फिरुनी नवी जन्मेन मी..........

Primary tabs

Jayagandha Bhatkhande's picture
Jayagandha Bhat... in जनातलं, मनातलं
13 Apr 2021 - 8:45 am

फिरूनी नवी जन्मेन मी….!

समोरचं फाटक उघडलं, आणि आमची गाडी बापटांच्या बंगल्यात शिरली. प्रशस्त दिमाखदार वास्तू , जणू हसून स्वागत करत होती. खूप मोठी जागा, अन् तेवढाच मोठा बगीचा...! एप्रिल महिना असल्यानं, मोगऱ्याचा वास सर्वत्र दरवळला होता. रंगीबेरंगी फुलांची छोट्या झुडपांवरची नैसर्गिक सजावट लक्ष वेधून घेत होती. मन अगदी प्रसन्न झालं. पोर्चमध्ये गाडी थांबली, आणि आम्ही तिघं उतरलो. श्रीराम बापट, हे एक प्रतिष्ठित बांधकाम व्यवसायिक, आणि माझे पती नचिकेत साने हे यशस्वी उद्योजक..! काही महिन्यांपूर्वी पाटणकर डॉक्टरांच्या मुलाच्या लग्नात या दोघांची ओळख झाली होती. गप्पांच्या नादात डॉक्टरांनी, मागच्या आठवड्यात, बापटांच्या जुईचं स्थळ, आमच्या अभिजीतसाठी सुचवलं, आणि मी मात्र थोडी गडबडून गेले. माझ्या एकुलत्या एक मुलाचं लग्न...! मी याविषयी विचारच केला नव्हता अजून... पण देवाच्या मनात असेल तर, एखादी गोष्ट घडायला कधीकधी विलंब लागतच नाही, आणि तसंच झालं. पत्रिका जुळते हे लक्षात आल्यावर, दोन-तीन दिवसातच बापटांनी आम्हाला चहापानाला बोलावलं. मुलगी पाहण्याचा अनौपचारिक कार्यक्रम असा ठरला...
दारामध्ये दोन्ही बाजूला ठिपक्यांची रांगोळी पाहिली. सुरेख रंग भरले होते. त्यांनं मनाला एक शुभसंकेतच मिळाला. “या ना”, असा गोड आवाज आला, आणि समोर जे पाहिलं त्यांनं मी क्षणभर स्तंभित झाले. “ती” हसून स्वागत करत होती.. डाळिंबी रंगाची, सोनेरी नाजूक किनार असलेली सुंदर तलम साडी, तिच्या केतकी वर्णाच्या अंगकांतीला खुलवत होती. हातात मॅचिंग बांगड्या, कपाळावर मोठं कुंकू, डाव्या खांद्यावरून हलकेच पुढे आलेला काळ्याभोर केसांचा लांब शेपटा, त्यावर माळलेले मोगऱ्याचे गजरे, टपोऱ्या मोत्यांचा गळेसर आणि त्याच्या जोडीची लोभस कर्णफुलं..!! “सुकांत चंद्रानना पातली” माझ्या मनातला कोकिळ गात होता... जुई, खरोखरच सुंदर होती...!
तिच्या पाठोपाठ स्वागत करत, बापटांनी ह्यांना हाताला धरून घरात नेलं. हॉलमध्ये पाऊल टाकताच, जुईनं गुलाबपाणी शिंपडलं. वाळ्याचं अत्तरही लावलं. इंटिरिअर पाहताना बापटांची रसिकता कणाकणात जाणवत होती. तेवढ्यात सौ. बापटही हजर झाल्या. क्रीम कलरची प्युअर सिल्क आणि मोजके हिऱ्याचे नाजूक दागिने. करारी नजर. नुसत्या हसल्या. मितभाषी असाव्यात. माझ्या मनातला कोकिळ गप्प..!! जुईच्या बाबांनी सर्वांशी ओळख करून दिली, आणि वातावरण गप्पांच्या नादात निवळलं.
जुई मध्येच आत जाऊन तिच्या आत्याला बरोबर घेऊन आली. मला त्यांचं व्यक्तिमत्व शांत, घरंदाज, आणि आश्वासक वाटलं. “लग्न झाल्यावर तुला काय करायला आवडेल..?” मी सहज विचारलं.
तसं ती पटकन म्हणाली, "संसार"..
“अगं, तो तर होतच राहतो. पण एमबीए झाली आहेस, तर काही वेगळं करायचं मनात आहे का..?” मी.
“संसार आपोआप कसा होईल ? आपण तो मन लावून फुलवला, तरच बहरेल ना.!”
जुईनं मला निरुत्तर केलं. पण आत्यानं हसून अनुमोदन दिलं. आणि म्हणाल्या, “लहानपणापासूनच जुईला घरसंसार, स्वयंपाक, कलाकुसर, याचीच जास्त आवड आहे.”
चहाबरोबर जुईच्या हातच्या चकल्या खाताना, माझ्या ‘रसना’बाईंनी सुद्धा तिला मनोमन होकार दिला...
