जावे IT च्या डिपार्टमेंटा

kool.amol's picture
kool.amol in जनातलं, मनातलं
27 Dec 2022 - 6:12 pm

Non IT कंपनीत काम करत असताना IT संबंधित काही काम जर आलं (देव करो आणि अशी वेळ कोणावर न येवो) तर तो कठीण समय आहे असं समजावं. इथं IT म्हणजे तुमचा laptop. त्याचं कुठलंही काम हे IT सोडून दुसरं कुठलंच नसतं. स्वतःच डोकं बडवून झालं की आपापल्या कुलदेवतेचं नाव घेऊन कामाला लागावं लागतं. IT मध्ये जाताना आल इझ वेल अस म्हणून प्रवेश करावा तर सुरुवातीला तुम्हाला कोणीही हुंगत नाही. तिथला प्रत्येक जण आपापल्या 'ह्यात' असतो. मग आधीची ओळख, मनातला आवाज, कुलदेवतेची कृपा, आईचा आशिर्वाद, गतजन्माची पुण्याई आणि चालूजन्माचे कर्मभोग हे सगळे एकत्र आल्यावर तिथला कोणीतरी तुम्हाला विचारतो काय प्रॉब्लेम आहे? एकंदरीतच हा प्रश्न विचारण्यापूर्वी त्याच्या किंवा तिच्या चेहऱ्यावर खालीलपैकी एक किंवा अनेक किंवा ह्या सगळ्यांच मिश्रण असतं.
१. बुलेट ट्रेनच्या ड्रायव्हरला बागेतली झुक झुक गाडी चालवताना मनात येणाऱ्या भावना
२. आश्रम मधल्या बॉबी देओल च्या चेहऱ्यावर असणारे भाव.
३. विराट कोहली किंवा रोहित शर्माला पिंपळगाव बुद्रुक इथल्या ज्ञानगंगा कॉलेज ऑफ ओन्ली आर्टस् अँड कॉमर्स च्या वार्षिक गॅदरिंग मधल्या क्रिकेट सामन्यात 2 डाऊनला टेनिस बॉल सामन्यात खेळायला पाठवल्यावर असणारा उत्साह.

हे झाल्यावर मी माझा प्रॉब्लेम सांगतो आणि त्यानंतर त्याचा चेहरा बदलतो. पू ल च्या नारायण मधल्या नारू मामा माझी नाडी बांधून दे ना म्हणल्यावर नारायणाचा होतो ना अगदी तसा किंवा ब्रूस ली ला त्याच्या बायकोने डब्याचं झाकण उघडून दे म्हणल्यावर होतो अगदी तसाच! आपली अवस्था सुद्धा फारशी बरी नसते. आधीच काहीही कारण नसताना (असं आपल्यालाच वाटत असतं) लॅपटॉप फुगून बसलेला असतो आणि त्याबाबतीत आपलं ज्ञान हे एखाद्या चिंपाजी माकडाला जितकं असेल तितकंच असतं. शेवटी तो IT वाला त्याच्या चेहऱ्यावर वैतागण्याच्या सगळ्या भावमुद्रा आणून शेवटी भूतदया ह्या एकमेव भावनेनं काहीतरी करतो. ते नेमकं काय असतं हे चुकून विचारलंच तर तो रामसे बंधूंच्या भुतापेक्षाही भयानक नजरेने आपल्याकडे बघतो आणि गप्प बसतो.

आपल्याच घरातल्या माळ्यावर किंवा store room मध्ये बाहेरचा गेल्यावर जे काही वाटतं तेच आपल्या लॅपटॉप मध्ये काम करणाऱ्या ह्या माणसाकडे बघून वाटतं. 8 सेकंद ते 3 दिवस असा कितीही वेळ आपल्या कामाला लागू शकतो. पण शेवटी काम होतं, फक्त इथे जास्त बोलू नये नाहीतर काम उशिरा होतं. एकदा तर मी मला एका database ला access मिळत नाहीये म्हणून गेलो होतो आणि त्या महामहोपाध्याय माणसाने माझ्या laptop चे hardware कसे बिघडले आहे आणि बॅटरी प्रॉब्लेम मुळे असे होऊ शकते, दरवेळेस server च्या नावाने का बोंबा मारता? असा प्रतिप्रश्न विचारला आणि मी सुद्धा तू म्हणतो आहेस तर असेलही तसं! असं हसून म्हणालो. 2 दिवसांनी ते काम झालं.

