दैवाचा रिव्हर्स पंगा(इतरत्र पूर्व प्रकाशित)

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
18 Aug 2021 - 7:24 pm

दैवाचा रिव्हर्स पंगा

विक्रम भालेराव हे “पॉवरकॉन” कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर होते. मी अस ऐकले आहे की सॉफ्टवेअर कंपन्यांमधून मॅनेजरला मांजर म्हणतात. पण भालेराव मांजर नसून वाघ होते. ते कायम कुणावरतरी हल्ला करून त्याला फाडून खायच्या मूड मध्ये असत. हे असे का? त्याला अनेक कारणे असावीत. तुम्ही खोदून चौकशी केलीत तर त्यांच्या हाताखाली काम करणारे एकमुखाने सांगतील, “सरांचे काय आहे तसे ते स्वभावाने फार चांगले आहेत. ते कुणावर आरडा ओरड करतील त्याचा नेम नाही, पण ते मनात काही ठेवत नाहीत. ऑफिसमधून संध्याकाळी घरी जाताना मन कसे निर्झरासारखे स्वच्छ! दुसऱ्या मॅनेजरां प्रमाणे “आत एक बाहेर दुसरे” ही पॉलिसी नाही.”

“ते ठीक आहे हो. पण ऑफिसमध्ये-----“

“तुम्ही कोणाला सांगणार नाही ना ह्या बोलीवर सांगतो,” तो तुम्ही सांगणार नाही असे धरून चालतो, थोडे पुढे झुकून हलक्या आवाजात बोलायला लागतो, “मी ऐकले आहे की त्यांची बायको त्यांच्यावर दाब चालवते. ते कुठे रहातात माहीत आहे तुम्हाला? पाली हिलला. तो फ्लॅट त्यांच्या वाइफचा आहे. नाहीतर आमच्या इथे नोकरी करणारे दुसरे लोक कुठे रहातात? डोंबीवलीला!”

“हे मला माहीत नव्हते. म्हणून लग्न करताना------“ इत्यादी इत्यादी.

भालेराव अर्थात् सॉफ्टवेअर कंपन्यांमधल्या मॅनेजरसारखे नव्हते. मी हे पण ऐकले आहे की तिकडच्या मॅनेजरला फक्त टाईम आणि कॉस्ट मॅनेज करायचे असते. मधून मधून हेड काउंट. टेक्नॉलॉजीशी त्याचा काही संबंध नसतो.

इंजीनिअरींग कंपन्यातून असं नसतं. तिथे मॅनेजर त्याच्या विषयातला सॉलिड दादा माणूस असतो. भालेराव त्याच पठडीतले होते. त्यांच्या हाताखाली काम केलेले छोकरे दुसऱ्या कंपनीत मोठ्या पदावर काम करत होते. ते अडले की सरांकडे धावत येत. मग सर खुश. तर सांगायचा मुद्दा असा की भालेराव सरांचा इंडस्ट्रीमध्ये दबदबा होता.

नेहमीप्रमाणे सकाळी सर ऑफिसमध्ये आले तेव्हा त्यांचा मूड जास्तच खतरनाक होता.

“सांभाळून रे अवि! आज वादळाची चिन्हे दिसत आहेत. तुझ्याकडे रिले सेटिगची एक्सेल सॅंपल फाईल आहे ना ती माझ्याकडे पाठव. आधीच तयारी केलेली बर.” मन्या पिंगळे अविला मेल पाठवत होता.

पांडूने साहेबांच्या टेबलावर चहा आणून ठेवला. साहेबाने चहाचा घोट घेतला, “पांडोबा, मिस्टर साखरसम्राट, दुसरा चहा बनवा. कम शक्कर. तुला जमत नसेल तर मी पॅंट्रीत येऊन चहा करून दाखवू? आता या ऑफिसमध्ये चहा पण मी बनवायचा.”

चला दिवसाला सुरुवात झाली होती. मन्या पिंगळे मनातल्या मनात बोलला॰

सर बोलायला लागले की धारदार तलवार म्यानातून बाहेर पडली आहे अशी जाणीव व्हायची.कुणाच्रे तरी रक्त काढल्या शिवाय ती म्यानात परतत नसे.

रक्ताचा लाल रंग!

