सर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

- मिपा व्यवस्थापन


दोसतार - २२

Primary tabs

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
22 Jun 2019 - 6:53 am

मी सकाळ समजून बराच लवकर जागा झालो होतो. आणि रात्री तीन वाजता अंघोळ केली होती. आता यापुढे झोपणे शक्यच नव्हते. गजर होईपर्यंत तरी काहीतरी करुया म्हणून इंग्रजीचे पुस्तक काढले. सरांनी सांगितलेला धडा वाचून तरी पाहूया. काही समजलंच तर चांगलंच आहे. आणि आईने विचारलं काय करतो आहेस तर सांगता येईल की अभ्यास करतोय म्हणून. ती निदान सहल तरी रद्द करणार नाही. ते ऐकून.
पुस्तक उघडले आणि वाचू लागलो.
"वन्स अपॉन अ टाईम. देअर लिव्हड अ किंग,......"

मागील दुवा http://misalpav.com/node/44667
द किंग हॅड अ ब्यूटीफूल डॉटर अँड हिज कॅस्टल वॉज बिल्ट ऑन द रिव्हर... मी वाचत होतो. कधी नव्हे ते धडा पटकन समजत होता. माझ्या डोळ्यापुढे चौकटच्या राजासारखा टोकदार मुकूट घातलेला तो राजा , त्याची फ्रॉक घातलेली सोनेरी केसांची, निळ्या डोळ्यांची मुलगी , मस्त हिरव्या गार माळरानात पसरलेला त्यांचा राजवाडा येत होता. राजा ला कसलीतरी समस्या होती. राजकन्येसोबत खेळायला ला कोणी मित्रमैत्रीणी नव्हत्या. ती राजवाड्याच्या बागेत एकटीच खेळायची. फुलांशी , भुंग्यांशी , झाडांशी , फुलपाखरांशी गप्पा मारायची. तीने मला पाहिले, मग ती माझ्याकडे आली, गोड हसत म्हणाली तू खेळशील माझ्याशी? मी लाजलो. इतक्या गोडमुलीने माझ्याशी बोलायची पहिलीच वेळ होती. नाही म्हणायला आंजी बोलायची पण ती काही इतकी गोड नाही . आणि बोलताना हसून तर कधी बोलत नाही.सदा न कदा काहीतरी कारण काढून भांडायच्या तयारीतच असते. राजकन्ये कडे उड्याची दोरी होती. भोवरा होता. तीच्या डोळ्यांसारख्या दिसणार्‍या काचेच्या गोट्या होत्या तीच्या हातात एक पांढरे शुभ्र कापसाच्या गाठडीसारखे पांढरेशुभ्र शेळीचे पिल्लु होते. ते एकसारखे हातातून सुटायला बघत होते. "छे कितीदा पकडायचे . एकसारखे पळूनच जातंय सारखे."
सोडून दे ना त्याला , कशाला पकडून ठेवले आहेस.
मग पकडून नाही ठेवले तर ते पळून जाईल. मग माझ्याशी कोण खेळेल.?
असे पकडून ठेवल तर कोणी खेळेल का? आमच्या क्रीकेट टीम कधे ज्याची बॅट तो कॅप्टन असतो . तरीही इतराना खेळायचे असते म्हणुन ते खेळतात. असे पकडून ठेवून फार तर नागरीकशास्त्राचा धडा शिकवता येईल. पकडून ठेवून कोणी खेळत नाही. असे केले तर पकडून ठेवलेला फिल्डर ओढ्यात बॉल शोधायला गेला की तेथूनच पसार होईल की. त्या पिल्लाला काहीतरी खायला दे. लिमलेटच्या गोळ्या दे मग येईल तुझ्या मागे ते.
मी ते ही केलं , त्याला माझ्या डब्यातली साबुदाण्याची खिचडी दिली
