दर्दी खवय्ये कुठ मिळतील ??

शेर भाई's picture
शेर भाई in काथ्याकूट
13 Aug 2022 - 8:13 pm
गाभा: 

तर मंडळी आमच्या बेचव बकवासीच्या पुढे आम्ही तुमच्या सल्ल्यानुसार कागदपत्रांची जुळवाजुळव करून शेवटी फूड लायसन मिळवले आता जी.एस.टी. येऊ घातलंय. आमच्या आजीच्या नावावरून “सावित्री’ज किचन” नावाचे आमच एक मराठमोळ्या पदार्थांचे विशेषतः मत्स्याहारींसाठी हाटील येऊ घातले आहे.

आता आम्हाला एक वेगळीच चिंता सतावते आहे. बऱ्याच तज्ञाच्या माहितीप्रमाणे मत्स्याहार थोडा महागडा असतो. कारण Ratatouille मधल्या ताईंच्या म्हणण्यानुसार ताज्या मालाची चव खास असते आणि ताजा माल स्वस्त मिळत नाही. त्यामुळे असा महागडा माल खरेदी केल्यावर आणि त्याची तशीच खास चव चाखल्यावर आवडीने खिसा खाली करणारे ग्राहकराजे असले तर आणि तरच आम्ही तरू!!!!

तर जाणाकारांनो आम्हाला मुंबई किंवा ठाणे (कोपरीपर्यंत) येथे असे दर्दी खवय्ये कुठ मिळतील ?? आपल्या मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत.

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

14 Aug 2022 - 12:26 am | माईसाहेब कुरसूंदीकर

दर्दी खवय्यांची मुंबई/ठाण्यात वानवा नाही रे शेरभाई. १९४०च्या दशकात सुरु झालेल्या गिरगावातील अनंताश्रम्/माधवाश्रमपासुन मग महेश लंच होम,सचिन ते गजाली/सायबा/म्हावरं.. खवय्ये दाद देत आहेतच. मत्स्याहारी दर्दी खवय्या तंदूर प्रॉन्स स्टार्टर वगैरेच्या भानगडीत न पडता सरळ सुरमई ताट+ जोडीला तळलेली मांद्याळी मागवतो.

जेम्स वांड's picture

14 Aug 2022 - 8:42 am | जेम्स वांड

पण आमचा चॉईस अलग असतो

रावस थाळी, सोबतीला तळलेला बांगडा, बारक्या पोरीला क्रॅब लोलीपोप, बायकोला पापलेट फ्राय अन् आम्हाला सोबत चिल्ड बिअर असा जामानिमा लागतो.

मत्स्य आहाराच्या बाबतीत दादर स्टेशन च्या बाहेर एक गोमंतकीय रेस्टोरंट होते. नाव आठवत नाही. खूप चांगले होते. विद्यार्थी दशेंत महेश लंच होम महाग असले तरी डेट्स च्या दृष्टीने खूप चांगले होते.

जेम्स वांड's picture

14 Aug 2022 - 8:56 am | जेम्स वांड

विकायला तर काहीही विकले जाऊ शकते, तुम्ही मासळी उत्तमच आणणार अन् बनवणार ह्यात काही शंका नाही, पण आधीच इतकी हॉटेल्स अन् महेश लंच होम सारखी चेन रेस्टॉरंट्स धंद्यात असताना तुम्हाला फक्त ताज्या फडफडीत बांगड्यांवर फोकस ठेऊन चालणार नाही.

Authentic असे ब्रॅण्डिंग करावे लागेल, भले हो त्या आगरी/ कोळी समाजाचे अन् त्यांच्या खाद्य परंपरांचे की मुंबईत अजून authentic मासे मिळतात नाहीतर कोल्हापुरी म्हणून लाल ग्रेव्ही अजून लाल करत वरती एक तळलेली लालमिर्ची खोचून शेट्टी लोकांनी पुरेसा कचरा केलाच होता जेवणाचा.

एम्बियंस, चव, ब्रॅण्डिंग ह्याचा मिलाफ केला तर उत्तम होईल असे ह्या निमित्ताने सुचवतो, इथेच मागे बहुतेक खरडफळ्यावर मी टक्का नाका, पनवेल इथल्या साईकृपा ढाब्याची जाहिरात केली होती, आगरी पद्धतीने बनवलेली बकरा मुंडी मसाला आणि लसूण भेजा फ्राय अतिशय उत्तम आहेत तिथली,

असे तुमच्या आजूबाजूच्या मासळी स्पेशल हॉटेल्स मध्ये जेवून बघा, मासे टू मासे, डिश टू डिश कंपेर करा, उदाहरणार्थ एखाद ठिकाणी फ्रेश अगळ वापरलं आहे एखाद ठिकाणी मुरवलेलं वापरलं आहे, त्यात तुम्ही काही इनोवेशन करू शकता का ? नवीन काय मसाले बनवू अन् ट्राय करू शकता, एखाद usp डिश ठेवायची असल्यास आपण ती काय ठेवाल ? असा विचार पहिले सांगोपांग करा.

