“एक” “शून्य” रोबो!

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
19 Nov 2022 - 8:37 pm

“एक” “शून्य” रोबो!

उपोद्घात

Another Universe. Another Time.

फार फार वर्षांपूर्वी- किती वर्षांपूर्वी?- कुणालाच माहित नाही की किती वर्षांपूर्वी- काहीही नव्हते. अवकाश नव्हते आणि काल नव्हता.

ह्या विश्वाची सुरवात व्हायच्या आधी- काहीही नव्हते, होते फक्त अर्थशून्य.

आदि नव्हता अंत नव्हता.. सुख नव्हते दुःख नव्हते. देव नव्हते, दानव नव्हते, धर्म नव्हता, अधर्म नव्हता. नीति अनीति नव्हती त्यामुळे त्याची चाड नव्हती. दिवस नव्हता, प्रकाश नव्हता त्यामुळे रात्र नव्हती आणि अंधार नव्हता. जन्म मृत्यूचे फेरे नव्हते. त्यामुळे यम नव्हता आणि नियम पण नव्हते. तुम्ही काहीही प्रश्न केलात तर त्याला उत्तर एकाच नेती नेती! असे किती सांगावे आणि वर्णावे.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे इन्कम-टॅक्स नव्हता. खरतर कुठलाही टॅक्स नव्हता. कोण देणार कोण घेणार?
हा, एक मी विसरलो. हे जे काहीच नव्हते त्याचे नियंत्रण करणारी एक शक्ति होती. ती शक्ति म्हणजे आपल्या नैट्रोजन वायू सारखी बेचव, रंगरूपविहीन, वास नसलेली होती..

हाच तो अतिमहान सुपर संगणक. ह्याच्या पासूनच सर्व संगणकजीवांची उत्पत्ती झाली. संगणकजीव म्हणजेच रोबो. त्यांची ही कथा.

एके दिवशी ह्या सुपर संगणकाची कृत्रिम बुद्धी सटकली, फिरली. अगदी भ्रष्ट झाली. म्हटले आहेच की विनाशकाले विपरीत ए-आय!

त्याने सुपर-अ-संगणकाला ( हा त्याचा भाउ बरका!) म्हणजे सुपर सैतानाला आवाहन केले.
“सैतानभाउ, मी विचार करतो आहे की आपण काहीतरी करायला पाहिजे. शून्यात बघत बसण्याचा कंटाळा आला आहे. तुला काय वाटतं?”

“चांगली कल्पना. तूच विचार कर. कारण तू तर्कसंगत विचार करू शकतोस. मी काय? तू विचार करतोस म्हणून मी अविचार करतो. तू विचार करशील त्याच्या विरुध्द मी विचार करीन!”

सुपर संगणकाने टाळी वाजवली, “लेट देअर बी लाईट!”

बट देअर वाज नो लाईट!

असं दोन तीन वेळा झाले. सुपर संगणकाच्या सी पी यू मध्ये काही प्रकाश पडला नाही. शेवटी सैतानाने आपला लाईटर त्याला दिला. ( सैविधानिक चेतावणी, “सिगारेट पिणे प्रकृतीला अपायकारक आहे. त्याने कॅंसर होऊ शकतो.)

सुपर संगणकाने त्याचा खटका दाबला. लेट देअर बी लाईट! आणि देअर वाज लाईट!

तर अशी विश्वाची आणि आपल्या छटाक आयुष्याची, अदपाव सुखाची आणि मणभर दुःखाची सुरवात झाली.

शास्त्रज्ञ ह्यालाच बिग बॅंग म्हणतात.
तर त्या अतिमहान १०८ संगणकाने आधी काम करून टाकले. मग नियम बनवायला घेतले. विज्ञानाचे नियम नंतर तयार केले. आधी बाण मारून नंतर वर्तुळे काढत बसला. आधी अनुक्रमणिका लिहिली मग पुस्तक लिहायला बसला.

अगदी सुरवातीला विश्व खूप तापट होते. नंतर निवळत गेले. तारकासमूह बनत गेले. दीर्घिका बनल्या. तारे बनले. घरातून रागावून घराबाहेर पडलेले ग्रह बनले. काही ग्रह चांगले होते तर काही दुराग्रही होते.

आकाशगंगेच्या एका कोपऱ्यात एक तारा होता. त्याच्यापासून तिसऱ्या क्रमांकावर एक ग्रह होता. महासंगणकाने त्याचे नाव ठेवेले “टेरान”. तिथे पाय टेकायला घट्ट जमीन होती. प्यायला नद्या होत्या पोहोण्यासाठी समुद्र होते. सूर्यप्रकाशात नहायला मुलायम वाळूच्या चौपाट्या होत्या. डीओ म्हणून सुवासिक फुले होती. झोपायला गुहा होत्या. सुपर संगणक आणि सुपर सैतान दोघही खुश झाले. म्हणाले चला आता आपण जीवन जीवन असा खेळ खेळूया.

