भाग ९ अंधारछाया प्रकरण ८. समजा मीच या फुल्या काढायचे ठरवले, घरात कोणी नसताना! तर मी काय करेन? ठीक आहे, काजळाची डबी घेतली. कशाने काढेन मी अशा फुल्या? काहीतरी काडी बिडी हवी! येस काड्यांची पेटी हवी!

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
21 Jan 2020 - 11:37 pm

अंधारछाया भाग ९ - प्रकरण ८

अंधारछाया

आठ

मंगला

कॅलेंडरचा नोव्हेंबर महिना फाडला. बेबीला येऊन आता दोन आठवडे झाले. डिसेंबरचे एकतीस दिवस. डिसेबर महिन्याचे पान फाडून नवे कॅलेंडर लावीन तेंव्हा काय झाले असेल? करायला घेतलंय हे आपण, पण निभेल ना असे मनात सारखे वाटे! मग ह्यांनी सांगितल्याचे आठवे. ‘मंगला, एक लक्षांत ठेव आपण तिच्या चांगल्यासाठीच करायला जातोय ना मग होऊ दे काहीही. तू सर्व भार स्वामींच्यावर सोपव. जपावर विश्वास ठेव. तूच म्हणालीस ना त्या दिवशी, स्वामींच्या फोटो, समोर तू प्रार्थना केलीस आणि बेबीच्या वागण्यात फरक पडला म्हणून?’
‘हो बाई’ मी म्हणाले होते.
डॉ फडणीसांनी पुन्हा चेक अपला बोलावले होते. एक दोन टॉनिक्स दिली म्हणाले, ‘दर आठवड्याला पाठवा तिला वजन पहायला दर आठवड्याला. यायचं बर का एकटीने दवाखान्यात बहीण काही येणार नाही दर आठवड्याला.’ बेबीला ते म्हणाले.
खाडिलकर नर्स बाईंना म्हणाले, ‘ही येईल तेंव्हा केस पेपरवर, बीपी, पल्स, टेस्टची नोंद करा बरं.’
परत येताना मधूच्या खोलीवरून आले. खोली बंदच होती. शेजारच्या बाईंना म्हटले, ‘सांगा बहिणीकडे बोलावलय संध्याकाळी.’
तिरशिंगराव आहेत आमचे मधोबा! लहरी कारभार. आले तर रोज येतील. नाहीतर पंधरा पंधरा दिवस फिरकणार नाही हा! आला होता तेंव्हा राहिला होता आमच्याकडे. मिलमधे नोकरीसाठी गेला इंटरव्हूला तेंव्हा हे म्हणाले, ‘मधू, माझ्या नात्यातला म्हणून तुला नोकरी लागलेली मला आवडणार नाही. तुझ्या हुशारीवरच नोकरी मिळवली पाहिजेस.’
पुढे हा लागला नोकरीला. मग घेतलीन एक खोली. आता राहतो तिथे. खाणावणीत जेवतो. मधून मधून येतो जेवायला संध्याकाळी.
मधे म्हणत होता. केळकर मॅनेजर आले होते अकौंटेस डिपार्टमेंटमधे. एम डी लिमयांबरोबर. डेप्युटी मॅनेजर गोरे आणि दादाही होते आलेले शेठजांना भेटायला. एम डी लिमये म्हणाले, ‘पर्वतेला अकौंट्स डिपार्टमेंटमधून मी देणार नाही. ही इज एन एसेट टू माय सेक्शन. तुम्ही दुसऱ्या कोणालाही मागा. ब्रेनी आहे पोरगा.’
गोरे म्हणाले, ‘सहा महिन्यात याने तीन लेजर्स अप टू डेट केली आहेतच, पण हा मला रफ ट्रायल बॅलन्स व पी एन्ड एल अकौट्स काढून देतो. गेली इतकी वर्ष मी शेठजींना कॉस्टींग व अकौंट्सची स्टेटमेंट्स देतोय. पण हे मला कोणी क्लार्कने बनवून दिले नव्हते!’
केळकर म्हणाले, ‘हे पहा एम डी, मी तुम्हाला सांगायला अकौंट्स डिपार्टमेंटमधे आलोय ते यासाठीच की शेठजी म्हणतायत की पर्वते मला पर्सनल स्टाफमधे हवा आहे. कदाचित ते नंतर श्रीकांत शेठ बरोबर देतील त्याला.’ शेठ विचारत होते कुठून आला हा दादा उभे होते. म्हणाले, ‘माझ्या मिसेसचा मामे भाऊ आहे. माझ्याच नात्यातला आहे.’ घारे डोळे मिचकावत मधू म्हणाला.
'दादांनी असे म्हणाल्याने इतका आनंद झाला मला' आणि डोळे पुसलेन.
संध्याकाळी जप करता करता बेबीचं अंग जरा कोंबट वाटलं. जरा कणकणी आहे असे म्हणता म्हणता, थर्मामीटर मधे शंभर निघाला. जरा तिला अंथरुणावर आडवी करून मी एकशे आठ माळा पुर्ण केल्या.

