जरा याद करो कुर्बानी

सुनिल पाटकर's picture
सुनिल पाटकर in जनातलं, मनातलं
9 Sep 2021 - 10:08 am

जरा याद करो कुर्बानी...

शेतात राबणारे हात जेव्हा हातात लाठी घेतात. रानोमाळ भटकणारा आदिवासी जेव्हा संघटित होऊन पेटतो, तेव्हा मोठी आंदोलने उभी राहतात. मग ही आंदोलने स्वातंत्र्यपूर्व काळातील असो कि स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची !. ब्रिटिश सरकारला चले जाव असे ठणकावून सांगणारा महाडचा किसान मोर्चा हा त्यातील एक. ब्रिटीश साम्राज्याला हादरवून सोडणारे आणि ब्रिटिश सरकारला मोठा धक्का देणारा हे आंदोलन आजही प्रेरणादायी आहे.

काय होते हे आंदोलन कशासाठी होते हे आंदोलन असे प्रश्न नव्या पिढीला सहाजिकच पडणारे आहेत. त्यांच्यापर्यंत हा इतिहास पोहचला पाहिजे.पोटाला एक वेळ खायला मिळेल की नाही अशी भ्रांत असणारा शेतकरी,आदिवासी घटक. ब्रिटिशांचा अन्याय सहन करणारा होता . परंतु याच सर्वसामान्य घटकांचे मनोबल वाढवून चलेजाव आंदोलनलाला बळ देणारे हे आंदोलन महाडमध्ये १० सप्टेंबर १९४२ ला उभे राहिले .हे आंदोलन इतके तीव्र होते की ब्रिटिशांना बेछूट गोळीबार करावा लागला. या गोळीबारात चार जण हुतात्मे झाले आणि एका आंदोलकाचा ब्रिटिश अत्याचारात बळी गेला.
ब्रिटिश सरकार उलथवून लावण्यासाठी १९४२ ला चले जाव म्हणजे छोडो भारत आंदोलन महात्मा गांधीनी मोठ्या प्रमाणात हाती घेतले होते. नोकरशाहीचे मनोबल खच्ची करून सरकारी यंत्रणा खिळखिळी करायची आणि त्यातूनच इंग्रजांना सळो की पळो करुन सोडायची हा या आंदोलनाचा हेतू होता. महात्मा गांधीच्या प्रेरणेने महाड मधील क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित प्रेरित झाले. आणि महाड मध्ये देखील ब्रिटिशांना हाकलून द्यायचे या उद्देशाने त्यानी आंदोलनाचा झेंडा हाती घेतला आणि या आंदोलनासाठी १० सप्टेंबर १९४२ गुरुवार, पिठोरी अमावस्या हा दिवस निश्चित झाला. आंदोलनाची तयारी महाडच्या ग्रामीण भागात शेलटोली आणि वाळण खोऱ्यामध्ये सुरू झाली. या आंदोलनामध्ये सर्वसामान्य शेतकरी ,आदिवासी, कष्टकरी समाज मोठ्या प्रमाणात एकत्रित आला .महाड शहरातील व्यापारी वर्ग देखील या आंदोलनात सहभागी होता. महाडमधील सरकारी कचेरी ताब्यात घ्यायची व इतर सरकारी कार्यालयांवर तिरंगा फडकवायचा या उद्देशाने हे सर्वसामान्य आंदोलक पेटून उठले होते .नाना पुरोहितावरील त्यांचा विश्वास या आंदोलनाला मोठे बळ देत होता. दहा सप्टेंबरला मामलेदार कचेरी ताब्यात घेण्यासाठी आंदोलकांनी येथून महाडकडे आपला मोर्चा सुरू केला. सुमारे पाचशे ते सातशे आंदोलन या मोर्चात सहभागी झाले होते .हातात काठ्या, अंगावर घोंगडी ,डोक्यावर गांधी टोपी आणि पुढे डॉलाने फडकणारा तिरंगा घेऊन आंदोलक महाड कचेरीच्या दिशेने निघाले.नडगाव येथे आंदोलकांनी एक बस अडवून सरकारी अव्वल कारकूमाला ताब्यात घेतले आणि त्याला खादी पोषाख चढवून आंदोलनात सहभागी करून घेतले . पेटलेल्या या आंदोलकानी पोस्ट ऑफिस ताब्यात घेतले. तेथील कागदपत्रे जाळली. तार घराची मोडतोड केली. महाडमधील सैनिक भरती अधिकाऱ्यांचे कार्यालय तोडले. याच वेळी ब्रिटिश पोलीस लाठीचार्ज करत आंदोलकांवर तुटून पडले .परंतु शेतकरी मोर्चा ची ही ताकद इतकी मोठी होती की, पोलिसांना येथून पळावे लागले. आंदोलनाची ताकद कळल्यानंतर ब्रिटिशांनी पोलिस बंदोबस्त वाढवला. विठ्ठल मंदिरा जवळ ब्रिटीशानी या मोर्चावर बेधुंद असा गोळीबार सुरू केला. या गोळीबारात दहावीत शिकत असणारा 14 वर्षाचा कमलाकर दांडेकर हा विद्यार्थी मृत्यूला सामोरा गेला .पुण्याहून बीए ला शिकत असणाररा वसंत दाते या तरुण या मोर्चात सहभागी होण्यासाठी खास आला होता. तोही धारातीर्थी पडला. नथू टेकावला आणि अर्जुन भोई यांच्यावरही असाच बेछूट गोळीबार झाला आणि हे सर्व महाडच्या या भूमीत हुतात्मे झाले. ज्या कारकुनाला जमावाने मोर्चात आणले होते त्याला देखील ब्रिटिशांनी गोळीबारात मारले.आंदोलन इतके तीव्र होते आणि ब्रिटिशांचा गोळीबार इतका भयानक होता कि नाना पुरोहितानी आंदोलकांना पांगवण्याचा इशारा दिला आणि आंदोलन सर्वत्र विखुरले गेले. नाना पुरोहित देखील ब्रिटिशांना गुंगारा देत भूमिगत झाले .महाडच्या या बंडाची धास्ती घेतलेल्या ब्रिटिश सरकारने तब्बल तीन हेलिकॅप्टर महाड शहरावर घिरट्या घालण्यासाठी ठेवली होती .ब्रिटिश सरकारचे कंबरडे मोडणाऱ्या या आंदोलकांपैकी 141आंदोलकांवर सरकारने गुन्हे दाखल केले. नानांचा शोध घेण्यासाठी दहा हजार रुपयांचे बक्षीस त्यांच्यावर लावण्यात आले. महाडसह इतर गावांवर तीस हजाराचा प्रचंड दंड ठोठावण्यात आला .गावातील अनेकांना ताब्यात घेतले जात होते. याच वेळी बिरवाडीतील विठ्ठल बिरवाडकर यांना ताब्यात घेतले गेले .नाना पुरोहित यांचे खंदे समर्थक व त्यांच्या पाठीशी कायम उभे राहणारे विठ्ठल बिरवाडकर यांचा ब्रिटिशांनी अतोनात छळ केला .अखेर या छळातून विठ्ठल बिरवाडकरांचे देखील शहीद झाले. किसान मोर्चा मधील काही आंदोलकांना शिक्षा झाली तर काही निर्दोष सुटले .परंतु आजही हे आंदोलन महाडच्या इतिहासात अभिमानाने गौरवले जाते. १० सप्टेंबरला महाडमध्ये हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. भारत मातेसाठी बलिदान देणाऱ्या या
वीराना कोटी कोटी प्रणाम.
........

