हॅशटॅग आयुष्य

Primary tabs

बेसनलाडू's picture
बेसनलाडू in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am


मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका
हॅशटॅग आयुष्य
चाटेसरांनी प्रसिद्ध करेतोवर ‘कोचिंग क्लासेस’ ही संकल्पना तितकीशी नावाजलेली नव्हती. नाही म्हणायला कोणा अमक्या मास्तरांच्या, कुणा तमक्या बाईंच्या खाजगी शिकवण्या वगैरे अस्तित्वात होत्या, पण एखादी छोटी खोली आणि समोरची हाताच्या बोटांवर मोजता येण्याइतकी मुले यापलीकडे त्याचा विस्तार नसे. त्या वेळी मी शाळेत होतो आणि कॉलेजात शिकणारे माझे ताई-दादा वगैरे मंडळीसुद्धा गणित, अकाउंटिंग वगैरेंच्या ‘क्लासेस’ना जात असली, तरी ‘कोचिंग’ हा प्रकार बव्हंशी खेळापुरता मर्यादित होता. अशा परिस्थितीत लहानाचे मोठे झालेलो आम्ही, जेव्हा ‘लाइफ कोच’सारख्या संकल्पनांना सामोरे जाऊ लागलो, तेव्हा भांबावून जाणे स्वाभाविकच होते. म्हणजे तोवर आम्ही आयुष्य जगलोच नव्हतो वगैरे अशातला भाग नाही. किंबहुना तोवर भेटलेला एकमेव ‘कोच’ म्हणजे शाळेच्या क्रिकेट संघाचे प्रशिक्षक. त्यांच्या अखत्यारीतले, त्यांच्या खास पद्धतीचे प्रशिक्षण अनुभवल्यानंतर आता ‘लाइफ कोच’ कसले डोंबलाचे धडे देत असेल - ते सुद्धा आयुष्याबद्दलचे - अशी रास्त शंका आमच्यासारख्यांच्या मनात डोकावणार, हे नक्कीच होते.

आता अशी शंका यायलासुद्धा तोवर जगत आलेले आयुष्यच कारणीभूत म्हणावे लागेल. शाळेत शिकवल्या गेलेल्या नामांकित कवींनी, लेखकांनी आयुष्याबद्दल इतके काय काय लिहून ठेवलेय, की ते समजून घेताना - तेसुद्धा शालेय वयात - दमछाक व्हायचीच! मग जे शिकलो, त्याचा उपयोग आयुष्य जगण्यापेक्षा मराठीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवण्यासाठीच व्हायचा, हे वेगळे सांगायला नकोच! बरे, घरच्यांकडून आयुष्याबद्दल काही शिकायचे म्हटले आणि त्या अनुषंगाने प्रश्न विचारले, की घरच्यांची पंचाईत व्हायची. म्हणजे समाधानकारक उत्तरे न देता येणे, बालमनाला समजतील अशी उत्तरे न देता येणे, असे प्रकार व्हायला लागले की "'मोठा’ झालास की कळेल हं” हे त्यांचे उत्तर ठरलेले असायचे. ‘किती’ मोठे झाल्यावर कळेल, हे मात्र कोणालाच सांगता यायचे नाही.


images-5


थोरामोठ्यांकडून आणि शिक्षकांकडून न मिळणाऱ्या प्रश्नांची उत्तरे समाजाकडून आणि स्वाध्यायातून मिळवण्याचा प्रयत्न काही नवीन नाही. मित्रमैत्रिणी, भावंडे यांच्यापलीकडच्या समाजात सापडणारा पहिला मित्र म्हणजे बॉलिवूड. तिकडे कित्येक प्रसिद्ध मंडळींनी ‘बाबूमोशाय, जिंदगी बंदी होनी चाहिये, लंबी नही’, ‘जिंदगी एक सफर है सुहाना’ असले काय काय सांगून ठेवलेले! त्यावर बेधडक विश्वास ठेवून जगायचे ठरवले, तर दुसरीकडे काही महाभाग ‘जिंदगी कैसी है पहेली हाये’, ‘जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मुकाम, वो फिर नाही आते’ असेही म्हणून गेलेले! त्यामुळे आयुष्य फ्रंटफूटवर खेळायचे की ब्याकफुटवर, की ‘वेल लेफ्ट’ करायचे, याची धांदल! नशिबात जसा चेंडू पडेल तसे खेळू, असा त्यातल्या त्यात सुरक्षित पर्याय निवडून आम्ही पुढे सरकत गेलो, हे नक्की!


