संन्यास

चलत मुसाफिर's picture
चलत मुसाफिर in जे न देखे रवी...
3 Apr 2020 - 10:18 am

दिन मावळला, छाया दाटे
क्लांत मनाला भीती वाटे
दिवसभराचे रोकड संचित
कमावले, की कधीच नव्हते?

भवताली गर्दी ओसरते
स्तब्ध एकटे पंखे, पलिते
फडफड कोरी मेजावरली
काय कुणा ती सांगु पाहते..?

होते काही रेशिमधागे
आले कुठुनी मागे मागे
हातावरती विसावलेले
होते का, की कधीच नव्हते..?

सोबत होती तुझी सावली
खट्याळ, मोहक, श्यामसावळी
अखेरचा अंधार पसरता
असेल का, की साथ सोडते?

प्रवास आता मुक्कामाचा
शोधायाचा मार्ग स्वतःचा
सामानाचे ओझे टाळुन
घेतो सोबत हास्य तुझे ते

परतीचा रथ तयार आहे
काळ सारथी वळुनी पाहे
मिटू लागते किवाड, खिडकी
पैलतिरी घर वाट पाहते..

कविता

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

3 Apr 2020 - 10:39 am | चांदणे संदीप

सुंदर रचना. अतिशय आवडली.

सं - दी - प

चलत मुसाफिर's picture

3 Apr 2020 - 12:55 pm | चलत मुसाफिर

प्रोत्साहनासाठी.

सतिश गावडे's picture

3 Apr 2020 - 1:02 pm | सतिश गावडे

कवितेचा आशय नाही आवडला, उदासिनता आहे आशयात. मात्र रचना म्हणून खुपच सुंदर आहे कविता.

चलत मुसाफिर's picture

3 Apr 2020 - 1:50 pm | चलत मुसाफिर

'हा' मुक्काम हलवून पैलतीरी जावे लागणार अशी एक अपरिहार्य जाणीव निवेदकास झालेली असल्यामुळे औदासीन्य ओघाने आलेच.

रचना तुम्हाला आवडली हे वाचून आनंद झाला. वास्तविक माझी मराठी शब्दसंपदा तशी मर्यादितच आहे.

आवडेश! पण पैलतीरी जायचंय यात औदासिन्य असायलाच हवं असं काही नाही! :-)

या रचनेवरून एक मागे लिहिलेली द्विपदी आठवली..

खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव,
पैलतीरी उभा माझ्या विठ्ठलाचा गाव!

चलत मुसाफिर's picture

7 Apr 2020 - 1:22 pm | चलत मुसाफिर

तुमच्या ओळी आवडल्या.

पैलतीराकडेच आपला प्रवास आहे याची जाणीव प्रत्येकाने बाळगावी. पण तो प्रवास करताना जगन्नियंत्याने ऐलतीरावर निर्माण कैलेले सृष्टीचे व मायेचे अदभुत सौंदर्य दृष्टीआड करू नये.

सतिश गावडे's picture

7 Apr 2020 - 2:12 pm | सतिश गावडे

सध्या जगन्नियंता रजेवर आहे. त्यामुळे मानवाला ऐलतीरावरील आपली लढाई आपणच लढावी लागत आहे. :)

चलत मुसाफिर's picture

7 Apr 2020 - 3:26 pm | चलत मुसाफिर

जगन्नियंता रजेवर वगैरे नाही, कार्यालयी हजर आहे आणि जगगाडा हाकत आहे. आपणच आपल्या चुकीने तोल सुटून खाली पडायचा व चाकाखाली येण्याचा धोका निर्माण झाला आहे इतकेच.

चलत मुसाफिर's picture

18 Apr 2020 - 8:09 pm | चलत मुसाफिर

या कवितेतील निवडक ओळींना माझा मावसभाऊ कपिल रानडे यांने चाल लावली व त्याचे मित्र श्रीकांत जोशी यांच्या आवाजात ती ध्वनिमुद्रित केली. तसेच कपिलने स्वतः चित्रित केलेला समर्पक व्हिडिओही त्याला जोडला. हा व्हिडिओ यूट्यूबवर पहाता येईल.

दुवा येणेप्रमाणे https://youtu.be/KFGnUMWnCgk