जुने जाऊ द्या ...

Primary tabs

Jayant Naik's picture
Jayant Naik in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am


मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका
जुने जाऊ द्या...

“निहार बेटा, नेहमी लक्षात ठेव. परमेश्वर जेव्हा एक दार बंद करतो, तेव्हा तो दुसरे दार उघडतो. तो असे का करतो, कुणास ठाऊक? पण करतो मात्र खरे.” निहारचे आजोबा - म्हणजे त्याच्या आईचे वडील त्याला सांगत होते.

निहार. अकरा-बारा वर्षांचा मुलगा. गोरा वर्ण. थोडीशी किडकिडीत म्हणावी अशी शरीरयष्टी. अगदी सरळ नाक. काळेभोर डोळे आणि व्यवस्थित कापलेले काळे केस. पाहताच कुणालाही आवडावा आणि त्याच्या डोक्यावर हात फिरवून त्याचे केस विस्कटून टाकावेत असे वाटावे असा गोड मुलगा. आत्ता पाषाणमधील त्याच्या आजोबांच्या बंगल्याच्या बाहेर एक मोठे वडाचे झाड होते, त्याच्या खाली एक लाकडी बाक होता, त्यावर निहार आणि त्याचे आजोबा बसलेले होते. निहारचे डोळे पाण्याने डबडबले होते. त्याचे बाबा लष्करात कर्नल होते. काश्मीरमधील एक बाँबस्फोटात नुकतेच त्याचे बाबा देवाघरी गेले होते. जेमतेम एक महिनाच झाला होता.

निहार एकदम भडकला! “तुम्ही काही मला त्या तुमच्या परमेश्वराचे सांगू नका. अगदी वाईट आहे तो. माझ्याच बाबांना न्यायची काय गरज होती? मी आता या पुढे कधीही देवळात जाणार नाही.. अजिबात नाही.” त्याचे आजोबा काही बोलले नाहीत. त्यांनी फक्त निहारच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला आपल्याजवळ ओढले. निहारला एकदम रडू कोसळले. आजोबांनी त्याला रडू दिले. त्यांच्याही डोळ्यात आता अश्रू आले होते.

ते दोघे बसले होते, त्याच्या डाव्या बाजूने एक रस्ता होता. त्यावरून जाणाऱ्या मोटारी आणि वेगवेगळ्या मोटरसायकली पहात ते दोघेही काही न बोलता बसून होते. तेवढ्यात एक कुत्रा एका काळ्या रंगाच्या मोटारीमागे भुंकत भुंकत धावायला लागला. लांबवर त्या मोटारीमागे जाऊन तो परत आला आणि निहार आणि त्याचे आजोबा बसले होते, त्याच झाडाखाली रस्त्याकडे तोंड करून तो बसला. तपकिरी रंगाच्या आणि झुपकेदार शेपटी असलेल्या त्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा होता. तसा तो भटक्या कुत्र्यासारखा दिसत नव्हता. आपली झुपकेदार शेपटी हलवीत तो येणाऱ्या जाणाऱ्या मोटारी मोठ्या आशाळभूतपणे पहात बसून होता. दोन-तीन मोटारींकडे त्याने दुर्लक्ष केले. मग पुन्हा एका काळ्या गाडीच्या मागे तो जोरात भुंकत मागे लागला. बऱ्याच लांबवर तो त्या मोटारीच्या मागे गेला. मग परत जणू निराश होऊन हळूहळू चालत तो झाडाजवळ येऊन बसला. आता तो बराच दमलेला वाटत होता. त्याचे पोट भात्यासारखे जोरजोरात वर-खाली होत होते. आपली जीभ बाहेर काढून तो तसाच येणाऱ्या आणि जाणाऱ्या मोटारींकडे आशाळभूतपणे पहात बसून होता. मग एकदम त्याने आपले सगळे शरीर जोर जोरात घुसळले. आपले पुढचे पाय पुढे करून एक मोठी जांभई दिली. आपली सगळी निराशा जणू त्याने झटकून टाकली आणि तो पुढच्या कारची वाट पाहायला सज्ज होऊन बसला.

