ताज्या घडामोडी - ऑगस्ट २०२२ (भाग ३)

क्लिंटन's picture
क्लिंटन in राजकारण
13 Aug 2022 - 10:47 am

नमस्कार मंडळी,

आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाले आहेत म्हणून नवीन भाग काढत आहे. नवीन प्रतिसाद लिहायचे असतील तर ते या भागात लिहावेत आणि आधीच्या भागात लिहिलेल्या प्रतिसादांना उत्तर लिहायचे असेल तरच ते त्या भागात लिहावेत ही विनंती. या महिन्यात पहिल्या दोन भागात मिपा परंपरेला अनुसरून चांगली चर्चा झाली आहे त्याबद्दल सगळ्यांचे आभार.

नितीशकुमार परत राजदबरोबर गेले तेव्हा मी त्यावेळेस चर्चेत मी म्हटले होते की समाजवादी नेते भांडण्यासाठी एकत्र येतात आणि एकत्र येण्यासाठी भांडतात. तसेच समाजवादी विचारांचे पक्ष किती वेळा एकत्र आले आणि किती वेळा तुटले याचा हिशेब ठेवणे कोणाही मर्त्य मानवाला शक्य होईल असे वाटत नाही. ते का हे या भागात इथे टाईमलाईनच्या मदतीने स्पष्ट करतो.