डॉ. फडणीस

स्टेथॉस्कोप कानातून काढून ठेवला. ताप पाहिला एकशे पाच! काही कारण नव्हते इतका चढायला! आधी फ्ल्यू वाटला. म्हणून पॅरॅसिटेमॉलने कंट्रोल होईल असे वाटले. पण आता सात दिवस झाले. तेंव्हा टॉयफॉईड तर नाही असे वाटून एंटीबायोटिक्सचे डोस चालू केले. पण गेले चार दिवस ताप हटेना. डॉक्टर गोसाव्यांना दाखवावी का मिरजेला? पाहू एक दोन दिवस वाट नाहीतर नेऊ हिची केस मिरजेला. प्रिस्क्रीप्शन लिहून दिले. चहा घेतला. ओकांना म्हणालो, ‘हे लक्षण काही चांगले नाही. टेंपरेचर खाली येत नाही. सिरीयस आहे.’ बूट पायात घातले. मोपेडला कीक मारली.

बेबी

किती गोळ्या खायाला देतासा, तेवढ्या द्या. खातो. माला काय होतय? म्हनली बाकीची माला, ‘शानं असशील तर गप सोड लवकर. तुझ्याच्यान निभनार न्हाई.’ पर मी हट्टाला अडून बसलो. म्हनालो, ‘का रे माझ्या माग लागलायासा? गप गुमान हुडका की लहान सहान. माला कशाला भिडताया?’ पैल पैल लई तरास वाटला. ती भैन म्हनाली म्हन म्हनून. पर मी बी हट्टाला पेटलो. न्हाईच तिला म्हनू दिलं. पर भन लागली तिचा हात धरून म्हनाया मग म्यातरी काय करनार? एखादा दीस केली खळखळ मग त्या जपाच काय भ्या वाटं ना.
पन काल पासनं कळ मारतीया पायाना, मग म्याच बोलीवला त्यो मांग गारुडी. तिकडं रेल्वे पुलाच्या खाली मसनवाटीकडं गेलाता, कोनी मिळतं का म्हनून वाट बघाया! म्हनलो त्याला, ‘जरा जादू टोना काय जमतय का ते बघ. म्हनला, ‘बघ, ताप आनवतो. हाटलाच न्हाई पायजे कायबी औषाध खाऊन! ताप आनलान लै. पर मालाच निबना! नुसत्या खिरीवर आन वरनभातावर कुठवर जगू? आज म्हनालो, ‘बाबा रे थांबीव तुझी करनी!
म्हनला, ‘बर’