“मी कालपासून बघतो आहे या कुत्र्याला. हा फक्त काळ्या गाड्यांच्या मागे जातो. हरवला आहे हा कुत्रा बहुतेक.” निहार म्हणाला.

“त्याला बहुतेक कुणीतरी काळ्या गाडीतून बाहेर सोडले असावे.. किंवा हाच चुकून अशा गाडीतून इथे उतरलाय की काय कोण जाणे? आपला मालक आपल्याला न्यायला येईल म्हणून हा काळ्या मोटारींमागे धावतो आहे की काय? त्याच्या गळ्यात पट्टासुद्धा आहे, तेव्हा हा कुणी तरी पाळलेला असणार.” आजोबा म्हणाले.

“त्याला खूप दम लागला आहे. त्याला थोडे पाणी देऊ का?” निहार म्हणाला.

“दे की. आपल्या बागेत एक छोटे घमेले आहे, त्यात आणून दे. पण लांबून दे. फार जवळ जाऊ नकोस त्याच्या.” निहारने मग त्या कुत्र्याला पाणी आणून त्याच्यापासून थोड्या लांब अंतरावर ठेवले.

त्या कुत्र्याने मोठ्या संशयाने एकदा निहारकडे आणि एकदा त्या पाणी ठेवलेल्या घमेल्याकडे आपली मान उंचावून पाहिले. मग आपली मान त्याने एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे फिरवली. मग तो आपल्या पोटावरच सरपटत थोडा पुढे सरकला. आपले दोन्ही कान त्याने एकदा पुढे घेतले आणि आपली शेपटी जोरजोरात हलवली. मग बहुतेक त्याच्या तहानेने त्याच्या संशयावर मात केली. तो आणखी पुढे सरकला आणि त्याने हळूच आपली जीभ पाण्यात घातली. एक घोट घेऊन त्याने परत आपली मान वर केली. एकदा निहारकडे आणि एकदा रस्त्याकडे पाहिले. मग तो उठून उभाच राहिला आणि त्याने अधाशीपणे पाणी प्यायला सुरुवात केली. लप लप ..चटक..फटक असे आवाज करत त्याने जवळजवळ सगळे पाणी पिऊन टाकले. मग त्याने निहारकडे पहात शेपटी हलवली आणि निहारकडे कृतज्ञतेने पहात तो थोडा वेळ तसाच उभा राहिला. मग परत मागे जाऊन रस्त्याकडे पहायची आपली जागा घेतली.

मग परत त्याचा तो काळ्या गाड्यांचा पाठलाग आणि परत निराश होऊन आपल्या जागेवर येऊन बसणे सुरु झाले. आता सूर्यास्त झाला होता आणि हळूहळू काळोख पडायला लागला होता. निहार आणि त्याचे आजोबा घरात परत गेले. पण निहारच्या डोक्यातून तो कुत्रा काही जात नव्हता.
“आजोबा त्या कुत्र्याला त्याचा मालक का टाकून गेला असेल? त्याला हा कुत्रा आवडत नव्हता का? आता त्याला भूक लागली असेल. त्याला मी पोळी नेऊन देऊ का?

“जा. आईकडून घे, पण लांबून टाक... जवळ जाऊ नकोस त्याच्या.” निहारने मग पोळी घेतली आणि तो बाहेर गेला. तो कुत्रा तसाच रस्त्याच्या कडेला मोटारींकडे पहात बसून होता. निहारने लांबूनच पोळी त्याच्या दिशेने टाकली. त्या कुत्र्याने एकदा निहारकडे संशयाने पाहिले. मग त्या पोळीकडे. मग तो हळूच पुढे आला. त्याने लांबूनच एकदा पोळीचा वास घेतला. मग आपली मान एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे वळवून आपली शेपटी जोर जोरात हलवली. त्याच्या पाणीदार डोळ्यात प्रथम संशय, मग अगतिकता आणि मग आपल्या भुकेची तीव्र जाणीव असे काही भाव उमटले. आपली जीभ बाहेर काढून त्याने पोळीला नुसता स्पर्श करून बघितला. मग तो अधाशीपणे त्या पोळीवर तुटून पडला.

