तुलना नको!
एक वेगळा विचार मांडणारा लेख इथे देतो आहे. वेगळा अशासाठी की काही लोक अमुक तमुक मिळाले नाही म्हणून निराश होतात,हव्या त्या प्रमाणात मिळाले नाही म्हणून निराश होतात,चिडतात. अशा वेळी काही लोक सल्ला देतात. "त्या अमुक तमुक व्यक्तीकडे बघ.त्याला तर तुझ्यापेक्षा कमी सुविधा मिळाल्या तरीही तो बघ तुझ्या पेक्षा जास्त यशस्वी झाला." किंवा याच्या उलट "तो तमुक व्यक्ती बघ.त्याच्या तुलनेत तुझं बरं चाललंय.कशाला काळजी करतोस उगाच?"
हे दोन्ही सल्ले तुलना करण्यास सुचवतात.ही तुलना करणे चुकीचे का आहे हेच सांगणारा हा छोटासा उद्बोधक लेख. तुम्हाला काय वाटतं या तुलना करण्याबद्दल? डॉक्टरांनी मांडलेला विचार तुम्हाला पटतोय का?
-----------------------------------------------------
इच्छा - आकांक्षा दुःखं जन्माला घालतात , पण त्यातूनच जगण रुचकरही होतं , असं वाटतं. खूप क्षणभंगुर आयुष्य आहे माणसाचं ; पण तेवढ्यात केवढा पसारा मांडतो आपण . ध्येय , यश यांच्या मागे ऊर फुटस्तोवर कधीकधी इतकं धावतो की , हाती आलेल्या या छोट्याशा कालखंडात जगणं राहूनच जातं. ' मिथ्या गोष्टींच्या मागे जन्म वाया जातो. डॉक्टर , हा विचार चूक आहे का ? अशा विचारांच्या गुंतागुंतीत न अडकता , आसपासची विशिष्ट फोकस ठेवून लौकिक यशाचे टप्पे पार करत , नेमून दिलेल्या चौकटीत जगणारी माणसं पाहिली की मात्र , कधीकधी आपलं चुकतंय की काय , अशी शंका येते . त्यांच्यासारखंच आपणही लौकिक यशाच्या मागे धावायला हवं , असं वाटतं. काय बरोबर , काय चूक?
स्मिता सावंत
उत्तर
तुमच्या प्रश्नाचा रोख समजला. तुम्ही फार काव्यमय पद्धतीने तुमचे विचार मांडलेले आहेत आणि तुमच्या लिखाणात एक संवेदनशीलता जाणवतेय. काही ठिकाणी तुम्ही मनाने खूप हळव्या झाल्या आहात , असं जाणवतं . तुमच्यासारख्या बऱ्याच संवेदनशील माणसांना असा संभ्रमित अवस्थेचा अनुभव येतो आणि यातून नेमका , अचूक मार्ग सापडेल आणि आपल्या मनाची संभ्रमावस्था संपेल , असं वाटतं. आता तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी काही गोष्टींचा विचार करावा लागेल. त्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही प्रश्न सोडवण्यासाठी काय चुकीचं , काय बरोबर हे शोधण्याचा प्रयत्न करत आहात. एकदा त्याचं उत्तर मिळालं की , आपले प्रश्न सुटतील , असे तुम्हाला वाटतंय. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की , तुम्हाला त्या गोष्टीचा निवाडा करायचाय. काय चूक आणि काय बरोबर हे ठरवण्यापेक्षा कोणत्या गोष्टीतून आपल्याला जीवनात आनंद मिळू शकेल , आपण केलेल्या कामातून आनंद मिळू शकेल ( काही प्रमाणात ) ; आपल्याला कोणत्या गोष्टी केल्याने आनंद , समाधान मिळतं याचा तुम्हाला शोध घ्यायला लागेल. कारण चूक बरोबर या गोष्टींची काळानुरूप व्याख्या बदलू शकते . त्यामुळे आपला गोंधळ उडतो. त्याऐवजी