नन्दिनीची डायरी - निर्णय

aanandinee's picture
aanandinee in जनातलं, मनातलं
14 May 2019 - 5:17 am

नन्दिनीची डायरी - निर्णय

वेटिंग रूममध्ये ती एकटीच बसली होती. "एला" मी हलक्या आवाजात हाक मारली. तिने मान वर करून माझ्याकडे पाहिलं. पंचविशीच्या आसपास, अतिशय रेखीव चेहरा, पिंगट डोळे, केस मात्र कोरडे, फिस्कारलेले, काळजी न घेतले गेल्यासारखे. आणि चेहर्यावर मलूल असा भाव. मला पाहून कसनुसं हसू तिच्या चेहर्यावर उमटलं पण ते वरवरचं होतं.
माझ्या मागोमाग ती आत आली. समोरच्या सोफ्यावर बसली. नजर जमिनीवर लावून ठेवलेली. सुरुवातीच्या औपचारिक गप्पा चालू झाल्या. एला तिच्या पार्टनरसोबत राहत होती. हा देश आता लिव्ह इन रिलेशनशिप बरोबर की चूक या वादाच्या पुष्कळ पुढे गेला आहे. बहुतेक सगळी कपल्स ही काही काळ एकत्र राहतात. या काळात ते एकमेकांचा उल्लेख पार्टनर म्हणून करतात. बहुतेकदा त्यांनतर काही वर्षांनी पैसे वगैरे जमवून लग्न होतात. आणि त्याउलट जर नाही जमत आहे असं वाटलं तर ते वेगवेगळे रस्ते घेतात. असं झालं तर हे आता एक्स-पार्टनर्स, आपापले नवीन पार्टनर शोधायला मोकळे असतात. सुरुवातीच्या जुजबी ओळखीपाळखीनंतर मी एलाला विचारलं, "मग इथे यायचं ठरवलंस त्याचं नेमकं कारण काय?".
ती लगेच सावरून बसली, सज्ज झाल्यासारखी. "मला अस्वस्थ वाटत राहतं, काळीज धडधडत असतं, घशाला कोरड पडते." Anxiety (चिंता/ भीती) की नैराश्य, की दोन्ही..... माझं विचारचक्र फिरू लागलं. "तुझ्या डोक्यात काय विचार चालू असतात तेव्हा असं होतं ?" मी विचारलं. "विचार..... काय माहित?" तिने गोंधळून उत्तर दिलं.
"बरं, आत्ता या क्षणाला कसं वाटतंय तुला?" मी प्रश्न केला.
"आत्ता सुद्धा तसंच होतंय, थोडंसं. पोटात खड्डा पडल्यासारखं"
"आणि आत्ता काय विचार करत्येयस तू?"
"सगळा गोंधळ आहे. मलाच नीट कळत नाहीये मला काय होतंय. काय सांगावं, काय करावं.... माझा नेहमी गोंधळ होत असतो. असं वाटतं आयुष्य वाया चाललं आहे." बोलता बोलता तिचे डोळे भरून यायला लागले. “माझा एक्स (आधीचा बॉयफ्रेंड) मला पुहा मेसेज करू लागलाय". वाक्य संपेपर्यंत तिचे गाल लाल व्हायला लागले होते. डोळ्यांतून पाणी येत होतं. ती क्षणभर थांबली. मी शांतपणे फक्त मान डोलावून पुढे काय अश्या अर्थाने तिच्याकडे पाहत राहिले. "मी तीन वर्ष त्याच्यासोबत होते. ती तीन वर्षं एका अर्थाने फार खराब गेली पण दुसर्या दृष्टीने पाहिलं तर तो माझ्या आयुष्यातला सर्वात छान काळ होता." ती बोलत राहिली, "मी नुकतीच पोलंडहून आले होते. तशी मी लाजरी बुजरीच आहे. तेव्हा तर फारच होते. एका पार्टीमध्ये मी एकटीच शांत बसले होते. तेव्हा तो - डॅन माझ्याकडे आला, त्याने मला डान्ससाठी विचारलं. मी अगदी अवघडून गेले. "नको" मी कसंबसं म्हटलं. "का?" तो सहजासहजी ऐकणार्यातला नव्हता. "सगळे मला बघतील ना, नकोच!" मी कसंबसं सांगितलं. "का, सगळे तुलाच बघायला तू काय तिथे जाऊन मूनवॉक करणार आहेस?" खळखळून हसत त्याने मला विचारलं. आणि मी काही बोलायच्या आत झटक्यात माझ्या हाताला धरून त्याने मला डान्स फ्लोअरवर