"पोर"खेळ

अभिनव प्रकाश जोशी's picture
अभिनव प्रकाश जोशी in जनातलं, मनातलं
11 Dec 2019 - 9:24 pm

आजकाल गावांची शहरे झाली, घरांच्या इमारती झाल्या, कौले जाऊन स्लॅब आला आणि जग कुठच्या कुठे गेले. पण, काहीही बदलो, चिमुलवाडा आणि त्यातली माणसं मात्र जशीच्या तशी उरलीयेत. दारातल्या गावठी कुत्र्याची चेन आता लॅब्राडोरच्या गळ्यात, तर माऊ, काळूच्या जागी पर्शियन मांजरांनी शहरात ठाण मांडले आहे. आता हे जुन्या गावचे सगळे मोती, टॉम वा माऊ, काळू चिमुलवाड्याचे आश्रित झालेत!
आजूबाजूचे गावकरी आता शहरवासी झाले असले, तरी आमच्या चिमुलवाड्यावर घरे आणि देवळे यांखेरीज आणखी कुठलीही वास्तू कोणास दृष्टी पडायची नाही. कोणा बिल्डर लोकांची अजून चिमुलवाड्यावर नजर पडली नाही ही त्या देवकीकृष्णाची मेहेरबानीच म्हणावी लागेल! तर, या अशा घरगुती प्राण्यांची संख्या चिमुलवाड्यावर विलक्षण वाढली होती! या वर्षी पाऊस सुरू होताच गावकर काकूंनी परोब काकूंकडून एक बोका अंथरुणात घेऊन उबेसाठी झोपायला म्हणून मागून आणला होता. घरात ऊठसूठ घाण करीत असल्याने ती साफ करून करून त्यांची कंबर एक इंच तरी झिजली असावी बहुतेक! पण, तरीही त्यांनी प्रेमाने त्याला ठेवून घेतला होता. आता तर तो चांगला सहा सात महिन्यांचा झाला असावा. पण, आता मोठा झाल्याने त्याने गावकर काकूंच्या अंथरुणात झोपणे मात्र सोडून दिले होते.
‘सकाळी दुधाला आमच्याकडे आणि रात्रीचा मेला असतो परबांच्या घराकडे. आणि काय ?! मांजरीच्या मागे!’ गावकरकाकू कुणालाही बोक्याच्या चहाड्या तशा मिस्कील प्रेमाने सांगत. परोबांना मात्र एकच शल्य होते, त्यांच्या घरात एकही बोका झाला नव्हता! परोबांच्या घरातील मांजरींची संख्या बघितल्यास, ‘नाम्याच्या सात मैत्रिणी आहेत’ असंही गावकरकाकू सांगतात. ( नाम्या: बोक्याच्या जन्मपत्रिकेतील नाव; ठेवणारे: गावकरकाका, कारण: दोन डोळ्यांमधील उठून दिसणारा ‘नाम’ वजा काळा ठिपका !). तसा गोंडस होता नाम्या. त्याला सुताने खेळवणार्‍या व वाड्यावर एकट्याच राहणार्‍या गोविंदमामांच्या वयस्क बायकोस, आपल्या मायेने दोन तीन वर्षे तरुण बनवणारा असा हा नाम्या! तिला त्या बोक्याला खेळवताना कुतूहलाने बघणार्‍या मला, ‘मनशां बरी नी. पूण ही कुत्री माजरा मात बरी रे!’ असं म्हणून बाबू भानावर आणे!
अशा या नाम्याला जो पाही तो उचलून घेत असे. पण, का कोण जाणे फक्त बाळा सोडून त्याला उचलणार्‍या प्रत्येकावर त्याने आपली छाप सोडली होती! नाम्याबरोबर परोबांकडली एक मांजरी गावकरकाकूंकडे दूध प्यायला यायची. ती नाम्याची खास मैत्रीण होती असं गावकरकाकू हसत हसत कोणालाही सांगायच्या. पूर्ण पांढर्‍या शुभ्र रंगाची अशी ती एकच मांजरी होती! गेल्या काही दिवसांपासून त्या पांढर्‍या मांजरीचे पोट जरा मोठे दिसू लागले होते. ते बघताच काहीसा विचार केल्यासारखा चेहरा करून, गावकरकाकूंनी जाहीर करून टाकले, ‘हा आमच्या नाम्याचा पराक्रम!’ झालं, ती पांढरी मांजरी गाभण आहे या बातमीचा बाळ्याने अख्ख्या वाड्यावर प्रचार प्रसार केला, अगदी ‘आज तक’पेक्षाही तेज!
एवढे दिवस नाम्याला मिळणारे महत्त्व आता दिवस गेलेल्या त्या पांढर्‍या मांजरीला मिळू लागले! इकडे परोबकाकू व गावकरकाकू दोघींनीही त्या मांजरीला बोकाच होऊ दे व तो आपल्यालाच मिळू दे यासाठी देवाकडे गार्‍हाणेसुद्धा घातले! गावकरकाकूंनी तर पाटल्यातील सगळे नारळ ओतून त्यात फाटकी गोधडी घालून ‘बाळंतपणाची’ सगळी तयारी वगैरे करून ठेवली होती! त्यांच्याही पुढे जात गावकरकाकूंनी त्या बाजूने मांजरांच्या पोरांना घालायचं खास खाणं मागवून ठेवलं होतं. आता फक्त ती मांजरी कधी विते, याचीच दोघींना प्रतीक्षा होती. मांजरी विणार यापेक्षाही, ‘ती कुठे विणार?’ हाही आणखी एक प्रश्‍न होता. ज्याच्या घरी विणार त्याच्याच घरी तिची पिल्ले वा पिल्लू उरण्याची शक्यता थोडी जास्त होती! बाकी दोघींनाही त्या मांजरीला बोकाच होणार असल्याचे डोहाळे लागले होते!
काही दिवसांनी त्या मांजरीने त्याच्याच सारख्या दिसणार्‍या दोन गोंडस पिल्लांना गावकरकाकू व परोबकाकू यांच्या घरांच्या मधोमध असलेल्या जुन्या गॅरेजमध्ये जन्म दिल्याची बातमी शांताबाई एके दिवशी सकाळी सकाळी घेऊन आली. त्यातला एक बोका तर एक मांजर असल्याचेही तिने सर्वांना सांगितले. ही बातमी ऐकताच परोबकाकूंनी तर किंचाळीच फोडली. गावकरकाकू तर पुन्हा पुन्हा गॅरेजकडे घुटमळू लागल्या. काही दिवस तसे शांततेत, ‘जैसे थे’ गेले. पण, जसजसा बोका मोठा होऊ लागला तसतसे वाद होऊ लागले. गावकरकाकूंनी त्याला घरी आणला असता एक दिवस परोबकाकू सरळ उचलून त्याला घेऊन जाऊ लागल्या! हे बघताच गावकरकाकूंनी त्यांना सरळ सरळ अडवले व परोब काकूंनीही बोक्याला सोडून वादात उडी घेतली. कित्येक मिनिटे वाद विवाद चालला होता! एव्हाना बाळ्या आला व शांतपणे दोघींना थांबवून गोविंदमामांच्या बायकोबरोबर मनमुराद खेळणार्‍या त्या बोक्याकडे त्यांचे लक्ष वेधले. गोविंदमामांची बायको आपल्या वायलाचे एक सूत काढून त्या बोक्याला खेळवण्यात रमली होती. ते दृश्य पाहून दोघींच्याही मनात काय आले कोणास ठाऊक, पण तो बोका गोविंदमामांच्या बायकोस देण्याचा निर्णय देवळात होत असलेल्या आरतीच्या घंटानादाच्या साक्षीने व एकमताने तेव्हाच घेण्यात आला!