“मनोहरलाल, रिले सेटिंग झाली नसतीलच. क्लाएंट मला रात्री बेरात्री फोन करतो. विचारतो केबल शेड्युल केव्हा देणार? त्याला काय सांगू? आमच्या मनोहरलाल साहेबाचा मूड होईल तेव्हा. उद्याचा वायदा केला तर काय म्हणतो का आत्ता का नाही? जणू काय साईटवर वायरमन स्क्रू ड्रायव्हर हातात घेऊन रात्री बारा वाजता वाट बघतो आहे – मी केव्हा शेड्युल पाठवतो त्याची. तुम्ही बायकोच्या कुशीत झोपले असणार. इकडे साहेब शिव्या खातोय. खाऊ दे. साहेबाची मारली जातेय. जाऊ देत. बरच आहे ---“ पांडूने चहाचा कप टेबलावर ठेवला, “पांडू, कप आपटू नको. मी तुझ्यावर रागावलो त्याचा राग त्या बिचाऱ्या कपावर काढू नको.”

कुत्सित काळा रंग! वर कुजलेल्या माश्यांचा वास.

खर तर पांडूने कप आपटला बिपटला नव्हता. पण साहेबाला आरडायला कारण पाहिजे ना. कोणी नाही तर घसरा पांडूवर. पांडू अशा गोष्टी मनावर घेत नाही. सरते शेवटी त्याने पण सरांच्या बरोबरीने ऑफिसात वीस वर्षे पाट्या टाकल्या आहेत! उगाच नाही त्याला आम्ही निर्विकार पांडू म्हणतो.

हे अस दररोज चालायचे. आजचा दिवस त्याला अपवाद कसा असणार?

सरांच्या टेबलावरचा फोन वाजला. बाहेरून फोन आला असणार.

“बोला साहेब, काय म्हणता. स्वीचयार्ड चार्ज झाले?” बहुधा क्लाएंटचा फोन असावा.

“माझ्यामुळे नाही झाले? कमाल आहे. मी काय घोडं मारलं?”

“रिले सेटिंग मध्ये चुका आहेत? मार्क अप करून मला फाईल मेल करा.”

“हे पहा कर्दळे साहेब. मी स्वतः सेटिंग केली आहेत. पहातो मी. आता मी काय सांगतो ते ऐका. चुका कोण करत नाही? मी केव्हापासून चुका न करणारा माणूस शोधतो आहे. तुमच्या पाहण्यात कोणी असेल तर माझ्याकडे पाठवून द्या. मागेल तो पगार देईन मात्र एकही चूक होता कामा नये बरका.” सरांनी फोन बंद केला.

सर मनोहर पिंगळेकडे वळले, “पाहिलेस पिंगळ्या. ह्या साल्याला आता आपल्याला शिकवावे लागणार. मी आयुष्यभर काय काम करतो आहे तर कधी क्लाएंटला शिकवा, कधी नवीन रिक्रूटला शिकवा. नवीन क्लाएंट, नवीन शिकवणी. नवीन रिक्रूट नवीन शिकवणी. मी जेव्हा शिकावू उमीदवार होतो तेव्हा टेंडरांचे कंपॅरिटीव टेबल मीच बनवत होतो. केबल शेड्युल? माझ्या शिवाय कोण साहेबाला सापडणार? म्हटलं त्या यंडू गुंडूला सांगा तर म्हणणार, अरे त्याला नको तो खूप चुका करतो. आता मी बॉस आहे तरी मी तेच करतो आहे. तुम्हा लोकांना वाटतं की साहेब साला खुर्चीवर बसून खुर्ची गरम करतो आणि अंगठे चोखत दिवस काढतो. होय ना अविनाश साहेब? लाजू नको. मला माहीत आहे तुमचे काय खुसुरपुसुर चालते ते -----“ फोन वाजला. बर झाल. साहेबांच्या तोंडाचा दांडपट्टा थांबला.

निराशेचा करडा सावळा रंग.

“पिंगळे, मी साहेबांच्याकडे जातो आहे. दोन तासांची निश्चिंती आहे. जर रिले सेटिंगचा मार्कअप आला तर बघून घेशील.”

