जिवंत पण जाणीवरहित

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
29 May 2019 - 7:21 am

बेशुद्ध पडलेला रुग्ण हा त्याच्या कुटुंबीयांसाठी धडकी भरवणारा विषय असतो. अचानक आलेली बेशुद्धी ही तर अधिक चिंताजनक असते. ही अवस्था नक्की कशामुळे येते हे सामान्यांना नीट समजले नाही तरी तिचे गांभीर्य कळते. तिच्या मुळाशी मेंदूच्या कार्यातील विशिष्ट बिघाड असतो. या बिघाडाची अनेक कारणे असतात. त्यामध्ये विविध आजार, गंभीर अपघात, व्यसनांचा अतिरेक आणि काही औषधांचे प्रमाणाबाहेर सेवन यांचा समावेश होतो. बेशुद्ध रुग्णास शुद्धीवर आणणे हे डॉक्टरसाठी एक आव्हान असते. ते पेलत असताना त्याला आपले वैद्यकीय कौशल्य अगदी पणाला लावावे लागते.

बेशुद्धावस्थेची विविध कारणे, संबंधित रुग्णतपासणी व त्याचे निष्कर्ष आणि अशा रुग्णाचे भवितव्य या सगळ्यांचा आढावा या लेखात घेत आहे. सुरवातीस आपली जागृतावस्था आणि मेंदूचे संबधित कार्य यांची माहिती देतो. त्यातून पुढे माणूस बेशुद्धावस्थेत कसा जातो हे समजेल.

pict

लेखातील विवेचन खालील मुद्द्यांच्या आधारे असेल:
१. जागृतावस्था आणि मेंदूचे कार्य
२. बेशुद्धावस्थेची कारणे
३. रुग्णतपासणी
४. उपचार, आणि
५. रुग्णाचे भवितव्य

जागृतावस्था आणि मेंदूचे कार्य:
हे समजण्यासाठी मेंदूची संबंधित रचना जाणली पाहिजे. ढोबळपणे मेंदूचे ३ भाग असतात: मोठा मेंदू, छोटा मेंदू आणि मेंदूची नाळ (stem). मोठ्या मेंदूच्या बाहेरील आवरणाला cortex असे म्हणतात. हा भाग जैविकदृष्ट्या सर्वात उत्क्रांत असतो. तिथे सर्व मज्जातंतूंच्या संदेशांचे एकीकरण होते.

pict

याउलट मेंदूची नाळ ही जैविकदृष्ट्या सर्वात प्राचीन भाग आहे. तिच्यामध्ये RAS नावाची एक ‘सक्रीय यंत्रणा’ असते. तिच्यातील मज्जातंतूंत सतत काही रासायनिक क्रिया होतात. त्यातून cortexला संदेश जातात. RAS आणि Cortex यांच्या समन्वयातून आपली जागृतावस्था टिकवली जाते. जेव्हा कुठल्याही कारणाने या यंत्रणेवर विपरीत परिणाम होतो, तेव्हा संबंधिताची शुद्ध जाऊ शकते.

बेशुद्धावस्थेची कारणे:
अनेक प्रकारचे आजार आणि डोक्याला जबरी मार बसणारे अपघात यांमध्ये व्यक्ती बेशुद्ध होते. काही प्रमुख कारणे आता समजून घेऊ.
१. मेंदूच्या रक्तपुरवठ्यातील अडथळा: याची दोन कारणे आहेत :
अ) रक्तवाहिन्या त्यांच्यात साठलेल्या मेद-थरांमुळे आकुंचित वा बंद होणे (Stroke)
आ) रक्तवाहिनी फुटणे.

या कारणामुळे येणारी बेशुद्धी ही बरेचदा अचानक येते. बऱ्याचदा अशा रुग्णांना लकवा / पक्षाघात झालेला असतो.
२. अपघात : बऱ्याच वाहन अपघातांत डोक्यास जबरी मार लागतो. तसेच डोक्यावर कठीण वस्तूचा जोराचा प्रहार हेही महत्वाचे कारण आहे.

३. औषधांची विषबाधा: मेंदूला गुंगी आणणारी औषधे (प्रामुख्याने opium गट) आणि अन्य घातक पदार्थ अतिरिक्त प्रमाणत घेणे. हे मुख्यतः व्यसनी लोकांत आढळते. तसेच आत्महत्या वा खून करण्यासाठी देखील यांचा वापर होतो. जवळपास ४०% बेशुद्ध रुग्णांत हे कारण सापडते.

४. हृदयक्रिया बंद पडणे: हृदयविकाराचा तीव्र झटका व अन्य काही आजारांत जर हृदयस्पंदन थांबले (arrest) तर मेंदूचा रक्तपुरवठा खंडित होतो. जवळपास २५% बेशुद्ध रुग्णांत हे कारण सापडते.

५. जंतूसंसर्ग: विशिष्ट जिवाणू आणि विषाणूंमुळे मेंदूदाह किंवा मेंदूच्या आवरणांचा दाह होतो. हे आजार गंभीर असतात.

६. ग्लुकोजच्या रक्तपातळीचे बिघाड: मेंदूला ग्लुकोजचा योग्य प्रमाणात पुरवठा सतत आवश्यक असतो. रक्तातील ग्लुकोजची पातळी अति वाढणे अथवा कमी होणे या दोन्ही कारणांमुळे बेशुद्धावस्था येते. आता ही दोन्ही कारणे विस्ताराने बघू.

अ) ग्लुकोजची पातळी अति वाढणे : याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे अनियंत्रित मधुमेह. जेव्हा ग्लुकोजची पातळी खूप वाढते तेव्हा शरीरातील भरपूर पाणी मूत्रावाटे निघून जाते (dehydration). त्यातून एकूण रक्तपुरवठा खूप मंदावतो(shock). तसेच अशा रुग्णास खूप उलट्याही होत असतात. त्यातून दुष्टचक्र होऊन परिस्थिती अजून बिघडते.

आ) ग्लुकोजची पातळी खूप कमी होणे: जेव्हा ही पातळी ४० mg/ dL चे खाली जाऊ लागते तेव्हा मेंदूच्या कार्यात बिघाड होऊ लागतो. जर का ती २० mg इतकी खाली गेली तर रुग्ण बेशुद्ध होतो.
ही पातळी कमी होण्याची प्रमुख कारणे अशी: मधुमेहीने घेतलेला इन्सुलिनचा अतिरिक्त डोस, स्वादुपिंडातील अति-इन्सुलिन निर्माण करणाऱ्या गाठी, यकृत आणि मूत्रपिंडाचे तीव्र आजार आणि फाजील मद्यसेवन. मद्यपी लोकांत मद्यपानाच्या जोडीला अन्य व्यसनी पदार्थांचे सेवन सुद्धा असू शकते. तसेच असे लोक जबरी वाहन अपघातालाही आमंत्रण देतात.

७. चयापचयातील अन्य बिघाड: यामध्ये रक्तातील सोडियमची पातळी खूप कमी वा जास्त होणे आणि काही हॉरमोनचे बिघाड यांचा समावेश आहे.

