भगवद्गीता शांकरभाष्य नमन आणि प्रस्तावना - मराठी भाषांतर

अभिजीत's picture
अभिजीत in जनातलं, मनातलं
8 May 2022 - 1:44 am

आद्य शंकराचार्य जयंती - वैशाख शुक्ल पक्ष पंचमी (मे ६, २०२२)
आद्य शंकराचार्य वेदोक्त अशा अद्वैत मताचे पुरस्कर्ते होत. केवळ ३२ वर्षाच्या आयुष्यात त्यांनी प्रस्थानत्रयी (भगवद्गीता, ब्रह्मसूत्रे आणि उपनिषदे) वर भाष्ये लिहिली, तत्कालीन भारत देशात चार वेळा भ्रमण करून प्रस्थपित असलेली अवैदीक मते खोडून काढली व वैदिक धर्माची पुनःस्थापना केली. द्वारका, जगन्‍नाथपुरी, शृंगेरी आणि बद्रीकेदार येथे चार पीठे स्थापन केली. वेदकाळापासून सुरू असलेली आचार्य परंपरा, आद्य शंकराचार्यांनी पुढे सुरू ठेवली.
आद्य शंकराचार्यांच्या गीत भाष्यात सुरुवातीला त्यांनी प्रस्तावना लिहिली आहे. संस्कृत ग्रंथांच्या परंपरेनुसार प्रथम नमन व प्रस्तावना आणि प्रस्तावनेत गीतेचे अनुबंधचतुष्टय समजावून सांगितले आहे. अनुबंधचतुष्टय म्हणजे कोणत्याही ग्रंथाचे चार महत्वाचे अंग ज्याद्वारे वाचकाला हा ग्रंथ का लिहिला आहे (ध्येय), कोणासाठी लिहिला (अधिकारी), त्याचे प्रयोजन काय, ग्रंथाचा मुख्य विषय कोणता आणि वाचक व मुख्य विषय यांचा संबंध काय यांचा नीटसा अंदाज वाचकाला येतो.
मी या ‘नमन आणि प्रस्तावानेचं’ मराठी भाषांतर केलंय आणि या आद्य शंकराचार्य जयंती दिवशी गुरुचरणी ही छोटीशी सेवा अर्पण करीत आहे.

===

भगवद्गीता - शांकरभाष्य
नमन आणि प्रस्तावना

ॐ नारायण: परोsव्यक्तादंडमव्यक्तसंभवं |
अंडस्यांतस्त्विमे लोका: सप्तद्वीपा च मेदिनी ||

ॐ! नारायण अव्यक्ताहून उच्च पातळीवर आहे. सात खंडांनी बनलेली पृथ्वी ज्या हिरण्यगर्भातून निर्माण झाली आहे, ते हिरण्यगर्भ अव्यक्तातून निर्माण झाले आहे.

या जगाच्या निर्मितीची कल्पना करून आणि या जगाच्या स्थैर्यची इच्छा करून, त्याने (भगवंताने) प्रथम मरिची आणि इतर प्रजापती निर्माण केले व त्यांना वेदोक्त कर्म युक्त (कर्म म्हणजे कर्तव्य आणि यज्ञयाग) असा धर्म पाळावयाची आज्ञा केली.यालाच प्रवृत्तीधर्म म्हणतात. सनक, सदानंद वगैरेची निर्मिती करून त्यांना संन्यास मार्गाने धर्म पाळावयाची आज्ञा केली. यालाच निवृत्तीधर्म म्हणतात. ज्ञान व वैराग्य हे या निवृत्तीमार्गाचे विशेष होत. वेदांमध्ये प्रकट झालेला आणि या जगताच्या मुळाशी असलेल्या धर्माचे दोन जीवनमार्ग आहे - प्रवृत्तीलक्षण आणि निवृत्तीलाक्षण. प्रवृत्तीलक्षण धर्म हा कर्मपर आहे तर निवृत्तीलक्षण धर्म हा संन्यासपर आहे. हा वेदोक्तधर्म या जगताला स्थैर्य प्राप्त करून देतो. सर्व प्राण्यांच्या अभ्युदयासाठी (सर्व प्रकारच्या उन्नतीसाठी) कारणीभूत असलेला धर्म हा ब्राह्मण व इतर वर्णात असलेले आणि विविध आश्रमात (ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास) असलेले लोक असे सर्व लोक पाळतात ज्यांना मोक्ष हवा असतो. (इथे ब्राह्मण व इतर वर्ण यांचा सध्याचा प्रचलित अर्थ जो जाती-पातीशी आहे तसा नसून त्रिगुणातून निर्माण होणाऱ्या मनुष्य-स्वभावाशी आहे. वैदिक चातुर्वर्ण (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र) ही संकल्पना आणि गेली शेकडो वर्षे असलेली जाती-पातीतून निर्माण झालेली समाजव्यवस्था जिच्यात असमता आणि अन्याय यांचा दोष निर्माण झाला आहे यात फरक आहे. इथे ब्राह्मण म्हणजे सत्त्वगुण प्रधान व्यक्ति जी ब्रह्मप्राप्तीसाठी योग्य बनली आहे.)

