गोव्याहून पत्र

अभिनव प्रकाश जोशी's picture
अभिनव प्रकाश जोशी in जनातलं, मनातलं
10 Apr 2020 - 4:03 pm

अ.प्र. जोशी
चिमुलवाडा, गाव सावरगाव
गोवा

प्रति,
सर्व वाचकांस

२ -४ -२०२०

विषय: थेट चिमुलवाड्यावरून

कित्ती तरी दिवस सरकाराग्रहास्तव घरीच असल्याने आणि एन तेन प्रकारेन सगळ्याच बाजूंनी कोरोना कम कोविड नाईन्टीन आणि इतर बातम्या ऐकून वाचून एवढा वीट आला आहे कि "चिमुलवाडा आणि कोरोना" असे शीर्षक खोडून तुम्ही वाचलेत तसे पत्र छापले आहे. चिमुलवाड्यावरील लोकडोवनचे ३ दिवस झाले आहेत. तर, वाड्यावरील जनतेच्या एकूण स्तिथीचा आढावा ह्या लेखातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी ह्या महामारीमुळे नाही म्हटले तरी असे एक मरगळीचे वातावरण तयार झालेले आहे. म्हणजे बघा ना दुधाच्या ८-१० किटल्या हातात झेलवत गांधींपेक्षाही जोरात चालणाऱ्या बाळ्याचा वेग बराच कमी झालेला आहे ! ( बाळ्या गांधींपेक्षाही जोरात चालतो असे पांचट वर्णन गांधींना प्रत्यक्ष बघितलेले कै. गोविंद मामाच करू शकतात !; बाकी चिमुलवाड्यावर गोविंद मामा सोडून गांधींना प्रत्यक्ष कोणी पाहिल्याचे ऐकिवात नाही) रांगेचे कारण देऊन बाळ्या सगळ्यांच्या संयमाची परीक्षा घेतो आणि सगळ्यांनी न राहावल्याने फुटी चहा घेतली की काहीच वेळात दूध घेऊन पोचतो! ३ मिनिटात ताट साफ करणाऱ्या गावकर काकू आता जेवायला बसल्या कि दिड तास उठत नाही अशी एक अफवा चिमुलवाड्यावर पसरलेली आहे; बाकी तसेही एकंदर परिस्तिथी बघता गावकर काकूंना वजनाचे दिड शतक गाठण्यासाठी पोषक असे वातावरण तयार झालेले आहे. सकाळ दुपार संद्याकाळ रात्र तशी शांतताच असते. भक्तीरुप दिगंबर काका सकाळी सकाळी भूपाळी म्हणायला बसतात आणि वाडा उठतो. मग हळू हळू बाळ्या किटल्या घेऊन, दूध सोसायटी बंद असल्याने रामा गवळ्याच्या गोठ्यात दुधाला जातो. पहिल्या दिवशी रामा गवळ्याने "सोशल डिस्टंसिन्ग" चुकीच्या अर्थाने मनावर घेत दुधच काढले नाही ! मग मात्र गोमुत्राची अफवा बायकोन सांगताच तो गाईला शिवला . कुमार भाऊंनी पहिले ३ दिवस सक्काळी सावरगावि जाऊन रांगेत राहून भाजी आणली; येऊन परत झोपले. बाकी सगळ्यांनी जाऊन धोपेश्वरकरांच्या फार्मासीतून सॅनिटायझर खरेदी केले असलेले, तरी त्यात मद्यार्क(अल्कोहोल) असते हे समजताच गुत्त्यातल्या रेगुलर मंडळींनी जाऊन बाळकडूच्या २ -२ बाटल्या घरी आणून ठेवल्या. "बाळकडू पिल्यास तुम्हास काही होणार नाही" असे आठवा कप वर धरत प्राण्यांचे डॉक्टर नाईकांनी सांगताच सगळ्यांनी तशी कृती केली होती. काका कामत आणि विघ्नेश पुन्हा नव्या हाटेलाचे काम काढणार आहेत अशी बाळ्याने