८. अपघाती विषबाधा: यामध्ये मुख्यतः कार्बन मोनोऑक्साइड व शिसे यांचा समावेश आहे. खाणी किंवा गटारातील कामे करणाऱ्यांना कार्बन मोनोऑक्साइडची विषबाधा होऊ शकते. हा वायू आपल्या रक्तात हिमोग्लोबिनला घट्ट चिकटतो आणि त्यामुळे असे हिमोग्लोबिन ऑक्सिजनचे वहन करू शकत नाही.

रुग्णाची शारीरिक तपासणी:

सर्वप्रथम रुग्णाचे नातेवाईकांकडून त्याचा इतिहास जाणून घेणे महत्वाचे असते. यात व्यसनाधीनता, पूर्वीचा आजार, औषधे आणि अपघात या माहितीचा समावेश होतो.

प्रत्यक्ष तपासणी करताना डोक्याला मोठी जखम आहे का आणि हातापायाच्या त्वचेवर सुया टोचल्याच्या खुणा पाहतात. मग रुग्णास चिमटे काढून तो काही प्रतिसाद देतो का अथवा डोळे उघडतो का, हे पाहतात. तसेच मनोरुग्णांचे बाबतीत ते बेशुद्धीचे सोंग करीत नाहीत ना, हेही पहावे लागते. शरीर-तापमान पाहणे महत्वाचे. रुग्णाच्या नाडी आणि श्वसनाची गती आणि ताल हे काळजीपूर्वक पहिले जाते. दोन्ही डोळ्यातील बाहुल्यांचा आकार आणि त्यांनी टॉर्चच्या प्रकाशाला दिलेला प्रतिसाद पाहणे हेही महत्वाचे ( विशेषतः ओपियम गटातील रसायनांची विषबाधा झाली असल्यास).

निरोगी डोळ्याच्या बाहुल्या :

pict

ओपियम गटातील रसायनांची विषबाधा : डोळ्याच्या बाहुल्या :
pict

याव्यतिरिक्त रुग्णाचे विविध प्रतिक्षिप्त प्रतिसाद तपासले जातात.
पूर्ण शारीरिक तपासणीनंतर बेशुद्धीची खात्री केली जाते आणि तिची तीव्रता ठरवली जाते. आता पुढची पायरी म्हणजे बेशुद्धीचे कारण ठरवणे. त्यासाठी विविध प्रयोगशाळा आणि प्रतिमाचाचण्या कराव्या लागतात.

प्रयोगशाळा चाचण्या
१. रक्त: यावरील चाचण्या ३ गटांत मोडतात. रक्तनमुन्यात खालील रासायनिक घटक गरजेनुसार मोजले जातात.

अ) ग्लुकोज, कॅलशियम, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, युरिआ आणि क्रिअ‍ॅटिनिन.
आ) ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण, अमोनिआ
इ) विशिष्ट औषधांचे प्रमाण

२. पाठीच्या मणक्यातील द्रव (CSF) : जेव्हा मेंदूच्या जंतूसंसर्गाची शक्यता वाटते तेव्हा ही तपासणी केली जाते. त्यात जंतूंचा शोध घेणे आणि काही रासायनिक चाचण्या करतात.

प्रतिमा चाचण्या

यात मुख्यत्वे CT अथवा MRI स्कॅन आणि EEG (मेंदू-विद्युत आलेख) यांचा समावेश असतो. त्यातून मेंदूला झालेल्या इजेबद्दल सखोल माहिती मिळते.
वरीलपैकी योग्य त्या चाचण्या झाल्यावर बेशुद्धीचे निदान केले जाते. आता त्यानुसार उपाय केले जातात.

उपचार आणि रुग्णाचे भवितव्य

अशा रुग्णांना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात ठेवले जाते. त्यांच्यावर उपचार करताना प्रथम त्यांच्या श्वसन व रक्ताभिसरण या मूलभूत क्रियांवर लक्ष केंद्रित केले जाते. गरजेनुसार रुग्णाच्या श्वासनलिकेत नळी घातली जाते. तिचा उपयोग कृत्रिम श्वसन देण्यासाठी होतो. बेशुद्धीच्या कारणानुसार शिरेतून औषधे देऊन उपचार केले जातात.

आता रुग्ण शुद्धीवर कधी येणार हा कळीचा प्रश्न असतो. त्याचे उत्तर मेंदूस किती प्रमाणात इजा झाली आहे, यावर ठरते. ती मध्यम स्वरूपाची असल्यास काही दिवसांत रुग्ण शुद्धीवर येतो. मात्र ती गंभीर स्वरूपाची असल्यास तो महिनोंमहिने बेशुद्धीत राहू शकतो. त्यानंतर पुढे ३ शक्यता असतात:
१. काही रुग्ण बरे होतात
२. काही मृत्यू पावतात, तर
३. काही vegetative अवस्थेत राहतात.

vegetative अवस्था
आता ही अवस्था आणि निव्वळ बेशुद्धावस्थेतील फरक समजून घेऊ. बेशुद्ध माणूस निद्रिस्त आणि जाणीवरहित असतो. तर vegetative अवस्थेतील माणूस हा “जागा” असला तरी पूर्णपणे ‘जाणीवविरहित’ असतो. असे रुग्ण हे वेळप्रसंगी डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल करू शकतात. तसेच ते ‘झोपी जाणे’ आणि ‘जागे होणे’ या अवस्थांतून जाऊ शकतात. पण, त्यांना कुठलेही आकलन (cognition) होत नाही. एक प्रकारे ही ‘जागृत बेशुद्धावस्था’ (coma vigil) असते ! म्हणजेच असा रुग्ण हा केवळ कागदोपत्री जिवंत पण काहीही समजण्यास वा करण्यास असमर्थ असतो. असा रुग्ण जर या अवस्थेत १ महिन्याहून जास्त काळ राहिला तर तो कायमच्या अशा अवस्थेत गेल्याची नोंद होते. त्यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांना त्या रुग्णावरील सर्व ‘जीवरक्षक उपाय यंत्रणा’ बंद करण्याची कायदेशीर परवानगी (काही देशांत) मिळते.
***
अनेक प्रकारचे अपघात, गंभीर आजार, व्यसनांचा अतिरेक अशा अनेक प्रसंगांत माणूस बेशुद्ध होतो. आपल्या कोणाच्याही कुटुंब अथवा परिचयातील व्यक्तीवर अशी वेळ येऊ शकते. अशा दुःखद प्रसंगाला सामोरे जाताना आपल्याला मनोबल वाढवावे लागते. त्या दृष्टीने बेशुद्धावस्थेची मूलभूत माहिती या लेखात दिली आहे. वाचकांना ती उपयुक्त वाटेल अशी आशा आहे.
*************************************************************
'vegetative ' (अवस्था) साठी मराठी शब्द जरूर सुचवावा ही वि.

जीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

29 May 2019 - 9:28 am | प्रकाश घाटपांडे

'vegetative ' (अवस्था) साठी मराठी शब्द जरूर सुचवावा ही वि.>>>वानस्पत्यावस्था असा प्रतिशब्द दिल्यास मराठीची दुरावस्था का झाली हे समजू शकते :)

सुबोध खरे's picture

29 May 2019 - 9:40 am | सुबोध खरे

आसन्नमरण हा शब्द कदाचित जवळ जाईल

प्रकाश घाटपांडे's picture

29 May 2019 - 11:12 am | प्रकाश घाटपांडे

उत्तम व सोपा शब्द

कुमार१'s picture

29 May 2019 - 10:12 am | कुमार१

प्रकाश,
म्हणूनच मी मूळ इंग्लिश शब्द तसाच ठेवला आहे. पण कोणी सोपा सुचवल्यास जरूर आवडेल.

सुबोध, चांगला शब्द.

अनिता's picture

29 May 2019 - 10:17 am | अनिता

अचेतन ?

कुमार१'s picture

29 May 2019 - 10:24 am | कुमार१

चेतन = सजीव
मग, ‘अचेतन’ हा विरुद्धार्थी होईल ना? = निर्जीव.

‘लोळागोळा’ अवस्था असा एक सुचला.

"गतभान" असा शब्द योजता यावा.

मृतप्राय हा एक शब्द होऊ शकतो.

प्रकाश घाटपांडे's picture

29 May 2019 - 12:12 pm | प्रकाश घाटपांडे

यात जवळ जवळ मेल्यात जमा आहे अशी छटा आहे

विजुभाऊ's picture

29 May 2019 - 11:17 am | विजुभाऊ

" भाजीपाल्यावत " हा शब्द अर्थाच्या अधीक जावळ जातो

याच्या उलट अवस्थाही असते. अतीव भयानक. सर्व जाणिवा पूर्ण शाबूत, जागृत मन आणि शरीराची कणभरही हालचाल करता न येणे. लोक आधी ब्रेन डेड समजतात. पण आत माणूस जागा असतो. बघत ऐकत असतो (श्रवण आणि दृश्य हे डोक्याच्या आतून थेट मेंदूत जोडलेले असल्याने). पण मी जिवंत आहे असं तो सांगू किंवा दर्शवू शकत नाही.

त्याविषयी लिहा असं तरी कसं म्हणावं? पण रुग्णांच्या नातेवाईकांना माहिती असावं म्हणून लिहा.

"Locked in सिन्ड्रोम"

कुमार१'s picture

30 May 2019 - 10:56 am | कुमार१

Locked-in syndrome (LIS) बद्दल थोडक्यात:

१. याला ‘आभासी’ बेशुद्धावस्था असे म्हणता येईल. हे रुग्ण जागृत असतात, पण ते बोलू शकत नाहीत. ते डोळ्यांच्या हालचाली व्यतिरिक्त कुठल्याही हालचाली करू शकत नाहीत.

२. हा आजार दुर्मिळ आहे. त्याचे मूळ कारण मेंदूचा रक्तपुरवठा खंडित होणे किंवा त्यात रक्तस्त्राव होणे, हे आहे.
३. अशा प्रसंगी मेंदूच्या नाळेतील ‘Pons’ या भागाला इजा होते.

४. सुरवातीस हे रुग्ण अर्धवट बेशुद्ध असतात. नंतर ते ‘जागे’ होतात पण आता बोलू शकत नाहीत आणि त्यांना पक्षाघात होतो.
५. भवितव्य: असे रुग्ण उठून हिंडूफिरू लागणे अवघड असते. पण त्यांना काही विशिष्ट वैद्यकीय सुविधा पुरवल्यास ते डोळ्यांच्या द्वारा “संवाद” साधू शकतात !

६. अशा आधुनिक उपचारांत word processor, speech synthesizer आणि संगणकीकृत संवादांचा समावेश होतो.
७. म्हणजेच, अशा रुग्णांत जर वरील उपचारांनी बरी प्रगती झाली तर ते महाजालावर वावरू शकतात !

गवि's picture

31 May 2019 - 6:53 am | गवि

धन्यवाद

Diving bell & the butterfly हे पूर्ण पुस्तक अशा अवस्थेतल्या व्यक्तीने एकेक अक्षर डोळा हलवून सिलेक्ट करत करत लिहिलं आहे.

कुमार१'s picture

31 May 2019 - 9:42 am | कुमार१

हे पूर्ण पुस्तक अशा अवस्थेतल्या व्यक्तीने एकेक अक्षर डोळा हलवून सिलेक्ट करत करत लिहिलं आहे. >>>>

हे जबरी आहे !
गवि, आपणास या पुस्तकाबद्दल काही माहिती असल्यास जरूर लिहा.

स्टीफन हॉकिंग्जचं संशोधन आणि लेखनही या अवस्थेतच केलेलं आहे. फक्त ती अवस्था अचानक न येता हळूहळू येत गेली.

कुमार१'s picture

4 Jul 2020 - 6:06 pm | कुमार१

आज ही चर्चा आठवायचे कारण ..

The theory of everything
हा स्टीफन हौकिंग यांच्यावरील चित्रपट प्राईमवर पाहिला.
छान, जरूर पाहा !

टर्मीनेटर's picture

9 Jun 2019 - 1:05 pm | टर्मीनेटर

Diving bell & the butterfly हे पूर्ण पुस्तक अशा अवस्थेतल्या व्यक्तीने एकेक अक्षर डोळा हलवून सिलेक्ट करत करत लिहिलं आहे.

विलक्षण माहिती आहे.

नगरी's picture

5 May 2022 - 6:26 am | नगरी

जबरदस्त,पराकोटीची चिकाटी

मराठी_माणूस's picture

31 May 2019 - 4:49 pm | मराठी_माणूस

हा एक काय प्रकार आहे

https://en.m.wikipedia.org/wiki/Sleep_paralysis

कुमार१'s picture

31 May 2019 - 5:20 pm | कुमार१

झोपेतील पक्षघात

हा एक निद्राविकार आहे. पूर्ण झोप आणि जाग यांच्यामधली ती अर्धवट अवस्था आहे. त्याच्यामागे काही जनुकीय कारणे आहेत. तसेच एखाद्याच्या रोजच्या झोपेच्या वेळेत आणि काळात जर वारंवार अडथळे येऊ लागले तर असे प्रकार होऊ शकतात.

या विशिष्ट अवस्थेत व्यक्ती जागृत असते पण, तिला बोलणे वा हालचाली करता येत नाहीत. अर्थात हे तात्पुरते असते.

वरुण मोहिते's picture

3 Jun 2019 - 9:01 pm | वरुण मोहिते

अगदी 2-5 मिनिटांसाठी होतो पण आपण मेलो असेच वाटते. मी गेलोय ह्या प्रकारातून

कुमार१'s picture

29 May 2019 - 12:22 pm | कुमार१

शब्द-अर्थछटा छान आहेत.
लेखातील मजकुरापेक्षा वाचकांना त्यातील तळटीपेचे वाटलेले आकर्षण बघून अंमळ मजा वाटली !

