योग म्हणजे नक्की काय ?

Primary tabs

Jayant Naik's picture
Jayant Naik in जनातलं, मनातलं
9 May 2022 - 10:19 am

योग म्हणजे नक्की काय ?
प्रस्तावना .

योग म्हणजे नक्की काय आहे ? हा प्रश्न मला बरेच दिवस भेडसावत होता . (खरा शब्द हा योग किंवा संस्कृत मधे योगः असाच आहे. योगा असा जो वापर होतो तो चुकीचा आहे .) या शब्दाच्या अर्थाचा शोध घेण्याचा प्रयत्न मी सुरु केला तेव्हा या विषयाचा आवाका बघून मनावर खूप दडपण आले. तथापि प्रयत्न सुरूच ठेवले. एका जिज्ञासूच्या भूमिकेतून मी या प्रश्नाचा शोध घेतला आहे ,तो तुमच्यासमोर मांडला आहे. आंतरजालावर असलेली माहिती आणि काही उपलब्ध पुस्तके यांच्या आधारे मी हा शोध घेतला आहे. माझे मत मी शेवटी मांडले आहे .
हा शोध तीन प्रकरणात घेतला आहे.
१. ०. योग एक मागोवा . योग याचा शब्दार्थ काय आहे ?आणि वेगवेगळ्या ग्रंथात या बद्दल काय सांगितले आहे?
२. ०. योगाचा सखोल विचार .
३. ० निष्कर्ष आणि माझे मत.

प्रकरण १. ०. योग एक मागोवा .
१. . १ आपल्या व्यवहारात येणारे शब्द
योग हा शब्द ऐकताच आपल्या डोळ्यासमोर योगासने येतात. पण योग या शब्दाचा अर्थ हा इतका मर्यादित नाही. आपण आपल्या नेहमीच्या जीवनात सुद्धा योग या शब्दाचा अनेक प्रकारे वापर करतो.
“ तुमच्या भेटीचा योग केव्हा येतो कुणास ठाऊक ?”
“ अरे ..तुम्ही सुद्धा इथे आलात ? काय योगायोग आहे !”
योगाचे बरेच प्रकार आपल्या नेहमीच कानावर येत असतात.
ज्ञानयोग ,कर्मयोग ,भक्तीयोग ,हठयोग, समत्वयोग , बुद्धीयोग , मंत्र योग . इत्यादी . भगवतगीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या नावातच एक योग सांगितला आहे.
उदाहरणार्थ तिसऱ्या अध्याय हा कर्मयोग असा सांगितला आहे … तसेच प्रत्येक अध्यायाच्या शेवटी ब्रम्हविद्याया योगशास्त्रे असे शब्द आहेत.
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः ॥3॥

१. २. शब्दकोश काय म्हणतो ? किंवा वेगवेगळी शास्त्रे काय सांगतात . ?
योग शब्दाचा अर्थ शब्दकोशात काय केला आहे ? किंवा वेगवेगळी शास्त्रे या शब्दाबद्दल काय म्हणतात ते आपण पाहूया.
१. २. १
मेरियम -वेब्स्टर ( Merriem - Webster Dictionary ) योग शब्दाचा अर्थ असा करतात .. ( मराठी भाषांतर हे माझे आहे त्यातून फक्त भावार्थ सांगायचा प्रयत्न आहे. मूळ इंग्रजी अर्थ कंसात दिलेला आहे. )

अ. एक हिंदू आस्तिक विचारसरणी जी सर्व शारीरिक ,मानसिक तसेच इच्छाशक्ती यांचे निरोधन करते . तसेच जीवात्मा आणि शरीर ,मन , इच्छा हे भिन्न आहेत याची जाणीव करून मोक्ष मिळवून देईल.
ब . एक शारीरिक आसन प्रणाली , प्राणायाम पद्धती आणि काही वेळा एक ध्यान पद्धती जी योग शास्त्रापासून निर्माण झाली आहे . विशेषतः पाश्चिमात्य देशात ही प्रणाली शारीरिक आणि मानसिक आरोग्य वर्धनासाठी वापरली जाते.
( a Hindu theistic philosophy teaching the suppression of all activity of body, mind, and will in order that the self may realize its distinction from them and attain liberation
a system of physical postures, breathing techniques, and sometimes meditation derived from Yoga but often practiced independently especially in Western cultures to promote physical and emotional well-being.”)
१. २. २ मूळ योग शब्दाचा पाणिनी यांनी दिलेला अर्थ .
मूळ संस्कृत शब्द “युज” या जुळणे किंवा जोडणे या अर्थाच्या शब्दावरून “योग “ हा शब्द बनला आहे . योग हा मूळ दोन धातु( मूळ शब्द ) पासून घेता येतो .
अ . यूज योग ( म्हणजे जुळणे किंवा जोडणे). या शब्दात एक क्रिया किंवा हालचाल दर्शवली आहे.
ब . आणि युज समाधौ म्हणजे लक्ष केंद्रित करणे किंवा ध्यान करणे. या शब्दात एक स्थिती दर्शवली जाते.

( संदर्भ . विकिपीडिया (Pāṇini (4th c. BCE) wrote that the term yoga can be derived from either of two roots: yujir yoga (to yoke) or yuj samādhau ("to concentrate").[32] In the context of the Yoga Sutras, the root yuj samādhau (to concentrate) is considered the correct etymology by traditional commentators)

१. २. ३. विकिपीडिया काय म्हणतो ?
विकिपीडिया वर योग या शब्दाचा अर्थ असा सांगितला आहे.
“योग तो आहे, की जो देह आणि चित्त यांच्या ओढाताणीत मानवाला अनेक जन्मांपर्यंत आत्म-दर्शनापासून वंचित रहाण्यापासून वाचवतो•
चित्तवृत्तींच्या निरोधाने (दमनाने) नाही, तर त्या जाणून त्यांना उत्पन्नच न होऊ देणे (हा खरा) योग होय•
योगाचा मूळ सिद्धान्त ध्यान आणि आसनांच्या माध्यमातून दैहिक आणि मानसिक पूर्णता प्राप्त करणे होय• याचे प्रारंभिक स्वरूप हिन्दू ग्रंथांमध्ये - महाभारत, उपनिषद, पतञ्जलीचे योगसूत्र आणि हठयोग प्रदीपिका मध्ये मिळतात•
योग एक पूर्ण विज्ञान आहे, एक पूर्ण जीवन शैली आहे, एक पूर्ण चिकित्सा पद्धति आहे आणि एक पूर्ण अध्यात्म विद्या आहे• योगाच्या लोकप्रियतेचे रहस्य हे आहे की लिंग, जाति, वर्ग, संप्रदाय, क्षेत्र आणि भाषाभेदांच्या संकीर्णतांमध्ये कधी आबद्ध न असणे होय• चिंतक, बैरागी, अभ्यासी, ब्रह्मचारी, गृहस्थ कोणीही याचे सानिध्य प्राप्त करून लाभांन्वित होऊ शकतात•
संदर्भ ( https://en.wikipedia.org/wiki/Yoga)
१. २. ४ अमर कोश काय अर्थ सांगतो ?
अमरकोश योग या शब्दाचे पाच अर्थ सांगतो .
⦁ योग हे उपायाची पूर्वतयारी आहे.
⦁ ध्येय गाठायचे साधन आहे.
⦁ ध्यान आहे.
⦁ ते एक एकत्रीकरण आहे.
⦁ ते कौशल्याने अथवा युक्तीने बुद्धीचा वापर करणे आहे.
१. २. ५ लिंग पुराण या ग्रंथात योग याचा अर्थ असा सांगितला आहे.
योग हे मनातील द्वंद्व थांबवणे आहे.

१. २. ६ आचार्य रामानुज यांचे योगावर भाष्य
अप्राप्तया प्राप्ती योग :
जे सद्य स्थितीत प्राप्त नाही ते प्राप्त करणे म्हणजे योग ..
शंकराचार्यांनी सुद्धा भगवतगीतेच्या “ योगक्षेमं वहाम्यहम् ॥ ९-२२ ॥” या श्लोकात योग या शब्दाचा अर्थ असाच केलेला आहे.
१. २. ७.. योग याज्ञवल्क्य या योगावरील ख्यातनाम ग्रंथात योगाची व्याख्या अशी केली आहे.
जीवात्मापरमात्मा संयोग :
संयोगो योग इत्युक्तो जीवात्मपरमात्मनोः

जीवात्मा आणि परमात्मा यांचे एकत्रीकरण किंवा संयोग म्हणजेच योग .
या श्लोकावरील भाष्यात भाष्यकार असे म्हणतात.बाह्य जगापासून तसेच मनापासून स्वतःला वेगळे करणे म्हणजे योग तसेच फक्त दृष्टा बनून परमात्म्यात विलीन होऊन राहणे हा सुद्धा योगच आहे. ( Thus, movement away from the world and the mind is Yoga. And to stay as the Seer and remain with the Divine is also Yoga.)
योगाचे उद्दिष्ट हे दृष्टा आणि द्रुश्य यातील अंतर जाणून दृष्टा म्हणून स्थिर राहणे हेच आहे आणि यालाच मोक्ष असे म्हंटले आहे.
दृश्य ज्याला प्रकृती आणि माया आणि दृष्टा याला पुरुष आणि आत्मन असे सुद्धा सांख्य शास्त्रात आणि अद्वैत वेदांतात म्हंटले आहे . हाच जीवात्मा . परमात्मा ,परमेश्वर , ब्रह्म .
योग या शब्दाचा इथे अर्थ असा आहे “ प्रकृती किंवा माया या पासून दूर जाणे ,अलिप्त करणे आणि दृष्टा किंवा पुरुष यात स्थिर राहणे. म्हणजेच जीवात्मा आणि परमात्मा यांचा संयोग. योग हा परमेश्वरापर्यंत परत जाण्याचा आणि त्या अवस्थेत स्थिर राहण्याचा मार्ग आहे. हाच मोक्ष आहे.”