नेलंसुद्धा!" अश्रूंनी भिजलेल्या एलाच्या गालांवर आता हसू पसरलं होतं. “आमची फारशी ओळखही नव्हती. पण माझ्या भित्र्या, घाबरट स्वभावाच्या उलट, त्याचा तो बिनधास्त स्वभाव, मोकळं, बेफाम वागणं मला इतकं आवडत होतं. त्यात त्याचा देखणा चेहरा, पिळदार शरीर, भेदक नजर, त्याची प्रत्येक गोष्टच मला आवडत होती. गोष्टी चटचट पुढे सरकलया. आम्ही एकत्र भाड्याच्या घरात राहू लागलो. त्याच्या आयुष्याला भन्नाट वेग होता. कधी अचानक उठून एखाद्या वीकएंडला कुठेतरी कॅम्पिंगला जायचं, कधी समुद्रकिनारी, तर कधी एखाद्या छोट्याश्या तळ्याकाठी तंबू ठोकून राहायचं, पाण्यात गळ टाकून दिवसभर मासे पकडायचे, संध्याकाळी शेकोटी करून भोवती बसून गप्पा मारायच्या, तर कधी रात्र रात्र मित्रमंडळींबरोबर पबमधे धमाल करायची. साधा मॉलमधला त्याचा जॉब. त्यात पैसा फार काही नव्हताच. पण त्याच्या बरोबर मला इतकं जिवंत, सळसळतं वाटायचं. एकत्र राहायला लागल्यावर पहिले सहा एक महिने छान गेले. नंतर त्याचा एक मित्र ग्लासगोहून आला. त्याला भेटायला अजून काही जण आले. घरी छोटी पार्टीच झाली. त्याच्या त्या मित्राने ड्रग्स आणले होते. 'काही नाही गं, जरा गंमत' म्हणून डॅनने मलासुद्धा घेतेस का म्हणून विचारलं, मी नाहीच म्हणाले. पण त्याने मात्र घेतले. त्याचं बिनधास्त, बेफिकीर वागणं मला आवडत असलं तरी मला एवढं अपेक्षित नव्हतं. पण त्याच्या इतक्या मित्रांसमोर मी काय म्हणणार होते! क्वचित कधीतरी म्हणत अश्या पार्टीज वाढायला लागल्या. मी घरी कटकट करते म्हटल्यावर त्याचे बरेच वीकएंड बाहेर मित्रांबरोबर जायला लागले. रात्र रात्र चालणार्या पार्टी, त्यात ड्रिंक्स आणि ड्रग्स.... तो माझ्यापासून लांब चालला आहे अशी मला भीती वाटू लागली होती. मी त्याच्यासारखी नाही तर मी कशी काकूबाई आहे म्हणून तो सारखी माझी टर उडवायचा. भांडाभांडी रोजची झाली होती, मग त्याचं चिडणं, माझं रडणं आणि त्याचं निघून जाणंही. कोणाचं चुकतंय आणि कोणाचं बरोबर आहे हेच मला कळेनासं झालं होतं.”
अशी जवळजवळ दोनेक वर्ष गेली. एकदा असेच सगळे आमच्या फ्लॅटवर जमले होते. पार्टी रंगली होती. दहाबारा जण तरी असतील. डॅन आणि त्याचे अजून पाच सहा मित्र ड्रग्स घेत होते. मी वैतागून झोपायला आत, खोलीत निघून गेले. बाहेर गोंधळ चालूच होता. हळूहळू शांत झालं पण डॅन अजून झोपायला आला नव्हता. आणि कोणीतरी धडाधडा दार वाजवू लागलं. मी अर्धवट झोपेत होते, पण मला दाणदाण पावलांचे आवाज येत होते. आज नक्की शेजारी पाजारी आमची तक्रार करणार, डॅनला आटपायला सांगावं का अश्या विचाराने मी डोळे किलकिले केले इतक्यात डॅनच धावत खोलीत आला. त्याने दार लावलं आणि झटकन मला हलवून जागं करत दबक्या आवाजात म्हणाला, "पोलीस आलेयत, ड्रग्समुळे बहुतेक आम्हाला पकडतील. मी, तुझा याच्याशी काही संबंध नाही, तुला काही माहीतच नाही असंच सांगेन. तूसुद्धा पुन्हा पुन्हा तेच सांग. त्यांनी तुला कितीही वळवण्याचा प्रयत्न केला तरी बधू नकोस. तुला काहीही माहीत नाही म्हणत राहिलीस तर तुला काही त्रास होणार नाही. आता झोपल्याचं सोंग करून