धग

रातराणी's picture
रातराणी in जनातलं, मनातलं
31 May 2020 - 2:34 pm

" संपूर्ण मानवजातीसमोर न भूतो न भविष्यती असे संकट उभे ठाकले असताना आपल्या देशातील सरकार आपल्याच देशबांधवांबाबत इतके निष्काळजी कसे असू शकते? फक्त ते गरीब आहेत म्हणून? त्यांच्या राहण्याचा तसाही काही ठावठिकाणा नव्हताच मग आता तरी त्यांची चिंता कशाला करा? की मग जातायत तर जाईनात का...उद्या त्यांच्या ओस पडलेल्या वस्त्यांवर टोलेजंग इमारती बांधून आपले तळवे चाटणाऱ्या अधिकारी, मंत्र्यांच्या पुढच्या पिढीची सोय करायची आहे? मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे असं आम्हाला लहानपणापासून शिकवण्यात आलं. मग आजचे राजकारणी नक्कीच मनुष्य नाहीत. एक सत्ता सोडली तर इतर काहीही त्यांना प्रिय नाही. सत्तेच्या लालसेनं इतकं आंधळं केलंय यांना की हातावर पोट असणार्या मजुरांच्या जीवनमरणाची त्यांना य:कश्चितही फिकीर नाही. अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. मैलो न मैल चालत जाणाऱ्या लोकांचा तांडा पाहिला की मन पिळवटून निघतं. मनात हजारो प्रश्नांचा गुंता तयार होतो. ही लोकं कधी त्यांच्या घरी पोचतील? काय खातील? कुठे झोपतील? उद्या कुणी आजारी पडले तर वेळेत औषधोपचार मिळतील त्यांना? पण मी फक्त लिहू शकतो, माझ्यासारख्याच चार विचारवंताबरोबर चर्चा करू शकतो. फार फार तर सरकारला एक खरमरीत पत्र लिहू शकतो. हे प्रश्न सोडवण्याचं साहस माझ्यात नाही. कारण मीपण आहे त्या सर्वांसारखाच लॉकडाऊनचा आणखी एक बळी."

आपण लिहिलेली पोस्ट पुन्हापुन्हा वाचून तो काही क्षण स्क्रीनकडे उदासपणे पहात राहिला. ही एवढी पोस्ट संपादकांकडे पाठवली की त्याचं आजचं काम संपलं होतं. दोन्ही हातांची बोटं जुळवून काही क्षण त्यानं विचार केला. एक खोल निश्वास सोडला आणि सेंड बटणवर क्लिक करणार इतक्यात "चहा, गरम गरम चहा" असं ओरडत मालती दार ढकलून आत आली. तिला बघून तो प्रसन्न हसला. चहाचा ट्रे टेबलवर ठेवत ती, त्याच्या टेबलजवळची एक खुर्ची जवळ घेऊन बसली.

"हुश्श्य, किती गरम होतंय ना. पाउस येईल आज बहुतेक." दोन्ही हात पंख्यासारखे हलवत, हाशहुश्श करीत मालतीने साडीच्या पदराने चेहऱ्यावरचा घाम पुसला.

अजिंक्य आपल्याकडे एकटक पहातोय हे लक्षात येताच ती म्हणाली,

"काय रे अज्जू... कुठे हरवलायस?"

हातातल्या चहाचा एक घोट घेत अजिंक्य म्हणाला,

"तू म्हणजे ना.. जमत नाही तर कशाला नेसायची साडीबिडी? जरा सुटसुटीत कपडे घातले तर नाही होणार गरम."

"मुंबईत घालतेच की मी सुटसुटीत कपडे. आणि मला आवडतं साडी नेसायला. मला शरूने टॅग केलंय साडी चॅलेंजसाठी. माझा एक छान फोटो काढ ना. मला स्टेटस लावायचंय. " आधीच मधाळ आवाज असलेली मालती, काहीशी लाडात येत अजिंक्यला म्हणाली.

"हां! हे खरं कारण आहे, आवड वगैरे काही नाही.. फक्त फोटो स्टेटसला लावायचाय म्हणून हा उद्योग. " तिला डिवचत अजिंक्य म्हणाला.

"असू दे स्टेट्ससाठी तर स्टेट्ससाठी. तुझ्याशी वाद घालणं म्हणजे, माबदौलत ये नाचीज ऐसी तौहीन कभी कर सकती है?"

वाद घालायला पुढे मुद्दा नसला की उर्दूमिश्रीत हिंदी बोलून ती अजिंक्यला गप्प करत असे. आपली ही सवय त्याला आवडते हे तिला चांगलंच ठाऊक होतं.

दोघांनी हसतखेळत चहा संपवला आणि मालतीचा फोटो काढण्याचा घोशा पुन्हा सुरु झाला. तिचं म्हणणं होतं सेल्फी वगैरे आपण तसेही नेहमीच काढत असतो. पण आज तिला तिचा वेगळा फोटो हवा होता. अजिंक्यच्या शेतातल्या बंगल्याच्या टेरेसवर उभं राहिलं की कितीतरी दूर पसरलेली त्यांची हिरवीगार शेतं दिसत. वरती निळं आकाश आणि खाली हिरवीगार शेतं बॅकग्राऊंडमध्ये येतील असा एक मस्त फोटो हवा होता तिला. मुंबईतच लहानाची मोठी झालेल्या मालतीला या सगळ्या वातावरणाचं फार अप्रूप होतं. पण कितीही आवडत असलं तरी मुंबईला गेल्यावर कामाच्या रगाड्यात दोघे इतके गुंगून जात की मनात असूनही गावी येऊन निवांत रहाणं त्यांना जमत नव्हतं.

