गेले ऐकायचे राहून

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं
29 Aug 2022 - 6:15 pm

सकाळी फिरायला जातो ते महात्मा सोसायटीजवळ असलेल्या डीपी रोडपर्यंत. तिथे रस्त्यावर दामलेकाकांची एक मोफत व ओपन लायब्ररी आहे. लोक पुस्तके नेतात व आणतात. अनेकांनी पुस्तके भेटही दिली आहेत. काही जण उपक्रमासाठी स्वयंसेवक म्हणूनही मदत करतात. दामले काका जगन्मित्र व नर्मदा परिक्रमा केलेले. त्यामुळे ग्रंथालायचे नाव ही नर्मदे हर! मी थोडावेळ गप्पा मारायचो. माझे यंदा कर्तव्य आहे हे पुस्तक ही ग्रंथालयाला भेट दिले.मग गप्पांमधून त्यांना व तेथील स्वयंसेवकांना, माझ्या व्यत्किमत्वाचा परिचय होत गेला. शिरिष नावाचे एक गृहस्थ माझे बोलणे लक्षपूर्वक ऐकायचे.पण त्यांच्या बोलण्यात मला अस्वस्थता जाणवायची. बर्‍याचदा ते माझी वाट पहात उभे असायचे. माझं लक्ष नसेल तर मला हाक मारायचे .एकदा त्यांनी भावाचे श्राद्ध असल्याचे सांगितले. मग मी विचारले," कधी गेले तुमचे भाउ? "
"वीस वर्षांपुर्व."
"कशाने गेले?"
"त्याने नियोजित आत्महत्या केली."
"कारण काय असावे ? "
आमचे बाबा! असे काहीतरी म्हणायचे. बोलताना अस्वस्थ व्हायचे. खाजगी संवेदनशील गोष्टी बाबत आधिक खोदून विचारणे मलाही प्रशस्त वाटेना. एकदा त्यांनी मला मन सावर रे व संशयी स्व्भाव अशी दोन पुस्तके मला वाचायला दिली. खर तर वाचायला भाग पाडले. मी ती वाचली सायकॉलॉजिस्ट डॉ संदीप लोंढे यांची ती पुस्तके होती. सोप्या भाषेत मानसशास्त्रीय सोदाहरण विवेचन होते. एका पुस्तकाला डॉ उल्हास लुकतुके यांची प्रस्तावना होती. मी वाचून ती पुस्तके परत केली. मी पुस्तके आवडली असल्याचा अभिप्राय दिला. मग ते मला म्हणाले," माझ्या भावाने ती पुस्तके लिहिली आहेत." मी कौतुक केले. मग बोलण्याच्या ओघात त्यानेच आत्महत्या केल्याचे सांगितले. माझ्या मनात सायकॉलॉजिस्ट , कौन्सिलर असलेल्या माणसाने आत्महत्या का करावी असा प्रश्न होताच. पण मी त्यांना तो विचारला नाही. मग कधी तरी ते घरगुती हिंसाचाराची बातमी बद्दल बोलायचे. मद्रास कोर्टाच्या एका निर्णयाचया बातमीचे कटिंगही ठेवलेले दाखवले. हळूच एकदा तो प्रकार आपल्याच घरात होत असल्याबद्दल सांगितले व बोटाला झालेली जखम दाखवली. मी त्यांना मॅरेज कौन्सिलरचा सल्ला घ्या ही गोष्ट गंभीर आहे असे सांगितले. एका भेटीत मी त्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल मला जाणवलेले निरिक्शण न राहून सांगितले. तुमचे भाउ एवढे सायकॉलॉजिस्ट होते . डॉ उल्हास लुकतुक्यांच्या तालमीत तयार झालेले. स्वत:चे क्लिनिक असलेले मग तुम्ही एखाद्या चांगल्या सायकॉलॉजिस्ट/ सायकियाट्रिस्टची मदत घेणे गरजेचे आहे. संकोच बाळगू नका. तुमच्या भावाच पुस्तक तुम्ही नीट वाचले आहे ना?"
