सगळं काही सुरळीत चाललेलं असताना
एखाद्या वळणावर अचानक निम्मी भेटते
आणि मग....
सगळं अंधुक होत जातं
दिसत राहते ती फक्त निम्मी
ऐकू येतो तो फक्त तिचाच आवाज
जाणवत राहतं ते फक्त तिचंच अस्तित्व
तिचा तो जीवघेणा सुगंध,
पुढच्या कित्येक रात्री बरबाद करत राहतात
सतत चाहूल... भास... भ्रम
..
निम्मी साली छळत राहते अधूनमधून
..
निम्मी एखाद्या श्वापदापेक्षा कमी नाही
तिचं नुसतं बघणं,
सावजावर स्थिरावलेली नजर वाटते
तिच्या साध्यासाध्या हालचाली,
शिकारीसाठी घेतलेले पवित्रे वाटत राहतात
त्यातून तिचं ते बोलता बोलता मध्येच ओठ आत मुडपून घेणं
किंवा
एखादं वाक्य बोलून गर्रकन गिरकी घेऊन वळणं
कुणालाही जागच्या जागी खलास करू शकतं
..
निम्मी सुंदर आहे
लहरी आहे
निडर आहे
हट्टी आहे
प्रसंगी निर्दयी आहे,
पण ढोंगी नाही
भरकटणं तिचा स्थायिभाव आहे
आणि कितीही नाही म्हटलं
तरी आपणही भरकटतोच तिच्यामागे
का तिलाही तेच हवं असतं... कुणास ठाऊक
.....निम्मीला सांभाळणं सोपं नसावं
..
निम्मी अप्राप्य वाटते.. असेलही... आहे
त्यामुळेच कदाचित,
तिचं जबरदस्त आकर्षण वाटत राहतं
तिच्याकडून नक्की काय हवंय
हे कळत नाही
पण,
तिच्या सतत आसपास राहावसं वाटतं
तिला हात लावून बघावासा वाटतो
कदाचित,
लांबून वाटते त्यापेक्षाही तलम असेल ती
तिचे लांबसडक केस छेडावेसे वाटतात... सतारीच्या तारांसारखे
पण,
सतारीपेक्षाही त्यांतून सारंगीचेच स्वर यायची शक्यता अधिक
..
निम्मीचे डोळे म्हणजे धरणाची भिंतच जणू
पलीकडे प्रचंड पाणी असणारे
त्या लोंढ्यात वाहून जायची तयारी असेल
तरच तिच्या नजरेला नजर द्यावी.
निम्मी अथांग आहे,
तिच्या डोळ्यातल्या पाण्याइतकीच
आणि स्वतःच स्वतःच्या तळाशी आहे
वर दिसतात ते फक्त तिचे तरंग
..
निम्मी एक वादळ आहे
मन मानेल तिथे जाते, वाटेतलं सगळं भिरकावून देते
आणि दूर कुठेतरी जाऊन शांत होते.
..
निम्मी एक धुमसणारी आग आहे
कधी हळूहळू पसरत जाते, कधी एकदम भडकते
तर कधी असह्य धग देत राहते.
..
निम्मी हळूहळू गर्द होत जाणारं रान आहे
सुरुवातीला पायवाटा स्पष्ट दिसतात
नंतर मात्र वाट चुकत जाते.
..
निम्मी एकदा का तुमच्या आयुष्यात आली
की तुमची तिच्यापासून सुटका नाही
ती छळत राहणार.. अखंड... मरेपर्यंत
..
निम्मी एक जहाल विष आहे
पण एक ना एक दिवस मरायचंच आहे
तो यह जहर ही सही...