पारवे पाळले होते

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
1 Sep 2021 - 1:30 pm

- डॉ. सुधीर रा. देवरे

गावात भोई मास्तरांनी पारवे पाळलेले होते. (त्यांचं आडनाव भोईच होतं.) पारव्यांसाठी त्यांनी मोठं लाकडी खोकं तयार करून घेतलं होतं. खोक्याला लोंखडी जाळी बसवलेली होती. सकाळी त्या खोक्याचं दार उघडलं की पारव्यांचा थवा बाहेर उडायचा. गल्लीत, झाडांवर, भितींवर, घरांवर सगळीकडे ते उडत- चरत विहार करायचे. आणि संध्याकाळी बरोबर त्याच खोक्यात येऊन बसत. खोक्यात ती गुटूरगूम...गुटूरगुम करायची. भुई मास्तरांचा मुलगा- सुरेश त्यांना ‘आऽ आऽ’ करून बोलवायचा. दाणे टाकायचा. पारवे त्याला ओळखायचे. त्याच्या अंगावर बसायचे. त्याच्या आजूबाजूला न घाबरता बागडायचे. हे दृश्य पाहून माझं मन हरखून जायचं. पारवे आपणही पाळावेत असं मला मनातून वाटत होतं. सुरेशला एकदा विचारलं,
‘पारवा इकतंस का तुम्ही?’
तो म्हणाला, ‘मंग इकतंस ना!’’
‘कवढाले?’
‘पाच रूपयाले जोडी. नर मादीनी जोडी. पाळना शेत का तुले सांग?’
‘तश्या इचार व्हयी र्‍हायना.’
‘पाळ ना मंग. चांगलं र्‍हास. आम्ही फगत येकच जोडी आनी व्हती. त्यास्ना कितला व्हयी गयात पहाय आता.’
मी तेव्हा नववीत होतो. पारवे पाळले तर अभ्यास होईल का? मी खूप विचार केला. येताजाताना पारव्यांची गमंत बघायचो. आपण पारवे पाळले तर ते असेच आपल्या ओट्यावर बसतील. खेळतील. गुटूरगुम करतील. मग मी एका दिवशी पारव्यांची एक जोडी सुरेशकडून पाच रूपयाला विकत घेतलीच. नर पाढंर्‍या रंगाचा होता तर मादी होती काळ्या रंगाची. त्यांचे एकेक पाय सुतळीने बांधून त्यांना आमच्या ओट्याच्या भिंतीच्या खुंटीला बांधून दिलं. त्यांच्या समोर दाणे टाकले आणि त्यांच्या रात्रीच्या मुक्कामासाठी तयारीला लागलो. घरातला एक चौकोनी आकाराचा मोठा डबा घेतला. त्याचं वरचं झाकण कधीचं मोडून पडलेलं होतं. म्हणून तो डबा असा वापरण्यासाठी आईचा विरोधही झाला नाही. डब्याच्या तोंडाच्या मापाचा विजेच्या ताराने बरोबर एक चौकोन तयार केला. त्या चौकानी ताराला उभ्या आडव्या अशा वायरी बांधून स्वत:च जाळी तयार केली. लाकडी स्टुलावर उभा राहून घरातल्या एका भिंतीवर अड्याकड्याजवळ दोन मोठे खिळे डबा बसेल अशा अंतरावर ठोकले. त्या खिळ्यांवर समोरची उघडी बाजू येईल असा आडवा डबा ठेवला. डबा पडू नये म्हणून डब्याच्या तोंडाच्या जरा मागे एक सुतळी बांधून आड्याकड्याच्या एका कडीला बांधून दिली. डब्याच्या उघड्या बाजूच्या वर चुकीने अगोदरच दोन बारीक भोकं पाडून तारेने ती जाळी थोडी ढिली बांधून ठेवली. म्हणजे ती एका बाजूने वर उचलली जाऊन जाळी उघडता येईल.
दोन्ही पारवे त्या डब्याच्या घरात सोडून दिले. डब्यातच त्यांना बाजरीचे दाणे टाकून वाटीत पाणी ठेवलं. त्यांच्या नव्या घरात ते लवकर रूळावेत म्हणून दिवसभर आणि लगेच रात्रभर त्यांना त्या डब्यातच कोंडून दिलं. जाळी उघडण्यासाठी नेहमी वर चढावं लागू नये म्हणून जाळीच्या झाकणाला खाली एक सुतळी बांधून आड्याकड्याच्या समोरच्या एका कडीतून ती खाली लोंबकळून ठेवली होती. ती सुतळी ओढली की जाळी आपोआप वर जायची आणि सोडली की जाळीने डब्याचं दार बंद व्हायचं.