मग मानसिक आरोग्य किती महत्वाचे यावर चर्चा व्हायची. त्यांच्याकडे एक अंतर्देशीय पत्र खिशात असायचे. ते मला दाखवू की नको अशा संभ्रमात काढून परत खिशात ठेवायचे. मी ते पत्र वाचावे अशी त्यांची सुप्त इच्छा मला त्यांच्या देहबोलीतून जाणवायची. मी त्यांना तुम्ही तुमच्या मनातले जिवाभावाच्या मित्रमंडळींशी बोलत जा, सुख दु:ख शेअर करत जा! या क्षेत्रातील तज्ञ लोक हेच सांगतात. मानसिक तणावाचा शरीरावर मोठा परिणाम होत असतो. शारिरिक आरोग्याचा मनावर परिणाम व मानसिक आरोग्याचा शरीरावर परिणाम असे दुष्टचक्र चालू होते. तुम्हाला जे काय वाटते ते डायरी मधे लिहित जा. मोकळे व्हा! असे लेक्चर वजा सांगितले. मी तुमच्या आयुष्यातील घटनांचा साक्षीदार नसल्याने तुम्ही सांगितलेल्या गोष्टींच भावनिक महत्व कदाचित मला नीट समजणार नाही. तुम्ही ते तज्ञ कौन्सिलरशी बोला. दुसरे असे की ज्याच्याशी तुम्हाला शेअर करावसं वाटते तो तरी सक्षम आहे का? हा प्रश्नही महत्वाचा आहे. लोकांना रडगाणे ऐकायला आवडत नाही. तुमच्या आनंदात शेअर करायला अनेक लोक तयार होतील पण दु:खात शेअर करायला लोकांना नकोसे वाटते.ते तज्ञही नसतात. त्यामुळे तुम्ही व्यावसायिक समुपदेशकाची मदत घेणे केव्हाही चांगले.
तज्ञ कौन्सिलर म्हणजे नेमेके कोण? नेमके कुणाला जाउन भेटायचं? हा उपप्रश्नही मग उपस्थित झाला. त्यावरही काही चर्चा झाली
तुम्हीअसं का करत नाही, डॉ लुकतुक्यांशीच का नाही बोलत हे सगळं?"
त्यावर ते विचारात पडले.
"मी तुम्हाला ते भावाचे पत्र लॅमिनेट केल्यावर दाखवतो. त्याने ते दुसर्‍याच्या नावाने लिहिले होते. मला तुम्हाला काही सांगायचेही आहे."
मी त्यांना अगोदर तुम्ही लुकतुक्यांना भेटा व त्यांना तुमच्या मनातले सर्व काही सांगा्च असे आग्रहाने सांगितले व त्यांचा निरोप घेतला.
मला जरा त्यांची चिंताच वाटत होती. तो मनुष्य आत्महत्या वगैरे करेल की काय अशी भीती मला वाटायची. मी एकदा त्यांना एकदा तसे अप्रत्यक्षपणे बोलून दाखवलेही होते.पण तेव्हा ते म्हणाले की डोंट वरी, मी माझा संदीप होउ देणार नाही. मग मला हायसं वाट्ले. पण नंतर ते मला दिसलेच नाहीत. मला वाटले मी भेटल्यावर त्यांना तुम्ही लुकतुक्यांना भेटलात का? असे विचारेन म्हणून ते कदाचित तोंड दाखवत नसावेत. मग आजूबाजूच्यांकडून कळले की ते जरा आजारी असल्याने सध्या येत नाहीत. हा विषय एकदा माझा मेहुणा डॉ मंदार बेडेकर याच्याशी बोललो होतो. योगायोगाने त्याच्या ते परिचयाचे निघाले. मित्रमंडळींच्या ग्रुपमधे होते.
एक दिवस त्यांच्या ग्रुपवर अचानक कळले की ते हार्ट फेल ने गेले. मी सुन्न झालो. त्यांना मला जे सांगायचे होते ते तसेच राहून गेले आणि माझे ऐकायचे. आयुष्यात अनेक गोष्टी राहून जातात. करु, बघु, बोलू,भेटू म्हणता म्हणता आयुष्य सरुन जातं. कधी घ्यायचं राहून जातं तर कधी द्यायचं राहून जात. आरती प्रभूंची कविता आठवते का?
गेले दयायचे राहून
तुझे नक्षत्रांचे देणे
माझ्या पास आता कळया
आणि थोडी ओली पाने
आलो होतो हासत मी
काही श्वासांसाठी फक्त
दिवसांचे ओझे आता
रात्र रात्र शोषी रक्त
आता मनाचा दगड
घेतो कण्हत उशाला
होते कळयांचे निर्माल्य
आणि पानांचा पाचोळा
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