पोळी खाऊन झाल्यावर त्याने निहारकडे बघून आपली शेपटी हलवली आणि तो मोठ्या प्रेमाने त्याच्या जवळ आला. पण तो आपल्या जवळ येत आहे हे बघताच निहारने घरात धूम ठोकली. एक-दोनदा भुंकून त्या कुत्र्याने आपली नाराजी दाखवली. मग तो खाली मान घालून परत रस्त्याच्या कडेला जाऊन बसला.

दुसऱ्या दिवशी शाळेतून आल्यावर निहारने पहिले, तर त्या कुत्र्याचा काळ्या गाड्या पाठलाग करायचा उद्योग चालूच होता. निहारच्या आजोबांनी त्याला पाणी दिले होते. निहारने परत त्याला पोळी खायला दिली. निहार जवळ येतोय असे दिसताच तो कुत्रा आनंदाने पुढे आला, पण जणू काही काल निहार पळून गेला होता, हे लक्षात घेऊन तो कुत्रा जरा लांब थांबला. मग पोळी त्याच्या समोर पडताच पोळी खाण्यात गुंग झाला. निहारला थोडा धीर आला आणि तो मग कुत्र्यासमोर तसाच त्याला पहात उभा राहिला. पोळी खाऊन संपताच त्याने निहारकडे पाहून आपली शेपटी जोरजोरात हलवली आणि तो निहारजवळ, त्याच्या पायापाशी येऊन उभा राहिला. निहारने घाबरत घाबरत त्याच्या पाठीवर हात ठेवला. हा निहारने केलेला पहिला स्पर्श. त्या खरखरीत स्पर्शाने निहार थोडा दचकला. त्या कुत्र्यानेही निहारकडे मन वर करून पाहिले आणि परत आपली शेपटी हलवून निहारला जणू सांगितले, “आपण आता दोस्त झालो..”

निहार मग घरी निघाला, तर तोही निहारच्या मागे आला. निहार आपल्या बंगल्याचे फाटक उघडून आत गेला, तेव्हा मात्र तो बाहेरच बसून राहिला. जणू तो निहारला विचारत होता, “मी आत आलो तर चालेल का?”

निहार त्याच्याकडे पहात थोडा वेळ थांबला आणि मग फाटक बंद करून आता गेला. त्या रात्री तो कुत्रा तसाच बाहेर बसून होता. दुसर्‍या दिवशी सकाळी निहारच्या शाळेची रिक्षा आली, तर हा रिक्षापर्यंत निहारला सोडायला आला आणि आपल्या पाणीदार डोळ्याने निहारकडे पहात आपली शेपटी हलवत उभा राहिला आणि रिक्षा जायला लागल्यावर जोरजोरात भुंकूत थोडा वेळ रिक्षाच्या मागे गेला. निहारने त्याला हात करून त्याचा निरोप घेतला. तेव्हाच निहारने ठरवले - आपण याचे नाव राजू ठेवायचे आणि आजोबांना विचारून त्याला आपल्या घरी घेऊन जायचे.

अशा प्रकारे राजू - निहारचा पहिला कुत्रा - तो शाळेतून परत आला, तेव्हा निहारच्या आजोबांच्या बंगल्याबाहेर बसून होता. निहारच्या आजोबांनी त्याला सांगितले की आता तो काळ्या गाड्यांच्या मागे पळत जात नव्हता, पण निहारची वाट पहात बाहेर बसून होता.

त्या दिवसापासून त्या कुत्र्याने आपला नवा मालक म्हणून निहारचा स्वीकार केला. निहारला एक नवा मित्र मिळाला. एके दिवशी निहारने आपल्या आईला विचारले, “आई, या राजूला समजले असेल का की त्याला आता नवे घर मिळाले? नवा मालक मिळाला? तो आपल्या जुन्या घराला.. जुन्या मालकाला विसरला असेल का?"

त्याच्या आईने निहारला जवळ घेतले आणि ती बराच वेळ गप्प बसली. मग तिच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. निहार एकदम बावरला, “आई, तू रडू नको ना! मला माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस तरी चालेल.”