अभिजीतची अवस्था तर, “ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला..!” अशीच होती. दोघांनी बागेत फेरफटका मारताना, ज्या गप्पा झाल्या त्यावरून, जुईचं शिक्षण, तिची निर्णयक्षमता, बोलण्याचं धाडस, विचारांमधली पारदर्शकता, याच्यावर तो खूश होता. आम्ही दोघं तर जुईवर फिदा होतोच. त्यामुळे लगेच दुसऱ्याच दिवशी बापटांना, जुईसाठी होकार कळवला. साखरपुडा फार मोठा केला नाही कारण, जून मधला मुहूर्त ठरला आणि खऱ्या अर्थानं लगीनघाई सुरू झाली.. भरपूर काळे मणी असलेलं मोठं ठसठशीत मंगळसूत्र तिनं पसंत केलं. एकंदरीतच तिची खरेदी पाहून, जुईला पारंपारिक दागिने, रेशमी साड्या यांची मनापासून आवड आहे, हे जाणवत राहिलं. “रोज वापरायला एखादं लहान मंगळसूत्र घ्या..” या दुकानदाराच्या प्रस्तावाला तिनं ठामपणे नकार दिला. तेव्हा तर मला अभिजीतचाच क्षणभर हेवा वाटला. कशाचीही तसुभरही उणीव न ठेवता, सरेपुरेपर्यंत कोडकौतुक करत, बापटांनी दृष्ट लागेल, असं कार्य करून दिलं..
आमच्या घरच्या लक्ष्मीचं पूजन विधिवत आणि समाधानानं पार पडलं. तिचा आग्रह होता म्हणून नाव मात्र मुळीच बदललं नाही. सत्यनारायण, गर्भाधान, बोडण, अशा सर्व कार्यक्रमांची जबाबदारी खरंतर माझी. पण जुईचा पुढाकार आणि उत्साह इतका प्रचंड होता, की मी हरखून गेले. पूजेची तयारी असो वा सत्यनारायणाचा प्रसाद, अगदी बोडणाची रांगोळी सुद्धा जुईला येतच होती. “आई, अहो, कुमारिका म्हणून मी नेहमी बोडणाला जात असे. माझे पाय धुतात, त्यावर स्वस्तिक काढतात. बोडण कालवताना, दूध हवं की दही..? हे फक्त मलाच विचारतात.. याचं मला फार आकर्षण होतं.” जुई म्हणाली.
खरंतर जुई नवी सून आहे, असं कधी जाणवलंच नाही. तिच्या मोहक वागण्याने, ती दुधात साखर विरघळून जावी तशी सान्यांशी एकरुप होऊन गेली. एकदा पोळ्या करत असताना, मला फोन आला. बोलणं वाढत गेलं, आणि परत येते तोवर जुईने राहिलेलं काम पूर्ण केलं होतं.
“अगं मी केलं असतं ना..” मी म्हणाले.
“पण चारच तर होत्या ना..” इति जुई.
‘कमी तिथे आम्ही’ या तत्त्वाला धरून जुईची सगळीकडे लुडबूड सुरू असे. मुलीचा सहवास नसल्यानं, मलाही ते सुख हवहवसं वाटे. परवा जुईच्या आत्यानं घरून भलंमोठं केळफूल पाठवलं. “आलं किचकट काम..!” अशा विचारानंच, मी बाजारात गेले. परत आले तर भाजी तयार...! चिरली तर इतकी सुंदर होती, की मी खाण्याआधी बघूनच खूश झाले,आणि भाजी खाऊन तर चाटच पडले. “भारी आहेस हं तू..” मी तिला हसून म्हणाले. “आत्याची कृपा. तिनंच सारं शिकवलंय.” इति जुई. संकष्टीला उकडीचे मोदक खाताना, ‘फक्कड झालेत’, असं हे उस्फूर्तपणे म्हणाले. तेव्हा, “मी सुगरण असले तरी, जुई अन्नपूर्णा आहे.” हे मी जाहीर करून टाकलं.....
परवा मात्र पोळ्या करताना, वाफेनं जुईला भाजलं. “आई गं..” म्हणत कळवळली पोर. उजव्या हाताच्या बोटांवर दोन फोड आले. मग वेणी असो, जेवण भरवणं असो, मी तिची जमेल तशी काळजी घेत होते. आणि अचानक जुई म्हणाली.. “आई, मी तुम्हाला अगं आई म्हणू..?”
“होsss. खुशाल म्हण की. त्यात काय विचारायचं गं..!” या माझ्या उत्तरावर तिनं मिठीच मारली.
“घरी आईला मम्मी म्हणताना, आई म्हणायची इच्छा राहून गेली होती.” ती गहिवरुन म्हणाली. मी हलकेच तिचे डोळे पुसले आणि तिच्या मस्तकाचं अवघ्राण केलं.
