मी आणि कानयंत्र..

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
2 Aug 2021 - 10:39 am

अखेर मी म्हातारी झाले. वय चोरुन बघितलं पण शरीर ऐकेना. अनेक वस्तू मला ॲक्सेसरीज् म्हणून गरजेच्या वाटू लागल्या. मला ऐकू येईनासं झालं. घरातला टीव्ही मी खूप मोठ्या आवाजात लावून बसू लागले. त्या आवाजाचा घरच्यांना त्रास होऊ लागला. गेले दीड वर्ष मुलाचं वर्क फ्रॉम होम होतं आणि नातवाची ऑनलाईन शाळा होती. मी आणि सूनबाई तोंडात मिठाची गुळणी घेऊन बसायचो. टीव्ही वरील कोरोनाच्या आणि हे सरकार कोसळणार की पाच वर्षे टिकणार, याबद्दलच्या बातम्या कितीदा ऐकायच्या? मग मी टीव्हीवर मनोरंजक कार्यक्रम बघायची. मला ऐकू येत नाही म्हणून आवाज मोठा करायची. संवादच ऐकू आले नाहीत तर सिरीयल ची मजा ती काय हो? तेव्हा मला तिघांकडून (मुलगा,नातू, आणि सून आडून आडून) सूचना आली की, तुम्हांला कमी ऐकू येतंय.प्राॅब्लेम्स व्हायला लागलेत. तुम्ही हियरिंग एड बसवून घ्या. आणि हल्ली कशी सोयीची, लहान आकाराची, जणू अदृश्य अशी कर्णयंत्रे उपलब्ध आहेत वगैरे.

मला ते पटलंही. कमी ऐकू आल्यामुळे अनेक तोटे होतात. कोणतंही संभाषण, कार्यक्रम, मैफिल आपण एन्जाॅय करु शकत नाही. घरी सगळे जमले आणि गप्पा मारायला लागले मला नीट कळत नाही. मी अंदाजाने, अर्थात अनेकदा चुकीच्या ठिकाणी हसते. विपरित रिस्पाॅन्स देते. आपल्याला ऐकू न आल्याने इतरांचे गैरसमज होतात. आपलेही इतरांबद्दल होतात. अनेकदा आपण विनोदाचा विषय होतो. आपल्याशी बोलताना एक वाक्य रिपीट करावं लागतं म्हणून सगळे आपल्याशी बोलायचं टाळतात.
तेव्हा नीट ,स्वच्छ ऐकू हे आलंच पाहिजे......पण त्यासाठी हियरिंग एड?

मला माझ्या चुलत सासऱ्यांची आठवण झाली. त्यांनी कानयंत्र घेतले होते. म्हणजे त्यांच्या मुलामुलींनी ते बळेच आणून दिले होते. पण ते ते सारखं काढूनच कुठंतरी ठेवायचे आणि परत लावायला विसरायचे. विचारलं तर म्हणायचे,"त्यातून सारखा खूप मोठं वादळ चालू असल्यासारखा आवाज येतो गं. आणि मधेच अचानक कानठळ्या बसतात. त्यापेक्षा न लावलेलंच बरं."
अर्थात तो जुना काळ होता. त्यावेळी कानयंत्र आजच्यासारखी सुधारलेली नव्हती.

अशा कितीतरी वस्तू घरोघरी पडून असतात. आता माझंच उदाहरण घ्या ना! मला कंबरदुखीचा त्रास आहे. म्हणून मी वेळोवेळी मणक्यांना सपोर्ट करणारे असंख्य पट्टे आणले. इतके पट्टे आणायचं कारण माझं आकारमान वाढत गेलं आणि जुने पट्टे बसेनात, म्हणून नवे पट्टे आणावे लागले. आज घरात ते पडलेत. आणि "राया माझ्या कमरेला कमरपट्टा आणा " अशी माझी अवस्था आहे. आज माझी कंबरदुखी जोरात, तर घरात मात्र कमरेला बसणारा पट्टा नाही. नातवाकडून कंबर यथाशक्य तुडवून घेणे हा माझ्या आजीच्या वेळचा उपाय उपयुक्त ठरतो. हीच गोष्ट मानेच्या पट्ट्यांची. ऑफिसात अनेक वर्षे लिखाणाचे काम केले. त्यामुळे मानेच्या मणक्यांवर ताण आला स्पाॅंडिलायटिस झाला. मानेला पट्टा लागला. शेप वाकडातिकडा झाला. मानेचा नाही. पट्ट्याचा. मळला होता ना म्हणून धुतला. मग नवाच आणला. मग बदली झाली. बदलीच्या गावच्या डॉक्टर ने एकदम नाॅर्मल डॉक्टर प्रमाणे आधीची औषधं आणि आधीचा पट्टा डिस्कार्ड केला. मग काय मानेला नव्या टाईपचा पट्टा आणला. एकूण मानेचे पट्टेही चार झाले. ते पडून आहेत.