राजकन्येच्या डब्यात साबुदाण्याची खिचडी?
हो ना रोज लाडू करंज्या आणते, कधी शिरा पुरी आणते. आज कंटाळा आला होता रोज रोज लाडू आणि शिरा खाऊन.
अरेच्चा .... मला ना जर कोणी रोज शिरापुरी आणि चकली दिली तर मी वर्षभर खाऊ शकेन ते.
वर्षभर....... ? अरे कसे शक्य आहे ते.
मला अचानक जाणवले की राजकन्या मराठीत बोलत होती.ए तू मराठी किती छान बोलतेस.
हो . माझे बाबा ;राजेसाहेब; शिवाजी महाराजांच्या च्या सैन्यात होते. सुवर्णदुर्गावर होते. मी ही त्यांच्या सोबत होते तिथेच शिकले मराठी.
आम्ही हे बोलत असताना त्या बागेत अचानक काहितरी जोरात धप्प धप्प असे वाजू लागले.
"अरे पळ पळ तो राक्षस आला" राजकन्या घाबरली . "या बागेत रोज एक ठेंगू राक्षस येतो. आणि त्या तळ्यातलं पाणी पितो.' तळ्यातली सोनेरी कमळं खाऊन टाकतो "
भितो की काय मी राक्षसाला? ती दाखव फक्त मला तो अस्सा पळवून लावतो ना बघ! काळकामवेगाची गणीतं घालून फुटके हौद च भरायला लावतो.
मी एका उंच दगडावर चढलो. आणि राक्षसाला पाहू लागलो. राक्षस मला दिसत नव्हता. पण तो माझ्या हातावर थापट्या मारत होता.
विनू ऊठ , अरे किती वाजले.?
राक्षसा तुला माझं नाव असे माहीत? आणि तुला काय करायचंय किती वाजले आहेत ते. आणि तू आईच्या आवाजात का बोलतोय? समोर ये मग दाखवतो तुला मी? मी जोरात हात फिरवले. माझा हात दगडावर आपटला. " आई गं"
विनू जागा हो . अरे सकाळचे सहा वाजताहेत. जायचं ना ट्रीप ला. बघ तुझ्यासाठी साबुदाण्याची खिचडी केली आहे डब्यात न्यायला आई मला उठवत होती. हातात इंग्रजीचे पुस्तक घेवून मी वाचतावाचता झोपून गेलो होतो. राजकन्या वगैरे स्वप्नच होते.
अंघोळीचा प्रश्न नव्हताच. पाण्याची बाटली डबा आणि एक छोटा टॉवेल पिशवीत कोंबला . शाळेच्या युनिफॉर्मचा पांढरा शर्ट इनशर्ट करायला चड्डीत कोंबला . पायात बूट मोजे घातले आणि अक्षरशः पळायला लागलो. रस्त्यावर दिसणारे भौतेक जण माझ्यासारखे च घाईत होते. तेही ट्रीपला येणार होते काय यवतेश्वरला? इतके सगळे लोक ? पण हे प्रश्न ते शाळेत आल्यावर विचारूया. रोज चा नेहमीचा रस्ता आज उगाचच मोठा वाटत होता. शाळेत पोहोचलो. सगळे जण मोठ्या ग्राउंडवरच उभे होते. घोळके करून. शाळेचं ग्राउंड रात्री पाऊस पडून गेल्यामुळे ओलसर झाले होते . पावसामुळे स्वच्छ झालेली ग्राउंडच्या कोपर्‍यातली हिरवी पोपटी गुलमोहोराची झाडे आईने भांग पाडलेल्या मुलासारखी दिसत होती. गुलमोहोराचं झाड तसं नेहमीच नीटनेटकं दिसतं , हुशार मुलासारखं . आज ते जरा जास्त उत्साही दिसत होते.