निहारची आई एकदम गंभीर झाली आणि निहारच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, “आज तुला समजणार नाही, पण माझे बोलणे फक्त लक्षात ठेव. आपल्याला सगळ्यांनाच या राजूने एक मोठा धडा शिकवला आहे. बाबा मला सांगत होते, हा कसा काळ्या गाड्यांच्या मागे आपल्या मालकाला शोधत जायचा. आता नाही जात तो. जणू आपल्याला शिकवतोय की आपल्या हातून निसटून गेलेल्या गोष्टींकडे फार काळ लक्ष न देता आपल्या समोर येणाऱ्या नव्या गोष्टींचा आपण आनंदाने स्वीकार करायला शिकले पाहिजे. कारण नवे कदाचित हातून निसटून गेलेल्या गोष्टींपेक्षा खूप लोभस आणि आनंददायक असू शकते. किंबहुना ते तसे करणे हेच आपल्या हातात असते. गेल्या गोष्टींचा काही वेळ शोक करावा, त्यातून धडा घ्यावा, पण त्यात अडकून पडू नये. दररोज सकाळी नवा सूर्य उगवतो. तो नवा दिवस कदाचित खूप चांगल्या गोष्टी तुमच्यासमोर उलगडून दाखवू शकतो. त्याचा अस्वीकार करू नका, स्वीकार करा.”

निहारला सगळे काही समजले नाही, पण त्याला इतके नक्की समजले की आपले बाबा आता परत केव्हाही येणार नाहीत. आणि त्याला एकदम खूप जोराने रडू आले. तो रडताना बघून त्याची आईसुद्धा रडायला लागली. ते दोघे मायलेक मग कितीतरी वेळ एकमेकांच्या मिठीत तसेच बसून राहिले.

****

मग नाटकाचा एक अंक संपून पडदा पडावा आणि थोड्या वेळाने पडदा उघडून दुसरा अंक सुरू व्हावा, तसे झाले. निहारच्या आईने सहा महिन्यांनी दुसरे लग्न केले आणि निहारला आणि त्याच्या आईला मस्कतला यावे लागले. त्याच्या नव्या बाबांना इथे नोकरी होती. ते इथे खूप मोठ्या कंपनीत मोठे अधिकारी होते, असे निहारला समजले होते. आपल्या आजोबाना, आज्जीला, आपल्या जुन्या शाळेतील मित्रांना आणि राजूला सोडून इतके लांब यायला लागले, याचा निहारला खूप राग आला होता. पण तो रडण्यापलीकडे काहीही करू शकला नाही.

ही मोठी माणसे काही वेळेला लहान मुलांकडे अजिबात लक्ष देत नाहीत आणि काही वेळेला उगीचच ज्यात त्यात लक्ष घालतात. निहारचे असे स्पष्ट मत होते.

निहारला इथे एका अमेरिकन शाळेत प्रवेश मिळाला होता. खूप मोठी आणि सुंदर शाळा होती ही आणि प्रत्येक वर्गात एसी होता. त्यामुळे बाहेर कितीही उकडत असले, तरी आत खूप गार वाटे. त्यांच्या इथल्या बंगल्यातद्धा सगळीकडे एसी होते. पण निहारला हे सगळे काही म्हणजे काहीही आवडले नव्हते. तो दररोज आजोबांना आणि आज्जीला फोन करून "मला परत पुण्याला घेऊन जा" असे सांगत होता. आईला मात्र तो काहीही सांगत नव्हता. हे नवे बाबा आणायची काय गरज होती आईला?

एका रात्री जेवण झाल्यावर निहार आपल्या खोलीत परत गेला होता.
दारावर टकटक झाली. निहारने आपल्या हातातील आपण पहात असलेला, आपल्या बाबांचा फोटो पटकन उलटा करून ठेवला आणि दाराकडे पाहिले. त्याचे नवे बाबा आत आले. निहार आपल्या टेबलाजवळ खुर्चीत बसून अभ्यास करत होता. एक-दोन पुस्तके उघडलेली होती. एका वहीत तो काहीतरी लिहीत होता. त्या वहीच्या खालीच त्यांना ती उलटी करून ठेवलेली फोटोची फ्रेम दिसली. ते काही बोलले नाहीत. त्यांनी सगळ्या रूमवर एक नजर फिरवली आणि ते शेजारच्या बेडवर बसले. निहारकडे पहात ते म्हणाले, “काय निहार, कसा होता आजचा दिवस शाळेचा? ही नवी शाळा आवडते आहे का? शाळेत कुणाची ओळख झाली का?”

