कमुआत्या

Primary tabs

रणजित चितळे's picture
रणजित चितळे in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am


मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका
कमुआत्या
कमुआत्याला जाऊन आज एक वर्ष झाले. संध्याकाळी आम्ही घरातले तिची आठवण काढत होतो. माझी आजी, कमुआत्या, आई, वडील व त्यांचा भाऊ - आम्ही त्यांना भाऊकाका म्हणायचो. भाऊकाका अविवाहित होते. आम्ही एकत्र राहायचो. माझे वडील तिला कमळाताई ह्या नावाने हाक मारायचे. आमच्यासाठी ती कमुआत्या होती. कमुआत्या म्हटले म्हणजे सदा प्रसन्न व हसरा चेहरा. सडपातळ देहयष्टी व दुसऱ्याला मदत करायची हौस हे आठवते. कमुआत्या कोठेही कधी जायची नाही. ती असल्यामुळे आमच्या घराला क्वचितच कुलूप लागायचे. आम्हाला ती माजघरात सतत काहीतरी करताना दिसायची. माजघरात पाटावर बसून खाली ठेवलेल्या चुलीवर स्वयंपाक करायची. लहान मुलांना तेथेच ताट ठेवून जेवू घालायची. तिची एक ठरलेली बसण्याची तऱ्हा होती. कोपऱ्यात पाटावर सुखासनात डावी मांडी वर करून बसायची. चुलीवर भांडे ठेवलेले. शेजारी विळी व फोडणीला लागणारे तिखटमिठाचे पंचपात्र.

नेहमी घरात असल्याकारणाने घराच्या किल्ल्यांचा जुडगा चंचीच्या शेजारी खोचलेला असायचा. घरातले पैसे व दागिने तिच्याच ताब्यात असत व सणावाराला घरातल्या स्त्रियांना परिधान करण्यासाठी तीच दागिने द्यायची. तिने कोणताही दागिना कधी घातलेला माझ्या आठवणीत नाही.
चौथी पास कमळाताई माझ्या वडलांची मोठी बहीण. तिच्या वयाच्या चौदाव्या वर्षीच तिचे लग्न झाले होते व सहा महिन्यात तिचे यजमान वारले. विधवा कमळाताई तेव्हापासून आमच्याकडेच राहिली. माझ्या आजीचे एक गुरुजी होते. मंगळूरकर गुरुजी. माझी आजी फार मानायची त्यांना. कमुआत्याची फार श्रद्धा मंगळूरकर गुरुजींवर. दुःखी व सतत उदास राहणार्‍या विधवा कमुआत्याला वयाच्या पंधरा वर्षापासून नामस्मरणाचे महत्त्व पटवून देणारे मंगळूरकर गुरुजी. परिस्थितीशी सलगी कशी साधायची हे त्यांनीच तिला शिकवले.

ती घरातले दागिने कोठे ठेवायची ते तिलाच माहीत होते. जिवंत होती तोपर्यंत दागिन्यांबद्दल कोणी विचारले नाही व तिने कधी सांगितले नाही. आता कळायला मार्ग नव्हता. आम्हाला आठवते तसे दागिने कधी तिच्या खोलीतल्या कपाटात ठेवायची किंवा कधी तिच्या पलंगाखालच्या ट्रंकेत. ज्या ज्या जागा असू शकत होत्या, त्या त्या सगळ्या जागा शोधायचा प्रयत्न केला, पण यश आले नाही.

काही कळेनासे झाले होते.

एके दिवशी मंगळूरकर गुरुजी अचानक आले. बोलता बोलता कमुआत्याचा विषय निघाला. माझ्या वडलांनी व भाऊकाकांनी गुरुजींना झालेली पंचाईत सांगितली. गुरुजी म्हणाले, "एक उपाय आहे. पण त्यासाठी आपला सर्वांचा होकार लागेल." सर्वांचा म्हणजे घरातल्या मोठ्यांचा. कारण, कॉलेजातल्या आम्हाला घरात काय चालले आहे जरी उमगत असले, तरी घरातल्या निर्णयात कोणी सहभागी करून घेत नसत.

घरातल्या मोठ्यांनी होकार दिला. आमच्याकडे दुसरा तोडगा नव्हता. गुरुजी म्हणाले, "गावाच्या वेशीजवळ एक वृद्ध साधू राहतो. त्याच्याकडे विशेष शक्ती आहेत. तो अदृश्यांना थोड्या वेळेसाठी दृश्य करू शकतो." हे ऐकून आमची तोंडे कोरडी पडली. भाऊकाकांना व वडलांना काय करावे उमजेना.

मग भाऊकाकांनी धीर करून विचारले, "काय करावे लागेल?"

