बात निकलेगी तो...

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
9 Nov 2022 - 4:18 pm

तू म्हणालास, कविता लिहिणार... पण जरा जपून हो!
प्रेम बीम तर बिलकूल नको, लोकं बसलेयत टपून हो!
नको लिहूस चंद्र बिंद्र किंवा कंकणभरला हात
इथं सगळेच ओळखतात "त" वरून ताकभात..
विस्कटलेल्या केसांवरून उगाच करतील भलते तर्क.
एका नजरेत ओळखतील सरलेली वयवर्षं..
सहज म्हणून विचारतील इतका तू उदास का रे?
उतरलेला चेहरा मग न बोलता सांगेल सारे..
तुझ्या हरेक शब्दाचा अगदी कीssस पाडतील
बोलता बोलता हळूच माझं नाव काढतील.
तेव्हा मात्र सांभाळ हं, चेहरा ठेव कोरडा
एक जरी हलली रेष, अनर्थ होईल केवढा..
आणखी एक गोष्ट तू कटाक्षाने पाळ,
कितीही मनात आलं तरी माझा उल्लेख टाळ..
एकदा नाव कळलं की लोकं तिथंच थांबतील काय?
आपल्या छोट्ट्या गोष्टीला मग लांबच लांब फुटतील पाय..
म्हणून म्हटलं, कविता लिहितोयस पण जरा जपून हो!
प्रेम बीम तर बिलकूल नको, लोकं बसलेयत टपून हो!

प्रेमकाव्यमुक्तक

प्रतिक्रिया

सरिता बांदेकर's picture

9 Nov 2022 - 7:50 pm | सरिता बांदेकर

मस्त आहे.

कर्नलतपस्वी's picture

10 Nov 2022 - 7:21 am | कर्नलतपस्वी

कविवर्य कुसुमाग्रज यांच्या "काही बोलावयाचे आहे" कवीतेची आठवण आली. मिपावर कवीतेच्या दालनाकडे हल्ली गर्दी मुळीच नसते.

काही लिहावयाचे आहे पण लिहीणार नाही
ठावे मजला शब्द माझे, कुणी वाचणार नाही

अंतरात माझ्या, भावनांना फुटती धुमारे
कोणास वेळ आहे, प्रदर्शन तयांचे मी मांडणार नाही

कल्लोळ जाणिवांचा, उसळे लाटा परी मनात
परी अक्षरांचा किनारा तयांना लाभणार नाही

मनी आठवणींचे, सप्तरंग जरी विखुरले
तरीही शब्दचित्र त्यांचे,मी रेखाटणार नाही

प्रतीसाद भावनांना इथे मिळत नाही
उपेक्षितांचा धनी मी होणार नाही....

कर्नलतपस्वी's picture

10 Nov 2022 - 9:16 am | कर्नलतपस्वी

साद प्रतीसाद, छिन्नी हातोडीचे घाव
ठोके पडल्याविना मुर्ती घडणार नाही.

चांगले वाईट कसेही असो प्रतीसाद मिळायला हवा एवढीच इच्छा व त्यातुन पडलेल्या या ओळी.

प्राची अश्विनी's picture

22 Nov 2022 - 9:36 am | प्राची अश्विनी

इतका सुंदर काव्यत्मक प्रतिसाद आल्यानंतर "प्रतिसाद भावनांना...." हे कसं मान्य करायचं?;)

भागो's picture

13 Nov 2022 - 11:46 am | भागो

छान. आवडलीच.

चाणक्य's picture

13 Nov 2022 - 12:00 pm | चाणक्य

आवडली.

विवेकपटाईत's picture

14 Nov 2022 - 12:06 pm | विवेकपटाईत

कविता आवडली आणि कवीचा भित्रेपणा. मेल्याशिवाय प्रेम भेटत नाही भावा..

प्राची अश्विनी's picture

22 Nov 2022 - 9:34 am | प्राची अश्विनी

सरिता, भागो , चाणक्य, पटाईत सर, धन्यवाद!

शिल्पा नाईक's picture

23 Nov 2022 - 10:29 am | शिल्पा नाईक

खूपच सुंदर

चौथा कोनाडा's picture

24 Nov 2022 - 2:07 pm | चौथा कोनाडा

व्वा, खुप सुंदर कविता.
प्रेमात गुपितं काटेकोर पणें सांभाळुन घ्यावी लागतात.
ब्रभा झाला तर .......
ही भावना उत्तमरित्या व्यक्त झालीय कवितेतून

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Nov 2022 - 4:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त आवडली कविता.

म्हणून म्हटलं, कविता लिहितोयस पण जरा जपून हो!
प्रेम बीम तर बिलकूल नको, लोकं बसलेयत टपून हो!

खरंय...! कोणी तरी म्हटलंय.

मै चुप रहा तो, और गलतफहमिया बढी
वो भी सुना है उसने, जो मैने कहा नही.

-दिलीप बिरुटे
(गप्प )

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

24 Nov 2022 - 5:54 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

सुंदर जमून आलिये.

स्वधर्म's picture

25 Nov 2022 - 4:53 pm | स्वधर्म

आवडली कविता.

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Nov 2022 - 11:33 am | ज्ञानोबाचे पैजार

जब प्यार किया तो डरना क्या,
लोग क्या कहेंगे सोचना क्या?

घाबरुन घाबरुन केलेले प्रेम म्हणजे प्रेम नव्हे,
लोक लज्जे खातर मन मारणे काही बरे नव्हे

खरे प्रेम निर्भय बनवते,
प्रवाहाविरुध्द पोहायला शिकवते

लपुन छपून दुनियेला घाबरुन अंधेरेमे होती है चोरी
चोरीकी सिर्फ एकही सजा, सदा बनी रहेगी दूरी

ऐसे प्रेमीसे दूर ही रहेना गालिब, जो इजहार ना कर सके
प्यार किया है प्यार करेंगे ये खुलकर बता न सके

पैजारबुवा,

प्राची अश्विनी's picture

27 Nov 2022 - 4:04 pm | प्राची अश्विनी

शिल्पा नाईक, बिरुटे सर, स्वधर्म, चौ.को., मिका, पैजारबुवा...
धन्यवाद.
बात निकलेगी... या प्रसिद्ध नज्म चा हा भावानुवाद करायचा प्रयत्न आहे.