ध्रांगध्रा - २

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
1 Jan 2022 - 6:32 am

पण काय करणार. दोस्त पडला ना. कुणीतरी म्हंटलय की शाळेत स्वतःला लागली नसतानाही मित्राला सोबत म्हणून मुतारीपर्यंत येतो तो तुमचा खरा दोस्त.
लोक ना कायच्या काय संबंध जोडतात......
मागील दुवा
ध्रांगध्रा - १ http://misalpav.com/node/49708
पण ही व्याख्या एकदम पटते मनाला.
त्याने सांगताना सांगितलय "वणी" ... पण ते ठिकाण त्याही पुढे म्हणजे थेट "धोडप" च्या पायथ्याला आणलंय. सकाळीच बाईकला कीक मारली आणि या सातमाळा डोंगरात आलोय.पायथ्याला कुठल्यातरी वाडीत एक चाहाचं दुकान दिसलं तिथेच बाईक लावली आणि चहा पिउन डोंगर चढायला सुरवात केली.
चहावाले आजोबा वारकरी असावेत बहुतेक. कपाळाला अबीर बुक्का होता. त्याना वाट विचारली.त्यानाही नक्की माहिती नसावी.
काय काम काढलंत रे पोरांनो.?
आजोबा तिथे कसंलसं देऊळ आहे असे ऐकलय
तिथे म्हणजे?
डोंगराच्या त्या उंचवट्यापलीकडे.
व्हय का!
म्हणजे तुम्हाला नाही माहीत!
न्हाय म्हणजे तसं माहीत हाय पण तिकडं काय गेलो नाही कधी.
गेला नाहीत? डोंगर्‍याच्या पायथ्याशी रहात असूनही तिकडे कधीच न गेलेल्या आजोबांचे महेशला आश्चर्य वाटते. " गम्मत आहे . अहो आजोबा आम्ही इतक्या लाम्बुन आलो इथे , तिथे काय आहे ते पहायला. आणि तुम्ही इथे असून तिकडे कधी गेला नाहीत!
तसं समजा पोरांनो.ती जागा लैच बेकार आहे.
म्हणजे?
या गावातले कुणी तिकडे जात नाहीत
का?
तिथे "ते" आहेत म्हणे. त्यांच्या जवळ कुणाला येवू देत नाहीत.
"ते "म्हणजे?
"न्हाय बा त्यांच नाव घ्यायचं नसतं" आजोबांना तिथे काय आहे ते माहीत आहे. पण ते कशालातरी भीत आहेत.
"नाव घ्यायचं नसतं? नका घेऊ नाव. उखाण्यात घेतले तरी चालेल.अहो आमच्याकडे नवर्‍याचं नाव थेट घेत नाहीत बायका. त्या ते उखान्ञातच घेतात. आता बघा ना त्या आमच्या काकाच्या लग्नात, काकाच्या आज्जे सासुबाईनी कसा छान उखाणा घेतला होता.... ऐंशी एक वय असेल त्यांचे" उखाणे हा महेशचा वीक पॉइंट.पूर्वी म्हणे लोकांना फक्त श्लोक ,पवाडा, आरत्या या साठीच कविता लिहायची परवानगी होती. चारोळ्या लिहायची हौस लोक उखाणे लिहून भागवायचे. अर्थात ही महेशची उखाण्याची व्याख्या आत्ता सांगण्यात काहीच अर्थ नव्हता
काकाच्या आज्जे सासूबाईनी सांगितलेला तो " हंड्यावर हंडे ठेवले सात त्यावर ठेवली परात बाबुरावांची वाट पहाते उभी राहून दारात " हा उखाणा मी मोजायचे झाल्यास एकशेत्रेचाळीस वेळा ऐकून झालाय. आता उखाणा घ्यायचा तर तो सरळ घ्यायचा ना! "हंड्यावर हंडे सात " या ओळी तो प्रत्येक वेळेस सात वेळा म्हणणार. एखादे वेळेस कमी वेळा म्हंटले तर त्याला कदाचित परात ठेवायला हंडे कमी पडत असावेत.
महेशच्या उखाण्यामुळे ते चहावाले आजोबा अगोदर थोडे हसले पण मग काय झाले कोण जाणे. त्यांच्या चेहेर्‍यावर एकदम राग जाणवायला लागला.
" मस्करी करताय व्हय म्हातार्‍याची. आरं माझा नातू आसंल तुझ्या वयाचा. लेका खुट्ट्या एवढा नाहीस आन माझी मस्करी करतोस? मी काय बाईल हाय व्हय उखाणा घ्यायला." आजोबांच्या रागाचा पारा चढतच चाललाय. त्यांचा चेहेरा सुरकुत्यांसह आक्रसलाय.