गवि, सूचनेबद्दल आभार !

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 May 2019 - 1:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

वैद्यकिय-आरोग्य विषयावरच्या तुमच्या लेखनाच्या टोपीवर अजून एक दिमाखदार पिस खोचले गेले आहे. किचकट वैद्यकिय विषय, सर्वसामान्य जनतेला समजेल अश्या भाषेत समजून देण्याची तुमची हातोटी, वाखाणण्याजोगी आहे !

Rajesh188's picture

29 May 2019 - 1:40 pm | Rajesh188

मेंदूच्या कार्यातील विशिष्ट बिघाड असतो.
विशिष्ट म्हणजे काय समजायचं .
ते स्पष्ट होईल का की त्या विषयात अजुन संशोधन चालू आहे

Rajesh188's picture

29 May 2019 - 1:40 pm | Rajesh188

मेंदूच्या कार्यातील विशिष्ट बिघाड असतो.
विशिष्ट म्हणजे काय समजायचं .
ते स्पष्ट होईल का की त्या विषयात अजुन संशोधन चालू आहे

कुमार१'s picture

29 May 2019 - 3:04 pm | कुमार१

** विशिष्ट बिघाड असतो.
विशिष्ट म्हणजे काय समजायचं .
ते स्पष्ट होईल का >>>>
याचे उत्तर लेखात दिलेले आहे, ते असे:

…..तिच्यामध्ये RAS नावाची एक ‘सक्रीय यंत्रणा’ असते. तिच्यातील मज्जातंतूंत सतत काही रासायनिक क्रिया होतात. त्यातून cortexला संदेश जातात. RAS आणि Cortex यांच्या समन्वयातून आपली जागृतावस्था टिकवली जाते. जेव्हा कुठल्याही कारणाने या यंत्रणेवर विपरीत परिणाम होतो, तेव्हा संबंधिताची शुद्ध जाऊ शकते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 May 2019 - 3:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

The reticular activating system (RAS) is a network of neurons located in the brain stem that project anteriorly to the hypothalamus to mediate behavior, as well as both posteriorly to the thalamus and directly to the cortex for activation of awake, desynchronized cortical EEG patterns.

कोमामध्ये रुग्णाच्या अन्न पाण्याचे कसे करतात? नळीवाटे द्रव का? रुगणाच्या वजनावर किती परिणाम होतो. त्याचे काही सेपरेट डाएट असते की फक्त जीवनावश्यक द्रव्य दिले जाते? शारीरिक हालचाल नसल्याने सांधे वगैरे कमकुवत होतात का?
त्याची मधल्या काळातली म्हणजे अपघात होऊन बेशुद्ध झाला ते शुध्दवर आला ही मेमरी टोटल लॉस असते का?

कुमार१'s picture

29 May 2019 - 2:28 pm | कुमार१

मनापासून आभार !
विचारल्या गेलेल्या प्रश्नांना सबुरीने यथाशक्ती उत्तरे देईन.

कुमार१'s picture

29 May 2019 - 4:45 pm | कुमार१

१. कोमामध्ये रुग्णाच्या अन्न पाण्याचे कसे करतात? नळीवाटे द्रव का? त्याचे काही सेपरेट डाएट असते की फक्त जीवनावश्यक द्रव्य दिले जाते? >>>>>

अशा रुग्णास अन्न देण्याच्या २ पद्धती आहेत:
१. पचनसंस्थेत वरून घातलेल्या नळीद्वारे आणि
२. रक्तवाहिनीतून

बहुतेक रुग्णांत पहिला पर्याय आधी निवडतात. अन्न किती द्यायचे हे शास्त्रीयदृष्ट्याठरवले जाते. रुग्णाचे वजन आणि अन्य काही निकष लावून उष्मांक गरज गणिताने काढली जाते. शरीरास सर्व पोषक घटक मिळतील अशा प्रकारे द्रव पदार्थ दिले जातात (Isotonic formulas). सुरवातीस ही नळी नाकातून पचनसंस्थेत पोचवली जाते. पण जर बेशुद्धावस्था दीर्घकाळ राहिल्यास विशेष नळी इंडोस्कोपीद्वारा त्वचेतून आतड्यांत घातली जाते.

डोके व मानेस जबरी इजा झालेल्या रुग्णांत हे नळी प्रकरण अवघड असते. मग त्यांना रक्तवाहिनीतून पोषण दिले जाते (TPN). ही एक स्वतंत्र विकसित वैद्यकशाखा आहे. विविध पोषणद्रव्ये त्या तज्ञाचे सल्ल्यानुसार दिली जातात.

डोके व मानेस जबरी इजा झालेल्या रुग्णांत हे नळी प्रकरण अवघड असते. मग त्यांना रक्तवाहिनीतून पोषण दिले जाते (TPN). ही एक स्वतंत्र विकसित वैद्यकशाखा आहे. विविध पोषणद्रव्ये त्या तज्ञाचे सल्ल्यानुसार दिली जातात.

निव्वळ रक्तवाहिनीतून पोषण दिल्यास (पचनसंस्था बायपास करुन), जठर आतडी वगैरे अवयव वापराअभावी सुकून जात नाहीत का? (निकामी होणे या अर्थाने).

कुमार१'s picture

29 May 2019 - 7:16 pm | कुमार१

२. शारीरिक हालचाल नसल्याने सांधे वगैरे कमकुवत होतात का? >>>

होय, त्यांना विविध अस्थिसमस्या आणि फुफ्फुसव्याधी होऊ शकतात. त्या येऊ नयेत म्हणून नियमित फ़िजिओ-उपचार दिले जातात.

कुमार१'s picture

30 May 2019 - 9:16 am | कुमार१

३. त्याची मधल्या काळातली म्हणजे अपघात होऊन बेशुद्ध झाला ते शुध्दवर आला ही मेमरी टोटल लॉस असते का? >>>

अपघाती बेशुद्धावस्थेनंतर होणारे विस्मरण हे तात्पुरते असते. पण ते किती काळ टिकेल हे अपघाताच्या तीव्रतेवर अवलंबून असते.
साधारणपणे जितका काळ व्यक्ती बेशुद्ध होती त्याच्या ३-४ पट काळ विस्मरण टिकते.

हे सांगितले ते बरे झाले, साला सिरीयल मध्ये एकदा अपघात झाला की माणूस 4 दिवस कोमामध्ये आणि 4 महिने मेमरी लॉस मध्ये असतो

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 May 2019 - 11:36 am | डॉ सुहास म्हात्रे

नव्या-जुन्या चित्रपट आणि मालिकांमधील लोकप्रिय विनोदी प्रकार म्हणजे...

१. २४ तासांत शुद्धीवर आला नाही तर काही खरे नाही.

२. डोक्याला लागलेल्या मारामुळे स्मृतीभ्रंश होणे आणि अनेक वर्षांनी डोक्याला तसाच मार लागल्यावर क्षणभरात सगळे लख्ख आठवू लागणे.