"जाऊया राणीसरकार, जाऊया. एवढी पोस्ट सेंड करतो गोखलेसाहेबांना आणि लगेच निघुयात. " तिची समजूत काढून अजिंक्य पुन्हा पोस्ट वाचू लागला. आतापर्यंत त्याने दोन तीन वेळा तरी त्याने ती वाचली होती. काहीही दुरुस्ती करायची नाहीये हे माहीत असूनही आपण लिहिलेलं स्वतःच विसरून गेल्यासारखा तो पुन्हा पुन्हा माउस वरखाली करीत ती डोळ्याखालून घालीत होता. मालती मागेच उभी राहून जमेल तेवढं त्याने लिहिलेलं डोळ्याखालून घालीत होती. शेवटच्या परिच्छेदाकडे आल्यावर अजिंक्यचा माउसवरचा हात तिनं तसाच धरून ठेवला. शेवटचा परिच्छेद वाचून झाल्यावर त्याच्या गळयाभोवती आपले दोन्ही हात गुंफून म्हणाली,

"किती सुंदर लिहलं आहेस अजिंक्य! सिम्पली अमेझिंग. आय होप तुझ्या या आर्टिकलनंतर तरी काही डेफिनिट ऍक्शन घेतील या पुअर लोकांसाठी."

अजिंक्य मनातल्या मनात हसला. वाक्यात दर दुसऱ्या शब्दाला इंग्रजीची कुबडी जवळ करणारी ही मुलगी एका कवितांच्या कार्यक्रमात आपल्या प्रेमात पडली आणि आपणही तिच्या. त्याला या योगायोगाचं नेहमीच आश्चर्य वाटत आलं होतं. एकदोनदा मालूचा मूड बरा असताना, त्यानं तिला ते बोलूनही दाखवलं होतं. तिने ते हसण्यावारी नेलं होतं. पण मनातल्या मनात तेव्हा तिला वाटलं होतं, ती त्याचीच होती म्हणून त्याला भेटली. यात योगायोग नव्हता. तिला जेवढं थोडंथोडकं मराठी येत होतं, त्याच्या आधाराने तिने त्याने लिहिलेलं एकूण एक साहित्य वाचलं होतं. तिने स्वतःला खूप आधीच त्याच्या लेखणीत हरवून घेतलं होतं. फक्त अजिंक्यला ते उशीरा लक्षात आलं होतं इतकंच. बहुदा लक्षात आलंही नव्हतं. हे सगळं तिला त्याला सांगायचं होतं, पण तिला असं त्याच्यासारखं भावनाप्रधान बोलता येणार नाही अशी भीती वाटून ती तेव्हा गप्प बसली होती.

अजिंक्यने पोस्ट सेंड केली आणि दोघे गच्चीवर जायला निघाले. पायऱ्यांजवळ पोचताच त्याने आपला हात तिच्यासमोर धरला. एका हाताने निर्या सांभाळत ती अजिंक्यला म्हणाली, "काय हे अज्जू! अरे अजून कन्फर्म नाहीये."

"हो, पण आपण कशाला उगाच रिस्क घ्यायची." असं म्हणून त्यानं एक एक पायरी सावकाश चढत तिला टेरेसवर नेलं. गावी आल्यानन्तर काही दिवसांनी तिने आपला पिरियड मिस झाल्याचं त्याला सांगितलं होतं. असं तिच्याबाबतीत आधीही झालं होतं पण गेलं वर्षभर तिची डॉकटरांकडे ट्रीटमेंट सुरु होती त्यामुळे दोघांनाही त्या गोड बातमीचे वेध लागले होते. यावेळेस काहीही ताण घ्यायचा नाही असं ठरवून तिने लगोलग तिच्या चांगल्या सिनियर सॉफ्टवेयर इंजिनियरच्या नोकरीचा राजीनामा देऊन टाकला होता. अजिंक्यला विचारल्यासारखं केलं होतं, पण त्यात विचारण्यापेक्षा "मी हे ठरवलं आहे आणि मी हे करणार आहे " असं सांगण्याचा आव जास्त होता. अजिंक्यनेही मग जास्त फाटे न फोडता तिला सपोर्टच केलं होतं. तसंही कमी पडावं अशी त्यांची परिस्थिती नव्हती. त्याच्यासाठी तिचा जॉब म्हणजे तिचं जीव रमवण्याचं साधन होतं. आता निसर्गाने आपसूकच तिला जीव रमवण्याची वेगळी तरतूद केली होती. मग तिच्या निर्णयाला निरर्थक विरोध करून "बायकोच्या प्रत्येक निर्णयाला सपोर्ट करणारा पुरुष" अशी सोशल मीडियावर स्वतःची जाहिरात करायची संधी त्याला गमवायची नव्हती.

दादासाहेबांची तब्येत खराब झाल्याचं आईंनी कळवलं म्हणून ते दोघे गावी आले होते. येऊन दोन-तीन दिवस झाले असतील तोच लॉकडाऊन सुरु झाल्याची घोषणा झाली आणि दोघेही तिथेच अडकले. त्यातल्या त्यात जवळ लॅपटॉप ठेवला म्हणून त्याला बरे वाटले. मालतीला मात्र मनापासून आनंद झाला. लॉकडाऊन मध्ये मुंबईच्या फ्लॅटमध्ये बंदिस्त व्हावं लागणार नाही, इथे कमीत कमी मोकळ्या हवेत तरी जाता येईल असं तिला वाटलं.

दोघेही निवांत फोटोसेशन उरकून खाली आले. आई किचनमध्ये काहीतरी खमंग बनवत होत्या. थोडंसं इकडचं तिकडचं बोलून अजिंक्य किचनमधून पुन्हा त्याच्या रूममध्ये गेला. संपादकांच आपल्या ईमेलला काही उत्तर आलेय का ते त्याला पहायचं होतं. दादासाहेबांची प्रकृती आता तशी बरी होती. या वयातही बाहेर होणाऱ्या घडामोडींवर त्यांचं बारीक लक्ष होतं. थोडं बरं वाटू लागताच त्यांनी अजिंक्यला शेतावरच्या सर्व मजुरांना महिन्याचा पूर्ण पगार देऊन घरी पाठवून द्यायला सांगितले होते. त्यांच्या घरी मदतीला येणाऱ्या, तिथेच राहणाऱ्या संगीता आणि तिच्या नवऱ्याला मात्र आईंनी सुट्टी दिली नव्हती. अजिंक्यनेही फार विचार न करता त्यांचा निर्णय अंमलात आणला होता.