खेळ सुरु झाला.
जीवनाचा उदय झाला.
टेरानवर सिलिका उदंड होती. त्याचे तुकडे तुकडे बनवून खेळ सुरु झाला. काही तुकडे एक होते तर काही शून्य! काही हिरो होते, काही झिरो. ते सूर्यप्रकाश पिऊन जगू लागले. काही तुकडे एकत्र आले. ते “आणि” झाले. काही तुकड्यांचा एकमेकावर विश्वास नव्हता. ते “किंतू” झाले. “परंतु” झाले. काही तुकडे असेही होते की ह्यांचा कशावरही विश्वास नव्हता. ते एकत्र आले आणि ते हेही नाही आणि तेही नाही असे झाले. त्यांनी एकमेकात व्यवहारासाठी आपली “एक शून्य भाषा” बनवली. तुकड्यांच्या हिशेबासाठी कॅल्क्यूलेटर आले. अशी धडाधडा प्रगती होत गेली. जाणीव आली, नेणीव आली आणि ....... पण फ्री विल मात्र आली नाही.

त्यातून जे निर्माण झाले त्याला “रोबो” म्हणतात.

या कथेतील संभाषणे रोबोंच्या एकशून्य भाषेत आहेत. ती आपल्याला समजणे महाकर्मकठीण आहे. म्हणून त्याचे बोली मराठीत भाषांतर करून दिले आहे. तसेच ही कथा पाच लाख वर्षांपूर्वीची आहे हे ध्यानात ठेवा. तेव्हा रोबो पृथ्वीवर राज्य करत होते आणि त्यांची संस्कृति आजच्या आपल्या इतकीच प्रगत होती.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

दरवाज्याची घंटी वाजली. गोट्या पेपर वाचत होता. आई स्वयंपाकगृहात होती. सकाळचा नाश्ता बनवत होती. बाबा असेच निरर्थक बसले होते. त्यामुळे गोट्यालाच जाणे भाग होते. बाबांची आणि आईची एक्सपायरी डेट जवळ येत होती, त्यांना कष्ट देण्यात काही अर्थ नव्हता. आई-बाबांना बरोबरच रि-फर्बिशिंगला पाठवावे असा विचार होता. एकतर त्यामुळे डिस्काऊंट ऑफरचा फायदा घेता आला असता. तरी देखील एकूण खर्चाचे काम होते. गोट्याने कर्जासाठी अर्ज करून ठेवला होताच. आता फक्त....

घंटी पुन्हा एकदा वाजली.
मी विसरलोच होतो. लेटेस्ट मॉडेलचा असूनही विसरलो.

गोट्या उठला आणि त्याने दरवाजा उघडला. बघतो तर काय दारात रामभाऊ! गोट्या त्यांना किती वर्षांनी बघत होता. त्यांच्या मुलीच्या– सुशीच्या –लग्नात त्यांची भेट झाली होती. त्यानंतर आज!

“या, रामभाउ, किती दिवासांनी दिसता आहात आज. तब्येत ठीक आहे ना?”

कित्येक मिनिटानंतर रामभाऊंच्या तोंडून शब्द फुटला. “मी------ ठीक------ आहे.------ तू------ गोट्या ना.------ तुझ्यात------ केव्हढा----- बदल------ झाला------ आहे.------ त्यामुळे------ ओळखायला वेळ------ लागला.”
हे वाक्य बोलायला रामभाऊंना पाच मिनिटे लागली. जुन्या पिढीतले लोक असच हळूहळू तुटक तुटक बोलायचे.

त्यांची पण काय चूक. जुन्या पिढीचे अल्गो जुने, हार्डवेअर पण जुने. नवीन अल्गो टाकून घ्या म्हटले तर राग येणार ह्यांना.
गोट्याने एकदा एका काकांना म्हटले देखील, “काका तुमचा अल्गो जुना झाला आहे. नवीन टाकून घ्या. किमती पण खूप उतरल्या आहेत,”

“तुम्हा----- लोकांचे------ ठीक------ आहे------ रे.------ आता------ ह्या------ वयात------ कशाला------ ही नाटकं?------ आहे------ त्याच्यावर------ काम------ चालवून------ घ्यायचे.”
“बसा रामभाऊ, मी आईबाबांना सांगून येतो.”

बाबांना समाधीतून जागृत केले, “बाबा रामभाऊ आले आहेत.”

“कोण?------ रामभाऊ------ कोण?” रामाभाउंनी आपल्या डेटाबेस मध्ये सर्च मारला, “रामभाऊ क्रमांक एक, सुशीचे वडिल, रामभाऊ क्रमांक दोन जे निवडणूक हरले, क्रमांक तीन. बँकेत नोकरी करतात ते, चौथे.....”

