मोहाचा विळखा भाग १/३

असहकार's picture
असहकार in जनातलं, मनातलं
16 Jan 2019 - 1:34 pm

जगात सातशे कोटीच्या वर लोकसंख्या गेली आहे. २०० देश आहेत. २०० देशात शेकडो कायदेही आहेत.
पण सातशेकोटीतली सर्व माणसे इथून तिथून मात्र सर्वत्र सारखीच आहेत असे वाटावे अशा घटना कायम
घडत असतात. मोहाचा विळखा घालणार्‍या पॉन्झी स्किम्स ह्या देखील त्यातल्याच एक.

पॉन्झी स्किम्स व तिच्या देशोदेशीच्या अवतारांबद्दल सांगण्याआधी एक सांगावं वाटतं. ते वाचकांनी पक्कं
डोक्यात कोरुन ठेवावं. कदाचित वेडेपणा वाटेल, हे काय लिहिलंय असे वाटेल. पण नीट वाचा.

फसवणार्‍यांपेक्षा फसले जाणारे जास्त मोठे गुन्हेगार असतात.

; बघा वाटलं ना आश्चर्य? तुम्हाला कधी
कोणी फसवलं असेल तर थोडासा रागही आला असेल. नक्कीच हे म्हणणं राग येण्यासारखंच आहे. पण
जरा विचार करुन बघा. चोरी करणारे, दरवडा घालणारे तुमच्या नकळत किंवा तुम्हाला शस्त्रांचा धाक
दाखवून तुमची संपत्ती, पैसा, दागिने पळवतात. म्हणजे बळजबरीच झाली ना? पण फसवणूकीच्या
स्किम्समध्ये स्वतः फसवले जाणारे बळजबरीने स्वतःच आपले पैसे चोराच्या हातात स्वखुशीने देत
असतात. आणि जेव्हा फसगत उघडकीस येते. तेव्हा केवळ एक वाक्य म्हणून स्वतःची समजूत काढतात
ते म्हणजे," आम्हाला काय माहित होतं, असे असेल म्हणून, आम्ही आपला भाबडा विश्वास ठेवला." हाच तो
गुन्हा. आपल्या स्वार्थाला, मोहाला भाबड्या विश्वासाचं नाव देणे ही स्वतःचीच परत एकदा फसगत आहे.

चार्ल्स पॉन्झी नावाच्या इसमाने सन १९२० मध्ये अमेरिकेत पहिल्यांदा या पद्धतीचा वापर करुन
गुंतवणूकदारांना गंडा घातला. त्याच्या या पद्धतीचा व या गुन्ह्याचा इतका गवगवा झाला की या
प्रकारच्या घोटाळ्यांना पॉन्झी स्किम्स म्हटले जाऊ लागले. याचाच दुसरा अर्थ असा की ही पद्धत
पहिल्याच फटक्यात उघडकीस आल्यावरही गेल्या शंभर वर्षात हजारोंनी हीच पद्धात वापरून करोडो
लोकांना गंडवले व अब्जावधी रुपये लुबाडलेले आहेत. याचा स्पष्ट अर्थ असा की पॉन्झी स्किम कशी
असते काय असते, काय काळजी घ्यायला हवी याचा शंभर वर्षात एवढा प्रचार होऊनही कित्येक लोक याचे
बळी पडत आले आहेत. तुम्ही हे वाचत असतांनाही जगात कोणीतरी नव्यानेच ही स्किम सुरु करत
असेल. कुठेतरी ही मध्यावर आलेली असेल. कुणीतरी बदमाश गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन पलायनाच्या
बेतात असेल, आणि अगदी आता आताच जगाच्या पाठीवर कुठेतरी स्किममध्ये पैसे गुंतवलेल्या लोकांचा
पैसे बुडाल्यामुळे आक्रोश होत असेल.

तर आधी समजून घेऊया पॉन्झी स्किम म्हणजे काय? फार साधी, समजायला सोपी आहे. बदमाष लोक हे
रितसर नोंदणीकॄत कंपनी स्थापन करतात. ह्या कंपनीच्या स्थापनेत काहीही बेकायदेशीर नसते. मग ते
इन्वेस्टमेंट च्या नावाखाली चांगले रिटर्न्स देण्याची जाहिरात करु लागतात. पहिले अगदी पाच ते दहा जण
ह्या भुलाव्याला भुलतात. कारण यांची जाहिरात म्हणत असते,

तुमच्या एक लाखाचे दोन लाख मिळवा
केवळ एक महिन्यात

;

१०० टक्के नफा मिळवा केवळ दोन महिन्यात

; अशा अतिशय अवास्तव घोषणा
ह्यांच्या कंपनीमार्फत होतात. तर हे पहिले दहा जण आपली रक्कम गुंतवतात. पहिल्याच महिन्यात कबूल
केल्याप्रमाणे ह्या गुंतवणूकदारांना परतावा म्हणजे प्रॉफिट मिळालेला असतो. म्हणजे कंपनीने आपले वचन
पाळलेले असते. हर्षोल्लासात हे गुंतवणूकदार आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आपल्या कमाइबद्दल
सांगतात, पैसे मिळालेले दिसल्यामुळे लोकांचा विश्वास बसतो आणि कंपनीकडे गुंतवणूकीचा ओघ सुरु
होतो. दुसर्‍या फळीतल्या लोकांनाही नफा बोलल्याप्रमाणे मिळतो. ते आणखी लोकांना खेचून आणतात.
अशा तर्हेने शेकडो लोक आपल्या कष्टाची कमाई ह्या मोहाच्या विळख्यात अडकवत जाते.