( संदर्भ .योग याज्ञवल्क्य Translated By Mr . A .G .Mohan . Publishers. Ganesh and Company Madras ( Now Chennai ))

१. २. ८. शिव संहिता या योगावरील ग्रंथात योगाबद्दल काय सांगितले आहे ?
ही संहिता योगावरील एक महत्वाचा ग्रंथ समजला जाणारा आहे. प्रकरण १ . १७ या श्लोकात असे विधान आहे ,कि सर्व शास्त्रांचा अभ्यास केल्यानंतर आणि त्यावर सतत मनन केल्यावर मी( भगवान शिवा ) अश्या निष्कर्षावर आलो आहे कि सर्व शास्त्रात योग शास्त्र हे अभ्यास करण्यास सर्वात श्रेष्ठ आहे.
या मुळे योग हे एक शास्त्र आहे या विधानाला पुष्टी मिळते.
१. २. ९. हठयोग प्रदीपिका या ग्रंथात योग काय आहे ?
हठ योग ही एक विशिष्ट योगविद्या आहे. १५व्या शतकातील ऋषी योगी स्वात्माराम ह्यांनी हठ योगाची रचना केली. ह्या रचनेत स्वात्मारामांनी "राज योगाच्या प्राप्ततेसाठी आवश्यक असलेली उंची गाठण्याची शिडी" अशी हठ योगाची ओळख करून दिली आहे.
शरीराच्या दृष्टीने हठयोगाला वैशिष्टय़पूर्ण स्थान आहे. मानवी शरीर हे पार्थिव तत्त्व ते आत्मतत्त्व यांना जोडणारा पूल आहे. मन आणि आत्मा यांना पार्थिवाच्या पकडीतून सोडविणाऱ्या शक्ती शरीरात असतात. अज्ञानाशी, दुःख-भोगांशी सामना करायला शरीर सशक्तच हवे. सशक्त शरीर आणि मन आध्यात्मिक गतीचे साधन ठरते. हठयोगात आसने, बंध, षट्क्रिया, प्राणायाम यांचा अभ्यास असतो.
‘ह’ म्हणजे सूर्य. ‘ठ’ म्हणजे चंद्र. यांचा जो योग तो हठयोग. हा श्वासोच्छ्वासाचा शास्त्रोक्त अभ्यास होय.
( संदर्भ https://mr.wikipedia.org/s/erw
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून )
१ . २. १०. हठयोग म्हणजे काय ? मराठी विश्वकोश .
हठयोग : एक कष्टसाध्य योगप्रकार. हठयोगात आसन, प्राणायाम, बंध, मुद्रा, त्राटके, नेती, धौती, बस्ती इ. कष्टसाध्य कृतींच्या आधारे समाधी प्राप्त करून घेतली जाते, म्हणून त्याला ‘हठयोग’ म्हणतात पण हठयोगविषयक ग्रंथांमध्ये ‘हठयोग’ या शब्दाची वेगळी व्युत्पत्ती दिली जाते. त्यानुसार ‘ह’ म्हणजे सूर्यनाडी आणि ‘ठ’ म्हणजे चंद्रनाडी. सूर्यनाडीआणि चंद्रनाडी अनुक्रमे उजव्या व डाव्या नाकपुडीतून चालणाऱ्याश्वसनाला म्हटले जाते. यांनाच पिंगला व इडा असेही म्हणतात. यादोन्हींचा संयोग जेथे होतो तिला सुषुम्ना नाडी म्हटले जाते. या सुषुम्ना नाडीला हठयोगात विशेष महत्त्व आहे. म्हणून ह (पिंगला) आणि ठ ( इडा) एकरूप होण्यातून जो योग साधला जातो तो हठयोग. कुंडलिनी नावाची एक तेजोवलयरूपी नाडी शरीरात नाभीच्या खाली व मूलाधार-चक्राच्यावर असते. तिला जागृत करून मस्तकातील ब्रह्मरंध्रापर्यंत पोहोचविणे, हे हठयोगाचे ध्येय असते. ही कुंडलिनी जागृती सुषुम्ना नाडीच्या माध्यमातूनच घडते. हे सुषुम्ना नाडीचे महत्त्व.
स्वात्मारामाने हठयोग आणि राजयोग यांत फरक केला आहे.राजयोग म्हणजे समाधी ज्यात मन जीवात्म्यात विलीन होते व जीवात्मा परमात्म्यात विलीन होतो. योगसाधनेचे हेच अंतिम ध्येय आहे. हठयोग हे राजयोगाचे साधन आहे, असे स्वात्माराम मानतो.
( संदर्भ . मराठी विश्वकोश . )
१. २. ११. आयुर्वेदामधे योग हा शब्द काय अर्थाने घेतला आहे ?
योग हा शब्द औषधी फॉर्म्युलेशन्स अश्या अर्थाने सुद्धा वापरला जातो. . इथे योग हा एकत्र करणे अश्या अर्थाने वापरला आहे.
(Yoga (योग) is a Sanskrit technical term and refers to “drug formulations”.—There was a tradition of writing small books containing drug formulations (yoga) in Ayurveda. They are one kind of handbooks of Ayurvedic treatment. Vaidyas of yore wrote the books of those formulations which they used in their own practice. These books are small having 100 or 300 formulations. Yogaśataka of Pandita Vararuci is an example of this category.
Source: gurumukhi.ru: Ayurveda glossary of terms
(https://www.wisdomlib.org/definition/yoga))

१. २. १२. श्री रमण महर्षी योग काय आहे असे सांगतात ?
ते एक वेगळाच मुद्दा ते मांडतात. योग हा शब्द काही तरी कशाबरोबर तरी मिळवणे दाखवतो. म्हणजेच त्या दोघांचे पूर्वी कधी तरी विभाजन झाले असले पाहिजे. म्हणजेच वियोग झाला असला पाहिजे. तुम्ही स्वतः शोध घेणारे आहात . कुणाशी तरी योग तुम्हाला साधायचा आहे. असे जर तुम्ही मानलेत तर ज्याचा शोध तुम्ही घेताय ते तुमच्यापासून वेगळे असले पाहिजे. पण तुमचा “ स्व” ( सेल्फ ) हा तुमच्या जवळच आहे आणि तुम्हाला त्याची जाणीव नेहमीच असते. त्याचा शोध घ्या. तो “स्व” तुम्हाला परमेश्वरापर्यंत घेऊन जाईल . इथे महर्षी “ स्व” अथवा “Self” हा शब्द एक सर्वव्यापी जाणीव या अर्थाने करतात .

( He defined self by saying that the real Self or real “ I” is, contrary to perceptible experience, not an experience of individuality but a non-personal, all-inclusive awareness. It is not to be confused with the individual self which he said was essentially non-existent, being a fabrication of the mind which obscures the true experience of the real Self)

श्री रमण महर्षी योग याचा अर्थ जुळवणे असाच करतात . पण ते म्हणतात तुमचा त्या परमेश्वराशी वियोग झालाच
नाही . तुम्ही फक्त तसा चुकीचा विचार करत आहात. असा चुकीचा विचार थांबवणे हाच खरा योग आहे. तुमचा कुणापासून वियोग झाला आहे याचा शोध म्हणजेच योग होय. या शोधात तुमच्या असे लक्षात येईल कि तुम्ही त्या परमेश्वरापासून वेगळे होणे किंवा असणे शक्यच नाही. तुमचा वियोग नव्हताच . त्या मुळे योग जरुरी नाही .
( संदर्भ . Be as You are . Teachings of Shree Ramana Maharshi . Edited by David Godman. )

१. २. १३. योग वशिष्ठ . या ग्रंथात योग या बद्दल असे सांगितले आहे.
मनः प्रशमन उपयः योग इति अभिधिते
(Yog Vashista – 3.9.32; )
अर्थ. योग हा मनाला शांत करण्याचा उपाय आहे.
इथे योग या शब्दाचा अर्थ पातंजल योग शास्त्रात केला आहे तसाच “ चित्तवृत्ती निरोध “ या अर्थी केला आहे.

प्रकरण २.०. योगाचा सखोल विचार

योग समजून घ्यायचा असेल तर पातंजल योग शास्त्र, भगवद्गीता,उपनिषद यांचा सखोल विचार करावा लागेल . या प्रकरणात त्याचा विचार केला आहे.
२. १. पातंजल योग सूत्रे
पतंजली ऋषीनी योगशास्त्र सूत्ररुपाने मांडले आहे. यात योगाची पुढीलप्रमाणे व्याख्या दिली आहे:
योग: चित्तवृत्ती निरोध: ( पातंजल योग सूत्रे प्रकरण १ सूत्र २.)