आपल्याला काय ब्रूस ली च्या बायकोसारखं करायचं, डब्याचं झाकण उघडणं महत्वाचं आहे. असंही ब्रूस ली काय किंवा नारायण काय आरडाओरडा जास्तच करत असतात, ते मनावर घ्यायचं नसतं.

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

इथं IT म्हणजे तुमचा laptop. त्याचं कुठलंही काम हे IT सोडून दुसरं कुठलंच नसतं.
नाही कळलं.

आमच्यासारख्या लोकांना म्हणजे जे IT मध्ये काम करत नाहीत त्यांच्यासाठी लॅपटॉप सुरू होत नसेल तरी IT department लाच जावं लागतं. हे तसं बघायला गेलं तर IT च्या कामात येत नाही. त्यामुळे तसं म्हणलं आहे.

कंजूस's picture

27 Dec 2022 - 9:55 pm | कंजूस

ओके.

सिरुसेरि's picture

28 Dec 2022 - 2:24 pm | सिरुसेरि

छान निरिक्षण . हे प्रसंग आयटी कंपन्यांमधेही घडतात .

योगी९००'s picture

28 Dec 2022 - 4:58 pm | योगी९००

मी Non IT मध्ये म्हणजे सेल्समध्ये असताना एक IT dept चा विचित्र अनुभव आला.

आमचे बसायचे लोकेशन एका ऑफीसहून दुसर्‍या ऑफिसला झाले. तिथे कंप्युटर वगैरे चालू झाले पण इमेल, बेसिक नेटवर्क वगैरे configure झाले नव्हते. दोन दिवस IT dept ने काहीच केले नाही. म्हणून विचारायला गेलो तर IT Support staff म्हणाला की तुमच्याकडून इमेल आल्याशिवाय काम पुढे सरकणार नाही. मी त्या माणसाला दोन-तीन वेळा सांगितले की इमेलच चालत नाहीत तर पाठवणार कुठून? पण तो ऐकतच नव्हता. त्याकाळी office365 वगैरे नव्हते की जेणेकरून वेब अ‍ॅक्सेसने मेल चालेल. तसे असते तर बाहेरून मेल पाठवला असता. मेल फक्त आमच्याच कॉप्युटरवर व ती पण ऑफिसमध्येच चालायची.

शेवटी तडक त्या डिपार्टमेंटच्या हेडकडे गेलो व त्यांची लायकी काढली. मी सेल्समध्ये असल्याने लोकं वचकून असायचे त्यामुळे हवी ती चक्रे लगेच फिरली व १० मिनिटात तोच IT Support staff गपगुमान मान खाली घालून आला व सगळे कॉंप्युटर configure करून गेला. तो असेपर्यंत आमच्या सेल्सचा स्टाफने IT dept वर भरपूर टोमणे मारून घेतले.

धर्मराजमुटके's picture

28 Dec 2022 - 5:05 pm | धर्मराजमुटके

मी आयटी मधे असतानाची गोष्ट !
एका साहेबांचा मॉनीटर खराब झाला होता तेव्हा मी दुसरा घेऊन गेलो आणि खराब झालेला काढू लागलो. तर ते साहेब म्हणाले, आता माझा सगळा डेटा जाईल का त्या मॉनीटर बरोबर ?
काय बोलावे ते सुचेना ! या डायलॉगचा उगम तिथूनच झाला असावा.

तुषार काळभोर's picture

2 Jan 2023 - 6:06 am | तुषार काळभोर

:D :D :D
उत्पादन क्षेत्रातील आयटी विभागात काम करताना असे अनुभव येतातच.

राजेंद्र मेहेंदळे's picture

29 Dec 2022 - 12:27 pm | राजेंद्र मेहेंदळे

नॉन आय टी कंपनी काय किवा कोअर आय टी कंपनी काय, अडला हरी आणि गाढवाचे पाय धरी असे अनुभव सगळीकडेच येतात.
काही दिवसांपुर्वीची गोष्ट--माझ्या लॅपटॉपवर विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टिम होती. ईंटर्नल आय टी डिपार्टमेण्ट्ची सतत ईमेल्स येत होती की लवकर विंडोज ११ वर अपग्रेड करा. पण त्या साठी कमीत कमी २०जी बी रिकामी स्पेस हार्ड डिस्क वर पाहिजे होती. एकतर लॅपटॉपवर आम्हाला फक्त सी ड्राईव्हच असतो. त्यामुळे सगळ्या महत्वाच्या फाईल्स मेन स्क्रीनवरच ठेवल्या होत्या. (तो ही सी ड्राईव्हचाच भाग असतो). बर्‍याच फाईल्स डिलिट केल्या पण ७-८ जी बी पेक्षा जास्त जागा होईचना. मग उरलेल्या सगळ्या फाईल्स वन ड्राईव्ह(ऑनलाईन स्टोरेज) मध्ये टाकल्या. तरीही १०-१२ जी बी पेक्षा मजल जाईना.