सगळी मुले वर्गानुसार घोळके करून काहीतरी गप्पा मारत होती. प्रत्येकजण इतक्या सकाळी सकाळी अंघोळ कशी केली ते सांगत होता. मी जर मध्यरात्री अंघोळ केली असं सांगीतलं असते तर बहुतेकांनी रात्री अंघोळ करणार्‍या पिंपळावरच्या मु़ंज्यासारखे माझे ही उलटे आहेत का हे बघायला सुरवात केली असती . एकढ्यात भोसेकर सरांनी फुर्र कन शिट्टी फुंकली. त्यामुळे क्षणभर का होईना त्या सगळ्या घोळक्यांचा बोलण्यात व्यत्यय आला. आणि शांतता पसरली.
"हे पहा सर्वांनी वर्गवार उभे रहायचे आहे. "
खरे तर आमचे घोळके वर्गवारच उभे होते.
" सर्वांनी रांगेत उभे रहायचे आहे. रांगेत हजेरी घेतली गेली की मग आपण यवतेश्वराला जायला निघायचं .
यात टाळ्या वाजवण्यासारखे काय आहे कोण जाणे पण आपी आणि संगीताने टाळ्या वाजवल्या , त्यानी वाजवल्या म्हणून आम्ही ही टाळ्या वाजवल्या. आम्ही वाजवल्या म्हणून सर्वांनीच वाजवल्या.
भोसेकर सरांनी पुन्हा एकदा शिट्टी ने फुर्र केले.
परेड रांगेत उभे रहा.... रांगेत उभे. एक. फुर्र्र्र.
यावेळी मात्र शिट्टी च्या फुर्र चा उपयोग झाला. आत्तापर्यंत गोल गोल घोळक्या पसरलेले सगळे ओळ करून उभे राहीले. आता आम्हाला शाळेत आल्यासारखे वाटले.
एरव्ही शनिवारच्या शाळेत असलेला सकाळचा उत्साह आणि आजचा उत्साह यात बराच फरक होता. शनिवारी आम्ही शाळेत सकाळी यायचो ते वर्गात बसायला आज आलो होतो ते सहलीला जायला. हे नाही म्हम्टले तरी प्रत्येकाच्या चेहेर्‍यावर जाणवत होते.
प्रत्येकाला ट्रीपची उत्सुकता होती. शाळेच्या शिस्तीत राहुनही दंगा करायला मिळणार होता. हुंदडायला मिळणार होते. पाटणला शेजारच्या कदम मावशीं कडे एक शेळी होती. तीला एक तांबुस रंगाचे पिल्लु झाले होते. कपाळावर अंगावर कुठे कुठे गोल पांढरे ठिपके होते. एकदम मऊ आणि अवखळ होते. त्याला कधीतरी माळावर मोकळे सोडले की टणा टण उड्या मारत वारा प्याल्यासारखे हुंदडायचे ते. त्याला हातात घेवून माळावर गेलो की आमच्या हातात असतानाच मोकळा माळ दिसल्यामुळे ते चळवळ करायला सुरवात करायचे. हातातूनच उड्या मारायला सुरू करायचे. कधीकधी तेथूनच त्याच्या इवल्याशा डोक्याने आमच्या छातीपोटाला ढुशा द्यायचे . कधी एकदा या हातातून सुटतोय आणि या हिरव्या गवतावर हुंदडतोय असे त्याला व्हायचे. आमची अवस्था तशीच काहिशी झाली होती. सरांनी प्रत्येक वर्गानीशी दोन दोन च्या ओळीत बाहेर रांगेत सोडायला सुरवात केली. कोणीतरी घोषणा दिली " भारत माता की ......" सगळ्यानी त्या घोषणेला उत्तर दिले."जय "
त्या घोषणेला प्रतिसाद मिळालेला पाहून दुसरा एक जण ओरडला " गणपती बप्पा ..... " " मोरया "
मग प्रत्येक गटातून घोषणा यायला लागल्या " हर हर"..... ज्याने ती घोषणा ऐकली तो म्हणायचा " महा......देव "
"न्यू इंग्लीश स्कूलचा ..... विजय असो"
बोलो ..बजरंग बली की ......" "ज....य"