साहेब गेले आणि सगळेजण थोडे रीलॅक्स झाले. “आपला साहेब ते “चुका न करणारा माणूस” सगळ्याना सुनवतात. खरच जगात असा कोणी असेल का रे?” डिपार्टमेंटमधला कोणीतरी बोलला.

“आहे ना. आपला साहेब, सुपर इंजिनिअर विक्रमवीर भालेराव!” सगळे हसले.

हलक्या हवेच्या झोक्याने मळभ निवळले.

इतक्यात दरवाज्यात एक तरुण आला. तो गोंधळलेला होता. बाहेरगावाहून मुंबईत प्रथमच पदार्पण करणाऱ्या पाहुण्यासारखा. पिंगळे पुढे झाला. साहेब नसले की पिंगळेच साहेबासारखा वागत असे. ते एका परीने बरोबरच होते कारण डिपार्टमेंटमधे तोच सिनिअर होता.

“येस??” कुणाला भेटायचे आहे, मी आपल्याला काय मदत करू शकतो. इत्यादी पिंगळ्याला बोलायचे होते पण राहून गेले. येस वर जीभ अडखळली.

“मी सुजय जोशी. मला भालेराव सरांना भेटायचे आहे.” त्या तरुणाने आपली ओळख करून दिली.

“सर जरा बिझी आहेत. सरांकडे काय काम होते आपलं. मला सांगा.”

“आज माझी जॉईनिंग डेट आहे.” थोडी विचारपूस झाल्यामुळे त्याची भीड चेपली असावी, त्याने आपल्या पाठीवरच्या बॅगमधून फाईलमधले अपॉइटमेंट लेटर पिंगळेला दाखवले.

“हो, बरोबर आहे. तुम्हाला ह्याच डिपार्टमेंटमध्ये जॉईन व्हायचे आहे, पण तुम्ही आधी पर्सनलमध्ये जाऊन आलात का?”

“हो हो. मी वागळे मामना भेटलो. तिथले सगळे रुटीन संपवले. त्यांनीच मग इकडे डायरेक्ट केलं.”

“सुजय, बसा ना इकडे ह्या खुर्चीवर. आज हा इथला रजेवर आहे. बसा, तोपर्यंत सर येतील.” समोरच्या खुर्चीवर स्वतः बसत मनोहर म्हणाला, “ तुम्ही इलेक्ट्रिकल ना? कुठून केले?”
“पदवी पुण्यातून आणि पोस्ट ग्रॅड बंगलोरहून.” सुजय उत्साहाने बोलत होता. कॉलेजची नावे अध्याहृत होती. समझनेवालोंको इशारा काफी होता है.

हे प्रकरण आपल्या हद्दीबाहेरचे आहे इतके समजण्याची अक्कल मनोहरला होती. त्याने संभाषण तेथेच थांबवले. पांडूला हाक मारून सुजयला चहा द्यायची व्यवस्था केली.

सर आले ते तणतणच, “मीटिंग्स, मीटिंग्स, मीटिंग्स. दुसरे काही धंदे नाहीत. एवढी तोंडाची वाफ वाया घालवतात. एव्हढ्या वाफेवर दहा मेगावॅटचे टर्बाईन चालले असते. पांडू चहा आण रे बाबा.” सरांनी टेबलाचा खण उघडला. आतून एक गोळी काढली, पाण्याच्या घोटाबरोबर गिळून टाकली. पांडूने चहा आणून टेबलावर ठेवला. “मनोहर लाल. त्या हिरोने मार्कअप पाठवला? नाही ना. कसा पाठवेल! ह्याच्या तीर्थरूपांनी कधी रिले शब्द ऐकला तरी होता. चालला माझ्या सेटिंगवर कॉमेंट करायला. म्हणे सेटिंग शीट मध्ये चुका आहेत. तुला सांगतो हा कर्दळ्या कुठे तरी दुसरीकडे फसला असणार. जेव्हा वरून “उशीर का झाला” म्हणून फायरिंग झाले असेल तेव्हा लगेच माझी लंगोटी लावली लाज राखायला. कन्सल्टंट चांगली खुंटी असते लक्तरे टांगायला. म्हणून कन्सल्टंट पाहिजे ह्यांना. हे लोक कॉन्ट्रॅक्टरबरोबर बसून रात्र रात्र दारूकाम करणार. मग त्याला ढील देणार.” सरांनी डोळे मिटून कपाळ घट्ट दाबून धरले. थोड्या वेळाने त्यांचे डोके शांत झाले असावे. कदाचित गोळीचा परिणाम असावा. अलीकडे सरांचे गोळी घ्यायचे प्रमाण वाढले होते. वयोमान पण झाले होते. रिटायर व्हायला राहिली असतील दोन चार वर्षे. कंपनी त्यांना थोडीच रिटायर होऊ देणार आहे. सरांचे काय ते कुठे ना कुठे काम करत राहतील.

