आरिगातो टोक्यो !

Primary tabs

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
8 Aug 2021 - 11:57 pm

आरिगातो टोक्यो !

मार्गरेट मीड नावाची अमेरिकन मानववंशशास्त्रज्ञ (anthropologist) होती. तिचं खूप गाजलेलं विधान होतं की मानवाच्या उत्क्रांतीचा सर्वात महत्वाचा टप्पा - आगीच्या किंवा चाकाच्या शोधापेक्षाही जास्त - माणसाच्या "मनुष्यत्वाचा" पहिला पडाव होता ते म्हणजे पहिल्या तुटलेल्या मांडीच्या हाडाचं (fractured femur) बरं होणं. मांडीचं हाड हे शरीरातलं सर्वांत मोठं हाड. ते तुटलं तर माणूस हालचाल करू शकणार नाही आणि अर्थातच तो माणूस भक्षकांसाठी सोपं भक्ष्य बनेल. बाकी कुठल्याही वन्य जीवांचा कळप अश्या कमजोर प्राण्यांना मागे ठेवून बाकी धडधाकट सदस्यांना घेऊन पुढे जातो. पण माणसाचं ते हाड पहिल्यांदा जेव्हा सांधून बरं झालं तेव्हा ते एका मानवाने दुसर्‍या मानवाची काळजी घेतल्याचं, त्याची सेवा सुश्रुषा केल्याचं पहिलं लक्षण होतं. आणि तिथे माणसाचा होमो सेपियन्स ते "मनुष्य" हा प्रवास सुरू झाला.

मला वाटतं त्याही आधी जेव्हा एका आदिमानवाने दुसर्‍याशी केवळ मनोरंजनासाठी कदाचित पळण्याची "शर्यत" लावली असेल आणि "हरलेल्याला जिंकलेल्याने" हसत हसत प्रेमाने मिठी मारली असेल ती खरी माणसाच्या मनुष्यत्वाकडच्या प्रवासाची सुरुवात! आणि ह्या उत्क्रांतीची परिसीमा आपल्याला बघायला मिळाली ती गेल्या सतरा दिवसांत. आणि ते एका देशाच्या, एका शहराच्या लोकांनी केलेल्या जीवतोड मेहनतीमुळे, त्यांच्या त्यागामुळे, त्यांनी पत्करलेल्या धोक्यामुळे, त्यांच्या शिस्तबद्धतेमुळे.

स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी ज्युदोका ताकातो नाओहिसाने फक्त जपानसाठी पहिलं पदक जिंकलं नाही तर जपानवासियांसाठी पहिली द्वाही दिली. इतक्या अभूतपूर्व संकटसमयीदेखील, इतक्या प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा जपान फक्त स्पर्धेच्या संयोजनातच नाही तर मैदानातही जोरदार मुसंडी मारणार. आणि झालंही तसंच. जपानने तब्बल ५८ मेडल्सची लयलूट केली. आर्थिक, सामाजिक, सुरक्षा, सार्वजनिक आरोग्य अश्या अनेक सीमांवर लढून हा उगवत्या सूर्याचा यजमान देश टोक्यो २०२० वर आपली छाप सोडणार हे पहिल्या दिवशीच स्पष्ट झालं. आणि मग उलगडत गेली ती माणसाच्या जिद्दीवर, चिकाटीवर, त्याच्या सृजनावर आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे माणसाच्या चांगुलपणावर विश्वास दृढ करणार्‍या प्रसंगाची मालिका.

सतरा दिवसांनंतर ह्यासाठी टोक्योला धन्यवाद द्यावे तितके कमी ठरतील. हे ऑलिम्पिक्स फक्त क्रीडाक्षेत्रासाठीच नाही तर सगळ्या मानवतेसाठी खूप गरजेचं होतं. एका अदृश्य राक्षसाशी सगळं जग लढत होतं. पण जपानने, टोक्योने जगभरातल्या अ‍ॅथलीट्सच्या साथीने दाखवून दिलं की मानवतेचं चैतन्य ह्या भस्मासुराला पुरून उरणारं आहे. तेव्हा धन्यवाद टोक्यो... आरिगातो - आम्हाला १७ दिवस खिळवून ठेवणारं ऑलिम्पिक्स दिल्याबद्दल... ह्या परिस्थीतीतही तब्बल सोळा जागतिक रेकॉर्ड्स तोडणारे परफॉर्मन्सेस दिल्याबद्दल.

