घडलंय असं आज...

किसन शिंदे's picture
किसन शिंदे in जनातलं, मनातलं
8 Jun 2019 - 1:06 am

आॅफिसला जाण्याची सकाळची गडबड. लवकर कसं पोहचू? ट्रेन उशीर तर करणार नाहीत ना? आजचं काम व्यवस्थित होईल का? असे सगळे प्रश्न डोक्यात ठेवून आपण धावत सुटतो, अगदी आजूबाजूचं जग विसरून. इतकं की आपल्या सभोवती घटणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींकडेही आपलं लक्ष जात नाही इतके आपण यांत्रिकपणे पळत सुटलोय. पण आज समोर घटणाऱ्या दोन घटनांनी या यांत्रिक आयुष्यातून किंचितही का होईना मला बाहेर पडण्यास मदत झाली.

सकाळी स्टेशनला आत शिरताना बाहेर ठाणं मांडून बसलेल्या विक्रेत्यांचा अडसर हा रोजचाच. या अनधिकृत विक्रेत्यांसोबत बेशिस्त रिक्षावाले, रस्त्यावरच फतकल मारून बसलेले अनेक भिकारी तुम्हाला दिव्यत्वाची पावलोपावली प्रचिती देत असतातच. पण ते एक असोच. आज मात्र या सगळ्यातून एक गोष्ट पटकन नजरेत भरली आणि थोडंसं भानावर आलो. बाहेर बसलेल्या विक्रेत्यांच्या रांगेत एक 'आई' बसली होती. समोर खाद्यपदार्थांची पाकिटे भरलेला प्लास्टिकचा ट्रे गिऱ्हाईकांची वाट बघत होता. मांडीवर झोपलेले तान्हे बाळ पदराखाली त्याची भूक शमवत होते. आणि या सगळ्याच्या पलीकडे असलेली ती 'आई' कम विक्रेता मस्तपैकी एकीकडे मांडी हलवून बाळाला जोजवत होती तर दुसरीकडे हातात असलेल्या अॅन्ड्राॅईड मोबाईलवर कार रेसिंगचा गेम खेळून तिच्या पद्धतीने तिचं आयुष्य जगू पाहत होती. जे काही दृश्य डोळ्यांनी पाह्यलं ते जितकं मजेदार होतं, एकदम भारी होतं, तितकंच नकळतपणे जगण्याची नवी उमेदही शिकवून गेलं. गिऱ्हाईके मिळतील का? माल संपेल का? बाळ व्यवस्थित झोपेल का? या सगळ्या चिंता पाठी टाकून तिला मिळालेला तो क्षण तिच्या पद्धतीने मस्तपैकी जगत होती आणि हीच गोष्ट मला प्रचंड आवडली.

दुसरा अनुभव संध्याकाळचा. कामं उरकलं आणि आवरून आॅफिसच्या 'कम्फर्ट' वातावरणातून बाहेर पडत त्यावेळी जाणवलेल्या दमट आणि उकडणाऱ्या वातावरणाला शिव्या घालत गेटमधून बाहेर पडलो. अगदी शंभर पावलेही चाललो नसेल तोच एक लहानसा मुलगा, अगदी सहा-सात वर्षांचा, हातातल्या पेनाने इलेक्ट्रीक डिबीवर पेस्ट केलेल्या कुठल्याश्या 'लोन चाहिये, हमारे पास आईये' टाईप जाहिरातीच्या कागदावर काहीतरी करण्यात मग्न झाला होता. दुरुन पाहताना असं वाटलं कि त्याच्या बालसुलभ वयानुारा पेनाने उगाच रेघोट्या मारून मस्ती करत असावा. पण जेव्हा बाजूला जावून नीट निरखून पाह्यलं तेव्हा कळालं, हा पठ्ठ्या हातातल्या पेनाने त्या समोर आलेल्या कागदावर अंक गिरवत होता. त्याच्या बाजूला त्याच्यापेक्षा किंचित वयाने मोठी असलेली त्याची ताईही जाहिरातीवरची काळी अक्षरे वाचण्याचा प्रयत्न करत होती आणि तिच्याही बाजूला त्या दोघांची आई सर्वात लहान मुलाला मांडीवर जोजवून झोपवत होती.

लहानपणी पैसे नसायचे तेव्हा आधीच्या वर्षी वह्या गोळा करून त्यांची उरलेली पाने व्यवस्थित बाजूला काढायचो आणि त्या बाजूला काढलेल्या पानांना एकत्र करून त्याच्यावर बाईंडिंग करून पुन्हा वापरायचो. पहिल्या सहामाहीपर्यंत निश्चितच चालायच्या, त्या बाईंडिंग केलेल्या वह्या. आज त्या लहानग्याला बघितल्यानंतर या गोष्टीची प्रकर्षाने आठवण झाली आणि ते दृश्य बघून न बघितल्या सारखे करत पुढे दहा पावले गेलेलो मी काही विचार करून पुन्हा पाठी आलो.

