व्यंगचित्रांच्या निमित्ताने...

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
1 Dec 2020 - 2:23 pm

- डॉ. सुधीर रा. देवरे

(संदर्भ: 2012 साली केंद्रीय विद्यालयांच्या राज्यशास्त्र- नागरीकशास्त्र विषयांतील अभ्यासाला पुरक असलेल्या स्वातंत्र्याच्या पहाट काळातील काही भारतीय राजकीय ऐतिहासिक व्यक्‍तींच्या व्यंगचित्रांमुळे भावना दुखावण्याचा प्रसंग उद्‍भवला होता. म्हणून तत्कालीन शासनाकडून अनेक चांगली व्यंगचित्रे त्या अभ्यासक्रमातून हटवण्यात आली होती. त्यावेळी लिहिलेला हा लेख. पण ब्लॉगवर अजूनही प्रकाशित केला नव्हता.)

आजचे राजकीय नेते नको इतके संवेदनाशील झालेले आहेत. त्यांना कोणतेही सामाजिक प्रश्न ‍नीट सोडवता आले नाहीत, दुष्काळ निवारण करता येत नाही तरी कितीही जटील भावनिक प्रश्न ते चुटकीसरशी सोडवताना दिसतात. (अपवाद गृहीत). ज्या शैक्षणिक धड्याबद्दल कोणी आक्षेप घेतला तो धडा अभ्यासक्रमातून धाडकन काढून मोकळं होणं, ज्या पुस्तकाबद्दल कोणी आक्षेप घेतला त्यावर पटकन बंदी आणणं. ज्या चित्रावर कोणी बोट ठेवलं ते चटकन मागे घेणं. इतक्या झटपट असे भावनिक निर्णय घेताना त्या त्या वर्षाच्या बजेटात तरतुदीनुसार जास्तीचा कोणताही खर्च येत नाही, नियोजनावर परिणाम होत नाही. खासदार- मंत्री निधीतून आर्थिक कपात होत नाही. झालाच तर तो फक्‍त फायदाच फायदा, तोही छप्पर फाडके. एकगठ्ठा मतांचा.

अशा काळात कोणी काही चांगल्या मागण्यांकरता शांततामय आंदोलन करत असेल तर ते दुर्लक्षित होतं. कोणी पिण्याला पाणी मागत असेल तर इतक्या ज्वलंत भावनिक प्रश्नांवर देशात चर्चा चालली असताना पिण्यासाठी पाणी मागणं हे अतिशय क्षुद्रपणाचं लक्षण ठरेल. कोणी चांगले रस्ते मागत असेल तर तो ही अतिक्षुल्लक प्रश्न ठरतो. शेतीमालाला भाव मागणेही तसे शासनाच्या दृष्टीने दुर्लक्ष करण्यासारखी बाब. महागाई- नफेखोरी, भ्रष्टाचार, भाववाढ, न्याय या सगळ्या गोष्टी भावना दुखावण्यापुढे किरकोळ ठरत असतात. (दुसरीकडे नोकरशाहीची मनमानी. अगदी दिल्लीपासून तर स्थानिक स्वराज्य संस्था. नगरपरिषदेकडून काही नागरीकांना दुप्पट घरपट्टी लावली जाते तर काहींना अर्धी लावली जाते. न्याय मागितला तर जातीपातीच्या- कायद्याच्या- अधिकाराच्या आश्रयाने ब्लॅक मेलींग केली जाते. स्थानिक लोकप्रतिनिधीचेंही भ्रष्ट नोकरशहा धकू देत नाहीत.) अशा वेळी आतापर्यंत सरकारने काहीही चांगलं काम केलेलं नसलं तरी असं इतिहास बदलण्याचं श्रेय फुकटात मिळतं आणि निवडणुकीत त्या जातीपातीच्या मतांचीही हमखास शाश्वती मिळते.

कोणाच्याही अचानक भावना दुखून त्या भडकताच दगडफेक, जाळपोळ, तोडफोडीसाठी सार्वजनिक क्षेत्रातील कार्यालये, वाहने, वास्तु, वस्तु, दुकाने जसं शासनच सहज उपलब्ध करून देत असतं की काय, असा प्रश्न पडावा; इतक्या सहजपणे हिंसा होत राहते. जनसामान्यांचे प्रश्न बाजूला पडून अशा घटनांच्या प्रतिक्रियांसाठी राजकीय नेते चॅनेल्सवर झळकू लागतात.