पडून राहा. लव्ह यू." म्हणून माझ्या कपाळावर ओठ टेकवून तो खोलीबाहेर निघून गेला. मी खूपच घाबरले होते. त्याने सांगितल्याप्रमाणे मी झोपेचं सोंग करून पडून राहिले. तीन चार मिनिटांतच एका पोलिसाने येऊन मला उठवलं. डॅन आणि त्याच्या मित्रांना पोलीस घेऊन गेले. माझी पोलिसांनी पुष्कळ उलट तपासणी केली. पण मी डॅनने सांगितल्याप्रमाणे मला काहीही ठाऊक नव्हतं हाच घोषा लावून ठेवला. डॅननेही तेच सांगितलं असेल त्यामुळे उलट तपासणी नंतर मी सुटले. डॅनला मात्र सहा महिने जेल झाली. आयुष्याची ही बाजू माझ्यासाठी अगदीच नवीन होती. मी दोनतीनदा त्याला भेटायला गेले. तो जेल मधून सुटून आल्यावर आम्ही भेटलो पण ते फक्त ब्रेक-अप ऑफिशिअल करण्यापुरतेच. डॅन मला आवडत होता, पण त्याचं जग हे माझं जग नाही, हे मला कळून चुकलं होतं.
एला बरोबरची सेशन्स पुढे पुढे चालली होती. आता ती अधिकाधिक मोकळेपणाने बोलत होती. सांगताना खूप खूप रडणं अजूनही होतंच. "ब्रेक-अप नंतरचं वर्ष मला खूपच खडतर गेलं. पोलिसांनी मला काही त्रास असा दिला नव्हता. तरीही रस्त्याने जाताना पोलिसांची गाडी बाजूने गेली तरी माझं काळीज धडधडायला लागायचं. रात्र रात्र झोपच यायची नाही. डॅनची बेफिकिरी, बिनधास्तपणा आवडत असला तरी मला पचत नव्हता हे मला पक्कं कळलं होतं आणि आपण किती लेचेपेचे आहोत असं वाटून मला स्वतःचा तिटकारा येऊ लागला होता.” आणि अश्या वेळी तिचा सद्ध्याचा पार्टनर, बिल तिच्या आयुष्यात आला. तिच्याच कंपनीच्या वेगळ्या ऑफिसमध्ये काम करणारा, साधा, सरळ, सज्जन माणूस, नऊ ते पाच काम करून पैसे साठवून घर घेण्याची स्वप्न बघणारा. हळूहळू ओळख वाढली. मैत्री झाली आणि पुढे प्रेमही. वर्षभराच्या प्रेमानंतर दोघे एकत्र राहू लागले. आणि आता गेल्या वर्षी दोघांनी एकत्र फ्लॅट विकत घेतला. "सगळं परफेक्ट आहे, बिलचं प्लॅनिंग इतकं चांगलं आहे, आठवड्याच्या किराणा पासून ते घरातली मोठी खरेदी, वर्षातली मोठी सुट्टी, प्रवास, सारं काही तो व्यवस्थित प्लॅन करतो. तेही प्रत्येक बाबतीत मला विचारून, माझं मत घेऊन! त्याने दोन वेळा मला लग्नासाठीसुद्धा विचारलं. पण मीच आत्ता नको म्हणून पुढे ढकललं." जमिनीवर खिळलेली नजर आणि शांत चेहरा. किंचित थांबून ती पुढे बोलू लागली, "तो माझ्या घरी पोलंडलासुद्धा आला होता. माझ्या आईला वाटतं की तो नवरा म्हणून परफेक्ट आहे."
"आणि तुला काय वाटतं?" मी विचारलं.
"मला... बिल म्हणतो की मी त्याच्याबरोबर असले तरीही माझा एक पाय बाहेरच आहे असं त्याला वाटत असतं."
"हे बिल म्हणतो, आणि ते आई म्हणते. पण मला जाणून घ्यायचंय की तुला काय वाटतं, आणि ते सांगायला तू टाळते आहेस असं मला वाटतंय."
एला गोरीमोरी झाली. Anxious (चिंताग्रस्त) पर्सनॅलिटी असणाऱ्या एलासारख्या लोकांमध्ये स्वतःच्या भावनांना टाळण्याची प्रवृत्ती बरेचदा दिसून येते. भावना व्यक्त करणं तर दूरच राहो, पण स्वतःच्या मनातही त्या भावनांचा स्वीकार न केल्याने त्यांची अवस्था त्रिशंकूसारखी होते.
"बिल बरोबरच्या तुझ्या नात्याबद्दल तुला काय वाटतं?" मी माझा प्रश्न पुन्हा विचारला.

