अस्तित्व - बालकथा

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
1 Jan 2022 - 9:39 am

अस्तित्व
----------------------------------------------------------------------------------------------------------------
लोहगडाच्या पायथ्याशी वसलेलं आमचं गाव . आमच्या छोट्याशा गावच्या छोट्याशा शाळेत एक पाहुणे आले होते. आबा . आम्हां मुलांना भेटायला. शिक्षणातून आयुष्य कसं घडवता येतं , यावर त्यांचं भाषण होतं . शिक्षणाच्या माध्यमातून ते समाजसेवा करत होते .
पावसाचे दिवस.पण पाऊस काही नव्हता.त्यामुळे आम्ही शाळेच्या मैदानातच होतो . लाल मातीमध्ये बसलेलो. तर आमच्या मागे, हिरवा झालेला लोहगड धुक्याची तलम पांढरी ओढणी पांघरून बसलेला.
राजा आणि इतर पोरांची बडबड चाललेली . मला मात्र भाषण ऐकायचं होतं .
आबा भारी वाटत होते . त्यांच्या वाढवलेल्या केसांमुळे अन पांढऱ्याशुभ्र , लांब दाढीमुळे. आबांचं भाषण मजेशीर होतं . खुसखुशीत ! मुलं खुदूखुदू हसत होती . भाषणानंतर मुलं शंका विचारू लागली. काहीतरी येडचापपणा ! पाहुणे भारी होते तर प्रश्नही भारीच पाहिजेत ना .
एकाने विचारलं, “ समाजसेवा केली तर पैसे मिळतात का ?”
आबांना या प्रश्नाचं हसू आलं. ते म्हणाले , “ नाही ! उलट स्वतःचे पैसे खर्च करावे लागतात .”
मग दुसऱ्याने विचारलं, “ मग स्वतःचे पैसे खर्च होतात, तर समाजसेवा कशाला करायची ?”
या प्रश्नावर सगळेच हसले . गुरुजी मुलांना दापायला लागले . त्यावर आबा म्हणाले , “असू द्या . मुलांना मोकळेपणाने बोलू द्या . “
मलाही प्रश्न विचारायचा होता. अंगात सुरसुरी आल्यासारखं होत होतं. पण धाडस होतं नव्हतं . मी जागेवरच चुळबुळत बसलेलो. आता कार्यक्रम संपणार असं वाटत होतं. अन मी सगळी शक्ती एकवटून उठलो. मी म्हणालो,” मला एक प्रश्न विचारायचा आहे.”
आबांनी मान डोलावली.
मी विचारलं ,”आपण शिकून डॉक्टर होऊ शकतो. पण मनाचा डॉक्टर होऊ शकतो का ? असं शिक्षण घेता येतं का ?”
आबा चमकले . माझा प्रश्न त्यांना अनपेक्षित होता.
ते म्हणाले, “ असतात ! का नाही. पण का रे बाळा ? तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात राहणारी काटक मुलं. ज्याचं शरीर चांगलं त्याच मन चांगलं. मस्त खायचं, मोकळं वारं प्यायचं अन मस्तीत हुंदडायचं . अशा मुलांना कशाला पाहिजे असला मनाचा डॉक्टर ?”
मला खूप वाटलं , त्यांना सांगावं - राजा स्वतः अभ्यास करत नाही. पण मला चांगले गुण मिळाले तर माझ्यावर जळतो. म्हणजे तो मनाने आजारी आहे. पण ही विनोदाची वेळ नव्हती.
तेवढ्यात गुरुजींनी कार्यक्रम आटोपता घेतला . ते चहापानासाठी आबांना घेऊन कार्यालयात गेले.
मुलं पांगली. मी लोहगडाकडे पहात उभा राहिलो. स्तब्ध . गडावरून धुकं वाहत होतं आणि माझ्या डोळ्यांतून पाणी .
---
माझं नाव हरिश्चंद्र . पण माझ्या आईला ते नावही कधी नीट म्हणता आलं नाही. तिने शाळेचं तोंडच कधी पाहिलेलं नव्हतं . ती मला हरीच म्हणायची.
माझं गाव लोहगडापासून तसं लांबच . आमचं शेत होतं . आई आणि अप्पा खूप कष्ट करायचे . त्यांना वाटायचं , मी खूप शिकावं , मोठं व्हावं . मलाही शिकण्यात रस होता आणि वाचनात . पण आमची गावं आजही इतकी दुर्गम की बस ! शाळा असली तरी साध्या साध्या सोयींचा अभाव असे . शहरातल्या मुलांना जसं सगळं उपलब्ध होतं तसं काहीच नाही . नवीन पुस्तकं बघायला मिळणं म्हणजे अवघडच गोष्ट. मग ती गोष्टींची असोत की इतर कुठली .
लांब असला तरी लोहगड आमच्या गावातून दिसायचा. तो पाहिला की मामाची आठवण यायची. त्याचं गाव अगदी गडाच्या पायथ्याशी .
आमच्या गावाचं वातावरण सुंदर अन परिसर निसर्गसुंदर . मुसळधार पाऊस, कुडकुडी भरवणारी थंडी आणि कडक उन्हाळा. गावाच्या अवतीभवती करवंदाची खूप झाडं. इतकी छोटी की त्यांच्याशेजारी उभं रहावं आणि हवी तेवढी करवंदं काढावीत. रसरशीत काळी मैना ! आंबट -गोड . आयुष्यासारखीच . हे वाक्य माझ्या आईचं .
पण मोठी माणसं ओरडायची- करवंदाच्या जाळीत जाऊ नका म्हणून ! जाळीत वाघ -बिबटेही येतात म्हणे .
ते करवंदं तर खात नसणार. मग कशाला उगा ? पण जाऊ दे ! मोठ्या माणसांचं तर ऐकायला पाहिजे .
हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे माझं आयुष्य असं होतं. साधं, पण आनंदाने भरलेलं ! शाळेत शिक्षण आणि बाहेर निसर्गशिक्षण. मोठे मजेचे दिवस !
आमचं घर शेतात. आजूबाजूची घरंही शेतात. पण लांबलांब.
