सनकी भाग १०

शब्दांगी's picture
शब्दांगी in जनातलं, मनातलं
9 Feb 2020 - 8:44 am

शिवीन आणि रिचा आज लवकरच घरी गेले. शिवीनने रिचाला तिच्या घरी सोडले व तो घरी गेला. त्याच्या आईने हाताला पट्टी पाहून काय झाले म्हणून विचारले.शिवीनने आईला सगळा वृत्तांत सांगीतला. शिवीनची आई काळजीत पडली. तिने रिचा कशी आहे? तिला तर जास्त लागले नाही ना? मग तू हॉस्पिटलमध्ये का नाही गेलास?डॉक्टरला बोलावू का? पोलीसात तक्रार केली का?अशा अनेक प्रश्नाचा शिवीनवर भडिमार केला. शिवीनने तिला खुर्चीत बसवले व काळजी करण्याचे काही कारण नाही असे म्हणून तिची समजून काढली.हो पोलीसात तक्रार केली आहे. पण गाडीला नंबर प्लेट नव्हती त्या मुळे काही उपयोग नाही झाला.अस त्याने सांगीतले. आईने त्याला आराम कर अशी तंबी देऊन त्याच्या बेडरूममध्ये पाठवले व फोन करून रिचाची चौकशी केली. रिचाने ही काळजीचे कारण नाही असं त्यांना सांगीतले.

पण रिचा मात्र खुप काळजीत होती. कारण तिला कायावर संशय होता की तिनेच अपघात घडवून आणला.पण ऐन वेळी शिवीनने तिला वाचवले. शिवीनचा विचार येताच ती मोहोरली. तिचे हृदय जोरात धडधडू लागले. खरं तर शिवीन तिचा लहानपणा पासून बेस्ट फ्रेंड होता. रिचा त्याच्याशी सगळं शेअर करत असे.एवढंच काय पण रिचाच्या फर्स्ट क्रश पासून तिचा शेवटचा बॉयफ्रेंड कोण होता.हे देखील शिवीनला माहीत होते तसेच रिचाला ही शिवीन सगळं सांगत असे. त्याच्या किती गर्लफ्रेंड होत्या वगैरे सगळं रिचाला माहीत होत. पण रिचाच्या मनात गेल्या काही दिवसांपासून शिवीन बद्दल ज्या भावना होत्या त्या मैत्री पेक्षा वेगळ्या नव्हत्या. एंगेजमेंटला ही ती तयार झाली कारण तिने विचार केला की लग्न करण्या योग्य आपल्याला कोणी बॉयफ्रेंड नाही मिळाला.मग कोणत्या अनोळखी व्यक्तीशी लग्न करण्यापेक्षा शिवीनशी केलेले बरे. पण तिच्या मनात त्याच्या बद्दल प्रेम ही भावना आत्ता निर्माण झाली होती.रिचा स्वतःशीच बोलली.

रिचा, “अग तू त्याच्या प्रेमात पडलीस. ज्याला तू वेडा म्हणत होतीस त्या शिवीनच्या ”असं म्हणून ती आरशात पाहून गोड हसली.

रिचा फ्रेश झाली व तिने काही तरी आठवल्याच्या अविर्भावात लॅपटॉप उघडला. तिने गुगलवर काही तरी सर्च केले व एका कागदावर काही नावे व फोन नंबर लिहून घेतले. तिने कायाचा इतिहास व ती आत्ता तिच्याशी व शिवीनशी अशी का वागतेय? व तिचा आज झालेल्या अपघाताशी काही संबंध आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी तिने प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अपॉइन्ट् करायचे ठरवले होते. म्हणूनच तिने गुगलवर सर्च करून काही प्रायव्हेट डिटेक्टिव्हची नावे व त्यांचे फोन नंबर काढले व त्यातील एकाला फोन लावून त्याला एका कॅफेमध्ये बोलावून काया जयसिंगची तिला माहीत असलेली सर्व माहिती व फोटो तसेच तिला काया बद्दल काय-काय माहिती हवी ते ही सांगीतले. त्या डिटेक्टिव्हचे नाव स्वगत स्वामी होते. तो एक प्रसिद्ध डिटेक्टिव्ह होता त्याला सगळे एस एस म्हणत. रिचाने त्याला ऍडव्हान्स दिला पण त्याने काम झाल्यावर सगळे पैसे असे सांगीतले.रिचाचे त्याला लवकरात लवकर माहिती गोळा करा असे बजावले.रीचाला काया विषयी अशी माहिती मिळणार होती की ज्या मुळे तिच्या पाया खालची जमीन सरकणार होती.