मधू

पहिला भोंगा झाला साडे अकराचा. फौंटनपेन शर्टाच्या खिशाला अडकवले. पांढरा शर्ट जरा मळका झालाय टाकला पाहिजे भट्टीला, म्हणत उठलो खुर्चीवरून. जरा आळोखे पिळोखे दिले. बाहेर पडलो ऑफिसच्या प्रभ्या जोशी बरोबर. वाटेत मानेंनी हाताने रामराम केला. म्हणाले, ‘पुढच्या आठवड्यात नाटकासाठी या बर का मिटींगला.’ मिलच्या फाटकापाशी कुंचूरही भेटला. ते आपापल्या घरी गेले जेवायला. मी बुधवार पेठेतल्या खानावळीकडे वळलो. अचानक माई दिसली स्टँडपाशी. म्हणाली, ‘मधू, जेवायला का? मी मानेनेच हो म्हणालो. तर म्हणाली, ‘अरे घरी जा. आजींना मोरूदादांचा अरविंद बरोबर घेऊन गेलाय सांगलीला, आठ दिवसासाठी. बेबी एकटीच आहे. ताप आहे तिला. जरा तिच्या सोबतीला जाऊन बस. मी डॉ. फडणिसांना सांगून औषध घेऊन येते. एक दोन गोष्टी घ्यायच्या होत्या म्हणून आले होते, उपाध्यांच्या किराणा दुकानात. वाटलं तू भेटशील. मग डॉक्टरांकडे मला वेळ लागला तरी हरकत नाही. ही घे किल्ली.’
मी ‘बर’ म्हटले. ढांगा टाकत घराशी पोचलो. अकरा चाळीस झाले होते. फाटकाला कडीलाऊन कुलूप उघडून आत आलो. टेबलावरचा सकाळचा अंक घेतला. आत डोकावले ओझरते. पाहिले तर बेबी झोपली असावी कॉटवर. मग मी मांडी ठोकून बसलो. पेपर पसरला जमिनीवर आणि वाचायला लागलो. बाराचा भोंगा झाला.
माई आलीच पाच दहा मिनिटात. आल्या आल्या औषधाची बाटली, पुड्या ठेवल्यांन कपाटावर, अन् म्हणाली, ‘जेवण तयारच आहे. चल हातपाय धुवून. तू जेवून घे. ह्यांना यायला वेळ लागतो.’ मी बरं म्हणून हात धुवायला गेलो. तर माई एकदम ओरडलीच, ‘मधू इकडे ये!’
मी बाथरून मधून आलो माई जवळ. माई बेबीच्या कॉट जवळ उभी होती. पहातो तो बेबी झोपलेली कुशीवर. ती झोपलेली जागा सोडून बाकीच्या उरलेल्या भागावर संपूर्ण मोठ्या मोठ्या फुल्या होत्या! काळ्या काळ्या! मी तर उडालोच!
डोळे विस्फारत माई म्हणाली, ‘हे काय झाले? कसे झाले? मी गेले तेंव्हा नव्हते काही या पांढऱ्या चादरीवर? आत्ताच्या आत्ता एवढ्यात हे कसे झाले?’ मला कळेचना हे काय गौड बंगाल आहे ते!
मी म्हणालो, ‘मी तर आलो कुलूप काढून आत, पेपर घेतला. ओझरते पाहिले बेबी कुशीवर झोपलेली. बसतो वाचत आणि तू येते आहेस. मला काहीही माहित नाही.’
मनात आले आईला शिरवळला व्हायचे तसे तर नाही ना काही? भूत बाधा वगैरे!

मंगला

त्या काळ्या काळ्या फुल्या पाहिल्या. घाबरले मी पोलक्यावरच्या फुल्या आठवून. आता ही काय नवीन भानगड? वाटले बेबीला उठवावी, खडसून खडसून विचारावे. पण झोपली होती गाढ असे वाटले. म्हणून थांबले. अस्वस्थ झालेली मनस्थिती. काही सुचेना. मधूला मग थोडक्यात सांगितले, आधी काय काय झाले होते ते. जेवता जेवता म्हणाला, दादांना बोलवून आणू का पटकन तेवढ्यात ह्यांच्या सायकलीचा घंटा वाजली. तसं हायसं वाटलं.