यश तुमचेच आहे , रेस्टॉरंट सुरू केलं की सांगा आवर्जून भेट देऊ,

टीप :- मिपाकरांना कौल लावा, मासेप्रेमी जनता खूप आहे इथे, दहा माणसे सोबत घेऊन कट्टा करायला तुमच्या हॉटेलमध्ये धडकतील येऊन. रेफरल डिस्काउंट देणार असलात तर माणसे पाठवतील हॉटेलमध्ये ती अलगच.

शेर भाई's picture

14 Aug 2022 - 3:04 pm | शेर भाई

याच धर्तीवर आमच्याकडे हाताने जेवणाऱ्या, खासकरून कुर्लीची नांगी एका हाताने मटकावणाऱ्या आणि पूर्णवेळ मराठीत बोलणाऱ्या ग्राहकांना काही सवलती देण्याचा आमचा मनसुबा आहे.

नेत्रेश's picture

16 Aug 2022 - 8:58 pm | नेत्रेश

> “सावित्री’ज किचन” नावाचे आमच एक मराठमोळ्या पदार्थांचे
मराठी बोलणार्‍या लोकांना सवलत द्यायचा विचार चांगला आहे, पण मराठेमोळे पदार्थ मिळणार्‍या हॉटेलचे नावही मराठी असते तर सुसंगत झाले असते.

हॉटेलसाठी शुभेच्छा. जेवायला नक्की येणार (आणी सवलतही मागणार).

शेर भाई's picture

17 Aug 2022 - 12:01 am | शेर भाई

किचन म्हटले कि एक आपलेपणा वाटतो. आमची (सावित्री) आजी नेहमी सांगायची, खाण नेहमी देताना गरम आणि ताजच पाहिजे त्यामुळे खाणारा आवडीने दोन घास जास्तच खातो, त्याप्रमाणे सगळे ताजे आणि सागरसंगीत देणार.
मि. पा. चे आय. डी. घेऊन या, जादा सवलत देऊ.

शेर भाई's picture

14 Aug 2022 - 2:59 pm | शेर भाई

धन्यवाद माई G, वांड Gआणि साहना G. तुमच्यामुळे Current Trend कळला.
पण मुळ मुद्दा बाजूलाच राहिला कि! Location बद्दल आपले विचार कळले तर नक्की आवडेल.
ठिकाण ठरे पर्यंत सध्या आम्ही Zomato & Swiggy वरून सुरुवात करावे का ??

प्रमोद देर्देकर's picture

14 Aug 2022 - 3:47 pm | प्रमोद देर्देकर

ठाण्यात राहता तर तुम्हाला फिशलॅन्ड हॉटेल माहिती असेलच?

तिथं फिश टॅंक मधले तुम्हाला हवाय तो मासा घेऊन तुमच्या समोर अर्ध्या तासात पदार्थ तयार करून देतात.

एकदा भेट देऊन बघा.

साहना ताई त्या हॉटेलचं नावं गोमंतकच आहे.
आणि दादर आणि गिरगांव दोन ठिकाणी आहे.

सतिश गावडे's picture

14 Aug 2022 - 4:24 pm | सतिश गावडे

गोमंतक दादर पश्चिमला कबुतरखान्याच्या पुढे आहे का?

प्लाझा सिनेमा च्या शेजारी.

जेम्स वांड's picture

14 Aug 2022 - 9:56 pm | जेम्स वांड

सायबिणी गोमंतक ?

सतिश गावडे's picture

14 Aug 2022 - 4:23 pm | सतिश गावडे

मत्स्याहारींसाठी हाटील जरा गुंतागुंतीचा मामला आहे. इतके विविध प्रकारचे मासे असतात. त्यांच्या किंमतीतही तफावत असते. पुन्हा मासे ताजे नसतील तर चव बिघडते हे ही आहे.

मत्स्याहारी म्हणून अशा हॉटेलांना भेट दिलेल्या हॉटेलातील माझा अनुभव साधारण असा आहे: मुख्यतः सुरमई, पापलेट आणि बांगडा या माशांच्या थाळ्या उपलब्ध असतात आणि गिर्हाईकेही साधारण याच थाळ्या मागवतात. यातील सुरमई, पापलेट किलोला ९०० - १००० च्या आसपास मिळत असल्याने ही थाळीही ५०० - ६०० वर जाते. चव असेल तर चांगले गिर्हाईक किंमतीचा विचार करत नाहीत. चव चांगली असेल तर बजेट थाली म्हणून बांगडा थाळी मागवली जाते.