आमचं चौकोनी कुटुंब सुखसागरात डुंबत असतानाच, एक दिवस रात्री जेवताना हे मला म्हणाले, “सुमती, मला आणि अभिजीतला पुढच्या आठवड्यात जर्मनीला जावं लागणार आहे. मी येईन आठ एक दिवसात पण अभी मात्र दीड महिना तिथे राहणार आहे.”
“जुईलाही घेऊन जा..” असं मी म्हणताच, दोघांनी एका सुरात नकार दिला. कामाच्या व्यापात जुईकडे दुर्लक्ष होईल, हे त्यांचं म्हणणं, मग मलाही पटलं. हल्ली जुईनं घरातल्या कामांमध्ये मदत करणं वाढवलंय, हे मला प्रकर्षाने जाणवू लागलं. ती हुशार होतीच, पण सर्वांच्या सवयी, आवडी-निवडी जपणं, याकडे तिचं खूपच मनापासून लक्ष असे. मीही तिला पूर्ण स्वातंत्र्य दिल्यानं, आमचं ट्युनिंग परफेक्ट जमलं होतं. इतर काही घरांसारखं, सून आल्यावर वातावरण तणावपूर्ण होण्याऐवजी, मी अधिक रिलॅक्स झाले होते. या अर्थानं मी खरंच भाग्यवान होते....
ही दोघं जर्मनीला जाऊन चारच दिवस झाले होते. पण आम्हा दोघींना मात्र करमतच नव्हतं. जुईनं रात्री हट्ट केला म्हणून, तिच्या डोक्याला तेल लावून देताना ती म्हणाली, "आई.."
“हं.. बोला राणीसाहेब.” मी.
“अगं मला एका विषयावर तुझ्याशी बोलायचंय. पण रागवणार नाही असं आधी कबूल कर.”
“हो गं वेडाबाई, बोल आता..”
“आई, मी घरात आता नीट बघू शकते. त्यामुळे तुझ्याकडे थोडा वेळ उरतो. तेव्हा तुला आता काय नवीन करावसं वाटतंय ते सांग... म्हणजे तुला गाणं शिकायचंय, सिनेमे पहायचेत, विणकाम भरतकाम करायचंय, किंवा मैत्रिणींबरोबर ट्रीपला जायचंय, बागकाम करायचंय.... असं काहीतरी, की जे संसाराच्या व्यापात करायचं राहून गेलं..!”
या अचानक आलेल्या प्रश्नानं मी भांबावले खरी, पण म्हणाले,
“अगं असा कधी विचारच केला नाही. आयुष्य समोर आलं, तसं प्रामाणिकपणे फक्त जगत राहिले.”
“हो गं आई, पण मी घरात तुला पुष्कळ वेळा अनेकांच्या अडचणी पटकन सोडवताना पाहिलंय. स्वयंपाक, घरगुती औषधं, भांडणाच्या विषयांची उत्तरं, पूजापाठ, शास्त्रातले निर्णय.. खूप छान सांगतेस तू..! म्हणून सगळे खूष असतात तुझ्यावर. तुझा खूप आधार वाटतो सगळ्यांना.”
“उगाच हरभऱ्याच्या झाडावर चढवू नकोस हं मला.” मी.
“आई, मी मनापासून सांगतेय. पटतयं का बघ. आपल्या आउटहाऊस मधल्या जिममध्ये थोडी जागा आहे. तू रोज एक ठराविक वेळ, तिथे कन्सल्टेशनसाठी बसत जा. एवढ्या लोकांना फायदा होईल, की सांगता सोय नाही... आणि हो, अवघड वाटत असेल तर फी घेऊ नकोस. थोडे दिवस करून पहा. जर लोकांचा प्रतिसाद नसेल, तर कधीही बंद करता येईल ते, आणि यात नुकसानही नाहीये. पण तुला खूप समाधान आणि आनंद मात्र मिळू शकेल...
मनात थोडी शंका होती. पण मी हा प्रयोग करायचं ठरवलं, आणि जुईची कळी खुलली. तिनं उत्साहानं सगळी तयारी केली, आणि व्हॉट्सअप वगैरे वापरून, या उपक्रमाची माहिती सर्वांना कळवली सुद्धा..! पहिले दोन दिवस कोणीच आलं नाही. पण उलट सुलट प्रतिक्रियांचे फोन मात्र आले. “सुमती, सुनेनं तुला हलकेच बाजूला काढलंय हं…” असं मैत्रिणी म्हणाल्या. “आत्ताच सुनेला आवर घाल. नाहीतर डोक्यावर बसेल.” असे नातेवाईकांचे सल्ले मिळाले. पण कुणीतरी यावं, आणि ‘स्नेहसखी’ या माझ्या उपक्रमाचा श्रीगणेशा व्हावा, यासाठी मन अधीर झालं. या वयात माझा पेशन्स कमी पडतोय, याची मनात थोडी खंतही वाटली..