१९३० चे दशक: जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव आणि आचार्य जीवतराम कृपलानी यांनी काँग्रेस अंतर्गत काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना केली.
१९४९: जयप्रकाश नारायण आणि आचार्य नरेंद्र देव यांनी काँग्रेस सोडून स्वत:च्या समाजवादी पक्षाची स्थापना केली.
१९५१: आचार्य कृपलानींनी काँग्रेस सोडून स्वत:च्या किसान मजदूर प्रजा पक्षाची स्थापना केली.
१९५२: पहिल्या लोकसभा निवडणुकांमधील पराभवानंतर समाजवादी पक्ष आणि किसान मजदूर प्रजा पक्ष एकत्र येऊन प्रजा समाजवादी पक्षाची स्थापना
१९५५: राममनोहर लोहियांनी प्रजा समाजवादी पक्ष सोडून स्वत:च्या समाजवादी पक्षाची स्थापना केली.
१९६४: कर्पुरी ठाकूर यांनी प्रजा समाजवादी पक्षातून बाहेर पडून स्वत:च्या संयुक्त समाजवादी पक्षाची स्थापना केली. जॉर्ज फर्नांडिस यांचा पण संयुक्त समाजवादी पक्षात प्रवेश
१९६७ - चरणसिंग यांनी काँग्रेस पक्षाबाहेर पडून भारतीय क्रांती दलाची स्थापना केली.
१९६९ - बिजू पटनाईक यांनी काँग्रेस पक्षाबाहेर पडून उत्कल काँग्रेस पक्षाची स्थापना केली. काँग्रेस पक्षात फूट-- इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस(आर) आणि मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस(ओ) पक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला.
१९७२ - १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर प्रजा समाजवादी आणि संयुक्त समाजवादी एकत्र येऊन नव्या समाजवादी पक्षाची स्थापना
१९७४ - चरणसिंगांचा भारतीय क्रांतीदल, बिजू पटनाईकांचा उत्कल काँग्रेस, १९७२ मध्ये स्थापन झालेला समाजवादी पक्ष, राजाजींच्या निधनानंतर उतरणीला लागलेला मिनू मसानी-पिलू मोदींचा स्वतंत्र पक्ष आणि १९७३ मध्ये भारतीय जनसंघातून हकालपट्टी झाल्यानंतर बलराज मधोक यांनी स्थापन केलेला स्वत:चा पक्ष एकत्र येऊन भारतीय लोकदल या पक्षाची स्थापना
१९७७ - जगजीवन राम, हेमवतीनंदन बहुगुणा आणि नंदिनी सत्पथी काँग्रेसबाहेर पडून त्यांनी स्वत:चा काँग्रेस फॉर डेमॉक्रसी हा पक्ष स्थापन केला.१९७७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हा काँग्रेस फॉर डेमॉक्रसी, भारतीय लोकदल, काँग्रेस(ओ) आणि भारतीय जनसंघ यांनी भारतीय लोकदलाच्या हलधर या चिन्हावर निवडणूक लढवली. निवडणुकीनंतर या पक्षांचे जनता पक्ष या नव्या पक्षात विलीनीकरण.
१९७८ - शरद पवार, वायलार रवी, अंबिका सोनी आणि के.पी.उन्नीकृष्णन यांनी काँग्रेस पक्षाबाहेर पडून काँग्रेस(समाजवादी) या पक्षाची स्थापना केली.
१९७९: चरणसिंग, राजनारायण इत्यादी नेत्यांनी जनता पक्ष सोडून जनता पक्ष (सेक्युलर) स्थापन केला आणि जनता पक्षाचे सरकार पाडले. चरणसिंग औटघटकेचे पंतप्रधान झाले.
१९८०- लोकसभा निवडणुकांमध्ये धुव्वा उडल्यानंतर चरणसिंग जनता पक्ष(सेक्युलर) बाहेर पडले आणि स्वत:च्या भारतीय लोकदल पक्षाची पुनर्स्थापना केली. जगजीवन राम जनता पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी स्वत:चा काँग्रेस(जे) पक्ष स्थापन केला. जनता पक्षातून पूर्वाश्रमीचे जनसंघाचे नेते बाहेर पडून त्यांनी स्वत:च्या भारतीय जनता पक्षाची स्थापना केली.
१९८०/१९८१: चरणसिंगांच्या भारतीय लोकदल पक्षातून बाहेर पडून देवीलाल यांच्या स्वत:च्या लोकदल(बी) पक्षाची स्थापना केली.
१९८७-- काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यावर त्यांनी जनमोर्चा या अराजकीय गटाची स्थापना केली. शरद पवार, अंबिका सोनी आणि वायलार रवी काँग्रेसमध्ये परतले. के.पी.उन्नीकृष्णन काँग्रेस(एस) बरोबर राहिले.
१९८८-- चरणसिंगांचा (त्यांच्या मृत्यूनंतर अजितसिंगांचा) लोकदल, देवीलालांचा लोकदल, काँग्रेस(एस), वि.प्र.सिंगांचा जनमोर्चा एकत्र येऊन जनता दलाची स्थापना.
१९८९- लोकसभा निवडणुकांनंतर जनता दलाचा गटनेता (म्हणजेच होणारा नवा पंतप्रधान) निवडायच्या वेळेस चंद्रशेखर आणि वि.प्र.सिंग हे दोन दावेदार होते. अरूण नेहरू आणि पत्रकार कुलदीप नय्यर यांना हाताशी धरून वि.प्र.सिंगांनी चंद्रशेखर यांना मात द्यायचा डाव खेळला. बैठक सुरू होताच ताबडतोब इतरांना कोणालाही बोलायची संधी न देता वि.प्र.सिंगांनी देवीलालांचे नाव नेतेपदावर सुचविले. काही क्षणातच पुढील पंतप्रधान देवीलाल असतील अशा तारा वर्तमानपत्रांच्या ऑफिसात गेल्याही होत्या. पण देवीलालांनी आपले वय ७५ उलटून गेले असल्याने इतकी मोठी जबाबदारी आपल्याला नको असे म्हटले आणि नेतेपदासाठी वि.प्र.सिंगांचे नाव सुचविले. हे सगळे चंद्रशेखरांना अंधारात ठेऊन ठरवून केले गेले होते. त्यातून चंद्रशेखर दुखावले गेले आणि ते वि.प्र.सिंगांच्या शपथविधीलाही हजर नव्हते.
१९९०- चंद्रशेखर आणि देवीलाल जनता दलाबाहेर पडले आणि त्यांनी स्वत:च्या समाजवादी जनता दल या पक्षाची स्थापना केली. चंद्रशेखर काँग्रेसच्या पाठिंब्याने पंतप्रधान झाले. राजस्थानात दिग्विजयसिंग (मध्यप्रदेशातील वाचाळवीर दिग्विजियसिंग वेगळे) या स्थानिक नेत्याने जनता दल सोडून स्वत:चा गट स्थापन करून भाजपबरोबर हातमिळवणी केली आणि भैरोसिंग शेखावतांचे अल्पमतातले सरकार तारले.
१९९१-- चिमणभाई पटेल यांनी समाजवादी जनता दलातून बाहेर पडून स्वत:च्या जनता दल(गुजरात) पक्षाची स्थापना केली आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने आपले सरकार तारले.
१९९२- अजितसिंग जनता दलाबाहेर आणि त्यांनी स्वत:चा जनता दल(अजित) हा पक्ष स्थापन केला. मुलायमसिंग यादव समाजवादी जनता दलाबाहेर पडून त्यांनी स्वत:च्या समाजवादी पक्षाची स्थापना केली. चिमणभाई पटेल यांचा जनता द्ला(गुजरात) हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन.
१९९३-- जनता दल, समाजवादी जनता दल आणि जनता दल (अजित) यांची उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका एकत्र लढवायची घोषणा. पण उत्तर प्रदेशात जोरदार पराभव झाल्यानंतर अजित सिंगांनी त्यांचा गट काँग्रेसमध्ये विलीन केला. १९९० मध्ये राजस्थानात भैरोसिंग शेखावतांचे सरकार तारणारे दिग्विजयसिंग काँग्रेसमध्ये गेले.
१९९४- जॉर्ज फर्नांडिस, नितीश कुमार आणि रबी रे यांनी जनता दलातून बाहेर पडून समता पक्षाची स्थापना केली. नंतर देवीलाल आणि ओमप्रकाश चौटाला यांनी पण समता पक्षात प्रवेश केला.
१९९६-- चंद्रशेखर यांनी पण समता पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुक लढवली. पण निवडणुकांनंतर त्यांनी आपला समाजवादी जनता पक्ष (राष्ट्रीय) ची स्थापना केली. लोकसभा निवडणुकांपूर्वी अजितसिंग काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी स्वत:चा भारतीय किसान कामगार पक्ष स्थापन केला. निवडणुकांनंतर रामकृष्ण हेगडेंची जनता दलातून हकालपट्टी. त्यांनी स्वत:चा लोकशक्ती हा पक्ष स्थापन केला.
१९९७-- देवीलाल आणि ओमप्रकाश चौटाला यांनी समता पक्षातून बाहेर पडून स्वत:चा हरियाणा लोकदल (राष्ट्रीय) हा पक्ष स्थापन केला. या पक्षाचे नाव १९९९ मध्ये बदलून इंडिअन नॅशनल लोकदल हे झाले. नवीन पटनाईक यांनी जनता दलातून बाहेर पडून बिजू जनता दल हा पक्ष स्थापन केला.
१९९९--- उरल्यासुरल्या जनता दलात जनता दल(धर्मनिरपेक्ष) आणि जनता दल(संयुक्त) हे दोन तुकडे पडले. देवेगौडा आणि कुमारस्वामी जनता दल(धर्मनिरपेक्ष) मध्ये तर रामविलास पासवान जनता दल(संयुक्त) मध्ये सामील. समता पक्ष आणि लोकशक्ती हे दोन पक्षही जनता दल (संयुक्त) मध्ये विलीन. १९९९ मध्ये कर्नाटकात जनता दल (धर्मनिरपेक्ष) आणि जनता दल (संयुक्त) हे दोन्ही गट होते. २००५-०६ च्या दरम्यान कर्नाटकातील जनता दल (संयुक्त) पक्ष अस्तंगत झाला.
२००२-- रामविलास पासवान यांनी जनता दल(संयुक्त) सोडून आपला लोकजनशक्ती हा पक्ष स्थापन केला.
२००६-- कर्नाटकात सिध्दरामय्या जनता दल (धर्मनिरपेक्ष) मधून बाहेर पडून काँग्रेसमध्ये गेले. पुढे २०१३ मध्ये ते काँग्रेसकडून कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले.
२०१४-- मोदीलाटेत सगळे पक्ष वाहून गेल्यानंतर परत एकदा जनता दलाचे पुनरूज्जिवन करायची घोषणा. पण ती प्रत्यक्षात आली नाही.
२०१७-- नितीशकुमारांनी परत एकदा भाजपबरोबर हातमिळवणी केल्यानंतर नाराज शरद यादवांचा अनामिक एक व्यक्ती असलेला स्वतंत्र गट.
२०२२-- नितीशकुमार यांनी परत लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाशी हातमिळवणी केली.