आपली भावनिक गरज समजून घेणं गरजेचं आहे. आपली भावनिक गरज हीच असते की , आपल्या कामातून समाधान मिळणं आणि शांतपणे , आनंदाने कुटुंबासोबत जगता यावं , ही सगळ्यांची गरज असते आणि ती तुमचीही आहे , हे या पत्रावरून कळतं आहे . आता हे सुख - समाधान कसं मिळवायचं , हा तुमच्या समोरचा प्रश्न आहे ; परंतु तुमचा खरा प्रश्न आनंद कसा मिळवायचा हा नसून . तुमच्या मनात निर्माण होणारं दुःख कसं मिटवायचं , हा तुमच्या समोरचा खरा प्रश्न आहे . हे दुःख निर्माण होण्याचं कारणही तुमच्या पत्रातून स्पष्ट होत आहे. तुम्ही असं म्हणता , बाकीची माणसं कशा प्रकारे लौकिक अर्थाने सुखी होतात , यशस्वी होतात , म्हणजेच तुम्ही याचा विचार करता . म्हणजे तुम्ही तुमची इतरांशी तुलना करता. या तुलनेवरून तुमच्या लक्षात येतं की , इतर माणसं तथाकथित अर्थाने तुमच्यापेक्षा जास्त यशस्वी आणि सुखी आहेत. त्यांनी निवडलेल्या मार्गाने त्यांना यश आणि सुख मिळतं , मग ते मला का बर मिळत नाही. ही व्यथा तुम्हाला छळते ; पण ही व्यथा निर्माण होण्याचं एकमेव कारण तुम्ही तुलना करता एवढंच आहे. तुलना करणारी व्यक्ती खऱ्या अर्थाने कधीही स्वतःला यशस्वी किंवा सुखी समजू शकत नाही. त्यामुळे तुम्ही तुलना करण्याचे सोडून द्या म्हणजे तुम्हाला तुमच्या मार्गातून कसं सुख मिळू शकतं , याचा आपोआप उलगडा होईल. तुमच्यापेक्षा कमी यशस्वी किंवा तुमच्यापेक्षा कमी सुखी माणसाशी तुमची तुलना करा म्हणजे तुम्हाला समाधान लाभेल , असा सल्ला काही हितचिंतक तुम्हाला देतील. वरवरच्या अर्थाने हा सल्ला पटणारा असला , तरी तो चुकीचा आहे . कारण अशा वेळीही तुम्ही कोणाशी तरी तुलना करत असता आणि त्यातून समाधान मिळेल , असं तुम्ही मानता ; पण ते फसवं असतं. ऊर फुटेस्तोवर तुम्हाला धावायला कोणी सांगितली जीवन हे क्षणभंगुर आहे. याची कल्पना सगळ्यांना आहे. त्यामुळे ध्येय,आकांक्षा यांच्यामागे तुम्ही न धावता शांतपणे चालू शकता. कोणीही आपल्यावर धावण्याची वा चालण्याची कोणतीही जबरदस्ती करत नाही. तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही चाला. बाकी लोक किती जास्त धावत आहेत की , हळूहळू चालत आहेत , याच्याशी आपल्याला देणं-घेणं नसतं आणि यात काही चूक आणि बरोबरही नसतं. त्यामुळे फारशा हळव्या कविता वाचू नका. हळव्या कवितांच्या वाचनापेक्षा धडाडी शिकवणारे धडे वाचा.
डॉ.राजेंद्र बर्वे
( लेखक प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ आहेत ) drrajendrabarve@gmail.com
वाचने
5125
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
छान
तुलना नको
In reply to तुलना नको by बरखा
@बरखा
तुलना व एक उद्योगपती ..
घटा घटाचे रूप आगळे
आजकाल जसं सोशल मिडियाला टाळू
In reply to आजकाल जसं सोशल मिडियाला टाळू by चौथा कोनाडा
तुलना करणे, सहज टाळता येते....
तुम्हाला काय वाटतं या तुलना