मंगळूरकर गुरुजी म्हणाले, "काही नाही. तो साधू नेहमी स्वतःत मग्न राहतो. कोणाशी बोलत नाही. कोणासाठी काही करत नाही. पण माझा तो एकेकाळी शिष्य होता, त्यामुळे माझे ऐकतो. कोणाचे वाईट करण्यासाठी तो त्याची ही विद्या वापरत नाही. कोणाला मदत होत असेल, तर तो माझ्या सांगण्यावरून मदत करतो. पैसे घेत नाही. एक वेळचा मूठभर शिधा घेतो व एक महिनाभर दुपार-संध्याकाळ मंदिरात ओसरीवर बसणाऱ्या गरजूंना जेवण वाढायला सांगतो."

पुढच्या आठवड्यात मंगळूरकर गुरुजी, भाऊकाका व वडलांना घेऊन त्याच्याकडे गेले. साधू शेकोटीशेजारी बसून भात खात होता. साधू त्यांना बघून म्हणाला, "हाती घेतलेले काम झाले की पाच दिवसांनी संध्याकाळी ७ वाजता घरात असा. बोलावतो त्यांना."

भाऊकाका व वडलांनी एकदम विचारले, "कोणाला?"

लहानपणी प्लॅन्चेटचे खूळ डोक्यात होते. त्याबद्दल ऐकले होते. आम्ही बऱ्याच वेळेला प्लॅन्चेटवर गप्पा मारल्या होत्या. मित्रांबरोबर सहलीला गेलो होतो, तेव्हा रात्री एका मित्राच्या दिवंगत घरमालकांना बोलवायचा प्रयत्नही केला होता. इंग्लिश ए बी सी डी व नंबर घातलेला कागद व त्यावर काचेचा ग्लास फिरायला लागल्यावर भीती वाटून त्या ‘घरमालकांना’तसेच सोडून आम्ही तेथून धूम ठोकली होती. मला वाटले होते, वडील व भाऊकाकांकडून तो साधू असेच काहीसे करवून घेईल म्हणून.

वडलांनी विचारले, "काय करणार?" प्लॅन्चेट करणार का असे भाऊकाकांनी अडखळत विचारले. तो गालातल्या गालात हसला. मान नाही अशा तऱ्हेने हलवली. म्हणाला, "फार प्रश्न विचारता. मंगळूरकर गुरुजींसाठी करेन. पुढच्या आठवड्यात अष्टमी आहे. संध्याकाळी घरी येईन. कमुताई माजघरात जास्त वेळ घालवायची. मी माजघरात आत्म्यांना बोलावेन. त्या वेळेला घरातल्या पुरुषांनी माजघरात असावे लागेल. भिंतीला टेकून रांगेत बसलात तरी चालेल. हे चालू असताना, घरातल्या स्त्रियांनी देवदर्शनाला जवळच्या देवळात गेलेले बरे."

पुढच्या आठवड्यात ठरलेल्या वेळी साधू आला. म्हणाला,
"मी जेव्हा आत्म्यांना बोलावेन, तेव्हा ते आल्याचा तुम्हाला भास होईल. तुमच्या अंतर्मनाच्या पटलावर ते आलेले तुम्हाला दिसतील."

"म्हणजे आम्हाला प्रत्येकांना एकदम?" भाऊकाकांनी साधूला विचारले.

"होय, ह्या खोलीतल्या प्रत्येकांना एकदम दिसतील." साधू म्हणाला.

"डोळे उघडे ठेवायचे का मिटायचे?" वडलांनी विचारले.


.

साधू म्हणाला, "काहीही केले तरी चालेल. तुम्हाला ते दिसतील." त्याने धूप पेटवले व एका तसराळ्यात आम्हाला कापूर व गोवऱ्या ठेवायल्या सांगितल्या. तो स्वतः पद्मासन घालून बसला व काहीतरी मंत्र पुटपुटू लागला. थोड्या वेळातच आम्हाला त्याने इशारा केला. आम्ही समजलो. साधू आम्हांंला म्हणाला, "बोलू नका. दिसल्यावर नुसता हाताने इशारा करा."