या सगळ्या ब्रम्हघोटाळ्यात कितीतरी मधल्या पायऱ्या मी विसरलो आहे हे नक्की. १९८०/८१ मध्ये कधीतरी देवीलालांनी चरणसिंगांच्या भारतीय लोकदल पक्षातून बाहेर पडून आपला लोकदल (बी) पक्ष स्थापन केला हे वर लिहिलेच आहे. १९८७ मध्ये चरणसिंगांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पुत्र अजितसिंग चरणसिंगांच्या लोकदल पक्षाचे अध्यक्ष झाले आणि तो गट लोकदल(ए) नावाने ओळखला जाऊ लागला. मुलायमसिंग यादवही त्याच पक्षात होते. चरणसिंगांनंतर पक्षाचे अध्यक्षपद आपल्याकडे येईल असे मुलायमसिंगांना वाटत होते पण अजितसिंग हे चरणसिंगांचे पुत्र असल्याने ते अनेक वर्षे अमेरिकेतले आपले वास्तव्य आणि ग्रीनकार्ड सोडून आले आणि ते अध्यक्ष बनले. अजितसिंग आणि मुलायमसिंग यादव यांचे जमायचे नाही. त्यामुळे अजितसिंगांनी मुलायमसिंगांना पक्षातून बाहेर काढले होते. हे १९८७/८८ मध्ये कधीतरी झाले. ते नक्की कधी झाले हे मला माहित नाही. हेच सगळे लोक १९८८ मध्ये जनता दलात परत एकत्र आले होते.