कादंबरी कशी लिहावी हे राजकीय लोक सांगतील, कविता कशी लिहावी, लेख कसा लिहावा, कथा कशी लिहावी, नाटक कसं लिहावं हे राजकीय लोक सांगतील आणि कलावंतानी त्याच आशयाचं लिहायला हवं. चित्र कशी काढावीत हेही तेच सांगतील. सिनेमा कसा निर्माण करावा, कसा दाखवावा हे आधी राजकीय लोकांना तो दाखवून मंजूरी घ्यावी, नंतरच सेन्सार बोर्डाकडे जावं.

लोककल्याणकारी राजकारण कसं करावं, पुस्तकं कशी वाचावीत, व्यंगचित्रे कशी पहावीत आणि वाचावीतही, कला कशी आत्मसात करावी, कला म्हणजे नेमकं काय ह्याची ज्या राजकारणी लोकांनी कलावंतांकडे शिकवणी लावली पाहिजे, तेच लोक कलावंताने काय करावं हे शिकवतात, हे आपल्या देशाचं आणि या प्रजासत्ताक देशाच्या राज्यघटनेचंही दुर्दैव!!!

महात्मा गांधीना दक्षिण आफ्रिकेत रेल्वेतून बाहेर फेकलं असं उद्या एखाद्या पुस्तकात चित्र छापल्याने कोणाच्या भावना दुखावल्यात तर काय करावं? हळू हळू इतिहास बदलून टाकावा दुसरं काय. (खरं तर महात्मा गांधीचा कितीही अपमान केला तरी या देशात कोणाच्याच भावना दुखावत नाहीत, ही आजची वस्तुस्थिती.)

ताजा कलम: अभिव्यक्‍ती स्वातंत्र्य घेणार्‍यांनी कोणाच्या भावना न दुखावता कलेतून सुधारकाची भूमिका घ्यावी. आणि ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यांनी हातात शस्त्र घेऊन अतिरेकी होऊ नये. या जगात न्याय मागण्याच्या कायदेशीर जागा उपलब्ध आहेत, हे लक्षात असलं पाहिजे. माणूस आज जसजसा सुशिक्षित होत आहे तसा अधिकाधीक धर्मांध होत चालला का? तसं होत असेल तर आपली समग्र (जागतिक) शिक्षण व्यवस्था की अव्यवस्था तपासून पहावी लागेल. (ताजा कलमचा संदर्भ: फ्रान्स)

(आज प्रकाशित करताना फ्रान्सच्या संदर्भासाठी ताजा कलम जोडला आहे. पुण्याच्या ‘दिलीपराज प्रकाशना’कडून ‘ब्लॉगच्या जाळ्यातून जग’ हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं. त्या निमित्ताने पुस्तकात समाविष्ट झालेल्या पण ब्लॉगवर अजून न आलेल्या तीन लेखांपैकी हा दुसरा. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.com/

साहित्यिकलेख

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

1 Dec 2020 - 3:01 pm | चौथा कोनाडा

कादंबरी कशी लिहावी हे राजकीय लोक सांगतील, कविता कशी लिहावी, लेख कसा लिहावा, कथा कशी लिहावी, नाटक कसं लिहावं हे राजकीय लोक सांगतील आणि कलावंतानी त्याच आशयाचं लिहायला हवं. चित्र कशी काढावीत हेही तेच सांगतील. सिनेमा कसा निर्माण करावा, कसा दाखवावा हे आधी राजकीय लोकांना तो दाखवून मंजूरी घ्यावी, नंतरच सेन्सार बोर्डाकडे जावं.

यात सर्व काही आलेच ! टोळ्यांच्या हातात शक्ती एकवटत चाललेली आहे. ज्या वेळी जी टोळी पॉवरफुल, त्यावेळी त्यांचे राज्य. ते सांगतील तेच करायचं नाही तर ....

एका छोट्याशा कारणांवरून डॉ आनंद यादव यांना संमेलनाध्यक्ष पदावर पाणी सोडावं लागलं त्यावेळी खुप वाईट वाटलेलं.
असो. आता कश्याचंही काही वाटून घ्यायचं नाही असे दिवस आलेत.

उत्तम लेख +१

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

2 Dec 2020 - 10:18 am | डॉ. सुधीर राजार...

सहमतीच्या प्रतिप्रियेबद्दल धन्यवाद.

महेंद्रसिंग साथी's picture

1 Dec 2020 - 3:04 pm | महेंद्रसिंग साथी

चांगला लेख. आवडला.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

2 Dec 2020 - 10:19 am | डॉ. सुधीर राजार...

धन्यवाद

उपयोजक's picture

1 Dec 2020 - 10:11 pm | उपयोजक

लेख!

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

2 Dec 2020 - 10:19 am | डॉ. सुधीर राजार...

धन्यवाद