जागा ठरेपर्यंत स्विगी झोमॅटोचा विचार करायला हरकत नाही. मी आणि माझे काही मित्र पुण्यात सत्कार मालवणी आणि वेरनेकर गोवन फिश करी ऑनलाईनच मागवतो.

कपिलमुनी's picture

14 Aug 2022 - 6:48 pm | कपिलमुनी

जेवण आणि क्वांटीटी उत्तम असेल तर लोक कुठेही येतात..

सुरुवातीला फूड ब्लॉगर बोलावून. रील , शॉर्ट च्या माध्यमातून तुफान जाहिरात करा, eat out चे फेसबुक ग्रुप्स असतात त्यावर उत्तम रिव्ह्यू सतत येत राहतील याची "सोय " करा.. उत्तम फूड फोटोग्राफर hire करून फोटो काढून गुगल रिव्ह्यू आणि फेसबुक , इंस्टा वर अपलोड करा....

ओळखीच्या लोकांकडून गुगल रेटिंग ४+ राहतील याची काळजी घ्या..
डिजिटल मार्केटिंग वाले hire करा, सर्च मध्ये सतत टॉप पेज वर राहाल याची काळजी घ्या...

शेर भाई's picture

16 Aug 2022 - 7:37 pm | शेर भाई

कुठल्या ठेसनांत जायचे ठरत नव्हते, आणि काही जाणते जुन्या, नव्या गोमंतकच्या रम्य आठवणींमध्येच रमत असल्याने, तसही ठाण्यात तीन हात नाक्याजवळसुद्धा एक गोमंतक आहेच!!!!

मग आम्ही Zomato बाबा आणि Swiggy ताईला शरण गेलो. बर आम्ही नवखे, त्यात (दुकानाच्या) जागेचा अजून शोध लागला नाही, म्हणून आम्ही On – Line onboarding करून पहिले. पण तेव्हापासून आम्ही BOT’s च्या विळख्यात अडकलो आहोत. गंमत अशी काहीही विचारले तर Zomato बाबा म्हणतात “Please contact your Zomato Account Relationship Manager.” आणि mail केले तर विचारतात “We care for you, how can we help?” बस्स इतकच.

आमच्या एका सुज्ञ परिचिताने सांगितले कि जेव्हा या बाबा किंवा ताईंचे दूत तुमच्या आसपास फिरत नसतात तेव्हा हे लोक खुशाल आम्हाला Off Line दाखवतात, तो एक वेगळा त्रास आहेच.

तरीही, Zomato आणि Swiggy ची लिंक अती धाडसाने खालीलप्रमाणे देत आहे:
Zomato:
https://www.zomato.com/mumbai/savitris-kitchen-2-vikhroli
Swiggy:
सध्या दाखवत नाही आहे

टीपीके's picture

17 Aug 2022 - 6:54 am | टीपीके

नवीन कार्यास शुभेच्छा.

क्लाउड किचन बद्दल हा व्हिडिओ थोडी मदत करू शकेल. थोडा मोठा आहे. जमल्यास बघून घ्या

शेर भाई's picture

19 Aug 2022 - 12:37 am | शेर भाई

खुपच छान. पण आता सदस्यता स्वीगीकडे फुकट आहे आणि झोमाटो विकत आहे. दोघेही पूर्ण यांत्रिक झाले आहेत, माणस शोधूनसुद्धा सापडत नाहीत.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