१९८९ च्या लोकसभा निवडणुका झाल्यानंतर पंतप्रधानपदासाठी वि.प्र.सिंगांनी चंद्रशेखरांना धोबीपछाड दिला हे वर लिहिलेच आहे. त्याचा सूड मग चंद्रशेखरांनी लगेच उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री नेमताना उगवला. अजितसिंग मुख्यमंत्री व्हावेत असे वि.प्र.सिंगांना वाटत होते तर चंद्रशेखरांचे उमेदवार होते मुलायमसिंग यादव. चंद्रशेखरांचा गट भारी पडला आणि उत्तर प्रदेशात मुलायमसिंग यादव मुख्यमंत्री झाले. पुढे मार्च १९९० मध्ये बिहारमध्ये मुख्यमंत्री निवडायच्या वेळेस वि.प्र.सिंगांचे उमेदवार होते रामसुंदर दास तर त्यांना आव्हान दिले होते लालू यादवांनी. लालूंनी चंद्रशेखरांकडे मुख्यमंत्री व्हायला मदत मागितली तेव्हा चंद्रशेखरांनी स्वतःचा रघुनाथ झा हा उमेदवार उभा केला. तेव्हा नेतेपदासाठी आमदारांमध्ये निवडणुक झाली होती. त्या निवडणुकीत रघुनाथ झांनी रामसुंदर दासांची मते फोडून लालूंचा विजय निश्चित केला. भारतीय राजकारणातील दोन सगळ्यात घाणेरडे लोक- लालू आणि मुलायमसिंग यादव या राजकारणातून पुढे आले आहेत.

