मामाच्या गावाला

Primary tabs

नीलकंठ देशमुख's picture
नीलकंठ देशमुख in जनातलं, मनातलं
20 Feb 2021 - 9:55 pm

मामाच्या गावाला...

माझे गाव खेडे असले तरी,आजोळ मात्र मोठ्या शहरात.नांदेडला.वर्षातून एकदा तरी तिकडे जाणे होई.कधी सुट्टीत,कधी कार्यासाठी.एखाद्या दिवशी नांदेड हून पोस्टाने पत्र व सोबत मंगल कार्याची निमंत्रण पत्रिका येई.आईचे आणि माझे जाणे निश्चितअसे.बहिणींपैकी कोण येणार व कधी जायचे हे घरात चर्चा होऊन ठरे.जाण्याचा दिवस निश्चित झाला की मामांना पत्र पाठवून तसे कळवले जाई.
माहेरी जायचे म्हणून आई खूष असे.आम्ही पण.जायची तयारी सुरू होई.आमच्यासाठी नवे कपडे,आहेराचे कपड्यांची खरेदी, कधी माजलगावी,तर कधी गावातील एकमेव दुकानी.खरेदी बहुधा वडीलच करायचे.सोबत मीही असे.खरेदी गावात असली तरी स्त्रिया दुकानात जात नसत. दुकानातील नोकरच,नउवार,सहावार साड्यांचा गठ्ठा दाखवण्यासाठी घरीच घेऊन येई.त्यातून रंग,पोत,पदर,नक्षीकाम पाहुन साड्या घेतल्या जात.निवड,चिकित्सेला फार वाव नसे.आहेराचे कपडे,अन आमचे कपडे,लोखंडी पेटीत( ट्रंकेत)भरले जात .इतर कपडे,पांघरुणे इ.ची छोट्या सतरंजीमधे वळकटी करून दोराने बांधली जाई.नंतर केव्हा तरी त्यासाठी एक होल्डॉल खरेदी केला होता.
निघायचे आधी आठवडाभरापासून घरात गडबड सुरू असे.माहेरी देण्यासाठी व प्रवासात खाण्यासाठी लाडू,चिवडा, चकल्या,अनारसे आदी फराळाचे पदार्थ तयार व्हायचे.ते पितळी डब्यात भरले जायचे.ते डबे एका पिशवीत.प्रवासात खाण्याचे पदार्थ वेगळ्या पिशवीत.
प्रवास सोपा सरळ नव्हता.गावा जवळचे मोठे गाव माजलगाव.तेथून नांदेडला जाण्यासाठी बससेवा नव्हती. ट्रेन होती ती सेलू हून.सेलू ,आडगावहून वीस पंचवीस किलोमीटर अंतरावर.तिथे जाण्यासाठी पण बस तर नव्हतीच पण पक्की /कच्ची सडकही नव्हती.होती,फक्त
गाडीवाट.बैलगाडी हेच प्रवासाचे साधन.दिवसभर बैलगाडीने प्रवास करून सेलू गाठायचे.अन तिथून ट्रेनने नांदेड. हा सर्वात चांगला मार्ग.
निघायचे दिवशी वेगळीच गडबड.सकाळी लवकर उठून आंघोळ न्याहारी करून तयार व्हायचे.वाड्या समोर वरती टप लावलेली बैलगाडी तयार असे. ट्रंक वळकटी होल्डॉल,पिण्याच्या पाण्याची कापडी पिशवी अन पितळी फिरकीचा तांब्या,खाण्याचे सामानाची पिशवी गाडीत ठेवले जाई.सामानासह गाडी गावाबाहेर मंदिराजवळ जाई.आम्ही पायी मंदिरापर्यंत जाऊन,देवीचे दर्शन घेऊन, गाडीत चढायचो. घरातील लोक आम्हाला वाटी लावण्यासाठी ( निरोप देण्यासाठी ) तिथपर्यंत येत.त्या ठिकाणाला,का कोण जाणे ,'खिडकी' म्हणत.