आता मात्र वैतागलो आणि जी मुलगी मेलवर फॉलो अप करत होती तिला पिंग करुन म्हटले की तुच रिमोट कंट्रोल घे नी काय ते कर. तर जेव्हा मी पिंग करे तेव्हा ती बिझी आणि ती पिंग करे तेव्हा मी बिझी. मग तिच्या टिममधल्या दुसर्‍या एकाला पिंग केले, त्याने रिमोट कंट्रोल घेउन काय काय फाईल्स उडवल्या नी एकदाची २० जी बी जागा झाली. तोवर बराच वेळ झाला होता आणि मला आय टीमधले थोडेफार कळते असे त्याला समजले होते. बिचारा एकाच वेळी २-४ जणांचा रिमोट घेउन काय काय करत होता, शेवटी त्याने विनंती केली की मी तुम्हाला एक लिंक पाठवतो त्यावरुन विंडोज ११ डाऊनलोड करा नी .ई एक्स ए फाइल ईन्स्टॉल करा, एकदम सोपे आहे. मी बरे म्हटले . त्याने लगेच लिंक पाठवली आणि रिमोट कंट्रोल बंद करुन दुसर्‍या कामाला लागला. मी फाइल डाउनलोड केली तर ती ४ जी बी ची फाईल होती. झिप फाइल एक्सट्रॅक्ट करुन अजुन मोठी झाली. ईन्स्टॉल करायला गेलो तर पुन्हा स्पेस कमी असल्याचा एरर. त्या मुलाने केलेल्या काही स्टेप्स पुन्हा करुन बघितल्या तर स्पेस पुन्हा २० जी बी दाखवायला लागली. म्हटले चला पुन्हा प्रयत्न करु. असे करता करता माझे २ तास गेले आणि एकदाची (कशी काय देवालाच माहित) नवीन विन्डोज ओ एस ईन्स्टॉल झाली,

ऑफिसात असतो तर हे झेंगट करण्यापेक्षा सरळ आय टी बे मध्ये गेलो असतो आणि लॅपटॉप सोपवला असता, पण मग दिवसभर मिटिंगा मोबाईलवर घ्याव्या लागल्या असत्या तो एक वेगळाच ताप.

दुसरा अजुन भयानक अनुभव---एका नवीन क्लायंट प्रोजेक्ट्ला जॉइन झालो. त्यांची सिस्टीम अ‍ॅक्सेस करायला व्ही पी एन क्लायंट वापरुन वर्चुअल डेस्क्टॉप घ्यावा लागणार होता. ऑन बोर्डींग टीमने सुचनापत्रक पाठवले होते, ते वाचुन व्ही पी एन क्लायंट तर डाउनलोड केला, पण तो चालु करायला २ फॅक्टर ऑथेंटिकेटर (गूगल किवा मायक्रोसॉफ्ट टोकन आणि पासवर्ड) लागणार होता, ते काही मला जमेना. मग कॉल सेंटरचा नंबर डायल केला, तर तो टोल फ्री नव्हता. टाईमझोन बघुन प्रत्येक वेळी सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा असा कुठलातरी नंबर डायल करावा लागे आणि त्या त्या माण्सांचे दिव्य उच्चार समजुन घेउन घ्यावे लागत. या भानगडीत माझ्या मोबाईलचे बिल ४००-५०० रुपयांनी वाढले तो भुर्दंड वेगळाच. शेवटी फोनवर एक भला माणुस भेटला आणि तोवर माझेही २-३ वेळा सगळ्या स्टेप्स करुन झाल्याने पाठांतर झाले होते, त्यामुळे आमची कुंडली जमली आणि गंगेत घोडे न्हायले.