आज स्नेहसखी मध्ये जाताना, वाचायला काय घ्यावं, हे शोधत असतानाच घरचा फोन वाजला. धारपकाकू गप्पा मारायला येते म्हणाल्या. आम्ही मुद्दाम स्नेहसखी मध्ये बसलो. “धारपकाका गेल्यापासून बंगल्यात एकटं वाटतं गं. दोन मुलं परदेशी सुखात आहेत. पण मला तिथलं एकटेपण आवडत नाही. त्यापेक्षा इथे काय करता येईल हे विचारायला तुझ्याकडे आलेय…” असं म्हणाल्या. त्या संस्कृत मध्ये एम.ए. आहेत, म्हणून, घरात मुलांचा संस्कार वर्ग चालवा, असं सुचवलं. पहिल्या वेळी दोन मुलांपासून सुरवात झाली, तेव्हा खूप आनंदाने फोन केला त्यांनी..!
महिन्याभरातच वीस मुलांच्या दोन बॅचेस झाल्या. त्यात त्यांना आनंद आणि यश दोन्ही मिळालं..! मुलांचं रामरक्षा, अथर्वशीर्ष पठण ऐकून, संध्याकाळी थिटे आजीआजोबा त्यांच्या घरी नियमानं जाऊ लागले. मुलं कंटाळली तर, त्यांना ते गोष्टीही सांगू लागले. हळूहळू याचा सुगावा आजूबाजूच्या आजी-आजोबांना लागला, आणि सात वाजता मुलं घरी गेल्यावर, धारपकाकूंकडे ज्येष्ठांच्या गप्पांचा फड रंगू लागला... त्यात पाठक आजोबा रस्त्यात पडल्याचं निमित्त झालं आणि त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. दवाखान्यात प्लास्टर घातलं. आजी स्नेहसखीत येऊन म्हणाल्या, "एकटीनं होणार नाही गं मला. आता आजोबा घरी आले, तर कसं करायचं हा यक्षप्रश्न आहे. सेवेला पुरुष माणूस घरी ठेवायची भीती वाटते गं.” मग मी धारपकाकूंशी बोलले. “पाठक आजीआजोबा दीडएक महिना तुमच्या घरी राहायला येऊ देत का..?” असं विचारलं. त्यांनी खुशीत होकार दिला. आता काकांच्या सेवेला गडी ठेवणं सोपं गेलं. दोन महिन्यांनी घरी जाताना, त्यांनी धारपकाकूंच्या देव्हाऱ्यात पैशांचा लिफाफा ठेवला. व्यावहारिक दृष्टीने ते योग्यच होतं म्हणा, पण त्यातून माझ्या मनात वृद्धाश्रमाची संकल्पना तरळून गेली...!
नंतर लगेचच, काकूंच्या मुलाचं काही कामानिमित्त, भारतात येणं झालं. आपल्या घरी संध्याकाळी मुलं आणि म्हाता-यांचा गोंधळ, त्याला आवडला नाही. “ह्यापेक्षा आई, तूच वृद्धाश्रमात जाऊन रहा. तेच दादा आणि मला सोयीचं होईल.” असं त्राग्यानं म्हणाला. तो गेल्यावर, स्नेहसखीत येऊन त्या म्हणाल्या, “ह्यांनी कष्ट करून बांधलेल्या या वास्तूतच माझा शेवट व्हावा, अशी इच्छा आहे गं.. नाहीतर, तूच या घराचा मी गेल्यावर वापर कर..!”
काकूंचा आठ खोल्यांचा बंगला होता. थोड्या सोयी करून घेतल्या तर, तिथे काही गरजू आजी-आजोबांची सोय नक्कीच होईल. मी वृद्धाश्रमाचं सुचवल्यावर, त्या समाधानानं हसल्या. या कामात जुईच्या बाबांची मदत झाली. त्यांनी स्वखर्चाने सेवा म्हणून हे काम केलं. धारपकाकूंचा एकटेपणा तर संपलाच, पण अर्थार्जनाची थोडी सोयही झाली. आमच्याकडच्या रखमाला तिथे स्वयंपाकाचं काम मिळालं. तशी तिची ओढाताण मात्र होऊ लागली..
एक दिवस रखमा म्हणाली, “ताई तुम्ही सर्वांचे प्रश्न सोडवता. माझी पण एक अडचण आहे हो. माझ्या बहिणीचा, सिंधूचा, नवरा अपघातात गेला. सासुबाई होत्या तोवर घरची पिठाची गिरणी तिनं चालवली. पण आता त्या गेल्यावर, ती एकटी पडली आणि गावात एकट्या बाईने राहणं जमणार नाही म्हणतेय.”