19 Aug 2022 - 3:09 am | हणमंतअण्णा शंकर...

१. अभिनंदन!
२. हॉटेल 'भन्नाट' नाव व 'भन्नाट' मेन्यू यांच्या बळावर नव्याचे नऊ दिवस या न्यायाने फक्त काही दिवसच चालेल. त्यानंतर फक्त लिगॅसीवर चालते.
३. हॉटेलचे नाव सामान्य दर्जाचे ठेवा जेणेकरून हॉटेल कमीत कमी ५० वर्षांचे आहे असा 'भास' निर्माण होईल. उदा. 'मावल्ली टिफिन सेंटर'. भयंकर खराब उदा. 'रॉनीज भन्नाट चवीचा चस्का मिसळ.' हॉटेलचे नाव विशेषतः मांसाहारी हॉटेलचे नाव जितके सामान्य तितके अपील. महेश लंच होम, अनुराधा खानावळ, सत्कार भोजनालय, आवारे खानावळ, घोरपडे थाळी सेंटर अशा धर्तीचे नाव ठेवा. जितके मंडेन तितके चांगले. किचनयुक्त नावे अलीकडची आहेत ती टाळा.
४. प्रत्यक्षात फूटप्रिंट आणि ऑनलाईन सेल्स यांची कल्पना सुरुवातीपासूनच असलेली बरी.
५. मांसाहारी हॉटेलांना सिलेक्शन पॅरालाईसिस प्रचंड घातक असतो. मेन्यू जितका कमी तेव्हढी लिगॅसी तयार होते. तुम्ही उदा. मिलन खानावळीच्या बाहेर उभे आहात. तुमचा नंबर आला की तुम्हाला पटकन ऑर्डर द्यायची आहे. समोर बोर्डावर लिहिलेला मिनिमल मेन्यू हाच उपयोगी येतो. माझ्या मते ग्राहक मांसाहारी हॉटेल्स मध्ये वैविध्य चाखायला जात नाही. सिगरेटचा ब्रँड जसा ठरलेला असतो तसाच कंड सुटला की लोक मांसाहार करतात. चॉईस घातक आहे. ऑनलाईन सेल्समध्ये माझ्य अनुभवाने स्टार असलेले( सारखे खरेदीकेलेले), फोटो असलेले मेन्यू आयटमच जास्तीत जास्त खपले जातात.. खाद्यपदार्थ निवडण्यात खूप कमी वेळ लागला पाहिजे. अगदी काही सेकंद. ग्राहक विषेशतः स्वीगी, झोमॅटो वरचा हा केवळ तुमच्याच हॉटेलातले अन्न मागवायचे म्हणून आलेला नसतो. फॅमिलीसाठी म्हणून, साईड डिश म्हणून, हे पण देतो, ते पण देतो, अर्धाच देतो, पाऊणच देतो, वगैरे प्रकार कमी करावेत. सिंपल आणि स्टुपिड मेन्यू असायला हवा.. व्हेज फटफटी का व्हेज रॉयल एन्फिल्ड का व्हेज लूना असला ढाबाछाप मेन्यू पूर्णपणे टाळा. बिर्याणीचे वगैरे सतराशे साठ प्रकार न करता एकच प्रकार तुमच्या स्पेशालिटीसह ठेवा.
६. मस्त्याहारी हॉटेलांत सुद्धा ठराविक थाळ्याच जास्त खपतात. तर पूर्ण फोकस फक्त त्याच थाळ्या परफेक्शनकडे नेऊन तुम्हाला लिगॅसी तयार करता येईल. तुम्ही थाळ्यांचे स्पेशल, अल्ट्रा, डिलक्स, हडकुळी, चिल्ड्रन, झिरो फिगर, लो कॅलरी असले प्रकार ठेऊ नका. त्याने मागवणार्‍यांचे गोंधळ उडतात. वरती 'डिलक्स थाळीत बांगड्याचा १० ग्रॅमचाच तुकडा होय' असली मानसिकता तयार होते. बांगडा थाळी असेल तर फक्त बांगडा थाळी, रोहू थाळी असेल तर फक्त रोहू थाळी असंच ठेवा. त्यांचे अजून व्हेरियेशन्स नको. व्हेरियेशन्स झाले तरी 'निवड' करायला खूप कमी वेळ लागला पाहिजे हे लक्षात ठेवा!
७. पेशन्स! प्रचंड पेशन्स! वर्षानुवर्षांचा पेशन्स!

अप्रतिम सूचना. एकेक शब्द मोलाचा. अगदी तंतोतंत असेच सुचवावेसे वाटत होते. हे सर्व सांगण्यासाठी कोणी कन्सल्टन्सी फी घेतली असती, इथे ते मोफत मिळाले.

धागाकर्त्यांनी हे शब्द प्रमाण मानले तर त्यांची भरभराट होण्याची शक्यता शंभर टक्क्यांजवळ पोहोचेल.

फॅन्सी नावे कुचकामी ठरतात. इंग्रजी, फ्रेंच, लॅटिन नावे-सुरमई अँड रान्देवू, लामूर, मेलांज,... किस-मूर,.. किंवा मराठीच पण फार साहित्यिक छाप अथवा भावुक नावे, सय माहेराची, मी डोलकर, म्हावरा,मासोली, रस्सा आणि बरेच काही, किंवा क्लिशे नावे, कोंकण कट्टा, अमुक'स किचन, सागरकिनारा..

हे सर्व काही महिनेच टिकते. वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या टिकते ती चवच. नाव लिजंड व्हायचे तर ते केवळ चवीने बनते. ठाण्यात हेमंत स्नॅक्स कॉर्नर म्हणून मासे थाळी होटेल आहे. आज रोजी त्याचा नाश्ता अथवा स्नॅक्सशी काही संबंध नाही. नाश्त्याच्या वेळांना ते चालूही नसतं. तरी तिथे सदैव वेटिंग लिस्ट असते. त्यांना ते नाव बदलण्याचीही गरज पडत नाही.