"बिल खूप चांगला आहे. ज्याच्यावर पूर्ण विश्वास टाकू शकतो असा. घरातसुद्धा मला सगळी मदत करतो. काळजी घेतो. पण .... पण... " ती थोडी अडखळली. "मी असा विचार करते हे सांगायला सुद्धा मला लाज वाटते, बिल दिसायला अगदी सामान्य आहे. चार लोकांत जराही उठून दिसणार नाही. सॉरी, असा विचार करणंसुद्धा चुकीचं आहे."
"सॉरी कशाला, तुझं आयुष्य, तुझे criteria (निकष), समोरच्याचं दिसणं हा बर्याच जणांसाठी, विशेषतः तरुण वयात, एक मोठा criteria असतो." माझ्या बोलण्याने तिला जरा हायसं वाटल्यासारखं दिसलं.
"मला सांग तू बिलबरोबर का आहेस? मी लिहून घेते" मी कागद पेन हातात घेऊन तिला म्हटलं.
"बिल खूप चांगला आहे. सगळं व्यवस्थित करतो. घरात काय हवं नको बघतो. मी उदास असते हे त्याने ओळखलंय म्हणून लगेच त्यानेच आग्रह करून मला ऑफिसमध्ये सुट्टी टाकायला सांगितली आणि पुढच्या महिन्यात तो मला सुट्टीवर ग्रीसला घेऊन चालला आहे. तो माझ्याशी खरंच इतका चांगला वागतो. माझी सगळी काळजी घेतो."
"आणि....?" मी अजून काय अश्या अर्थाने विचारलं.
"त्याच्या बरोबर माझं भविष्य सुरक्षित आहे असं मला वाटतं आणि तेच तर माझ्यासाठी महत्वाचं आहे ना. तो कधी मला सोडणार नाही. आयुष्य स्थिर असेल, सुरक्षित असेल.”
"बरोबर आहे. अजून काही आहे की झालं?" मी लिहिणं थांबवून विचारलं.
"झालं." तिने उत्तर दिलं.
तो कागद तिच्यासमोर सरकवून मी म्हटलं, "यात मला सिक्युरिटी दिसतेय, स्थैर्य दिसतंय पण प्रेम दिसत नाहीये. 'तो मला आवडतो, माझं त्याच्यावर प्रेम आहे' हे दिसत नाहीये. मी जे ऐकतेय त्यावरून मला वाटतंय की तो चांगला आहे पण तो लाडका नाहीये. तुला काय वाटतं?"
माझ्या प्रश्नासरशी एला हुंदके देऊन रडू लागली. "मी काय करू?" रडत रडत ती म्हणाली, "माझं आयुष्य अगदी नीरस, बोअर झालंय. दोन महिन्यांपूर्वी माझ्या पूर्वीच्या पार्टनरचा - डॅन चा मेसेज आला होता. आम्ही एकत्र असताना आम्ही कुत्रा पाळला होता, बँजो. नंतर डॅन जेलमध्ये गेला तेव्हापासून बँजो माझ्याकडेच असतो. डॅनने मला मेसेज केला की मला बँजोचा फोटो पाठव ना. त्याचा खरंच बँजोवर जीव होता म्हणून मी फोटो पाठवला. पुढच्या आठवड्यात त्याने पुन्हा मेसेज केला, की 'मला बँजोची खूप आठवण येते. त्याला घेऊन पार्कमध्ये येतेस का? मी त्याच्याशी थोडा वेळ खेळेन'."
"मग तू गेलीस?" मी शांतपणे विचारलं.
"नाही, मी नाही म्हणून कळवलं"
"मग?"
"मग काय, काही नाही. त्याचा पुन्हा मेसेज नाही आला, पण बॅन्जोलासुद्धा कदाचित त्याची आठवण येत असेल. त्याला जायचं असेल तर?" तिचे गाल पुन्हा लाल लाल व्हायला लागले. या गोर्या रंगाला भावना लपवणं जमतच नाही. आता तिच्या डोळ्यांतूनही घळाघळा पाणी येऊ लागलं.
"तुला जायचं होतं का?" मी विचारलं.
"काय माहीत. मी बिल बरोबर आहे ना. मी कशी जाणार? मी जाऊ शकते का?" अश्या प्रश्नांना मी उत्तर देत नाही. ही सेशन्स ही मी पेशंट्सना उत्तरं देण्यासाठी नसतात. उत्तरं त्यांची त्यांनाच शोधायची असतात. मी फक्त दिवा दाखवू शकते की ज्यामुळे समोरचं सगळं स्पष्ट दिसेल.
"एला, गेले काही आठवडे तू येते आहेस, बोलते आहेस, मला असं दिसतंय की तुझा स्वभाव शांत, फार जोखीम न घेणारा, थोडी अधिक चिंता करणारा आहे. तुझ्या विरुद्ध स्वभावाचा देखणा आणि बिनधास्त असा डॅन तुला आवडला. तुमचे काही दिवस छान अगदी कायम लक्षात राहतील असे गेले. पण त्याची बेफिकिरी जेव्हा ड्रग्स पर्यंत गेली तेव्हा तुला गोष्टी हाताबाहेर जातायेत असं वाटू लागलं. नंतर बिल तुझ्या आयुष्यात आला. तो चांगला आहे, डॅन सारखा वाइल्ड नाही. मोजून मापून आयुष्य जगणारा आणि स्थिर आहे. आणि हीच त्याची जमेची बाजू आहे आणि त्याचा वीक-पॉईंटही! तुम्ही एकत्र फ्लॅट घेतलायत ही एक आर्थिक बांधिलकीसुद्धा आहे. आता बिल बरोबरचं स्थिर आयुष्य निवडावं, जे नीरससुद्धा आहे, की हे स्थैर्य, सुरक्षितता सोडून डॅनबरोबरच्या बेफिकीर आयुष्याला पुन्हा एक संधी द्यावी ही दुविधा तुला छळत्येय. बरोबर आहे?" मी तिच्या समस्येचा सारांश, मला समजला तसा सांगितला. चित्राकडे थोडं मागे जाऊन बघितलं की जसं पूर्ण चित्र दिसतं तसं सगळं माहीत असलं, तरीही असा सारांश ऐकणं हे बरेचदा उपयुक्त असतं.