पुढे काय होणार ह्याची वाट बघत आम्ही सतरंजीवर चुपचाप बसलो. वडलांनी व भाऊकाकांनी डोळे मिटून घेतले होते. मी उघडेच ठेवले होते. माझ्या डोळ्यासमोर एक दृश्य दिसले. खोलीच्या एका बाजूने आत्मे येत होते, आमच्या भोवती प्रदक्षिणा घातल्यासारखी खोलीची फेरी मारत दुसऱ्या बाजूने जात होते. मनुष्यासारखे दिसणारे होते. स्थूलता नव्हती. आत्मे वेगवेगळे होते की ऊर्जेचा एक लगदा होता, समजत नव्हते. एकाच वेळेला वेगवेगळेही होते व एकत्रही. हळूहळू खोलीत आत्म्यांची गर्दी वाढायला लागली. आम्ही बसलो होतो त्याच्या चोहोबाजूंना गोल फेरी मारताना एकमेकात मिसळत होते. एवढेच काय, आमच्या मधूनसुद्धा जात होते, त्यांना कोणतीच अडचण होत नव्हती, खोलीतल्या गोष्टींचा अडथळा वाटत नव्हता. कट्टा, फडताळ, भांडी, भिंती, आम्ही, तो पेटवलेला अग्नी जसे काही काहीच त्या खोलीत सामान नाही असे वावरत होते. खोलीच्या लांबी, रुंदी व उंचीत ते बांधलेले नव्हते. एखाद्या फुग्यासारखे किंवा कापसासारखे लीलया हवेत तरंगल्यासारखे उडत होते. पण उडतही नव्हते, कारण त्यांना पंख नव्हते. घनता नव्हती असे वाटत होते. मला हात लावता येईल असे वाटत होते, पण घाबरल्यामुळे ते करून बघता आले नाही. कोणत्या पदार्थाचे बनलेले होते समजत नव्हते. एकमेकांमधून पारदर्शक असल्यासारखे सहजच जात होते, पण पारदर्शकही नव्हते. मधूनच मला ते हवेचे बनलेले आहेत असे वाटत होते. मी डोळे बंद केल्यावरसुद्धा तेच दृश्य दिसत होते. फक्त खोलीचा संदर्भ गेला होता आता. उरले होते फक्त आत्मे. हा ऊनसावल्यांचा खेळ बराच वेळ चालला होता. पण ते कृष्णधवलही नव्हते. मला रंग पाहिल्यासारखे आठवते. मी गोंधळून गेलो. त्यांच्या चेहऱ्यावर हावभाव होते की स्थितप्रज्ञता होती, हे जाणण्यापलीकडचे होते ते सगळे. त्या आत्म्यांमध्ये माणसांव्यतिरिक्त वेगवेगळे प्राणी होते - सरपटणारे प्राणी होते, झाडे होती, पक्षी होते, किडे होते, ह्याबरोबरच माहीत नसलेल्या असंख्य प्राण्यांचाही समावेश होता. एवढेच काय, घन, द्रव व वायुरूप पदार्थ त्यांच्या मूळ स्वरूपात येत होते व जात होते. ऊर्जा होती की चैतन्य होते की घन पदार्थ होता, उमजत नव्हते, पण जाणवत होते. आम्ही घाबरलो. आता ह्यात कमळाताई कशा शोधायच्या, ह्याचा आम्हाला प्रश्न पडला. कारण आकार होता असे वाटत होते, पण तेवढीच प्रकर्षाने निर्विकारताही होती.

तेवढ्यात त्या तांत्रिकाचा आवाज आला. म्हणाला, "आता येतीलच थोड्या घटकेत. फक्त त्यांनाच व एकच प्रश्न विचारा. एकानेच फक्त. आत्मा जे काही उत्तर देईल ते ऐकून घ्या. समजले नाही तरी लक्षात ठेवा, पण उलट प्रश्न विचारू नका आणि कृपा करून दुसऱ्यांनासुद्धा काही विचारू नका."


images-21

आमची बोबडी वळली. भाऊकाका वडलांना म्हणाले "तू विचार." भाऊकाकांनी प्रश्न विचारायची जबाबदारी वडलांवर टाकली. मला वाटत होते, भाऊकाका सगळ्यात मोठे, त्यांंनी विचारले पाहिजे. तेवढ्यात वडलांनी "कमळाताई" अशी हाक दिली.

आम्ही तिघांनी कमळाताईला बघितले होते. त्या आत्म्यांच्या धुरासारख्या फुग्यात ती स्पष्टपणे दिसत होती. तिने तीच अंजिरी रंगाची सुती नऊवारी घातली होती. आमच्या कल्पनेने आम्ही तिला बघत होतो? प्रत्येकाला काही वेगळे दिसत होते का? आमच्याकडे वापरून जुन्या झालेल्या पूर्वीच्या सुती साड्यांच्या गोधड्या बनायच्या. जुन्या वापरलेल्या साड्या इतक्या मऊ असतात की त्याच्या गोधड्या मऊ व उबदार बनतात. अशा शिवलेल्या पांघरुणाला आम्ही ‘आई’ म्हणायचो. पांघरूण घेतले की आई जवळ आहे असे वाटायचे. माझी पांघरुणाची ‘आई’ त्याच अंजिरी रंगाच्या साडीची होती. रोज ती घेऊन झोपायचो.