असा धर्म पाळणाऱ्या लोकांच्या विवेकबुद्धीचा कालांतराने नाश होतो आणि हे धर्म पाळणारे लोकच जेंव्हा मोहाला बळी पडतात तेंव्हा अधर्माची निर्मिती होते. या अधर्मामुळे मूळ वैदिक धर्म (जो मोक्षासाठी गरजेचा आहे) धोक्यात येतो. आणि असे झाले की जसे पूर्वी होत आले आहे त्यानुसार विष्णू म्हणजेच नारायण; जो या जगताचा आदिकर्ता आहे तो; स्वत:चाच अंश असलेला कृष्ण, देवकीचा पुत्र वासुदेव (देवकी-वसुदेव पुत्र) म्हणून जन्म घेतो. ब्रह्म ज्या ब्राह्मणत्वातून या पृथ्वीवर वैदिक धर्म चालवते व त्याद्वारे या जगताला स्थैर्य प्राप्त करून देते, त्या ब्राह्मणत्वाच्या रक्षणासाठी कृष्ण जन्म घेतो. ब्राह्मणत्वाचे जर रक्षण केले तरच वैदिक धर्माचे योग्य प्रकारे रक्षण होते कारण या ब्राह्मणत्वावर बाकीचे तिन्ही वर्ण आणि चारी आश्रम यांचे अस्तित्व अवलंबून आहे.

भगवंत हा ज्ञान, ऐश्वर्य (जगतावर असलेली सार्वभौम सत्ता या अर्थी), वीर्य (शक्ती), बल (सामर्थ्य या अर्थी), शौर्य आणि तेज (सर्वव्याप्त या अर्थी) यांनी सदैव संपन्न असलेला असा आहे. माया शक्ती त्याच्या पूर्ण स्वाधीन असून ही माया त्याच्यापासूनच निर्माण होते. असा हा भगवंत, विष्णू (म्हणजे सर्वव्यापी) या नावाने ओळखला जातो. माया शक्ती ही आदिप्रकृती या नावानेही ओळखली जाते. ही आदिप्रकृती सत्व, रज आणि तम या त्रिगुणांची बनलेली आहे. आणि तो भगवंत स्वत:च्याच मायेने सकळ जगताच्या रक्षणासाठी जणू काही नवाच जन्माला आला अशा पद्धतीने सगुण रुपात जगतात अवतीर्ण होतो. जरी तो भगवंत जन्माला आला असे दिसले तरी वास्तविक पाहता तो अज (ज्याला जन्म-मृत्यू नाही असा), अव्यय (ज्यात कोणताही बदल घडत नाही असा), सर्व प्राणिमात्रांचा स्वामी, नित्य (चिरंतन), शुद्ध, बुद्ध (सर्वज्ञानी या अर्थी) आणि मुक्त असा आहे.

वास्तविक पाहता, त्याला (भगवंताला) स्वत:साठी काही करण्याची गरज नाही पण तरीही सकळ प्राणिमात्रांच्या भल्यासाठी त्याने विषाद (शोक) आणि भ्रमाच्या (मोह) सागरात बुडालेल्या अर्जुनाला वैदिक धर्माच्या दोन मार्गांचा (प्रवृत्तीपर आणि निवृत्तीपर) उपदेश केला. या उपदेशामागचे भगवंताचे प्रयोजन असे आहे की जेंव्हा अधिक गुणवान लोकांना या दोन्ही मार्गांचे योग्य आकलन होईल आणि ते या वैदिक मार्गांचे जसजसे अधिक पालन करतील तसतसा हा वैदिक धर्म अधिक सुदृढ होत जाईल. सर्वज्ञ असलेल्या वेदव्यासांनी गीता हा सातशे श्लोकांचा ग्रंथ भगवंताने जो वैदिक धर्माचा उपदेश सांगितला तो जशाचा तसा लिहिला. सर्व वेदांच्या उपदेशांचे सार असलेले हे गीताशास्त्र समजण्यास अवघड आहे. अनेक विद्वानांनी या गीतेचे अर्थ समजावून सांगताना प्रत्येक शब्दाचा, वाक्याचा आणि युक्तिवादाचा अन्वय लावला आणि भाष्ये लिहिली परंतु या भाष्यांमद्धे मध्ये इतकी विविधता आणि विरोधाभास आहे की त्यामुळे सर्वसामान्य लोकांना गीतेचा अर्थ समजणे खूपच अवघड झाले आहे. मी (आदि शंकराचार्य) गीतेचा सुगम असा विवेकाने युक्त असा अर्थ समजावून सांगेन.

