पंचगंगातिरीचा दिपोत्सव

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in जनातलं, मनातलं
12 Nov 2022 - 11:46 am

पंचगंगा घाट

पहाटे तीन वाजता कोल्हापुरामधला पंचगंगेचा घाट गाठला. त्यावेळी घाटावर लोकांची बरीच गर्दी दिसत होती. सगळ्यात आधी पंचगंगेवरच्या ऐतिहासिक शिवाजी पुलावरून घाट पाहिला, तर अजून लोकांनी तिथं लावलेल्या पणत्यांची संख्या तशी कमीच दिसत होती. इकडे पुलावरून लेसर शो घाटाच्या दिशेने सुरू होता. त्याच्या शेजारीच उभं राहून घाटाचं दृश्य न्याहाळत होतो. घाटावर पेटवलेल्या पणत्यांच्या काही रांगा चमकत होत्या. घाटावरच एकेठिकाणी बसवलेल्या ध्वनिक्षेपकावरून लावलेली गाणी इथंपर्यंत जोरजोरात ऐकू येत होती. धार्मिक पण तरीही नवीन ढामचिक-ढामचिक चालीमधल्या काही गाण्यांचाही त्यात समावेश होता. साधारण अर्ध्यातासानंतर पुलावरही लोकांची दिपोत्सव पाहण्यासाठी गर्दी जमू लागली. अनेकांची आणि विशेषत: तरुणांची लक्ष-लक्ष दिव्यांनी उजळलेल्या पंचगंगा घाटाचे फोटो काढण्याची तयारी पूर्ण झालेली होती. अनेक जण तर भारीतले कॅमेरे घेऊन तिथं पोहचले होते.

आता पहाटेचे चार वाजत आले होते आणि ध्वनिक्षेपकावरून सर्वांना आवाहन केलं जात होतं की, ज्यांना पणत्या लावायच्या आहेत, त्यांनी आता थोडा वेळ थांबावं, कारण हा दिपोत्सव आयोजित करत असलेल्या शिवमुद्रा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते घाटावर पणत्या ठेवत होते. काही क्षणात तिथलं महादेवाचं मंदिरही फ्लड लाईट्समध्ये उजळून निघालं. ठीक चार वाजता आरती झाल्यावर घाटावर मांडण्यात आलेल्या लाखो पणत्या प्रज्वलित केल्या गेल्या आणि साऱ्या परिसराचं रुपडंच पालटलं. ते अप्रतिम दृश्य कॅमेरात टिपून घेऊन मग आम्ही प्रत्यक्ष घाटाकडं निघालो.

रांगोळी

घाटावर तर लोकांची प्रचंड गर्दी जमली होती. विविध तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक संदेश देणाऱ्या, धार्मिक विषयावर आधारलेल्या अनेक सुंदर रांगोळ्या तिथं काढलेल्या होत्या आणि त्या रांगोळ्यांवर पणत्या ठेवल्यामुळं तर त्या कलाकृतींचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होतं. मग अशा उजळलेल्या, नदीकाठच्या वातावरणात तरुणाई आली की, सेल्फी घेणं आलंच.

पहाटेचे पाच वाजत आले होते. आता तर या दिपोत्सावाला येणाऱ्यांची गर्दी आणखीनच वाढू लागली होती. त्याचवेळी या दिपोत्सवाच्या आयोजकांकडून पुढच्या कार्यक्रमाची उद्घोषणा सुरू होती. थोड्याच वेळात तिथं भक्तिसंगीताचा कार्यक्रम सुरू झाला. अधूनमधून फटाके उडत होते आणि कंदीलही आकाशात सोडले जात होते. ही गाणी ऐकत असतानाच माझं नदीपात्राकडं लक्ष जात होतंच. एके ठिकाणी उभं राहून आम्ही पौर्णिमेच्या चंद्राचे फोटो काढू लागलो होतो. चंद्र हळुहळू मावळतीला जात असताना त्याचं नदीच्या पाण्यावर उमटलेलं प्रतिबिंब मस्तच दिसत होतं. त्या दृश्याकडं आता अनेकांचं लक्ष जाऊ लागलं होतं आणि त्यानंतर त्यांची त्या सुंदर दृश्याचे फोटो काढण्यासाठी गर्दी झाली होती.