एके दिवशी.-
रात्रीची वेळ. आमच्या घरावर दरोडा पडला. खरंतर , आमच्याकडे लुटण्यासाठी आनंद सोडून दुसरं काय होतं ?...
दरोडेखोरांनी आई अप्पांना मारलं . मला सोडलं . खरंतर , मलाही तेव्हाच मारलं असतं तर पुढचा सगळा प्रश्नच मिटला असता.
ते दोघेही देवाघरी गेले. तेव्हा मामाने मला त्याच्या घरी नेलं. त्याचं लोहगडाच्या पायथ्याशी , ‘लोहगड ’ नावाचंच छोटंसं हॉटेल होतं . हॉटेल म्हणजे चारच टेबलं. वडापाव,चहा-भजीचं . गडावर येणाऱ्या पर्यटकांना ते तर हवंच असायचं . ते अगदी मिटक्या मारत खायचे . ‘ लय भारी काका !’ म्हणत अजून प्लेटा हाणत .
त्याने गावाकडून मला घरी आणलं , तेव्हाच त्याने मला सांगितलं , “ हऱ्या, रडायचं काम नाय . शिकून मोठं हुयाचं. मी हाय तुज्या पाठीशी !”
मामा प्रेमळ आहे. मामा-मामी दोघेही माझे लाड करतात .
त्यांच्या छोट्या सिमीताएवढंच . स्मिता माझी छोटी मामेबहीण आहे . गोड . मामी तिला सिमिता म्हणते . कळलं ?
ही गावातली माणसं शिक्षणापासून लांबच राहिली ... मग ती आई असो की मामी .
मी गावातल्या शाळेत जाऊ लागलो. नवीन मित्र मिळाले. माझं मन रमलं. इतर वेळी मी हॉटेलच्या कामात मदत करू लागलो. गिऱ्हाईकांचा हिशोब मी पटापट करत असे. त्यांना माझ्या त्या गणिताचं आश्चर्य वाटत असे.
कधी माझे मित्र आले तर मामा त्यांना वडापाव खाऊ घालत असे. त्याचे पैसे घेत नसे. पोरांना काय , खाऊचं आकर्षण असतंच. त्यात मामीच्या हातचे बटाटेवडे म्हणजे लय चवदार ! त्यांचा नुसता वास आला तरी पोट भरलेल्या माणसालासुद्धा खायची इच्छा होईल . त्यामुळे माझा भाव वाढला होता. पण भाव खाण्यापेक्षा मला मैत्रीच महत्वाची वाटे.
एकदा आम्ही लोहगडावर गेलो. मी पहिल्यांदाच. भारी वाटलं . महाराजांचा गड ! तटबंदीच्या दगडाला स्पर्श करताना हात थरथरले . मन रोमांचित झालं .
गडावर एक मोठं तळं आहे. लहान पोराच्या उत्सुकतेने त्यामध्ये वाकून पाहिलं . त्यामध्ये कित्ती मासे. एकसारखे. पण - त्यातल्या एकाचंही अस्तित्व वेगळं नाही... मनात आलं , आपलंही तसंच आहे का ?
माझ्या उंच अन काटक आईची मध्येच आठवण आली . काळजात गलबलूनच आलं . गप्पकन !
“ हऱ्या..” राजाच्या हाकेने मी दचकलो. माझं विचारचक्र तुटलं. मी वर्तमानात आलो.
---
पाहुण्यांचं चहापान झालं . आबांनी मला बोलवायला सांगितलं होतं. काय झालं होतं , कोणास ठाऊक ?
म्हणून राजा मला बोलवायला आला होता.
आबांनी मला जवळ बोलवलं. माझ्या पाठीवर हात ठेवला. मी जरा घाबरलो ना त्यामुळे . ते प्रमुख पाहुणे अन ?- मी तर इतर चार मुलांसारखा एक साधा मुलगा . त्यात आई-वडलांविना .
आबांनी मला विचारलं ,” तू मगाशी मनाचे डॉक्टर असतात का, असं विचारलंस. ते का ?”
“ मी ... मी...” माझी ततपप झाली.
“ बोल, घाबरू नकोस . मला गुरुजींनी तुझ्याबद्दल सांगितलंय सारं.” आबा म्हणाले .
आता माझ्या लक्षात आलं . बहुतेक आबांचा गैरसमज झाला असावा म्हणून . बहुतेक मला...मला त्या मनाच्या डॉक्टरांची गरज पडणारसं दिसतंय, असं त्यांना वाटलं असणार ! वेडा मी!
“ मला मनाचा डॉक्टर व्हायचंय !” मी म्हणालो .
“अच्छा ! त्याला मानसोपचार तज्ञ म्हणतात. पण का व्हायचंय ?”
“ जे लोक दरोडा घालतात, ते असं का करतात? ते जाणून घ्यायचंय. कदाचित त्यांची परिस्थितीही तशी असेल . पण मग ते फक्त पैसे का लुटत नाहीत ? लोकांचा असा जीव का घेतात ? त्या रात्री आमच्या घरावर दरोडा पडला. माझ्या अप्पांनी त्यांना जे आहे ते दिलं असतं. तरी त्यांनी माझ्या आई-वडलांना मारलं. ते असं का करतात, हे मला समजून घ्यायचंय . म्हणजे तसं करण्यापासून त्यांना रोखता येईल. यासाठी यांच्या मनाचा अभ्यास करावा लागेल.
माझ्यासारख्या मुलांचं छत्र असं धुक्यासारखं विरून जाणार नाही. माझं छत्र गेलं . निदान इतरांचं तरी वाचवता येईल.”
बोलता बोलता माझ्या डोळ्यात पाणी आलं.
आबांच्या आणि इतरांच्याही डोळ्यात पाणी आलं.
मग ते पाणी पुसत आबा म्हणाले,” लहान आहेस तू पोरा. ह्या गोष्टी खूप गुंतागुंतीच्या आहेत. तुम्हा पोरांना त्या आत्ता कळणार नाहीत. पण तू खूप शिक. हो मनाचा डॉक्टर. मी तुला मदत करीन .”
माझ्या डोळ्यांत पुन्हा पाणी आलं. मी तसाच बाहेर गेलो. मी ते पाणी पुसलं.
डोंगरावरच धुकं गेलं होतं. समोर लोहगड स्वच्छ उन्हात उभा होता.त्याच्या अंगावरचं हिरवं वैभव मिरवत. दिमाखात !
त्या क्षणाला मला माझं अस्तित्व ठळकपणाने उठून दिसलं.