"अगदी बरोबर आहे. पण निर्णय कसा घ्यावा हे मला कळत नाहीये. आयुष्य असं का आहे?" वेळ संपल्याने अस्वस्थ मनाने आमचं सेशन तिथेच संपलं. पण एलाच्या प्रश्नाने माझं अंतरंग ढवळलं होतं. जगजीत सिंगनी गायलेली कैफी आझमींची गझल मला आठवली,

कोई ये कैसे बताए के वो तनहा क्यूँ है ?
आस जो टूट गयी फिर से बंधाता क्यूँ है ?
यही होता हैं तो आखिर यही होता क्यूँ है ?

माझं मन भूतकाळात गेलं. मी आणि साकेतने एकमेकांमधे काय पाहिलं होतं? कपल्स एकमेकांना कशाच्या आधारे निवडतात? काहीजण उत्पन्न, शिक्षण, जात, धर्म, भाषा असे निकष लावून त्यात खर्या उतरणार्यातून कोणाला तरी निवडतात. आणि काही जणांमध्ये आपसूक काहीतरी क्लिक होतं.
"साकेत, तुझ्या माझ्यात काय क्लिक झालं रे?" घरी गेल्यावर मी साकेतला विचारलं.
"क्लिक कसलं! तू बघितलंस, इंजिनीअर आहे, काहीतरी नोकरी बिकरी करेलच. आणि घरकामही येतं थोडं फार. झालं, डोरे टाकलेस तू माझ्यावर."
"सांग ना रे"
"तुझ्या सोबत असताना मला छान वाटायचं, आयुष्य छान आहे असं वाटायचं" साकेतने हसून सांगितलं.
"Exactly!!" माझ्या तोंडून निघालं.
"Exactly काय, माझी काय टेस्ट चालली होती? ए, तू मला गिनिपिग बनवत जाऊ नकोस.... "
"नाही रे, मलाही तुझ्या बरोबर असताना अगदी असंच वाटायचं" मी हसून खरं तेच सांगितलं.

