मिलिंदमिलन

मायमराठी's picture
मायमराठी in जे न देखे रवी...
16 Feb 2020 - 12:10 pm

नशिबात पापण्यांच्या मिटणे अजून नाही
धुरळाही द्वारकेचा का दारात येत नाही
ग्रीष्मात वाहते यमुना भिजे विरहात ओली
नयनांत राधिकेच्या अश्रू दिसणार नाही

"क्षण एक आसवांचा झेलू अशी कशी मी
अवचित येई स्वारी पाहू त्याला कशी मी?
हृदयातल्या रणाला थांबवू आता कशी मी
झाकूनही दिसावी त्या मूर्तीस लपवू कशी मी?"

मग कृष्णही महाली तुळशीस काही सांगे
अंगणात राधिकेच्या रुजले नवीन धागे
देहात पाकळ्यांच्या सजली अशी कळी ती
गोकुळीचे सुगंधी श्वास द्वारकेस जाती

माया त्याची स्वयंभू भ्रमरात कृष्ण होई
गुंजारवे अलिच्या बासरीच ऐकू जाई
गात्रीं येता गहिवर हृदयाची होई घाई
किरणे टाकीत मागे हरी वृंदावनी येई

येता मिलिंदमाधव कळी आसवांत न्हाली
थबके काळही थोडा युगं क्षणांची लोटली
गळल्या पाकळ्या साऱ्या राधाही न उरली
'मी'पणास त्यागुनी ती श्रीहरीमनीं मुरली

- अभिजीत

प्रेमकाव्य

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Feb 2020 - 12:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुंदर रचना. आवडली.

-दिलीप बिरुटे

नशिबात पापण्यांच्या मिटणे अजून नाही
धुरळाही द्वारकेचा का दारात येत नाही

...

देहात पाकळ्यांच्या सजली अशी कळी ती
गोकुळीचे सुगंधी श्वास द्वारकेस जाती

...

गळल्या पाकळ्या साऱ्या राधाही न उरली
'मी'पणास त्यागुनी ती श्रीहरीमनीं मुरली

लईचं भारी

राघव's picture

19 Feb 2020 - 5:39 pm | राघव

खूप सुंदर कल्पना आहेत..! थोडा बदल करून मांडण्याचा प्रयत्न केलाय. आगाऊपणाबद्दल क्षमस्व.

===

नशिबात पापण्यांच्या मिटणे अजून नाही
धुरळाही द्वारकेचा [का?] दारात येत नाही..!
भिजुनी विरहात ओल्या.. ग्रीष्मात यमुना वाही..
नेत्रांत आर्जवाचे अश्रू उभे.. प्रवाही..

"अश्रूंस बांध नाही.. अडवू तयां कशी मी?
अवचित श्रीहरी येता, पाहू तया कशी मी?
हृदयातल्या दुहीचे रण थांबवू कशी मी?
अद्वैत मूर्त जेथे.. लपवू तया कशी मी?"

तुळशीस कृष्ण सांगे हलकेच गूज काही..
मनांत राधिकेच्या फुलती गुलाब-जाई..
देहात पाकळ्यांच्या सजली जशी कळी ती..
ते गंध गोकुळीचे द्वारावतीस जाती..

भ्रमररुपाने श्याम, मायेस लेवूनी येई
वेणूशिवाय काही.. गूंजारवात नाही..
गात्रांतुनी गहिवर येता, हृदयाची होते घाई..
ती शुद्ध हाक हृदयातील, कृष्णास खेचुनी नेई..

येता मिलिंदमाधव, कळी आसवांत न्हाली
काळाचा वेग थबकला, क्षणात युगे उलटली..
अस्तित्वबोध न उरला.. राधेतील राधा विरली..
प्रेमस्वरूप श्यामल कृष्णात राधिका "मुरली"..

प्राची अश्विनी's picture

20 Feb 2020 - 8:27 am | प्राची अश्विनी

सुरेख

मायमराठी's picture

24 Feb 2020 - 9:08 pm | मायमराठी

हा आगाऊपणा नव्हे ह्याला मी आपलेपणा मानतो.
शब्दांवर प्रेम करणाऱ्या रसिकांना हा हक्क असायला हवाच.

प्राची अश्विनी's picture

20 Feb 2020 - 8:28 am | प्राची अश्विनी

वाह!

मायमराठी's picture

24 Feb 2020 - 9:09 pm | मायमराठी

सर्व प्रतिसादांबद्दल मनापासून आभार

मदनबाण's picture

26 Feb 2020 - 7:18 pm | मदनबाण

सुरेख...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सावरकर सावरकर सावरकर