दुसर्‍या दिवशी मी जाळी उघडली. दोन्ही पारवे डब्यातून घराच्या खुंटीवर व नंतर बाहेर येऊन घराच्या भिंतीवर बसले. आणि भिंतीवरून जसे उडाले तसे ते पुन्हा घराकडे फिरकलेच नाहीत. मला दिसलेही नाहीत. सायंकाळी येतील म्हणून वाट पहात बसलो पण आलेच नाहीत. मग थोडा अंधार होताच सुरेशकडे गेलो. त्याच्या पारव्यांमध्ये ते खोक्यात होते. सुरेशकडून ते घेतले. सुरेश म्हणे, ‘दोन्ही पारवा यकदम सोडू नही. येकना पायले दोरी राहू दे. मंग दोन तीन दिवसमा दुसराले मोकळं सोड आनि पहिलाले बांधी ठेव. आशे करता करता त्या रवळी जातीन.’ मी पारवे घेऊन घरी आलो.
दुसर्‍या दिवसापासून एका पारव्याच्या पायाला दोरी बांधून घरात कसं यायचं, बाहेर कसं जायचं, याचं त्याला ट्रेनिंग दिलं. जोडीदाराच्या पायाला दोरी असल्यामुळं दुसरा पारवाही उडून दूर जात नव्हता. ट्रेनिंगचा परिणामही आठच दिवसात दिसायला लागला. पारवे रूळायला लागले. डब्यात ते स्वत:हून उडून बसायला लागले. नंतर दोघांना मोकळं सोडून पाहिलं. तरीही ते उडून गेले नाहीत. परत आले. सकाळी डब्यातून उडून जाऊन दिवसभर गावभर फिरून त्यांच्या आधीच्या मित्रांमध्ये राहूनही संध्याकाळी ते माझ्या घरात येऊन डब्यात जाऊन बसायला लागले. मला ओळखायला लागले. दाणापाणी खायला लागले. आंनदात गुटूरगूम करू लागले.
पारवे घरात रूळून गेले. संध्याकाळी मी त्यांच्या वाटेत उभा असलो तरी माझ्या डोक्यावरून उडून डब्यात जाऊन बसायला लागले. मग जाळी लाऊन घेत असे. ते ही ती जाळी लाऊन घ्यायची वाट पहात असत. सुरुवातीला ते बळजबरी या घराशी जुळवून घेताहेत असं वाटायचं. पण दिवसेंदिवस नवं घर त्यांना आवडलं. ते माझ्याशीही हसतात- बोलतात असं वाटायचं. पाळलेल्या पारव्यांमध्ये खूप रमलो होतो. सहज एकदा डब्यात डोकावून पाहिलं तर डब्यात दोन अंडी घातलेली दिसली. आता आपल्याकडेही पारव्यांची संख्या वाढेल म्हणून आनंद झाला. असे माझे आणि पारव्यांचे छान दिवस चालले होते.
एका पहाटे झोपेत असतांनाच पारव्यांचा कर्कश आवाज आला. दचकून जागा झालो. आणि डब्याकडे आलो तर मांजर तोंडात मादी पारवा पकडून घराच्या धाब्याच्या गवाक्षातून बाहेर उडी घेत पळताना दिसली. घाबरलेला नर डब्यातून घाबरून घराच्या भिंतीच्या खुंटीवर येऊन बसलेला होता. झटापटीत पारव्यांचे दोन्ही अंडे जमिनीवर पडून फुटलेले होते. वायरची जाळी ढिली झालेली होती. आणि त्याचा फायदा मांजरीने बरोबर घेतला होता. मांजरीच्या झडपेसरशी जाळीतले अंतर वाढले आणि मांजरीला आत डब्यात प्रवेश करता आला होता. थोडा वेळ काही सुचलंच नाही. नर पारव्याला हातावर घेऊन बाहेर ठेवलं. त्यांची चरायला जाण्याची वेळ झालेली होती. नर उडून गेला पण परत संध्याकाळी आला नाही. मी ही सुरेशकडे त्याचा तपास करायला गेलो नाही.
आता कुठं पारवे दिसले की पाळलेल्या पारव्यांची आठवण होते, नव्हे ते डोळ्यासमोरच उभे राहतात. पारवे दिसले की कायमचं त्यांच्यासोबत रमून जावं. त्यांच्याबरोबर आभाळात उडावं असं वाटतं. पण या धावपळीच्या आयुष्यात तसं करायला आज वेळ नाही. मग शहाण्या माणसासारखं रोज आपलं ओझं आपणच ओढत रहावं.
(‘सहज उडत राहिलो’ या पुस्तकातला मजकूर. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
© डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.com/