तेव्हा सांगायचा मुद्दा हा की या सगळ्या पार्श्वभूमीवर परत नितीश आणि तेजस्वी/लालू फुटले तर अजिबात आश्चर्य वाटू नये.

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

21 Aug 2022 - 7:13 pm | कपिलमुनी

मोदी समर्थक म्हणत्यात तेच केजरी समर्थक उत्तर देणार

किती पण आपटा , दिल्लीत केजरीवाल च येणार

कानडाऊ योगेशु's picture

21 Aug 2022 - 9:27 pm | कानडाऊ योगेशु

मी जे ऐकलेय वा वाचतोय त्यानुसार केजरीवालांनी अनेक काही चांगले निर्ण्य घेतले आहेत आणि त्याचे परिणाम ही दिसत आहेत. दिल्लीचे बॅलन्स शीट कॅग सारख्या सरकारी संस्थेनेच ऑडिट करुन प्रकाशित केले आहे आणि त्यानुसार बर्याच काही गोष्टी मुफ्त देऊन ही दिल्ली ला फायदा झालेला आहे. ह्या सर्व गोष्टींमुळे सेठ व भाजपेयींच्या गोटात चिंतेचे वातवरण आहे आणि येणार्या गुजरात निवडणुकीत आपमुळे बीजेपीचा सुपडा साफ होण्याची शक्यता आहे. म्हणुन्च हे अश्या धाडींचे/चौकशीचे शुक्लकाष्ठ आप च्या नेत्यांचा मागे लावले आहे. (जसे महाराष्ट्रात ईडीचा वापर केला जातोय तसेच.) खखो एकतर सेठ जाणे अथवा केजरीवाल.

तर्कवादी's picture

24 Aug 2022 - 4:44 pm | तर्कवादी

येणार्या गुजरात निवडणुकीत आपमुळे बीजेपीचा सुपडा साफ होण्याची शक्यता आहे

गुजरातमध्ये आपची ताकद किती आहे ते मला माहित नाही पण माझ्या मते बिल्कीस बानोच्या गुन्हेगारांना सोडून व झालेच तर त्या गुन्हेगारांचे सत्कार करुन भाजपने गुजरातमध्ये नक्कीच स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतलाय.. हा सगळा प्रकार अगदी अविश्वसनीय वाटावा इतका अतिरेकी झालाय. या गोष्टीमुळे हिंदुत्त्ववादीही भाजपपासून दुरावलेत तर आश्चर्य वाटणार नाही.

रात्रीचे चांदणे's picture

24 Aug 2022 - 4:54 pm | रात्रीचे चांदणे

सहमत, अति तेथे माती. बलात्कारांचा सत्कार करायची काहीही गरज नाही.

श्रीगुरुजी's picture

24 Aug 2022 - 5:05 pm | श्रीगुरुजी

फुकट वीज वगैरे देण्याच्या घोषणा केजरीवालांनी उत्तराखंड, गोवा या राज्यातही केली होती. परंतु तेथील मतदारांनी आआपकडे दुर्लक्ष केले. बिल्कीस बानोवर केलेल्या बलात्कारी गुन्हेगारांना सोडण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला आणि आआपने वीज फुकट देण्याचे आश्वासन दिले असले तरी गुजरातमध्ये आआपकडे संघटना, कार्यकर्ते व नेत्यांचा दुष्काळ असल्याने तेथे आआपला फारसा वाव नाही. गुजरातेत कॉंग्रेस आकसत असल्याने रिकाम्या झालेल्या जागेत घुसण्यासाठी आआप प्रयत्न करीत आहे. परंतु ती रिकामी जागा बहुतांशी भाजपच बळकावेल.