सहा पानी मेन्यूचे भोक्ते अगदीच नसतात असे नाही पण ते मुख्यत: शाकाहारी उडुपी किंवा ऑल इन वन सत्कार, सन्मान होटेलांत.

अतिचॉइस हा एक अत्यंत घातक प्रकार आहे हे कोणाला सांगून पटत नाही. मी तर म्हणतो की टेबलवर मेन्यू कार्डही नको. फळ्यावर आजचे ताजे उपलब्ध पदार्थ (जास्तीत जास्त 5) ही उत्तम यशाची गुरुकिल्ली ठरावी. हे स्विगीत कसे बसवावे हे बघावे लागेल.

150 प्रकारचा चहा, 120 प्रकारची कॉफ़ी अशी रेस्टॉरंट बघितली की मी तरी रस्ता बदलतो. अरे बाबा मला एक चांगली कॉफ़ी हवीय आणि ती तुला करता येते अशी माझी अपेक्षा आहे. तशी देतोस तर दे. मलाच बुचकळ्यात टाकू नको. माझ्याकडून अर्धी रेसिपी मागू नको. तू सुचव, दे, आवडली तर परत येईन. व्हरायटीचे वावडे नाही. पण कोणती कॉफ़ी आज पेश करायची ते खुद्द ठरवू शकणारी कॅफेज अधिक आवडतात हे खरे.

काही (आगाऊ) सूचना

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर, तुमच्या सूचना (की सुचना) अगदी योग्य आहेत.

गविंनी म्हटल्याप्रमाणे, यासाठी व्यावसायिक सल्लागाराने भरभक्कम मोबदला घेतला असता.

शेर भाई, तुमच्या उपाहारगृहाला यशस्वीतेसाठी शुभेच्छा.

---

नावाबद्धल: नांदेडात गुरुद्वारा परिसरात अनेक मांसाहारी हॉटेले आहेत. वर्षानुवर्षे तिथे जात राहूनही काहींची नावे खात्रीने सांगता येत नाहीत! गेट नंबर १ वरचे दुसरे हॉटेल असे आम्ही सांगतो. (अर्थात त्या हॉटेलचे नाव सुंदर हॉटेल आहे, पण ते आणि इतर नावे स्पेसिफिकली लक्षात राहत नाही; चव मात्र अजिबात विसरली जात नाही!)

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर G, तुमच्या सूचना खरच खूप मोलाच्या आहेत, इतक्या कि त्यांची एक प्रत काढून आमच्या मालकीण बाईंना दिली.
गविGनी म्हटल्याप्रमाणे बोर्डाची कल्पना मस्तच आहे, सध्या Online, आम्ही आमचा मेन्यू खूप छोटा केला आहे.
तुम्ही बनवलेला पदार्थ प्रत्येकजणाने आवडीने खावा यासाठी मुळात तुम्ही तो मन लावून बनवला पाहिजे अस आमची आजी म्हणायची, त्याची आठवण झाली.
वामन देशमुखG सध्या ठेसन ठरत नाहीये, पण जेव्हा ठरेल तेव्हा आपण सगळ्यांना यायचेच आहे.
आमच्या हाटीलचे नाव "Savitri’s Kitchen" किंवा "सावित्रीचे किचन" आहे. (आमच्या सुगरण आजीचे)

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

20 Aug 2022 - 4:58 am | हणमंतअण्णा शंकर...

मी पुण्यात होतो तेव्हा साथीच्या एक वर्ष आधी एक अशी मेस शोधत होतो जी मला आवडेल असे रुचकर अन्न देईल. माझे कमाल बजेट १७० रुपये प्रति डबा होते. माझ्या नशिबाने मला एक पंजाबी डान्सर जो डान्स क्लास नंतर डबे देत असे तो मिळाला, शेजारीच राहत होता. प्रत्येक डबा साधारणतः १३० पर्यंत जात असे. परंतु साथीमध्ये त्याचे बरेच हाल झाले आणि त्याला मला डबा देणे जमेना. त्यानंतर मी कंटाळून एक स्वयंपाकीण ठेवली. जी अर्थातच यथातथा जेवण बनवत असे. परंतु ती दांड्याही तितक्याच मारायची. त्यात साथ असल्याने सगळ्यांचेच हाल झाले.

