चंद्राने केलेलं मंगळाचं पिधान!

Primary tabs

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
18 Apr 2021 - 6:49 pm

सर्वांना नमस्कार. सर्व जण ठीक असतील अशी आशा करतो. काल १७ एप्रिलला संध्याकाळी आकाशामध्ये चंद्राने केलेलं मंगळाचं सुंदर पिधान बघता आलं. काही काळ मंगळ चंद्राच्या पलीकडे लपला होता आणि नंतर समोर आला. म्हणजेच हे चंद्राने केलेलं मंगळाचं पिधान- अर्थात एक प्रकारचं ग्रहण होतं.

सूर्यास्ताच्या आधीच मंगळ चंद्राच्या पलीकडे गेलेला होता. ठीक ७:२१ ला चंद्राच्या बिंबापलीकडून मंगळ परत समोर आला. माझ्या टेलिस्कोपमधून ह्याचे फोटोज व व्हिडिओज घेता आले. नुसत्या डोळ्यांनीही हे दृश्य बघता आलं. पण चंद्र मंगळाहून फार जास्त तेजस्वी असल्यामुळे नुसत्या डोळ्यांनी तो दिसण्यासाठी आणखी जास्त वेळ लागला व चंद्रापासून थोडा दूर आल्यानंतरच मंगळ दिसला. मंगळ बाहेर येताना टेलिस्कोपमधून घेतलेला व्हिडिओ इथे बघता येईल.

काल पंचमीची कोर होती आणि चंद्र व मंगळ वृषभ राशीमध्ये व अग्नी ता-यापासून दक्षिणेला साधारण साडेपाच अंश म्हणजे आपण बघताना हात पूर्ण लांब केल्यास हाताची तीन बोटे मावतील इतक्या अंतरावर होते. ह्यावेळी मृग नक्षत्र, ब्रह्महृदय तारकासमूह, रोहिणी नक्षत्र, कृत्तिका नक्षत्र, व्याध, पुनर्वसू नक्षत्र, प्रश्वा, सप्तर्षी आदि ठळक तारे व तारकासमूह सहजपणे बघता आले. चंद्र आपल्यापासून सुमारे ३ लाख ८४ हजार किलोमीटर अंतरावर आहे आणि मंगळ ह्यावेळी सुमारे २९ कोटी किलोमीटर अंतरावर आहे. तरीही ह्या दोघांसह पृथ्वीचे एका रेषेमध्ये येणे आपण नुसत्या डोळ्यांनी बघू शकतो. आपले छोटेसे डोळेही अतिशय दूर अंतरावरची अशी अद्भुत दृश्यं बघू शकतात.

अशा अनेक खगोलीय दृश्यांना बघण्यासाठी आपले डोळे "उघडे" मात्र असावे लागतात. आपण जवळ जवळ नेहमी आपल्या समस्या व अहंकारामध्ये अडकलेलो असतो. पण जेव्हा आपण आकाशातले असे सुंदर नजारे व इतक्या विराट अंतरावरचे दृश्य किंवा आपल्याहून लाख- कोटी पट मोठे तारे किंवा आपल्या सूर्यापासून हजारो प्रकाशवर्ष दूर अंतरावरचे तारे बघतो तेव्हा आपल्याला आपल्या खुजेपणाची जाणीव होते! आपली पृथ्वीच इतकी नगण्य आहे की आपली तर गणतीच होऊ शकत नाही! आणि त्या संदर्भात मग आपला अहंकार किती व्यर्थ आणि आपल्या समस्यांचं स्थान किती नगण्य ही जाणीव होते. आणि त्याबरोबर हेही जाणावतं की, आपले इतके चिमुकले डोळेही ह्या विराट रंगमंचावरची अशी दृश्य बघू शकतात. हजारो प्रकाश वर्ष लांब अंतरावरचे तारे व आकाशगंगा आपल्या चिमुकल्या डोळ्यांनी बघता येणं हा मोठाच चमत्कार नाही का?