समाजलेखअनुभव

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

29 Aug 2022 - 6:38 pm | विजुभाऊ

घाटपांडे साहेब......... ही कविता आत्ता थोडिशी कळाली असे वाटतंय.
कामाच्या गडबडीत आपण आज करू उद्या करू असे करत मी माझ्या एका चुलतभावाला फोन करायचे म्हणत होतो.
एकदा अचानक तो गेल्याची बातमी आली ....
आता कोणाशी बोलायचे तेच समजत नाही.

राजेंद्र मेहेंदळे's picture

29 Aug 2022 - 8:08 pm | राजेंद्र मेहेंदळे

एकटेपणा ही समस्या जगभर वाढत चालली आहे असे ऐकुन आहे. मागे मिपावरच कोणीतरी जपानच्या संदर्भात यावर लेखही लिहिला होता वाटते. संपर्कमाध्यमे वाढत चालली आहेत तसा संपर्क कमी होत चालला आहे. त्यातुन हे सगळे प्रॉब्लेम्स वाढत आहेत.
असो. एक दोन मित्रांना फोन करायचे आहेत, ते करुन टाकतो.

कर्नलतपस्वी's picture

31 Aug 2022 - 9:43 pm | कर्नलतपस्वी

छान व्यक्त झालात.

कबीर मनाचं स्वरूप समजावताना म्हणतात,

"पाणी ही तै पतला,धुवां ही तै झीण ।
पवनां बेगि उतावला, सो दोसत `कबीर’ कीन्ह" ॥

संवाद कमी झालाय,वाद सुद्धा कमी झालाय. कुठली गोष्ट कुणाला दुखवून जाईल सांगता येत. सर्वात जवळचे नाते आई मुलांचे पण त्यातही भेगा पडायला सुरुवात झालीये. माहीत नाही हे कुठवर जाणार आहे.

मला आवडलेली कवीता. अश्या लोकांच्या मनात काय चाललंय कुणालाच कळत नाही.

सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी ।
एकदा हसलो जरासा मग पुन्हा हसलोच नाही ।।

जगत मी आलो असा – सुरेश भटांची कविता

जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही ।
एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही ।।
जन्मभर अश्रूस माझ्या शिकवले नाना बहाणे ।
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही ।।
कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो ।
पण प्रकाशाला तरीही हाय मी पटलोच नाही ।।
सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी ।
एकदा हसलो जरासा मग पुन्हा हसलोच नाही ।।

वाटले मज गुणगुणावे ओठ पण झाले ति-हाइत ।
सुचत गेली रोज गीते मी मला सुचलोच नाही ।।
संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा ।
लोक मज दिसले अचानक मी कुठे दिसलोच नाही ।।

प्रकाश घाटपांडे's picture

1 Sep 2022 - 9:45 am | प्रकाश घाटपांडे

कर्नल साहेब एकदम उचित व मार्मिक प्रतिसाद. आवडलाच.