जरा विचार करून पाहा -

१. भारता अतिशय सुग्रास जेवण करणार्‍या कोट्यवधी गृहिणी महिला आहेत. करोडो सुगरणी. लाखो पुरुष देखील असतील. तरीही, १७० रुपये प्रतिडबा देण्यास तयार असूनही मला इतकी अडचण आली. मी शेजारच्या वहिनींनाही विचारले की तुम्ही मला दिवसाला दोन ताटं द्याल का? उत्तर नाही आले.
२. का? तर कमिटमेंट! एरव्ही घरात मन लावून स्वयपाक करणार्‍या या गृहिणी काही बेसिक गोष्टी व्यावसायिक पातळीवर पाळू शकतीलच असे नाही - स्वतःच्या कुटुंबासाठी सुद्धा जेवण करताना रोज एका दर्जाचं, क्ष पदार्थांचं जेवण बनवणं प्रचंड शिस्तीचे, मेहनतीचे काम आहे. माझ्या गावी घरी दोन भाज्या, भाकरी, भात, एक-दोन आमट्या हे कॉन्स्टंट जेवण असते आणि हे मेन्टेन करायला आजीची, काकवांची कंबर मोडते. तरी आजोबा रात्री बरेचदा दूधभात खाऊन झोपत म्हण्जे प्रत्येकाची आवड निवड, उपलब्धता आणि शक्ती या सार्‍यांचा मेळ साधत एका शिस्तीचा स्वयंपाक करणे हे 'खायचे' काम नाही. आणि जेव्हा याचे प्रोफेशन बनते तेव्हा ही कमिटमेंट पेलवत नाही. भले तुम्ही कितीही मन लावून जेवण बनवा. अशा रोझी स्वप्नांतून बाहेर या. कारण लोकांना मन लावून केलेले जेवण आवड्तेच पण रोज मन लावून इतक्या अमुका क्वांटिटीत, इतक्या अमुक वेळेत, इतक्या अमुक दर्जासहित जेवण करणे प्रचंड अवघड आहे. म्हणून बरेच "क्ष'ज किचन्स" हॉटेल्स/मेस ज्यांचा बॅकबोन व्यावसायिक पातळीवर जेवण करू पाहणारी गृहिणी असते ते बंद पडतात. त्यात अजून एक महत्वाची अडचण म्हणजे बहुतेक भारतीय अन्न हे स्केलेबल नाही. (म्हणजे तुम्ही पालेभाजी एका छोट्याशा कढईत ठराविक मर्यादेतच चांगली करू शकता. शंभर माणसांसाठी मेथीची भाजी सहजगत्या करता येत नाही) त्यामुळे तुम्हाला नाउमेद करत नाही, परंतु घरगुती मन लावून जेवण बनवून तुम्हाला व्यवसाय करता येत नाही हे वास्तव आहे. स्वयंपाक करणार्‍या स्त्रीला दर महिन्यात तीन-चार दिवस आराम करावा लागतो, क्वचित आजारपणं असतात, आणि तुमच्याकडे लोड बॅलन्सिंग अरेंजमेंट नसते तेव्हा अनेक तडजोडी कराव्या लागतात. मला वाटते तुम्हाला याची पुरेपूर कल्पना असेलच. आणि तुम्ही याचा अनुभवही घेतला असेल. तेव्हा मी हे तुम्हाला नाही पण बाकीच्या इच्छुकांसाठी लिहिले आहे असे गृहित धरा.

३. मेस तत्वावर चालणार्‍या व्यवसायात निदान मेंबरांची संख्या तरी ठाऊक असते त्यामुळे प्लॅनिंग सोपे जात असावे असा कयास आहे. ऑनलाईन/हॉटेलांना मात्र काही आठवड्यांनी, महिन्यांनी हे अंदाज लावता येतात. या काळात आर्थिक आणि मानसिक नुकसान होऊ शकते. या काळात तुम्ही कसे तग धरून राहता त्यावरच सगळी मदार आहे. जर तुम्ही फिजीकल हॉटेल टाकणार असाल तर इंटिरियर वगैरे गोष्टींत भरमसाठ पैसे गुंतवून ठेवले जातात. जर कॅशफ्लो राहिला नाही तर मात्र आर्थिक डोलारा कोसळतो आणि मग सगळं गुंडाळावं लागतं. माझ्या मते, ऑनलाईन ओन्ली किचन केलेले चांगले. इंटिरियर पेक्षा भांडीकुंडी, उपकरणे, यांच्यात दर्जात्मक गुंतवणूक करता येईल. मोठे फ्रीज, उत्तम ब्रँडचे फ्रीजर वगैरे, म्याकडी मध्ये असतात तसे फ्रायर, ग्रील्स, कणीक मळण्याचे यंत्र, स्वत:ची चांगली गिरण, उत्तम दर्जाच्या चिमन्या, उत्तम क्वालिटीचे नळ, स्टेनलेस स्टील्चा प्लॅट्फॉर्म, अन्न गरम ठेवण्याचे पाण्याचे स्टँड, प्रोफेशनल मिक्सर्स, साफसफाईला सोयीस्कर गोष्टी म्हणजे सांडपाण्याचे वहन करणार्‍या गोष्टी इत्यादी. ज्या गोष्टिंचा पुढे लॉन्ग रन मध्ये खूप फायदा होतो. मी अनेक छोट्या हॉटेलांत रंगांचे डबे साठवणुकीला, अत्यंत अस्वच्छ फ्रीज, कळक्कट तवे वगैरे पाहिले आहेत ज्याचा कधीना कधी फटका बसतोच.