जेम्स वांड's picture

24 Aug 2022 - 7:02 pm | जेम्स वांड

पंजाबातील निवडणुकीत दाखवायला किमान भगवंत मान होते, त्यांची थोडीबहुत खासदारकीची कारकीर्द होती, गुजरातेत तर AAPकडे औषधालाही एखाद आमदार नाही दाखवायला, गुजराती लोक व्यवहारी असतात, त्यामुळे असे सहज मतदान करणार नाहीत, मात्र गुजराती जनता थोडी भावूक पण असते स्पेसिफिक बाबतीत ती जरी AAP ने उचलली हवा तरीही काँग्रेसच्या रिकाम्या झालेल्या सीट ते उचलू शकतील असे वाटते मला पण.

श्रीगुरुजी's picture

24 Aug 2022 - 7:13 pm | श्रीगुरुजी

सध्या तीच योजना असावी. २०१७ मध्ये आनंदीबेन पटेल मुख्यमंत्री असताना त्यांची तुलना सतत मोदींशी होत राहिल्याने त्या काहीश्या फिक्या वाटल्या. त्यात हार्दिक पटेलने राखीव जागा आंदोलन सुरू केले. त्याचाही काहीसा प्रभाव पडला. हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी व हितेंद्र ठाकोर हे तरूण नेते कॉंग्रेसमध्ये गेल्याने कॉंग्रेसने ६० जागांवरून ७७ वर उडी घेतली तर भाजप ११५ वरून ९९ वर घसरला.

परंतु आता परिस्थिती खूप बदलली आहे. हितेंद्र ठाकोर व हार्दिक पटेल भाजपत आलेत. कॉंग्रेस पूर्ण विस्कळीत आहे. अश्या परिस्थितीत कॉंग्रेसच्या जागी आपण पर्याय म्हणून स्थान निर्माण करावे, जनतेला अजून एक वेगळा पर्याय असावा यासाठी आआपचा प्रयत्न आहे. जोपर्यंत कॉंग्रेस गांधी घराण्याच्या तावडीतून सुटत नाही, तोपर्यंत कॉंग्रेसची घसरणच होत राहणार. कदाचित २०२७ मध्ये आआप भाजपविरूद्ध एक ताकदवान पर्याय म्हणून समोर असेल जर केजरीवालांनी संघटना बांधणीवर नीट लक्ष दिले तर.

सुबोध खरे's picture

24 Aug 2022 - 7:16 pm | सुबोध खरे

हिंदुत्त्ववादीही भाजपपासून दुरावलेत तर आश्चर्य वाटणार नाही.

मागच्या गुजरात निवडणुकीच्या वेळेस लोक केंद्रीय नेतृत्वावर नाराज आहेत आणि आता जिग्नेश मेवानी कन्हैया कुमार सारखे नेते आले होते.

तेंव्हा हवा निर्माण केली गेली होती कि आता भाजप हरणार.

त्यावेळेस एका सामान्य कार्यकर्त्याचे बोल ऐकण्यासारखे होते.

त्याने सांगितले नाराज है लेकिन गद्दार नही!

किसी दुसरे को कैसे चुन सकते है?

https://www.esakal.com/desh/assam-two-suspected-terrorists-linked-with-a...

अब्दुस शोभन अली, हा एका मदरशाचा इमाम असल्याचे सांगीतल्या जात आहे....

https://www.loksatta.com/explained/loksatta-explained-on-ronhingya-refug...

बांगलादेशातील रोहिंग्यांनाही म्यानमारमध्ये परत पाठवायलाच हवे, असे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाला दोनच दिवसांपूर्वी सांगितले

धर्मराजमुटके's picture

1 Sep 2022 - 11:07 pm | धर्मराजमुटके

नासा ने ब्लॅक होल मधून येणार्‍या आवाजांचे रेकॉर्डींग केले आहे. बरेच जणांना ते 'ॐ' आहे असे वाटते. तुम्हाला काय वाटते ?
दुवा १