आरिगातो टोक्यो -

सिमोन बाईल्सला मिळालेल्या आधारासाठी.... ४६ वर्षीय उझबेक जिम्नॅस्ट ओक्साना कुझोवितीनाला तिच्या प्रतिस्पर्ध्यांकडून मिळालेल्या मानवंदनेसाठी.... आफ्रिकेच्या तात्याना शूमाकरने वर्ल्ड रेकॉर्ड मोडल्यावर तिच्या अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन प्रतिस्पर्ध्यानी तिला मारलेल्या मिठीसाठी. अमेरिकेचा इसायाह ज्युविट आणि बोट्स्वानाचा नायजेल अ‍ॅमॉस ह्यांनी ८०० मीटर्समध्ये पडल्यावर खांद्यांवर हात टाकून शर्यत एकत्र पूर्ण करण्यासाठी... कतार आणि इटलीच्या स्पर्धकांनी "Can we have two golds?" असं विचारत सुवर्णपदक वाटून घेण्यासाठी. डायव्हिंग सुवर्णपदक जिंकताना विणकाम करणार्‍या टॉम डेलीच्या LGBT खेळाडूंसाठीच्या संदेशासाठी.

टोक्योच्या हजारो स्वयंसेवकांनी, वैद्यकीय कर्मचार्‍यांनी, सुरक्षा यंत्रणेनी केलेल्या कष्टांमुळे आम्हाला फ्रान्स आणि रशियन ऑलिम्पिक कमिटीमधली चित्तथरारक ह्या एकाच विशेषणानी वर्णन करता येईल अशी व्हॉलिबॉल फायनल दिली. डायव्हर्सचे श्वास रोखून धरायला लावणारे परफॉर्मन्सेस दिले, टेबल-टेनिसचं परमोच्च प्रात्यक्षिक म्हणता येईल अशी मा लॉन्ग आणि फॅन झेंगडॉन्गची लढत दिली. टोक्यो - तुमच्यामुळे पोलिश अ‍ॅलेक्झान्ड्रा मिरोस्लाव्ह ५० फुटाची भिंत ६.८४ सेकंदांत लंघून गेली. तुमच्यामुळे Race of the century म्हणता येईल अश्या ४०० मीटर्स अडथळ्यांच्या शर्यतीत नॉर्वेच्या कर्स्टन वॉरहोल्मने ४६ सेकंदांचं अशक्य वाटणारं glass ceiling तोडलं. मोमिजी निशिया आणि रेयसा लील ह्या १३ वर्षीय चिमुरड्यांनी केवळ ऑलिम्पिक मेडल्स नाही तर जगभरातल्या क्रीडारसिकांची मनं जिंकली ती तुमच्यामुळे. ऑस्ट्रेलियन अ‍ॅन्ड्र्यू होय ह्यांनी दाखवून दिलं की वयाच्या ६२ व्या वर्षी सुद्धा ऑलिम्पिक पदक जिंकता येतं.

टोक्यो - गेल्या १७ दिवसांतल्या किती किती संस्मरणीय आणि नेत्रदीपक गोष्टींसाठी तुमचे धन्यवाद मानायचे? केलेब ड्रेझेल आणि एमा मॅकिओनच्या जलतरणातल्या विस्मयकारक कामगिरीसाठी..... लाशा तलाकझादेच्या तब्बल २६५ किलो वजनी क्लीन अँड जर्क साठी तुमचे आभार. एक भारतीय म्हणून विशेष धन्यवाद - विजयात हात जोडून विनम्र आणि पराभवात धीरोदात्त असणारे आमचे सिंधू, बजरंग पूनिया, मेरी कोम, अदिती अशोक आणि मीराबाई चानू जगाला दाखवण्यासाठी आणि विश्व अ‍ॅथलेटिक्सच्या आकाशात भारताचा भाला फेकणार्‍या नीरज चोप्राच्या उदयासाठी. १७ दिवस आम्हाला खिळवून ठेवणारे अनेक क्षण देण्यासाठी. जगभरातला प्रत्येक क्रीडारसिक तुमचा त्याग आणि तुमच्या मनाच्या मोठेपणासाठी कायम ऋणी राहील.

आरिगातो टोक्यो - सायोनारा!