आधी त्या लहान मुलाला विचारलं “नोटबूक चाहीये क्या लिखनेके लिए?"

गडी काहीच बोलेना. तेव्हा पुन्हा एकवार विचारलं “नोटबूक लाके दे दू क्या?"

यावेळी त्याची आई बोलली “दादा, नोटबूक नही पैसा दे दो, मै बादके लेके दुंगी."

“नही. अभी पैसा दुंगा तो आप बूक नही लोगे. पैसा एेसेही वेस्ट करोगे और वो फिर किसी पेस्ट किए हुए कागज पर लिखेगा."

तिच्या तीनही मुलांकडे आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहून आधी पैसे देवून टाकावे आणि निघावे असा विचार केला. पण नंतर क्षणातच तो विचार झटकत बाजूच्या स्टेशनरी दुकानातून एक साधेसे नोटबूक घेऊन त्या मुलाच्या हातात दिलं आणि काही पुढे काहीही न बोलता त्या चौघांकडेही पाठ करून मी मेट्रोच्या दिशेने चालू लागलो. सकाळच्या घटनेचा संध्याकाळच्या घटनेशी एक अदृश्य आणि घट्ट धागा जोडला गेला होता. मी फक्त निमित्तमात्र होतो.!!

वाङ्मयमुक्तकप्रकटनविचारअनुभव

प्रतिक्रिया

मस्त रे किसनदेवा. वेलकम बॅक.

प्रशांत's picture

13 Jun 2019 - 1:08 pm | प्रशांत

असेच लिहत रहा

टवाळ कार्टा's picture

8 Jun 2019 - 2:06 am | टवाळ कार्टा

मस्तय

मिसळपाव's picture

8 Jun 2019 - 6:14 am | मिसळपाव

किसन, माझ्या आईच्या भाषेत "शंभरात ११०% मार्क तुला". असा विचार कॄतीत आणायला एकच क्षण असतो तो घट्ट पकडावा लागतो.

टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

आनन्दा's picture

8 Jun 2019 - 10:00 am | आनन्दा

आवडलं!!
अवांतर, त्यांची पोटाची भूक शिक्षणाच्या भुकेच्या अगोदर येत असावी.

नाखु's picture

8 Jun 2019 - 10:01 am | नाखु

तुझी रूपे किती आहेत हेच उमजेना
मिपा वृंदावन वासी नाखु वाचकांची पत्रेवाला

अधूनमधून मिपावर लिहीत जा,नाहीतर इथे सध्या शुद्धलेखनाचा मुडदा पाडून मिळेल व छुप्या संपादकाची आपली आवड हेच कार्यक्रम जोमात सुरू आहेत

माहितगार's picture

8 Jun 2019 - 8:39 pm | माहितगार

किती योग्य जागी शुद्धता समर्थन झालेय __/\__

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Jun 2019 - 10:02 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भवतालचं वास्तव चित्र डोळ्यासमोर उभं केलं आहे. नियमित घडत असणा-या गोष्टीकडे आपण रूटीन म्हणून तितकंच दुर्लक्ष करतो, पण त्यातही वेगळं भान असलेलं अणि करता येईल तशी मदत करून समाधान पावलेलं लेखन वाचायला मिळालं.

देवा नियमित टीपत जा अशी क्षणचित्रे. शुभेच्छा...!

-दिलीप बिरुटे

उगा काहितरीच's picture

8 Jun 2019 - 10:24 am | उगा काहितरीच

साधच लिहीलंय पण मस्त लिहीलंय. आवडलं !

अभ्या..'s picture

8 Jun 2019 - 11:44 am | अभ्या..

किसणदेवाचं निरिक्षन बारीकच की, हामच्या शेजारी बसलेल्या मानसाच्या मोबाईलमध्ये काय चाललंय हे हामाला कळत णाही, ह्यांणा कार रेसिंगची गेम कळली, जरा बारकाईने त्यांणी पाहिलं असतं तर स्कोर आनि लेव्हल पन सांगितली असती. पण त्यातणंही त्यांणी पेर्णा घ्येतली आणि एका अमराठी मुलाला त्याच्याच भाषेत संवाद साधीत हिंदी/इंगरेजी शिकायला त्यांणी नोटबुक घेऊनश्यान दिली. विशेश म्हन्जे आसला आवसम हानुभव आम्च्या संगं शेर केला, हामाला किसणदेवांचं कौतुक ह्यासाठीच लै वाटते.