माझ्या मुलानं पूर्वी एकदा त्याच्या स्वतःसाठी मोठ्या हौसेने चष्म्याऐवजी लेन्सेस आणल्या. यंग दिसण्यासाठी बहुधा! किंवा कुणीतरी"अंकल"अशी हाक मारली असेल. त्यानं रोज थोडे दिवस त्या रोज काढणे ,घालणे असे उद्योग केले. सुरुवातीला डोळ्यात बोटे घालत, घळाघळा अश्रुपात करत तो तास तास बसलेला असे. नंतर कंटाळला. आता काहीही केले तरी निर्विवाद अंकलच दिसू लागल्यावर त्याने तो नाद सोडला. त्या उरलेल्या लेन्स पडून राहून एक्सपायर झाल्या.

माझ्या सासऱ्यांचा उजवा पाय गुडघ्यापासून टाचेपर्यंत खूप दुखायचा.नीट आठवत नाही पण त्यांनी पायासाठी एक कसलासा सांगाडा बनवून घेतला होता. पण तोही पडूनच राहिला. ते दुखऱ्या पायाने लंगडतच चालायचे. तो कृत्रिम सांगाडा घातला की पायजमा किंवा पॅंटचा पाय बसायचा नाही. आणि पायजम्यावरुन तो सांगाडा घालायची लाज वाटायची. पायात खोडा घालणे म्हणजे काय ते त्यांना पाहून कळायचं.
त्यानी त्यांनी कितीजणांना तो खोडा हवाय का म्हणून विचारले.
अगदी फुकट घेऊन जा असे म्हणू लागले शेवटी. पण कुणीच तयार झाला नाही. कोण घेणार? ते असं विचारायला लागले की मला खूप हसू फुटायचं.

आमच्या सासूबाईंसाठी (त्यांना सद्गति लाभली असावी अशी इच्छा), आम्ही दातांची कवळी करुन घेतली. म्हटलं, कवळी घालून सगळं नीट खाता येतं. चावता येतं. बोलणं स्पष्ट येतं. इतरांना कळतं. चेहराही सुंदर दिसतो. कवळी लावा. तर छे! आठ दिवस लावली. नंतर कायमची काढून ठेवली. म्हणाल्या,"कुठं ते काढा,घाला,धुवा,घासा,स्वच्छ करा,डबीत ठेवा, नको वाटतं." त्या शेवटपर्यंत बिनकवळीच्या राहिल्या.

मी माझ्यासाठी एका ऑप्टिशियनकडून एक चष्मा अडकवायचा "स्पेक्टसहॅंगर" की कायतरी घेतला. त्याला एक लोहचुंबक होता. तो आपल्या कुडत्याला/ ड्रेसला डावीकडे लावायचा. जी गॅप तयार होते त्यात चष्मा अडकवायचा. म्हणजे दरवेळी तो केसमध्ये , टेबलवर ठेवायला नको. पण सांगायचं म्हणजे तोही पडूनच आहे. सुरुवातीला मी हौसेने वापरला पण एके दिवशी बाथरुममध्ये विसरला. तेव्हापासून आजतागायत ठेवूनच दिला. अशा असंख्य हौसेने आणलेल्या वस्तू माझ्याकडे पडल्यात.
म्हणून विचार करतेय की मी कानयंत्र घ्यावं की न घ्यावं? आता तुमच्याशी बोलायचं असतं तर नक्कीच घेतलं असतं. पण इथं तर काय ! मी लिहायचं , तुम्ही वाचायचं. तुम्ही लिहायचं मी वाचायचं. ऐकायबियकायचा मामलाच नाही. मग घेऊ की नको?