कालच्या घटनेसंदर्भात अजून एक गोष्ट महत्त्वाची ही की, ती बघण्यासाठी ज्या प्रकारे चंद्र- मंगळ एका रेषेत येणं आवश्यक होतं, अगदी तसंच बघणारा दर्शकही आवश्यक होता. अशा घटनेच्या निरीक्षणामध्ये बघणारा दृष्टा महत्त्वाचा असतो. जेव्हा सजग बघणारा आणि दृश्य ह्यांची सांगड असेल तेव्हाच ही घटना बघता येऊ‌ शकते. आणि जिथे आपण सजग होऊन बघत नाही, तिथे आपण छोट्या गोष्टीही बघू शकत नाही. आणि त्याच अनुषंगाने कोणतीही गोष्ट बघणे किंवा न बघणे हे आपल्यावरच अवलंबून असतं. म्हणजे जेव्हा कोणी फूटबॉल खेळत असतो, तेव्हा त्याच्या पायांना रक्त आलं तरी वेदना जाणवत नाही, कारण पायांकडे लक्ष म्हणजे ध्यान दिलंच जात नसतं आणि ध्यान तर खेळण्यामध्ये असतं. जेव्हा तो खेळाडू‌ घरी जाईल व पायांकडे त्याचं लक्ष जाईल, तेव्हाच त्याला वेदनेची जाणीव होईल. म्हणून जर आपण योग्य प्रकारे सजग होऊन बघू शकलो, तर अवांछित गोष्टींवरचं आपलं लक्ष आपण काढून घेऊ शकतो. आणि जेव्हा आपण बघणं बंद करतो, तेव्हा ते दृश्य आपल्यासाठी उरत नाही. जर आपण दु:ख, त्रास, अडचणी ह्यावरून आपलं ध्यान काढलं तर अशाही दृश्यांपासून आपण मुक्त होऊ शकतो.

-निरंजन वेलणकर (niranjanwelankar@gmail.com, ०९४२२१०८३७६). २१ डिसेंबर २०२० रोजीच्या गुरू- शनी युतीचे फोटोज, व्हिडिओ व त्यासंदर्भातला अनुभव इथे वाचता येईल: http://niranjan-vichar.blogspot.com/2020/12/blog-post.html

भूगोलविज्ञानआस्वादअनुभव

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

18 Apr 2021 - 6:55 pm | मुक्त विहारि

तुम्हाला, ग्रहण वगैरे बघायची आवड दिसते...

सतिश गावडे's picture

18 Apr 2021 - 7:58 pm | सतिश गावडे

सजग बघणार्‍याकडेही दुर्बिणही हवी ना :)

मुक्त विहारि's picture

18 Apr 2021 - 8:17 pm | मुक्त विहारि

आवड पण हवी

आमच्या ओळखीचे एक सद्गृहस्थ, ग्रहण बघण्यासाठी, जगांत कुठेही जातात... ग्रहण जर ऑस्ट्रेलिया मध्ये असेल तर, तिथे जातात...

खगोलशास्त्र, हा त्यांचा आवडता विषय आहे...

सतिश गावडे's picture

18 Apr 2021 - 8:28 pm | सतिश गावडे

ज्याला आकाशनिरीक्षणाची आवडच नाही तो आकाशनिरीक्षणासाठी लागणारी दुर्बिण घेईलच कशाला? :)

कंजूस's picture

19 Apr 2021 - 10:59 am | कंजूस

तीन कामांना उपयोगी पडते. पक्षी,आकाशदर्शन आणि हिल स्टेशनला. न्यायला आटोपशीर.
8x40 साइजची ओलिम्पस.

मुक्त विहारि's picture

19 Apr 2021 - 11:31 am | मुक्त विहारि

तुझे बरोबर आहे ...

मदनबाण's picture

18 Apr 2021 - 8:05 pm | मदनबाण
प्रचेतस's picture

18 Apr 2021 - 8:35 pm | प्रचेतस

फोटो एकदम छान आलेत.

फोटो आणि व्हिडिओ छान! सुंदर माहिती.
कायप्पावर या घटनेचा एक खुपचं स्पष्टपणे दिसणारा व्हिडिओ फिरतोय,खुपचं जबरदस्त आहे.

चौकटराजा's picture

18 Apr 2021 - 10:15 pm | चौकटराजा

तुमचा ब्लॉग वाचला व ते विडीओ ही पाहिले ! प्रचंड आभारी आहे ! शनि व गुरु एकाच वेळी इतक्याजवळ (???? ) पाहिल्यामुळे आनद झाला !

गॉडजिला's picture

18 Apr 2021 - 11:23 pm | गॉडजिला

किप इट अप

तुषार काळभोर's picture

19 Apr 2021 - 9:02 am | तुषार काळभोर

पिधानाचे फोटो काढण्याची तांत्रिक माहिती वाचायला आवडेल. कॅमेरा, सेटिंग, लेन्स, इत्यादी.