20191016-102519

हे नशीब एकदा आयुष्याशी जोडले गेले की जगण्याचा शोध जास्त तीव्र होत जातो की काय, असेही वाटून जाते. मुळात काही जाणकारांच्या मते, नशीब हे जन्मापासूनच आपल्याला येऊन चिकटते आणि ते घडवता-बिडवता येऊ शकते, हे साफ खोटे आहे म्हणे! मग असे असेल, तर जगायचे म्हणजे नेमके काय करायचे? तर जे जे बरेवाईट वाट्याला येत जाईल, ते ते निमूटपणे, विनातक्रार स्वीकारत जायचे? थोडक्यात नशिबात काय वाढून ठेवले आहे, त्यास सामोरे जायचे. जगण्याचा शोध घेत असताना ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’चे उपदेशाचे डोस कुणी पाजू लागले की हे नशीब जगण्याला घट्ट चिकटून बसले आहे, याची जाणीव अधिकाधिक तीव्र होऊ लागते. मोठे होताना याबद्दल काही विशेष वाटले नाही, पण जगण्याच्या व्यवहाराशी दैनंदिन संबंध येऊ लागल्यावर मात्र या तत्त्वज्ञानातून येणारी असाहाय्यता खूप बोचू लागली. स्वतःसाठी आयुष्यात निश्चितसे ध्येय ठरवावे, ते साध्य करण्याची स्वप्ने पाहावीत, त्यासाठी पावले उचलावीत आणि एक दिवस या असाहाय्यतेची अशा अनपेक्षितपणे जाणीव व्हावी की जगणे खोटे किंवा एखादे दु:स्वप्न वाटावे. या क्षणापाशी पोहोचेतोवर तुमच्या आयुष्यात काहीच चांगले झालेले नसते, तुम्हाला असीम आनंद देणारे काही घडलेले नसते, असे मुळीच नसते. पण त्या आनंदाची नि सुखाची गुंगी आपल्याला लांब कुठवर तरी घेऊन गेलेली असते. अशा ठिकाणी, जिकडे आसपास सतत सावलीसारखे पण चोरपावलांनी वावरणाऱ्या नशीब, असाहाय्यता वगैरेंचा मागमूसही लागत नाही. पण ज्यामुळे अशी गुंगी येते, त्या सगळ्यालाही आपण जगणं म्हणूच शकतो की! एखादी सुंदर कविता वाचणे, तिचे झालेले गाणे ऐकणे, एखाद्या सुंदर मुलीत किंवा मुलात गुंतून पडणे, छान वर्तुळाकार पोळी लाटणे, ती तेवढीच सुंदर मऊसूत भाजणे, पातेल्याच्या तळाशी चिकटलेली बेरी खरवडून खाणे, इथपासून ते गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत बेभान नाचणे, भारत-पाकिस्तान मॅचनंतर भारत जिंकल्याचा आनंद दिवाळीसारखा फटाके फोडून साजरा करणे हे जगणेच आहे. फरक इतकाच की हे आपल्याला हवे असते; याची आपण स्वप्ने बघितलेली असतात आणि बघितलेली स्वप्ने सत्यात उतरावीत यासाठी कधी प्रयत्न केलेले असतात, तर कधी प्रार्थना केलेल्या असतात.

अशी स्वप्ने बघण्याची इच्छा, आयुष्यात एक निश्चित ध्येय गाठायची इच्छा, नि ती सत्यात उतरवण्यासाठीच्या प्रयत्न नि प्रार्थनांची ऊर्मी आपल्यात कुठून येत असावी, याचे कुतूहल मला नेहमीच वाटते. फक्त याचेच नाही, तर एकंदर माणूस असण्याचेच! विचारक्रिया (यात तर्कशास्त्र, कार्यकारणभाव वगैरे आले असे मानून चालू), शरीरक्रिया यांच्यावर असलेला मेंदू नावाच्या अवयवाचा प्रभाव मान्य जरी केला तरी मनाचा प्रश्न मात्र अजून अनुत्तरितच आहे. इच्छा, स्वप्ने मनात जन्म घेतात, असे म्हटले, तर मनाचा शोध घ्यायचे प्रयत्न चालू होतात. मनाबद्दल तर सगळ्याच साहित्यिकांनी, कवींनी, विचारवंतांनी इतके काय काय म्हणून ठेवलेय माझ्यासारख्याने काहीच न म्हटलेलेच बरे! पण मनाच्या खोल डोहात उतरण्यापूर्वी, त्याच्या अस्तितत्वाची जाणीव नि मग त्याच्या आत, खोलवर ‘काय’ आहे, ‘का’ आहे, याच्यामागे धावणारे कुतूहल हेसुद्धा जगणेच, हासुद्धा एक प्रकारे जगण्याचा शोध. आणि तो शोध घेणारे, इच्छुक नि शोधक भावाने जगणारे आपल्यासारखे कित्येक जण ही विश्वाची जमा.