" आरं तुमच्या चांगल्यासाठीच सांगतोय. तिकडं जायचं नसतय. मागल्या वर्षी अशीच तीन पोरे गेली. त्यातला एकच जण परत आला. चकवा लागला होता त्याला .कसाबसा परतला.आला तर धड बोलताबी येत नव्हतं. कशाला तरी जाम घाबरला होता. एकलाच आला. बाकीचे दोघे कुठे आहेत हे विचारलं तर बसल्याजागी दातखीळ बसली. थाडथाड उडायला लागला. आम्हाला काय बी कळंना. नशीब तालुक्याच्या गावचा डॉक्टर इथे होता. त्याने सुई टोचली तेंव्हा कुठे शांत झाला. विस्तव हातात ठेवल्यावाणी आंग तापानं फणफणलं होतं त्याचं. माझ्म ऐका ..आज पोर्णीमा आहे. निदान आज पोर्णीमेचं तरी तिकडं जाऊ नका .... हात जोडतो. आरं तुम्ही माझ्या नातवासारखे " आजोबांच्या रागाची जागा आता विनवणीने घेतली.
अर्थात महेश त्यांच्या विनवणीला काही आन देईल अशातला नाही.त्यांच्याच काय पण कोणाच्याच.
" आरं पोरानो मागं फिरा.... नका जाउ तिकडे. तुम्हाला काही झालं तर , माहीत असूनही तुम्हाला सावध केल नाही म्हणून माझ्या दहा पिढ्या नरकात जातील. नका रे जाउ तिकडे आरे परत फिरा. शपत्थ आहे पोरांनो नका जाऊ"
त्या आजोबांपासून बरेच पुढे आलो तरी त्यांचा आवाज ऐकू येत होता.
"त्यांना नक्की माहीत असणार . आपण जे शोधायला चाललोय ना ती जागा.म्हणून ते हाका मारताहेत. आपण शोध लावला तर त्याना ते नको असणार." महेशचं डोकं ना कसही चालतं , कुठही चालतं. आता या लहान गावात , गावात कसलं डोंगरात कसलंस दगडी बांधकाम आहे कळालं तर याला वाटतय आपण अजिंठ्यातल्या लेण्यांचा शोध लावणार आहे " जॉन स्मिथ" सारखा.
" शिवा तू बघच रे. आपण जे काही बघू ना ते सगळं व्यवस्थित डॉक्यूंमेंट करू. आपण एकाला दोघे आहोत. फोटोबीटो पण काढू साईटचे आणि आपण तिथे असल्याचे. मला नक्की खात्री आहे तिथे वाकाटक शैलीतल्या बांधणीचे असणार आहे ते. वाकाटक म्हणजे हेमाडपंती शैलीच्या बांधकामाची स्टाईल येण्या अगोदरचे.या भागात ते सापडलना की मग वाकाटकांची नाणी , आणि गौतमीपुत्र सातकर्णी....." महेशच्या बोलण्याला ब्रेक लागत नाहीये. मला तर "वाकटक" हे काय प्रकरण आहे ते कळत नाही. "गौतमीपुत्र सातकर्णी" हे नाव कधीतरी कानावरुन गेल्याचं अस्पष्ट आठवतय. पण "वाकाटक" हे काय आहे असे विचारले असते तर महेशने रामायणातला कोण तो "रघू" की "अज" त्याच्या पासून सुरवात करून पांडव, राष्ट्रकूट ते ब्रिटीश राजवट व्हाया औरंगजेब असे फिरवून आणलं असतं.
डोंगराची चढण आता चांगलीच जाणवायला लागली आहे. सकाळचं कोवळं ऊन आता संपलय. नशीब, काल परवा पाऊस पडून गेलाय म्हणून जरा हिरवं गार तरी आहे.पण डोंगर हिरवे असल्याचा एक तोटा असतो. पायांना जमिनीवर म्हणावी तशी ग्रीप मिळत नाही. चालताना पाउलवाटेवर, एखाद्या वळणावर, गवतावरून पाय सटकून आपटायला होतं. त्यामुळे वाटचाल तशी हळुहळू , सांभाळून करावी लागते.सातमाळा डोंगररांगांचं एक आहे, उभी चढण आणि प्रामुख्याने कातळ त्यामुळे दाट झाडी वगैरे प्रकार कमीच. उन्हाचा चटका चटका म्हणता नाही येणार पण ताप आता हळू हळू जाणवायला लागलाय.
"जरा थांबूया का थोडं"? माझा पार घामटा निघालाय.
"काय राव.. तुम्ही तरुण रक्त. असे थांबून कसे चालेल? " महेश चा उत्साह कसा काय तसाच कायम रहातो? हे एक कोडंच आहे.
" अहो तरुण रक्त शिल्लक रहायला हवं ना शरीरात! काही पाणी बीणी नको प्यायला?" माझी विनोदबुद्धी अजून शाबूत आहे.
अरे एकदा थाम्बलो की मग पाय शिथील पडतात. पुन्हा उठून पुढे चढायला नको म्हणतात." महेशचे बरोबर आहे एका अर्थाने. पण मागचे तीन एक तास आम्ही सतत चालतोय. तेही अक्षरशः उभ्या चढणीवर.