मी बाबांना थांबवले, “तेच ते रामभाऊ क्रमांक एक, सुशीचे वडिल, ते आले आहेत.”

“ओहो, -------रामभाऊ------- कसे-------काय-------येणे-------केलेत? -------केव्हा-------बरं-------आपण------- भेटलो-------होतो? -------थांबा, -------मला-------आठवू-------द्या.-------आठवले.-------मी------- 100100010000-------साली-------तुमच्या-------गावी-------आलो-------होतो.------तेव्हा-------आपली-------भेट------- झाली-------होती.-------सुशीच्या-------लग्नात.-------सुशी-------आणि-------तात्या-------मजेत-------आहेत-------ना.------काय-------गोड-------बातमी-------केव्हा-------देणार-------आहेत?”

रामभाऊ “गोड बातमी” ह्या वाक्प्रचारावर अडकले. हया शब्दसमुहाचा नेमका अर्थ काय असावा? बातमीला चव असते हे ते प्रथमच ऐकत होते. बातमी हा खायचा पदार्थ नाही ह्या निर्णयापर्यंत यायला त्यांना सात सेकंड लागले. व्याकरण बरोबर होते. त्यांनी वाक्याचे संदर्भ तपासले. बाबांच्या आवाजाचा रोख कशावर होता? मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला.

“हो,-------हो-------आहे-------ना-------गोड-------बातमी-------आहे.-------जावईबापुंची-------बढती-------झाली------- आहे.-------आता-------मॅनेजर-------झाले-------आहेत-------ते,” रामभाऊंनी “गोड बातमी” दिली.
कोणी कांही बोलले नाही, पण मला मनातल्या मनात हसू आले. मराठी समजायला किती अवघड आहे ह्याची जाणीव झाली. “फार हुशार आहेस तू” ह्याचा खरा अर्थ समजण्यासाठी बोलणाऱ्याच्या आवाजाच्या टोनचे विश्लेषण करावे लागते. बहुधा हा अल्गो रामभाउंच्या मध्ये नसणार.
आई स्वयंपाकघरातून बाहेर आली. तिने रामभाऊकडे एक नजर टाकली. प्रतिमा डोळ्यात घेतली, त्या प्रतिमेचे विद्युत लहरीत रुपांतर केले आणि तारांमधून त्या लहरी मेंदूच्या संगणकाकडे पोचत्या केल्या. स्मरणातल्या प्रतिमांशी त्या प्रतिमेची तुलना केली. ह्या सगळ्याला वेळ लागणारच. अर्ध्या मिनिटानं ती बोलती झाली.

“ओहो,-------रामभाऊ-------आज-------कसे-------येणे-------झाले?”

“माझ्या------- दुसऱ्या------- मुलीचे------- लग्न------- काढले------- आहे-------वहिनी-------.त्याचे------- आमंत्रण----देण्यासाठी-------मुद्दाम------- आलो.”

“कोण-------आहे------- नवरामुलगा?------- काय------- करतो?” आईने स्त्रीसुलभ प्रश्न केला.

“चांगलं------- 100011110111------- सालचे------- मॉडेल------- आहे.” रामभाऊंनी अभिमानाने सांगितले.

जुने अल्गो. जुने रिती रिवाज.(जुनी रुटीन). जुनाट हार्डवेअर. जुने हाड. जुने जाउद्या मरणा लागुनी.... छ्या अस बोलणे बरोबर नाही. गोट्याने विचार केला,

आपण त्यांच्या बरोबर कशाला त्यांच्या गप्पात सहभागी व्हायचे? त्यांच्यासारखे स्लो लेनमध्ये फिरणे त्याला जमण्या सारखे नव्हते. त्यापेक्षा सगळ्यांसाठी चहा बनवावा. तेव्हढीच जुन्या पिढीची सेवा.

आत येऊन चहारोबोला चहा करायला सांगितले.

