पणजीचं लुगडं (भाग -१)

Primary tabs

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
4 Apr 2021 - 7:41 pm

दीपाचं पहिलच बाळंतपण. अमेरिकेमध्ये लीगल असुनही जेन्डर रिव्हील न करण्याचं जोडप्यानं ठरवलं होतं. तेव्हा भारतात सगळ्यांची पेढा की बर्फी याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. मऊ मऊ कापडात गुंडाळलेला इवलासा जीव टुकू टुकू आईबाबांना पाहत होता.. संदीपने कळवल.. ”बर्फी झाली हो..”
रजनीकाकूंनी लगेच देवासमोर बर्फीचा पुडा ठेवला. अशोककाकांनी पेढा आणि बर्फी हे दोन्ही पुडे आणून ठेवले होते. ”मुलीच्या पहिल्या बाळाचा उत्साह काही वेगळाच अनुभव देतो”, अशोककाका म्हणाले.
”त्यात आज मार्गशीष अष्टमीही आहे, चांगला योग आला. अगदी देवीनेच दीपाला आशिष दिलाय.” रजनीकाकुंच्या आनंदाला या मुहुर्तामुळे मनात चार चांद लागले होते.
दीपाजवळ सासू बाळंतीणीचं सगळ करायला जवळच होत्या. आई जवळ असती तर... पहिलटकरीन दीपाला आईंची तीव्र आठवण यायची.
आज बाळ चार महिन्यांचे झाले. पण महिन्यातून एकदा तरी अतीच रडायचं, रात्र रात्र शांत करण्यात जायची... दीपाच काळीज पिळवटून निघायचं. ”आई अग तिचं रडणं पाहून मीच रडायला लागते. काल पुन्हा रडली, शांतच होईना.”दीपा आईला सांगत होती .
“काल आम्हीच खुष होतो की आज अष्टमी .. बाळ चार महिन्यांचं झालं, होईल शांत. काळजी करू नको.”रजनी ताई मुलीला धीर देत होत्या.
पुढच्या महिन्यांतही दीपाचा परत बाळ रडण्याचा फोन यायचा. रजनी ताईंनी देवासमोर उगा कसलासा भाग बांधून ठेवला... “वेडीच आहेस,“ अशोकाका म्हणाले. “असू द्या हो ..आपल्या मनाची शांती”, रजनीकाकू म्हणाल्या.
विभा...भावविभोर डोळ्यांची प्रभा लाभलेली विभा. दीपा-संदीपने त्यांच्या छकुलीला दहाव्या वाढदिवसानिमित्त भारतात पहिल्यांदा न्यायचं ठरवलं होतं. विभा खूपच खुश होती... “मम्मा मला तुझं गाव पाहायचंय...नानीला भेटायचंय , तीन वर्षांपूर्वी किती फन केला आपण दिवाळीला.” “हो हो आता नुसती धमाल करुया तीन महिने.”
दीपा-संदीप-विभा असा त्रिकोण पुण्यात पोहचले. सगळे पाहुणे, विभाचे नाना –नानी, आजी- आजोबा, विभाचे बिल्डींगमधले नवे मित्र सगळे विभाच्या दहाव्या वाढदिवसाला एकत्र आले होते..धमाल चालू होती..पार्टी संपली. विभा गिफ्टस पाहत होती..रजनी काकू आल्या. “विभू बच्चा ,झोप की आता” “नानी ..उद्या तू मला गावाकडे न्यायचं म्हणजे न्यायचं ..मला माझ्या मम्माचं गाव पाहायचं.” विभा नानीच्या गळ्यात हाताच्या फुलांचे झुले घालून हट्ट करीत होती. ”नेणार राजा, लवकर नेणार , झोप पाहू लवकर.”
दुसऱ्या दिवशी “नानी कुठय” म्हणत विभा घरभर तिला शोधू लागली,तिला गावाकडे जायची चातकासारखी उत्सुकता लागली होती. “नानी आवरते मी ,मग आपण जावूया गावाकडे” “विभा आग मम्माला थोड काम आहे,तुला एकटीला करमायचं नाही तू नन्तर मम्माबरोबर ये” रजनी काकू तिला समजावत होत्या.मम्मापण तिला समजावयाला लागली ,तशी हुशार असलेल्या विभाने आपले अस्त्र काढत मोठ मोठ्याने रडायला सुरुवात केली ,लेकीच्या डोळ्यात एकही अश्रू पाहू न शकणारा संदीप म्हणाला”आवर बेटा लवकर तुला आणि नाना –नानीला गावी सोडवून येतो”...रागावलेल्या दीपाला नजरेनच समीरने शांत राहायला सांगितलं.
येह्ह्ह...विमानासारखी उडत विभा आवरायला लागली. “बघ विभा तुला मुळीच करमणार नाही ,आपण गेलो असतो पिल्लू नंतर” दीपा बोलत होती.. “मम्मा तू बस इथेच ..मी तर फन करणार..हो ना नानी”विभा आईला वाकुल्या दाखवत होती. “लवकर ये ग काम आटपून “रजनी काकू लेकीला म्हणाल्या.