दादा

सायकलला कुलूप लावले. चपला काढून आत आलो. तो मधू आणि ही मधल्या खोलीत होती
बेबी जवळ. बुशकोट काढून हँगरला लावला. ही म्हणाली, ‘अहो पटकन इकडे या. हे पाहिलेत का काय नवीन लचांड? संपूर्ण चादरीवर बेबी झोपली आहे तेवढी जागा सोडून फुल्या काळ्या कुळकुळीत! मी मधू कडे पाहिले म्हटले, ‘तू इथे कसा?’ मग कळले काय झाले होते ते.
तंबाखूचा बार भरला तोंडात आणि विचार करायला लागलो. या फुल्या आल्या कशा? कुणी केल्या? ही म्हणाली, ‘अहो जरा चार घास खाऊन घेता का? तीही तोवर झोपलेली आहे. उठली की लगेच चादर बदलून टाकते. का उठवू लगेच?’
‘थांब ग जरा विचार करू दे. हे केले कुणी? तू म्हणतेस साडे अकराचा भोंगा झाला अन तू निघालीस औषध आणायला. तेंव्हा ही थोडीशी जागी होती. तू म्हणालीस ‘कुलूप लावते’ तेंव्हा ती ‘बरं’ म्हणाली तुला?
मग तू मधूला भेटून तो येई पर्यंत किती वेळ झाला असावा?
‘मी आलो तेंव्हा अकरा चाळीस झाले होते. मला आठवतय कारण फाटकाची कडी काढताना घड्याळात पाहिले होते.’ मधू म्हणाला.
‘मग त्या अकरा तीस ते अकरा चाळीस या दरम्यान दहा मिनिटात इतक्या फुल्या काढता येणे शक्य आहे? पाहू मोजून किती आहेत त्या!
मधू आणि मी मोजायला लागलो. अगदी काठाच्या सर्व जागेत तेरा भरल्या एका रांगेत पुढे कमी जास्त होत्या. ती झोपली त्या भागात अर्धवट झाल्या होत्या काही फुल्या. याचा अर्थ काठाकडून चालू केल्या होत्या काढायला. एकोण साठ पूर्ण आणि तेहतीस अर्धवट होत्या सर्व मिळून!
मी मधूला विचारले, ‘काय रे कशाने काढल्या असतील या फुल्या?
‘आपलं तर टाळकं चालत नाही बुवा’ मधोबा म्हणाला.
‘काजळाच्या असल्या सारख्या वाटतायत! पुर्वी पोलक्यावर होत्या आलेल्या तेंव्हा मला वाटले होते त्या काजळाच्या असतील म्हणून!’ मंगला म्हणाली.
मी म्हटले, ‘काजळाच्या असतील तर कुठाय काजळाची डबी? मंगलाने कोनाड्यातून आणली डबी. माझ्याकडे देत म्हणाली, ‘पहा कशा खरवडल्यासारख्या खुणा दिसत आहेत काजळाला!
‘असे नसते कधी काजळ ओरबाडल्यासारखे! कधी चुकून नखाला लागले काढताना, तरी इतके ओरखडे मुळीच नसतात. घेतय कोण माझ्या शिवाय? आजी घालत नाहीत. ना बेबी! येऊन जाऊन लतीच घेते बाहुलीला डोळ्यात घालायला’ मंगला म्हणाली.
मी डबी हातून खाली ठेवली. तर बोटाना काळे लागलेले होते. लगेच मंगलाला म्हटले, ‘बोटे पाहून तुझी तिच्याही बोटांना अगदी बारीक पण काळे लागलेच होते! बेबीची बोटे बघ जरा.’ मी हिला म्हटले.
हळूच हिने तिच्या हाताचा पंजा हातात घेतला. तो तिची झोप चाळवली. आम्ही तिघे तिच्याकडे पाहतोय म्हणताना उठून बसली.
‘काय झालेय पाहिलेस का बेबे?’ ही म्हणाली व मी चादरीकडे बोट केले. तशी ती चाट पडली. मी निरखून पहात होतो. काय तिची रिएक्शन आहे म्हणून मला वाटले ती ही प्रथमच पहात होती फुल्या. तिच्या बोटांना काहीच काळ्या रंगाच्या खुणा नव्हत्या! काय बेबी? हे तू केले नाहीस ना? मी म्हटले. ‘मी आणि हे करणार? ‘
‘छे ग बाई. मी कशाला जातेय त्या काजळाच्या डबीला हात लावायला? मी हे पाहतेय तुमच्या समोर प्रथमच!