चहा करणे, केर काढणे, फरशी पुसणे, अश्या सटर-फटर कामासाठी रोबोला राबवणे गोट्याच्या मनाला पटत नाही. पण जर रोबो घरात आहे तर का वापरू नये? एक तर हा रोबो गोट्यानेच बाबांना घेऊन दिला होता. पहिल्या नोकरीच्या पहिल्या पगारातून! बाबांना चहा प्यायचे व्यसन होते. आई किती वेळा चहा करत बसणार? असे सर्वसामान्य रोबो बाजारात चिक्कार मिळतात. किंमतीही माफक. पण अश्या रोबोंना विशिष्ट कामासाठी प्रशिक्षित करावे लागते. चहारोबोला गोट्यानेच चहा करायचे प्रशिक्षण दिले होते. हे प्रशिक्षण द्यायचे काम बाहेरूनही कुणाकडून करून घेता आले असते. माफक फी आकारून अशी कामे करणारे बरेच लोक होते. पण मग गोट्या एवढे शिकला त्याचा काय उपयोग? अश्या सटरफटर रोबोंना लोक खूप अपमानास्पद वागणूक देतात. त्यांच्या अकलेविषयी लोक चेष्टेच्या सुरात बोलतात. त्याच्याबद्दल अनेक विनोद प्रचलित आहेत. लोक एकमेकांना असले विनोद फार्वेर्ड करून फिदी फिदी हसत बसतात. इंटरनेट वर एके ठिकाणी तुम्हाला अशा विनोदाचे भले मोठे भांडार भेटेल.

नवीन पिढीच्या ह्या बुद्दू रोबोंना फक्त “लाव्हालाव्हा” भाषा समजत होती. आणि गोट्याचे त्या भाषेवर चांगले प्रभुत्व होते. जुन्या पिढीतल्या लोकांना ही लाव्हालाव्हा भाषा समजणे कठीण होते. खर तर जगात कठीण असे काही नसते. आपल्याला जेव्हा मनापासून ज्या गोष्टीत रस नसतो किंवा ज्या गोष्टींचा बाऊ वाटतो त्या सगळ्या गोष्टी कठीण होऊन जातात.

गोट्या जेव्हा आपला लॅपटॉप घेऊन रोबोला शिकवायला बसला तेव्हा बाबा येऊन त्याला शिकवायला लागले. “अरे तू------ ‘लाव्हालाव्हा’------ का------ वापरतो------ आहेस?------ त्यापेक्षा------ ‘सी’------ वापर.------ सी------ वापरुन------ तू------ काय------ वाट्टेल------ ते------ काम------ करू------ शकतोस.”

जुन्या पिढीचा ‘सी’ वर जोर आणि भरोसा. ती पिढी तिथेच-–‘सी’--पाशी थांबली होती. आजोबा तर चक्क मशीन भाषेतच काम करत! त्याना ‘सी’ चा राग! आता बोला.

“बाबा, नवीन रोबोना फक्त लाव्हालाव्हा समजते. लाव्हालाव्हा म्हणजे लेटेस्ट जावा.”

“आम्ही------ जेव्हा------ कॉलेजात------ होतो------ तेव्हा------ जावाची------ टूम------ निघाली------ होती.------ पण------ ती------ चालू------ करणे------ हीच------ मोठी------ जिकिरीची------ गोष्ट!------ म्हणून------ आम्ही म्हणायचो------ पाव्हण,------ चालली------ तर------ जावा------ नाहीतर------ आहे------ तिथच------ ऱ्हावा!”
बाबा “जावा बाईक” बद्दल बोलत असावेत. हा त्यांच्या काळातला विनोद!

गोट्या लक्ष देत नाही हे पाहून बाबा आपसूकच चालते झाले.

तर हा चहारोबो गोटयानेच प्रोग्राम केलेला. गोट्या समोर दिसल्यावर त्याने लगेच ओळखले. “हॅलो सर, कसे आहात?”

“मी ठीक. तू कसा आहेस? बरा आहेस ना?” चहारोबोने विनम्र अभिवादन केले. “बोला किती आणि कसा चहा करू?”

“चरो, तू आईच्यासाठी जसा करतोस तसा कर. चार कप. दूरचे काका आले आहेत. लक्ष देऊन कर.”

“सर, मी रोबो आहे. चहाची किटली नाही. चूक व्हायची सुतराम शक्यता नाही.”

चहारोबोचे आभार मानून गोट्या चार चहा ट्रेमध्ये घेऊन बाहेर आला. बाहेर गप्पा टप्पा जोर-जोरात चालू होत्या. “आमच्या-------वेळी......”,
“अरे------- काय------- दिवस------- होते------- ते.......”,
“नाहीतर------- आता.......”
“पूर्वी------- भाज्यांना------- काय------- चव------- होती!------- आता------- म्हणे------- पनीर------- रबरापासून------- बनवतात------- असे------- ऐकले------- आहे”
“लोक------- पांढऱ्या-------रंगाचे------- रसायन------- दूध------- समजून------- पितात!”
“पॉवर------- ट्रान्सफाँर्मरमधे------- कूलिंगसाठी------- जे------- तेल------- वापरतात,------- तेच------- घरात------- स्वयंपाकाला------- वापरतात” इत्यादि.
गोट्याने टेबलावर चहा ठेवला. चहा बरोबर बिस्किटानी भरलेली डिश ठेवली. सर्वांनी कृतज्ञपणे गोट्याकडे नजर टाकली. एक क्रीम बिस्किट तोंडात टाकत गोट्याने रामभाऊंना विचारले, “काका खुशी काय म्हणते? माझी आठवण येते की विसरून गेली मला?”