इतिहासलेख

प्रतिक्रिया

सुरिया's picture

9 Sep 2021 - 3:26 pm | सुरिया

महाडच्या या बंडाची धास्ती घेतलेल्या ब्रिटिश सरकारने तब्बल तीन हेलिकॅप्टर महाड शहरावर घिरट्या घालण्यासाठी ठेवली होती

वॉव.
गम्मत म्हणजे ह्याच वर्शी (१९४२) तिकडे इगिर सिकोरस्कीने पहिले लार्ज स्केल प्रॉडक्शन हेलिकॉप्टर अमेरिकन आर्मीला सोपवले. तोपरेन्त प्रोटोटाईप वगैरे चालले होते.
हि घटना महाडला जागतिक नकाशावर नेणारी आहे. कारण ब्रिटिश इतिहासातला पहिला कॉम्बॅट रेस्क्यु बाय हेलिकॉप्टर बर्मा मधला १९४४ सालचा आहे.

योगेश कोलेश्वर's picture

10 Sep 2021 - 11:28 am | योगेश कोलेश्वर

ह्या बद्दल काही च माहित नव्हते ... माहिती पूर्ण लेख ..

ओना मात्तिना, मि सोन अल्झाटो

ओ बेल्ला चाव बेल्ला चावो बेल्ला चाओ चाओ चाओ

ह्या घटनेबद्दल काही माहित नव्हते. माहिती पूर्ण लेखासाठी धन्यवाद!

सर्वसाक्षी's picture

12 Sep 2021 - 7:52 pm | सर्वसाक्षी

नवीन माहिती मिळाली