लेखनक्रिया : लिहून की बोलून ?
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
सध्याच्या टाळेबंदीच्या काळात आपण घरकामे आणि विविध छंद यात मन रमवित आहोत. बरेच जण या निमित्ताने एखादी नवीन कला देखील शिकत आहेत. यातून स्फूर्ती घेऊन मी देखील एक कला शिकत आहे. ती शिकत असतानाच हा लेख लिहीत आहे. काही अंदाज येतोय का या कलेबद्दल ?
ठीक आहे. आता सांगतोच.
ही कला म्हणजेच संगणकावर हाताने टंकन न करता आपल्या बोलण्याद्वारे हे टंकन करीत आहे. बरेच दिवसांपासून याबद्दल ऐकत होतो. या पद्धतीत आपल्या हातांना आराम मिळणार असतो, म्हणून याचे आकर्षण होते. काही काळापूर्वी असे ऐकले होते की, मराठी लेखनाच्या बाबतीत ही सुविधा इंग्लिश इतकी अजून प्रगत झालेली नाही. तसेच अशा मराठी लेखनात विरामचिन्हे मात्र बोलून टंकता येत नाहीत. तसे ऐकल्यावर मी या सुविधेपासून लांबच राहात होतो. परवा एकदा मिपाकर प्रकाश घाटपांडे यांच्याशी संवाद केला होता. त्यांच्याकडून असे कळले, की आता ही बोल-लेखन सुविधा मराठीत देखील खूपच विकसित झालेली आहे. त्यांनी स्वतः एक मोठा लेख याप्रकारे पूर्ण लिहिला होता. विरामचिन्हे आपल्यालाच टंकावी लागतील, असे त्यांनी सांगितले. तसेच अशा लेखनात साधारण दहा टक्के मजकूर हातानेच टंकून संपादित करावा लागेल, असेही समजले.
एखादा लेख लिहिताना ९० टक्के काम बोलूनच होईल, हा भाग नक्कीच आकर्षक वाटला. मग काल रात्री हे नवे तंत्र शिकून घेतले.
आज प्रथम एक छोटा प्रतिसाद अशा प्रकारे टंकलिखित केला. मग हुरुप आला. म्हणून या विषयावर एक छोटा लेख लिहून पाहत आहे.
या निमित्ताने माझ्या लेखन प्रकाराचा थोडक्यात आढावा घेतो आणि त्यातले काही अनुभव सांगतो. सन २०१५ पूर्वी मी सर्व लेखन हस्तलिखित करीत असे. तेव्हा ते फक्त छापील माध्यमांसाठीच पाठवीत असे. आपण लिहिताना एकीकडे विचार विचार करीत असतो. त्यानुसार हातांना संदेश मिळून ते काम करतात. ही लेखनाची अगदी नैसर्गिक पद्धत आहे. त्यामुळे अशा लेखनाचा माझा वेग सर्वाधिक असतो. आजही मला जर एखादे लेखन एकटाकी करायचे असेल, तर मी हातानेच लिहिणे पसंत करेन. आपले विचार आणि हस्तलेखन यांच्यातील समन्वय जबरदस्त असतो. या लेखनात आपली लेखणी अक्षरशः सशासारखी पळते. अर्थात असे लेखन करताना हाताची फक्त तीनच बोटे वापरली जातात आणि त्यामुळे त्यांच्यावर खूप ताण येतो.
२०१६ पासून मी संगणकावर टंकलेखन करून स्वतंत्र लेख लिहिण्यास सुरुवात केली. सुरवातीस हे लेखन दमादमानेच करायचे होते. म्हणून प्रथम ते ऑफलाईन करण्याचे शिकलो. तेव्हा डेस्कटॉप वापरत होतो. त्यावर टंकताना हातांना ऐसपैस जागा मिळते खरी. पण त्याच बरोबर बोटे कळफलकावर अक्षरश आपटत असतात. त्यामुळे एका बैठकीत दीर्घ लेखन होऊ शकत नाही. म्हणून एका वेळेस फक्त अर्धा तास लिहित असे. त्यानंतर बोटांना थोडेसे दाबावे लागे आणि त्यांची उघडझाप करून व्यायाम करावा लागे.
गेल्या वर्षी मी डेस्कटॉप चा त्याग करून लॅपटॉप घेतला. काही आधुनिक संगणक सुविधांसाठी हे नक्कीच फायद्याचे आहे. आता यावर टंकलेखन करू लागलो. बोटांच्यासाठी एक सुखद बदल लगेच जाणवला. पूर्वी जी बोटे बोर्डवर अक्षरशः आपटत असंत, त्यांना आता एक प्रकारे मुलायम स्पर्श जाणवू लागला ! या सुखामुळे आता टंकन बऱ्यापैकी आरामदायी झाले. मग लेखनाचा हुरूप वाढला. आता एक गंमत असते. एखादी कृती सुखावह झाली की आपण ती अधिकाधिक करू लागतो. कालांतराने असे लक्षात येते की आपण आपले श्रम वाढवूनच ठेवले आहेत ! त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली की टंकन दीर्घ काळ केल्यास बोटांना ताण हा पडणारच. त्यानुसार लेखन करताना योग्य अंतराने विश्रांती घेतलेली बरी.
