(अष्टाक्षरी छंद)

मनीषा's picture
मनीषा in जे न देखे रवी...
11 Nov 2008 - 4:21 pm

सागरात हेलावते
नाव माझी वादळात
शीड तिचे तुटलेले
दिशाहीन अंधारात |

लाटांमागे येती लाटा
कल्लोळ हा आठवांचा
दूर दूर नभांगणी
खेळ रंगे सावल्यांचा |

शब्द शब्द जपलेला
सूर एक भारलेला
आयुष्याचा सारीपाट
मीच माझा मांडलेला |

तुटलेले काही बंध
ओढ लावती जीवाला
काही नाती, क्षण काही
माझे, मागते देवाला |

सूर्यबिंब ढळे जळी
अस्त जणु वेदनेचा
शुभ्र ,शीतल चांदवा
देई दिलासा सुखाचा |

गंधीत हा गार वारा
साद देई तुला, मला
वेदनेच्या वाटेवर
साथ देऊया सुखाला |

कविता

प्रतिक्रिया

अनिरुध्द's picture

11 Nov 2008 - 9:10 pm | अनिरुध्द

गंधीत हा गार वारा
साद देई तुला, मला
वेदनेच्या वाटेवर
साथ देऊया सुखाला |

एकदम सुंदर कवीता. आवडली.

प्राजु's picture

11 Nov 2008 - 9:13 pm | प्राजु

अतिशय सुरेख कविता.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

11 Nov 2008 - 11:58 pm | विसोबा खेचर

सुंदर कविता...! क्या बात है

तात्या.

राघव's picture

17 Nov 2008 - 2:31 pm | राघव

सुंदर कविता. :)

सागरात हेलावते
नाव माझी वादळात
शीड तिचे तुटलेले
दिशाहीन अंधारात |

तुटलेले काही बंध
ओढ लावती जीवाला
काही नाती, क्षण काही
माझे, मागते देवाला |

हे विशेष भावलेत.
मुमुक्षु

आनंदयात्री's picture

17 Nov 2008 - 3:06 pm | आनंदयात्री

>>आयुष्याचा सारीपाट
>>मीच माझा मांडलेला |

या ओळी खुपच आवडल्या !
मस्त !!