वर्गात शिक्षकांनी प्रश्न विचारल्यावर हाताची घडी तोंडावर बोट करणारे सगळे वीर आज मुठी उंचावत खुल्या आवाजात " मोरया ...., विजय असो.... महादेव.... म्हणत होते.
मधल्या एका गटातून कोणीतरी म्हणाले "बोला पंढरीनाथ महारा....ज की " त्याही घोषणेला जोरदार प्रतिसाद आला "जय....."
क तुकडीतल्या राजा ने तर एक नवीच घोषणा दिली " लाल बावट्टे की...... " ती म्हणे मुंबईतल्या गिरणी कामगारांची घोषणा होती. त्याचा एक काका लाल साडीवाली बाई दिसली की ती घोषणा द्यायचा . त्यामुळे म्हणे सरकारला भिती वाटते.
खरे म्हणजे लाल बावटा म्हणजे काय हे कोणालाच माहीत नव्हते. पण कुठल्याही घोषणेत ... अमूक की..... असे काही म्हंटले हाताच्या मुठी उंचावून " जय " म्हणायचे असते हे अंगवळणी पडले होते . त्यामुळे या घोषणेला ली " जय " चा प्रतिसाद मिळाला.
अर्थात लाल बावटा या ऐवजी पिवळे बावटे की .... सातारा की .... धुनीवाले बाबा की ...किंवा अगदी ऋषीकपूर की.... किंवा गब्बरसिंग की.... असे म्हंटले असते तरी आम्ही ओरडून " जय " असेच म्हंटले असते.
पलीकडच्या दुसर्‍या शाळेतले काही विद्यार्थी शाळेत जाताना दिसले की आमच्या घोषणांचा जोर वाढत होता. आमच्या सोबत
घोषणा देत आम्ही निघालो. सकाळ असल्यामुळे रस्त्यावर रहदारी अशी नव्हतीच , तरीही येणारे जाणारे काही मोजके लोक ही कसली प्रभात फेरी म्हणून आमच्या या रांगांकडे पहात होते. आम्हीही त्याना वात्रटपणा म्हणून नमस्कार टाटा वगैरे करत होतो. तरी बरे आमच्या जवळ कुणी ढोल लेझीम वगैरे नव्हते, नाहीतर तेही वाजवत निघालो असतो.
आठवी ब मधल्या मुलींनी त्यांच्या पिशवीतून टाळ बाहेर काढले आणि त्या गाऊ लागल्या॑
ज्ञानेश्वर माउली... ज्ञान राज माउली तुकाराम " त्यानी वारीत वारकरी नाचतात तशी पावलीही टाकली.
त्यांच्या आसपासच्या दोन तीन वर्गांनी त्यांचे अनुकरण केले
आमच्या सहलीला आता " शाळेची शिस्तीत निघालेली मुले, प्रभात फेरी , गणपतीची मिरवणूक, कुठल्याशा महाराजांची पालखी , आणि वारी" असे काहिसे संमिश्र स्चरूप आले होते.
या घोषणांच्या नादात आम्ही गावाबाहेर कधी आलो आणि यवतेश्वरच्या हिरव्यागार रस्त्याला कधी लागलो ते समजलेही नाही.

क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

असंका's picture

28 Nov 2019 - 2:48 pm | असंका

हा भाग कधी येउन गेला!!!!!

(बाकी आमची पण ही शाळा होती 2 वर्ष...)

धन्यवाद!

चौथा कोनाडा's picture

15 Jul 2020 - 6:09 pm | चौथा कोनाडा

स्वप्नातील राजकन्येची फॅण्टसी अतिशय सुंदर !
ट्रीपला निघतानाची मस्त धम्माल !
लेखमाला खुप सुंदर चाललीय, एक भाग वाचला कि पुढचा वाचला जातोच !

चौथा कोनाडा's picture

15 Jul 2020 - 6:12 pm | चौथा कोनाडा

पुढील भाग :

दोसतार - २३