पुढच्या आठवड्यात एला आलीच नाही. नंतर रिसेप्शनला फोन करून तिने ट्रीटमेंट थांबवल्याचं कळवलं. माझ्या मनात इतके उलट सुलट विचार येऊन गेले. सारासार विचार करून निर्णय घ्यायला तिला अजून सेशन्सची गरज होती का? तिने यायचं का थांबवलं असेल? मी परिस्थिती वेगळ्या पद्धतीने हाताळायला हवी होती का? की माझं काम झालं होतं, आता निर्णय तिचा तिलाच घ्यायचा होता? तिने काय निर्णय घेतला आता मला कधीच कळणार नाही. मला कळू नये असं तिला का वाटत असेल, मी तिला जज करेन असं तिला वाटलं असेल का? असं बरंच काही....

असं का होतं? एलासारख्या अतिसावध व्यक्तीला नेमका डॅन सारखा बिनधास्त माणूस का आवडतो? बेफिकिरी कधी प्रमाणात असते काय? आगीशी खेळताना हात भाजण्याची शक्यता गृहीतच धरायला हवी ना? मग आगीला घाबरणारे त्या फंदात पडतातच कशाला? पण प्रेमात पडण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला तरी जातो का? प्रेमात पडण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला जात नसेलही, पण आयुष्य कोणाबरोबर काढायचं हा निर्णय तर विचारपूर्वक घेतला जाऊ शकतो ना? आयुष्य एकत्र काढण्यासाठी security सुरक्षितता, स्थैर्य आवश्यकच नाही का? पण तेवढंच पुरेसं आहे का? एखाद्या बरोबर अक्ख आयुष्य काढण्यासाठी नात्यात सिक्युरिटी जास्त जरूरी आहे की प्रेम? प्रत्येकाचे हे मापदंड सारखेच कुठे असतात! एलाचा मापदंड नेमका काय आहे? आणि याला काय म्हणावं की तिच्याबद्दल हा सारा विचार करणाऱ्या मला कधीच तिचा निर्णय कळणार नाही.

बरेच महिने असेच गेले. आणि ख्रिसमसच्या दरम्यान माझ्या नावाने एक पोस्टकार्ड आलं. त्यावर फक्त ‘थँक्यू फ्रॉम एला’ एवढंच लिहिलं होतं, आणि दुसऱ्या बाजूला एला, तिचा कुत्रा आणि एक उंच देखणा माणूस बॉलने खेळत आहेत असा फोटो होता.

डॉ. माधुरी ठाकुर

http://drmadhurithakur.blogspot.com/

वाङ्मयकथालेखविरंगुळा

प्रतिक्रिया

देशपांडेमामा's picture

14 May 2019 - 9:12 am | देशपांडेमामा

योग्य निर्णय घेतलाय एला ने

देश

विजुभाऊ's picture

14 May 2019 - 10:03 am | विजुभाऊ

बिल दिसायला सामान्य आहे आणि फोटो एका उंच देखण्या माणसासोबत आहे
म्हणजे एला डॅन सोबत राहू लागली.

धर्मराजमुटके's picture

14 May 2019 - 10:38 am | धर्मराजमुटके

एला ने परत एकदा चुकीचा निर्णय घेतला. असो.

श्वेता२४'s picture

14 May 2019 - 11:32 am | श्वेता२४

तिने डॅनचीच निवड केली यात शंका नाही. पण डॅनदेखील जेलमधून सुटुन आल्यावर सुधरला असेल तर? तरीही बिलसारख्या पडत्या काळात आयुष्याला स्थैर्य देणाऱ्या जबाबदार व विश्वासार्ह माणसाला सोडून एलाने शहाणपणा केला की चूक काही ठरविणे एवढ्याच माहितीवरुन चूक आहे.