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Aug 2021 - 12:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कानयंत्र नक्की घ्या. कुटुंबातील ज्येष्ठांच्या समस्या या वयाप्रमाने समोर येत असतात. कमी ऐकू येणे हा विसंवाद आणि कमी संवादाची नांदी असते, वादविवाद मग रक्तदाब वाढणे, चीड चीड होणे, घुसमट होणे वगैरे.

बाकी, असंख्य अशा गरजेच्या पण कालपरत्वे अडगळीत पडणा-या वस्तुंची घरात गर्दी होते. पण त्या वस्तु उपयोगाच्या नसल्या तरी डोळ्यासमोर दिसल्या पाहिजेत. चश्मे काचा, फ्रेम्स, डोळ्यातील ड्रॉप्स डबी, गोळ्यांचा बॉक्स. वगैरे.

बाकी आजी लिहिते राहा. येत राहा. तुमच्या लेखनामुळे आजुबाजूला बघता येतं आणि समजून घेता येतं. धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

2 Aug 2021 - 1:07 pm | चौथा कोनाडा

हा .... हा .... हा .... ! आजीबाई, मस्त खुसखुशीत लिहिलंय !
😄

तुमच्या कडे काय काय पडून आहे ?
१) सासऱ्याचं कानयंत्र
२) कंबरेचा पट्टा
३) मानेचा पट्टा
४) पोराच्या कॉन्टॅक्ट लेन्स
५) सासऱ्यांचा पायसांगाडा
६) सासूबाईंची दातानाची कवळी
७) स्पेक्टसहॅंगर

किती श्रीमंत आहात तुम्ही, आता काढायला हरकत नाही:
आजीबाई रुग्णसेवा केंद्र
😂

shashu's picture

2 Aug 2021 - 1:35 pm | shashu

जरूर घ्यावेत आणि ते वापरायची प्रचंड इच्छाशक्ती सुद्धा ठेवावी. वापरले (किंवा न वापरले) तर आपल्या पुढील आयुष्यात यामुळे खूप फरक पडेल.
एक अनुभव सांगतो माझा आईचे वय साधारण 71 च्या आसपास आहे. दहा बारा वर्षांपूर्वी तिला दातांचा त्रास व्हायला लागलं, कालांतराने कवळी बसवावी लागली. सुरवातीला जुळवून घ्यायला खूप त्रास झाला. पण आता गेली १० वर्ष वापरत आहे. रोज रात्री न चुकता कवळी ची निगा राखली जाते. कवळी मुळे खाल्लेले अन्न पचण्यास मदत होते. त्यामुळे पोटामुळे होणारे बाकीचे आजार सुद्धा कमी आहेत. म्हणजे गेल्या ८-१० वर्ष्यात क्वचितच डॉक्क्टर कडे जावे लागले.

या उलट वडिलांचे आहे. त्यांचे आत्ताचे वय ७४+ आहे. २००९ साली अपघातामुळे एका पायात रॉड टाकावा लागला. बरे झाल्यानंतर चालण्यास त्रास होवू नये म्हणून ट्रायपॉड स्टिक दिली. थोडे दिवस वापरली गेली व नंतर वडिलांनी तिला सोडून दिल्या मुळे धूळ खात पडली. आता असे झाले आहे कि स्टिक न वापरल्या मुळे लंगडत चालतात, चालताना त्या पायावर दाब येऊन तो दुखायला लागला आहे व अधून मधून सूज येत असते. तरी सुद्धा हट्टामुळे स्टिक वापरत नाहीत.

या बाबतीत मिपा वरील जाणकारांची मते, अनुभव उपयोगी ठरतील.

गॉडजिला's picture

2 Aug 2021 - 2:42 pm | गॉडजिला

बरेच श्रवण दोष आजकाल सहज बरे सुध्दा करता येतात...

यंत्रेही आता उत्तम आहेत. बाकि पाय कंबरदुखी साठी हलके व्यायाम करा kiat jud dai व्हिडिओ तूनळीवर बघा... मणके झिजले नसतील अपघात झाला नसेल तर बराच त्रास हलक्या व्यायामाने जादू व्हावी असा नाहीसा होतो...

