सापशिडी

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
13 Mar 2021 - 11:36 pm

सापशिडीचा खेळ लहानपणी आपण सर्वांनीच खेळला. कधी भावा बहिणीं तर कधी मित्रांन आणी अगदीच कोणी नसेल तर आजी आजोबान बरोबर. भांडणे झाली, सापाच्या तोंडातून वाचण्यासाठी अगदी खोटारडेपणा केला. आजकाल नातवंडा बरोबर, कुणी कुणी लग्नानंतर नवीन बायको बरोबर सुद्धा खेळले असतील.
सोगंटी ९८ वर पोहचल्यावर सगळ्यांच्या छातीत धडधड झाली असेल आणि, देवा दोनच च दान दे, आशी प्रार्थना केली असणार तर बाकीच्या खेळाडूंनी देव याला एकाच च दान देणार म्हणून चिडवले असणार. कारण ९९ वरचा साप पाचवर खाली घेऊन येतो.

थोडक्यात काय तर हा सर्वकालिक,सर्वाधिक आवडणारा खेळ आहे. पण कधी प्रश्न पडलाय का :-
खेळाचा जनक कोण?
कधी ,कुठे, केव्हा याची सुरुवात झाली?
याच्या पटावर शंभरच आकडे का?
मोठ्या आकड्यावर मोठा साप का?
छोट्या आकड्यावर साप का नाही?
शिड्या छोट्या मोठ्या का?
शिड्या कमी साप जास्त का?
दानाचे आकडे एक ते सहाच का?

लहानपणी खेळ वाटला ,एवढे विचार मनात कधी नाही आले. पण आता वाटतय याच्या पाठिमागे काहितरी कार्यकारणभाव असावा, मग विचार केला याची उत्तरे सापडतात का पाहू. काही उत्तरे मिळाली, काही बद्दल बुद्धी, कुवतीनुसार अनुमान लावायचा प्रयत्न केला.
एक लक्षात आले की या जगात प्रत्येक गोष्टींला कार्यकारणभाव ,काळ, काम आणी वेग आहे.सापशिडीचा हा खेळ पण विश्वगुरू भारताची संपूर्ण जगाला मोठी भेट आहे.

मित्रांनो हा जबरदस्त खेळ योगीयांचा गुरु, ज्ञानियांचा राजा, संत ज्ञानेश्वर माऊलींनी १३ व्या शतकात या विश्वाला दिलेल देण आहे .
इतिहासकार, अभ्यासक म्हणतात माऊलींनी हा खेळ मांडला त्याचे नाव " मोक्षपट" असे ठेवले.
काही ठिकाणी याला "ग्यान चोपड" असेही म्हटले जाते. आंध्रा प्रदेशात याला कैलाश पटम्, परमपाद सोपानमं असंही म्हटलं जातं. मान्यता आहे की श्रीविष्णू भगवान वैकुठ एकादशीला रात्रभर जागरण करण्यासाठी हा खेळ खेळतात असे म्हटले जाते.
काही अभ्यासक या खेळाचा ख्रिस्तपुर्व दुसर्‍या शतकात तर जैन धर्मग्रंथातील सुद्धा दाखला देतात. हा खेळ इ स १८९२ मधे ब्रिटन मधे तर इ स १९४३ मधे अमेरिकी देशात प्रसिद्ध झाला.

जन्म, मृत्यू, पुनर्जन्म, कर्म कर्मफल ,निती अनिती आणि मोक्ष या सारख्या जटील व सर्व सामान्यांना सहज न समजणाऱ्या ,समजल्या तरी लक्षात न येणाऱ्या गोष्टी.माऊलींनी शंभर चौकोनात कर्म व कर्मफलश्रुती याचा लौकिक जीवनावर परिणाम आणी अतंतः मोक्ष याची सांगड घातली आहे. मूलतः हा खेळ लहान मुलांना धर्म कर्म शिकवण्यासाठी बनवला होता.
हा खेळ व त्याचे नियम कमी जास्त प्रमाणात तेच त्यात बदल नाही पण फक्त त्यातील अध्यात्मिक भाग लुप्त झालाय. मुळ खेळाप्रमाणे , १०० वर्ष माणसाच आयुष्य म्हणून १०० वा चौकोन मोक्ष. आयुष्यात चांगल वाईट कर्म यांना दाखवणारे शिडी आणी साप. आप आपल्या कर्मा नुसार पडणारे दान व त्याने मिळणारे फळ प्रगती अथवा अधोगती अर्थात सुख किंवा दुःख. पहिल्यांदा दान पाडण्यासाठी शंख वापरायचे. प्रतेक चौकोनात एक ते शंभर आकडे लिहीले असुन, पट कापडाचा बनवला जायचा. त्याच्या वर देवी देवतांची चित्र असायची. एका वेळेस दोन पेक्षा अधिक खेळाडू सहभागी होऊ शकतात. १२,५१,५७,७६ व ७८ वर शिडी हि अनुक्रमे आस्था, विश्वास, उदारता, ज्ञान आणि वैराग्याची घर तर ४१,४४,४९,५२,५८,६२,७३,८४९२,९५ आणी ९९ ही सापांची घरे म्हणजे अनुक्रमे अवज्ञा, अहंकार, स्थुलता (आळस), चोरी डकैती,विश्वासघात,व्यसनधीनता,ऋण,हत्या,क्रोध,लालसा आणी जो याच्या अधीन जाईल त्याचे पतन निश्चित. या सर्वांनवर आकुंश ठेवून जो शंभराव्या घरात पोहचला त्याला मोक्ष. पुण्याचा मार्ग कठिण म्हणून शिड्यांची संख्या कमी व सापाची जास्त.काही असेही मानतात सापाच्या तोंडातुन खाली जाणे म्हणजे पुनर्जन्म.कालांतराने अध्यात्मिक भाग संपला व फक्त एक खेळ उरला.
आजही मनुष्य माऊलींच्या उपदेशा कडे लक्ष देईल तर पसायदान प्रत्यक्षात दिसेल.

आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतनाचिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||

।। लहानतोंडी मोठा घास हृदयी असो माऊलींचा वास ।।

त्यांचीच क्षमा मागून इथेच थांबतो. माऊली आहे क्षमा नक्कीच करणार.
।। पांडुरंग हरी वासुदेव हरी ।।

मुक्तकलेख

प्रतिक्रिया

सोत्रि's picture

14 Mar 2021 - 6:34 am | सोत्रि

इंटरेस्टींग!

असेही मानतात सापाच्या तोंडातुन खाली जाणे म्हणजे पुनर्जन्म

रोचक!!

- (सापशीडीचं रूपक आवडलेला) सोकाजी

मुक्त विहारि's picture

14 Mar 2021 - 9:22 am | मुक्त विहारि

छान लिहिले आहे

चौथा कोनाडा's picture

16 Mar 2021 - 12:46 pm | चौथा कोनाडा

रोचक लेखन.
अध्यात्मिक कोनातून केलेलं विश्लेषण भारी आहे !
आवडला लेख.

प्रकाश घाटपांडे's picture

16 Mar 2021 - 1:01 pm | प्रकाश घाटपांडे

आमच्याकडे खूप जुना व जीर्ण झालेला एक मोक्षपट होता. त्यावरुन वडिलांनी तसा एक मोठ्या नकाशाच्या कागदावर तयार केला होता.

टर्मीनेटर's picture

19 Mar 2021 - 9:16 pm | टर्मीनेटर

रोचक माहिती 👍