⦁ स्वामी विवेकानंद योगसूत्राच्या त्यांनी केलेल्या भाष्यामधे असे म्हणतात . मनाला योग्य लगाम घालून त्यात वेगवेगळ्या विचारांचा उगम होऊ नये असे करणे म्हणजे योग .(Yoga is restraining the mind-stuff (Chitta) from taking various forms (Vrttis))
⦁ किंवा असेही म्हणता येईल . चित्तवृत्तींना निर्विचार करणे म्हणजे योग.
⦁ पातंजल योग शास्त्रात योगाची आठ अंगे सांगितली आहेत.
यम ,नियम ,आसन ,प्राणायाम ,प्रत्याहार ,धारणा ,ध्यान ,समाधी ..
यातील पहिली चार ही शरीर संबंधी असून पुढची चार ही मनाच्या संबंधात आहेत .
म्हणजेच योग हा शरीर आणि मन यांचा समन्वय करणारा आहे.
पातंजल योग शास्त्राच्या भाष्यामधे ( ज्याला विवरण असेही म्हणतात .) शंकराचार्य सूत्र १ आणि २ यावर भाष्य करताना काही मूलभूत गोष्टी सांगतात.
१. ० संसार हा दुःखमय आहे.
२. ० याचे मूळ कारण अविद्या आहे.
३. ० या अविद्ये मुळे दृश्य आणि द्रष्टा ह्यांचे एकात्म भासमान होते.
४. ० या एकात्म भासमानतेपासून मोक्ष मिळण्याचा मार्ग म्हणजे अखंड ( अविप्लव ) जाणीव कि दृश्य आणि द्रष्टा हे भिन्न आहेत. ( ज्ञान ) .
५. ० हा मार्ग म्हणजे योगशात्रात सांगितलेला अष्टांग मार्ग . या मुळे अविद्येचा नाश होतो आणि दृश्य आणि द्रष्टा यांच्या भिन्नतेचे ज्ञान होते.
६. ० अर्थात योगशास्त्राचे साध्य हे आहे कि ,जेव्हा हे भिन्नतेचे ज्ञान होते ( विवेक ख्याती ) तेव्हा अविद्या नाहीशी होते आणि हे अज्ञान नष्ट होताच, दृश्य आणि द्रष्टा यांच्या भासमान एकात्मापासून मोक्ष मिळतो. यालाच कैवल्य असे समजले जाते. यालाच योगामधे प्रतिष्ठित होणे म्हणतात.
अर्थात इथे योग हे साधन आहे तसेच साध्य सुद्धा आहे.
इथे योग या शब्दाचा अर्थ दृश्य अथवा प्रकृती अथवा माया याची यथार्थता जाणून त्या पासून अलिप्त होणे आणि द्रष्टा म्हणून स्थिर राहणे.
म्हणजे योग हे बंधक शक्तींपासून मुक्तता आणि बंधमुक्त करणाऱ्या शक्तींशी संयोग आहे.

( संदर्भ. Complete Commentary of Sankara On Yoga Sutras By Trever Legget. First published in 1990)

२. १. १. द्रष्टा आणि द्रुश्य या दोन शब्दांबद्दल थोडे विवेचन.
द्रष्टृदृश्ययोः संयोगो हेयहेतुः ॥ २.१७॥

पातंजल योग सूत्र २. १७ या बद्दल स्वामी विवेकानंद असे म्हणतात
सर्व दुःखाच्या मुळाशी द्रष्टा ( The Seer. किंवा पाहणारा ) आणि दृश्य ( The Seen ) यांचा संयोग आहे. पाहणारा कोण आहे ? पुरुष किंवा जीवात्मा किंवा द्रष्टा. ( The Self or The Seer ) .
काय पहातो आहे ? द्रुश्य ( The Seen ) काय आहे ? संपूर्ण जग किंवा निसर्ग . तुमचे मन . सर्व स्थूल जग ( Gross Matter ). सर्व दुःख किंवा सुख हे पुरुष किंवा जीवात्म्याच्या मनाशी तादात्म्य पावल्यामुळे होते. जीवात्मा किंवा पुरुष हा मुळात शुद्ध आहे मन आणि जगाच्या तादात्म्यामुळे जीवात्म्याला सुख आणि दुःख भासमान होते.

एक उदाहरण घेतले तर ….
तुम्ही रस्त्याने जाताना ,तुम्ही काही मोटारी ,दुचाकी किंवा काही माणसे पाहता ..,झाडे पाहता ..पक्षी ..प्राणी . त्यांचे वेगवेगळे आवाज अनुभवता . वेगवेगळे वास अनुभवता . कुणाचा किंवा कशाचा तरी तुम्हाला स्पर्श होतो ते तुम्हाला जाणवते , हे सगळे तुमच्या ज्ञानेंद्रियांमार्फत तुमच्या मनात नोंदले जाते तसेच बुद्धीच्या साहाय्याने तुम्ही त्याचा अर्थ लावता आणि तुमच्या मनामार्फत तुम्हाला म्हणजे पुरुषाला किंवा जीवात्म्याला त्याचे यथायोग्य ज्ञान होते .
दुसरे एक उदाहरण …
तुमच्या समोर जेव्हा श्रीखंड येते ,तेव्हा तो शब्द तुम्ही कानाने ऐकल्याबरोबर , तुम्हाला त्याचे रूप आणि चव समजते. म्हणजे त्याला नाव आहे आणि रूप आहे. ते खाल्यावर त्याची जिभेद्वारे चव कळते . ही चव समजण्यासाठी तुम्हाला मन आणि बुद्धी मदत करते. खाताना तुम्ही त्याचा स्पर्श सुद्धा अनुभवता. म्हणजे तुम्ही रूप ,रस ,गंध ,स्पर्श ,आवाज आणि शब्द यांचा एकत्रित अनुभव मन आणि बुद्धी याच्या साहाय्याने घेता तेव्हाच श्रीखंडाचा परिपूर्ण अनुभव तुमचा “ स्व “ किंवा Self किंवा जीवात्मा , पुरुष घेतो .
तुम्हाला हा जो सर्व अनुभव होतो ..म्हणजे ज्याचा अनुभव होतो ते द्रुश्य आणि ज्याला अनुभव होतो तो पुरुष किंवा द्रष्टा.
वेदांत असे सांगतो कि ,द्रुश्य या मधे तीन गुणांचा( सत्व ,रज आणि तमस ) समावेश असतो . ते सगुण आहे . विनाशी आहे. सतत बदलत असते . म्हणूनच माया आहे.
जे विनाशी, सतत बदल होणारे आहे , ज्याचे अस्तित्व दिसते किंवा जे भासते ते द्रुश्य आणि जे अविनाशी आहे आणि ज्याला हे द्रुश्य दिसते ..अनुभवता येते आणि ज्यात बदल होत नाही , ते अविनाशी तत्व म्हणजे पुरुष ,जीवात्मा किंवा द्रष्टा.
हा जो पुरुष अथवा द्रष्टा आहे हा आपण जागे असताना ,झोपलेले असताना ,स्वप्नात असताना कायम उपस्थित असतो . हा निर्गुण असतो आणि अविनाशी असतो . स्थिर असतो. हा आपली ज्ञानेंद्रिये आणि मनाच्या आणि बुद्धीच्या माध्यमातून जगाचा अनुभव घेत असतो.
(The Seer is simply an eternal observer which perceives the world through the mind and its senses, while itself remaining unaffected and unchanged)
द्रष्टा हा मुळात मुक्त असतो . पण मन आणि ज्ञानेंद्रिये आणि ज्ञानेंद्रियांना आवडणारे पदार्थ (sense objects ) यांच्याशी चुकीच्या आत्मीयतेमुळे , द्रष्टा हा दृश्याला बांधला जातो. म्हणजेच या जगाला बांधला जातो. ( हे माझे शरीर आहे ,हे माझे विचार आहेत ,हे माझे घर आहे ,ही माझी बायको किंवा हा माझा नवरा आहे अश्या विचारांनी मी हा मनाला आणि जगाला बांधला जातो .)
(To remain serenely detached from the world as the Seer is our natural state, the state of freedom. But through our mistaken identification with the mind, its objects and its senses, the Seer becomes bound by the Seen, thus leading to a state of bondage to the external world of time and circumstance.
( संदर्भ .योग याज्ञवल्क्य Translated By Mr . A .G .Mohan . Publishers. Ganesh and Company Madras ( Now Chennai ))

वेगवेगळी तत्वज्ञाने वेगवेगळ्या भाषेत ,वेगळ्या शब्दांच्या साहाय्याने शेवटी याच निष्कर्षावर येतात कि प्रत्येकात एक अविनाशी तत्व आहे तसेच ते संपूर्ण जगाच्या मागे सुद्धा आहे. फक्त मायेच्या मोहजालामुळे किंवा अज्ञानामुळे आपल्याला ते दिसत नाही. हे अज्ञान घालवून या अविनाशी तत्वाच्या संयोग जो आधीपासून आहेच त्याची जाणीव आपल्याला होणे हाच मोक्ष आहे.
“ तत्त्वमसि आणि अयमात्मा ब्रह्म” या महा वाक्यांचा अर्थ हाच आहे . आणि तेच योगाचे उद्दिष्ट आहे.

