पाणी-च-पाणी

Primary tabs

बी.डी.वायळ's picture
बी.डी.वायळ in जे न देखे रवी...
3 Sep 2019 - 4:26 pm

असा कसा हा पाऊस |
पडला बेधुंद होऊन,
कित्येकांचे संसार ,
गेले पाण्यात वाहून |

शंभर वर्षाचा त्याने,
म्हणे रेकॉर्ड मोडला |
जणु फाटले आकाश,
असा पाऊस पडला |

सरला श्रावण मास,
भाद्रपद सुरु झाला |
तरी ही पावसाचा,
जोर कमी नाही झाला |

किल-बिलती पाखरे,
कशी झाली ओलीचिंब |
परी कधी नाही केली,
त्यांनी कुठे बोंबाबोंब |

मिळेना खेळायला,
मैदाने झाली ओली |
कंटाळुन गेली ती,
शाळेतील मूल-मुली |

पडला पाऊस बेभान,
पिके पाण्यात बुडाली |
शेतकरी बांधवाची,
झोप रात्रीची उडाली |

चारतात गाई दूर,
त्या रानमाळावर |
येती पावसाच्या सरी,
घेती आपल्या अंगावरी |

रानातील पशु-पक्षी,
कापतात थर थर |
थंडी पावसात नाही ,
त्यांना उबदार घर |

तुला दिले रे देवाने,
अन्न वस्त्र आणि घर,
तरी ही देवाकडे रोज,
करतोस कुर कुर |

भेटलिया श्रीसद्गुरु,
सामर्थ्यात आले मन |
आता ठेविले अनंते,
त्यात मानी समाधान |

बी.डी.वायळ

माझी कविताकविता

प्रतिक्रिया

अरे कोसळतोयस , पड धुवांधार अजुन

होऊन देत त्या मुसळधार धारांच्या तलवारी

बुडवून टाक , तुझ्या वखवखलेल्या असुयेत

कैक दीपक , उज्वल भवितव्याचे आणि मायेचे

फक्त जीवनच तर मागितले होते

आज कैक बळी घेऊनही तुझी भूक शमत नाही

तरीही लढतायत आणि पुढेही लढत राहतील

हि बळीची पिल्ले

घामाच्या चिलखताला तुझ्या तलवारी कापू नाही शकत

तुझ्या तलवारीची धार , त्या घामात भिनते आणि पुन्हा देते

अभेद्य ताकद ,

जा जाऊन सांग निरोप त्या महादेवाला

निर्माण , सर्वनाश , उत्पत्ती, प्रकोप सर्वांचाच कारक तू

आज जी बीजे आमच्यात रोवली गेली आहेत

ती सहजासहजी तुटणारी नाही आहेत

तण आत खोलवर रुजलेले आहेत

आणि प्रत्येक प्रकोपात ते जवळ येत जातील

बनेल मग एक दिमाखदार डेरेदार कल्पवृक्ष

ज्याच्या छायेत मग तुलाही रममाण व्हावंसं वाटेल