स्मृतींची चाळता पाने -- कल्याण आणि आठवणी

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
1 Jan 2021 - 8:29 pm

स्मृतींची चाळता पाने --मुक्काम पोस्ट लालबाग
स्मृतींची चाळता पाने -अनगाव

स्मृतींची चाळता पाने -अनगाव2

स्मृतींची चाळता पाने --ठाणे आणि नातीगोती
स्मृतींची चाळता पाने --ठाणे आणि आठवणी
स्मृतींची चाळता पाने -नोकरी,लग्न आणि कल्याण

एकीकडे मुलांची शिक्षणे चालू होती, तर दुसरीकडे आमचे संसाराचे चक्र चालू होते. माझ्या यजमानांना व मला प्रवासाची आवड असल्याने आम्ही एकुणात बराच प्रवास केला. १९८० साली माझ्या चुलत भावाने रेल्वेच्या लोकांना घेऊन काश्मीर ट्रिप काढली होती. तो स्वतः ही रेल्वेतच नोकरीला होता. साधारण ४०-५० लोकांना घेऊन त्याने हि ट्रिप काढली होती. आम्ही दोघे व यांचे मित्र लेले आणि त्यांची पत्नी असे ४ जण गेलो होतो.त्यावेळी माझी आई व सासूबाई यांनी मिळून मुलांना सांभाळले. एकतर प्रवास फार लांबचा असल्याने मुलांना घेऊन जाणे जमले नाही. शिवाय त्यांच्या शाळा वगैरे होत्या आणि मुले आजी जवळ आनंदाने राहत असत. त्यामुळे आम्ही २-४ दिवसाच्या ट्रिप सोडल्या तर मुलांना नेत नसू.
काश्मीर चे वर्णन शब्दात करणे खरोखरच कठीण आहे. त्याला भारताचे नंदनवन का म्हणतात ते तिकडे गेल्यावरच कळते. सर्वत्र फुलांचे ताटवे,उंच डोंगरशिखरे, कुठे कुठे बर्फ, उंच चीनार वृक्ष, सुंदर रस्ते, निशांत बागेसारख्या मोठ्या बागा आणि कारंजी, असे सर्व मनमोहक दृश्य बघून पाहणाऱ्यांचे भान न हरपले तरच नवल. शिवाय दल सरोवरातील बोटिंग, शिकारे,फुले आणि इतर वस्तू व पोशाख विकणारे आनंदी काश्मिरी लोक यांचे मनावर गारुड होते. रस्त्याच्या कडेला बसलेल्या काश्मिरी बायका व मुले गोरीपान आणि सुंदर दिसत आणि त्यांच्या वस्तूही दर्जेदार असत.स्वेटर व उबदार शाली ३० ते ५० रुपयांच्या घरात मिळत. मी आई,सासूबाई आणि इतरांसाठी ७-८ शाली व स्वेटर घेतले. अशा शाली इथे मुंबईत मिळणार नाहीत. फळेही खूप दर्जेदार होती. सफरचंद ४ रुपये किलो होती. आम्ही तर जेवायचो कमी आणि सफरचन्देच जास्त खायचो. बाहेर फारशी चांगली हॉटेल नव्हती. त्यामुले २-३ आचारी बरोबर घेतले होते. पण जे आचारी घेतले होते ते रोज आमटी भातच करायचे. त्यामुळे इतर खाण्यावरच आमचा भर होता. या ८ दिवसात जम्मू श्रीनगर,सोनमर्ग,गुलमर्ग,पहलगाम वगैरे सगळे बघून तेथील नयनरम्य दृश्ये डोळ्यात साठवून