२. १. २ व्यास मुनीचे पातंजल योग शास्त्रावरील भाष्य.
योग म्हणजे समाधी अशी व्याख्या व्यासमुनी करतात. मनाच्या पाचही अवस्थेत समाधी असते. त्या पाच अवस्था म्हणजे
क्षिप्त - आपोआप येणारी. जोपर्यंत काही अप्रिय जाणवत नाही तो पर्यंत असणारी.
मूढ - विवेक विरहित स्थिती ..
विक्षिप्त - क्षिप्त स्थितीच्या विरुद्ध . वेगवेगळ्या दिशेने भरकटणारी .
एकाग्र - एकाच विषयाचा विचार करणारी .
निरोध. - विचार विरहित स्थिती .
या ठिकाणी योग हा जोडणे या अर्थाने न घेता सम स्थितीत राहणे या अर्थाने वापरला आहे. ( संदर्भ. Complete Commentary of Sankara On Yoga Sutras By Trever Legget. First published in 1990)
२. २ भगवद्गीता योगाबद्दल काय म्हणते ?
गीतेमधे योग हा शब्द अनेक ठिकाणी आला आहे.
२. २. १. मूळ श्लोक आणि त्याचा अर्थ.

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्
॥ ९-२२ ॥

भावार्थ.
जे अनन्य प्रेमी भक्त, मज परमेश्वराला निरंतर चिंतन करीत निष्काम भावाने भजतात, त्या नित्य माझे चिंतन करणाऱ्या माणसांचा योगक्षेम मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो. ॥ ९-२२ ॥

या श्लोकाबद्दल शंकराचार्य काय भाष्य करतायत ते पाहू या.
जे भक्तगण मीच सर्वत्र या चराचरात आहे आणि मी आणि ते भक्तगण एकच आहेत अश्या भावनेने ..अद्वैतपणे ...माझी उपासना करतात त्यांना त्यांच्याकडे जे नाही ते मी त्यांना उपलब्ध करून देतो आणि जे त्यांच्याकडे आहे त्याचे मी रक्षण करतो .

या श्लोकावर भाष्य करताना शंकराचार्य योगक्षेम या शब्दाचे दोन भाग करतात. योग म्हणजे जे भक्ताकडे नाही ते उपलब्ध करून देणे आणि क्षेम म्हणजे जे भक्ताकडे आहे त्याचे संरक्षण करणे. त्यांच्या नंतरच्या भाष्यकारांनी हाच अर्थ मान्य केलेला आहे.
( संदर्भ . The Bhagwat gita with commentary of Sri Sankaracharya. English Translated by Mr. Alladi Mahadeva Shastri .Published by Samata Books Madras .originally published in 1897. )

आता ज्ञानेश्वर माउली या श्लोकाबद्दल काय म्हणतात याचा विचार करू या.
अध्याय ९ .ओवी ३३५ ते ३४३ या मध्ये माऊली या श्लोकाचा विचार करतात. ज्या प्रमाणे गर्भातील गोळा कोणत्याही उद्योगाला जाणत नाही त्या प्रमाणे ज्यांना माझ्याशिवाय आणखी दुसरे काही चांगलेच दिसत नाही त्यांनी आपल्या जगण्याला माझेच नाव ठेविले आहे अश्या रीतीने एकनिष्ठ चित्ताने चिंतन करून जे माझी उपासना करतात त्यांची सेवा मीच करतो. … ते पुढे असेही म्हणतात कि जे आपल्या पंचप्राणांची ओवाळणी करून माझी भक्ती करतात त्यांचे सर्वकाही मीच करतो. ...तसेच ...भक्त मनामध्ये जो जो भाव धरतात तो तो पुनः पुन्हा मी देऊ लागतो आणि मी त्यांना जे जे दिले त्याचे रक्षण तेही मीच करतो.
थोडक्यात या श्लोकात योग म्हणजे जे भक्ताकडे नाही ते उपलब्ध करून देणे म्हणजेच योग हे एक साधन आहे असा अर्थ आहे. ( Means to an end )

२. २. २
योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय ।
सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥ –
श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्लोक ४८
भावार्थ : हे धनंजय अर्जुना, तू आसक्ती सोडून, तसेच सिद्धी आणि असिद्धी म्हणजे यश आणि अपयश यांमध्ये समान भाव ठेवून योगात स्थिर होऊन कर्तव्यकर्मे कर. समत्वालाच योग म्हटले जाते.
या श्लोकात समत्व भावात स्थिर होऊन राहणे यालाच योग असे समजले आहे.
२. २. ३
बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते ।
तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम् ॥
– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्लोक ५०
भावार्थ : समबुद्धीचा म्हणजे जो यश आणि अपयश हे दोन्ही समान समजतो आणि असा पुरुष पुण्य आणि पाप या दोहोंचाही याच जगात त्याग करतो. अर्थात् त्यापासून मुक्त असतो; म्हणून तू समत्वरूप योगाला चिकटून रहा. हा समत्वरूप योग म्हणजेच कर्मांतील कौशल्य आहे. तसेच हाच कर्मबंधनातून सुटायचा उपाय आहे.
समत्व रूप योग हा कायमस्वरूपी कसा उपलब्ध होतो हा एक गहन विषय आहे पण त्या मुळे तुम्ही समबुद्धीचे होता. यालाच वर्तमानात कायम उपस्थित असणे असे म्हणता येईल . आपण हातात घेतलेल्या कामात जर तुम्ही स्वतःला पूर्ण झोकून दिले तर तुम्ही त्या क्षणापुरते तरी या समत्व रूप योगाला उपलब्ध होता.तुम्ही लहान मुले आपल्या आवडत्या खेळात गुंग होऊन खेळताना जर पाहिलीत तर तुम्हाला जाणवेल की ती संपूर्णपणे त्या क्षणाचा आनंद घेत असतात. त्यांना बाहेरील जगाचे भान सुद्धा नसते.
या श्लोकावर भाष्य करताना ओशो एक महत्वाची गोष्ट सांगतात, तुम्ही कार्य करताना जेव्हडे कौशल्याने आणि स्वतःला पूर्ण झोकून कराल तेवढी तुमच्या यशाची शक्यता वाढेल.
कार्य करण्याच्या क्षणी तुम्ही फक्त कार्य कौशल्याने करणे हेच ध्येय ठेवायला पाहिजे.
मला यश मिळेल का नाही ?..मला यश मिळाले तर माझा असा सन्मान होईल ..मला अपयश मिळाले तर माझा असा अपमान होईल असे विचार मनात अजिबात न आणता ..म्हणजे समत्व बुद्धिने कार्य करत राहिले पाहिजे.
हे असे पूर्ण पणे झोकून देऊन कार्य करण्याचे कौशल्य तुम्हाला योगामुळे अर्थात समत्व रूप योगाने येते. किंबहुना समत्व रूप योग आणि कर्मातील कौशल्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ( या योगाला काही जण बुद्धी योग असेही म्हणतात. )
थोडक्यात या दोन श्लोकात योग हा समत्व रूप आहे आणि पूर्ण कौशल्याने आणि फळाची आशा न धरता कार्य केल्यास तुम्ही वर्तमानात कायम उपस्थित राहू शकता असा अर्थ आहे म्हणजे यात योग या शब्दाचा स्थिती असा अर्थ आहे. ( End in itself. ) तसेच तुम्ही या समत्वयोगाने कर्मयोग सुद्धा साधू शकता असाही भावार्थ आहे त्या मुळे इथे योग हे एक साधन सुद्धा आहे. ( Means to an end )
लोकमान्य टिळक गीतारहस्यात योग हा शब्द संपूर्ण भगवतगीतेत एक साधन किंवा एक युक्ती अशा अर्थाने घेतला आहे असा युक्तिवाद करतात . त्याचा संपूर्ण विचार मी पुढे वेगळा केला आहे.
२.२.४. लोकमान्य टिळक गीतारहस्यामध्ये काय म्हणतात ?
( संदर्भ. रहस्य विवेचन - अर्थात गीतेचे कर्मयोगपर निरूपण . भाग १. लेखक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक )

⦁ लोकमान्य टिळकांनी योग या शब्दाचा सर्वांगांनी विचार केला आहे . ते म्हणतात ..
कर्म या शब्दापेक्षा अधिक भानगडीचा शब्द म्हंटला म्हणजे तो “योग” हा शब्द होय.
या शब्दाचा हल्लीचा रुढार्थ म्हणजे “ प्राणायामादि साधनांनी चित्तवृत्तींचा आणि इंद्रियांचा निरोध करणे” अथवा “ पातंजलसूत्रोक्त समाधी किंवा ध्यानयोग असा असून “या अर्थी उपनिषदामधे सुद्धा या शब्दाचा उपयोग केला आहे. ( कथाउपनिषद ). अर्थात हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे कि भगवतगीतेमधे असा सामान्य अर्थ विवक्षित नाही.
⦁ योग या शब्दाचा धात्वर्थ “जोड ,जुळणी ,मिळवणी ,संगती ,एकत्त्त्रावस्थिती “ असा आहे आणि पुढे तशी स्थिती प्राप्त होण्याचा “ उपाय ,साधन ,युक्ती ,इलाज म्हणजेच कर्म” असाही अर्थ झाला आहे.
⦁ अमरकोषात( ३.३.२२. ) सुद्धा “योग : संहननोंपायध्यानसंगती युक्तिषु “ असे सर्व अर्थ दिले आहेत.
⦁ भागवत गीतेत ९. २२. मधे योग याचा प्राप्त न झालेल्या वस्तू मिळवणे असा अर्थ घेतला आहे.
⦁ युद्धात द्रोणाचार्य जिंकले जात नाहीत हे पाहून त्यांना जिकायचा एकच योग ( साधन किंवा युक्ती ) आहे असे कृष्णाने सांगितले आहे. “ एकोहि योगोस्य भावेद्वधाय “ (महाभारत द्रोण १८१. ३१)
⦁ योगः कर्मसु कौशलम् ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्लोक ५० या श्लोकात गीतेमधे योग म्हणजे काय याची जणू व्याख्याच श्रीकृष्णाने दिली आहे. “ योग म्हणजे कर्म करण्याची काही विशेष प्रकारची कुशलता ,युक्ती ,चतुराई अथवा शैली” अशी स्पष्टपणे व्याख्या केली आहे. शंकर भाष्यात सुद्धा “ कर्माच्या ठायी स्वभावतः असणारे जे बंधकत्व ते नाहीसे करण्याची युक्ती” असाच अर्थ केला आहे.
⦁ कर्माचे पाप न लागता समत्वबुद्धीने कर्म करायची जी “ युक्ती” ( २. ४९. ) पहिल्यांदा सांगितली आहे तिचेच नाव “ कौशलम ” असून या प्रकारे म्हणजे “युक्तीने” कर्म करणे यासच गीतेत “योग” असे म्हटले आहे हे उघड दिसून येते.

२. ३. उपनिषद योगाबद्दल काय म्हणतात ?
बऱ्याच उपनिषदात योगाचा विचार झाला आहे. त्या सगळ्यांचा विचार इथे केला तर हा लेख खूपच वाढेल. आपण फक्त एका उपनिषदाबद्दल विचार करूया.
२. ३. १ कथा उपनिषद. ( यालाच कठोपनिषद असेही नाव आहे. )
या उपनिषदामधे जो विचार आहे तोच अनेक ठिकाणी केला गेला आहे . त्यामुळे या उपनिषदामधील विचार हा प्रातिनिधिक म्हणून समजता येईल .
यदा पञ्चावतिष्ठन्ते ज्ञानानि मनसा सह ।
बुद्धिश्च न विचेष्टते तामाहुः परमां गतिम् ॥ २.३ . १०॥
तां योगमिति मन्यन्ते स्थिरामिन्द्रियधारणाम् ।
अप्रमत्तस्तदा भवति योगो हि प्रभवाप्ययौ ॥२. ३ . ११॥

⦁ जेव्हा मानस किंवा मन विचार आणि पाच ज्ञानेंद्रिये यांच्या सह स्थिर अवस्थेत असते आणि बुद्धी डगमगत नाही याला उच्चतम मार्ग मानला जातो. यालाच योग असे म्हणतात. म्हणजेच स्थिर ज्ञानेंद्रिये आणि मनाची एकाग्रता. परंतु या स्थितीत कायम जागरूक राहण्याची गरज आहे. कारण योग येतो आणि जातो. ( काही भाष्यकार योग हा सृजन आणि प्रलय आहे असे म्हणतात.शंकराचार्य योग हा वाढतो तसेच हळू हळू नष्ट होतो असे म्हणतात. Subject to Growth And Decay )
⦁ या श्लोकात योगाचा अर्थ एका अवस्थेत स्थिर असणे असा केला आहे.
(Reference . Katha Upanishad with Shankara’s Commentary by S. Sitarama Sastri | 1928 |)

⦁ ओशो या दोन श्लोकांबद्दल असे म्हणतात.
जेव्हा मन पाचही ज्ञानेंद्रियासहित स्थिर होते आणि बुद्धी कोणत्याही प्रकारची क्रिया करत नाही त्याला योगी परमगति असे म्हणतात.
ही सर्व इंद्रिये अश्या प्रकारे जेव्हा स्थिर स्थितीत असतात ( त्या धारणेला )त्यालाच योग समजले जाते. कारण या स्थितीत साधक हा प्रमादरहित असतो . पण हा योग कायम न राहणारा आहे त्या मुळे या योग स्थितीत राहण्याचा दृढ अभ्यास करत रहावा लागतो.
(जब मन के सहित पांचों ज्ञानेद्रियां भलीभांति स्थिर हो जाती हैं और बुद्धि भी किसी प्रकार की चेष्टा नहीं करती उस स्थिति को ( योगी) परमगति कहते हैं।। 10।।
उस इंद्रियों की स्थिर धारणा को ही योग मानते हैं क्योंकि उस समय ( साधक) प्रमादरहित हो जाता है। परंतु योग उदय और अस्त होने वाला है अत: योगयुक्त रहने का दृढ़ अभ्यास करते रहना चाहिए।। 11।।)
या वर भाष्य करताना ओशो असे म्हणतात .
जेव्हा मन पाचही ज्ञानेंद्रियासहित स्थिर होते आणि बुद्धी कोणत्याही प्रकारची क्रिया करत नाही त्याला योगी परमगति असे म्हणतात. जेव्हा सगळ्या क्रिया थांबतात जेव्हा तुम्ही अक्रियामधे पूर्णतः बुडून जाता तेव्हा काहीही घडत नाही …. तेव्हा तुम्ही फक्त असता.हे शुद्ध असणे म्हणजे जेव्हा चेतनेची ज्योत निष्कम्प असते त्याला योगी परमगति असे म्हणतात.
या प्रमादरहित अवस्थेत तुमची चेतना ..जीवात्मा .. परमात्म्याबरोबर विलीन होतो. तुमचा अहंकार नष्ट होतो . परमात्मा तुम्हाला आपल्यात सामावून टाकतो ..किंवा असेही म्हणू शकाल कि परमात्मा तुमच्यात भरून राहतो.
पण हा योग कायम रहात नाही. याचा उदय आणि अस्त होत राहतो. याचा सतत अभ्यास करत रहावा लागतो. यालाच झेन फकीर सतोरी असे म्हणतात. ही समाधी नव्हे समाधीची पहिली पायरी आहे. याचा परत परत अभ्यास केला तर कबीर म्हणतो तशी अ-मनी अवस्था ( NO mind )( अमनी भाव ) प्राप्त होते. जेव्हा मन उरतच नाही …. तेव्हा तुम्हाला योग करायची आवश्यकता नाही.
( संदर्भ . ओशो. कठोपनिषद . प्रवचन १५)

प्रकरण ३. निष्कर्ष आणि माझे मत .