“अजून जास्त कुणाची ओळख झाली नाही.” निहार तुटकपणे म्हणाला. त्याला हे नवे बाबा काही फारसे आवडले नव्हते.

“होईल ओळख हळूहळू. थोडे दिवस तर झालेत या शाळेत जायला लागून.” निहारचे नवे बाबा म्हणाले.

निहारचे पहिले बाबा - म्हणजे त्याचे 'खरे बाबा' असे निहार म्हणायचा, ते किती छान होते. ते घरी आले की निहारला कुठे कुठे घेऊन जायचे, त्याचे खूप लाड करायचे. “तुमच्या लाडाने अगदी बिघडलाय हा मुलगा. तुम्ही परत गेलात की माझे काहीही ऐकत नाही हा!” त्याची आई त्याच्या पहिल्या बाबांना नेहमी म्हणायची.

आता तर काय? ते गेले. आता परत कधीही येणार नाहीत.

'का पण असे? तो देव तरी माझ्याच बाबांना का घेऊन गेला? गेला तो गेला आणि हे दुसरे नवे बाबा का म्हणून मला मिळालेत? आणि परत इकडे कुठे मस्कतला मला आणि माझ्या आईला यावे लागले. आज्जी म्हणते, देव खूप चांगला असतो आणि दयाळू असतो... अगदी वाईट असतो तो. मला माहीत आहे ना!' निहारला असे काही तरी नेहमी वाटे.

“निहार, तुला इथे रुळायला वेळ लागणार आहे, हे मला समजतंय, पण तू थोडा धीर धर. उद्या सुट्टी आहे. माझे एक मित्र इथे जवळ राहतात, त्यांच्याकडे उद्या संध्याकाळी जाऊ. त्यांचा मुलगा तुझ्या शाळेतच आहे. त्याची आणि तुझी ओळख होईल. तो तुझ्या वर्गातच आहे.” निहारचे नवे बाबा म्हणाले. त्यांना तू पप्पा म्हणू शकतोस असे आई म्हणायची. पण निहार अजून त्यांना नवे बाबा असे मुद्दामच म्हणायचा.

“ठीक आहे. जाऊ या आपण.” निहार म्हणाला. त्यालासुद्धा हे नवे गाव पाहायचे होते. नवे मित्र झाले तर त्याला हवेच होते.

त्याचे नवे बाबा जायला उठले. ते अगदी दारापर्यंत गेले आणि मग परत मागे आले. आता काय? असे निहारला वाटले. हे जात का नाहीत लवकर? “आणि निहार.. तुझ्या बाबांचा फोटो तुला माझ्यापासून लपवायची गरज नाही. ते तुझे बाबा होते आणि बाबाच राहतील. त्यांचा फोटो तू तुला हवा तेथे ठेवू शकतोस. good night..” असे म्हणून ते निघून गेले. जाताना त्यांनी खोलीचे दार लोटून घेतले.

निहारला आश्चर्य वाटले. त्याला वाटले होते की आपण आपल्या बाबांचा फोटो ठेवलेला त्यांना आवडणार नाही. त्याच्या आईच्या आणि या नव्या बाबांच्या खोलीत आता त्या दोघांचा फोटो होता. लग्नात काढलेला. आपल्या आईच्या शेजारी त्यांचा फोटो बघून निहारला राग आला होता. पण त्याची आई म्हणाली होती, “आनंद आता या जगात नाही, हे तू आणि मी जेवढ्या लवकर स्वीकारू तितके चांगले आहे. आपल्याला या जगात राहायचे आहे आणि आपण दोघेही आनंदी नसू, तर ते आनंदलासुद्धा आवडणार नाही. मी दुसरे लग्न केले म्हणजे माझे आनंदवरचे किवा तुझ्यावरचे प्रेम कमी होत नाही. ते कायम तसेच राहणार आहे.”