३. कालपरवाच, "माझ्या बायकोचा नवरा" या मालिकेत नायक जिन्यावरून गडगडत जाऊन बेशुद्ध होतो. "तो जर दिवसाभरात शुद्धीवर आला नाही तर कोमात जाईल" अश्या अर्थाचे वाक्य एका पात्राच्या तोंडी आहे. ते लिहिणार्‍याचे डोके तपासून पहायची गरज आहे.

=)) =)) =))

कुमार१'s picture

31 May 2019 - 11:59 am | कुमार१

ते लिहिणार्‍याचे डोके तपासून पहायची गरज आहे. >>>> + १११११

... बाकी असल्या लई मालिकांमुळे भरपूर इनोदनिर्मिती होते !!

म्हात्रेकाका चक्क "माझ्या बायकोचा नवरा(की नवऱ्याची बायको?) " असल्या शिरेल्स बघतात?
.
.
.
.
.
मैं कहा हुं............

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 May 2019 - 10:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

इतर अनेक घरांत चालू असतात तश्याच सिरियल्स आमच्याही घरात बाय डीफॉल्ट चालू असतात. सिरियल्स चालू असताना मी लॅपटॉपवर काम करायला बसतो, तेव्हा डोळ्याच्या कोपर्‍याने असे अनेक ईनोदी प्रकार सहज टिपले जातात... तेवढीच करमणूक. ;) :)

माझ्या बायकोचा नवरा(की नवऱ्याची बायको?) नावात काय आहे? आपला ईनोदाशी मतबल. भावनाओंको समजो.
बाकी, सिरियलचे बरोबर नाव ताबडतोप सांगितल्यामुळे, तू मराठी सिरियल्स मन लावून पाहतोस (किंवा त्या पहाव्या लागतात) हे सिद्ध झाले आहे. =)) =)) =))

गवि's picture

31 May 2019 - 7:00 am | गवि

मूळ अधोरेखित पाहता:

अपघात होऊन बेशुद्ध झाला ते शुध्दवर आला ही मेमरी

याविषयी म्हणत असाल तर या काळातली मेमरी नोंदवली न गेल्याने पुढे कधीही परत येत असेल हे शक्य वाटत नाही.

अपघात होण्याच्या जस्ट आधीची काही मिनिटं किंवा शुद्धीवर आल्यानंतरचा काही काळ हा भाग आधी दीर्घ स्मृतीतून गायब आणि नंतर हळुहळू परत येऊ शकत असावा.

कुमार१'s picture

31 May 2019 - 9:59 am | कुमार१

आता हा विषय वरील चर्चेत आल्याने नवीन संशोधनाची भर घालतो.

१. अपघातानंतरचे विस्मरण (amnesia) ही पूर्वापार कल्पना होती. परंतु आता हा शब्द तितकासा बरोबर नसल्याचे तज्ञांचे मत आहे.
२. अपघात झाल्याझाल्या ‘लक्ष’(attention) पूर्णपणे विचलित झालेले असते. त्यामुळे तेव्हा कुठलीही नवी माहिती मेंदूत साठवली जात नाही.

३. म्हणून आता या स्थितीला अपघातानंतरचा मानसिक ‘गोंधळ’ (confusional state) असे म्हणतात.

अभ्या..'s picture

31 May 2019 - 10:04 am | अभ्या..

खुप खुप धन्यवाद डॉक्टरसाहेब,
तुमची लेखमाला तर अप्रतिम आहेच शिवाय प्रतिसाद प्रश्नाचे उत्तरें देऊन अजून माहितीपूर्ण करीत आहात.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

कुमार१'s picture

29 May 2019 - 5:44 pm | कुमार१

निव्वळ रक्तवाहिनीतून पोषण दिल्यास (पचनसंस्था बायपास करुन), जठर आतडी वगैरे अवयव वापराअभावी सुकून जात नाहीत का? (निकामी होणे या अर्थाने). >>>

चांगला प्रश्न. TPN दीर्घकाळ दिल्यास पचनसंस्थेवर काही विपरीत परिणाम होतात. ते असे:
१. यकृताचे कार्य मंदावते. काही रुग्णांत ते अखेर खूप क्षीण होऊ शकते.
२. पित्ताशय (gall b.) ‘निद्रिस्त’ होते व त्यातून पित्तखड्यांची निर्मिती होते.

३. आतडी ‘सुकून’ जात नाहीत. पण त्यांचा रक्तप्रवाह, पेशींची वाढ, एन्झाइम्स निर्मिती, हालचाली, उपयुक्त जिवाणूनिर्मिती यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

म्हणूनच,
जमेल तेव्हा नळीतून पोषणाचा जास्तीत जास्त प्रयत्न केला जातो.

शेखरमोघे's picture

30 May 2019 - 1:08 am | शेखरमोघे

अतिशय कठिण विषयाचे उत्तम विश्लेषण आणि शन्कानिरसन. अभिनन्दन!

लई भारी's picture

30 May 2019 - 9:08 pm | लई भारी

खूप उपयुक्त माहिती सोपी करून सांगितल्याबद्दल धन्यवाद!

कुमार१'s picture

31 May 2019 - 6:40 am | कुमार१

प्रतिसाद व प्रोत्साहनाबद्दल आभार !

शेखरमोघे's picture

31 May 2019 - 7:12 am | शेखरमोघे

'vegetative ' (अवस्था) साठी मराठी शब्द जरूर सुचवावा ही वि.

आपला "लोळागोळा" हा शब्द त्या अवस्थेच्या जवळचा आहे. पण vegetative हाच शब्द थोडासा खटकतो. अनेकानी (न खुडलेली) vegetables "जिवन्त" असतात हे नक्कीच सिद्ध केलेले आहे. आणखी पर्याय- मृतवत, मृतप्राय, अचेतन, मज्जासन्वेदनाहीन (जरा बोजडच शब्द)

कुमार१'s picture

31 May 2019 - 7:45 am | कुमार१

शेखर, पूर्ण सहमत.

मलाही तो मूळ इंग्लिश शब्द खटकतो. पण अधिकृत वैद्यकीय भाषेत तो नोंदवला असल्याने तो वापरला जातो. त्यानुसार त्याचा अर्थ 'functioning unconsciously' असा आहे.

Rajesh188's picture

31 May 2019 - 2:54 pm | Rajesh188

वजन दीड किलो पण नाही पण करामत केवढी मोठी आहे मेंदूची.

कुमार१'s picture

31 May 2019 - 4:27 pm | कुमार१

राजेश, सहमत .
मेंदूचे वजन शरीराच्या जेमतेम २% आहे. पण आपल्या एकूण ऑक्सिजन वापरातील तब्बल २०% वाटा त्याचा आहे. मुलांत वयाच्या पहिल्या दशकात तर तो ५०% आहे.

मेंदूचा सतत रक्तपुरवठा चालू लागतो. जर तो काही कारणाने पूर्ण थांबला, तर अवघ्या काही सेकंदांत बेशुद्धावस्था येते.