वडलांनी धीर करून विचारले "कमुताई, तो दागिन्यांचा डबा कोठेशी आहे?" इतक्या जवळचे नाते. मला तर खरे "तू कशी आहेस?" हे विचारायचे होते. पण त्या तांत्रिकाच्या दमदाटीपुढे व घरातल्या मोठ्यांपुढे माझे काही चालणारे नव्हते. "माजघरात पाटाखाली" असे म्हणत दुसऱ्या भिंतीतून पार झाली. ती पार झाल्या झाल्या तांत्रिकाने आम्हाला इशारा केला व आत्म्यांचा खेळ संपला. आम्ही त्या तांत्रिकाभोवती गोळा झालो. त्याने मंत्र म्हणत हातावर घेतलेले भस्म सगळ्या दिशांना फुंकरले. त्या भस्माबरोबरच त्याने पेटवलेला अग्नी मंदावला व हळूहळू विझला. तांत्रिक दूध-केळे खात जायची तयारी करत आम्हाला म्हणाला, "माझे काम झाले. आता तुम्ही शोधा काय शोधायचे ते." तांत्रिक निघून गेला. पुढे बरेच दिवस त्याबद्दल आमच्या घरात बोलले जायचे. प्रत्येकाने कमुआत्याला वेगवेगळ्या साडीत बघितले होते. मला अंजिरी रंगाची नक्की आठवत होती. वडलांना पांढऱ्या, भाऊकाकांना मातकट रंगाची नऊवारी आठवत होती.

मी समजायचो, आमच्या घरात आम्हीच राहतो, एवढी वर्दळ असेल ह्याची कल्पनाच केली नव्हती कधी.

तो तांत्रिक म्हणाला की "एवढी गर्दी नेहमीच असते सगळीकडे. घरांच्या भिंती, घरं, प्रायव्हसी हे आपण तयार केलेल्या गोष्टी आहेत. तारेतून इलेक्ट्रिसिटी कशी वाहते, किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींना कसे भिंतींचे बंधन नसते, तसेच ह्या आत्म्यांचे आहे. हे सतत सगळीकडे असतात व एकाच वेळेला पदार्थरूपी किंवा ऊर्जारूपी असतात. माझ्या तंत्राने मी फक्त थोड्या वेळापुरते तुमचे अंतःचक्षू जागृत केले होते. आता तुम्ही जे पाहिले ते डोळ्यांनी नव्हे, तर अंतःचक्षूंनी पाहिले."

ह्या घटनेतून आम्ही सावरलो. ह्या वर्षी घरातल्या स्त्रियांना घालायला कमुआत्याच्या वेळचे दागिने होते. माजघरात पाटाच्या खाली फरशीखाली कप्पा होता. कमुआत्याने त्यात दागिने ठेवून परत ती फरशी सिमेंट लावून केव्हा बंद केली होती, हे आम्हाला कोणालाच कळले नव्हते. रोज आम्ही माजघरात जेवायचो, पण कधी वाटले नाही माजघराच्या पाटाखाली बघावे म्हणून.श्रेयनिर्देश: चित्रे आंतरजालावरून साभार.


20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

26 Oct 2019 - 2:17 pm | यशोधरा

मस्त जमली आहे कथा.

पद्मावति's picture

26 Oct 2019 - 2:20 pm | पद्मावति

मस्तंच. खुप आवडली कथा.

प्रकाश घाटपांडे's picture

26 Oct 2019 - 4:49 pm | प्रकाश घाटपांडे

छान कथा

विनिता००२'s picture

29 Oct 2019 - 5:00 pm | विनिता००२

सुरेख :)

शाम भागवत's picture

29 Oct 2019 - 6:32 pm | शाम भागवत

मस्त जमली आहे.

मीअपर्णा's picture

31 Oct 2019 - 3:23 am | मीअपर्णा

छान ओघवतं लिहिलं आहे.

टर्मीनेटर's picture

4 Nov 2019 - 7:52 pm | टर्मीनेटर

कथा आवडली...ज्याच्यावर अगदी संपूर्ण विश्वास आहे अशा व्यक्तीकडूनही तत्सम अनुभवाबद्दल ऐकले असल्याने पटली देखील.
धन्यवाद.

श्वेता२४'s picture

4 Nov 2019 - 10:03 pm | श्वेता२४

.

मुक्त विहारि's picture

23 Nov 2019 - 9:24 am | मुक्त विहारि

आवडली. ..

हि कथा मिपाच्या छापील दिवाळी अंकात वाचली.
छान वाटली. सत्यकथा आहे का?

रणजित चितळे's picture

6 Dec 2019 - 2:53 pm | रणजित चितळे

....