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Jun 2019 - 4:37 pm | ज्ञानोबाचे पैजार

किसणदेवाचं निरिक्षन बारीकच की, हामच्या शेजारी बसलेल्या मानसाच्या मोबाईलमध्ये काय चाललंय हे हामाला कळत णाही, ह्यांणा कार रेसिंगची गेम कळली, जरा बारकाईने त्यांणी पाहिलं असतं तर स्कोर आनि लेव्हल पन सांगितली असती.

या अभ्या..ला जरा म्हणून कोणाचे कौतुक नाही. एकतर किसनदेवाने एवढ्या मोठ्या गॅप नंतर लेखणी हातात धरली त्या बद्दल त्यांना प्रोत्साहाण द्यायचे सोडून हा बसला छिद्रांन्वेश करत.

असे कोणाच्या मोबाईलात डोकावणे आपल्या सारख्या सामान्य माणसाचे काम नाही, ते देव आहेत आणि देवाला दिव्य दृष्टी असते, विसरलास का? आता मुकाट रहा आणि त्यांची नजर अजून कुठे कुठे पडली असेल त्याची कल्पना करत बस..

देवा एक डाव माफी द्या अभ्याला पण आता इकडे वरच्यावर येणे करा

पैजारबुवा,

ज्योति अळवणी's picture

8 Jun 2019 - 3:26 pm | ज्योति अळवणी

मस्तच

आवडलं लेखन. अत्यंत वास्तवदर्शी

ज्योति अळवणी's picture

8 Jun 2019 - 3:26 pm | ज्योति अळवणी
जॉनविक्क's picture

8 Jun 2019 - 5:11 pm | जॉनविक्क

अब रुलाएगा क्या असेच अक्षरश: सदगदीत होऊन म्हणावेसे वाटतय. खरेच कुठून मिळवता ही दृष्टी, ही व्यापकता आणि ही पवित्र निष्कामता...

पद्मावति's picture

8 Jun 2019 - 5:14 pm | पद्मावति

सुंदर अनुभव कथन. खूप आवडलं.

यशोधरा's picture

8 Jun 2019 - 6:26 pm | यशोधरा

चांगलं लिहिलं आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Jun 2019 - 8:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं लिहिलंय.

जालिम लोशन's picture

9 Jun 2019 - 12:37 am | जालिम लोशन

एक नंबर

एमी's picture

9 Jun 2019 - 10:53 am | एमी

लेखन आवडलं.
आणि अभ्याचा प्रतिसाददेखील आवडला :D

टर्मीनेटर's picture

9 Jun 2019 - 11:46 am | टर्मीनेटर

भावदर्शी लेखन आवडले.

झेन's picture

9 Jun 2019 - 11:48 am | झेन

साधं सुटसुटीत मस्त लिखाण विथ अभ्याश्री & ज्ञापैबुवा

लई भारी's picture

9 Jun 2019 - 9:17 pm | लई भारी

आवडलं.

चौथा कोनाडा's picture

17 Jun 2019 - 4:58 pm | चौथा कोनाडा

मस्त लिहिलंय. आवडलं

आपल्या आसपास इतक्या प्रकारची विषमता पाहायला मिळते की चक्रवायला होतं. कित्येक वेळी मदत करावी की नाही हाच प्रश्न पडतो.
समस्यास इतक्या असतात की आपण तोकडे वाटायला लागतो, मदत करायची इच्छा असौनही असहाय्य वाटायला लागतं.
आपण आपल्या परीने प्रश्न निकाली काढतो, आणि पुढे सरकतो, ते आपलं दान सत्पात्री पडलं की नाही हाच विचार करत. उलट सुलट अनुभव येत राहतात.
पण एक नक्की जो पर्यंत दया, करुणा, कणव शिल्लक आहे तो पर्यंत दीन लोकांचं जिणं सुसह्य आहे.

किसनभाऊ, वेलकम बॅक.

इरामयी's picture

18 Jul 2019 - 11:43 am | इरामयी

खूप छान! पैसे देण्याऐवजी वस्तू दिलीत हे फार छान केलंत.

ट्रॅफिक सिग्नल मध्ये भिकार्‍यांचं रॅकेट कसं संघटीत (आंतरराष्ट्रीय स्तरावरची) गुन्हेगारी /आतंकवाद पोसतं याची झलक बघायला मिळते. त्यामुळे उद्या आपण दिलेला प्रत्येक रुपया आपल्या समाजावरच गुन्हेगारी/बाँब बनून उलटण्यापेक्षा जेवण, कपडालत्ता, इतर वस्तू देणं श्रेयस्कर.

अनुभव आवडला.

अजून लिखाणाच्या प्रतीक्षेत।