मराठी कथालेखक's picture

2 Jun 2019 - 8:46 pm | मराठी कथालेखक

आणि प्रतिसादांतूनही चांगली माहिती मिळाली आहे

त्यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांना त्या रुग्णावरील सर्व ‘जीवरक्षक उपाय यंत्रणा’ बंद करण्याची कायदेशीर परवानगी (काही देशांत) मिळते.

भारतात याबद्दल काय कायदे आहेत ?

मराठी कथालेखक's picture

2 Jun 2019 - 8:47 pm | मराठी कथालेखक

वैद्यकीय इच्छापत्र (मेडिकल विल) संदर्भाने काय्द्यात काही उपकलमे आहेत का ?

नावातकायआहे's picture

3 Jun 2019 - 9:42 pm | नावातकायआहे

सख्खे नातेवाईक आणि फॅमिली डॉक्टर यांनी संमती अर्ज सही करून दिल्यास जीवरक्षक उपाय यंत्रणा बंद करता येते

कुमार१'s picture

2 Jun 2019 - 9:36 pm | कुमार१

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मला कायद्याचे वाचन करून द्यावी लागतील.
सवडीने प्रयत्न करतो.

@म.क.,

लोळागोळा अवस्थेतील रुग्णाच्या जीवरक्षक यंत्रणा कधी काढून घ्याव्यात, याबाबत कायद्यात संदिग्धता आहे. किंबहुना ही जगभरात आहे. जालसंदर्भ चाळताना एक जाणवते की याबाबत भारतातील कायद्यातील एखाद्या कलमाचा थेट उल्लेख नसतो. विविध लोकांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिका-निकालांचे काही संदर्भ मिळतात.

अशाच एका याचिकेत न्यायालयाने असे म्हटले आहे:
“ अशा रुग्णाच्या जीवरक्षक यंत्रणा काढून घेणे म्हणजे त्याला सन्मानाने मरण्याचाच हक्क आपण देतो. त्याच्या देहात नैसर्गिक मृत्यूची प्रक्रिया आधीच चालू झालेली असते. त्याच्या यंत्रणा आपण काढून घेण्याने त्याच प्रक्रियेला आपण फक्त गती देतो.”

.... अशा ज्या रुग्णांचे बाबतीत कोणीच न्यायालयात जात नाही ते रुग्ण वर्षानुवर्षे त्या अवस्थेत पडून असतात.
या विषयावर कोणी कायदा जाणकारानेच माहिती दिलेली बरी.

माझा जवळचा मित्र लहान पणापासून सर्व गोष्टी एकमेकात share करणारे कोणतीच गोष्ट लपवत नाही .
त्याचे जेवण ज्वारीची भाकरी ,आणि सर्व कड धान्य .
पिझ्झा, चीझ,बटर ,बिलकुल नाही .
रोज व्यायाम .
घरची आर्थिक आणि कोटांबिक स्थिती अती उत्तम.
कोणतेच व्यसन नाही
वय ४५, तरी अशा व्यक्तीला अँजिओप्लास्टी करावी लागली .
९० percent blockages आहेत .
सायन्स कडे ह्याचे काय उत्तर आहे .
त्या उलट सर्व व्यसन करणारे .सर्व junk food खाणारे मस्त लाईफ जगत आहेत

मुद्देसूद तरीही रोचक पद्धतीने लिहिता तुम्ही डॉक, लेख आवडला.

कुठल्याही कारणाने दीर्घकाळ कोमात राहावे लागल्यास 'सन्मानाने मरणाचा' हक्क मला अगदी हवाच आहे :-)

पु ले शु

कुमार१'s picture

3 Jun 2019 - 1:51 pm | कुमार१

अनिंद्य, धन्यवाद
आणि सहमती. सन्मानाने मरण्याचाच हक्क जगातील सर्वांनाच मिलो हीच माझीपण इच्छा.

आमच्याकडून दंडवत स्वीकारा कुमारसाहेब ... सुंदर माहितीपूर्ण लेख आणि तोही समजेल अश्या सहजसोप्या भाषेतून .. आणि हो सुंदर प्रतिसादांसाठीहि धन्यवाद ..

खिलजि's picture

3 Jun 2019 - 4:05 pm | खिलजि

डॉक्टर मला एक प्रश्न पडला आहे तो हा कि माणसाच्या कवटीमध्ये काही किडे असतात का ? मी हे विचारतोय कारण मी बोकडाला कापताना बऱ्याचदा बघितलंय आणि तेही जवळून . त्याला कापल्यानंतर भेजा घेणारे उभे असायचे . त्याची कवटी मोठ्या चाकूने फोडल्यावर बरेच जिवंत किडे इकडेतिकडे पळायचे. मी उत्सुकतेने त्या खाटीकल विचारले तेव्हा तो म्हणाला कि " भाय अपने मग्जने भी ऐसैच किडा रहता है . एक भी काम करना बंद करेगा तो आदमी इस दुनियासि उठ जायेगा . " हे ऐकून मी चाट पडलो .
मला एक विचारायचं आहे ते हे कि , खरंच असे काही आहे का ? हे किडे माणसाला नियंत्रित करतात का ? आणि जर उत्तर हो असेल तर या किड्यांचा नक्की रोल काय आहे आपल्या आयुष्यात ?

चिगो's picture

26 Jun 2019 - 2:14 pm | चिगो

मटणवाला बदला तुमचा.. फालतू गोष्टी सांगण्यापेक्षा दर्जेदार माल देणारा आणि स्वच्छतेची दक्षता घेणारा मटणवाला शोधा..

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jun 2019 - 11:52 am | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =))

कुमार१'s picture

3 Jun 2019 - 7:15 pm | कुमार१

खिलजी,
धन्यवाद. माणसाच्या कवटीच्या आत फक्त मेंदूच आहे हे नक्की.
बाकी ते बोकड आणि किडे याबाबत म्या पामरास काय नाही हो माहित !

Rajesh188's picture

3 Jun 2019 - 7:34 pm | Rajesh188

तहान,भूक ह्याची जाणीव होते का बेशुद्ध अवस्थे मध्ये .
तसेच वेदना,लघवी होणार त्याची जाणीव ,संडास होण्याची जाणीव
सुख ,दुःख, हे सर्व समजत का?

कुमार१'s picture

3 Jun 2019 - 7:57 pm | कुमार१

ही पूर्णपणे जाणीवरहित अवस्था असते.

भूक लागत नाही
म्हणजे बाहेरून मोजून जेवण द्यावे लागेल.

तहान लागत नाही
म्हणजे ते सुधा बाहेरून मोजुंच द्यावे लागेल.
संडास आणि लगविची जाणीव नाही .
म्हणजे ती सुधा शरीरातून वेळेत बाहेर काढावी लागेल.
पोटात दुखत नाही ,डोकं दुखत नाही म्हणजे वेदना होतेय हे डॉक्टर तरी कसे ओळखणार .
असा व्यक्ती मृतच आहे .
फक्त heart आणि श्वास चालू आहे म्हणून जिवंत समजायचं का.