कंपनी नेमकं करते तरी काय? कंपनी काहीच करत नाही. सुरुवातीला आलेल्या गुंतवणूकीतूनच लोकांना
नफा वाटते. मग जो पहिला आलेला असतो त्याला दुसर्‍या फळीतल्या गुंतवणूकदारांचा पैसा नफा म्हणून
दिला जातो. अशा तर्‍हेने कंपनी कोणताही व्यवसाय, उत्पादन, विक्री न करता नंतरच्या गुंतवणूकदारांकडून
घेऊन आधीच्या गुंतवणूकदारांना पैसे वाटते. दहाचे शंभर, शंभराचे हजार, हजाराचे दहा हजार, कधी कधी
अगदी पन्नास हजार ते दहा लाख लोक अशा स्किम्समध्ये पैसे गुंतवतात. आणि आता जादूचे प्रयोग
संपण्याचे वेळ येते. पुरेसा पैसा गोळा व्हायला लागला की कंपनीचालक परतावा, नफा द्यायला टाळाटाळ
करु लागतो. तो गुंतवणूकदारांना आणखी चांगल्या व्याजदराचे आमीष दाखवत तोच पैसा परत गुंतवायला
लावतो. आपला पैसा कागदोपत्रीच वाढतांना पाहून लोक खुष होतात, पण तो पैसा फक्त कागदावर असतो.
थोड्याच दिवसात बातमी येते की सर्व पैसा गोळा करुन कंपनीमालक फरार झालेले आहेत. विदेशात
निघून गेले आहेत. त्यांचा तपास लागणे अशक्य होते. त्यांचा तपास लागला तरी पोलिसयंत्रणा,
न्यायव्यवस्था गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याबद्दल फारसे काहीच करु शकत नाही. ९९ टक्के केसेस
मध्ये कोणालाही एक रुपयाही परत मिळत नाही. कारण पैशाचा काहीही ट्रेस लागत नाही. मुळात अशा
फसवणूकीच्या स्किम्सविरोधात पोलिसयंत्रणा काम करण्यात हतबल असते. लोकांनी इतकी जनजागृती
केली असूनही स्वतःच मूर्खपणा करुन गुंतवणूक केलेली असते. अशा मूर्खपणा करणारास पोलिस-
न्यायव्यवस्थेने का म्हणून सहाय्य करावे? गुंतवणूकीची सुरक्षा हवी असेल तर आधीच न्याययंत्रणेकडून
खातरजमा करुन घेऊन गुंतवणूक करावी. नंतर पश्चातापाशिवाय काहीच हाती लागत नाही.

समाजअर्थकारणलेख

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

16 Jan 2019 - 1:50 pm | विजुभाऊ

आर के नारायणची " द फायनाशियल एक्स्पर्ट " ही कादंबरी यावरच आधारीत आहे

काही वर्षांपूर्वी मुंबईत घडलेले शेरेगर प्रकरण हे चांगले उदाहरण आहे.

सुधीर कांदळकर's picture

17 Jan 2019 - 7:42 pm | सुधीर कांदळकर

मोअर, नॉट अ पेनी लेस ही कादंबरी पण अश्शीच भन्नाट आहे. ले. माजी ब्रिटीश मंत्री डेव्हीड आर्चर.

अथांग आकाश's picture

17 Jan 2019 - 8:15 pm | अथांग आकाश

झटपट श्रीमंत होण्याची इच्छा जो पर्यंत माणसाच्या स्वभावात राहिल तो पर्यंत अशा स्कीम्स चालूच राहतील!
आश्चर्य या गोष्टीचं वाटतं कि परत परत माणूस अशा स्कीम्सला बळी कसा पडतो?
money

नगरीनिरंजन's picture

18 Jan 2019 - 2:20 pm | नगरीनिरंजन

इंडस्ट्रियल सिव्हिलायझेशन हीसुद्धा एक पॉन्झी स्कीम आहे; पण तिचा फटका काही पिढ्यांनंतर बसणार असल्याने सगळे मजेत आहेत.

स्वधर्म's picture

18 Jan 2019 - 6:06 pm | स्वधर्म

नुकतेच WM Kotke या लेखकाचे फायनल एंम्पायर हे पुस्तक वाचले. यात इंडस्ट्रियल सिव्हिलायझेशन चा अगदी नागडं उघडं करून समाचार घेतलेला अाहे. बर्याच लोकांना अात्ता जे अापले हिरो वाटतात, ते कसे वाट चुकलेले प्रवासी अाहेत, हे समजल्यावर धक्का बसतो. उदा. सध्याचे सर्व विकासपुरूष राजकारणी, मोठे उद्योजक, मोठे शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ इ. लोक जो विकास करण्याच्या मागे अाहेत, तो संपूर्णपणे कसा विनाशकारीच होता, हे विदारक सत्य समोर येतं. माणसानं अापल्या चड्डीत राहून मातीसोबत जगलं पाहिजे, नाही तर कधी हाल हाल होउन मानवजात मरेल, हे सांगता यायचे नाही, हे सत्य दिलीप कुलकर्णी पासून हरारीपर्यंत सगळे सांगत अाहेत, पण लक्षात कोण घेतो?