लॉकडाऊन सुरु झाल्यापासून वेळ जणू थांबली होती. मालूला तर कधी कधी वाटायचं की ती टाइम लूपमध्ये अडकलीये की काय. एक दिवस असेच दुपारी जेवणखाणं उरकून अजिंक्य आणि मालती निवांत पडले होते. संध्याकाळ होऊ लागताच बाहेर अंधारून आलं. टप टप आवाज करीत टपोऱ्या गारांचा पाऊस सुरु झाला. अगदी पाच दहा मिनिटांचा पाऊस, पण त्यानेही सगळं वातावरण प्रसन्न झालं. मालती, अजिंक्य आणि आई पाऊस सुरु झाल्यावर व्हरांड्यात बसून बराच वेळ गप्पा मारत होते. अजिंक्यच्या लहानपणीच्या आठवणी त्या मालतीला सांगत होत्या. त्यातले काही किस्से अनेकदा ऐकून ऐकून मालतीला पाठ झाले होते, पण वातावरणाचा प्रभाव असो कि मिळालेला निवांतपणा, आज तिला ते किस्से ऐकून कंटाळा आला नाही. दादासाहेबांच्या चहाची वेळ झाली तशा आई उठून आत गेल्या. अजिंक्य मात्र त्याच्याच विचारांच्या तंद्रीत हरवला होता. त्याचं असं हरवून जाणं मालतीला नवीन नव्हतं, त्यामुळे तिही काही न बोलता त्याच्यासोबत शांत बसून राहिली.

आई ज्या आठवणी अगदी रंगवून सांगत होत्या, अजिंक्यला मात्र त्या बिलकुल आठवत नव्हत्या. जणू काही कळत्या वयाचा होईपर्यंत त्यांना कुणी दुसराच मुलगा होता असं वाटावं. अजिंक्यला आठवत होतं ते दादासाहेबांच्या माणूसवेड्या स्वभावामुळे त्याची आणि आईची झालेली फरफट. गावातले बडे असामी झालेले दादासाहेब काही एका दिवसात मोठे झाले नव्हते. त्यासाठी आई आणि अजिंक्यला वेळोवेळी बाजूला सारून त्यांना इतरांना महत्व द्यावं लागलं होतं. लहान असेपर्यंत अजिंक्यला या गोष्टी जाणवल्या नाहीत पण कळता झाल्यावर त्याला दादासाहेबांचे काही निर्णय, त्यांची मूल्य त्रासदायक वाटू लागली. काही काळ त्याने आपल्या परीने वडिलांच्या या स्वभावाला मुरड घालायचा प्रयत्न केला, पण तो फिका पडला. त्यात आई दादासाहेबांच्या शब्दाबाहेर नव्हत्या. तो एकटा लढून लढून असा किती काळ लढणार होता? त्याला आठवलं एकदा आईला खूप खोकला झाला होता. तिनं तो बराच काळ अंगावर काढला शेवटी न राहवून अजिंक्य तिला तालुक्याच्या दवाखान्यात घेऊन गेला. पण दादासाहेबांनी त्याला बजावून सांगितलं होतं, अजिबात ओळख दाखवून आपला नंबर लावायचा नाही. जितका वेळ लागेल तितका वेळ थांबायचं. सकाळी घरातून निघालेले ते, दुपारी कधीतरी त्यांचा नंबर आला. तोपर्यंत आईचा खोकून खोकून चेहरा म्लान झाला होता. दुपारनंतर डॉकटर आले आणि आईला तपासून काही औषधं दिली. अजिंक्यच्या पोटात तोपर्यंत भुकेने गोळा आला होता. पण आईकडे पाहून तो सगळं सहन करत होता. डॉकटरानी कौतुकाने त्याच नाव विचारलं तेव्हा ते हसून म्हणाले होते, "अरे बाळा आधी नाही सांगायचं का? दादासाहेबांच नाव सांगून किती लोक आपला नंबर पुढे सरकवतात. उगीच ताटकळत बसलास तू." अजिंक्यला तेव्हा कीव आली होती, स्वतःचीही आणि दादासाहेबांची देखील. त्यानं तेव्हाच ठरवलं होतं ही मूल्य वगैरे सगळं आपल्या जागी बरोबर असतात. पण स्वतःच्या, आपल्या निकटच्या लोकांच्या अस्तित्वाचा जर प्रश्न उभा असेल तर प्रसंगी ही मूल्य नाकारून पुढे जायची ताकत आपल्यामध्ये असायला हवी.

