मामाचं पत्र

Primary tabs

श्रीगणेशा's picture
श्रीगणेशा in जनातलं, मनातलं
7 Aug 2022 - 2:59 pm

(विद्यार्थीदशेतील भाचे मंडळींसाठी)
----

विद्यार्थीदशेतील एक टप्पा मागे सरून चढणीचा प्रवास सुरू होईल आता. धुकं असेलही प्रवासात आणि मनातही, पण ते थोडंसं निवळावं म्हणून हे चार शब्द.
----

आरोग्य, सवयी:
आरोग्य सर्वोपरी. या वयात हे ध्यानी-मनीही नसतं पण आरोग्याच्या चांगल्या सवयी आतापासूनच लावणं आवश्यक. नियमित सूर्यनमस्कार, ओंकार प्राणायाम अशा सोप्या, छोट्या गोष्टी खूप चांगला, सकारात्मक मानसिक परिणाम करतात, आत्मविश्वास द्विगुणित करतात. पण इथे महत्वाची असते ती नियमितता!
चांगल्या सवयी आत्मसात करणं कठीण आणि त्या जपणं महाकठीण! लवकर पहाटे उठणे, रात्री लवकर झोपी जाणे, वेळेवर जेवण करणे, वेळ वाया न घालवणे, या वरवर साध्या-छोट्या वाटणाऱ्या सवयी, नंतर पुढे जाऊन महत्वाच्या वाटायला लागतात, कारण त्या आयुष्यातली कदाचित सर्वात मूल्यवान अशी गोष्ट नियंत्रित करतात, ती म्हणजे...वेळ!

भाषा, वाचन:
दररोज मराठी आणि इंग्रजी पेपर वाचणं, आवडत्या विषयात पुस्तकं वाचणं, ही एक चांगली सवय! वाचनातून आपल्याला वेगवेगळ्या विषयांची ओळख होते. आपल्या अवती-भवती, समाजात काय चाललं आहे, हे समजतं, आपला समाजाभिमुख दृष्टिकोन विकसित होतो.
वाचनातून भाषा व्यवस्थित आत्मसात करता येते. भाषा एकमेकांना जोडते, भाषेच्या माध्यमातून आपण दुसऱ्यांना समजून घेतो आणि स्वतः व्यक्त होतो.
तसेच इंग्रजी भाषा कितीही महत्वाची वाटली, आणि ती तशी आहेच यात शंका नाही, पण आपला वैचारिक, बौध्दीक आणि भावनिक विकास करण्यासाठी आवश्यक असं बाळकडू, फक्त मातृभाषेतच असतं!

बोलणं, संवाद:
आपण पुरेसे आणि व्यवस्थित व्यक्त होणं, आपल्याला संवाद साधता येणं तितकंच महत्वाचं. लहान-थोर, कुणाशीही, कुठेही बोलायला न घाबरणं, न लाजणं; स्वतःहून उत्सुकतेने सर्वांची विचारपूस करणं; प्रश्न विचारणं, उत्तरं देणं; विचार करून, शांतपणे बोलणं; आपलं म्हणणं व्यवस्थित मांडणं; हे फक्त सरावानेच शक्य होतं!

ऐकणं, आकलन:
दुसऱ्याचं म्हणणं पूर्ण आणि मन लावून ऐकून, समजून घेणं; ऐकत असताना एकाग्र राहणं, त्या क्षणात उपस्थित असणं; हे वरवर खूप सोपं वाटतं खरं, पण ते निश्चितच अवघड असतं. त्यामुळे प्रयत्न करून ऐकण्याचं कौशल्य विकसित करणं आणि ते टिकवून ठेवणं महत्वाचं!

चिंतन, मनन:
स्वतंत्र विचाराचं व्यक्तिमत्त्व विकसित करण्यासाठी चिंतन, मनन महत्वाचं. दिवसातून काही मिनिटे तरी अंतर्मुख व्हावं, शांत राहून स्वतःशी संवाद साधावा.
श्रद्धा जपावी, अंधश्रद्धेपासून दूर राहावं; वैज्ञानिक, चिकित्सक दृष्टिकोन प्रयत्न करून आत्मसात करावा!

लेखन:
आपण वाचन आणि लेखन एकाच वेळी शिकतो. आपण अभ्यासाव्यतिरिक्त वाचन करतो, लिहिण्याची सवय मात्र क्वचितच जपली जाते. लिखाण आपल्या विचारासाठी एक आरसा म्हणून काम करतं. लिहिणं म्हणजे आपल्या मनाचा त्या क्षणी घेतलेला फोटोच, असंही म्हणता (लिहिता) येईल! स्वतःशी संवाद साधण्यासाठी लिखाण एक प्रभावी माध्यम, त्यामुळे मला लिहिता येईल का, वगैरे प्रश्नांत न अडकता नियमित लिहावं, निदान स्वतःसाठी तरी!

