*दिवाळी इथली आणि तिथली*
बंगल्यामधे सगळीकडे विजेची रोषणाई
गिफ्ट बाॅक्सेसमधून ओसंडते मेवे मिठाई
खातील तरी किती..अर्धे वायाच जाई
कशाचीच तमा इथल्या कोणालाच नाही !!
झगमगाटात वाहतो पैशांचा महापूर,
आसमानात पसरे हजारो फटाक्यांचा धूर !
तिजोरी भरून वाहिली तरी 'अजून' चा सूर,
कोण करेल भस्मसात हा लालसेचा असुर !!
तिकडे झोपडीमधे घडे रोजचाच उपास,
हाती नाही काम, नाही पोरांमुखी घास,
कामासाठी वणवण करून लागतो श्वास
दिवाळी नाही की मिठाई नाही
फटाके कपड्यांची तर बातच नाही
एका पणती पुरतेही तेल घरात नाही ,
पोटाच्या आगीने नी अश्रुंनी जर पणती पेटेल
तर अवघी झोपडी प्रकाशाने झगमगून उठेल !!
किती भेद जगण्यांमधे..दोन टोकं..पण हेच वास्तव,
एक पणती मनामधे..पेटती ठेऊ., या जाणिवेस्तव !
आपल्याकडचं 'जास्तीचं' देऊया. जिथे गरज आहे,
मदतीचा हात देऊ..करण्यासारखं अजून बरंच आहे !!
©वृंदा मोघे
19/10/17.