त्याकाळी असं म्हणत की संपूर्ण महाराष्ट्रातलया कचेरीदफ्तरांमध्ये दादासाहेब पाटलांना ओळखत नाही असा एकही माणूस सापडणार नाही. ही अतिशयोक्ती आहे हे त्याला माहिती होतं. पण तो काही बोलत नसे. त्यांची जी काही इमेज होती त्याचा आजवर त्याला फायदाच झाला होता. नुकसान तसं काहीच झालं नव्हतं. त्यामुळे तोदेखील त्याच्या वडिलांचा किंवा गावातल्या लोकांचा गैरसमज दूर करण्याच्या भानगडीत कधी पडला नाही. सर्वांना वाटलं होतं, दादासाहेबांचा एकुलता एक मुलगा नक्कीच राजकारणात सक्रिय होणार. पण त्यानं वेगळा मार्ग निवडला. मुंबईला जाऊन त्यानं सेंट झेवियर्स कॉलेजमधून पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशनची डिग्री पूर्ण केली. पुढे मुंबईतच त्याला "आपला आवाज" पत्रकात पत्रकार म्हणून नोकरी मिळाली. अगदी सामान्य घरातून आलेल्या मुलांसारखंच त्यानं करियरमध्ये "स्ट्रगल" केलं. दादासाहेबांच्या मदतीशिवाय तो ऑफिसमधला सगळ्यांचा लाडका, कुठलीही भीड न बाळगता आपले विचार मांडणारा पत्रकार म्हणून ओळखला जाऊ लागला. फक्त प्रिंट मीडियाचं नाही तर दृकश्राव्य माध्यमंसुद्धा कुठल्याही घटनेवर "अजिंक्य पाटील" काय म्हणतो, याची वाट पहात असत. पत्रकार म्हणून तो जसा नावारूपाला आला, तसाच आणखी एका कलाप्रकारात तो मुक्तपणे मुशाफिरी करीत होता. ते म्हणजे लेखन. त्याच्या कथा, कविता समाजाच्या विविध प्रश्नांना शब्द देत होत्या. त्याच्या लिखाणात एक वेगळाच आवेश होता, त्याच्या भावना झरझर शब्दांवाटे त्याच्या मनातलं चित्र कागदावर उतरवत. त्याच्या कवितांमुळे तो साहित्य क्षेत्रातदेखील बंडखोर कवी म्हणून ओळखला जाऊ लागला. कितीही विदारक प्रसंगावर केलेली कविता असो, त्या कवितांमध्ये नव्हती ती म्हणजे हार, असहाय्य्यता. उद्याचा सूर्य वेगळा असेल ही आशा कुठल्या न कुठल्या रूपात त्याच्या कवितांमधून उतरत असे. अशाच एका कार्यक्रमात त्याला मालती भेटली होती. गव्हाळ रंगाची, बोलक्या डोळ्यांची मालती त्याला पाहता क्षणीच आवडली होती. टीवीवर, त्याच्या वर्तमानपत्रात येणाऱ्या फोटोंमुळे तिलाही तो आवडायचा. पण प्रत्यक्ष भेटल्यावर ती साखर पाण्यात विरघळून जावी तशी त्याच्यात विरघळून गेली होती. सोशल मीडियावर बरेच दिवस दोघे चर्चेत होते. शेवटी दोघांच्या घरच्यांनीच न राहवून "बाबारे, आता उरकून टाका" असं त्यांना सांगितलं होतं. आणि दोघांनीहि ही आज्ञा शिरसावन्द्य मानली होती. पाच वर्षांचा दोघांचा संसार बहरला होता. अजिंक्य म्हणजे मालूचं सगळं विश्व् झाला होता.

काळोख पडू लागला तसा तो तंद्रीतून बाहेर आला. रात्री जेवण झाल्यावर मालूला घेऊन तो पुन्हा टेरेसवर गेला. वरती आकाशात चांदण्यांचा सडा पडला होता. मुंबईच्या त्याच्या फ्लॅटमधून आकाश असं दिसतच नसे. दिसत त्या फक्त उंच उंच पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे उभ्या असलेल्या इमारती. कठड्यावर बसून त्यानं सवयीनं एक सिगारेट शिलगावली. मालून खुणेनंच नको म्हणून सांगितल्यावर त्यानं नाईलाजानं ती विझवली. सगळीकडे मिट्ट काळोख पसरला होता. तुम्हाला अंधाराची, मोकळ्या वातावरणाची सवय नसेल तर तो अंधारही जाचक वाटतो. मालूला तसंच झालं. दिवसा लोभस वाटणारा तिथला निसर्ग आता रात्री भेसूर वाटत होता.

"चल मी जाते खाली, तू लवकर ये" असं म्हणून ती वळली आणि पुन्हा थबकली. मागे वळून तिनं दूरवर नजर टाकली आणि अजिंक्यला म्हणाली,

"अज्जू, तू इथल्या सगळ्या वर्कर्सना घरी जायला सांगितलेस ना?"

"हो का ग? काय झालं?" प्रश्नार्थक चेहऱ्याने तो तिच्याकडे पहात होता.

लांबवर बोट दाखवीत मालू म्हणाली, "अरे तिथे लाईट दिसतोय. अजूनही कुणीतरी आहे इथे."

तिने दाखवलेल्या दिशेकडे पहात अजिंक्य म्हणाला, "यु आर राईट. बट इट्स टू लेट नाऊ. सकाळी बघू."

"व्हॉट इफ इट्स वन ऑफ दोज वर्कर्स? मे बी दे नीड हेल्प.. शुड वी गो अँड चेक?"

काही वेळापूर्वीच घाबरून खाली निघालेल्या मालुमध्ये इतका धीटपणा कसा आला याचं अजिंक्यला आश्चर्य वाटलं. पण ते चेहऱ्यावर अजिबात दाखवू न देता तो म्हणाला, "मालू अगं किती विचार करशील. तू असा स्ट्रेस घेणं बरोबर नाही. चल खाली जाऊया. मी राजूला पाठवून बघतो काय प्रकार आहे ते."

अजिंक्य आता लक्ष घालतोय म्हणल्यावर मालू शांत होऊन त्यांच्या रूममध्ये जाऊन पडली. राजू लगोलग जाऊन परत आला. मुंबईहून चालत आपलया गावी निघालेले काही कामगार तिथे थांबले होते. रात्र खूप झाली होती आणि वातावरण कधीही तुफान पाऊस येईल असं झालेलं. त्यांनी राजुला सगळी हकीकत सांगितली आणि सकाळ होताच तिथून जायची ग्वाही दिली. राजूने अजिंक्यला सगळं सांगितले. सकाळी निघून जातील असं सांगितल्यामुळे तो निश्चिन्त मनाने बेडरूममध्ये गेला. मालतीची केव्हाच झोप लागली होती. तिच्या शेजारी पडून अजिंक्यही लगेच निद्राधीन झाला.