सरांनी डोळे उघडले. समोर बघताच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. “मनोहर, हे मी काय बघतो आहे? ऐनापुरे एवढा तरुण गुटगुटीत? मी स्वप्न बघत नाही ना.?”
“सर, हा ऐनापुरे नाही. त्याने आज रजा टाकली आहे. हे आहेत सुजय जोशी. नवीन ट्रेनी आहेत. आज त्यांची जॉइनिंग डेट आहे. सर, ते तुम्हाला भेटायला थांबले आहेत.”

सरांनी मनगटी घड्याळाकडे नजर टाकली, “माझी नजर अधू झाली आहे. लॉर्ड सुजय जोशी, जरा इकडे येऊन ह्यात बघून मला सांगा बर किती वाजले. बघा बघा लाजू नका. बारा वाजले. बारा वाजता जॉइन होऊन आमचे बारा वाजवा----“

“सर ते वेळेवर आले होते-----“

“तू चूप मनोहर, तू काय ह्यांचे वकीलपत्र घेताले आहेस? का हा तुझा जावई आहे? नाही ना मग मध्ये मध्ये बोल नकोस. हा, तर मिस्टर जोशी. हे ऑफिस जगातली सगळी ऑफिसं असतात तसच आहे. सकाळी दहा वाजता सुरु होतं. जायची वेळ निश्चित नसते. मी रात्री नऊ दहाला घरी जातो. तुम्हालाही तसच करावे लागेल. तयारी असेल तर थांबा नाहीतर आत्ताच चालायला लागा. बाहेर जायचा दरवाजा उघडा आहे. नेहमी उघडा असतो.”

ही नॉन स्टॉप भंकस ऐकून सुजय हादरला. हा अनुभव त्याला नवीन होता. असे स्वागत होईल अशी त्याची अपेक्षा नव्हती. पण इथपर्यंत आल्यावर पुढे जाणे भाग होते. ही आपली परीक्षा आहे. त्यात चांगल्या प्रकारे उत्तीर्ण व्हायचे आव्हान होते. “मी शिकण्यासाठी आलो आहे. कितीही कष्ट पडले तरी -----“

“मिस्टर. हे काही ट्रेनिंग सेटर नाही. नवीन शिकायच्या अगोदर तुम्ही आधी काय दिवे लावले आहेत ते सांगा.”

सुजयने थोडक्यांत आपल्या रेझ्युमेची रेकॉर्ड लावली. सुजय सांगत गेला. साहेब टेबलावरचे कागद वर खाली करत होते. एम टेक ऐकल्यावर साहेबाने कान टवकारले.

“मी मॅनेजमेंटला स्पिन बॉलर मागितला होता. तर त्यांनी स्विंग बॉलर पाठवला! वहा रे तुझी लीला! थिसीस काय होता?”

“सांगितले ना आत्ताच -----“ सुजय आता मात्र पुरा वैतागला होता.

“का पुन्हा सांगितलेस तर तोंड झिजून जाईल? नका सांगू. आमच्या सारख्या अनाडी लोकाना काय समजणार असं तुला वाटत असेल. हो ना. एक सांगू का तुमच्या सारख्या स्कॉलर लोकांनी तिकडे बंगलोरला रहायला पाहिजे.” सरांनी अजून एक पिंक टाकली.

“हो मी बंगलोरला नोकरी करणार होतो. तसा मी मूळचा मुंबईचा. माझे वडील मुंबईला असतात. ते एकटेच रहातात. वय झाले आता त्यांचे. म्हणून मी मुंबईत नोकरी शोधत होते. अनायासे आपल्या कंपनीत कॉल आला.” सुजयने मोकळ्या मनाने सांगितले.