कथालेख

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

11 Dec 2019 - 9:57 pm | जॉनविक्क

पोरखेळ :)

शेवट थोडा १९ वाटला तो २० राहिला असता अथवा २१ झाला असता तर अजून मज्या आली असती.

अभिनव प्रकाश जोशी's picture

11 Dec 2019 - 10:28 pm | अभिनव प्रकाश जोशी

नक्की ! धन्यवाद !

प्रमोद देर्देकर's picture

12 Dec 2019 - 7:52 am | प्रमोद देर्देकर

मस्त खुशखुशीत लेख.
मिपावर स्वागत.

आनन्दा's picture

12 Dec 2019 - 10:02 am | आनन्दा

मस्त आहे.

अभिनव प्रकाश जोशी's picture

12 Dec 2019 - 1:54 pm | अभिनव प्रकाश जोशी

धन्यवाद !

कंजूस's picture

12 Dec 2019 - 10:15 am | कंजूस

बाळ्या नक्की काय करायचा?

अभिनव प्रकाश जोशी's picture

12 Dec 2019 - 1:53 pm | अभिनव प्रकाश जोशी

घरचा नोकर !

श्वेता२४'s picture

12 Dec 2019 - 9:57 pm | श्वेता२४

हलकाफुलका विषय छान रंगवला आहे. लिहीत रहा.

अभिनव प्रकाश जोशी's picture

12 Dec 2019 - 10:41 pm | अभिनव प्रकाश जोशी

जरूर !

मस्त वाटलं वाचताना... लिहीत रहा..

अभिनव प्रकाश जोशी's picture

13 Dec 2019 - 6:51 am | अभिनव प्रकाश जोशी

धन्यवाद !

मुक्त विहारि's picture

13 Dec 2019 - 8:44 pm | मुक्त विहारि

आवडलं

अभिनव प्रकाश जोशी's picture

14 Dec 2019 - 11:07 pm | अभिनव प्रकाश जोशी

Dhanyawaad !