बैलगाडीत बसतानाअसलेला उत्साह,खडबडीत अन ओबडधोबड रस्त्यावर बसणारे धक्के ,हिसक्यांमुळे हळूहळू कमी होई.सुरुवातीला जोराने पळणारे बैल ही थकत.अजून किती अंतर बाकी आहे याची विचारणा सुरू होई. दोन तीन तासाचा प्रवास झाला की नदी,ओढ्याजवळ झाडाखाली विश्रांती साठी गाडी थांबे.बैलांचे वैरण पाणी होई.आमच्यासाठी धपाटे,पोळी,शेंगदाण्याची चटणी,कांदा बटाट्याची भाजी,लोणचे असे खाणे.नदी,ओढ्यांनाही नितळ,स्वच्छ, वाहाते पाणी असे.ओंजळीत पाणी घेऊन प्यायचे.रिकामी झालेली पिशवी व तांब्या भरुन घ्यायचा अन पुढे निघायचे.वाटेत गावे लागत.बाया बाप्ये कुतुहलाने
आमच्याकडे पाहात.लहान मुले तर गाडी गावाचे बाहेर पडे पर्यंत मागे मागे येत.गाव येण्याचे आधी व संपल्यावर दुर्गंधी सुरू होई.नाक दाबून बसावे लागे.प्रवास संपता संपत नसे.दिवस कलायला लागल्यावर सेलू दिसायला लागे.कधी कधी स्टेशनवर पोहंचे पर्यंत नांदेडची रेल्वे गेलेली असे.पुढची ट्रेन दुसरे दिवशी असे.सेलूला मुक्काम करण्याशिवाय पर्याय नसे.सुभेदार हे सेलूचे बडे प्रस्थ.ते माझ्याआत्याचे,वडिलांच्या चुलतबहिणीचे घर.आत्या माझ्या आईच्या समवयस्क आणि मैत्रीण.आम्ही गेलो की त्यांना खूप आनंद होई.तिथे पाहुणचार घेऊन दुसरे दिवशी ट्रेनने नांदेड कडे.
नांदेडच्या महावीर चौक(वजीराबाद) या मध्यवर्ती ठिकाणी असलेले 'पुंडलिकवाडी'हे माझे आजोळ.
पणजोबांच्या
नावाने प्रसिद्धअसलेली, 'नांदेडकर 'कुटुंबीयांची, वैशिष्ट्य पूर्ण आखणी असलेली वसाहत.रस्त्यालगत असलेल्या दुकानांच्या मागे काही अंतरावर,
विशेष प्रसंगीच उघडला जाणारा,भव्य निळ्या रंगाचा दिंडी दरवाजा,ही पुंडलिक वाडीची खास ओळख.येजा करण्यासाठी दिंडी दरवाज्याचे पोटात एक छोटा दरवाजा.आत गेल्यावर मोठे पटांगण.त्याचे दोन्ही बाजूस थेट दरवाजाचे दर्शनीभागापर्यंत काही घरे.नांदेडकरां कडची सगळी मंगल कार्ये या पटांगणातच होत.पटांगणाला लागून जाळीने बंदिस्त असा मोठा हॉल. तेथील भिंतीवर कै.पुंडलिक राव व त्यांचे बंधुंची भव्य छायाचित्रे. संत कवी दासगणूंचे पुंडलिकवाडीशी फार जिव्हाळ्याचे संबंध होते.त्यांचे ही मोठे तैलचित्र.हॉलच्या दोन्ही बाजूला व मागे लांबपर्यंत असलेल्या खोल्या.मधे लांबोळा पॅसेज.मागील बाजूस मोकळे आंगण.त्याचे दोन्ही बाजूस एकमेकास लागून घरे व दुमजली चाळवजा इमारत.सगळ्यांमधे नांदेडकरांचीच बिर्हाडे.काही खोल्यात भाडेकरू पण होते .मागे अर्धा किलोमीटर पर्यंत मोकळी जागा.थेट गोदावरी नदीपर्यंत.