४. कृपया गॅस सिलींडर्स, बर्नर, शेगड्या यांच्या बद्दल काळजी घ्या. केटरिंग करणारे जे कोणतेही स्टँडर्ड्स नसलेले लोकल मेड बर्नर आणि शेगड्या वापरतात ते प्रचंड घातक आहेत. गोष्टी जितक्या इलेक्ट्रिकल करता येतील तेवढं चांगलं. हे वै मत आहे. 'चुलीवरच्या' फॅनग्रुपची माफी मागून!

५. मन लावून शिस्तीने व्यवसाय करा. मन लावून अन्न शिजवलेत तर सोने पे सुहागा! खूप शुभेच्छा!!

सुबोध खरे's picture

20 Aug 2022 - 7:01 pm | सुबोध खरे

हणमंत अण्णा

साष्टांग दंडवत.

इतका बारकाईने विचार करून सल्ला देणे एखाद्या मायकेलिन शेफला सुद्धा कदाचित जमला नसता.

खरोखर उत्तम सल्ला आहे.

शेरभाई

आपले उपहार गृह चालू झाले की जरूर कळवा. भेट द्यायला येऊच.

आणि

"सवलत"

अजिबात मागणार नाही. मी शक्यतो उदघाटनाला जात नाही तर एकदा रेस्टोरंट सुरु झाले कि ओळख न देता जातो आणि व्यवस्थित बिल भरुचनच बाहेर पडतो.

सुरुवातीच्या काळात मी आवर्जून पूर्ण पैसे देऊनच अन्न सेवन करतो म्हणजे आपण काय खाल्ले त्याची किंमत वसूल झाली का आणि हे ठिकाण परत यावे असे आहे का? हे अंतर्मनात आपोआप साठवले जाते.

शेर भाई's picture

20 Aug 2022 - 7:48 pm | शेर भाई

तुमचा मुद्दा एकदम रोखठोक आहे. पण मागच्यावेळी वीणा३G, निनादG आणि अभ्याG यांनी सुचवल्याप्रमाणे बरीच रंगीत तालीम केली आहे. थोडासाच पण अभ्यास केला आहे. आता या घडीला एका वेळेस १०० लोकांना जेवण वाढण्याची तयारी आहे, अर्थात जेवण करताना मनापासून केल तर त्याची चव खाणाऱ्याला भिडते हे त्या मागचे सूत्र आहे.
सध्या Online असताना , गाविG नी सुचवल्याप्रमाणे आम्ही मेनू बराच छोटा केला आहे, आणि प्रत्येक दिवशी सगळे पदार्थ ठराविक प्रमाणातच करत आहे. त्यामुळे अन्नाची नासाडी टळते आणि नुकसान होत नाही आणि त्यामुळे होऊ घातलेला मनस्तापही टळतो.
आम्ही सध्या जागेच्या शोधात आहोत, त्यासाठी time to reach the location आणि तिथला local public response हे मुद्दे पकडले आहेत.
अजून काही मुद्दा आमचाकडून सुटत असेल तर नक्की सांगा.

वामन देशमुख's picture

23 Aug 2022 - 6:10 pm | वामन देशमुख

बहुतेक भारतीय अन्न हे स्केलेबल नाही

हे कळलं नाही हो, हणमंतअण्णा.

थोडं विस्तृत, सोदाहरण, तुलनात्मक सांगाल का?

सर टोबी's picture

23 Aug 2022 - 6:49 pm | सर टोबी

मेथीची भाजी कमी प्रमाणात असतांना उलथण्याने सतत हलवून मोकळी ठेवता येते. पण शंभर माणसांसाठी करायची ठरवल्यास भाजी निवडण्याचे कष्ट, ती परततांना मोकळी राहावी म्हणून उलथण्याचा मोठा आकार किंवा एकाच वेळी अनेकांनी ती परतण्याची करावयाची कसरत प्रत्यक्षात शक्य होणार नाही. याला स्केलेबिलिटी इश्यू म्हणतात.

शेर भाई तुम्हाला व्यवसायवृद्धी साठी खूप खूप शुभेच्छा 👍
(मी मत्स्याहारी नसल्याने शुभेच्छा व्यतिरिक्त कुठल्या टिप्स वा सल्ला देऊ शकत नाही)

शेर भाई's picture

20 Aug 2022 - 7:50 pm | शेर भाई

तुमचा आहार कुठला ?? बघू काय करता येते का.