कुटुंब, मित्र:
घरापासून दूर गेल्यावर घराची जास्त ओढ वाटणं साहजिक आहे. पण थोडंसं कठोर होऊन, स्वतःच्या प्रमुख जबाबदारीवर, ज्ञान मिळविण्यावर लक्ष केंद्रित करावं. कुटुंबासाठी ठरवून वेळ काढावा, संवाद जपावा.
एकटं न राहता मिळून-मिसळून राहावं; सर्वांना सोबत घ्यावं, त्यासाठी मी-पणा, आत्म-प्रशंसेला दूर लोटावं. समोरच्याची योग्य वेळी आणि योग्य शब्दात प्रशंसा करणं ही अवघड कला ज्याला जमली त्याला मित्र, माणसं कमावणं समजलं.
मित्रांचा गोतावळा व्हावा, पण यात गोम ही आहे की, त्यांचे चांगले गुण घ्यावेत, त्यांच्या वाईट गुणांपासून नेहमी चार हात लांब राहावं!

अभ्यास, अभ्यासेतर कौशल्ये, छंद:
आपल्याला सर्व काही आयतं शिकवलं जाईल ही अपेक्षा व्यावसायिक अभ्यासक्रमात तरी गृहीत नाही. त्यामुळे स्वतः अभ्यास करावा आणि त्यानंतर गरज पडली तरच शिक्षकांकडून मार्गदर्शनाची अपेक्षा करावी. अभ्यास कितीही कठीण वाटला तरीही अभ्यासाची गोडी, कष्टाची सवय आणि सोशल मीडियापासून सोशल डिस्टंसिंगची, चार हात दूर राहण्याची, तयारी ठेवावी.
काळानुरूप, अभ्यासेतर कौशल्ये, नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आत्मसात करावीत. सर्व कार्यक्रमात, स्पर्धांमध्ये, सहलीत जमेल तसं सहभागी व्हावं, मिळेल ती जबाबदारी उत्साहाने घ्यावी, पार पाडावी. स्वतःची आवड शोधावी, जोपासावी!

जबाबदारी:
घरापासून दूर राहताना प्रथमच बरचसं स्वातंत्र्य मिळतं, पण त्यासोबत जबाबदारीही येते. स्वतःचे बरेचसे निर्णय आपण स्वतः घ्यायला शिकतो.
इन्स्टा-फेबुवर टाईमपास करायचा, मोबाईल गेम्स खेळून आभासी जगात वावरायचं; की चालत्या-बोलत्या माणसांशी संवाद साधायचा, वाचन-लिखाण-चिंतन-मनन करायचं हा निर्णय घ्यायला शिकावं, त्याची जबाबदारी घ्यावी.
कोणीतरी म्हटलं आहेच -- "मनाचं आरोग्य जपण्यासाठी, स्वतःशी प्रामाणिक राहणं, यापेक्षा चांगला व्यायाम नाही"

----

इथे लिहिलेल्या बहुतेक सर्वच गोष्टी आपण वेगवेगळ्या माध्यमातून नेहमीच ऐकत, वाचत असतो, नवीन असं काहीच नाही यात. काही गोष्टी उमगतील, काही नाही; काही वेळेसोबत उमगतील, काही स्वतः शोधाव्या लागतील. पण त्याची प्रकर्षाने जाणीव होणं आणि ती दृढ करणं महत्वाचं!

"मामाचं पत्र हरवलं" या खेळात ते पत्र हरवतं; हे पत्र मात्र हरवू नका!

----

साहित्यिकविचार

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

7 Aug 2022 - 6:25 pm | मुक्त विहारि

थोडक्यात आणि मुद्देसूद

श्रीगणेशा's picture

7 Aug 2022 - 7:39 pm | श्रीगणेशा

धन्यवाद मुवि सर _/\_

मुक्त विहारि's picture

7 Aug 2022 - 8:44 pm | मुक्त विहारि

मी, जेमतेम दहावी पास शेतकरी आहे ...

काका, म्हणालात तर उत्तम ...

श्रीगणेशा's picture

7 Aug 2022 - 10:04 pm | श्रीगणेशा

नक्कीच, मुवि काका _/\_

शाळेतलं शिक्षण कागदापुरतंच, आपण बरचसं शिकतो ते जगण्याच्या शाळेतच!

रात्रीचे चांदणे's picture

7 Aug 2022 - 8:17 pm | रात्रीचे चांदणे

चांगलं पत्रं, फक्त विध्यार्थ्यांसाठी नाहीतर सर्वांसाठी.

श्रीगणेशा's picture

7 Aug 2022 - 10:05 pm | श्रीगणेशा

धन्यवाद रात्रीचे चांदणे _/\_

चांगलं पत्र,बरेचदा असे लिखाण अनेकदा वाचतो.पण तेवढ्या पुरतेच भारावतो.ह्या भारावण्याच्या दशेतून बाहेर पडून हळूहळू या गोष्टी अमलात आणून मग एका टप्प्यावर आपसूकच हे सर्व घडत जाते.
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे!

श्रीगणेशा's picture

9 Aug 2022 - 8:04 am | श्रीगणेशा

धन्यवाद भक्ती!
विचार कृतीत उतरवणं अवघड. आणि खरं आहे, वेळेसोबत सर्व गोष्टी आपसूकच समजतात, अमलात आणाव्याच लागतात.
परंतू, विद्यार्थीदशेत याची व्यवस्थीत जाणीव झाली तर पुढचा प्रवास बराचसा सोपा होतो.