साकेत आणि लेखिकेला आतून जाणीव झाली: "तुझ्या सोबत असताना मला छान वाटायचं, आयुष्य छान आहे असं वाटायचं". हे असे क्लीअर मेसेजेस डिव्हाईन असतात. चुकत नाहीत. सद्य परिस्थिती कष्टप्रद वाटली तरीही बदलू नयेत. एलानेसुद्धा आतून आलेले डिव्हाईन मेसेजेस जाणले असावेत. ... असं मला वाटतं.

माहितगार's picture

14 May 2019 - 5:06 pm | माहितगार

लेखिकेने तिचे लेखनाचे काम व्यवस्थित केले आहे.

चुकार खास करून व्यसनी अथवा गुन्हेगार व्यक्ति आयुष्यात येण्याची शक्यता हि स्वातंत्र्या समोरची सगळ्यात मोठी जोखीम असते.

डॅनचेह एलावर खरे प्रेम असेल तर तो व्यसन आणि व्यसन आणि गुन्हेगारीतून बाहेर पडेलही पण नुसताच फिरवत असेल तर ?

मला इथे दोन गोष्टी जाणवल्या एलाचा नवा पार्टनर जबाबदार दिसतो त्याला तीने डॅनबद्दल वेळीच विश्वासात घ्यायला हवे होते. खरी चांगली व्यक्ती सर्व स्थितीत सोबत रहाते. (हे माझे व्यक्तिगत मत)

एलाने डॅन आणि त्याच्या मित्रांसाठी मानसोपचाराची वेळीच व्यवस्था केली असती तर अधिक बरे झाले असते का ?

आपल्या प्रतिसादांकरिता सर्वांचेच मनापासून आभार. माझ्या बहुतेक कथांसारखीच हीसुद्धा सत्यघटनेवर आधारित कथा आहे. मी ज्यांच्याबरोबर काम करते अश्या बर्याच लोकांचं आयुष्य खरोखरीच नाट्यमय असतं . त्यांचे निर्णय नेहमी मला पटतातच असं नाही. पण माझे व्यक्तिगत preferences बाजूला ठेऊन या लोकांना 'त्यांच्या' उद्दिष्टापर्यंत पोहचायला मदत करण्याचा मी प्रयत्न करत असते.

आनन्दिनी

मराठी कथालेखक's picture

15 May 2019 - 6:53 pm | मराठी कथालेखक

छान लिहिलं आहे.. हे UK मधलं आहे का ? तुम्ही तिथे समुपदेशन करता का ? तिथले स्थानिक लोक समुपदेशनाकरिता परदेशी समुपदेशकाकडेही जातात ..? ही खरंच मोठी गोष्ट आहे कारण समुपदेशन करण्यासाठी त्या समाजाची मानसिकता , चालीरीती बर्‍यापैकी आत्मसात करावे लागते ..

एमी's picture

15 May 2019 - 8:05 pm | एमी

> तिथले स्थानिक लोक समुपदेशनाकरिता परदेशी समुपदेशकाकडेही जातात ..? ही खरंच मोठी गोष्ट आहे कारण समुपदेशन करण्यासाठी त्या समाजाची मानसिकता , चालीरीती बर्यापैकी आत्मसात करावे लागते .. > +१. हा विचार माझ्या मनातदेखील आलेला.

मराठी कथालेखक, एमी आपला प्रश्न रास्त आहे. माझ्या इथल्या वास्तव्याने आता मला त्यांचे आचार विचार बर्यापैकी समजले आहेत (मी आत्मसात केले आहेत असं मला म्हणता येणार नाही ) . तसंच वैद्यकीय आणि त्याच्याशी संबंधित सर्व क्षेत्रांमध्ये आशियाई लोकांच्या असण्याची ब्रिटिशांना आता सवय झाली आहे. पण असेही लोक असतीलच की ज्यांचा स्कॉटिश / ब्रिटिशच काउन्सेलर हवी असा आग्रह असेल. फक्त वर्णद्वेषाच्या आरोपाच्या भीतीने कोणी उघडपणे तसं म्हणणार नाही.

प्रमोद देर्देकर's picture

18 May 2019 - 2:13 am | प्रमोद देर्देकर

तुमचे लेख आवडतात . विचार करण्याचा कक्षा रुदावतात.

आपल्या विचारांच्या कक्षा रुंदावणं केव्हाही चांगलंच , आपल्या स्वतःसाठी आणि इतरांसाठीसुद्धा ! आपल्या प्रतिक्रियेकरिता मी आभारी आहे. माझा प्रयत्न चालू राहील.