जे.पी.मॉर्गन

क्रीडाप्रकटनविचारसद्भावनाआस्वादलेखविरंगुळा

प्रतिक्रिया

चौकस२१२'s picture

9 Aug 2021 - 5:47 am | चौकस२१२

कळविण्यास आनंद होतो कि एकूण २०० + देशातून फक्त २.५ कोटी लोकसंखय असलेल्या ऑस्ट्रेल्या ने ४६ पदके मिळवून ६ वे स्थान पटकावले
तुलना करायची तर कानडा ची लोकसंख्या ३ कोटी च्या आसपास असून त्यांनी एकूण २४ पदके मिळवली
जपानचे पण अभिनंदन

शानबा५१२'s picture

14 Aug 2021 - 3:40 pm | शानबा५१२

विशिष्ट हवामन, तापमान ह्या गोष्टींचा परीणाम एका विशिष्ट देशाच्या खेळाडुच्या शरीरयष्टीवर व परीणामी त्याच्या खेळावर होतो. कमी लोकसंख्या असलेल्या देशाने जास्त पदके पटकवणे म्हणजे तिथे हवामान, तापमान अनुकुल आहे की खेळाला जास्त प्राधान्य दीले जाते? की तुम्ही लोकसंख्या जास्त म्हणजे जिंकलेली पदके जास्त असा अनुमान लावताय?

सोत्रि's picture

9 Aug 2021 - 6:14 am | सोत्रि

आरिगातोऽ टोक्यो, जे.पी. नी मो आरिगातोऽ!

- (जपानप्रेमी) そかじ

कॉमी's picture

9 Aug 2021 - 7:20 am | कॉमी

खरंच, आमच्यासारख्या क्रीडाविष्यात अरसिक माणसाला सुद्धा उत्सुकतेने पाहायला लावणारे हे ऑलिंपिक प्रकरण जबर होते.

होमो सेपियन ते माणूस- अतिशय मार्मिक...

अनिरुद्ध.वैद्य's picture

9 Aug 2021 - 11:56 am | अनिरुद्ध.वैद्य

ऑलिम्पिक मस्तच झाले!

तुषार काळभोर's picture

9 Aug 2021 - 12:10 pm | तुषार काळभोर

यंदाच्या स्पर्धांतील कित्येक क्षण अंगावर रोमांच उभे करणारे होते.
तितकाच रोमांचक लेख.

भीमराव's picture

9 Aug 2021 - 1:42 pm | भीमराव

अवघं विश्व ज्या वेळी मनुष्य जात म्हणून एका दिलाने खेळलं त्यावेळी आमचे काही नतद्रष्ट विचारत होते कौन जात.
लवलीना कौन जात, मिराबाई कौन जात, बजरंग कौन जात, सिंधू कौन जात, निरज चोपडा कौन जात.
संघी है का भक्त है का सेक्युलर हे सुद्धा होतंच.
लाज वाटली बघुन.

पराग१२२६३'s picture

9 Aug 2021 - 2:01 pm | पराग१२२६३

मस्त लेख. ऑलिंपिक अगदी लहानपणापासून माझ्या आवडीचा सोहळा आहे.

गॉडजिला's picture

9 Aug 2021 - 3:35 pm | गॉडजिला

अनाता नी दोई, मॉर्गन सान. आरिगातो टोक्यो...
- कायजु गोजिरा

Bhakti's picture

9 Aug 2021 - 5:29 pm | Bhakti

सुंदर !
सगळं ऑलिंपिक पुन्हा तराळल! सुरूवात रोचक होती.

मित्रहो's picture

10 Aug 2021 - 10:30 pm | मित्रहो

ऑलिंपिक मुळे जगात किती तरी वेगळ्या प्रकारचे खेळ आहेत याची माहिती मिळते. या ऑलिंपिकचे आणखीन एक वैशिष्ट म्हणजे काही महारथी ज्यांनी ऑलिंपिक गाजवले ते आता रिटायर्ड झाले. यात जे तयार होतील ते नंतर महारथी होतील.
यावर्षी भारतात भालाफेक या खेळाने उत्सुकता वाढविली. मग समजले की भाल्यात बदल केल्यामुळे जुन्या भाल्याने केलेला रेकॉर्ड १०४+मीटर आता कुणीही कधीही मोडू शकनार नाही. हा रेकॉर्ड नीरज चोप्राच्या सध्याच्या कोचच्या नावावर आहे. या व्यतिरीक्त फेंसींग, गोल्फ, ४x४०० मीटर रिले रेस, थाळीफेक या खेळात सुद्धा भारताने चांगली कामगिरी केली.