असे म्हणतात ली यशापेक्षा अपयश, सुखापेक्षा दु:ख आपल्याला खूप जास्त काही शिकवून जाते. नशीब, असाहाय्यता वगैरे इतर वेळी नकळत दुर्लक्षिलेले दैत्य समोर उभे ठाकतात. अशा वेळी जगण्यातले कुतूहल, इच्छुक भाव वगैरे कोणी मदतीला येत नाही. कोणत्याही ‘लाईफ कोच’चे motivational speech, pep-talk वगैरे कामी येत नाही. त्या वेळी प्रत्येक मनुष्य हा निर्णयक्षम वेळेच्या तारेवर कसरत करत असतो. जी.ए. कुलकर्णी म्हणतात तसे, इतर वेळी कितीही ‘भारी’ असलेला मनुष्य अशा निर्णय घेण्याच्या वेळी मात्र पूर्णपणे एकटा असतो, एकट्याने लढत असतो. पण अशा वेळी कर्तव्यभावनेचा भगवान कृष्णाने घालून दिलेला धडा गिरवायला कुणी मागेपुढे पाहत नाही. आपल्या हातून या परिस्थितीत जे होणार आहे, तेच विधिलिखित आहे, या विश्वासातून मनुष्य ते कर्तव्य पार पाडतो. कधीकधी ते कर्तव्य बंदुकीचा चाप ओढण्याचं असते, कधी व्हेंटिलेटरवरच्या कुणाच्या शरीरात खुपसलेल्या नळ्या काढून टाकण्यावरच्या संमतीपत्रावर सही करण्याचे असते, कधी कुणाला ‘बाइज्जत बरी’ करण्याचे. मनातून - आणि बुद्धीलाही - अप्रिय वाटणारे निर्णय घेताना केवळ विश्वासाच्या आणि आशेच्या बळावर कृती करणे, त्या वेळी कुतूहलाला, शोधक वृत्तीला लगाम घालणे - मुळात चिकित्सा न करणे, प्रश्नच न विचारता मार्गक्रमण करणे, हे अशा विशिष्ट वेळी प्रकर्षाने जाणवणारे जीवनविशेष हेच जगण्याचा मुख्य किंवा एकमेव मार्ग मानून जगणारे जीव विश्वात आहेतच.

सारांश हा, की आजच्या जमान्यात गूगलमुळे नि हॅशटॅगमुळे असंख्य गोष्टींचा शोध घेणे सोपे झाले असतानाही आयुष्याचा शोध घेणे आजही सोपे नाही. माणसांच्या मनाचा, स्वभावाचा पूर्ण थांगपत्ता लागणे आजही कठीणच आहे. उतारा म्हणून कोणीतरी living in the present किंवा living in the momentचा शोध लावलाय खरा, पण तो जितका कागदावर वाचायला सोपा वाटतो, त्यापेक्षा जगायला कठीणच आहे. मग उपलब्ध अनेक मार्गांपैकी कोणता मार्ग निवडून जगावे, याचे चिंतन हेच कदाचित जगण्याचे रसग्रहण असावे, असे म्हणायलाही वाव आहे. किंवा प्रकृती नि परिस्थितीप्रमाणे वेगवेगळा मार्ग निवडून पण तरीही समाधानाने जगावे, असे त्यातल्या त्यात आशादायक चित्र रंगवायलाही वाव आहे. चिकित्सक वृत्तीने, कुतूहल जागवत जगायचे असेल, तर या पर्यायांमधला परस्परसंघर्ष पाहणे, हा सुद्धा एक पर्याय आहे. पण जिकडे संघर्ष पेटतो, तिकडे वेदना जन्मतात, त्यामुळे त्यांचीही तयारी ठेवावी. त्यांच्या सान्निध्यात मग ‘पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे’ म्हणायची पाळी आली, तरी ती वेळ आपल्या आयुष्याचे रसग्रहण करण्याच्या इच्छेने किंवा महत्त्वाकांक्षेने आली आहे, इतकेच जरी लक्षात असले तरी पुरे.

दीपावलीच्या मुहूर्तावर हा भलताच पसारा मांडायचा नादानपणा सांगितला कोणी? चुपचाप चकल्या-लाडू हाणून, दिवाळी अंक वाचून-बिचून मज्जा करा राव, हे काहींच्या मनात आल्यावाचून राहणार नाही, पण इन्स्टंट जगण्यातले विसाव्याचे मोजकेच क्षण नादान मनात खोल कुठेतरी लपलेल्या या गोष्टी उफाळून वर यायला कुठेतरी हातभार लावतच असतात. मिरझा गालिबच्याच शब्दात सांगायचं झाले तर,

दिल-ए-नादान तुझे हुआ क्या हैंं
आखिर इस दर्द की दवा क्या हैंंश्रेयनिर्देश : चित्रे आंतरजालावरून साभार.