स्वधर्म's picture

29 Dec 2022 - 4:49 pm | स्वधर्म

असणे शक्यच नाही. प्रत्येक हार्डवेअरचे व सॉफ्टवेअरचे वेगवेगळे व्हर्जन्स, त्यांची एकमेकांसोबतची कॉंम्पॅटिबिलिटी आणि सतत अपग्रेड होत जाणार्या सिस्टिम्स, सिक्युरिटी, ओएस वगैरे मुळे कुणा एकाला सगळं माहिती नसतंच. हे प्रथम मनाशी समजून घेतलं की एकच काम उरतं. धीर धरणे आणि एक एक पायरीवरील प्रश्न सोडवत सोडवत जाणे. अर्थात जसे ट्यूबलाईटही न बदलू शकणारे काही ईलेक्ट्रीकल इंजिनिअर असतात, तसे अत्यंत बेसिक माहिती नसणारेही काही आयटी इंजिनिअर असतात. एका पठ्याने मला एका प्रॉब्लेमसाठी ‘सतत माऊस हलवत रहा, म्हणजे असा प्रॉब्लेमच येणार नाही’ असे सोल्यूशन दिले होते. आाता बोला.

चौकस२१२'s picture

30 Dec 2022 - 11:34 am | चौकस२१२

प्रत्येक हार्डवेअरचे व सॉफ्टवेअरचे वेगवेगळे व्हर्जन्स, त्यांची एकमेकांसोबतची कॉंम्पॅटिबिलिटी आणि सतत अपग्रेड होत जाणार्या सिस्टिम्स, सिक्युरिटी, ओएस वगैरे मुळे कुणा एकाला सगळं माहिती नसतंच.

हो हा मुद्दा खरंच विचार कारण्यासारखं आहे खरा त्यामानाने ... अभियांत्रिकी क्षेत्र घेतले उदाहरण म्हणजे स्ट्रेंग्थ ऑफ मटेरियल घ्या .. यात काम करणाऱ्याला येवेढा सतत चा बदल सहन करावं लागत नाही किंवा दंतवैद्य घ्या .... जरी नवीन तंत्रन्यान सर्वच क्षेत्रात येत असले आणि ते शिकावे लागत असले तरी मोठी उलथापालथ तशी कमी ( माझा अंदाज चुकीचा असू शकतो )

कंजूस's picture

30 Dec 2022 - 1:35 pm | कंजूस

प्रत्येक हार्डवेअरचे व सॉफ्टवेअरचे वेगवेगळे व्हर्जन्स, त्यांची एकमेकांसोबतची कॉंम्पॅटिबिलिटी आणि सतत अपग्रेड होत जाणार्या सिस्टिम्स

हो ना.
सिस्टीमच्या फोरमवर १)आता या धाग्यावर चर्चा बंद केली आहे,२)तुमचं मशीन नवं घ्या(फेका) अशी सोपी एकोळी उत्तरं असतात.
विंडोज १० शेवटची ओएस असं छातीठोक सांगणाऱ्या कंपनीने अचानक विं. १० शेवटची तारीख में २०२५ सांगून विं ११ आणली.
सिस्टम मध्ये क्र ४,९ ,१३ नसते. कारण म्हणजे काही देशात हे आकडे वाइट्ट समजतात.

तुमचा अनुभव हा खिडकीच्या त्या पलीकडचा आहे. पण खिडकीच्या अलीकडे देखील बरेच प्रकार असतात.
१. स्वतःचे वळवळणारे किडे System मध्ये सोडून प्रकरण अंगाशी आले कि IT च्या नावाने बोट मोडणारे.
२. एरव्ही घरात Router set करणारे, हापिसात आले कि एकदम “I am not IT person” म्हणून हात झटकणारे.
आग दोनो तरफ बराबरच है भाय!!!!

भागो's picture

29 Dec 2022 - 6:31 pm | भागो

शेर भाई+१११
निव्वळ जेलसी बरका.

परदेशात वेगळं.