तिला पुढे विचारण्यात काही अर्थ नव्हता. आम्ही चादर बदलली. जेवायला बसलो. मधू म्हणाला, ‘मी थांबतो. कॅजुअल टाकतो एक.’ जेवणं झाली.
तंबाखूचा बार भरला विचार करायला लागलो. आयडिया आली. समजा मीच या फुल्या काढायचे ठरवले, घरात कोणी नसताना! तर मी काय करेन? ठीक आहे, काजळाची डबी घेतली. कशाने काढेन मी अशा फुल्या? काहीतरी काडी बिडी हवी! येस काड्यांची पेटी हवी! ती घेतली. मग मी बसेन काढायला’ मग मी चादर आंथरली टेबलावर. काड्यापेटीतील एक काडी काढून गुलाची बाजू हातात घेऊन काजळाच्या रेघोट्यांवरून आणखी एक रेघोटी ओढली. रेष तर तशी आलेली वाटली काजळात.
चादरीवर एका अर्धवट फुलीला पूर्ण करायचे म्हणून एका फुलीला एका साईडला ती काडी टेकवून रेष ओढली. तर आली. आधी जाड ठळक. पण लगेच कमी होत गेले काजळ. पुन्हा काजळात काडी घालून पुन्हा रेषा ओढत फुली पूर्ण करताना तीन वेळा काड्या मोडल्या, काजळात घालता घालता!
‘तुमच्या फुलीत आणि त्या फुल्यात फरक आहे बराच’ मधू म्हणाला. ‘कमी जास्त झालेय काजळ तुमचे. शिवाय फारच ठळक आहेत तुमच्या! त्या फुल्या एक सारख्या ठशाने पाडाव्यात तशा आहेत!
पुढे दोन फुल्या कशाबशा झाल्या तो पर्यंत आणखी पाच सात काड्या मोडल्या होत्या. माझी बोटे ही बरीच खराब झाली होती. मधू म्हणाला, ‘या शेवटच्या दोन फुल्या काढेपर्यंत साधारण साडे तीन मिनिटे लागली तुम्हाला. तर एकोणसाठ पूर्ण व तेहेतीस अर्ध्या काढायला मिनिटाला एक याप्रमाणे किती लागतील काढायला? साधारण पंचाहत्तर लागतील! मी यायच्या आधीची दहा मिनिटे अधिक माई येण्या आधीची तीस मिनिटे धरली तरी सगळी एकूण चाळीस मिनिटे होतात.
‘येवढ्यात इतक्या फुल्या ह्युमनली इंपॉसिबल आहे. बेबीला तर शक्यच नाही काढायला जमणार’ आणि ती झोपली होती ज्या पोझमधे तेवढा भाग सोडला होता काढायचा. म्हणजे तिने आपल्यासाठी झोपायची जागा सोडून फुल्या काढल्या असाव्यात आणि ती स्वतः नंतर उरलेल्या जागेत झोपली असावी! मी शंका बोलून दाखवली.
‘शक्य आहे ते ही.’ मंगला म्हणाली.
‘अशक्य नसले तरी, मला नाही वाटत तिला हे जमेल एवढ्या तापात,’ मधू म्हणाला.
तेही खरेच होते. ‘मला वाटले, जर समजा हिनेच त्या फुल्या केल्या असल्या तर ती काय करेल काड्याबिड्यांचे? टाकेल बाहेर कुठेतरी कुठे, या जवळच्या खिडकीतून टाकेल एकतर, नाही तर फार फार तर दार उघडून बागेत टाकेल.’
केळकरांच्या घराच्या बाजूच्या बोळात आलो. जमिनीची कसून पहाणी करायला लागलो. काम तसे त्रासाचे होते. कोयनेलचे कुंपण होते. त्यात पडल्या असल्या अडकून तर दिसणे अवघड होते. मधूने कोयनेल हलवले जरा. पिवळट पालापाचोळ्यात काड्या हुडकणे जिकीरीचे होते. मी बाहेरूनच मंगलाला म्हणालो, ‘अगं जरा चार-पाच काड्या फेक बरं बाहेर, कुठे पडतात ते पाहू.’
काड्या पडल्या विखरून हिने टाकल्यावर. त्याच्या अनुरोधाने मी शोध कसून घेतला. शेवटी वाकून कंबर दुखायला लागली. तेंव्हा मी परतलो. मधू होता दगड धोंडे उलटेपालटे करत. बाकीच्या दोन्ही खिडक्यांच्या जागीही पाहिले नजर टाकून. काड्या तशा निसटणार नाहीत नजरेतून. पण नव्हत्याच तर दिसणार कुठून?