“अहाहा, मुलांनो हा पहा विसाव्या शतकातला श्रावण बाळ! आपल्या बाबांची सेवा करण्यासाठी सगळे सोडून मुंबईला धावत आला. सुदैवाने ह्यांचे बाबा आंधळे नाहीत का त्यांना तीर्थयात्रेला जायचे नाही. मग काय? आले आपल्या कंपनीत नोकरी करायला. केव्हढे हे आपले सुदैव!”

कुजलेल्या मासळीचा दुर्गंध सगळीकडे पसरला. सुजयच्या कपाळावरची शीर ताड ताड उडू लागली. असल्या सडैल माणसाच्या हाताखाली काम करायची कल्पना असह्य झाली. चुकून झुरळावर पाय पडावा व ते पचकन चिरडले जावे तशी किळस आली.

बस्स झाले. आता इथे थांबायचे नाही. पुन्हा बंगलोरला जाऊ. नेटवर्क डायनॅमिक्सची ऑफर अजून ओपन होती. बाबांना समजाऊन सांगू. त्यांना बरोबर घेऊन जाऊ.

त्याने भराभर आपले कागद आवरले, बॅगेत भरले. सरांची बडबड चालू होती. तिकडे दुर्लक्ष करून तो निघाला. दरवाज्याशी आल्यावर त्याने खिशातून कंगवा काढला. केस विचरले, सगळ्या मेंढ्यांकडे आणि मेंढपाळाकडे एक नजर टकली आणि कंगवा झटकला. कंगव्यातून विद्युतचुंबकीय लहरींचा झोत प्रकाशाच्या वेगाने निघून धडक मारून गेला. नशीब की खिडक्यांची तावदाने फुटली नाहीत.

निःशब्द वादळाचा झंझावात!

“हुं.” सुजय निघून गेला.

“अरे, तो सुजय आत्ता इथे होता, गेला कुठे?” सर भानावर येत म्हणाले.

“सर, मला वाटत, बहुतेक तो निघून गेला. रागावून.” कोणीतरी उद्गारले.

“रागावून? मला ह्या हल्लीच्या मुलांचे काही समजत नाही. मान अपमान नाकाच्या शेंड्यावर! मोठ्यांचा राग असा मनावर घ्यायचा नसतो. हसून ह्या कानाने ऐकून त्या कानाने सोडून द्यायचा. मीच त्याला दादापुता करून घेऊन येतो.”

सर निघाले. रिसेप्शन ओलांडून बाहेरच्या लिफ्टपाशी आले. लिफ्ट खाली जात होती. ती वर येईस्तवर थांबायला पाहिजे.

आपल पण थोडं चुकलच. थोडं म्हणजे बरच म्हणजे फारच. इतकं लागट, कडू, कठोर नको होतं बोलायला. सगळ्या आयुष्याचा राग त्याच्यावर कशाला काढायचा? साली ती मीटिंग! तेथून लागट घेऊन आलो आणि ह्या गरीब बिचाऱ्या सुजयवर ओतली. त्याला सॉरी म्हणायला पाहिजे. अगदी मनापासून. चांगला मुलगा आहे. ऐकेल माझे. येईल परत.

लिफ्टने खाली येऊन सर बिल्डिंगच्या बाहेर पडले. त्यांना पाठमोरा सुजय जाताना दिसला. झपाझप पावले उचलत सर त्याच्या पाठी निघाले.

“काही उपयोग नाही. सुजय नाही भेटणार. पहा त्याला रिक्षा मिळाली. तो गेला.”

“कोण तुम्ही? तुम्हाला काय माहीत?”

चेशायर कॅटच्या हास्यासारखे एक हसू हवेत हळू हळू विरत गेले.

पर्सनलकडे त्याचा फोन नंबर, पत्ता, ई-मेल असेलच की. ह्या विचाराने त्यांना हायसे वाटले. समोरच चहाचा ठेला होता. एक कटिंग मारून ऑफिसला परत जाऊ. चहा घेतल्यावर त्यांना उत्साह आला. अंगातली मरगळ गायब झाली. एखाद्या तेवीस वर्षाच्या तरूणाप्रमाणे त्यांचे मन आशा आकांक्षांनी भरून गेले. त्यांनी समोर बघितले. मोठी पाटी होती. “पॉवरकॉन” येस! इथेच त्याला आज जॉइन करायचे होते.