घेतली आणि काश्मिरी ड्रेस वगैरे घालून फोटोही काढले. तेथील बायका व मुलांचेही काही फोटो काढले आणि अस्सल काश्मिरी सौंदर्य कॅमेरात कैद केले. त्याशिवाय काश्मीर मधील प्रसिद्ध केशराचे मळे, ड्राय फ्रुटची दुकाने,मसाल्याची दुकाने वगैरे बघून तिथे भरपूर खरेदीसुद्धा केली. सगळ्या मित्र मंडळी व नातेवाईकांना देण्यासाठी काही ना काही आणले होते. आता बायका म्हटले की साड्या व ड्रेस मटेरियल यांची खरेदी अटळ आहे. त्याप्रमाणे तिकडे काही सिल्क साड्यांच्या दुकानांना भेटी दिल्या आणि माझी बहीण,मावशी,आई वगैरे साठी सिल्कच्या साड्याही घेतल्या.
ही आमची ट्रिप साधारण प्रत्येकी एक हजार रुपयात झाली. मी अशी सुंदर ट्रिप काढल्याबद्दल माझ्या भावाचे पुनः:पुन्हा आभार मानले.
इतर वेळी २-३ दिवस लागून सुट्टी आली की आम्ही लहान ट्रिप करत असू.यांचे ३ खास मित्र होते बर्वे,लेले व भातखण्डे, आम्ही ४ कुटुंबे मिळून कधीकधी ट्रिप करायचो. श्री. बर्वे यांचे नागावला घर होते व घराजवळ स्वच्छ समुद्र किनारा होता. आम्ही ४ कुटुंबे मिळून २-३ वेळा तिथे राहायला गेलो होतो. तिकडच्या किनाऱ्यावर मुले खूप खेळत असत तसेच समुद्रात पोहणे, बैलगाडीत बसणे ,रात्री पत्ते,गाण्याच्या भेंड्या वगैरे यात मजेत वेळ जात असे. त्यावेळी मुलांचे काढलेले फोटो अजूनही जतन करून ठेवले आहेत आणि ते बघायला फारच मजा येते.
कधी कधी आम्ही ऑफिसच्या मैत्रिणी मुलांना घेऊन ट्रीपला जायचो. एका मैत्रिणीचे अलिबागला तर एकीचे पेणला घर होते. मुलांना खेळायला मोकळे घर मिळे आणि आम्ही मैत्रिणी गप्पा टप्पा करत बसत असू. शिवाय कोणाच्या मुलाचे मुंज,मुलीच्या लग्नाचे केळवण किंवा नुसतीच पार्टी अशा निमित्ताने आम्ही जमायचो आणि पोहे,चिवडा,साबुदाणे वडे,बटाटे वडे ,लाडू वगैरे विविध पदार्थ करून आणि मुलांना प्रसंगानुसार कम्पासपेट्या ,पेन,पेन्सिली,रंगीत खडू,पॅड अशा भेटवस्तू वगैरे देऊन दिवस साजरा करायचो.आज आम्ही सर्वजणी सत्तरीपुढे आहोत पण अजूनही अधून मधून फोनाफोनी करून एकमेकींची खुशाली जाणून घेत असतो. कोणी कल्याण, कोणी पुणे,कोणी बदलापूर अशी पांगा पांग झाली आहे आणि प्रकृतीच्या काही ना काही तक्रारी सुरु असतातच. त्यामुळे फोनवर भेट हीच प्रत्यक्ष समजून आनंद मानतो. माझी खास मैत्रीण लेले हि मात्र पुणे येथे असल्याने क्वचित तिची भेट होते आणि एखाद दिवस आम्ही एकत्र राहून जुन्या आठवणींना उजाळा देतो.