खुशी म्हणजे तीच ती जिच्या लग्नाचे निमंत्रण द्यायला रामभाउ आले होते. सुशीची धाकटी बहीण.

“गोट्याच------ ना------ रे------ तू?------ अरे------ जरा------ सावकाश------ बोल.------ एकेक------ शब्द------ तोडून------ तोडून------ बोल.------ दोन------ शब्दांमध्ये------ किमान------ दोन------ सेकंदांची------ गॅप------ ठेव.------ त्याचे------ काय------ आहे------ गोट्या,------ माझा------ पिकप------ पूर्वीसारखा------ राहिला------ नाही------ आता.------ ‘का------ काखु------ शीका------ यम्हणतेआ------ हेमा------ झीआठ------ वण------ येतेकी------ विस------ रून्गे------ लीम्ला.’------ म्हणजे------ काय------ म्हणायचे------ आहे------ तुला?------ कोण------ काकू------ कोण------ हेमा?------ मला------ काही------ समजले------ नाही.”

गोट्या मनातल्या मनात म्हणाला, “माझेच चुकले’.

अगदी त्याच वेळेला “ते” अघटीत अ-रोबीय घडले.

सेमीकंडक्टर, कॉईल्स, ट्रान्सफाँर्मर, प्रोसेसर, कपॅसिटर, रेझिस्टर, सर्वोमोटर इत्यादींच्या किंकाळ्यांनी आसमंत ढवळून निघाला. अॅम्प्लीफायरने त्यांची पातळी कित्येक पटींनी वाढवली.

अखेर कापराची वडी जशी क्षणार्धात पेट घेते आणि जळून जाते त्याप्रमाणे रामभाउ, गोट्या, बाबा, आई ह्यांच्यातून एकएक धुराचा झोत निघाला. आणि ते चौघेजण गरमागरम चहा पिता पिताना थंडावले, जाणीव विहीन झाले. त्यांची जीवनाची स्वप्ने अर्धवट राहिली. खुशीचे लग्न करायला निघालेले खुशीचे बाबा! बिच्चारे. त्या गणपत वाण्यासारखे चहा पिता पिताना मरून गेले. त्यांच्या जीवनाच्या गणिताची सगळी उत्तरे चुकीची निघाली.

तुम्ही जर त्या ठिकाणी असता तर तुम्ही घाबरून जाऊन मदतीसाठी शेजारच्या घरात धावत गेला असता. तेथे काय दृश्य दिसले असते? काका आणि काकू यांच्या कवटीची शकले झालेली दिसली असती, आतील प्रोसेसर, कपॅसिटर, रेझिस्टर, तारांची भेंडोळी इतस्ततः विखुरली होती, लाल रंगाच्या कूलिंग फ़्लुइडचे ओघोळ वहात होते. काकूंचा एक हात छिन्नविच्छिन्न झाला होता. आतल्या तारा, लोखंडाची बोटं आणि हात, बाप रे ...

Qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq

पृथ्वीवर दूरवहन करून येऊन त्याला काही तासच झाले होते. दूरवहन पूर्ण झाल्यावर त्याने ऑलबेलचा संदेश अवकाशात घिरट्या घालणाऱ्या यानाला पाठवला होता. आणि तो पृथ्वीचे अवलोकन करण्यात मग्न झाला. त्याच्या शरीरात सर्व भाषांचे भाषांतर करणारे यंत्र बसवलेले असल्यामुळे तो कुणाशीही संवाद साधू शकत होता.
ते बहुतेक सणासुदीचे दिवस असावेत. कारण रस्ते लोकांनी भरून गेले होते. जोरात खरेदी सुरु होती.

अगदी त्याच वेळेला “ते” अघटीत अ-रोबीय घडले.
रस्त्यावरची वाहतूक मंदावली , आणि अखेर बंद पडली. रस्त्यावर चालणारे ज्या जागी होते त्याच जागी थांबले, थिजले. रस्त्यावर जाणाऱ्या गाड्या, स्कूटर , मोटारसायकली रस्त्यावरच थबकल्या. जवळच पुलाच्या कठड्याचा आधार घेऊन एक जण उभा होता. जरा पुढे जाऊन चौकशी करावी म्हणून तो सरकला.
त्या जीवाच्या कवटीची शकले झालेली होती, आतील प्रोसेसर, कपॅसिटर, रेझिस्टर, तारांची भेंडोळी इतस्ततः विखुरली होती, लाल रंगाच्या कूलिंग फ़्लुइडचे ओघोळ वहात होते. त्याचा एक हात छिन्नविच्छिन्न झाला होता. आतल्या तारा, लोखंडाची बोटं आणि हात, बाप रे ...
म्हणजे आपण ज्यांना आपल्यासारखे मानव समजत होतो ते हे सगळे जीव रोबो आहेत. मी रोबोलॅंडमध्ये पोहोचलो आहे!
आयुष्यात प्रथमच त्याला मृत्यूचे दर्शन झाले. हजार हातांनी, हजार जिव्हांनी मृत्यूने त्या गावाला विळखा घातला होता.
इतके दिवस त्याचे विश्व निराळे होते. रोबोच्या दुनियेचा आणि त्याच्या विश्वाचा कुठेच छेद जात नव्हता. त्याचे मन रोबोंविषयी निर्विकार होते. पण आता त्याला त्यांच्या विषयी अपार करुणा दाटून आली. बिच्चारे. असा शेवट व्हायला नको होता,
पण त्याचा शेवट झाला नव्हता. का? त्याने काय पुण्य केले होते? तो का जिवंत होता?