गीतेचे मुख्य प्रयोजन थोडक्यात सांगायचे तर मोक्षप्राप्ती हेच आहे. जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून त्याच्या मूळ कारणासकट मुक्ती हे मोक्षप्राप्तीचे एक महत्वाचे लक्षण आहे. सर्व कर्मांचा (कर्तव्य आणि यज्ञयाग या कर्मांचा) त्याग करून व आत्मज्ञानाची कास धरून जीवन जगणे हा धर्मच मनुष्याला मोक्षप्राप्ती प्रदान करतो. ‘अनुगीते’त भगवंताने या धर्माबद्दल ‘स हि धर्म: सुप्रयाप्तो ब्रह्मण: पदवेदने’ म्हणजे ‘धर्ममार्गाचे आचरणच ब्रह्मप्राप्तीसाठी पुरेसे आहे’ असे म्हटले आहे. आणि पुढे असेही म्हटले आहे, ‘नैव धर्मी न चाधर्मी न चैव हि शुभाशुभी| य: स्यादेकासने लीनस्तूष्णी किंचिदचिंतयन्||’ ‘(इति) ज्ञानंसंन्यासलक्षणं’ म्हणजे ‘जो मनुष्य गुण आणि दुर्गुण यांच्या विकारात न अडकता, शुभ-अशुभांची चिंता न करता, कोणतीही इच्छा मनी न धरता, भगवंतचरणी लीन होतो (त्यालाच ब्रह्मप्राप्ती - मोक्ष - मिळतो)’ आणि ‘संन्यास हेच मोक्षप्राप्तीचे ज्ञान झाल्याचे लक्षण आहे’ असेही म्हटले आहे. भगवंत पुढे गीतेत अर्जुनाला म्हणतात, ‘सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज’ (गीत १८.६६) म्हणजे ‘सर्व कर्म त्यागून तू मला शरण ये’. (इथे मनुष्याने कर्मत्याग करणे म्हणजे कर्मच न करणे असा संन्यास अभिप्रेत नाही, तर निष्काम वृत्तीने - कर्मफलातून निर्माण होणाऱ्या सुख-दुखा:ने मनात निर्माण होणाऱ्या मोहाला त्यागून, किंवा ‘मी हे केले’ हा अभिमान त्यागून असा संन्यासाचा अर्थ घ्यावा).

असा हा धर्म, जो कर्माधिष्टित आहे, चातुर्वर्ण (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र) व चार आश्रमांमध्ये (ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास) नियमित झाला आहे आणि त्याच्या आचारणामुळे माणसाला ऐश्वर्य व स्वर्गप्राप्ती होते परंतु तोच धर्म जर भगवंतभक्तीच्या दृष्टीने आणि निष्काम वृत्तीने अंगिकारीला तर त्यातून मनुष्याची चित्तशुद्धी होते. चित्तशुद्धी म्हणजे सत्त्व गुणाचे अधिक्य! या चित्तशुद्धीमुळेच मनुष्याच्या अंगी मोक्षज्ञानाचा बोध होण्यासाठी लागणरी योग्यता बाणवते आणि पुढे त्यातूनच मनुष्याच्या मनात मोक्षज्ञान प्रज्वलित होते. याकडे पाहून भगवंत गीतेत म्हणतात, ‘ब्रह्मण्याध्याय कर्माणि’, ‘ योगिन: कर्म कुर्वंति संगत्यक्त्वात्मशुद्धये’ म्हणजे ‘ब्रह्मप्राप्तीसाठी (भगवंतप्राप्ती साठी) कर्मत्याग (कर्तव्य आणि यज्ञयाग)’ व ‘जो कर्मयोगी चित्तशुद्धी करीता मोहाचा त्याग करून कर्मे करतो’. (मोह म्हणजे सध्या प्रचलित असलेला हाव किंवा desire असा नाही. मोह म्हणजे ‘कर्मफलातून निर्माण होणाऱ्या सुख-दु:खाने जे क्षणिक असे पूर्णत्व किंवा अपूर्णत्व मनात येते, त्यातून मनास ‘मी हे सुख सतत मिळवू शकतो किंवा दु:ख सतत टाळू शकतो’ या भ्रमाचे गारुड पडते आणि मनुष्य पुन:पुन्हा आसक्तीच्या बंधनात अडकत राहतो’ असा आहे.)