हे डोंगर फसवे असतात. लांबून एकदम सोप्पे वाटतात. सुरवातीला पण बरे असतात. थोडं चढायला लागल्यावर छाती रेल्वे इन्जिनासारखी फासफुस व्हायला लागते.
"दुरून डोंगर साजरे " या म्हणीचे संदर्भासह स्पष्टीकरण लिहायला सांगितले तर पानभर सहज लिहिता येईल.
"इथे एखादे चहाचे दुकान दिसलं तर बरे होईल" माझ्या विचारांचं मलाच हसायला आलं.
"चहाचं दुकान!!!!" महेश घोड्यासारखा खिंकाळत हसतोय ,, दोन्ही हात पोटावर धरून
"मायला ! तुला काय डोक्यातले विचार पन ऐकू यायल अलागले का! मी चहाचा विचार करतोय ते तुला कसे समजले? " मला महेशच्म आश्चर्य वाटतय. तोम्डात बोट गेलं नाही इतकंच.
" अरे तुला वाटतय की तू विचार करतो आहेस म्हणून. प्ण तू जे मनात बोलतो आहेस ना ते मोठ्याने बोलतो आहेस. अगदी त्या सिनेमातल्या गलगले सारखे." महेशला हसु आवरत नाहीये.
माझ्या त्या चहाच्या विचाराने एक झालं आम्ही चालायचे थांबलो. पिशवीतली बाटली काढुन पाणी प्यालो. थोडं पाणी चेहेर्‍यावर , थोडे डोक्यावर. वाटेत बसायला दगड वगैरे काही नाही. तिथेच फतकल मारून बसलो.
"अरे बसू नको बसू नको" महेशने मला , चांगला बसलेला, उठवला." एकदा बसलास की परत उठून चालायला अवघड जाईल"
अरे पण अजून किती चालायचं. ते चहावाले आजोबा भेटले तिथपासून आपण चालतच आहोत. नुसतं चालतोय.
"आलंच की आता. पुढच्या वळणा वरून दोन वाटा फुटतात या पायवाटेला. एक थेट वर म्हणजे डोंगराच्या माथ्यावर जाते आणि दुसरी डावीकडची खाली दरीतल्या गावात." महेश येताना नकाशा पाठ करून आलाय.ह्या असल्या ठिकाणी वाट चुकली तर विचारताही येत नाही कोणाला. विचारायला कोणी दिसायला तर हवे ना! दिसलं तर विचारणार. अशावेळी फक्त वर वर जात रहायचे मिळेल त्या मार्गाने.आपण डोंगर माथ्यावर पोहोचतोच.
पाणी पिण्यासाठी थाम्बल्यामुळे एक झाले. आम्ही दोघेही फ्रेश झालोय.अजून तासभर तरी चालु शकतो . हे बोलता बोलता संपेल एक तास.
" पन एक सांग . मघाशी तू म्हणालास की ते कोणतसं झाड गेलं की पुढे आपल्या वळायचंय"
हो
" ते झाड मागे टाकून अर्धा तास झाला पुढे आलो आपण तु म्हणतोस तसा रस्ता कुठे दिसलाय? आपण पुढे तर नाही ना आलो?
नाही रे . झाड मागे गेलं हे खरं, पण तुला वाटतं तसं ते वळण झाड गेल्यावर लगेच येणार नव्हतं तर थोड्या वेळाने नंतर म्हणजे थोडे आणखी चालल्यावर.
आम्ही इतकं बोलतोय तोच समोरून कोणीतरी येताना दिसतय. लेंगा शर्ट, डोक्यावर गांधी टोपी,हातात पिशवी.
"कोण असेल रे?" हळू हळू तो माणूस आमच्या जवळ येतोय.
क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

1 Jan 2022 - 7:12 am | प्राची अश्विनी

जबरी! पुढील भागाची प्रतिक्षा.

तुषार काळभोर's picture

1 Jan 2022 - 12:01 pm | तुषार काळभोर

झक्कास!

कर्नलतपस्वी's picture

1 Jan 2022 - 4:52 pm | कर्नलतपस्वी

छान

विजुभाऊ's picture

2 Jan 2022 - 8:07 am | विजुभाऊ

पुढचा भाग. http://misalpav.com/node/49727

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Jan 2022 - 8:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विजूभौ. भारी होतंय लेखन. वाचतोय.

-दिलीप बिरुटे

सिरुसेरि's picture

3 Jan 2022 - 2:35 pm | सिरुसेरि

जबरदस्त . पुभाप्र .

चौथा कोनाडा's picture

7 Jan 2022 - 5:51 pm | चौथा कोनाडा

जबरीच ! आता पुढील भाग वाचतो.