कानडाऊ योगेशु's picture

30 Dec 2022 - 2:18 pm | कानडाऊ योगेशु

मी ही सॉफ्टवेअर कंपनीत काम करतो व आता पर्यंतच्या अनुभवाने एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे इथेही एक उतरंड असते.
सगळ्यात वर फायनान्स वाले असतात.
मग सिस्टीम्/आय.टी वाले आणि सगळ्यात शेवटी
प्रोग्रॅमर्/डेवलपर वगैरे.
वरच्या मंडळींकडे काही काम घेऊन गेले कि अगदी किती त्रास आहे असे भाव चेहर्यावर असतात.
फायनान्स/आय.टी वाले एरवी अगदी चांगले मित्रासारखे वागतात पण काही काम घेऊन गेले कि टाळंटाळ सुरु होते.
कंपनीत असाच एक आय.टी मध्ये काम करणारा इंजिनिअर होता जेव्हा पाहा तेव्हा टीम्स मीटींगवर त्याचे स्टेटस नेहेमी बिझी असे दिसायचे. एकदोनदा ग्रीन दिसला आणि त्याला संपर्क केला कि ते तो त्वरित बदलायचा. एकदा कंपनीच्या एम.डीलाच क्लायंट फेस करत असलेल्या काही समस्ये संबंधित त्याच्याशी संपर्क करायचा होता पण तो काही होऊ शकला नाही अथवा त्याच्याकडुन त्या समस्येचे निराकरण वेळेत झाले नाही. दुसर्या दिवशी त्याला लगोलग नारळ दिला गेला.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

30 Dec 2022 - 3:31 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

या सर्वांच्या पुढे आणि फार वरची लेव्हल बँकांच्या आय टी ची असते. माझ्याकडे जगभरातल्या आय टी वाल्यांचे खुप किस्से आहेत. अगदी थायलंड/नायरेजिया पासून ते लंडन पर्यंत.
मला एकदा नायरेजियाच्या एका बँकेतला आय टी हेड म्हणाला होता, एकाच सर्व्हर च्या अ‍ॅक्सेस वर तुमच काय असेल ते मॅनेज करा. संपूर्ण बँकेची एंड-टू-एंड सिस्टम (बॅक-टू-फ्रंट) मला इन्स्टाल करायची होती!! मी थंड पडलो होतो ४० डिग्री मध्ये! शेवटी मला बँकेच्या ट्रेझरी हेड कडे जाउन परवानग्या आणाव्या लागल्या.

बबन ताम्बे's picture

31 Dec 2022 - 5:04 pm | बबन ताम्बे
बबन ताम्बे's picture

31 Dec 2022 - 5:04 pm | बबन ताम्बे
बबन ताम्बे's picture

31 Dec 2022 - 5:05 pm | बबन ताम्बे
बबन ताम्बे's picture

31 Dec 2022 - 5:07 pm | बबन ताम्बे
बबन ताम्बे's picture

31 Dec 2022 - 5:08 pm | बबन ताम्बे

कृपया डिलीट करणे

बबन ताम्बे's picture

31 Dec 2022 - 5:10 pm | बबन ताम्बे
बबन ताम्बे's picture

1 Jan 2023 - 3:06 pm | बबन ताम्बे
कंजूस's picture

1 Jan 2023 - 4:57 pm | कंजूस

ते वायरी कुरतडतात.

राजेंद्र मेहेंदळे's picture

1 Jan 2023 - 7:11 pm | राजेंद्र मेहेंदळे

त्यात तळलेली भजी वगैरे ठेवा, म्हणजे पकडले जातील.

बबन ताम्बे's picture

1 Jan 2023 - 11:18 pm | बबन ताम्बे

मोबाइल वरुन प्रतिसाद प्रकशित करताना मिपा साइट एरर दाखवत होती. म्हणून खूप वेळा त्याच त्याच कॉमेंट आल्यात.
आता लॅपटॉप वरुन टाइप करत आहे.
१९९२-९३ च्या सुमारास आमच्या आर अ‍ॅन्ड डी ने डिझाईन ऑफिसमधे प्रॉडक्ट डिझाइनिंगसाठी काँप्युटर आणले. त्यावेळी पुर्ण हॉल मध्ये एक फूट ऊंचीचा प्लॅटफॉर्म करत , त्यावर टेबल आणि वर कॉम्प्युटर, हार्ड डिस्क, स्पिकर वगैरे ठेवत. प्लॅटफॉर्म च्या खाली वायरी असत.
सुरुवातीला लोक सकाळी तिथेच नाश्ता करत. नंतर कंपनीने ते बन्द केले. पण सुरुवातीला थोडे फार खरकटे सांडले असेल कदाचित, मला एक दिवस उंदिर फिरताना दिसला. मी साहेबांना सांगितले तर त्यांनी मला आय टी सर्व्हिस विभागात फोन करायला सांगितला. (त्यावेळी त्या विभागास मेंटेनन्स विभाग म्हणत) फोन केला तर पलिकडून उत्तर आले की उंदीर पकडायचं काम आमचं नाही :-)