सुसाट गाडीमध्ये विभा खूपच खुश होती...मधेच खिडकीतून हात बाहेर काढत हवा पकडत होती.विभाला गावी पोहचवून “हट्ट नाही ह करायचा” अस म्हणून पुन्हा पुण्याला परत गेला.
विभा मोठा वाडा पाहत उड्या मारत होती...सकाळी लवकर उठायचं नानाजीबरोबर गाईचे दुध काढायचे..नानी बरोबर सडा रांगोळी करायची..रांगोळी काढत विभा तासान तास बसायची.. “अगदी चार दिवसांत रमली आहे हो पोर ,वाताच नाही की,ही परदेशातून इथे आलीये ..इथलीच आहे असे वाटतंय” रजनी काकू म्हणाल्या ,”आपल्या पोरीचे संस्कार आहेत तिच्यावर” अशोक काकांना कौतुकाने भरून आले.
अशोक काका देवपूजा करीत होते.आता रोजच्या सवयीप्रमाणे विभा फुले घेऊन आली. “नाना मी आज पूजा करू?” .... “मुली पूजा नाही करत बेटा.” विभाने आपले अस्त्र बाहेर काढत मोठ्याने रडायला सुरुवात केली. . “अहो लहान आहे ती..काही नाही राग येणार तुमच्या देवाला ,करू द्या तिला मदत.” रजनी काकू थोड्या रागातच बोलल्या. “बर ताम्ह्नातल्या देवांवर पाणी ओतत त्यांना स्नान घाल “अशोककाका विभाला म्हणाले.. विभा मनोभावे पूजा करू लागली.एक एक देवा नाना सांगतील तिथे मांडू लागली.तेवढ्यात हे काय अस मनाशी म्हणत एका कापडात बांधलेली पुरचुंडी उघडली...त्यातला रुपया हातात घेतला...सोसात्याचा वारा सुटून खिडक्या वाजू लागल्या.. “नाना हा कॉईन का ठेवला इथे?” तो रुपया नाना समोर नाचवत म्हणाली. “देवाचा आहे असा घेऊ नये आण इकडे” विभा रुपया घेऊन उंदरासारखी सुर्रकन पळून गेली.पळत पळत कपाटामागे लपली.अशोककाकांना नाहीतरी अश गोष्टी अंधश्रद्धा वाटायच्या तेव्हा या प्रसंगाकडे त्यांनी दुर्लक्ष केले.
विभा हळूच बाहेर आली आणि आता तिने ते जुन्या काळातल लाकडांच कपाट उघडल.. नानीच्या साड्या व्यवस्थित ठेवल्या होत्या ..विभाने नानीचा ओरडा नको म्हणून धप्पकन कपाट पुन्हा लावल..तोच कपाटावरून एक रेशमी फडताळ खाली पडलं.विभाने खजिना सापडावा तस ..त्याच्यावरली धूळ झटकत त्या बांधलेल्या गाठी सोडू लागली.गाठी अगदी शुष्क झाल्या होत्या,तरी विभा सराव जोर लावत त्या उघडत होती.चार..तीन..दोन..एक.. सर्व गाठी सोडल्या तर आत कृष्ण धवल फोटो होते आणि फोटोखाली होती एक साडी ...नववारसाडी ...गर्द हिरव्या रंगाची..इरकल पोताची.. “नानी इकडे ये “विभा जोराने ओरडू लागली,रजनी काकु आल्या.. “नानी मला ही साडी नेसायची आहे..प्लीज नेसव..” बालहट्टापुढे नानी कसल्या जिंकतात ...विभाला त्यांनी साडी नेसवली..तिच्या केसांचा आंबाडा बांधला..कपाळावर गंधाने चंद्रकोर काढली,हौशेने दागिनेही घातले ,हिरव्या बांगड्या घातल्या..
विभाच रूप एक हिरवाईने नटलेल्या झाडासारख खुलल होत आणि त्यात माळलेला शुभ्र कुंदाचा गजरा...नानी म्हणाली थांब आधी दृष्ट काढते...असे म्हणत दोघी स्वयंपाकघरात गेल्या.नाना म्हणाले “वाह ग विभा परीराणी” असे म्हणत त्यांनी मोबाईलवर फोटो काढले आणि नानींनी तिची दृष्ट काढली.”नाना हे फोटोत कोण आहेत?” नानांनी चष्मा लावत फोटो पाहत सांगू लागले..हि माझी आई,बाबा,भाऊ....आणि हो हि माझी पणजी”...”पणजी म्हणजे ?” ..विभा प्रश्नार्थक म्हणाली."पणजी म्हणजे नानांच्या आजोबांची आई..." आणि बघ ह्यां फोटोत जी साडी आहे तिच तू घातली आहेस...रंग जरी लक्षात येत नसला तरी ..डिजाईन तशीच आहे....तू माझ्या ...पणजीच लुगड ...नेसली आहेस तर .. माझी पणजीच आहेस तू ..”अशोककाका खो खो हसू लागले..तशी विभा पण हसत हसत आश्चर्याने फोटो पाहू लागली.
(क्रमशः)
-भक्ती