वाङ्मयलेख

प्रतिक्रिया

शानबा५१२'s picture

1 Sep 2021 - 5:14 pm | शानबा५१२

आपल्य ब्लॉगवर अपण लिहलेल्या पुस्तकांच्या यादीत 'सायको' नावाची एक कादंबरी दीसली. त्या कादंबरीची तोंडओळख द्याला का प्लीज? असे जरा हटके विषय वाचावसे वाटतात म्हणुन विचारले.

सौंदाळा's picture

1 Sep 2021 - 5:52 pm | सौंदाळा

खूप सुंदर लिहिले आहे.
साधा प्रसंग असला तरी तपशील, बोलीभाषा, भावना यांचा सुंदर मिलाफ.

श्रीगुरुजी's picture

1 Sep 2021 - 6:21 pm | श्रीगुरुजी

छान लिहिलंय.

पक्षी पिंजऱ्यात ठेवून पाळणे हा त्यांच्यावर अन्याय आहे असे माझे मत आहे. पूर्वी काही जण एका छोट्या गोल पिंजऱ्यात पोपट ठेवायचे. या मुक्त विहार करणाऱ्या पक्षावर हा अन्याय होता. एकदा पिंजरा मोकळा असताना दबा धरून बसलेल्या त्याला तोंडात पकडून पळाला होता.

काही वेळापूर्वीच घरासमोरील झाडावर पोपटांचा कलकलाट ऐकू येत होता. त्यांना पहायला सज्जात गेल्यानंतर ६-७ पोपटांचा थवा कलकलाट करीत उडून गेला व हवेत गोल फेरी मारून परत त्याच झाडावर येऊन बसला. अशा आनंदी पक्षाला किंवा इतर कोणत्याही पक्षाला निसर्गात मुक्त वावरू द्यावे.

कंजूस's picture

1 Sep 2021 - 6:30 pm | कंजूस

कबुतरं फार त्रास देतात म्हणेन पाळावीशी वाटली नाहीत. मासे मात्र पाळले. गप्पीच असायचे. त्यामुळे कुणीना कुणी द्यायचे फुकट. मग पोळी चुरा घालून वाढवायचे. जरा गंमत.

अनिरुद्ध.वैद्य's picture

1 Sep 2021 - 6:36 pm | अनिरुद्ध.वैद्य

पारव्यांबाबत अशीच आठवण आहे. तेव्हापासुन मांजरी कधीच आवडल्या नाहित. :(

गॉडजिला's picture

1 Sep 2021 - 7:55 pm | गॉडजिला

....

कपिलमुनी's picture

1 Sep 2021 - 9:16 pm | कपिलमुनी

पक्षी पाळणाऱ्यांना गळ्यात पट्टा घालून पिंजऱ्यात ठेवावे असा विचार मनात येतो

सौन्दर्य's picture

1 Sep 2021 - 10:51 pm | सौन्दर्य

खुप साधा, सरळ व मोकळा लेख. आवडला.
शाळेतल्या वयात मलाही पक्षी पाळावेसे वाटले होते पण कधी पाळले नाहीत. आमच्या मामांना पक्ष्याचं प्रचंड वेड होते, त्यांनी घरातच जवळ जवळ ८' बाय ८' फुटांचा पिंजरा बनवला होता त्यात लव्ह बर्ड्स व इतर अनेक पक्षी ठेवले होते.

लेखातील बोली भाषा अहिराणी आहे का ?

king_of_net's picture

2 Sep 2021 - 1:21 pm | king_of_net

छान!