अलीकडे काही जणांकडून या बोल-लेखन सुविधेबद्दल ऐकत होतो. त्यात हळूहळू बऱ्याच सुधारणा होतं असल्याचे समजत होते. पण काहीही नवे शिकण्याचा आळस मला त्यापासून लांब ठेवत होता. तसेच या पद्धतीत एकेक शब्द सुटा सुटा व्यवस्थित उच्चारणे आवश्यक असते. त्यामुळे लेखनाचा वेग खूप मंदावणार हे उघड होते. अशात सध्याची घरात सक्तीने बसण्याची परिस्थिती निर्माण झाली. नेहमीच्या भाषाविषयक छंदांमध्ये मन रमवित होतोच. त्या जोडीला जालावरचे चित्रपट पाहणेही चालू आहे. तरीही असे वाटत राहिले की या काळात काहीतरी नवे शिकूयाच. आता नेहमीच्या व्यवहारात नसलेली पूर्णपणे नवीन गोष्ट शिकायला नको वाटते. म्हणून असे ठरवले, की आपल्या लेखन छंदालाच उपयोगी पडेल अशी ही नवी कृती शिकावी.
आता नवे नवे शिकत असल्याने अगदी मजा येत येत आहे. त्याच बरोबर आपले उच्चार आणि समोर उमटणारी अक्षरे यांच्यातील काही गमती जमती ती देखील नजरेस पडत आहेत. त्या पाहून अंमळ मजाही वाटते आहे. नमुन्या दाखल काही उदाहरणे देतो:
( प्रथम माझा उच्चार आणि यापुढे प्रत्यक्ष उमटलेले शब्द)
१. स्फूर्ती : टाकली
२. शिकत : चिकन
३. अक्षरशः : अक्षर शहा / शहर शहा
४. पसंत : वसंत…..
आहे की नाही हे हे मजेदार?
एकाक्षरी शब्द दोनदा पडणे हे तर फार फार होते बुवा !
अजून एक जाणवले. ‘की’, ‘ही’ सारखे एकाक्षरी शब्द बरेचदा जाम उमटत नाहीत. मग आपण चिडून संगणकावर ओरडतो ! पूर्वीचे टंकन आणि आणि ही सुविधा यात अजून एक महत्त्वाचा फरक आहे. वर्डमधील टंकन हे ऑफलाईन करता येते. त्यामुळे ते करताना आपल्या जालसुविधेचा वेग वगैरे गोष्टींचा विचार नसतो. तसेच टंकनासाठी आपला डेटाही खर्ची पडत नाही. याउलट बोल सुविधातील लेखन खूप हळू होत असल्याने डेटा खर्च होतो. तसेच मधून मधून जाल सेवेचा वेग कमी होत असतो. त्यामुळे हे लेखन मध्ये मध्ये अडते. हळूहळू या या प्रकाराचा सराव वाढल्यावर अजून मजा येईल असे वाटते. एकीकडे टंकनश्रम कमी करण्याच्या नादात दुसरीकडे संपादनाचे कष्ट बरेच वाढताहेत, असे आता तरी वाटत आहे.
सहज जाणवलेला एक मुद्दा. आपण टंकनक्रिया शांतपणे करू शकतो. त्यामुळे आजूबाजूच्या कुणाला आपला त्रास नसतो. बोलसुविधेत पुरेसा खाजगीपणा आवश्यक ठरतो. मग घरात आपल्या खोलीचे दार लाऊन बसावे लागते.
आपल्यातील बरेच जण संगणक तंत्रज्ञानात कुशल आहेत. त्यातील काहीजण ही सुविधा वापरत असतीलच. तेव्हा तुमचेही यातले अनुभव जाणून घेण्यास उत्सुक.
… हा लेख नव्या प्रकारे शिकून लिहिल्याने छोटाच ठेवत आहे. शेवटी नवशिकेपणाच्या मर्यादा असतातच.
धन्यवाद !
**************************************
प्रतिक्रिया
छान
धन्यवाद, प्रा डॉ
हे फक्त क्रोमवर होते. अन्य
मला
बोलसुविधेत पुरेसा खाजगीपणा आवश्यक ठरतो.
नैसर्गिक भाषा प्रक्रिया (NLP)
२०२५ च्या आधीच सध्याचे
हेच म्हणायचं होतं...
सर्वांना धन्यवाद !
पुरेसा डाटा
एक अतिरेकी विचार
लेखन एकटाकी करायचे असेल, तर
थोडेसे "स्पीच टू टेक्स" ह अ
"बोलून-लेखन" हे तंत्र शिकून
धन्यवाद ,
सरस संस्थळ ..
टंकन: एक कंटाळवाणी क्रिया
माझं सुद्धा तुमच्या सारखंच
टर्मिनेटर,
छान!
छान!
हस्तलेखन हवेच !
आश्चर्यकारक ..
परीक्षा..
खरंतर मराठी टंक लेखनासाठी
बरेचसे शब्द स्पष्ट
सर्व काही ज्ञान वाटत नाहीत
लेख
लीपी आपलीच असताना ती आपल्यालाच चक्क लिहावी लागते
गमतीजमती
"स्पीच टू टेक्स्ट "चे काही
व्ही एस आर
हं
त्यात काय चुकले? विषयानुरूप
...
डॉ कुमारेकसर,
नवे तंत्रज्ञान : चॅट-जीपीटी
त'वरून ताकभात जुने झाले.