कर्नलतपस्वी's picture

1 Sep 2022 - 5:17 am | कर्नलतपस्वी

तन तंदूर तो मन अंगार
अंगार के बिना सब बेकार
टुटा तंदूर इक बार जुड सकता है
बुझे मन को कौन सुलगाये?
आओ, सब मिलकर फिर से दिया जलाये !!

विवेकपटाईत's picture

1 Sep 2022 - 10:11 am | विवेकपटाईत

वाचून अत्यंत वाईट वाटले. मनोविज्ञान समजणे आणि परिस्थितीचा सामना करणे दोन्ही वेगळे, हे ही कळले. माझी आई नेहमी म्हणायची जे काही चांगले वाईट होते ईश्वरी इच्छेने होते. हे जर स्वीकार केले तर जगणे सौपे होते. कुणावरतरी विश्वास माणसाने ठेवला पाहिजे, मग तो देव असो, मित्र असो. काही लोक अनोळखी लोकांसमोर ही मोकळे होतात, ऐकताना विचित्र वाटते पण त्यांच्या मनातले शल्य बाहेर निघून जाते.

विवेकपटाईत's picture

1 Sep 2022 - 10:14 am | विवेकपटाईत

मी पाव सारख्या धाग्यांवर वाद घालून ही उत्तम टाइम पास होतो. एकटेपणा वाटत नाही.

टर्मीनेटर's picture

1 Sep 2022 - 11:11 am | टर्मीनेटर

मी पाव सारख्या धाग्यांवर वाद घालून ही उत्तम टाइम पास होतो. एकटेपणा वाटत नाही.

मिपावर असो कि प्रत्यक्ष जीवनात, पण 'टाइम पास' म्हणून किंवा स्वतःचे पांडित्य सिद्ध करण्यासाठी कोणाशी निरर्थक वाद घालणे हे सुदृढ मानसिकतेचे लक्षण असू शकेल काय?
त्यापेक्षा 'संवाद' साधण्यावर भर दिल्यास मनःस्थितीही उत्तम राहील आणि असंख्य माणसे जोडली गेल्याने एकटेपणा तर जवळपासही फिरकणार नाही.
अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे, तुमच्या मुद्द्याचे खंडन करून त्याद्वारे नव्या वाद/विवादाला तोंड फोडण्याचा कोणताही उद्देश नाही 😀
बाकी वरच्या प्रतिसादात तुम्ही म्हंटले आहे,

काही लोक अनोळखी लोकांसमोर ही मोकळे होतात, ऐकताना विचित्र वाटते पण त्यांच्या मनातले शल्य बाहेर निघून जाते.

तसा अनुभव मलापण नेहमी येतो. परिचितांनाही सांगणार नाहीत अशा कित्येक गोष्टी पहिल्या भेटीतच शेअर करणारे अनेकजण भेटले आहेत आणि भेटत असतात. त्यातून त्यांच्या भावनांचा निचरा होऊन मनातले शल्य बाहेर पडत असावे हे पटते.
मानवी मनाचा आणि त्याच्या मनोव्यापाराचा थांग लागणे महाकठीण आहे हेच खरे!

कर्नलतपस्वी's picture

1 Sep 2022 - 12:21 pm | कर्नलतपस्वी

+ १,
मिपावर वाद घालण्यापेक्षा संवाद साधल्यास अनेक मित्र मिळतील.
मला तरी मिळाले ज्यांच्याशी संवाद होतो.

व्यक्त होण्यासाठी विश्वसनियता महत्वाची. कधी कधी अगतिकता माणसाला कुणाबरोबर ही व्यक्त होण्यास भाग पाडते.

उगाच पांडित्य दाखवले तर वादच होणार आणी भावनाशून्य माणसाला काहीच फरक पडत नाही पण इतरांना मात्र त्रास होतो.