केळकरांच्या घराचे दार उघडले गेले. आजी बाहेर आल्या. म्हणाल्या, ‘काय पाहातासा उन्हाच इतक्या?
मी म्हणालो, ‘काही नाही. जरा पेन बीन पडल्यासारखे वाटले म्हणून आलो होतो पहायला.’ दार बंद करून केळकरांच्या आजी आत गेल्या.
दाराच्या बाजूने मी पाहिले. कोळशाच्या पेटीकडे नजर फिरवली. कुठेच काहीच मागमूस नव्हता काड्यांचा. मंगलाला म्हटले, ‘पहा जरा कचऱ्याच्या डब्यात! असायच्या त्यातच आणि आम्ही फिरतोय इथे तिथे पाहात! असे व्हायचे! पाहून आली म्हणाली, ‘नाहीयेत केरात.’
अंगाला धामाच्या धारा लागल्या. शेवटी आत गेलो. फॅन चालू केला तेंव्हा बरे वाटले.
हाताचे काळे काढायला बाथरूममधे गेलो. सनलाईटने हात साफ करता करता साबण काळा झाला. तशी मी हमामची वडी पाहिली. काळपट डाग होते त्यावर. मी टॉवेलला हात पुसले. अन हाताचा वास घेतला. साबणाचा वास अजून होता हाताला.
मी बेबीच्या हाताचा वास घेतला. हमामचा येत होता ! मी विचारले केंव्हा धुतलेस हात तू?
बेबी म्हणाली, ‘आंघोळ तर करतच नाहीये सध्या. सकाळी परसाकडला जाऊन आले, तेंव्हाच हातपाय आणि तोंडाला साबण लावला तेवढाच.’
‘हात बघ वास घेऊन, आत्ता थोड्यावेळा पुर्वी लावल्यासारखा वाटतोय? तिने नाकाला हात लाऊन पाहिले वाटतय तर म्हणाली, ‘पण मला तर गेल्याचे आठवत नाहीये मोरीवर! म्हणजे हे त्यांनीच तर नाही केलेले?’
कुणी काहीच बोलले नाही. चादर हिने स्वेचा फेस करून पाण्यात बुचकळली. मी पेपर घेऊन कोचावर आडवा झालो. मधू चपला घालून बाहेर जाताना पाहिला.
थोड डुलकी लागली. मधूच्या चपलांचा आवाज झाला म्हणून डोळे उघडले. मधू म्हणाला, ‘मगाच्या त्या तुम्ही फुल्या काढायकरता वापरलेल्या काड्या फेकायला बाहेर गेलो. कुठे टाकाव्यात प्रश्न पडला. शेवटी मागे गेलो आणि लक्षांत आले की, जर त्यांना नाहीसे करायचे असेल तर दोन शक्यता आहेत. एक तर त्यांना काडी लाऊन जाळून टाकणे किंवा विहीरीत फेकणे.’ कौतुक वाटले मला मधूचे.
अगदी दबक्या आवाजात मी म्हटले, ‘मधू ती काजळाची डबी घे. व्यवस्थित गुळगुळीत कर बोट फिरवून, माझे हात काळे करायला नकोत.’
तो डबी घेऊन आला. मला गुळगुळीत केल्याचे दाखवून डबीचे झाकण बंद केले. तेंव्हा मी एका ब्लँक एन्व्हलपमधे ती डबी घातली. बंद केली डिंक लावून. मधूला म्हटले, ‘तू जरा जा बघू या खोलीतून. तो गेला आणि मी ती डबी मोठ्या लाकडी कपाटाच्या मागच्या देवळीत ठेवली. फक्त मलाच माहिती होते डबी कुठे आहे ती ! जास्तीत जास्त मधूला की बाहेरच्या खोलीत कुठेतरी डबी आहे काजळाची म्हणून.

मांडणीविचारअनुभव

प्रतिक्रिया

सुचिता१'s picture

22 Jan 2020 - 12:30 am | सुचिता१

उत्कंठावर्धक!!! मोठे भाग असले तर वाचायला मजा येते.

आंबट गोड's picture

22 Jan 2020 - 11:25 am | आंबट गोड

उत्कंठा वर्धक आणि दिलचस्प कथानक.
विशेष म्हणजे सगळे लोक किती साधे सरळ आहेत यातले!

विजुभाऊ's picture

22 Jan 2020 - 3:13 pm | विजुभाऊ

उत्कंठावर्धक आहे. मस्त.
वातावरण छान दाखवलंय

राजाभाउ's picture

22 Jan 2020 - 5:49 pm | राजाभाउ

मस्त चालु आहे.