इकडे शिवीनला रिचाचा अपघात म्हणजे एक धक्का होता. त्याला रिचाला काय झाले असते तर हा विचार ही करवत नव्हता. त्याने लहानपणा पासून रिचाला गृहीत धरले होते. रिचा आपल्या आयुष्यात नसणे ही कल्पनाच त्याला सहन होत नव्हती. रिचाला गमावणे त्याला शक्य नव्हते. काया बद्दलचे आकर्षण कुठल्या कुठे गेले. त्याला या अपघाताच्या निम्मीताने रिचा बद्दल त्याच्या मनात असलेल्या प्रेमाची जाणीव झाली होती.शिवीन काया व रिचामध्ये मनोमन तुलना करू लागला.त्याला कायाच्या बेफिकीर,डॉमीनेटिंग ,गूढ व्यक्तिमत्वा पेक्षा रिचाचे काळजी घेणारे,शांत व सोज्वळ व्यक्तिमत्त्व जास्त भावले.त्याने रिचाला लग्नासाठी प्रपोज करून हा प्रोजेक्ट पूर्ण झाला की लवकरच तिज्याशी लग्न करायचे ठरवले.कारण या प्रोजेक्ट मुळे त्याच्या आर्थिक विवंचना ही संपणार होत्या.त्याच्या मनातील द्वंद्व आता संपले होते व त्याचे मन शांत व निश्चिंत झाले होते

काया मात्र इकडे बेचैन होती. सुधीरला वाटले होते की आजचा प्लॅन फसल्या मुळे; काया आता अजून तोड-फोड करणार. त्रागा करून स्वत: ला त्रास करून घेणार म्हणून तो तिला समजावण्यासाठी आला. त्याने बेल वाजवली नेहमी प्रमाणे शांताबाईने दार उघडले. त्याने शांताबाईला विचारले की काया कुठे आहे? तर शांताबाईने त्या रूमकडे बोट केले. काय डोक्याला ताप अशा अविर्भावात सुधीर तिची वाट पाहत सोप्यावर बसला. पण त्या रूम मध्ये असे काय असेल की काया त्या रूममध्ये कोणाला म्हणजे तिच्या आई- वडीलांना सुध्दा तिथे फिरकू देत नाही असा विचार करत बसला. तेवढ्यातच काया त्या रूमला लॉक करून सुधीर जवळ येऊन बसली.सुधीर कायाचे निरीक्षण करत होता पण काया ना आज दारू प्यायली होती. ना तिने त्रागा केला होता. ती अगदी नॉर्मल वाटत होती. तिला असे पाहून सुधीरला हायसे वाटले.

काया,“शांताबाई दोन कॉफी घेऊन या!”असे म्हणाली.

सुधीर, “नको दि मी फक्त तुला पहायला आलो होतो.कारण आज जे काय झाले त्या मुळे मला वाटले तू अपसेट असशील पण तसं काही नाही तर मी आता निघतो” तो उठणार तेवढ्यातच शांताबाई कॉफी घेऊन आली.

काया, “ बस आणि घे कॉफी.”असे म्हणून तिने त्याला कप दिला. सुधीर बसला व कॉफी घेतली.

पण त्याला एक प्रश्न सतावत होता की आज इतकं सगळं तिच्या मना विरुद्ध घडून ही काया इतकी शांत कशी? त्याने स्वतः लाच समजावले की कदाचित कायाने तिचा रिचा बाबतचा निर्णय बदलला असेल.कायाने ही कॉफी घेतली व ती सुधीरला म्हणाली.

काया,“सुधीर तो कोण गुंड आहे त्याचा फोन नंबर देतोस मला?” ती शांतपणे म्हणाली.