थिटे आजोबांशी बोलून, मी सिंधूची रहायची सोय केली, आणि तयार पिठाचा व्यवसाय, ती इथेही करू शकेल, अशी व्यवस्था केली. तिनंही गावातलं सर्व विकून, त्या भांडवलावर या धंद्यात वर्षभरात जम बसवला. शिक्षण कमी पण कष्टाची तयारी असणाऱ्या स्त्रिया, आता सिंधू बरोबर पापड, लोणची, चटण्या, तयार पीठं बनवण्याच्या व्यवसायात जोडल्या जाऊ लागल्या. त्यात हुंडाबळी ठरलेल्या, परित्यक्ता, काही विधवा, अशाही भगिनी होत्या. एकदा एका परित्यक्तेच्या नव-यानं त्रास द्यायला सुरुवात केली. प्रकरण चिघळलं.. मलाही असा अनुभव नसल्यानं टेन्शन आलं. घरी हे व लेक थोडे नाराज झाले.."कशाला नसता व्याप वाढवलास" असं बोलले.. पण जुई माझा पुनश्च आधार झाली. वकील आणि पोलीस यांच्या मदतीने, ते प्रकरण तिच्याच साथीमुळे निस्तरलं..! असो. इथेच 'महिलाश्रमाची' कल्पना मनात डोकावून गेली..
आज जुईची मैत्रिण रेवती, स्नेहसखीत आली. तिला ऑफिसच्या कामासाठी आठ दिवस गावाला जायचं होतं. एकुलत्या एक मुलाची स्कॉलरशिपची परीक्षा होती, आणि पती परगावी नोकरीला होते. त्याला कोणाकडे ठेवायचं हा प्रश्न होता. म्हटलं आमच्या घरी ठेव. पण ती संकोचली. शिवाय इथे लहान कोणी नाही. मग सुचलं धारपकाकूंकडे त्याला पाठवावं. सगळे आजी-आजोबा लाड करतील, आणि संध्याकाळी संस्कार वर्गातल्या मुलांमध्ये त्याचा वेळही जाईल. रेवती निश्चिं त झाली. तिनंही धारपकाकूंना, लेकाला सांभाळण्याचे थोडे पैसे देऊ केले. त्यातून पाळणाघराच्या संकल्पनेने जन्म घेतला. "एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ." याचा अनुभव पावलोपावली येत होता. देवाच्या कृपेने माणसं जोडत गेली. माझी एक डॉक्टर मैत्रीण वृद्धाश्रमात नियमितपणे सेवा देऊ लागली. काही जणांनी आपली सर्व इस्टेट, वृद्धाश्रमाला देऊ करण्याचा मानस बोलून दाखवला. तसं मग ह्यांनी आणि जुईच्या बाबांनी मला 'स्नेहसखीचा' ट्रस्ट करण्याचा सल्ला दिला...
ज्येष्ठांना प्रेमाचं घर असावं, त्यांचा आत्मसन्मान टिकून रहावा, त्यांना नातवंडांचं प्रेम मिळावं, मुलांवरही चांगले संस्कार व्हावे, त्यांनाही आजी-आजोबांचं प्रेम लाभावं, 'निवृत्त पण कार्यक्षम' ज्येष्ठांना, कामासाठी संधी मिळावी, आणि त्यांचा विविध क्षेत्रातील अनुभव, इतरांच्या उपयोगास यावा, एकाकी स्त्रियांसाठी रहाण्याची आणि अर्थार्जनाची सोय व्हावी... या हेतूने आता स्नेहसखी नावाचा ट्रस्ट झाला. वकील, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनियर, अन्य व्यवसायिक, अशी अनेक मंडळी यात स्वखुषीने सामील झाली. खूप जण आवर्जून म्हणाले, की पन्नाशीनंतर किंवा स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर, उर्वरित आयुष्य कसं जगावं, याचा अनोखा मार्ग त्यांना स्नेहसखीच्या रूपाने गवसला. तसचं इथे निःशुल्क सेवा करण्याची त्यांची प्रबळ इच्छाही आहे. मग काय, रोपट्याचा वटवृक्ष व्हायला एवढ्या सगळ्यांच्या निस्वार्थी प्रेमाचं आणि कर्तृत्वाचं खतपाणी पुरेसं होतं. ‘वृद्धाश्रम-महिलाश्रम-पाळणाघर’ शक्यतो एकत्रितपणे चालवावं, असा मानस होता. कारण हे सर्व एकमेकांना पूरक उपक्रम आहेत. त्यांचं एक कुटुंब तयार होतं, आणि सर्वांनाच एकमेकांचं प्रेम लाभतं..!! याचा प्रसार इतर गावातही झाला, आणि हा "त्रिसूत्री उपक्रम" एक रोल मॉडेल बनला...