३. १. शब्दार्थ आणि भावार्थ .
भाष्यकार ,उपनिषद्कार, पातंजल योग शास्त्रात तसेच भगवद्गीता व अन्य ग्रंथातून योग याचा अर्थ काय सांगतात ?
शब्दार्थ जर पहिला तर योग या शब्दाचे पाच अर्थ स्पष्ट दिसतात. पण या ५ अर्थापैकी ३ अर्थ जास्त ठिकाणी वापरले आहेत हे स्पष्ट दिसते.
⦁ मनाच्या वृत्तींचा निरोध म्हणजेच सर्व ज्ञानेंद्रिये आणि बुद्धी यांचे निरोधन .
⦁ समाधी साधण्याचा मार्ग . ध्यानयोग सत्य समजावून घेण्याचा मार्ग. अ - मनी अवस्था (संस्कृत अमनी भाव ) ( इंग्रजी - नो माईंड अवस्था .) कायम वर्तमानात स्थिर असणे .
लोकमान्य टिळकांनी योग या शब्दाचा सर्वांगांनी विचार करताना सुद्धा या शब्दाचे दोन मुख्य अर्थ सांगितले आहेत. ते म्हणतात … या शब्दाचा हल्लीचा रुढार्थ म्हणजे “ प्राणायामादि साधनांनी चित्तवृत्तींचा आणि इंद्रियांचा निरोध करणे” अथवा “ पातंजलसूत्रोक्त समाधी किंवा ध्यानयोग” असा आहे.
⦁ एक तिसरा अर्थ लोकमान्य टिळकांच्या मते भगवतगीतेमधे आहे.
ते म्हणतात कर्मयोग म्हणजे “ युक्ती” हा अर्थ आहे.
( लोकमान्य म्हणतात .. “योग म्हणजे काय याची जणू व्याख्याच श्रीकृष्णाने दिली आहे. “ योग म्हणजे कर्म करण्याची काही विशेष प्रकारची कुशलता ,युक्ती ,चतुराई अथवा शैली” शंकर भाष्यात सुद्धा “ कर्माच्या ठायी स्वभावतः असणारे जे बंधकत्व ते नाहीसे करण्याची युक्ती” असाच अर्थ केला आहे. कर्माचे पाप न लागता समत्वबुद्धीने कर्म करायची जी “ युक्ती” ( २. ४९. ) पहिल्यांदा सांगितली आहे तिचेच नाव “ कौशलम ” असून या युक्तीने म्हणजे “युक्तीने” कर्म करणे यासच गीतेत “योग” असे म्हटले आहे हे उघड दिसून येते.” )
३.२. पातंजल योग सूत्रात योग याचे विवेचन
शंकराचार्य पातंजल योग शास्त्रावर भाष्य करताना जे विवेचन करतात त्यावरून आपण काही समीकरणे मांडू शकतो .
१. दुःखमय जगत किंवा संसार = अविद्या ( दुःखाचे मूळ कारण अज्ञान )
२. अविद्या = दृश्य आणि दृष्टा यांचे एकात्म्य भासमान होणे.
३. अज्ञान नष्ट होणे = ज्ञान होणे म्हणजेच दृश्य आणि दृष्टा यांचे एकात्म्य नाही याची अखन्ड जाणीव( अविप्लव ) होणे.यालाच विवेक खयाती असे सुद्धा समजले जाते.
४. ज्ञान = मोक्ष ( दृश्य आणि दृष्टा यांच्या भासमान एकात्म्यापासून मुक्ती .) यालाच कैवल्य असे ही समजतात.
४ . योग = समाधी ( व्यास मुनींची व्याख्या. ) यालाच मन एकाग्र करून वर्तमानात सदैव राहणे असेही समजले जाते.
५ . योग =यम +नियम +आसन +प्राणायाम +प्रत्याहार +धारणा +ध्यान + समाधी
६. समाधी = ज्ञानाचा उदय .
७. योग ( किंवा त्याचे साध्य ) = दृष्टा आणि दृश्य यांच्या भिन्नाचे ज्ञान यालाच विवेक ख्याती असेही म्हंटले जाते.+दृष्टा म्हणून परमात्म्यात स्थिर राहणे .
किंवा .
योग = जीवात्मा ( दृष्टा ) + परमात्मा .
८. योग याज्ञवल्क्य मधे योग = दृष्टा बनून परमात्म्यात विलीन होणे +बाह्य जगापासून आणि मनापासून वेगळे असणे. अलिप्त असणे . .
म्हणजेच बाह्य जगापासून तसेच मनापासून स्वतःला वेगळे करणे म्हणजे योग तसेच फक्त दृष्टा बनून परमात्म्यात विलीन होऊन राहणे हा सुद्धा योगच आहे. ( Thus, movement away from the world and the mind is Yoga. And to stay as the Seer and remain with the Divine is also Yoga.)
( संदर्भ .योग याज्ञवल्क्य )
३. ३ ओशो योग या बद्दल काय म्हणतात ?
⦁ योग ही सत्य समजून घेण्याची एक पद्धत आहे.
⦁ योग हे वर्तमानात कायम राहण्याचे एक शास्त्र आहे. योग म्हणजे तुम्ही भविष्याकडे न जाण्याचे ठरवता . भूत आणि भविष्य या दोन्हीकडे पाठ फिरवून तुम्ही फक्त वर्तमानात स्थिर होता. जे आहे ( The Reality ) त्याला सरळ सामोरे जाता.
⦁ योग म्हणजे अ - मनी ( No Mind ) ( अमनी भाव ) अवस्था. मन म्हणजे सर्व तुमचे विचार ,तुमचा अहंकार तसेच तुमच्या भावना ,तुमच्या इच्छा,तुमचे धर्म ,अगदी सगळे. ज्याचा तुम्ही विचार करता ते सर्व यात आले. यातील काहीही नाही ती अ - मनी अवस्था ( अमनी भाव )
⦁ योग हे फक्त तंत्रज्ञान ( Technology ) आहे. ते कोणत्याही एका धर्माचे नाही. ते फक्त हिंदू नाही .ते ख्रिस्ती योग असेल , हिंदू योग असेल ,बौद्ध योग तर नक्कीच असेल . जितके धर्म तितके योग असू शकतात . ते फक्त एक मशीन असल्यासारखे आहे. योग ,मंत्र आणि यंत्र हे सर्व एक तंत्रज्ञान आहे . तंत्रज्ञान कोणत्याही एका धर्माचे असू शकत नाही .
३. ४. निष्कर्ष आणि माझे मत .
शास्त्र आणि तंत्रज्ञान
वरील विवेचनाच्या आधारे माझ्या मते योग हे एक शास्त्र आहे ( शिवसंहीता आणि भगवद्गीता या दोन्ही ग्रंथात योग हे एक शास्त्र आहे असे विधान आहे. ) आणि तंत्रज्ञान किंवा साधन सुद्धा आहे. या दोन्ही अर्थाने योग हा शब्द वापरला गेला आहे. तसेच यात योग सुद्धा आहे आणि वियोग सुद्धा आहे .
⦁ शास्त्र म्हणून यात वियोग झालेल्या गोष्टीपासून पुन्हा मिलन किंवा एकत्रीकरण आहे. हेच मूळ साध्य आहे.
⦁ तंत्रज्ञान किंवा साधन म्हणून योगात अभिप्रेत असलेले ज्ञान मिळवण्याचे मार्ग आहेत. लोकमान्य म्हणतात तशी कर्मयोगाची युक्ती ,ज्ञान योग , भक्ती योग ,हठयोग ( हठयोग हा राजयोगापर्यंत जाण्याची शिडी आहे असे विधान आहे . ) ,मंत्र योग अथवा इतर कोणत्याही नावाचे साधन . ह्यात दोन गोष्टी अपेक्षित असतात.
१. विधायक शक्तींचे एकत्रीकरण जसे पूर्ण एकाग्रता, परमेश्वराची नितांत भक्ती . अभ्यास , श्रद्धा आणि भक्ती
२. संहारक शक्तींचे किंवा बंधक शक्तींचे निर्मूलन . जसे प्रकृती पासून किंवा मायेपासून तसेच ज्ञानेंद्रियापासून आणि फळाच्या आकांक्षेपासून दूर जाणे. आणि या स्थितीत कायम राहण्यात असलेले अडथळे दूर करणे .( वैराग्य. )
( योग सूत्रे १. १२ आणि १. २३)
माझ्या मते योग शब्दाचा हाच खरा अर्थ आहे.
( तळटीप . माझ्या लेखाचा मूळ उद्देश हा योग म्हणजे काय हे समजावून घेणे आहे. या लेखात आलेले दृष्टा तसेच द्रुश्य , माया ,प्रकृती, जीवात्मा ,परमात्मा,
स्व ( सेल्फ ) ,ज्ञान आणि अज्ञान , विद्या आणि अविद्या हे शब्द त्या त्या संदर्भ ग्रंथात आलेत तसे इथे घेण्याचा प्रयत्न केला आहे . भगवद्गीता तसेच सांख्य तत्वज्ञान , अद्वैत वेदांत आणि त्याचे उपप्रकार ,रमण महर्षी यांचे तत्वज्ञान यात या शब्दांचा एक विशिष्ट अर्थ आहे. माझ्या लेखात काही ठिकाणी हे शब्द वेगळ्या अर्थाने आले असायची शक्यता आहे. अर्थ अगदीच वेगळा असेल तर तिथे तसे नमूद करायचा प्रयत्न केला आहे . सर्वसामान्य लोकांना जो अर्थ अभिप्रेत आहे किंवा माहित आहे तो इथे घेण्याचा प्रयास केला आहे. )
**************************************************************************************

धर्मसमीक्षा

प्रतिक्रिया

सस्नेह's picture

10 May 2022 - 7:36 pm | सस्नेह

युज्यते इति योग:
अर्थात जीवात्म्याचे परमात्म्याशी मीलन म्हणजे योग. बस्स. इतके पुरेसे आहे.

Jayant Naik's picture

12 May 2022 - 6:54 am | Jayant Naik

संयोग तर नक्कीच आहे पण योगात वियोग सुद्धा आहे . अभिप्राय दिल्याबद्दल आभार.

"असं का?" या विवंचनेपासून दूर नेण्यासाठी योग असावा. म्हणजे जे होणारच आहे ते विसरून काम करणे.

फार गहन विषय आहे. अनेक संदर्भ मला मिळाले नसल्याची सुद्धा शक्यता आहे. होय. कर्मयोग हा एक महत्वाचा योग आहे. पण फळाची आशा न धरता कार्य करणे हे आजच्या कलियुगात फारच कमी लोकाना जमत असेल.

नगरी's picture

11 May 2022 - 4:02 am | नगरी

लेख आवडला,काही गोष्टी इंद्रियातीत असतात.त्यांना शब्दात अडकवू नयेत.किंबहुना शब्दात मांडताच येत नाहीत.
समाधी आणि प्रज्ञा त्याच प्रकारात मोडतात.त्या अनुभवायच्या गोष्टी आहेत,शब्दात पकडता येत नाहीत.

कंजूस's picture

11 May 2022 - 5:55 am | कंजूस

आणि इतर काही गोष्टी अगदी अत्यल्प लोकांनाच अनुभवता येत असतील तर त्याचे मूल्य शून्य आहे. शिवाय त्यातून काही उत्पन्न झालेले इतरांना देता येत नसेल तर आणखी मोठे शून्य. ते मिळवण्यासाठी खटाटोप न केलेलाच बरा.

Jayant Naik's picture

12 May 2022 - 2:33 pm | Jayant Naik

सगळेच संत महात्मे आपल्याला जे अनुभवता आले ते इतरांपर्यंत पोचेल याच साठी प्रयत्न करताना दिसतात.