गामा पैलवान's picture

4 Jun 2019 - 5:38 pm | गामा पैलवान

कुमार१,

अतिशय माहितीपूर्ण लेख. त्याबद्दल धन्यवाद! :-)

vegetative या शब्दाबद्दल विचार करत असतांना हिंदू तत्त्वज्ञानासंबंधी कुठल्याशा पुस्तकातली काहीबाही चर्चा अंधुकशी आठवली. तिच्यात 'वृक्षपाषाणैव स्थिती' असा काहीसा शब्दप्रयोग होता.

त्यावरून vegetative ला मराठीत वृक्षदशा म्हणता येईल. अगदी पाषाणदशा नको.

गावरान मराठीत 'पालापाचोळ्यावाणी पडलंय' म्हणता येईल. शिष्ट शब्दांत पाचोळदशा, पाचोळणे, इत्यादि प्रयोग करता यावेत.

भारदस्त प्रयोग हवा असेल तर अवचेष्ट हा शब्द बरा वाटतो. देहात चेतना आहे म्हणून तो चेष्ट आहे ( म्हणजेच निश्चेष्ट नाही ). पण त्यात जाणीव नाही म्हणून ही चेतना अव म्हणजे नकोशी आहे. म्हणून अवचेष्ट यथोचित ठरावा.

आ.न.,
-गा.पै.

कुमार१'s picture

4 Jun 2019 - 6:00 pm | कुमार१

'पालापाचोळ्यावाणी पडलंय' हे लै आवडले !

मी एक व्हिडीओ पाहिला होता . तो तू नळीवर उपलब्ध आहे. मेडिकल विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा म्हणून मेंदूच्या प्रत्यक्ष काचऱ्या काढून मेंदू " शिकविला " जातो. ( सी टी स्कॅन नाही ). बर ते जाऊ द्या . फ्लावर सारखा दिसणारा हा गड्डा गंध ,रंग, आठवणी ,चव, भावना कितीचे पृथक्करण करील ? त्याला काही मर्यादा ? आईच्या गर्भात जुळणी होणारी ही असेम्ब्ली जगातील आद्य आश्चर्य ठरावे. प्रष्ण असा की कवटी मेंदूचे बाह्य आघातापासून रक्षण करते पण पेशीबाह्य आक्रमणाचे पासून मेंदूचे रक्षण कोण करते ? त्या रक्षा भिंतीची ही काही मर्यादा असेल ना ? नाहीतर मस्तिष्कावरण दाह कसा झाला असता ?

दुसरा प्रशन असा आहे की मेंदू संदेश ग्रहण व आज्ञादान असे कार्य करतानाच तो एंडो क्राइन संस्थांचे ही काही काम करत असतो .या संस्थांचे काम हे मनुष्य बेशुद्धावस्थेत असताना चालू असते का ?

कुमार१'s picture

5 Jun 2019 - 5:38 pm | कुमार१

शंकानिरसन १.

पेशीबाह्य आक्रमणाचे पासून मेंदूचे रक्षण कोण करते ? त्या रक्षा भिंतीची ही काही मर्यादा असेल ना ? नाहीतर मस्तिष्कावरण दाह कसा झाला असता ? >>>>>

शरीराचा रक्तप्रवाह आणि मेंदू यांना वेगळे करणारी जी रक्षाभिंत आहे तिला Blood Brain Barrier (BBB) असे म्हणतात. ती भिंत म्हणजे सूक्ष्म रक्तवाहिन्यांतील विशिष्ट पेशी असतात. निरोगीपणात ही भिंत जीवाणूंना मेंदूत शिरू देत नाही. पण जेव्हा काही तीव्र जंतूंचा शरीरात प्रवेश होतो, तेव्हा ते या भिंतीला दुबळी बनवतात. मग त्यांची विषे मेंदूत शिरतात.

कुमार१'s picture

5 Jun 2019 - 5:46 pm | कुमार१

मेंदू एंडो क्राइन संस्थांचे ही काही काम करत असतो .या संस्थांचे काम हे मनुष्य बेशुद्धावस्थेत असताना चालू असते का ? >>>

होय, हे काम तेव्हाच्या चयापचयाच्या गरजेनुसार चालू असते. जेव्हा मेंदूस गंभीर मार लागलेला असतो, तेव्हा तर अनेक हॉर्मोन्सच्या पातळीत चढउतार होत राहतात. त्यामध्ये प्रामुख्याने थायरोईड, TSH, इन्सुलिन आणि ग्रोथ हॉर्मोन यांचा समावेश आहे.

जॉनविक्क's picture

5 Jun 2019 - 9:05 pm | जॉनविक्क

हे औषधशास्त्रासाठी एक challange सुद्धा आहे बरे का, ही तीच भिंत आहे जी मेंदुच्या गरज असलेल्या भागात पोचणं अपेक्षित असणारे औषध सुद्धा मेंदूला मिळणाऱ्या रक्तातून फिल्टर करते :)

कुमार१'s picture

6 Jun 2019 - 10:48 am | कुमार१

अतिशय चांगला मुद्दा. मेंदूच्या कर्करोगावरील काही औषधे BBB भेदून आत पोचवणे हे एक आव्हान असते. आता nano तंत्रज्ञानाच्या मदतीने हे शक्य होणार आहे.
यावरील संशोधन जोरात चालू आहे.

स्टेम सेल पासून dna, chromosome, मानवी शरीराचे कार्य कसे चालते ह्याचे विश्लेषण खूप झाले . जीन्स मध्ये बदल #कॅन्सर
मेंदूला मार# बेशुद्ध अवस्था
जीन्स मध्ये बदल #मधुमेह.
अशी खूप खूप प्रश्नांची मालिका आहे
उत्तर कोणाकडे नाही
त्या मुळे हे सर्व ज्ञान हे वांझोटे आहे

गड्डा झब्बू's picture

5 Jun 2019 - 10:35 pm | गड्डा झब्बू

उत्तर कोणाकडे नाही>>>स्वामीला इचारा कि!
त्या मुळे हे सर्व ज्ञान हे वांझोटे आहे>>> मंग करा कि थोडे प्रयत्न फळवायला!

कुमार१'s picture

7 Jun 2019 - 10:20 am | कुमार१

उपयुक्त सूचना, चांगल्या शंका आणि पूरक माहितीची भर या सगळ्यांमुळे चर्चा छान झाली.
सर्व सहभागी सदस्यांचे मनापासून आभार !
लेखाचा विषय असलेली अवस्था आपणा कुणावरही कधीही न ओढवो, या सदिच्छेसह समारोप करतो.

टर्मीनेटर's picture

9 Jun 2019 - 12:54 pm | टर्मीनेटर

वाह डॉक्टर साहेब, नेहमीप्रमाणेच खूप छान माहितीपूर्ण लेख.
व्यसनांच्या अतिरेकाने येणाऱ्या बेशुद्धावास्थेची दोन गंभीर उदाहरणे प्रत्यक्ष बघितली असल्याने लेखाशी जास्त चांगल्या प्रकारे रिलेट करू शकलो. मागे 'गांजाला भारतात कायदेशीर मान्यता मिळावी का?' या धाग्यावर दिलेल्या प्रतिसादात त्यांचा उल्लेखही केला होता.