गोदावरीचे सान्निध्य हे पुंडलिक वाडीचे आगळे वेगळे वैशिष्ट्य.कधी कधी महापूराचे पाणी पुंडलिकवाडीमधे पणशिरत असे.घरीच गोदास्नानाचे पुण्य नांदेडकर मंडळीला मिळत असे.पुंडलिकवाडीतील स्त्रीया पर्वकाळ,आणि पवित्र दिवशी नदीवर स्नानासाठी जात.त्यांचे सोबत आम्ही मुले पण जात असू.पोहता येणारी मुले खूप आतपर्यंत जात.कांही तर पलीकडचा तीरही गाठत .पोहता न येणारे मात्र किनारे किनारे,फार तर कमरेएवढ्या पाण्यात ,एखाद्या दगडाला धरून बुचकळ्या मारत.बायकांच्या आंघोळी,पुजा आटोपल्या तरी मुलांची पाण्यातली दंगामस्ती सुरू असे.त्या ओरडायच्या.मग मुले पाण्याबाहेर यायची.ओल्या लुगड्यांचे पिळे खांद्यावर घेऊन,स्त्रिया घरी परतायच्या.
आम्ही त्यांच्या मागे मागे.
माझ्या सहा मामांपैकी सर्वात मोठ्या मामांचे घर तिथे होते.ते पत्रकार आणि सावरकर भक्त होते.'जयहो' नावाने ओळखले जात.इतर तीन मामा,नोकरी व्यवसाया निमित्त परगावी असत.धाकटे दोन मामाही शिक्षणासाठी बाहेर गावी असत. आजी आजोबाही बहुतेक परगावी असलेल्या इतर मुलांकडे असत.माझ्या आईला मुळात,माणसां विषयी आपुलकी,प्रेम होते. माहेर आणि माणसांविषयी तर फार जिव्हाळा व आपुलकी होती.अर्थात ही आपुलकी व जिव्हाळा दोन्ही बाजूंनी होता.सख्खे,चुलत ,आपला,परका असा भेदभाव नव्हता.तिच्या तीन्ही काका व काकूंनाही ती व तिची बहीण म्हणजे माझ्या मावशी विषयी फार प्रेम.ज्यांना लोक खूप घाबरायचे असे तिचे काका पण त्या दोघींशी ज्या पध्दतीने हास्य विनोद करत,गप्पा मारत, ते पाहून इतरांना नवल वाटे.सगळेच चुलतभाऊ त्यांना सख्ख्या बहीणी मानायचे.वहिनी मंडळीशीही मैत्री होती.रोज एकाच्या घरी जेवणाचे आमंत्रण असे.गप्पांचे फड रंगत.माहेरवाशिनींचे सुख व आनंद त्या दोघींना मिळाला.
लाडक्या ताईचा एकुलता मुलगा असल्याने माझे ही लाड होत.कांही मामांची मुले माझ्याच वयाची असल्याने गप्पा खेळ यात वेळ मजेत जाई.
मोठ्या मामांकडे वर्तमानपत्रात व नियतकालिकांची एजंसी होती.खुप पुस्तकेअसत.चांदोबा,फुलबाग,किशोर, कॉमिक्स असा मोठा खजिना हाती पडे.थोडा मोठा झाल्यावर वेगवेगळी मासिके,दिवाळी अंक,(विशेषतः आवाज मधील जादुई चित्रे)साप्ताहिक सोबतचे आकर्षण असे.
सर्वांचे आकर्षण असलेला प्रसिद्ध गुरुद्वारा पुंडलिकवाडी पासून जवळच.रोज सकाळी तेथील 'शबद किर्तनाचे'स्वरांनी जाग यायची.शिख दिसले की उगीच भिती वाटायची.पण गुरुद्वारा मधे गेल्यावर छान वाटे.
गुरुद्वाराच्या,बाहेर रस्त्यालगत सरदारजीचे हॉटेलमध्ये,आधी कधीच माहिती नसलेली लस्सी,मोठा पितळी प्याला भरुन पिल्याची आठवण अजून आहे.खुप स्वादिष्ट होती.