अशा प्रकारे गीता मोक्षप्राप्तीसाठी जीवनाचे दोन मार्ग दाखवते. प्रवृत्ती आणि निवृत्ती या वैदिक धर्माच्या दोन जीवनशैली आहेत. गीतेचे मुख्य प्रयोजन मोक्ष आहे, वासुदेव (ब्रह्म) हाच मुख्य विषय आहे, वासुदेवाचा आणि मनुष्याचा (ब्रह्म आणि जीवात्म्याचा) संबंध आणि असा मनुष्य मोक्षप्राप्तीसाठी पात्र बनवण्यासाठी वैदिक धर्माच्या या दोन जीवन मार्गांचे मार्गदर्शन करते. गीतेच्या सुस्पष्ट उपदेशाने सकळ मनुष्यजातीचे पुरुषार्थ संपूर्णपणे तृप्त होतात म्हणून मी (आदि शंकराचार्य) गीतेच्या या भाष्याचा यत्न करीत आहे.

=====
संदर्भ
१. श्री भगवद्गीता भाष्यम् - श्रीमच्छंकरभगवपादविरचितेन भाष्येण संहिता
२. Bhagavad Gita - with commentary of Shri Shankaracharya - Translated by Swami Gambhirananda

धर्मतंत्रविज्ञानभाषांतर

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

8 May 2022 - 8:40 pm | प्रचेतस

छान लिहिलं आहे.

श्रीगुरुजी's picture

8 May 2022 - 8:57 pm | श्रीगुरुजी

छान माहिती!

गामा पैलवान's picture

9 May 2022 - 12:43 am | गामा पैलवान

अभिषेक,

अनुवाद फक्कड जमलाय. तन्निमित्त धन्यवाद. हाव आणि मोह यांतील फरक विशेषत्वे भावला. माझ्या मते एखादी वस्तू लाभल्यावर किंचितकाळ तरी समाधान मिळतं, त्यास लोभ म्हणावं. एखाद्या वस्तूची वा प्रसंगाची जी भुरळ पडते त्यास मोह मानावं.

बाकी, शंकराचार्यांच्या साहित्यास अवघ्या जगात तोड नाही. हिंदू मानसावर महर्षी व्यासवाल्मिकीपश्चात आद्य शंकराचार्य यांचाच प्रभाव लक्षणीय आहे.

आ.न.,
-गा.पै.

सोत्रि's picture

12 May 2022 - 2:28 pm | सोत्रि

इथे षड्रिपू ह्या विकेपेजवर लोभ आणि मोह ह्यांच्या चपखल व्याख्या आहेत.

मोह किंवा मोहाचा पडदा हे ignorance ह्या अर्थी समजून घेतल्यास वरील व्याख्या अधिक सुलभतेने समजण्यास मदत होइल.

- (मोहाचा पडदा दूर करण्याच्या प्रयत्नात असलेला) सोकाजी

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B7%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4...

Jayant Naik's picture

11 May 2022 - 5:54 pm | Jayant Naik

सुरेख भाषांतर. तुम्ही म्हणता ते खरे आहे. आद्य शंकराचार्य अद्वैत तत्त्वप्रणाली सुरेख शब्दात मांडतात. त्यांचे गीतेचे भाष्य तर प्रमाणभूत म्हणावे लागेल.

Jayant Naik's picture

11 May 2022 - 5:55 pm | Jayant Naik

सुरेख भाषांतर. तुम्ही म्हणता ते खरे आहे. आद्य शंकराचार्य अद्वैत तत्त्वप्रणाली सुरेख शब्दात मांडतात. त्यांचे गीतेचे भाष्य तर प्रमाणभूत म्हणावे लागेल.

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 May 2022 - 8:58 am | ज्ञानोबाचे पैजार

वरील सर्व प्रतिसादांशी देखिल सहमत, शंकराचार्यांनी जे कार्य केले आहे त्याला तोड नाही. तर्कसंगत मांडणी हे त्यांच्या प्रत्येक रचनेचे वैशिठ्य होते.
पैजारबुवा,