कुमार१'s picture

9 Jun 2019 - 1:15 pm | कुमार१

धन्यवाद.
तुमच्या वरील संदर्भातील प्रतिसादातील खालील वाक्य.....

पुण्यात गांजा पिणाऱ्या/ओढणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील देशात सर्वात जास्त झाली आहे. >>>>>

......हे धक्कादायक आहे. वाईट वाटले.

खालील प्रतिमा दिसल्या नाहीत....

निरोगी डोळ्याच्या बाहुल्या :
pict
ओपियम गटातील रसायनांची विषबाधा : डोळ्याच्या बाहुल्या :
pict

..... काही सुबुद्ध वाचक उद्धटपणे प्रतिसाद कसे देऊ शकतात हे एक न उमगलेले कोडे आहे...

सर्व प्रतिमा आता दिसत आहेत.
धन्यवाद!

कुमार१'s picture

9 Jun 2019 - 2:16 pm | कुमार१

नितीन,

धन्यवाद. बरेच दिवसांनी आपली भेट झाल्याने आनंद झाला.
ओपियम विषबाधेत डोळ्यांच्या बाहुल्या खूप बारीक होतात. त्यांना pin point pupils म्हणतात.

सुधीर कांदळकर's picture

10 Jun 2019 - 6:46 am | सुधीर कांदळकर

लेख.

फार्माकोलॉजी ऑफ स्लीप वाचतांना
वाचतांनाअनेक वर्षांपूर्वी कधीतरी कार्यालयात झोपा काढतांना करमणुकीसाठी तिथेच उपलब्ध असलेल्या मोजसंदर्भग्रंथातून फार्माकोलॉजी ऑफ स्लीप की तसेच काहीतरी वाचतांना या विषयात कधीतरी बुडी मारायची इच्छा झाली होती. मग ते तसेच राहून गेले. (मेंदू नसल्यामुळे)आता निदान पाय बुडवायला मिळाले. बरे वाटले, अनेक धन्यवाद.

घातनिद्रा, कटुनिद्रा, कृष्णनिद्रा हे शब्द चिरनिद्रा, कालनिद्रा या शब्दांवरून सुचले. प्रतिशब्द कोणताही निवडला तरी मग त्यात अवस्थातीव्रतेप्रमाणे घातनिद्रा १, घातनिद्रा २, घातनिद्रा ३ असे वर्गीकरण देखील करता येईल.

संगणक नुकताच घातनिद्रेतून जागा झाल्यामुळे प्रतिसाद देता आला.

कुमार१'s picture

10 Jun 2019 - 7:47 am | कुमार१

सुधीर,

मिश्किल प्रतिसादाबद्दल आभार ! तुमचे पर्यायी शब्द वेगळ्या पठडीतील आहेत. या धाग्याच्या निमित्ताने आता vegetativeसाठी किमान डझनभर मराठी शब्द माझ्या संग्रहात जमा झाले. त्याबद्दल सर्व संबंधितांचे आभार.

… बाकी तुमच्या संगणकाची घातनिद्रा संपली हे लै बेश झाले !

सुधीर कांदळकर's picture

13 Jun 2019 - 6:57 am | सुधीर कांदळकर

तृणावस्था आणि क्षुपावस्था हे तीन शब्द असेच सहज आठवले/सुचले.
मस्त ब्रेनस्टॉर्मिन्गबद्दल धन्यवाद.

कुमार१'s picture

13 Jun 2019 - 7:44 am | कुमार१

पण 'क्षुपा' चा अर्थ नाही समजला.

सुधीर कांदळकर's picture

14 Jun 2019 - 6:40 pm | सुधीर कांदळकर

श्रब - Shrub म्हणतात ते

सुधीर कांदळकर's picture

14 Jun 2019 - 6:41 pm | सुधीर कांदळकर

श्रब - Shrub म्हणतात ते

सध्या चर्चेत असलेली ही दुर्घटना आहे. या रुग्णांत मेंदू बिघाड असा झालाय:

काही कुपोषित मुलांनी लिचीची फळे खाल्ली >>
त्यातील
methylene cyclopropyl glycine (MCPG) या विषामुळे रक्तातील ग्लुकोज पातळी खूप कमी झाली >>>

बेशुद्धावस्था >>> मृत्यू.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jun 2019 - 5:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

याबाबत इथे तज्ज्ञांनी, तुलनेने सोप्या भाषेत, दिलेली जराशी सविस्तर माहिती आहे...

कुमार१'s picture

22 Jun 2019 - 11:57 am | कुमार१

सदर मुलांचे मृत्यू लिचीतील रसायनाने की विषाणूजन्य तापाने, यावर आता परस्परविरोधी मते व्यक्त होत आहेत.

सत्य जाणून घेण्यासाठी आता राज्य सरकारने कृषी तज्ज्ञांची समिती नेमली आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jun 2019 - 12:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

या प्रकरणात लिचीची शेती करणार्‍या मोठ्या शेतीउद्योगाचे राजकारण आहे असे म्हटले जाते.

हा आजार फक्त लिचीच्या मोसमात आढळतो व अनेक वर्षांच्या व्हायरालॉजी अभ्यासांत, व्हायरस असल्याचे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संकेत मिळालेले नाहीत. मात्र, लिचीतील रसायनांमुळे चयापचय प्रक्रियांवर होणारे परिणाम आणि त्यामुळे सकाळच्या वेळी रक्तातले प्रमाण लक्षणियरित्या कमी होणे, हे सिद्ध झाले आहे.

वरच्या लेखात लिहिल्याप्रमाणे लिची तोडणी करणार्‍या मजुरांची मुले योग्य तेवढे रात्रीचे जेवण घेतात याची खात्री/सोय केल्यास, सकाळच्या वेळी रक्तात साखरेचे पुरेसे प्रमाण राहील व हा आजार होणार नाही. हा जवळ जवळ डायग्नोस्टिक असलेला (निदान पक्के करणारा) कमी खर्चाचा, साधासोपा प्रयोग मोठ्या प्रमाणावर शास्त्रिय पद्धतीने करून पहायला हरकत नव्हती. तो यशस्वी झाला तर समस्येचे निवारण करणे सोपे होईल. पण, ते सिद्ध झाले तर लिचीवर (तिच्यात धोकादायक रसायने असल्याचा) ठपका येऊन, तो व्यवसाय धोक्यात येईल... कमीत कमी त्याची उलाढाल तरी कमी होईल. त्यामुळे, 'सधन शेतीउद्योग' आणि 'त्यात काम करणार्‍या मजूरांची मुले' या दोन गटांच्या हितसंबंधामध्ये, अजून तरी पहिला गट जिंकत आहे, हेच दिसत आहे... दुर्दैवाने. :(