तुझ्या कवितेची ओळ

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
21 Jan 2019 - 11:47 am

तुझ्या कवितेची ओळ
अवचित ओठी येते
जिंदगीच्या निवडुंगा
इवलेसे फूल येते

तुझ्या कवितेची ओळ
अवचित ओठी येते
कालियाच्या डोहातून
कृष्णधून उमटते

तुझ्या कवितेची ओळ
अवचित ओठी येते
पाखराच्या लकेरीने
हिर्वी वेल थर्थरते

कवितेची ओळ तुझ्या
पुन्हा पुन्हा ओठी येते
पुन्हा पुन्हा रुजूनिया
पुन्हा पुन्हा उगवते

मुक्त कविताकविता

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

22 Jan 2019 - 3:27 am | चांदणे संदीप

आम्ही यमकहराम...

तुझ्या कवितेची ओळ
घाली मनामध्ये घोळ
रात्रीला झोप नाही
दिवसा बट्ट्याबोळ.... असेच लिहिले असते! ;)

Sandy

टवाळ कार्टा's picture

23 Jan 2019 - 7:37 pm | टवाळ कार्टा

चुकून "छान आहे पण पीठ कमी पडलंय" असे वाचले :D

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Jan 2019 - 4:43 pm | ज्ञानोबाचे पैजार

कविता आवडली आणि त्यावर चांदणे पैलवानांचा प्रतिसाद सुद्धा... मग प्रश्ण पडला आपण काय लिवले असते?

(चुलीत घाल) तुझ्या कवितेची ओळ
पाठीला ग साबण चोळ
नाका मधे हात फिरव
काढ कानातला मळ

(चुलीत घाल)तुझ्या कवितेची ओळ
का ग करशी वेडं चाळं
उतार वयात आता
देवापुढती कुट टाळं

(चुलीत घाल)तुझ्या कवितेची ओळ
पिवळं वसईच केळ
त्याचा पाहून रुबाब
डाळींबाची सुटे लाळ

(चुलीत घाल)तुझ्या कवितेची ओळ
म्हणा वदनी कवळ
ओरपावा आमरस
फळ मधुर रसाळ

असे काहिही लिहिले असते...

पैजारबुवा,

चांदणे संदीप's picture

22 Jan 2019 - 4:59 pm | चांदणे संदीप

हा..हा..ही..ही..ही =))

पैजारबुवा म्हणजे, साक्षात, कसल्याही वस्तूला पुडीत बांधणारे वल्ली.

Sandy

अनन्त्_यात्री's picture

24 Jan 2019 - 9:45 am | अनन्त्_यात्री

पैजारबुवांची फ्याक्टरी खतरी
कच्च्या मालाची पक्की खात्री
वाग्देवीची कृपाछत्री
जोवरी अमुच्या मस्तकी :)

दमामि's picture

26 Jan 2019 - 12:49 pm | दमामि

खिखिखि

यशोधरा's picture

22 Jan 2019 - 5:02 pm | यशोधरा

तुझ्या कवितेची ओळ
अवचित ओठी येते
कालियाच्या डोहातून
कृष्णधून उमटते

सुरेख, आवडलं.

पद्मावति's picture

23 Jan 2019 - 3:56 pm | पद्मावति

कालियाच्या डोहातून
कृष्णधून उमटते

सुरेख.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Jan 2019 - 9:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर कविता !

आणि तिला वाचून मिपाशीघ्रकवींच्या काव्यस्फुर्तीला फुटलेले धुमारेही तितकेच मस्तं ! ;) :)

अनन्त्_यात्री's picture

26 Jan 2019 - 11:31 am | अनन्त्_यात्री

देणार्‍या सर्वांना धन्यवाद.

दमामि's picture

26 Jan 2019 - 12:50 pm | दमामि

कविता लई आवडली.
इडबंन करतोय माफी असावी._/\_

नाखु's picture

30 Jan 2019 - 3:18 pm | नाखु

माफी मागूनच आमची कलाकुसर
पहिला बेल बालबुद्धी करीता***

भाषणाची ओळ तुझ्या
पुन्हा पुन्हा मोठी येते
पुन्हा पुन्हा गांजुनिया
पुन्हा पुन्हा हसवते

उगळणार्या कोळश्यासाठी****

तुझ्या विद्वत्तेचा घोळ
अवचित दृष्टी येतो
जाती द्वेषाच्या डोहातून
कालियाच डोकावतो

सतत आदळणारे ब्रिगेडी विचार आणि त्यांचे मूक संमती पाठीराखे***

तुमच्या निस्पृहतेची ओळख
अवचित पुढे येते
पाखंडीच्या गलोलीने
मूर्ती (पुतळा) जागीच थर्थरते

कडवा सैनिक आणि त्याचेच कल्याण***
ज्याच्या प्रतिभेची झळ
अनुयायी ओठी येते
तर्क शून्यता हिरीरीने
आम्रतरुपोटी कडुनिंब प्रसवते

वाचकांची पत्रेवाला नाखु