हे ठिकाण

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

1 Jan 2022 - 10:37 am | प्राची अश्विनी

वा! नववर्षाची सुरवात इतक्या सुंदर कथेने झाली. वर्ष चांगलं जाणार आता!

खूप सुंदर लिहीलय हो बिपीनभाऊ.
नव्या वर्षाची सुरवात छानच केलीत

सरिता बांदेकर's picture

1 Jan 2022 - 2:07 pm | सरिता बांदेकर

आवडली कथा.

कुमार१'s picture

1 Jan 2022 - 7:56 pm | कुमार१

आवडली कथा.

यात प्रतिशोधाऐवजी दोषी मनांवर इलाज करण्याचा विचार खूप मोठा आहे.आपण चांगले लिहिता.
लिहीत रहा.

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Jan 2022 - 12:27 pm | ज्ञानोबाचे पैजार

हर्‍याची विचार करण्याची पध्दत तर भावलीच पण गोष्टीला आमच्या आवडत्या लोहगडाची पार्श्वभूमी असल्याने अधिकच आवडली.

पैजारबुवा,

चौथा कोनाडा's picture

4 Jan 2022 - 1:06 pm | चौथा कोनाडा

व्वा, सुंदर कथा !
बिपीन भाऊ, भारीच लिहिता तुम्ही.