कालचक्र वेगानं पुढे जातच राहिलं. "देणाऱ्याचे हात हजार, दुबळी माझी झोळी..!" याचा अनुभव स्नेहसखी चालवताना, मला खूप वेळा आला. कुठलीही संस्था हे एक कुटुंब असतं, आणि कुटुंबात जशा आर्थिक, सामाजिक अडचणी येऊ शकतात, तसंच स्नेहसखी ट्रस्टलाही त्या आल्या. हा मार्ग एवढा सोपा नव्हता. मदतीचे हात पुढे झाले, तसा काही समाजकंटकांचा त्रासही झाला. पण तरीही स्नेहसखीचा आधारवड, सर्वांना सावली देतच राहिला. हे सगळं त्रयस्थपणे पाहताना, जुई विषयी मला नेहमीच वाटणा-या अपार कृतज्ञतेची गंगाजळी वाढतच राहिली...!!
त्यातच मला यंदाचा 'सामाजिक कृतज्ञता पुरस्कार' जाहीर झाल्याचा फोन, जुईनं घेतला.. आणि तिची भुणभुण सुरू झाली. आई सत्काराला जाताना ही साडी नेस, हे दागिने घाल, ही पर्स घे, असं भाषण दे.. एक नाही हजार सूचना तिनं दिल्या. "अगं,.. 'सारख्या सूचना' मी द्यायच्या ना तुला..? मी "सा.सू." आहे ना तुझी...? मी हसून म्हणाले..!!
"नाsssही..तू आई, आहेस गं..!! इति जुई.
"होय गं खरयं अगदी.."मी.
"आता पानांची तयारी करते", असं बोलून जुई निघून गेली..
ह्या सत्काराला मात्र, जुई विषयी प्रथम सारं काही लोकांना सांगायचं मी ठरवलं... तीच तर या उपक्रमाची प्रणेती आहे. तेव्हा तिला सोबत बोलवून, मगच हा पुरस्कार स्वीकारायचा..!! मनात आलं,...प्रत्येक आई काय करते, तर घरात सर्वांचं हवं नको बघते. आजीआजोबा असोत वा तिची नातवंड,.. या दोन्ही पिढ्यांमध्ये प्रेमाचा सेतू बांधते. मागच्या पिढीची परंपरा, आई व सासूकडून घेऊन, सुना-मुली-नातवंड यांना देते. म्हणून आपल्या संस्कृतीत आपण, "न मातुः परं दैवतम् ।" असं म्हणून तिचा गौरव करतो. जुईनं 'अहो आई' वरून मला प्रथम, "अगं आई" हे प्रमोशन दिलं.... आणि नंतर हेच मातृत्वाचं लेणं घेऊन समाजाभिमुख हो, असं सुचवलं..! समाजऋण अंशतः फेडण्याची, एक छोटी कलाच तिनं मला शिकवली. याची गुरूदक्षिणा तिला कशी द्यायची हे मात्र माझ्या समोर मोठं कोडं आहे. सान्यांच्या घरातल्या सुमतीला, जुई-अभिजितच्या आईला, स्नेहसखीच्या माध्यमातून, केवळ जुईमुळे हे विशाल मातृत्व लाभलं. सुमतीचा एक नवीन जन्मच झाला जणु...!!!
"आई, जेवायला चल ना." या जुईच्या हाकेनं माझी तंद्री भंगली. काकडी-टोमॅटो-गाजराचं सॅलेड, पुलाव, मटार बटाटा रस्सा, गव्हल्याची खीर आणि पुरी असा साधा बेत होता. पण जुई ती जुईच.. तिच्या प्रेमाच्या चवीला तोडच नाही. रात्र म्हणून थोडंच जेवण जेवले. पण आज कदाचित सर्वार्थाने तृप्त झाले.. "आई, तुझ्या आवडीचं केशर पिस्ता आईस्क्रीम आणतो गं" असं सांगत जोडगोळी पसार झाली. त्यांची वाट बघत, बागेतल्या झोपाळ्यावर बसले. मनात आलं, भगवान श्रीकृष्णाचे आभारच मानायला हवेत मी. त्यानंच तर स्वर्गातून पारिजातक वृक्ष भूतलावर आणला. त्यामुळेच की काय, "बापटांच्या घरचं हे प्राजक्ताचं फूल, सान्यांच्या अंगणी, अगदी अलगद विसावलं..!" आणि त्यानं माझं घरदार सुगंधित केलं..!! हं... काही झालं तरी जुई विषयी परवाच्या समारंभामध्ये निश्चित बोलायचं, असा विचार पक्का झाला. ती नसती तर कदाचित, स्नेहसखीच्या या वाटेवर, मी आलेच नसते..अन् हा माझा नवीन जन्म मला अनुभवायलाच मिळाला नसता...! मुलांची वाट बघताना मनातला कोकिळ गात होता.. "एकाच ह्या जन्मी जणू, फिरुनी नवी जन्मेन मी.." माझ्यापुरता तरी या गीताचा अर्थ, मनात नव्याने उमगला होता......