“सहावा माळा.” त्याने लिफ्टमन सांगितले. इकडे मजला नाही म्हणत कोणी. माळा म्हणतात.

रिसेप्शनमध्ये पोहोचल्यावर नटलेल्या रिसेप्शनिस्ट बधून तो भांबावला. इतकी नटवेली तरुणी तो आयुष्यात प्रथम बघत होता.

“येस?” तिने प्रश्नार्थक चेहरा केला. म्हणजे हिला बोलता पण येत होतं. पण एका शब्दापेक्षा त्या तरुणाची जास्त लायकी नसावी अशी तिची समजूत झाली असावी. “?” तिने पुन्हा विचारले.

“मी विक्रम भालेराव. मला सुजय जोशी सरांना भेटायचे होते. मला त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये जॉइन करायचे होते. आज. ट्रेनी इंजिनिअर म्हणून.”

भावलीने कुठेतरी कुणालातरी फोन केला

“सर बिझी आहेत. तुम्ही सरळ जा. डिपार्टमेंटमध्ये मनोहर पिंगळे सिनिअर आहेत. त्यांना भेटा. पण त्या आधी पर्सनलमध्ये मिस वागळे आहेत. त्यांना प्रथम भेटा.”

***********************************************************************************

दरवाज्यात एक तरुण आला. तो गोंधळलेला होता. बाहेरगावाहून मुंबईत प्रथमच पदार्पण करणाऱ्या पाहुण्यासारखा. पिंगळे पुढे झाला. साहेब नसले की पिंगळेच साहेबासारखा वागत असे. ते एका परीने बरोबरच होते कारण डिपार्टमेंटमधे तोच सिनिअर होता.

“येस??” कुणाला भेटायचे आहे, मी आपल्याला काय मदत करू शकतो. इत्यादी पिंगळ्याला बोलायचे होते पण राहून गेले.

“मी विक्रम भालेराव. मला जोशी सरांना भेटायचे आहे.” त्या तरुणाने आपली ओळख करून दिली.

“सर जरा बिझी आहेत. सरांकडे काय काम होते आपलं. मला सांगा.”

“आज माझी जॉईनिंग डेट आहे.” थोडी विचारपूस झाल्यामुळे त्याची भीड चेपली असावी, त्याने आपल्या पाठीवरच्या बॅगमधून फाईलमधले अपॉइटमेंट लेटर पिंगळेला दाखवले.

“हो, बरोबर आहे. तुम्हाला ह्याच डिपार्टमेंटमध्ये जॉईन व्हायचे आहे, पण तुम्ही आधी पेर्सनलमध्ये जाऊन आलात का?”

“हो हो. मी वागळे मामना भेटलो. तिथले सगळे रुटीन संपवले. त्यांनीच मग इकडे डायरेक्ट केल.”

“विक्रम, बसा ना इकडे ह्या खुर्चीवर. आज हा रजेवर आहे. बसा, तोपर्यंत सर येतील.” समोरच्या खुर्चीवर स्वतः बसत मनोहर म्हणाला, “तुम्ही इलेक्ट्रिकल ना? कुठून केले?”
“पदवी पुण्यातून आणि पोस्ट ग्रॅड बंगलोरहून.” विक्रम उत्साहाने बोलत होता. कॉलेजची नावे अध्याहृत होती. समझनेवालोंको इशारा काफी होता है.

कथा समाप्त? नाही. नाही. आता तर कुठे सुरुवात झाली होती.

कथा

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

19 Aug 2021 - 10:48 am | सौंदाळा

काय बी समजलं नाही.
पुनर्जन्म वगैरे काही आहे का?

हि सॉफ्टवेअर कंपन्यांमधली कथा नाही हे समजले . खुप दिवसांनंतर इंजीनिअरींग कंपन्यांमधली कथा दिसली .

गॉडजिला's picture

19 Aug 2021 - 4:06 pm | गॉडजिला

कथा आवडली. लीहते रहा...