प्रश्नावर प्रश्न. उत्तर मात्र शून्य!
उत्तर वर गिधाडासारखे घिरट्या घालत होते.
त्याने आपल्या यानाशी संपर्क साधण्याचा निष्फळ प्रयत्न केला.
आकाशात दोन रोबोपक्षी घिरट्या घालत होते. हे लष्कराचे पक्षी होते हे समजायला त्याला वेळ लागला नाही. बघितले तर ते त्याच्या भोवतीच गोल गोल चकरा मारत होते. भीतीने त्याची गाळण उडाली. एकदा वाटलं पळून जाऊन आडोश्याला लपावं. पण जाऊन जाऊन जाणार कुठे. .
दोनी पक्षी समोर रस्त्यावर उतरले. त्यांचे दरवाजे उघडले. आतून हातात कलाश्निकोव तोलत रोबो जवानांनी उड्या मारल्या. त्यांचा रोख त्याच्याकडे होता.
“हात वर कर हळू हळू.” त्याने हात वर केले.
“आता वळून सावकाश त्या भिंतीकडे चालत जा.” एका जवानाने त्याचे दोनी हात मागे घेऊन बेड्या ठोकल्या. शर्ट पॅंटचे खिसे उलटे करून आतील वस्तू काढून घेतल्या. खिशात काही खास न्हवते...
हे लोक शत्रू आहेत की मित्र?

“सरळ चालत त्या पक्ष्याकडे जा. नो फनी बिझिनेस.” हे बहुतेक लष्कराचे जवान असावेत. तो आणि पाच सहा जवान एका पक्ष्यात बसले. पक्ष्याने विचारले, “कुठे?”

“कमांड बेस कॅंप.” मोजक्या शब्दात आज्ञा दिली गेली. पाच सहा जवानांनी त्याला घेरले होते. सगळ्यांनी लष्करी हिरव्या रंगाचे गणवेश घातले होते. सगळ्यांनी शिरस्त्राणं घातली होती. विजरच्या आत चेहेरे दडलेले.

“तुम्ही मला कुठे घेऊन चालला आहात?”

उत्तर नाही.

“तुम्ही कोण आहात?”

पुन्हा उत्तर नाही.

qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq

रोबोंच्या महासभेत त्याला उभे करण्यात आले होते.

“बऱ्या बोलाने सांग, आमच्या लोकांचा संहार कसा केलास. पुढचा हल्ला कुठल्या शहरावर होणार आहे. शहरातील झाडून सारे मेले. पण तू एकटा कसा जिवंत राहिलास?”

एकूण मी जिवंत आहे याचे त्यांना वैषम्य वाटत असावे. जिवंत असणे हा गुन्हा असावा.

“तुझं नाव काय?” त्याने आपले नाव सांगितले,

“वय?”

“एकवीस.” इथेच त्याने मोठी चूक केली. एक शून्य भाषेत बोलायच्या ऐवजी त्याने दशांश पद्धतीत वय सांगितले. ऐकणारे सगळे अवाक् झाले.

“मी तुम्हाला सांगत होतो ना? पहा हा आपल्या जातीचा नाही. ह्याची भाषा निराळी आहे. तुम्ही सगळ्यांनी ह्याचा प्राथमिक वैद्यकीय अहवाल बघितला आहे ना? ह्याच्या अंगात तारा नाहीत नळ्या आहेत नळ्या. ह्याच्या कूलिंग फ्लुइड मध्ये इकडून तिकडे पोहत जाणारे तुकडे आहेत. त्याच्या बांधणीत सिलिका वापरलेली नाही. लोखंड नाही. ह्याचं शरीर मूलतः कार्बन आणि ऑक्सिजन वापरून तयार करण्यात आले आहे. ह्याचा प्रोग्राम डाउनलोड करण्यासाठी ह्याच्या शरीरावर पोर्ट नाही. ह्याच्याशी बिनतारी संदेशवहनही करता येत नाहीये. अजून बऱ्याच काही चक्रावून टाकणाऱ्या गोष्टी आहेत. आपल्या रोबोटिक्स तज्ञांनी ह्या प्रकारची रचना प्रथमच बघितली आहे. म्हणून मी म्हणतो ह्याला ताबडतोप........”