टीप:- इथल्या सर्वांचे सल्ले डॉक्टर कडून परवानगी घेऊन अमलात आना

...........

अन्य प्रतिसादाच्या अनुषंगाने मूळ प्रतिसादातील टायपो दुरुस्त करीत आहोत- व्यवस्थापन

संजय पाटिल's picture

2 Aug 2021 - 9:44 pm | संजय पाटिल

लिन्क द्याल का?
तयपिन्ग करायला जमत नाही...
रच्याकने... मला पण मणक्याम्च्के व्यायाम कराचे आहेत.....

गॉडजिला's picture

2 Aug 2021 - 11:14 pm | गॉडजिला

kiat jud dai workout असे टाईप करा... तुमची खरडवही बघून टायपिंग येतं नाही असे वाटत नाही

सौन्दर्य's picture

2 Aug 2021 - 11:21 pm | सौन्दर्य

सायन्स फारच पुढे गेले आहे, श्रावण यंत्रांचे आकार, किंमत बऱ्यापैकी कमी झाली आहे. त्यात ऍडजस्टमेंट्स सुध्दा करता येतात. क्वालिटी ऑफ लाईफ नक्कीच सुधारते. मला खेळायची बऱ्यापैकी आवड होती, अगदी ५५ वर्षांपर्यंत व्हॉलिबॉल खेळत होतो. पण तरुणपणी पहिल्यांदा चष्मा लागला तेव्हा खेळायला जमणार नाही म्हणून घालायला अळंटळं करू लागलो, पण जेव्हा अगदीच नाईलाज झाला तेव्हा चष्मा बनवून वापरायला लागलो व त्यातून असं काही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागलं की आत्तापर्यन्त चष्मा का वापरला नाही असे वाटून गेले. तेव्हा श्रवणयंत्र नक्कीच वापरा.

कियातजुडई म्हणजेच kiat jud dai असे टाईप करून तूनळी वर सर्च करावे...

...........

या प्रतिसादाच्या अनुषंगाने मूळ प्रतिसादातील टायपो दुरुस्त करीत आहोत- व्यवस्थापन

एकदम हलकाफुलका खुसखुशीत लेख, आवडला.

टर्मीनेटर's picture

3 Aug 2021 - 2:47 pm | टर्मीनेटर

आजीबाई, नेहमीप्रमाणेच छान लेखन.
वर अनेकांनी सांगितल्या प्रमाणे मी देखील तुम्ही श्रवणयंत्र घ्यावे ह्याच मताचा आहे.

माझ्या वडलांना गेल्या दोन वर्षांपासून खूप कमी ऐकायला येऊ लागले. त्यांनी आधी टाळाटाळ केली पण त्यांच्या वाढदिवशी आम्ही कुटुंबियांनी त्यांना एक चांगले श्रवणयंत्र भेट म्हणुन दिले, परंतु ते लाऊनही त्यांना नीट ऐकू येत नव्हते, त्यामुळे आधी खात्री करुन घ्या असे सुचविन.
वडिलांना कमी ऐकू येण्याचा मोठा दुष्परिणाम म्हणजे घरच्या बाकी मंडळींना त्यांच्याशी मोठ्याने बोलण्याची सवय लागली आणि सगळे इतरांशीही मोठ्याने बोलू लागले आहेत हे फार त्रासदायक झालंय.

मदनबाण's picture

3 Aug 2021 - 9:45 pm | मदनबाण

आजी... अगदी चकली सारखा कुरकुरीत लेख पाडला...सॉरी लिहला आहेस ! :)
इतक्या गोष्टी घेउन आणि वापरुन पाहिल्यास मग त्या श्रवण यंत्राने कुणाचं घोडं मारल हाय ? ;)
तुला ऐकायला आलं नाही ना तर उगाच कोणी आपल्या विरुद्ध बोलतयं असा भास व्हायचा ! [ यंत्र वापरलसं तर कळेल तरी... तसही स्त्रियांना शंका-कुशंका फार ! ] :)))

एव्हढे सगळे त्रासेस असुन देखील तू इतक मस्त कसं लिहतेस बरं ? :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Din mahine sal gujarte jayenge... :- Avtaar