“मला माझे जुने बाबाच जास्त आवडतात. मला तू काहीही सांगू नकोस” असे निहार तेव्हा म्हणाला होता.

“तुझे पप्पा म्हणतात तेच खरे. तुला थोडा वेळ द्यायला लागेल, हे दिसते आहे मला. ते म्हणाले होते की.. एखादे रोपटेसुद्धा एका जागेवरून उपटून दुसरीकडे लावले, तर ते कोमेजते. त्याला परत फुलायला थोडा वेळ लागतो. आपण तर जिवंत माणसे आहोत आणि तू तर लहान आहेस अजून.” त्याची आई म्हणाली होती.

निहारला ते सगळे आठवले. निहारला वेळ दिला पाहिजे म्हणजे काय कुणास ठाऊक? पण आपल्या बाबांचा फोटो आपल्या टेबलावर आपण ठेवू शकतो, याचा त्याला आनंद झाला. टेबलाच्या एका कोपऱ्यात त्याने तो नीट लावून ठेवला आणि कितीतरी वेळ तो त्या फोटोकडे पहात राहिला. त्याच्या डोळ्यातून अश्रू केव्हा यायला लागले, हे त्याचे त्यालाच समजले नाही.

***

दुसर्‍या दिवशी निहारच्या नव्या बाबांना सुट्टी होती. इकडे शुक्रवारी सुट्टी असते म्हणे. निहारला ते अजिबात आवडायचे नाही. रविवारी सुट्टी का नाही? निहार, त्याचे नवे बाबा आणि आई असे सगळे मग दुपारीच मस्कत पाहायला गेले. निहारच्या नव्या बाबांची गाडी भली मोठी GMC होती. निहारला त्यांनी पुढे बसायला सांगितले. त्या गाडीत काय काय सोयी आहेत, हे त्यांनी निहारला नीट समजावून सांगितले. निहारला ही गाडी खूप आवडली. पुण्यात त्याच्या जुन्या बाबांची मारुती अगदीच लहान होती. आणि ही गाडी automatic होती. सारखे गिअर बदलायला लागत नसत. आणि या गाडीत खाली येणारा एक छोटा टीव्हीसुद्धा होता. सो कूल.. निहारला भारतातील सगळ्या गाड्या माहीत होत्या, पण ही गाडी त्याला फारशी माहीत नव्हती. मस्कतच्या सुरेख रस्त्यावरून अतिशय वेगात जाताना निहारला खूप मजा आली. एकदा तर १२० किलोमीटर वेग झाल्यावर निहारने आपला सीट बेल्ट घट्ट धरून ठेवला. द्रुतगती मार्गावरून ते मग लांब फिरून आले. मग ते नव्या बाबांच्या मित्राच्या घरी गेले. त्यांचा मुलगा राहुल एकदम मस्त मुलगा होता.

.


त्याच्याकडे कितीतरी व्हिडिओ गेम्स होते. निहार आणि राहुल एकच शाळेत होते, पण वेगळ्या डिव्हिजनमध्ये होते. संध्याकाळी मग सगळे अल शात्ती बीचवर गेले. तिथे तर खूप धमाल आली. राहुल आपल्याबरोबर प्लास्टिकची बकेट, एक खोरे आणि पाणी घालायची झारी घेऊन आला होता. इतका सुंदर बीच निहार पहिल्यांदाच पहात होता. मग त्यांनी किल्ला करायला घेतला. निहारचे नवे बाबा आणि राहुलचे बाबाही त्यांना मदत करायला आले. निहारची आई आणि राहुलची आई जवळच वाळूत फोल्डिंग खुर्च्या टाकून बसल्या होत्या. थोड्याच वेळात त्यांचा सुंदर किल्ला तयार झाला.