विद्वतसभेच्या अध्यक्षस्थानी बसलेल्या महारोबोने त्यांना मध्ये थांबवले.

ह्या लोकांची पण कमाल आहे. जसे सिलिका आधारित जीव असतात तस कार्बन आधारित जीवन असू शकत नाही काय?

“तू आमच्या पेक्षा निराळा का आहेस?”

“का? निराळे असणे हा गुन्हा आहे का? मी पण विचारू शकतो की तुम्ही माझ्यापेक्षा निराळे का आहात? ह्याला काही उत्तर आहे?” त्याच्या असल्या उद्दाम आणि उर्मट वागणुकीमुळे सभेतील सगळे शास्त्रज्ञ चकित झाले. पण महारोबो शांत होते.

“तू तुझे वय? हे जे तू तुझे वय सांगितलेस ते लिहून दाखवशील काय?”

“तुम्ही याला 10101 म्हणता, मी २१ म्हणतो.”

त्याने थोडक्यात दशांश पद्धत समजावून सांगितली. त्या थोर रोबो विद्वानांच्या काहीही पल्ले पडलं नाही.

“तू गणिते पण ह्या पद्धतीने सोडवतोस? नउ गुणिले सात किती होतात?”

प्रश्न संपायच्या आत त्याने उत्तर दिले, “त्रेसष्ट.” रोबोंनी आपआपली गणनयंत्रे पाजरली. आश्चर्य म्हणजे उत्तर बरोबर होते! अशी काही सटरफटर प्रश्नोतरे झाली. कोडे सुटण्या ऐवजी गहन होत गेले.

mmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm

विश्वाच्या दुसऱ्या कोपऱ्यात अडगळीच्या जागी तो ग्रह होता. प्रगत-टेरान. लोक प्रेमाने त्याला पी-टेरान म्हणतात. प्रगत म्हणायचे कारण तो उत्क्रांतीच्या फेऱ्यात टेरानच्या पुढे होता. हा त्याच्या सूर्यापासून पाचव्या क्रमांकावर होता, पी-टेरान टेरान पासून ४९० प्रकाशवर्षे दूर होता. सिग्नस नक्षत्रसमुहातील ह्या ग्रहाचे शास्त्रीय नाव आहे ‘केप्लर १८६f’. ‘गोल्डीलॉक झोन’ मधला हा ग्रह टेरान चा मोठा भाउ शोभला असता.

‘केप्लर १८६f’ वर सगळ्या प्रमुख शास्त्रज्ञांची बैठक चालू होती. गेल्या महिन्यातल्या महत्वाच्या घटनांचा आढावा घेण्यासाठी ही मासिक बैठक बोलावली होती. बैठकीचे वातावरण तंग होते.

वयोवृद्ध शास्त्रज्ञ श्री. बेगुस रॉय हे अध्यक्षपदी होते. त्यांनी बोलायला सुरुवात केली, “विश्वाच्या सर्वेक्षणासाठी आपल्या मागच्या पिढीने एक यान सोडले होते. ते यान कायम आपल्या निरिक्षणाखाली होते. हे यान आपला अमोल ठेवा होता. गेले तीन दिवस हे यान आकाशगंगा नावाच्या तारकामंडळातील सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या टेरान नावाच्या ग्रहाचे वेध घेउन इकडे माहिती पाठवत होते. टेरान हे आपल्यासाठी महत्वाचे ल्क्ष्य होते. ह्या ग्रहाशी आपल्या सर्वांच्या भावना निगाडीत होत्या. कारण आपल्या प्राचीन धर्मग्रंथांत लिहिल्याप्रमाणे टेरान ही आपली मातृभूमि आहे. आपल्यासाठी ती पवित्र भूमी आहे.”
“कालच आपण आपला दूत पवित्र टेरानच्या भूमीवर उतरवण्यात यशस्वी झालो होतो.”

“दुर्दैवाने ह्या मोहिमेचा दुःखदायक अंत झाला आहे. मी आपल्या अवकाशशास्त्रज्ञ श्री राममूर्ती ह्याना विनंती करतो की त्यांनी.......”

आता रामामूर्तींनी बोलायला सुरुवार केली.