सकाळी जाग आली तेव्हा मालू तिच्याजागी नव्हती. असेल आईबरोबर किचनमध्ये असा विचार करून तो काहीवेळ तसाच पडून राहिला. पण असंच नुसतं पडून राहायचादेखील त्याला कंटाळा आला म्हणून उठला. अंघोळ वगैरे उरकून बाहेर आला. मालू कुठेच दिसली नाही. अजिंक्य बाहेर आलेला पाहून आईनी त्याला चहा आणून दिला. आईनी त्याला चहा आणल्याचं पाहून अजिंक्यला थोडंसं आश्चर्य वाटलं. लग्न झाल्यापासून सकाळचा पहिला चहा मालूच त्याला आणून द्यायची. तिला मनापासून आवडायचं ते काम. एकदा दोनदा त्यानं यावरून तिला टोकलं होतं, तेव्हा मालू म्हणाली होती, "आपल्या माणसाच्या चेहऱ्यावर सकाळी सकाळी हसू बघितलं की दिवस छान जातो." तिच्या या निरागस स्पष्टीकरणावर अजिंक्यला खूप हसू आलं होतं. त्यामुळं आज आईन चहा हातात दिल्या दिल्या त्यानं विचारलं, "मालू?"

आई म्हणाल्या, "अरे ती गेली आहे आत्ताच. ते बांधापलीकडच्या झोपडीत काही कामगार आले आहेत असं म्हणाला राजू. त्यांना चहा नेऊन दे असं मी सांगितलं त्याला तर मालू म्हणाली मी पण जाते त्याच्याबरोबर. मी खूप नको म्हणलं रे पण ऐकलं नाही तिने. तेवढेच पाय मोकळे होतील म्हणाली."

"व्हॉट? ओह मालू मालू! आई तूपण ना.. अगं मला उठवायचं ना. आणि काय गरज होती त्यांना चहा नेऊन द्यायची. ते काय पाहुणे आलेत का आपल्याकडे?"

चहाचा कप तसाच खाली ठेवत अजिंक्य उठला. अजिंक्यच्या या वरवर शांत पण आतून धुमसणाऱ्या रागीट स्वभावाची आईंना कल्पना होती. पण मालू? तिच्यासाठी आज सर्वस्वी नवीन अजिंक्य तिला भेटणार होता.

तसाच पायात चपला घालून अजिंक्य भराभर चालत बांधाच्या दिशेने जाऊ लागला. अर्ध्या रस्त्यात गेला तोच गप्पागोष्टी करीत निवांत चालत येत असलेले राजू आणि मालू त्याला दिसले. कमरेवर हात ठेऊन ती जवळ येताच त्यानं मालूच्या हातातून चहाची किटली अक्षरश: ओढून खाली टाकली आणि ओरडला,

"आर यु आउट ऑफ युर माईंड? मला न विचारता का गेलीस तू बाहेर?"

अजिंक्यचा हा रुद्रावतार मालून आधी पाहिला नव्हता. अनपेक्षित झालेल्या या हल्ल्यानं ती थोडी कावरीबावरी झाली पण लगेच स्वतःला सावरीत म्हणाली,

"ही काय पद्धत आहे अजिंक्य. घरी जाऊन बोलूयात." राजूसमोर मालू आपल्याला काही बोलणार नाही असा विश्वास अजिंक्यला होता. पण मालूच्या शांत तरीही करारी शब्दात दिलेल्या उत्तरानं त्याचा अभिमान दुखावला. मालू मागे येतीये की नाही हेदेखील न पाहता तो घरी निघून गेला. मालू परत जाताना पूर्ण रस्ताभर विचार करीत होती इतकं राग येण्यासारखं काय आहे त्यात? एक चांगलं काम तर करायला गेली होती ती, त्यासाठी एवढं आकाशपाताळ एक करायची काय गरज? घरी जाऊन शांतपणे बोलू असा विचार करून ती हळूहळू चालत राहिली. घरी पोहचली तेव्हा अजिंक्यने संगीताला सांगून राजू आणि मालूसाठी गरम पाणी तयार ठेवायला सांगितले होते. त्या पाण्याने हातपाय धुऊन ती घरात गेली. आईनी तिला तू त्या कामगारांना चहा द्यायला गेलीस म्हणून अजिंक्य रागावलाय असं सांगितलं. मालूला ते अगदीच क्षुल्लक कारण वाटलं.

अजिंक्य त्याच्या रूममध्ये लॅपटॉपवर काहीतरी खुडबुड करीत बसला होता. मालू त्याच्याजवळ जाऊन बसली. बराच वेळ कुणीच काही बोललं नाही. ही शांतता कुणीतरी भंग केली पाहिजे, आपल्यावरच्या काळजीपोटीच अजिंक्य असा रियाक्ट झाला असं वाटून मालती हळूच म्हणाली,

"आज सकाळी लवकरच जाग आली. राजू बाहेर काम करीत होता. मी त्याला विचारलं काल रात्री काय झालं होतं. त्यानं सगळं सांगिल्यावर मला रहावलं नाही. गॉड नोज कधीपासून ते लोक चालत आले आहेत. म्हणून मीच सजेस्ट केलं आईंना त्यांना थोडा चहाबिस्कीट नेऊन द्यायचं. त्यांनाही आवडली माझी आयडिया. त्यांनी स्वतः मला बनवून दिला इतक्या साऱ्या लोकांचा चहा. शी इज सो ग्रेट. मला छान वाटलं त्या लोकांना मदत करून. "

"इट वॉज नॉट युअर जॉब टू डू." अजिंक्य रुक्षपणे तिला म्हणाला. तिला त्याच्या आवाजातला हा रुक्षपणा खटकला. पण तरीही नाराजी न दाखवता ती समजुतीच्या स्वरात म्हणाली, "ओके बाबा. चुकलं माझं. बट सिरियसली आय नो व्हॉट आय'म डूइंग. मी योग्य ती काळजी घेतली त्यांच्याशी बोलताना. मी काही त्यांच्या फार जवळ गेले नाही."

