Kooman The Night Rider (कुमान द‌ नाईट रायडर)

अनुस्वार's picture
अनुस्वार in जनातलं, मनातलं
3 Dec 2022 - 11:51 am

कटाक्ष:
मल्याळम इंग्रजी उपनामांसाहित
२ तास ३३ मिनिटे
गुन्हा, थरार, रहस्य
अमेझॉन प्राईम

.

ओळख-

ही गोष्ट आहे गिरीशंकर या केरळ पोलीस दलातील CPO (सिविल पोलीस ऑफिसर) ची. एका विशिष्ट कारणामुळे गिरीशंकर प्रचंड स्वाभिमानी, अहंकारी आणि अत्यंत चालाख पोलीस अधिकारी असतो. कितीही गुंतागुंतीचा गुन्हा असला तरी स्वतःच्या उपजत गुणांमुळे गिरी त्यांची सहज उकल करतो. याच स्वभावामुळे वैयक्तिक आयुष्यात गिरीचे अगदी शुल्लक कारणांवरून इतरांशी खटके उडतात. गिरी मात्र खाकी अंगावर चढवून पोलीसी ढालेचा वापर करत या भांडणांचा सूड उगवण्याची पद्धत अवलंबतो. परंतु मुळात घटनाच लहान असल्याने या गोष्टींचा बोभाटा होत नाही. गिरीच्या स्वभावात बदल होण्याऐवजी तो सूड उगवण्याच्या वरच्या पातळ्या गाठत राहतो. या सूडाच्या प्रक्रियेत गिरीच्या समोर अनपेक्षितपणे एक वेगळीच घटना येते. नायक स्वतःच्या सूडचक्रात गुरफटत असताना घटनेमागून घटनांच्या मालिका येत राहतात. त्याला समांतर गिरीचे सूड-द्वंद्व चालूच राहते. मात्र उपजत अहंकारामुळे गिरीला हा नवा गुन्हेगार म्हणजे त्याच्या पोलिसी स्वाभिमानाला पोहोचलेली ठेच असेच वाटते. त्यामुळे या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी गिरी स्वतःचे कसब पणाला लावतो. गिरीचे सूडचक्र कुणामुळे आणि कसे चालू होते? या सूडाच्या महाभारतात गिरीचा 'शकुनी मामा' कोण? कोणत्या गुन्ह्यांमुळे गिरीतील पोलिसाच्या स्वाभिमानावर घाव होतो? गिरीचा पोलीसी अहंकार त्याला धाडसाच्या/वेडेपणाच्या कोणत्या थरापर्यंत घेऊन जातो? हे गुन्हेगार गिरीच्या ओळखीचे असतील की हा आंतरराज्यीय कटाचा भाग आहे? आणि मुळात भावनेच्या आहारी जाऊन गुन्हेगारांचा पाठलाग करताना गिरी यशस्वी होतो की त्याला या सर्वांची किंमत मोजावी लागते? यासाठी पाहा 'कुमान द नाईट रायडर'.

शिल्लक-

'कुमान' चा मल्याळम भाषेतील अर्थ 'साधारण' असा आहे.‌ हा चित्रपट रात्रीवर स्वार होणाऱ्या एका साधारण मनुष्याची कहाणी आहे. दृश्यम आणि दृश्यम २ या मुळ मल्याळी चित्रपटांचा लेखक-दिग्दर्शक जितू जोसेफ हा 'कुमान'चा दिग्दर्शक आहे. चित्रपटाचे पार्श्व संगीत सौम्य परंतु परिणामकारक आहे. चित्रपटातील एकमेव गाण्यातून मनुष्य स्वभावावर अर्थपूर्ण टिपण्णी केली आहे. हा चित्रपट केवळ थरारपटांच्या चाहत्यांसाठी आहे. चित्रपटात कुठेही प्रेमप्रसंग, विनोद, भावनिक ओलावा यांना जागा नाही. अथपासून इतिपर्यंत केवळ थरार! अर्थात चित्रपट दक्षिणेकडील असल्याने नायकाच्या क्षमतांवर प्रश्नचिन्ह उभे केल्यास पाप लागू शकते. परंतु चित्रपटाचे यश हे की संपूर्ण चित्रपटात क्षणभरही हे अवास्तव आहे याची जाणीव होत नाही. आपल्याला वास्तवापासून दूर नेणे हा मनोरंजनाचा एक प्रधान हेतू नसतो काय? चित्रपट आपला अगदी अजगरासारखा हळूहळू ताबा घेत शेवटी सर्वांगाला घट्ट विळखा घालतो. त्यामुळे थरारपटांवर वर प्रेम करणाऱ्यांना हा चित्रपट प्रचंड आवडेल यात अजिबात शंका नाही.

कलाचित्रपटआस्वादसमीक्षाशिफारस

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

3 Dec 2022 - 7:11 pm | राजेंद्र मेहेंदळे

हिंदीतील विनोदी चित्रपट "शहेन्शहा" सारखी गोष्ट वाटते आहे.

कुमार१'s picture

4 Dec 2022 - 7:34 pm | कुमार१

आज चित्रपट पाहिला.
मध्यंतरापर्यंत आवडला अगदी जितू जोसेफ छाप आहे त्यावर.
उत्तरार्धात मात्र स्वामी- पूजा- अंधश्रद्धा- तृतीयपंथी या सगळ्या प्रकारामुळे कंटाळा आला.

लांबी कमी असायला हवी होती.

शानबा५१२'s picture

10 Dec 2022 - 2:42 pm | शानबा५१२

पण हे वाचुन कुमान कसा आहे हे बघावसे वाटतेय पण कोणी जास्त सिरीयसली घेतल तर स्वता: कुमान बनेल अस वाटतय. :-)))))

मिपावर फोटो फ्लीकरमधुन उपलोड करता येत होता ना?

शानबा५१२'s picture

10 Dec 2022 - 3:00 pm | शानबा५१२

finally?

शानबा५१२'s picture

10 Dec 2022 - 3:06 pm | शानबा५१२

झायल एकदाच!