सुधीर हे ऐकून चपापला. त्याला कळून चुकलं की ही तर वादळा पूर्वीची शांतता आहे. तो जरा टाळा-टाळीच्या सुरात म्हणाला.

सुधीर, “अग गुंड आहे तो! अशा लोकांशी मुलींनी डिल करणं सोपं नाही दि.” तो चाचपडत बोलत होता.

काया,“मी तुला त्याचा नंबर दे म्हणाले ना?” काया जरा सुधीरवर खेकसली.

सुधीरने निमूटपणे पक्याचा नंबर तिला व्हाट्सएप केला व तो तिला काही ही न बोलता निघला. त्याला कळून चुकले होते की कायाने काही तरी ठरवले आहे आणि आपली इच्छा असो वा नसो आपल्याला तिने ठरवलेल्या गोष्टीत सामील व्हावे लागणार आहे.तो हा विचार करत घरी गेला.

इकडे दोन जीवांना एकमेकांबद्दलच्या प्रेमाची जाणीव आजच्या घटनेने करून दिली होती. शिवीन आणि रिचाच्या मनात प्रेमाची ज्योत प्रज्वलित झाली होती. तर काया मात्र सुडाग्नी मध्ये धुमसत होती. तिने जो सूडाचा अग्निहोत्र मांडला होता त्यात ती कोणाची तिलांजलि देणार होती. ते फक्त कायालाच माहीत होते.

खरच काया म्हणत होती तस शिवीनने तिला धोका दिला होता.आपल्या बालमैत्रिणीसाठी स्वतः चा जीव धोक्यात घालणारा मुलगा काया बरोबर अस काही करू शकतो का? याचे खरे उत्तर फक्त शिवीन आणि कायाच देऊ शकत होते.पण कायाने सुरू केलेला हा सूडाचा अग्निहोत्र कोणाचा तरी बळी घेऊ पाहत होता पण तो बळी रिचाचा होता की शिवीनचा? याचे उत्तर मात्र फक्त कायाकडे होते.

●●●●

दुसऱ्या दिवशी शिवीन व रिचा बरोबरच ऑफिसमध्ये आले. काया व सुधीर ही आलेच होते. आता प्रोजेक्ट शेवटच्या टप्प्यात होता. कपडे डिझायनिंगचे व प्रोडक्शनचे काम जवळ-जवळ पूर्ण होत आले होते.आता फक्त फॅशन शो ऑर्गनाईझ करायचा होता व ब्रँड लॉन्ज करायचा होता पण त्याला ही अजून बराच अवकाश होता. त्यामुळे ऑफिस मध्ये खूप काही काम नसे आज-काल;याच कारणाने शिवीन आणि रिचा ही थोडे रिल्याक्स होते. कालच्या घटनेने त्या दोघांचा एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता. जे प्रेम अंकुर त्याच्या मनात रूजले होते. त्याला आता नवीन धुमारे फुटू पाहत होते व त्यांच्या वागण्या बोलण्यातून ते दिसत होते. कारण ते ऑफिस मध्ये आल्या पासून फक्त एकमेकांना पाहत होते.रिचा शिवीनला साधा ग्लास किंवा पेन ही उचलू देत नव्हती. ती त्याला सतत तुझ्या हाताला लागलाय याची जाणीव करून देत होती. जसे काही जर शिवीनला दुखले तर तिला ही दुखणार होते.

काया मात्र हे सगळं निमूटपणे पाहत होती पण आतून ती धुमसत होती पण तिने मनात काही तरी ठरवले होते.ते काय होते ते मात्र गुलदस्त्यात होते.रिचा ही आता काया विरुद्ध कंबर कसून उभी होती हे मात्र निश्चित पण यात काया बरोबर होती की रिचा?

क्रमशः

(सदरचे लेखन कॉपी राईट या कायद्या अंतर्गत येत असून लेखकाच्या नावा शिवाय कोठेही पोस्ट करू नये . साहित्य चोरी हा कायद्याने गुन्हा आहे)

कथालेख

प्रतिक्रिया

मराठी कथालेखक's picture

5 Mar 2020 - 1:02 pm | मराठी कथालेखक

पुढचा भाग कधी ?