Jayant Naik's picture

12 May 2022 - 7:03 am | Jayant Naik

अगदी बरोबर . काही गोष्टींकडे फक्त निर्देश करता येतो. सगळे शब्दात अडकवणे शक्य नाही. जे नाम आणि रूप याच्या पलीकडे आहे ते फक्त अनुभवता येते. कबीर म्हणतो तसे मुका माणूस गूळ खातो .. तर तो काय सांगणार ? " खाये और मुसकाय !"

प्रचेतस's picture

11 May 2022 - 7:21 pm | प्रचेतस

चांगला लेख.

महाभारतात शांतिपर्वात व्यास शुक संवादात योगाचे विस्ताराने वर्णन आहे.

छिन्नदोषो मुनिर्योगान्युक्तो युञ्जीत द्वादश |
दशकर्मसुखानर्थानुपायापायनिर्भयः ||

चक्षुराचारवित्प्राज्ञो मनसा दर्शनेन च |
यच्छेद्वाङ्मनसी बुद्ध्या य इच्छेज्ज्ञानमुत्तमम् ||

ज्ञानेन यच्छेदात्मानं य इच्छेच्छान्तिमात्मनः ||

एतेषां चेदनुद्रष्टा पुरुषोऽपि सुदारुणः |
यदि वा सर्ववेदज्ञो यदि वाप्यनृचोऽजपः |

ज्याचे राग-द्वेष नाहींसे झालेले आहेत, अशा मुक्त मुनीनें द्वादश प्रकारचे योग साधावे. हे बारा प्रकार असे:- देश, कर्म, अनुराग, अर्थ, उपाय, अपाय, निश्चय, चक्षु, आहार, संहार, मन व दर्शन या बारा साधनांनीं हे प्रकार साधतां येतात. चित्ताची एकाग्रता साधण्यास अनुकूल असे पवित्र स्थान है योगाचें 'देश' साधन होय. आहार, विहार, झोंप व जागरण, इत्यादि गोष्टींना इयत्ता ठेवणें हें योगाचें कर्मरूप साधन. सच्छिष्य हें 'अनुराग रूपी साधन, अर्थ म्हणजे द्रव्य, हेही योगाचं एक साधन आहे.

व्यास पुढे म्हणतात

नानाविध आसनें साधणें हें योगाचें 'उपाय' साधन होय. रागद्वेषादि गोष्टींचा निरास करणें हें योगाचें ' अपाय ' साधन आहे. गुरुवाक्य व वेदवाक्य यांच्या वर आपल्याला इष्ट फल हटकून मिळणार, अशी दृढश्रद्धा हें 'निश्चय' रूपी योगसाधन चक्षु हेआणखी एक योगसाधन होय. आहारशुद्धता है आहारा संबंधाचे योगसाधन विषयोपभोगाकडे स्वभावतःच धांव घेणारें मन आंवरून धरणे हे योगाचें 'संहार' साधन आहे. मनांतील संकल्पविकल्प नाहींसे करणे हैं मनाच्या बाबतींतील योगसाधन होय. जन्म, मृत्यु, जरा, नाना प्रकारचे रोग इत्यादि दोषांनीं हे शरीर युक्त आहे, असे ज्ञान हे योगाचें 'दर्शन' रूप साधन आहे. ज्याला उत्कृष्ट प्रकारच्या ज्ञानाची इच्छा असेल अशा पुरुषानें वाणी व मन यांच्या शक्तीचा निरोध करावा व त्यांचा लय आपल्या अंतर्मुख बुद्धीमध्यें करून बुद्धिस्वरूप होऊन रहावें. ज्याला परमश्रेष्ठ अशा प्रकारचें शांतिसुख पाहिजे असेल, त्यानें या ज्ञानाचाहि आत्म्याच्या ठिकाणीं लय करावा. या सर्व प्रकारच्या योगसाधनांचें उत्कृष्ट ज्ञान ज्याला आहे असा पुरुष महाकठोर असला; सर्ववेदपारंगत किंवा ज्याला एकहि ऋचा येत नाहीं, असा असला; धार्मिक, यजनशील, पापी, वाघासारखा शूर किंवा कष्टानें आयुष्य कंठणारा कसाहि असला, तरी जरामरणांनी युक्त असलेला हा महाभयंकर सागर त्याला तरून जातां येतो. उपरोक्त प्रकारचा हा योग आपल्याला समजावा अशी इच्छा धरणारा पुरुषसुद्धां मुक्त होतो. मग याचें आचरण करणारा कर्मकांडातीत होतो व त्याला परोक्ष ज्ञान होते, हे सांगावयासच नको.

योग समजवून सांगण्यासाठी शांतिपर्वात रथाचे सुरेख रूपक वापरले आहे.

अपि जिज्ञासमानो हि शब्दब्रह्मातिवर्तते ||

धर्मोपस्थो ह्रीवरूथ उपायापायकूबरः |
अपानाक्षः प्राणयुगः प्रज्ञायुर्जीवबन्धनः ||

चेतनाबन्धुरश्चारुराचारग्रहनेमिवान् |
दर्शनस्पर्शनवहो घ्राणश्रवणवाहनः ||९||

प्रज्ञानाभिः सर्वतन्त्रप्रतोदो ज्ञानसारथिः |
क्षेत्रज्ञाधिष्ठितो धीरः श्रद्धादमपुरःसरः ||१०||

त्यागवर्त्मानुगः क्षेम्यः शौचगो ध्यानगोचरः |
जीवयुक्तो रथो दिव्यो ब्रह्मलोके विराजते ||

अथ सन्त्वरमाणस्य रथमेतं युयुक्षतः |
अक्षरं गन्तुमनसो विधिं वक्ष्यामि शीघ्रगम् ||

निर्विकार अक्षर ब्रह्माची प्राप्ति करून घेऊं इच्छिणाऱ्या माणसानें आचरावयाचा हा योग म्हणजे एक रथ आहे असे मानले तर धर्म ही त्यांतील सारथ्याची जागा होय. अकार्यापासून परावृत्त होण्याची बुद्धि हे त्या रथाचें रक्षण करणारें आच्छादन, उपाय व अपाय ह्या त्या रथाच्या दोन्ही बाजूंच्या दांड्या, प्राण हे या रथाचें जूं, बुद्धि ही या रथाची बळकटी, जीव हा या रथाचें आकलन करणारा बंध, चेतना ही या रथातील फळकूटांची जोडी, निरनिराळ्या आचारांचे अवलंबन हेच या रथाच्या धांवा, स्पर्श, दर्शन, वास व श्रवण, हे चार या रथाचे घोडे, शमदमादिकांमधील प्रावीण्य हीच ज्यामधील यजमानाची मुख्य जागा, सर्व प्रकारचीं शास्त्रे हा ज्यांतील चाबूक, शास्त्रांच्या अर्थाचा निश्चय करविणारे ज्ञान हाच ज्यांतील सारथी असा हा धीर गंभीर गतीनें चालणारा योगरथ होय. श्रद्धा व दम हे या रथाच्या पुढे चालतात. जीव हा या रथांत बसणारा रथी होय. विषयादिकांचा त्याग हा या रथामागून चालणारा सेवक आहे.

पावित्र्य हा याचा मार्ग असून त्याच मार्गानें तो ध्यानाकडे जातो. ध्यान हेच याचें ध्येय होय. अशा तऱ्हेचा जीवानें जोडलेला हा दिव्य रथ ब्रह्मलोकाच्या समीप शोभून दिसतो. असा हा रथ जोडून या रथांतून परब्रह्माच्या समीप जाण्याची ज्याला त्वरा झाली आहे त्याला शीघ्र ब्रह्म प्राप्ति करून देणारा विधि सांगतो.

सप्त यो धारणाः कृत्स्ना वाग्यतः प्रतिपद्यते |
पृष्ठतः पार्श्वतश्चान्या यावत्यस्ताः प्रधारणाः ||

क्रमशः पार्थिवं यच्च वायव्यं खं तथा पयः |
ज्योतिषो यत्तदैश्वर्यमहङ्कारस्य बुद्धितः ||

अव्यक्तस्य तथैश्वर्यं क्रमशः प्रतिपद्यते |
विक्रमाश्चापि यस्यैते तथा युङ्क्ते स योगतः ||

अथास्य योगयुक्तस्य सिद्धिमात्मनि पश्यतः |
निर्मथ्यमानः सूक्ष्मत्वाद्रूपाणीमानि दर्शयेत् ||

योगमार्गामध्यें सात मुख्य गोष्टी आहेत. वाणी इत्यादिकांचें नियमन करून या सप्तधारणांचा अवलंब योग्यानें करावा. एकाद्या विशिष्ट विषयाचे ठिकाणीं चित्ताचा लय करणे याला धारणा म्हणतात. चंद्रमंडल, सूर्यमंडल, ध्रुवमंडल इत्यादिकांचे ठिकाणीं चित्ताचा लय लावणे किंवा त्या मानानें जवळच्या अशा नासाग्र भूमध्य, इत्यादिकांचें ठिकाणीं मनाची एकाग्रता करणें, या सप्तधारणांच्या मानानें दूरच्या, धारणा होत. पौत्राहून प्रपौत्र जसा दूरचा, शिष्याहून प्रशिष्य जसा दूरचा, तशाच सप्तधारणांतून वर सांगितलेल्या निरनिराळ्या धारणा या दूरच्या धारणा आणि प्रधारणा होत. पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश, अहंकार आणि अव्यक्त या सातांचे ठिकाण चित्ताचा लय करणें, या सप्तधारणा होत.