+१
चित्रदर्शी आहे !
तुमच्याकडे अनुभवांची वेगळी पोतडी आहे !
भेटायला पाहिजे एकदा तुम्हाला.

अत्यंत भावस्पर्शी आणि तरल कथा.

टर्मीनेटर's picture

4 Jan 2022 - 1:40 pm | टर्मीनेटर

मस्त बालकथा 👍

अनन्त्_यात्री's picture

4 Jan 2022 - 2:52 pm | अनन्त्_यात्री

कथा!

बिपीन सुरेश सांगळे's picture

4 Jan 2022 - 9:09 pm | बिपीन सुरेश सांगळे

सर्व वाचक अन प्रतिसाद्क
खूपच आभारी आहे .
फार सक्रिय नसतो , यासाठी मनापासून क्षमा मागतो .

बिपीन सुरेश सांगळे's picture

4 Jan 2022 - 9:20 pm | बिपीन सुरेश सांगळे

प्राची अश्विनी
कित्ती सुंदर, सकारात्मक प्रतिक्रिया !

आपलेही अन बाकी साऱ्यांचेही वर्ष खूप चांगले जावो .
पण आपल्या या लगेच आलेल्या योग्य प्रतिक्रियेने माझेही वर्ष चांगले जाईल !

आपल्या प्रतिक्रियेने मनातला विचार वाचकांपर्यंत पोचतो , हे कळल्याने आनंद वाटतो . अन लिहावंसं वाटतं , नाहीतर कधी लेखनाचंही नैराश्य येतं .
धन्यवाद .

बिपीन सुरेश सांगळे's picture

4 Jan 2022 - 9:24 pm | बिपीन सुरेश सांगळे

विजुभाऊ
आभार . आपल्या शुभेच्छा पाठीशी आहेतच .

सरिता
कुमार
बाजीगर
पैजारबुवा
चौको
सौंदाळा
टर्मिनेटर
अनंतयात्री
खूप आभार

बिपीन सुरेश सांगळे's picture

4 Jan 2022 - 9:49 pm | बिपीन सुरेश सांगळे

चौको
खूप आभारी आहे .
अहो , लिहितो काहीतरी . तसा कधी एखाद्या क्षणी मी मला स्वतःला अनुभवशून्य वाटू लागतो .

कधी भेटताय ?

स्मिताके's picture

4 Jan 2022 - 10:10 pm | स्मिताके

छान सकारात्मक विचार देणारी कथा.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

5 Jan 2022 - 1:21 pm | ॲबसेंट माइंडेड ...

छान आहे कथा.

मुक्त विहारि's picture

5 Jan 2022 - 5:21 pm | मुक्त विहारि

छान लिहिले आहे

बिपीनजी फार सुंदर कथा!! नेहमी आपल्या खिळविण्यार्या गूढ व न वाचवण्यार्या horrible भय , गूढकथा असतात. ही वेगळी कथाही खूप खूप आवडली.पण शेवट नीट उलगडला नाही. बाजीगर यांचे सर्वात वेगळे मत व विचारकरायची वेगळीच पध्दत वाटली व आवडली.

बिपीन सुरेश सांगळे's picture

6 Jan 2022 - 7:35 am | बिपीन सुरेश सांगळे

नूतनजी
आभारी आहे
मी गूढकथा / भयकथा फार च कमी लिहिल्या आहेत .
तसेच शेवट सरळसाधा आहे .
आपली प्रतिक्रिया मला नीटशी कळली नाही . कृपया कळावे

वाह! खुप छान कथा.लोहगड, धुकं ,हरीची विचारसरणी मस्त डोळ्यासमोर उभी राहिली कथा!

बिपीन सुरेश सांगळे's picture

8 Jan 2022 - 1:24 pm | बिपीन सुरेश सांगळे

भक्ती
आपली प्रतिक्रिया आवडली
आभार

ब़पिनजी कथा आवडली, बाजीगर याांची प्रतिक्रिया आवडली, वेगळ्या प्रकारे विचार केलाय, प्रतिशोध म्हणजे सूडाऐवजी मनावर उपचार करणे असा विचार करायची लहान मुलगा असून विचार केलाय.

शेवट म्हणजे मला मुलाला आपले अस्तित्व कसे कळले हे समजले नव्हते आता कळले.

बिपीन सुरेश सांगळे's picture

9 Jan 2022 - 4:03 pm | बिपीन सुरेश सांगळे

नूतनजी
आपण आवर्जून पुन्हा प्रतिक्रिया दिली , यासाठी आपले पुन्हा आभार .