कथा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

4 Apr 2021 - 9:11 pm | मुक्त विहारि

सुरूवात छान झाली आहे...

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

4 Apr 2021 - 9:27 pm | ॲबसेंट माइंडेड ...

चांगली सुरूवात.

तुषार काळभोर's picture

5 Apr 2021 - 8:23 am | तुषार काळभोर

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत

>>
नानांनी चष्मा लावत फोटो पाहत सांगू लागले..हि माझी आई,बाबा,भाऊ....आणि हो हि माझी पणजी”
>>
”पणजी म्हणजे नानांची आजी
>>
इथे ”पणजी म्हणजे नानांच्या आजीची आई" असं हवं का?

Bhakti's picture

5 Apr 2021 - 10:10 am | Bhakti

"पणजी म्हणजे नानांची आजी"
हो तुषार .. वाक्यं गडबडल आहे..
"पणजी म्हणजे नानांच्या आजोबांची आई..." असे पाहिजे होतं..
संपादक मंडळाला विनंती करते की एवढी दुरूस्ती करून द्यावी.

उत्तम सुरुवात. पुढचा भाग येऊ द्यात लवकर.
शुद्धलेखनातल्या काही चुका टाळता आल्या असत्या तर लेखन अधिक खुललं असतं.

मुवि,ॲ.मा प्रतिसादासाठी खुप धन्यवाद!
प्रचेतस, शुद्धलेखनासाठी खुप खबरदारी बाळगली होती,पण काही किष्ट शब्द अजूनही मला टाइप करता येत नाही.प्रयत्न करतेय.सुचनांसाठी धन्यवाद!

तुषार काळभोर's picture

5 Apr 2021 - 1:04 pm | तुषार काळभोर

तुम्ही सुचना सकारात्मक घेताय म्हणून अजून एक.
टिंबांऐवजी साधी पूर्णविराम, स्वल्पविराम वापरा. अवतरण चिन्हांचा सुयोग्य वापर करा.
जरूर तिथे नवीन ओळीवर सुरू करा.
बरेच संवाद नक्की कोणाच्या तोंडी आहेत, ते अंदाजे समजून घ्यावं लागतंय.

Bhakti's picture

5 Apr 2021 - 8:23 pm | Bhakti

नक्कीच..
सुचना योग्य आहे.
पुन्हा एकदा धन्यवाद!

चौथा कोनाडा's picture

9 Apr 2021 - 12:48 pm | चौथा कोनाडा

छानच सुरुवात !

दीपाजवळ सासू बाळंतीणीचं सगळ करायला जवळच होत्या.

या ऐवजी "बाळंतीणीचं सगळं करायला सासू दीपाजवळच होत्या." असं असलं असतं तर सोपं वाटलं असतं !

अशी अवघडली भाषा टाळा.
(सुचवणुकीत काही चुक असेल तर क्षमस्व ! )

रंगीला रतन's picture

5 Apr 2021 - 12:39 pm | रंगीला रतन

वाचतोय