सस्नेह's picture

15 May 2022 - 9:15 pm | सस्नेह

उत्तम विवेचन. धन्यवाद प्रचेतसभाऊ.
...तुम्हीपण यातले का ? :)

प्रचेतस's picture

15 May 2022 - 9:54 pm | प्रचेतस

नाही हो =))

हा संदर्भ मला माहीत नव्हता. तो इथे मांडल्याबद्दल अतिशय आभार. मी जसजसा या विषयाकडे पाहायला लागलो तसतसा या विषयाचा आवाका पाहून अचंबित झालो. हा लेख खूप लांबत गेला .. किती विद्वानानी यावर काम केले आहे ! रथाची उपमा वाचनात आली होती पण माझा लेख आधीच खूप मोठा आणि क्लिष्ट होतोय का ? या भीतीपोटी ही उपमा वापरली नाही. तुम्ही तुमच्या प्रतिसादात घालून आणि व्यास शुक संवाद मांडल्याबद्दल आभार. लेखात एक महत्वाची भर घातलीत .
"ज्याचे राग-द्वेष नाहींसे झालेले आहेत, अशा मुक्त मुनीनें द्वादश प्रकारचे योग साधावे. हे बारा प्रकार असे:- देश, कर्म, अनुराग, अर्थ, उपाय, अपाय, निश्चय, चक्षु, आहार, संहार, मन व दर्शन या बारा साधनांनीं हे प्रकार साधतां येतात." बरोबर. मी याच निष्कर्षाला आलो की योगाकडे साध्य आणि साधन असेच पाहायला पाहिजे.

ह्या द्वादश साधनांचा उहापोह देखील पुढे केला गेला आहे.

चित्ताची एकाग्रता साधण्यास अनुकूल असे पवित्र स्थान हे योगाचें 'देश' साधन होय. आहार, विहार, झोंप व जागरण, इत्यादि गोष्टींना इयत्ता ठेवणें हे योगाचें कर्मरूप साधन. सच्छिष्य हे'अनुराग रूपी साधन, अर्थ म्हणजे द्रव्य,हेही योगाचं एक साधन आहे.

नानाविध आसनें साधणें हे योगाचें 'उपाय' साधन होय. रागद्वेषादि गोष्टींचा निरास करणें हे योगाचें ' अपाय ' साधन आहे. गुरुवाक्य व वेदवाक्य यांच्या वर आपल्याला इष्ट फल हटकून मिळणार, अशी दृढश्रद्धा हे 'निश्चय' रूपी योगसाधन तर चक्षु हे आणखी एक योगसाधन होय. आहारशुद्धता हेआहारासंबंधीचे योगसाधन,विषयोपभोगाकडे स्वभावतःच धांव घेणारें मन आंवरून धरणें हे योगाचें 'संहार' साधन आहे. मनांतील संकल्पविकल्प नाहींसे करणे हे मनाच्या बाबतींतील योगसाधन होय. जन्म, मृत्यु, जरा, नाना प्रकारचे रोग इत्यादि दोषांनीं हे शरीर युक्त आहे, असे ज्ञान हे योगाचें 'दर्शन' रूप साधन आहे. ज्याला उत्कृष्ट प्रकारच्या ज्ञानाची इच्छा असेल अशा पुरुषानें वाणी व मन यांच्या शक्तीचा निरोध करावा व त्यांचा लय आपल्या अंतर्मुख बुद्धीमध्यें करून बुद्धिस्वरूप होऊन रहावें. ज्याला परमश्रेष्ठ अशा प्रकारचें शांतिसुख पाहिजे असेल, त्याने या ज्ञानाचाहि आत्म्याच्या ठिकाणीं लय करावा. या सर्व प्रकारच्या योगसाधनांचें उत्कृष्ट ज्ञान ज्याला आहे असा पुरुष महाकठोर असला, सर्ववेदपारंगत किंवा ज्याला एकहि ऋचा येत नाहीं, असा असला, धार्मिक, यजनशील, पापी, वाघासारखा शूर किंवा कष्टानें आयुष्य कंठणारा किंवा क्लिबासारखा कसाही असला, तरी जरामरणांनी युक्त असलेला हा संसाररूपी महाभयंकर सागर त्याला तरून जाता येतो.

Bhakti's picture

12 May 2022 - 10:14 am | Bhakti

_/\_ जबरदस्त आहे हे!

पण सामान्य माणसास ते कशात तरंगतात हे दिसत नाही.
जरामरणांनी युक्त असलेला हा संसाररूपी महाभयंकर सागर त्याला तरून जाता येतो.
हे एक त्यात. तो सागरच दिसत नै तर तरणे दूरच.

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 May 2022 - 10:32 am | ज्ञानोबाचे पैजार

वल्लीदांची पुरवणीही वाचनिय आहे,

योगाला आपण जरी शास्त्र किंवा तंत्रज्ञान किंवा साधन म्हणत असलो तरी त्याचा काही एक विषिष्ठ फॉर्म्युला सांगता येणार नाही, तो व्यक्तीसापेक्ष वेग वेगळा असू शकतो.

अर्थात योगसाधनेच्या मार्गावर चालण्याचे कारण व्यक्तीसापेक्ष वेगवेगळे असू शकते, म्हणूनही असेल.

कदाचित प्रत्येकव्यक्तीच्या समजूती प्रमाणे वियोगीत गोष्ट ही इतरांपेक्षा वेगळीच असल्याने त्याच्या साठी आखून दिलेला पुर्नमिलनाचा मार्गही वेगळा असावा.

या सर्व मार्गांचे साध्य मात्र एकच आहे हे या क्षेत्रातले अधिकारी लोक ठाम पणे सांगत असतात.

योगाचा अवाका मात्र अचाट आहे, इतका की ज्याचे वर्णन शब्दांमधे होउच शकत नाही.

रामदेव बाबा म्हणतातच "करो योग रहो निरोग"

योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन।
योऽपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजलि प्रांजलिरानतोऽस्मि।।

पैजारबुवा,

Jayant Naik's picture

12 May 2022 - 1:48 pm | Jayant Naik

तुमच्या अभिप्रायाबद्दल आभार

मार्कस ऑरेलियस's picture

12 May 2022 - 1:01 pm | मार्कस ऑरेलियस

अप्रतिम !

एकुणच लेख वाचुन मला - रमण महर्षी ह्यांचे विचार माझ्या संस्कारजन्य विचारांशी जुळणारे आहेत असे जाणवले.

आतां अविद्या नाहींपणें । नाहीं तयेतें नासणें ।
आत्मा सिद्धुचि मा कोणें । काय साधावें ? ॥ ६-९७ ॥

तैसें सुखा आतोनि निथणें । तें सुखीयें सुखी तेणें ।
हें सुखमात्रचि मा कोणें । अनुभवावें ? ॥ ५-३५ ॥

द्रष्टा दृश्याचा ग्रासी । मध्यें लेखु विकासी ।
योगभूमिका ऐसी । अंगीं वाजे ॥ ७-१८५ ॥

ही ही जी अवस्था माऊलींनी अमृतानुभवात वर्णन करुन ठेवली आहे ही योगाची परमस्थिती आहे . ती प्राप्त करण्याचे जी जी काही साधने असतील ती ती सारीच योग आहेत! ज्ञानयोग कर्मयोग राजयोग हे तीन्हीही वैदिक योग उत्तमच पण त्यातल्यात्यात ह्या तिहिंचेही समष्टी साधणारा भक्तीयोग हे सर्वात सोप्पे साधन आहे हे आमचे अनुभवाचे मत .

असो, बाकी हा सारा अनुभवाचा अन अनुभवाच्या पलीकडे जायचा मामला आहे तस्मात जास्त काही लिहित नाही.

किंबहुना श्रीनिवृत्तीं । ठेविलों असों जया स्थितीं ।
ते काय देऊं हाती । वाचेचिया ? ॥ ८-८ ॥

_____________________________________/\____________________________________

अर्धवटराव's picture

13 May 2022 - 8:43 pm | अर्धवटराव

या असल्या विषयांवर तुम्ही जे माऊलि, समर्थ साहित्याचे रेफर्न्स देऊन जे निरुपण करता ते फार फार आवडते.
अन्यथा ओ का ठो कळत नाहि काय चाललय ते :ड

Jayant Naik's picture

12 May 2022 - 1:53 pm | Jayant Naik

माऊली तर योग सिद्ध होते. त्यांचे कौतुक वर्णावे तितके थोडेच. आपल्या प्रतिसादाबद्दल आभार

मुक्त विहारि's picture

15 May 2022 - 8:24 pm | मुक्त विहारि

तुमचे विचार आणि प्रचेतसचा प्रतिसाद अप्रतिम...

Jayant Naik's picture

17 May 2022 - 6:51 pm | Jayant Naik

धन्यवाद आपले.