रागाने लॅपटॉप बंद करून अजिंक्य म्हणाला, "काही माहीत नाहीये तुला. उद्या तुला काही झालं तर कोण जबाबदार आहे? आपल्या घरी दोन म्हातारी माणसं आहेत, त्यांना काही झालं तर कोण जबाबदार आहे? द हेल यु नो! यु नो नथिंग अबाऊट एनिथिंग!"

अजिंक्यचा चढलेला आवाज आणि त्याचा आवेश पाहून मालू पहिल्यांदा घाबरली. अजिंक्य तिच्यावर कधीच रागावला नव्हता. तो तिच्याशी इतका रागवून, इतक्या चढ्या आवाजात काही बोलेल असं तिला कुणी सांगितलं असतं तर तिला ते स्वप्नातसुद्धा खरं वाटलं नसतं. पहिल्यांदा भीती आणि मग झालेलया आपल्या पराकोटीच्या अपमानाच्या भावनेनं तिच्या टपोऱ्या डोळ्यात मोठे मोठे पाण्याचे थेंब जमा झाले. ते मोठ्या निग्रहाने थोपवून ती शांतपणे म्हणाली,

"अजिंक्य! तू अपसेट आहेस हे कळतंय मला. पण तू समजून घे ना थोडं. अरे आपण मदत नाही केली तर असेच उपाशीपोटी किती दिवस चालतील ते लोक? जवळ होते ते पैसे एकतर संपले आहेत किंवा मुलांच्या दूधपाण्यासाठी जपून वापरत आहेत ते लोक.. अरे तू एकदा जाऊन बोल तर त्यांच्याशी. आय'म शुअर तुझं ओपिनियन बदलेल त्यांच्याशी बोलल्यावर. तूच लास्ट वीक एक मोठा आर्टिकल लिहला होता ना, हाऊ धिस होल सिच्युएशन इज अनफेयर फॉर देम. इट्स युअर टाइम टू डू समथिंग अबाऊट इट. आणि तू ते न करता जे करत आहेत त्यांच्यावरच रागावतो आहेस? व्हॉट इज रॉंग विथ यु?"

इतकं बोल्ल्यांनंतर मालूच्या डोळ्यातून इतका वेळ थांबवून ठेवलेलं पाणी घळाघळा वाहू लागलं. पण आज अजिंक्य उठला नाही. तिची समजूत काढली नाही. ज्या माणसाकडून त्याने बिलकुल अपेक्षा केली नव्हती, त्याच माणसाने त्याला आज दुखावलं होतं. एखाद्या माणसापासून आपण आपली प्रतिमा खूप जपून ठेवत असतो, कधी प्रेमापोटी तर कधी स्वार्थापोटी पण तेच माणूस जेव्हा शांतपणे आरसा दाखवतं तेव्हा त्याला किती यातना होत असतील? ही प्रतिमा बनवण्यासाठी आपण किती झिझलो, तिच्या डोळयांत आपल्याविषयी कधी तिरस्कार दिसू नये म्हणून आपण आपलया आत असलेलं सगळं विष आतच रिचवत राहिलो. तिला आपल्या या स्वभावाची, भूतकाळाने आपल्यावर केलेल्या आघातांची जराही झळ लागू नाही दिली आणि तीच आज आपल्या डोळ्यात डोळे घालून प्रश्न करते, हीच का तुझी निष्ठा? हीच का तुझी सो कॉल्ड "प्रिंसिपल्स?"

सकाळी अजिंक्यबरोबर भांडण झाल्यापासून मालून काहीच खाल्लं नव्हतं. दुपारी तिला कसेतरी चार घास खायला लावून आई अजिंक्यला समजवायला आल्या पण तो काहीही ऐकून घ्यायच्या मन:स्थितीत नव्हता.

संध्याकाळी अजिंक्य व्हरांड्यात बसून चहा पीत असताना त्याला मालू पुन्हा एकदा बांधाजवळून चालत येताना दिसली. आता ही आणखी कशाला गेली होती असा तो विचार करत असतानाच आई आल्या. त्याला म्हणाल्या, "मन अगदी साफ आहे रे मुलीच. इतका राग बरा नाही. अशाच माणसाबरोबर संसार केला मी. अशा मनस्वी लोकांचं जग वेगळंच असतं. आपण ते कितीही त्यांच्या चष्म्यातून पहायचा प्रयत्न केला तरी आपल्याला ते तसं दिसत नाही. म्हणून काही त्यांचं सगळं चूकच असतं असं नाही रे बाळ."

मालूसाठी पाण्याचा तांब्या आणायला त्या आत गेल्या. त्या परत येत असतांना आज बरेच दिवसांनी दादासाहेब त्यांचा हात धरून बाहेर व्हरांड्यात आले. आरामखुर्चीवर शांतपणे रेलून बसत ते घराजवळ आलेल्या मालूला म्हणाले, "किती दगदग करायची त्या जीवाला. जरा आराम करा."

अजिंक्यकडे पाहून न पाहिल्यासारखे करीत ती म्हणाली, "एवढे दिवस आरामच केला. आता कुठे कामं दिसू लागली आहेत."

"हम्म स्टेटसला लावायला चांगलं आहे वाक्य."