20191016-122815

अनुक्रमणिका

मनोगत/अनुभव

प्रतिक्रिया

एकदम भन्नाट आणि चपखल. नेमकं लिहिलंय बेला.

चिकित्सक वृत्तीने, कुतूहल जागवत जगायचे असेल, तर या पर्यायांमधला परस्परसंघर्ष पाहणे, हा सुद्धा एक पर्याय आहे. पण जिकडे संघर्ष पेटतो, तिकडे वेदना जन्मतात, त्यामुळे त्यांचीही तयारी ठेवावी.

अगदी मनापासून पटले. संवेदनशील, चिकित्सक मनाला जगतांना अस्वस्थता, वेदना येतेच. गुलजार म्हणून गेलाय ना -

दिल अगर है तो दर्द भी होगा
इस का कोई नहीं है हल शायद

पद्मावति's picture

30 Oct 2019 - 5:05 am | पद्मावति

मस्तंच.

टर्मीनेटर's picture

3 Nov 2019 - 3:29 pm | टर्मीनेटर

उतारा म्हणून कोणीतरी living in the present किंवा living in the momentचा शोध लावलाय खरा, पण तो जितका कागदावर वाचायला सोपा वाटतो, त्यापेक्षा जगायला कठीणच आहे.

माझा जीवनविषयक दृष्टिकोन असाच आहे! त्यामुळेच कदाचित घायल चित्रपटातील,

सोचना क्या जो भी होगा देखा जाएगा...
कल के लिए आज को ना खोना...
आज ये ना कल आएगा...

हे गाणे आणि गोलमाल-3 मधील

अपना हर दिन ऐसे जियो, जैसे के आखिरी हो...
जियो तो इस पल ऐसे जियो, जैसे के आखिरी हो...

हे गाणे मला खूप आवडत असावे! लेख आवडला,धन्यवाद.

दिल-ए-नादान तुझे हुआ क्या हैंं
आखिर इस दर्द की दवा क्या हैंं

आयुष्यभर आपण आपल्याला नेमकं काय झालंय, काय हवंय व ते कसं मिळवता येईल याचा शोध घेण्यातच जातो. मस्त जमुन आलाय लेख.

मुक्त विहारि's picture

21 Nov 2019 - 10:36 pm | मुक्त विहारि

हसत जगावे ...हसत मरावे. ..

गोंधळी's picture

25 Dec 2019 - 6:44 pm | गोंधळी

सारांश हा, की आजच्या जमान्यात गूगलमुळे नि हॅशटॅगमुळे असंख्य गोष्टींचा शोध घेणे सोपे झाले असतानाही आयुष्याचा शोध घेणे आजही सोपे नाही. माणसांच्या मनाचा, स्वभावाचा पूर्ण थांगपत्ता लागणे आजही कठीणच आहे. सहमत.

आयुष्याच्या जन्म ते म्रुत्यु पर्यंत्च्या प्रवासात असंख्य प्रश्न पडत असतात त्यांची उत्तर मनाला समाधान करणारी नसतात.यातुन येणारी अस्वस्थता,सत्य जाणुन घेण्याची ईच्छा जगण्याला बळ देत असते.
असमाधानाकडुन समाधानाकडे जाणारा प्रवास म्हणजेच आयुष्य असावे.

जॉनविक्क's picture

25 Dec 2019 - 9:35 pm | जॉनविक्क

असमाधानाकडुन समाधानाकडे जाणारा प्रवास म्हणजेच आयुष्य असावे.

वाह..!

जसे जन्मा सोबत सुरू होतो व मरताना थांबतो म्हणून श्वास म्हणजे जसे जीवन आयुष्य न्हवे तसेच आयुष्य आणी जाणीव या वेगळ्या गोष्टी आहेत खऱ्या पण एक भासतात. आयुष्य चालू राहते जाणिवेची पातळी कमी जास्त होते (झोप /जागेपणा)

आयुष्य ही संपूर्ण जीवशास्त्रीय क्रिया आहे तर जाणीव... cosmic म्हणून शकतो. तिचा समाधाना पर्यंत प्रवास म्हणजे आयुष्य अशी बोजड व्याख्या होऊ शकेल :)

नाटक्या's picture

1 Jan 2020 - 9:12 pm | नाटक्या

बेला शेट!

बर्‍याच दिवसांनी तुमचा लेख वाचायला मिळाला... चला पुन्हा कॅलिफोर्नियाचा कट्टा करायला पाहिजे.

नाटक्या