घरचे जेवण पण स्वादिष्ट असे.आजी,मामींच्या हातचा साधा स्वयंपाक पण रुचकर असे.अनेकदा जेवणाचे ताट घेऊन गच्चीवर जायचो.
पुंडलिकवाडीतली इतर मुलेमुलीही येत.गप्पा मारत छान सहभोजन होई.त्यागच्चीवरुन पुंडलिक वाडीचे बाजूस असलेल्या मल्टीपर्पज शाळेच्या मैदानात सुरु असलेले खेळ व इतर कार्यक्रम दिसत.ते पाहाण्यात वेळ जाई.
पुंडलिकवाडीत झाडबुके यांचा फोटो स्टुडिओ होता.हे झाडबुके नांदेडकरांपैकीच आहेत,असा बरेच दिवसमाझा समज होता. तिथे जाउन फोटो काढण्याचा कार्यक्रम ठरलेला असे.छोट्या मुलांना मोठ्या व्यक्तीने हाताचे पंजावर तोललेल्या पोझमध्ये फोटो काढले जात.
संक्रांतीचे दागिने घालून छोट्या मुलांचे आणि नवविवाहितेचे फोटो काढायची फॅशन होती.तरुण मुलींचे टेबलवरील फ्लावरपॉटचे बाजूस उभे राहून गालावर हात टेकवून,वेणीचा शेपटा किंवा दोन्ही शेपट्या समोर घेऊन फोटोकाढले जायचे.हे अनेकदा वर संशोधन मोहीमेसाठी असत.एकापेक्षा जास्त लोकांचा फोटो असल्यास,बेंचवर बसून;नवविवाहितेचे फोटोसाठी ती खुर्चीत व तो बाजूला उभा,किंवा उलट अशा खास मुद्रा असत.
पुंडलिकवाडीत कुठलेही कार्य असो फोटोग्राफर , झाडबुकेच असायचे.
पुंडलिकवाडीतील लग्नकार्ये ,हा एका कुटुंबाचाच नाही तर तेथील सर्वांसाठीच कौटुंबिक सोहळा असे.तेंव्हा लग्नकार्यांचे 'इव्हेंट' झाले नव्हते.इव्हेंटमॅनेजर,केटरर्समंगल कार्यालये,ही नव्हते.समोरच्या पटांगणात मंडपघातला जाई.हे आपल्याच घरचे कार्य आहे असे समजून सगळे कामाला लागत.लग्न कुणाच्याही घरीअसो;निमंत्रणपत्रिकेवर निमंत्रक म्हणून पुंडलिकवाडीतील सर्वात जेष्ठ व्यक्तीचे एकट्याचेच नाव असे.कार्याचे आधी व नंतरचेही काही दिवस सर्वांची जेवणे लग्नघरी असत.
कुठल्याही कामासाठी माणसांची कमतरता पडत नसे.हे आपलेच कार्य आहे व ते व्यवस्थित पार पाडणे आपली जबाबदारी आहे ही सार्वत्रिक भावना असे.लग्नच नाही तर लग्नाआधीची सर्व तयारी,आधी व नंतरच्या सर्व विधींच्या वेळी स्त्रिया आवर्जूनआणि उत्साहाने उपस्थित
राहून ,मनापासून सहभागी होत.गरज पडल्यास स्वयंपाक करण्या पासून ते जेवणाच्या पंगती वाढण्याची तयारी असे.महिलांचा पुढाकार मंगलाष्टके म्हणण्यात ही असे.अनेकांना गाण्याचे अंग असल्याने ती सुश्राव्य होत.
त्याला कारण कदाचित भोवताली असलेले सांगितिक वातावरण असावे.
मराठवाड्यातील सुप्रसिद्ध संगीततज्ञ कै.आण्णासाहेब गुंजकर यांचे संगीत विद्यालय अनेक वर्षे पुंडलिक वाडी मधे होते. तिथे तानपुरा कायम निनादत असे.अनेक शिकाऊ मुले, मुली सुरांशी झटपट करत असलेले ऐकू येई. त्या संगीत विद्यालयाची पायरी चढली नाही अशी मुलगी पुंडलिकवाडीत अपवादानेचअसेल.तिथल्या मुलांचा मात्र या संगीत विद्यालयाशी कधी संबंध आल्याचे माहिती नाही.गाण्यापेक्षाआपापल्या बहीणींच्या 'गानकौशल्याची',गंमत ऐकण्या,पाहण्यात त्यांना जास्त मजा वाटत असावी .