मदनबाण's picture

20 Aug 2022 - 5:27 pm | मदनबाण

शेर भाई, तुम्हाला तुमच्या व्यवसायाठी शुभेच्छा.
मी शाकाहारी असलो तरी मत्स्याहारी धागे वाचायला आवडतात. :)
वरती हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर यांनी दोन अप्रतिम प्रतिसाद दिले आहेत ते वाचले आणि या धाग्यावर आल्याचे समाधान मिळाले ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हृदयी वसंत फुलताना-Hridayi Vasant Phultana Full Song :- Takatak 2

शेर भाई's picture

20 Aug 2022 - 7:53 pm | शेर भाई

सध्या श्रावणात बरेच (सारेच) शाकाहारी आहेत, तुमचा मेनू कंचा??

आजचाच बायडीने केलेला मेनू :- ज्वारी,बाजरी,नाचणी,तांदळाचे पीठ्,गव्हाचे पीठ यांचे मिश्रीत तिखट मिठाचे वडे [ पसरट ] खाल्ले आहे.
तसे पाहता श्रावण म्हणुन काही मी वेगळ खाण्याचा आग्रह धरत नाही, जे पानात येते ते पूर्णब्रह्म आहे आणि परमेश्वराच्या कृपेने ते मला मिळते हे लक्षात ठेवून मी कधीच काही टाकत नाही. घेताना थोडे घेतले तर परत मागुन खाता येते. अगदी मी आजारी असलो आणि तोंडास चव नसली आणि अशा वेळी चुकुन कधी अन्न जात नसल्यास ते पानात राहते, त्यासाठी मी मनात अन्नपूर्णा मातेची / देवाची क्षमा मागतो.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हृदयी वसंत फुलताना-Hridayi Vasant Phultana Full Song :- Takatak 2

शेर भाई's picture

20 Aug 2022 - 10:58 pm | शेर भाई

मग तुम्ही आमच्या मसाला रोटीसाठी योग्य ग्राहक (गिऱ्हाईक) आहात तर......

नि३सोलपुरकर's picture

23 Aug 2022 - 11:36 am | नि३सोलपुरकर

" अजून एक महत्वाची अडचण म्हणजे बहुतेक भारतीय अन्न हे स्केलेबल नाही. (म्हणजे तुम्ही पालेभाजी एका छोट्याशा कढईत ठराविक मर्यादेतच चांगली करू शकता. शंभर माणसांसाठी मेथीची भाजी सहजगत्या करता येत नाही) ..... १०० % खरे आहे .

त्यासाठीच मला लग्न , मोठे समारंभ इ. वेळी स्वयंपाक बनविणारे बल्लवाचार्य ह्यांचे नेहमीच कौतुक वाटते .

बाकी ह्या धाग्यातील हणमंत अण्णांचे प्रतिसाद म्हणजे आइसिंग ऑन केक आहेत _/\_ आणी शेर भाई तुम्हाला व्यवसायवृद्धी साठी खूप शुभेच्छा .

विवेकपटाईत's picture

23 Aug 2022 - 4:15 pm | विवेकपटाईत

वेझ मासा हा प्रकार ठेवला तर ग्राहक बेस निश्चित वाढेल. एवढे लोक सल्ला देत आहेत माझी बोटे ही शिव शिव लागली. टंकून टाकला एकदाचा सलला .

शेर भाई's picture

23 Aug 2022 - 5:49 pm | शेर भाई

आपल्या विलासरावांच्या लेकाने (रितेश देशमुख) आणलेत कि "वेझ मासे" पण ते आरोग्यासाठी किती चांगले ते नाय माहित.
Mock Meat करून शोधल्यावर बरेच प्रकार आढळले.
आमच्याकडे माशाच्या आकारात मापात कापलेली अळूवडी वरून garlic garnish तडका मारून मिळेल.

जेम्स वांड's picture

24 Aug 2022 - 10:18 am | जेम्स वांड

म्हणजे ?
आजवर सुरमई, बांगडे, बोंबील, कोळंबी, सुकट, तिसऱ्या, कुर्ल्या, खेकडे इत्यादी सगळे खाल्ले पण
वेझ नावाचा मासा नाही खाल्ला, कुठे मिळेल वेझ मासा ?

तुम्ही अशा हॉटेलांना भेट दिली असणारच. त्यात एक भर सांगू इच्छितो. श्रीवर्धन बस डेपोजवळच असणारे विचारे यांचे 'स्वाद'. वेज नॉनवेज दोन्ही थाळ्या. रात्री साडेआठ ते बारा टुअरवाल्या बसेस येतात.( राहाण्याचे लॉजही आहे जवळच.)