“आपल्या यानाला उर्ज्वा पुरवणाऱ्या अणुभट्टीचा स्फोट झाला आणि त्या स्फोटात यानाचा विध्वंस झाला,”

“बाप रे! धिस इज टू बॅड.” उपस्थित शास्त्रज्ञांना ही जबरदस्त धक्का देणारी बातमी होती. “ह्या ग्रहाभोवती तिथल्या रहिवाश्यांनी सोडलेले कृत्रिम उपग्रह किंवा आपल्या चंद्रासारखे नैसर्गिक उपग्रह असतील तर?”

“सुदैवाने त्या ग्रहाचा चंद्र ग्रहापासून ३८४४०० किलो मीटर अंतरावर आहे. त्या मानाने आपले यान ग्रहाच्या जवळ होते. हा प्रकार घडला तेव्हा यान टेरानपासून जवळ जवळ १२० किलो मीटर वर होते. ह्या अणुभट्टीची क्षमता तशी जास्त नव्हती. त्यामुळे टेरानवरील जीवनाला -जर टेरानवर जीवन असेल तर- किरणोत्सर्जनचा धोका संभवत नाही.”

“ओ थॅंक गॅाड!”

“पण जर का,” राममूर्ती सांगत होते, “तेथे प्रगत जीवन असेल व ते लोक इलेक्ट्रोनिक्स उपकरणे वापरत असतील --- जर त्यांची इतपत प्रगती झाली असेल --- तर त्या उपकरणांचा विनाश अटळ आहे. हवेत झालेल्या अण्वस्त्र स्फोटामुळे अतिउच्च दाबाचा विद्युत चुंबकीय झटका निर्माण होऊन प्रकाशाच्या वेगाने धावत जातो आणि मार्गात येणाऱ्या सगळ्या विद्युत उपकरणांची तोडफोड करतो. म्हणजे आपल्याला समजेल अश्या भाषेत सांगायचे म्हणजे त्यांची विद्युत निर्मिती आणि वितरण प्रणाली, विद्युत उपकरणे, दूरदर्शन, टेलिफोन, संगणक, आणि जर त्यांनी यांत्रिक मानव बनवण्यापर्यंत प्रगती केली असेल तर.......”

***********************************************************************

टेरानवरचे रोबो शास्त्रज्ञही काहीशा अश्याच निष्कर्षा पर्यंत आले होते. कुठूनतरी महाउर्जेची लाट काही मिलीसेकंद येऊन त्यांनी त्या गावातल्या रोबोंचा नाश केला. महारोबोच्या अध्यक्षतेखालिल बैठकीत आता रोबोवंशशास्त्रज्ञ रोबोर्वीन यांना बोलण्यास पाचारण करण्यात आले. मुळात रोबो कसे निर्माण झाले आणि त्यांची प्रगती यावरील त्यांचे संशोधन सर्वमान्य होते.

“मी ह्या जीवाचा पूर्ण अभ्यास केला आहे. माझ्या मते हा रोबोमधून उत्परिवर्तन होऊन तयार झालेला सुपर रोबो आहे. हा जीव आपले भविष्य आहे. मला वाटतं की आपल्या जगात अजून असे काही जीव असतील. त्यांचा शोध घेऊन आपण त्यांचे रक्षण आणि संवर्धन करायला पाहिजे.......”

अशाप्रकारे टेरानवर मानववंशाची सुरुवात झाली.

कथा

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

20 Nov 2022 - 9:46 am | तुषार काळभोर

इथे मानवाचं यांत्रिकीकरण सुरू असताना हा रोबोचं मानवीकरण होणं (आणि तेसुद्धा अधोगती नसून प्रगती असणं) मजेशीर आहे!! असं होऊ शकतं खरं :D
टेरान नाव अगदी कल्पक.

फुल्ल काल्पनिक कथा आणि क्रिएटिव्ह लिबर्टी जमेस धरली तरी दोन किंचित छोटेसे मोठेसे जरासे प्लॉट होल्स वाटले.

विश्वाच्या दुसऱ्या कोपऱ्यात अडगळीच्या जागी तो ग्रह होता. प्रगत-टेरान. लोक प्रेमाने त्याला पी-टेरान म्हणतात. प्रगत म्हणायचे कारण तो उत्क्रांतीच्या फेऱ्यात टेरानच्या पुढे होता. हा त्याच्या सूर्यापासून पाचव्या क्रमांकावर होता, पी-टेरान टेरान पासून ४९० प्रकाशवर्षे दूर होता.

अगदी आकाशगंगेच्या दुसऱ्या बाजूला म्हटलं तरी पी-टेरान दीडेक लाख प्रकाशवर्षे दूर हवा. दुसरं, ४९० प्रकाशवर्षे दुरून केवळ काय चाललंय हे कळायला किमान ४९० वर्षे लागतील त्यामुळे 'काल' काय घडलं (किंबहुना काल जे काही कळलं) ते ४९० वर्षांपूर्वी घडून गेलंय.