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Apr 2021 - 9:17 am | ज्ञानोबाचे पैजार

पिधानपुराण आवडले, फोटो आणि व्हिडिओ ही छान आहेत
पैजारबुवा,

गॉडजिला's picture

19 Apr 2021 - 11:47 am | गॉडजिला

जेव्हा सजग बघणारा आणि दृश्य ह्यांची सांगड असेल तेव्हाच ही घटना बघता येऊ‌ शकते. आणि जिथे आपण सजग होऊन बघत नाही, तिथे आपण छोट्या गोष्टीही बघू शकत नाही. आणि त्याच अनुषंगाने कोणतीही गोष्ट बघणे किंवा न बघणे हे आपल्यावरच अवलंबून असतं. म्हणजे जेव्हा कोणी फूटबॉल खेळत असतो, तेव्हा त्याच्या पायांना रक्त आलं तरी वेदना जाणवत नाही, कारण पायांकडे लक्ष म्हणजे ध्यान दिलंच जात नसतं आणि ध्यान तर खेळण्यामध्ये असतं. जेव्हा तो खेळाडू‌ घरी जाईल व पायांकडे त्याचं लक्ष जाईल, तेव्हाच त्याला वेदनेची जाणीव होईल. म्हणून जर आपण योग्य प्रकारे सजग होऊन बघू शकलो, तर अवांछित गोष्टींवरचं आपलं लक्ष आपण काढून घेऊ शकतो. आणि जेव्हा आपण बघणं बंद करतो, तेव्हा ते दृश्य आपल्यासाठी उरत नाही. जर आपण दु:ख, त्रास, अडचणी ह्यावरून आपलं ध्यान काढलं तर अशाही दृश्यांपासून आपण मुक्त होऊ शकतो.
हे काहीतरी नवीन आहे अजुन स्पष्ट करु शकाल काय ? की हाच पॅरा परत एकदा सजग होउन बघितला तर समजुन जाइल ?

मार्गी's picture

19 Apr 2021 - 2:03 pm | मार्गी

वाचनाबद्दल व प्रतिसादांबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद!!!!! :)

@ सतीश गावडे जी, तुमचा मुद्दा बरोबरच आहे. म्हणून तर मी लिहीलं आहे की, नुसत्या डोळ्याने बघता येणा-याही खूप सुंदर आकाशस्थ गोष्टी आहेतच. तोही आकाश दर्शनातला एक मोठा भाग आहे- अगदी एक डोमेन असल्यासारखा.

@ तुषार काळभोर जी, हे फोटोज मी माझ्या सव्वाचार इंची रिफ्लेक्टर टेलिस्कोपमधून घेतले आहेत. ११४/५०० हा टेलिस्कोप आहे. २५ पट झूम व त्यामध्ये ३ पट डिजिटल झूम. मोबाईल कॅमेरा मोबाईल एडप्टरने सेट केला होता. पण मी म्हणेन प्रत्यक्ष डोळ्यांनी बघण्याची जी मजा असते व तो अनुभव जितका मोठा असतो, तितकी मजा फोटोत येत नाही! कारण बहुतेक आपले डोळे हे ५७६ मेगा पिक्सेलचे असतात ना! फोटोज/ व्हिडिओज हे केवळ ५% झलक म्हणून ठीक आहे. असो.

@ गॉडजिला जी! ह्याचा अर्थ हाच आहे की, जर एखाद्या गोष्टीवर आपली सजगता असेल, तर ती आपल्याला "दिसते." अन्यथा दिसत नाही. जर आपण गर्दीमध्ये आपल्या मुलाला शोधत असू, तर बाजूनेच गेलेला जवळचा मित्रही "दिसत"‌ नाही, कारण तिकडे लक्ष/ सजगता/ ध्यान गेलेलं नसतं. सवयीने हे लक्ष/ सजगता आपण चालू/ बंद करू शकतो. असो.

गॉडजिला's picture

19 Apr 2021 - 2:48 pm | गॉडजिला

सजगता म्हणजे फोकस काय... अच्छा. छान समजावलेत.

मला वाट्ले होते जर आपण सजग असु तर मुलाला शोधता शोधता आपला मित्रही आपल्याला दिसु शकेल व मुलगाही सापडेल वगैरे वगैरे काही असावे.

स्पष्टीकरणासाठी धन्यवाद मार्गीजी.

ओह!
मला वाटलं की कॅमेरा ट्रायपॉड्ला लावून, एखादी टेलीफोटो लेन्स वापरून काढलेत.

कारण बहुतेक आपले डोळे हे ५७६ मेगा पिक्सेलचे असतात ना!
>> शिवाय फोकस, डायनॅमिक रेंज, ऑटो-अ‍ॅपर्चर हे सगळं (सध्यातरी) कॅमेर्‍यापेक्षा भारी आहे.