वाड्यावर फाम घातली आहे. जयओम शिवशक्ती फरसाणचे संस्थापक श्रीयुत कर्वे यांनी तीनही दिवस लागून ९ फरसाण पाकिटे फास्ट केल्याने आता चवथ्या दिवशी बादली उचलून उचलून त्यांचा हात दुखू लागला आहे ! काहीच काम नसल्याने खिडकीत बसून कुमार कर्वे याने "बाबांनी प्रातर्विधी केंद्राच्या १३ वाऱ्या केल्या आहेत, मी १२ बघितल्या; पण मी स्वतः एक वारी केली तेव्हा बाबांनीही केली असावी- ती धरून १३ !" असे स्पष्टीकरण दिले. इन्स्पेक्टर खट्याळ आणि हवालदार गजा हे तसेही स्टेशन मध्ये रोजच क्वांरंटाईन असल्याने त्यांना खास असा फरक पडला नसावा ! विसूभाऊंनी भक्तिरूप दिगंबर काकांच्या सल्ल्यावरून २०० पानी वही "श्री राम जय राम, जय जय राम" ने भरण्याचा संकल्प सोडलेला आहे अशी बातमी बाळ्याने आणलेली आहे. सावईकर नेहमीप्रमाणे वहिनींच्या पदराकडेच स्वयंपाकघरात असतात, आपण नवीन डीशी शिकू असे त्यांनी ठरवले होते, पण मारवाड्याने किराणा दुकान बंदच ठेवल्याने त्यांच्या बेताला वाळवी लागली होती. चिमणे आजोबा रोज देवळात बसून खडीसाखरेचे दाणे मेजतात अशीही बातमी बाळ्याने आणली आहे. भानुदासाने घरामागच्या परसात मागच्या वर्षी जमवलेल्या तांबड्या भाजीच्या बिया पेरल्या असून, रोपेही दिसू लागली आहे अशी बातमी होती. पण रोज ती किती वाढली हे भानुदास ती रोपे उपटून त्यांची लांबी मोजत असल्याने त्याचे पीक येण्याची काही लक्षणे दिसत नाहीत असे बाळ्याने सांगितले. बाकी हे संकट लवकरात लवकर दूर होवो अशी प्रार्थना आम्ही देवकीकृष्णांकडे केली आहे !
आपला कृपाभिलाषी
अ.प्र. जोशी
आजीला मी संपूर्ण पत्र वाचून दाखवले आणि आजीने जपमाळ हातात असल्याने प्रतिक्रियात्मक मान हलवली, ज्याचा मी चांगलाच अर्थ धरला.
"आजी खाली ताक आहे"- मी म्हटले
"मग पी तर !"-शांतपणे आजी
शेवटी ताक म्हणजे ताजा कलम असे म्हणत मी "वाचणाऱ्या सगळ्यांना विचारलें म्हणून सांग" असा चिमणे आजोबांचा तो ताकही वाचून दाखवला, आणि हात धुतले !

विनोदलेख

प्रतिक्रिया

कंजूस's picture

10 Apr 2020 - 5:19 pm | कंजूस

गोवेकाराचें पत्र आवडले.

अभिनव प्रकाश जोशी's picture

10 Apr 2020 - 5:22 pm | अभिनव प्रकाश जोशी

देव बरें करू ; धन्यवाद !

ज्योति अळवणी's picture

11 Apr 2020 - 11:07 am | ज्योति अळवणी

मस्त...

आवडले तुमचे पत्र

अभिनव प्रकाश जोशी's picture

11 Apr 2020 - 10:54 pm | अभिनव प्रकाश जोशी

खूप धन्यवाद !

जव्हेरगंज's picture

17 Apr 2020 - 7:33 am | जव्हेरगंज

सॉलिड ह्युमर आहे तुमच्या लेखनात!!
लिहिते राहा!!
"आजी खाली ताक आहे"- मी म्हटले
"मग पी तर !"-शांतपणे आजी

=)))))