कल्याणमध्ये ब्रम्हे नावाचे एक गृहस्थ बसने स्पेशल ट्रिप काढत असत. गाणगापूर,पंढरपूर,अक्कलकोट, तुळजापूर,पैठण नेवासे, शनी शिंगणापूर अशा २-४ दिवसांच्या ट्रिप असत. त्यामुळे माझी हि सर्व ठिकाणे बघून झाली.शिवाय वर्षातून एकदा ऑफिसची सर्व मंडळी एकत्र येऊन ट्रिप काढत त्यामुळे मराठवाडा,, ११ मारुती,गोंदवले,चाफळ,सज्जनगड,शिवथरघळ,सातारा,कोल्हापूर हेही बघून झाले.

१९८४ मध्ये आम्ही दक्षिण भारताची मोठी सहल केली. आम्ही दोघे व माझी मावशी असे तिघे गेलो होतो. त्यावेळी दादरहून श्री. जोग यांची भारत दर्शन सहल कंपनी ट्रिप काढत असे. प्रत्येकी २५०० रुपयात आमची १५ दिवसांची दक्षिण भारत सहल झाली. यात म्हैसूर,बंगलोर, उटी कोडाईकनाल, शीवाकांची/विष्णू कांची, रामेश्वरम,कन्याकुमारी गुरुवायूर,महाबलीपूरम अशी अनेक मंदिरे पाहिली. दक्षिणे कडे विशेष म्हणजे तिकडची भव्य मंदिरे,सभामंडप आणि अंधाऱ्या गाभाऱ्यातील मूर्ती होत. मुख्य गाभाऱ्यात जाण्यास खूप वेळ लागतो पण तिकडची फुलांची आरास व मोठ्या समया वगैरे बघून डोळ्याचे पारणे फिटते. या सहलीत राहण्याची सोय कॉमन सभामंडपात किंवा भक्त निवास मध्ये असे. तरीही सहल फार छान झाली. रामेश्वराला २७ पाण्याची कुंडे आहेत आणि सगळ्या कुंडातून थोडे थोडे पाणी घेऊन अंघोळ केल्यास पुण्य मिळते असे म्हणतात.त्यामुळे आम्ही कपड्यांवरूनच थोडे थोडे पाणी अंगावर घेतले आणि ओलेत्याने भक्त निवासमध्ये गेलो.कन्याकुमारी तर माझे ३ वेळा बघून झाले. एकदा माझी बहीण रिझर्व बँकेच्या कामासाठी १ वर्ष मद्रासला राहिली होती तेव्हा आम्ही तिच्याकडे काही दिवस गेलो होतो त्यावेळी आणि नंतर पुन्हा एकदा ट्रिपबरोबर. या सर्व ट्रीपमध्ये वर सांगितलेली ठिकाणे थोडीबहुत पुन्हा बघून झालीच पण दुसऱ्या ट्रीपमध्ये आम्ही बहिणीबरोबर तिच्याच स्टाफ क्वार्टर्स मध्ये राहिलो होतो तेव्हा अजूनच आरामात सर्व बघता आले. बहीण तेव्हा लक्ष्मी विलास बँकेवर ऑडिटर म्हणून काम करत होती त्यामुळे त्यांनी आम्हाला एक मोठी गाडी आणि ड्रायवर दिमतीला दिला होता.शिवाय शेवटच्या दिवशी नल्ली व कुमारन या सुप्रसिद्ध साड्यांच्या दुकानांना भेटी देऊन आम्ही सगळ्या बायकांनी मनसोक्त साडी खरेदी केली.तसेच कॉटनच्या साड्या मदुराई येथून घेतल्या. पुढे तिथून इगमोर या स्मॉल गेजच्या स्टेशनला जाऊन तिथून कन्याकुमारी व नंतर परतीचा प्रवास केला. तसेच येताना मसाल्याचे पदार्थही घेऊन आलो. माझे मोठे जावई साऊथ इंडियन आहेत त्यामुळे नंतरही कधी कधी साऊथला जाणे झाले.तसेच त्यांच्याच बरोबर काशी,प्रयाग वगैरेही झाले.

माझी एक मुलगी कोकणात दापोलीला असते त्यामुळे मी महिन्यात तिच्याकडे जाणे होतेच. तिच्याकडे पुरवीपासूनची नारळी पोफळीची,फणसाची,रातांब्याची झाडे आहेत. तसेच आंब्याची वाडी आहे. कोकणातील शांतता मला फारच छान वाटते. गावात दरवर्षी दुर्गादेवी, राम,मारुती,गणपतीचे उत्सव होतात व रोजची पूजा अर्चाही चालू असते. रामनवमीच्या नऊ दिवसात तसेच देवीच्या नवरात्रात धामधूम असते. तसेच महाशिवरात्रीचा उत्सव असतो. होळी पौर्णिमा तर कोकणात फारच मोठ्या प्रमाणात साजरी होते. बायका व पुरुषांची वेगवेगळी नाटके बसवली जातात. गोकुळाष्टमीला एकत्र जेवण असते. कोकणी पदार्थ जसे की मेतकूट भात,आंबा व फणस पोळी ,केळफूल आणि फणसाची भाजी,पानगी, यांचा आस्वाद घेताना लहानपणीच्या आठवणी पुन्हा जाग्या होतात.(क्रमश:)

धोरणप्रकटन