मला तेव्हा गाणे,संगीत यात फारसे स्वारस्य नव्हते भावंडां सोबत गप्पा मारणे जास्त मनोरंजक असे.आपापल्या शाळेत व गावात कधीच न केलेल्या धाडसांच्या कल्पीत कथा, एकमेकांना चढाओढीने ऐकवायच्या.
मामांचा मुलगा उत्तम माझा समवयस्क आणि मित्र. दोघे मिळून सिनेमे पाहायला जात असू.किती सिनेमे पाहिले असतील, संख्या सांगता
येणार नाही. आम्ही तिथे असताना,अनेकदा माझोडची मावशी पण येई.एकमेकींना भेटल्यावर तीला व आईला खूप आनंद व्हायचा.बहुतेक वेळ त्या एकत्रच असायच्या.जेवणे,झोपणे,बाहेर जाणे ,इतरांना भेटणे,सगळे एकत्र.मावशी सोबत मावसभाऊ व मावस बहिणी पण यायच्या.आम्हा बहिणभावंडांचे खूप छान जमायचे. गप्पा,थट्टा, विनोदाच्या मैफिलींना पूर यायचा .खूप छान दिवस जायचे.भराभर.मग परतीची चाहूल लागायची. शेवटी तो दिवस यायचा.आता पुन्हा केव्हा भेटी होणार हा विचार डोक्यात.वातावरण गंभीर व्हायचे.भरल्या डोळ्यांनी निरोप दिला,घेतला जायचा.मग आल्या वाटेने गावी परतायचे.
परतल्यावर ही नांदेडच्या आठवणी खूप दिवस सोबत करायच्या.तिथे मला जावाई म्हणून चिडवले जायचे.माझ्या दुसरे क्रमांकाच्या मामांची मुलगी माझ्यासाठी,सर्वांनी ठरवून ठेवलेली असावी.मामा सरकारी वकील होते.बदलीच्या गावी असत.त्यामुळे 'तिची 'फारशी भेट होत नसे.काही निमित्ताने एकत्र आलोच तर,इतरांचे चिडवण्यामुळे,आम्ही दोघेही एकमेकां समोर येणे टाळायच्या,युक्त्या शोधत असू.गंमत म्हणजे पुढे आठ दहा वर्षांनी ,आम्ही एकमेकांना टाळण्या ऐवजी ,भेटायच्या युक्त्या शोधू लागलो.आणि मग,चार पाच वर्षांनी ,पुंडलिकवाडीतील त्याच पटांगणात थाटलेल्या मंडपात एका 'आनंद सोहळा' झाला.आणि त्या भेटीगाठींचे जन्माच्या गाठीत रुपांतर झाले.ते रेशीमबंध चाळीस वर्षांनंतर ही घट्ट आहेत.आणि पुंडलिक वाडीशी ऋणानुबंधही कायम आहेत.
काळाच्या ओघात खूप काही घडले.आई व मावशी गेल्या.विविध स्वभाव वैचित्र्य असलेली,भरभरून प्रेम करणारी,आपुलकी, जिव्हाळा असणारी पुंडलिकवाडी तील माणसं गेली जग सोडून.जुनी घरे पडली,पाडली गेली.दुरुस्त्या झाल्या.नवीन बांधकामे झाली.मोकळ्या जागांवर नवी घरे, दुकाने,मोठ्या इमारती,वसाहती झाल्या.पुंडलिकवाडीचे रुपच बदलले.तो निळा दिंडी दरवाजा मात्र भूतकाळाच्या स्मृती जागवत तसाच उभा आहे,अजूनही.
नीलकंठ देशमुख .

मुक्तकलेख