जयगंधा..
१०-२-२०२१.

कथालेख

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

13 Apr 2021 - 9:23 am | मुक्त विहारि

आवडले

Jayagandha Bhatkhande's picture

13 Apr 2021 - 5:29 pm | Jayagandha Bhat...

मनापासून धन्यवाद.

Jayagandha Bhatkhande's picture

13 Apr 2021 - 5:29 pm | Jayagandha Bhat...

मनापासून धन्यवाद.

प्रचेतस's picture

13 Apr 2021 - 5:44 pm | प्रचेतस

छान लिहिलंय.

फारच गोड गोड वाटतय आणि म्हणूनच खर वाटत नाहीये.सासू सून संबंध चांगले असतात हल्ली पण इतके गोड न ऐकले न बघितले . अगदी राजा राणी, राजपुत्राची गोष्ट व तो कुठल्या तरी राजकन्येला( पण लावलेली ) जिंकतो व लग्न करून सुखात राहू लागतो. इतकच सोपे आयुष्य. काही खूप वेगळे वाचायला खूप आवडेल.करीत कमी अनुवाद किंवा कुठल्या तरी पुस्तकाची माहीती असे थोडेसे तरी वेगळे.

याबद्द्ल आभार मानावेत तितके कमीच पडतील...

(काकडी-टोमॅटो-गाजराचं सॅलेड, पुलाव, मटार बटाटा रस्सा, गव्हल्याची खीर आणि पुरी असा साधा बेत मनापासुन हादडणारा)
- गॉडजिला