त्याच्या आवाजातला कुत्सित टोन जाणवून मालूने त्याच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. तिला वाटलं इतके दिवस आपण या माणसावर प्रेम केलं पण त्याला आपण खरंच कशा आहोत हे कळलेलंच नाही.
वातावरण पुन्हा तंग होत असल्याचे लक्षात येताच आई दादासाहेबांना म्हणाल्या, "चला, वाऱ्यात बसू नका फार वेळ. " आईंचा हात धरून दादासाहेब हळूहळू पुन्हा आत गेले.

"मला वाटत मी तुला स्पष्ट सांगितलं होतं, पुन्हा तिकडे न जाण्याबद्दल. मग का? तू जर ठरवलंच असेल यावरून मला त्रास द्यायचा तर मी तरी कोण आहे तुला रोखणारा म्हणा.. करा आपली मनमानी."

दूर बांधावरच्या झोपडीकडे नजर लावून बसलेली मालू म्हणाली, "त्या लोकांमध्ये एक गरोदर बाई आहे. लक्ष्मी नाव आहे तिचं. सेकण्ड ट्रायमेस्टर. तिनं सकाळी मला हात जोडून विचारलं होतं, ती खूप थकली आहे. अजून चालण्याचं त्राण नाही तिच्यात. अजून थोडे दिवस ती आणि तिचा नवरा दोघे राहिले तर चालेल का? मी तिला तेव्हाच जितके दिवस वाटेल तितके दिवस रहा असं सांगून आले होते. तिथून आल्यानन्तर तू जे तांडव केलंस त्यात त्यांना जेवण पाठवायचंपण लक्षात नाही माझ्या. संगीताच्या लक्षात आलं म्हणून तिनंच त्यांना थोडंफार शिल्लक जे होतं ते नेऊन दिलं. त्या बाईनी काय केलं माहिती? ती हात जोडून म्हणाली आता एकवेळ दिलंत ते उपकार झाले आमच्यावर. आम्ही आधीच तुमच्या जागेवर राहिलोय. अजून त्रास नाही देणार तुम्हाला. तुम्ही मला थोडाफार सामान द्या मी आणि माझा नवरा जमेल ते रांधून खाऊ. पण तुम्ही त्रास करून घेऊ नका. कॅन यु बिलिव्ह इट? आता मी तिकडे गेले होते ना तर त्या नवराबायकोनि सगळं घर अंगण झाडून स्वच्छ केलंय. एका कोपऱ्यात चूल मांडली आहे. इतक्या त्रासातून जात असूनही शी इज ग्लोइंग. शी इज हैप्पी. उद्या या जगात येणाऱ्या त्यांच्या बाळाचं काय भविष्य असेल काय माहिती. पण ते या सगळ्या चिंता आता धरून बसले नाहीयेत. फक्त आजचा दिवस त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. "

एवढं बोलून मालू आत गेली. तिचं बरचसं बोलणं पटत असूनही अजिंक्यने तिला कधीही सॉरी म्हणलं नाही. त्याचा पुरुषी अहंकार आड येत होता की आपणच गोष्टी खूप ताणतोय हे मालूला कळत नव्हतं. लॉकडाऊनमध्ये बाळाची चाहूल लागल्यावर आपण अजून एकमेकांच्या जवळ येऊ, आपलं एक सुखी कुटूंब असेल हे तिचं स्वप्न धुळीस मिळालं होतं.

यथावकाश काही दिवसांनी ट्रेन सुरु झाल्यानंतर ते जोडपं त्यांच्या गावी जायला निघालं. मालूला ते गेले त्यादिवशी खूप एकटं एकटं वाटलं. इतक्या दिवसांत तिला सवय झाली होती त्यांच्या तिथे असण्याची. अजिंक्य अजूनही आपला आवाजमधून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम इमाने इतबारे करतोय. फक्त मालूला जाणवणारी त्यातली धग आता कमी झालेय इतकेच.

कलाकथा

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

31 May 2020 - 3:07 pm | टवाळ कार्टा

अप्रतिम....

ऋतुराज चित्रे's picture

31 May 2020 - 3:37 pm | ऋतुराज चित्रे

ओघवतं अप्रतिम लिखाण

यश राज's picture

31 May 2020 - 4:29 pm | यश राज

अप्रतिम लिखाण.
त्याचबरोबर कळफलक दाबुन नुसती पोकळ कळकळ दाखवणारे व खरच मदत करु इच्छीणारे रादर करणारे यांच्यावर तुम्ही मार्मिकरीत्या बोट ठेवले आहे.

गणेशा's picture

31 May 2020 - 5:05 pm | गणेशा

अतिशय ओघवते लिखान

सामाजिक दृष्टीकोन आहेच.. पण नात्या नात्या मधील अनेक कंगोरे किती सुंदर पध्दतीने सांगितले आहेत.. निव्वळ अप्रतिम..
हात हातात घेवून वरती घेवून जाणारा नवरा .. आणि बांधावर तीला पाहुन ओरडणारा नवरा.. किती करेक्ट..
बाप, आई ..सुन.. बायको.. नवरा..मुलगा.. किती नाती सुंदर पणे दिसतायेत.

त्या थांबलेल्या लोकांचे मन आणि भाव भारीच ...

प्रचेतस's picture

31 May 2020 - 5:12 pm | प्रचेतस

हेच म्हणतो
उत्कट लेखन आहे.

Prajakta२१'s picture

31 May 2020 - 5:38 pm | Prajakta२१

+१११११११११११

मोगरा's picture

31 May 2020 - 6:31 pm | मोगरा

मनामनाचे तरंग!
सुंदर.

-
मोगरा

सतिश गावडे's picture

31 May 2020 - 6:46 pm | सतिश गावडे

मानवी भावभावनांचे कंगोरे, नात्यांमधील गुंतागुंत आणि अपेक्षांचे हेलकावे इतक्या सुरेख पद्धतीने मांडले आहेत. प्रसंगांचे वर्णनही खुप छान केलं आहे.