लेसर शो

मगाशी म्हटलेला पुलावरून सुरू असलेल्या लेसर शो घाटावरून आणखी मस्त दिसत होता. एकीकडे पणत्यांचा प्रकाश, समोरून सुरू असलेला लेसर शो आणि भक्तिसंगीताची मैफल. एकूणच कडाक्याच्या थंडीमधलं हे पहाटेचं पंचगंगेच्या तीरावरचं वातावरण जबरदस्त वाटत होतं.

काही वेळानं रात्रीच्या मिट्ट काळोखात अदृश्य झालेली नदीपात्रामधली दीपमाळ आणि अन्य छोटी-छोटी मंदिरं पुसटशी दिसू लागली होती. घड्याळात पाहिलं, तर पावणेसहा वाजले होते. सकाळी सहा वाजता उजाडू लागलं. तिकडे भक्तिसंगीताच्या कार्यक्रमालाही आणखीन रंग चढला होता आणि जवळच असलेला चहाचा स्टॉलही आता उघडलेला होता. आज त्याचा चहा तयार होतोय आणि संपतोय असं चाललं होतं. चहा तयार होणं आणि संपणं याचा वेग काही जुळत नव्हता. सगळेच गारठलेले असल्यामुळं असं होणारच. मग सकाळी चांगलं उजाडल्यावर आम्हीही तिथं चहा घेतला आणि घरी परतलो.

त्रिपुरारीचा दिपोत्सव पहिल्यांदाच अनुभवल्यामुळं मला जास्तच मस्त वाटत होतं. आता पुढच्यावेळी पुन्हा हा दिपोत्सव अनुभवायला यायला हरकत नाही, असंही मनात येऊन गेलं. आता दिपोत्सव कोल्हापुरामधल्या अन्य भागांमध्येही होऊ लागला आहे, पण मला पंचगंगेच्या घाटावरचा हा पहाटेचा दिपोत्सव अधिक भावलाय.

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/11/blog-post.html

संस्कृतीकलामुक्तकसमाजदेशांतरछायाचित्रणआस्वादसमीक्षालेखअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

सरिता बांदेकर's picture

12 Nov 2022 - 4:46 pm | सरिता बांदेकर

मस्त. कोल्हापूरला आहे पण बघायचं राहून गेलं.

श्वेता व्यास's picture

16 Nov 2022 - 3:45 pm | श्वेता व्यास

वा! हा दीपोत्सव अनुभवण्याचा कधी योग येतोय का ते पाहायला हवं.

पराग१२२६३'s picture

16 Nov 2022 - 11:51 pm | पराग१२२६३

याचा मी एक व्हिडिओसुद्धा केलेला आहे. तो खाली दिलेल्या लिंकवर पाहता येईल.
https://youtu.be/IrF6wfwmkWI

श्वेता व्यास's picture

17 Nov 2022 - 9:49 am | श्वेता व्यास

व्हिडिओ देखील आवडला, रांगोळ्या सुंदर आहेत.
छान प्रसन्न वातावरण आहे.

सस्नेह's picture

17 Nov 2022 - 7:13 am | सस्नेह

सुंदर फोटो.
आम्ही कोल्हापूरकर भारीच आहोत मग ! :)
नदीपात्रात दिवे सोडून प्रदूषण वाढवण्यापेक्षा तीरावरच दिवे लावणे उत्तमच.

पराग१२२६३'s picture

17 Nov 2022 - 4:20 pm | पराग१२२६३
कुमार१'s picture

27 Nov 2022 - 11:52 am | कुमार१

आवडले.

कंजूस's picture

27 Nov 2022 - 4:53 pm | कंजूस

हे नदीची आऽरती प्रकरण फार वाढत चाललंय.

हरिद्वार - प्रयागराज आणि आता काशी, उज्जैन (नर्मदा)
कोल्हापूर (पंचगंगा).
उसाच्या मंळीने कितीही मलीन होवो पंचगंगा, आऽरती झालीच पाहिजे.