निहारने तर “हुर्रे” असे म्हणत जोरात उडी मारली. निहारची आई लांबून हे बघत होती. आज कितीतरी दिवसांनी निहार मनमोकळा हसत होता... ती आपल्या जागेवरून उठून आली आणि तिने निहारला जवळ घेऊन त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. काय झाले हे निहारला काहीच समजले नाही. पण तो कितीतरी वेळ आपण केलेला किल्ला पहात उभा होता.

निहारने मग राहुलला विचारले,
“आपला हा किल्ला या समुद्राच्या लाटेने वाहून गेला, तर आपण काय करायचे?”

“मग काय? आपण इथे परत आलो की पुन्हा दुसरा किल्ला करायचा.. खूप मजा येते किल्ला करायला!”

आपला किल्ला समुद्राच्या लाटेने वाहून जाणार याचे निहारला वाईट वाटले, पण राहुल म्हणतो ते बरोबरच आहे. हा गेला तरी आपण दुसरा किल्ला करू.. खूप मजा येते किल्ला करताना. निहारच्या डोक्यात असे काहीतरी विचार येत होते. तेवढ्यात त्याच्या आईने निहारला सूर्यास्त पाहायला बोलावले.

मग निहार आपल्या आई आणि नव्या बाबाच्या मध्ये सूर्यास्त पहायला जाऊन उभा राहिला.

“हा आजचा सूर्यास्त जितका सुंदर असतो, तेवढाच उद्याचा सूर्योदयसुद्धा सुंदर असेल.. आपण उद्या सकाळी दुसऱ्या कन्ताब बीचवर जाऊ. तिथला सूर्योदय खूप सुंदर दिसतो.” निहारचे नवे बाबा म्हणाले.

निहारच्या आईने त्याचा एक हात धरला होता आणि दुसरा हात त्याच्या नव्या बाबांच्या हातात होता. समुद्रात बुडणारा तो लालबुंद गोळा पहात ते तिघे कितीतरी वेळ समुद्राकाठी उभे होते. मग ते तिघे तसेच एकमेकांच्या हातात हात घालून आपल्या गाडीकडे निघाले. निहारने आपला हात आपल्या बाबांच्या हातातून काढून घेतला नाही .

निहारला आता हे मस्कत थोडे थोडे आवडायला लागले होते. आणि हे बाबासुद्धा...

श्रेयनिर्देश: चित्र आंतरजालावरून साभार.


20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

26 Oct 2019 - 2:16 pm | यशोधरा

सकारात्मक कथा. आवडलीच.

Jayant Naik's picture

26 Oct 2019 - 11:18 pm | Jayant Naik

आपल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आभार.

अथांग आकाश's picture

27 Oct 2019 - 1:15 am | अथांग आकाश

मस्त कथा !
.

Jayant Naik's picture

29 Oct 2019 - 9:31 pm | Jayant Naik

आपल्या प्रतिसादा बद्दल आभार. चित्र ही आवडले.

Jayant Naik's picture

29 Oct 2019 - 9:32 pm | Jayant Naik

आपल्या प्रतिसादा बद्दल आभार. चित्र ही आवडले.

अथांग आकाश यांचे चित्र (डिपी) समर्पक.

विनिता००२'s picture

29 Oct 2019 - 5:06 pm | विनिता००२

आवडली :)

पद्मावति's picture

29 Oct 2019 - 5:11 pm | पद्मावति

सुंदर आणि सकारात्मक कथा. खुप आवडली.

मस्त आहे कथा! लहानग्या निहारचे भावविश्व छान शब्दबद्ध केले आहे.
धन्यवाद.

Jayant Naik's picture

7 Nov 2019 - 4:44 am | Jayant Naik

आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.

श्वेता२४'s picture

5 Nov 2019 - 3:27 pm | श्वेता२४

परिस्थिती लहान मुले कशी समजून घेत असतील. कथा आवडली.

Jayant Naik's picture

7 Nov 2019 - 4:45 am | Jayant Naik

आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.

Jayant Naik's picture

7 Nov 2019 - 4:45 am | Jayant Naik

आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.

मुक्त विहारि's picture

22 Nov 2019 - 8:17 am | मुक्त विहारि

आवडली