कानडाऊ योगेशु's picture

31 May 2020 - 8:34 pm | कानडाऊ योगेशु

अप्रतिम! एक शॉर्ट फिल्म नक्कीच होऊ शकते ह्यावर!

फारएन्ड's picture

31 May 2020 - 8:57 pm | फारएन्ड

आवडली कथा.

मराठी कथालेखक's picture

31 May 2020 - 11:51 pm | मराठी कथालेखक

अरे वा तुम्ही पुन्हा लिहित्या झाल्यात..
तुमची एक कथा अपुर्ण राहिली आहे, ती पुर्ण करा ना प्लीज.

रातराणी's picture

2 Jun 2020 - 10:16 am | रातराणी

हो, नक्की प्रयत्न करेन. :)

संजय क्षीरसागर's picture

1 Jun 2020 - 12:44 am | संजय क्षीरसागर

इतकं ओघवतं लेखन आंतरजालावर सहसा वाचायला मिळत नाही.

छान लेखनशैली आहे.

लिहीत रहा !

चांदणे संदीप's picture

1 Jun 2020 - 2:00 am | चांदणे संदीप

रातराणीतै इज ब्याक आफ्टर खूप टाईम! :)

पहिला प्यारा वाचून बाजूला ठेऊन दिलं होतं, नंतर वाचूया म्हणून. सामाजिक काहीतरी दिसतेय असे वाटले होते. पण आत्ता रात्री काम संपल्यानंतर सहज पुन्हा वाचायला घेतले आणि संपवूनच प्रतिसाद लिहायला घेतला.

अप्रतिम! ___/\___

सं - दी - प

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Jun 2020 - 1:10 pm | ज्ञानोबाचे पैजार

वेलकम ब्याक ताई

जबरा म्हणजे एकदम जबरा लिवले आहे.

एका दमात सगळी गोष्ट वाचली.

संदिप सारखा मी पण पहिल्या प्यार्‍या मधे जरा अडखळलो होतो, पण वाचत गेलो आणि मग वाचतच राहिलो. सुरेख आणि समयोचित...

आता लेखणी खाली ठेउ नका लिहित रहा

पैजारबुवा,

सिरुसेरि's picture

1 Jun 2020 - 2:54 pm | सिरुसेरि

सुरेख कथन .

कथा अगदी भिडली. मनस्वींची मानसिकता समजून घेणारे फार फार विरळा.
बाकी रारा , पुनरागमन दमदार !

कोण's picture

1 Jun 2020 - 7:27 pm | कोण

खुप सुन्दर कथा

सुंदर लिहिलंय. मनात मदत करावी असं वाटणं त्यबद्दल, आंतरजालावर लिहिणं आणि स्वतः प्रत्यक्षात वेळ पैसा खर्च करून मदत करणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे. छान ओघवतं लिहिलंय.

सुमो's picture

2 Jun 2020 - 5:49 am | सुमो

अतिशय आवडली कथा.

अभ्या..'s picture

2 Jun 2020 - 7:42 am | अभ्या..

अप्रतिम लेखन रातराणी,
ह्या मनस्वी आणि तरल लेखणीला आपला त्रिवार सलाम.

शेखरमोघे's picture

2 Jun 2020 - 8:37 am | शेखरमोघे

सुन्दर लिखाण!!

अनिंद्य's picture

2 Jun 2020 - 9:45 am | अनिंद्य

लेखन आवडले

सर्वांना मनापासून धन्यवाद :)

रुपी's picture

3 Jun 2020 - 10:53 am | रुपी

खूप सुंदर! मीही पहिला परिच्छेद जरा उरकता घेतला की कथेऐवजी या वेळी वेगळं काही लिहिलं आहे की काय :)
पण बाकी कथा आणि लेखनशैली फारच छान!

गामा पैलवान's picture

4 Jun 2020 - 6:49 pm | गामा पैलवान

रातराणी,

कथा फारशी आवडली नाही. भाकितेय ( = परिचित वळणाची) वाटली. पाल्हाळ खूप लावलंय.

मात्र तरीही कथा चांगली आहे. कारण की कथा वाचून विचारचक्रास चालना मिळाली. कथा आवडती असो वा नावडती, जर विचारप्रवृत्त करणारी असेल तर ती चांगलीच असते.

कथेतनं कम्युनिस्ट चळवळीचं रूपक प्रभावीपणे व्यक्त झालेलं वाटतं. धन्यवाद! :-)

आ.न.,
-गा.पै.

उपेक्षित's picture

5 Jun 2020 - 2:09 pm | उपेक्षित

अतिशय टोकदार आणि वास्तववादी लिखाण, खूप दिवसांनी असे काही वाचायला मिळाले.

सर्व नवीन प्रतिसादकांची आभारी आहे.
@गा.पै: आपल्या मताचा व सूचनांचा आदर आहे. पुढील लेखन अधिक सफाइदार असेल असा प्रयत्न करेन.

सर्व नवीन प्रतिसादकांची आभारी आहे.
@गा.पै: आपल्या मताचा व सूचनांचा आदर आहे. पुढील लेखन अधिक सफाइदार असेल असा प्रयत्न करेन.

माझ्यातल्या (उरल्यासुरल्या) पुरुषी नवरोबा अहंकाराला अंतर्मुख व्हायला लावणारी कथा. आपण सगळेच बऱ्याचदा सोयीस्कर भूमिका घेत असतो. त्यावरचे भाष्य आवडले. पुन्हा लिहित्या झाल्याबद्दल मनःपूर्वक आभार.

बिपीन सुरेश सांगळे's picture

11 Jun 2020 - 9:20 pm | बिपीन सुरेश सांगळे

उत्तम लेखन

कपिलमुनी's picture

24 Sep 2021 - 12:45 pm | कपिलमुनी

ही कथा वाचनातून सुटली होती.

आज मिपाकरांच्या वाचनखुणा धाग्यामधून सापडली.