माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं

Primary tabs

जागु's picture
जागु in जनातलं, मनातलं
8 Jan 2019 - 4:37 pm

मळ्याच्या मळ्यामंदी पाटाच पाणी जातं,
गुलाब, जाई, जुई, मोगरा फुलवीतं.

माझ्या माहेरच्या पूर्ण वाडीत हे पाटाच पाणी पूर्वी झरझर वाहायचं आणि फक्त जाई जुईलाच नाही तर भाज्या, माड, सुपारी, चिकू अशा सगळ्याच झाडांभोवती पिंगा घालायचं. ह्या पिंग्यात पिंगा धरायला मला खूप आवडायचं.

वाडीत मध्यवर्ती ठिकाणी आमची विहीर होती. त्या विहिरीला पंप लावून तो हौदेत सोडलेला होता व त्या हौदातून सुरू होणारे पाट वाडीच्या काना कोपर्‍यात पोहोचलेले होते. पावसाळ्यात पाटाच्या पाण्याची गरज नसल्याने हे पाट पावसाळ्यात अक्राळ विक्राळ रूप धारण करून मध्येच कुठे कडेची माती निघून फुटलेले, दगडच कुठे आडवा पडलेला, कचरा जमून बंद झालेला, कुठे मोठा खड्डाच पडलेला तर कुठे वेडा वाकडा झालेला अस रूप झालेलं असायचं. पाऊस गेला की ह्या पाटांना लयबद्ध पाणी वाहण्यासाठी एकसंघ रूप देण्यासाठी वळण लावण्याच काम सुरू व्हायचं. गडी कुदळी व फावडे घेऊन हे पाट व्यवस्थित करायचे. नवीन पाट भुसभुशीत काळ्या मातीला कडेने रचल्याने देखणे दिसायचे. चार दिशेला चार मुख्य पाट व त्याला लागून केलेले झाडांपर्यंत पोहोचणारे त्यांना लागुनचे उप-पाट असायचे. माड, सुपारी भोवती केलेल्या पाटांच्या गोल आळ्यांमुळे त्या झाडांचे सौंदर्य अधिक खुलून दिसायचे. तांदुळाची शेती कापून झाल्यावर त्या शेतात मळा लावला जात असे तसेच काही भाट्या म्हणजे शेताच्या वरची सपाट जागा त्यावरही भाजी लावली जात असे व ही भाजी अख्ख्या शेतात किंवा भाटीवर लांब आडवे वा उभे पाट करून केले जात. मोठ्या शेतांमध्ये एक मधला सरळ पाट व त्याच्या दोन्ही बाजूला जोडून छोटे पाट करून त्यात भेंडी, टोमॅटो, मिरची, वांगी, अलकोल, कोबी, फ्लावर, गवार व इतर अनेक भाज्या लावल्या जात. पालेभाजीसाठी वाफे असत व ह्या वाफ्यांना जोडून पाट खणलेले असत. एका लाईनमध्ये पद्धतशील भाजी लावलेले पाट सजावट केल्यासारखे सुंदर दिसायचे.

पंप चालू केला की पंपाच्या पाइप मधून धबाधबा पाणी हौदात उतरायचं आणि शाळा सुटलेली मुले जशी आनंदात कधी एकदा घरी जातो ह्या आवेशात धावत सुटतात तसे ते पाणी हौदातून पाटात धूम ठोकून धावत सुटायचं. मग ह्या वाहत सुटलेल्या पाण्याला गरजेच्या आळीत किंवा मळ्यांत शिंपण करण्यासाठी एक माणूस लागत असे. पाटात पाण्याला कधी कधी काड्या, पाल्यांचा अडथळा यायचा म्हणून एकतर आधीच पाट झाडून घ्यायचे किंवा पाणी सोडल्यावर अडकलेला पाला हाताने बाजूला सारायचा. हे काम गडी नसेल तर वडील करायचे आणि मी पण करायचे. माझं खूप आवडत काम होत कारण पाटात खेळणं, गार पाण्याच्या सहवासात राहणं, त्या पाण्याचा मंद लयातील स्वर ऐकणं, पाटातील माती पायामुळे किंवा हाताने ओढल्याने पाणी मातीचे गढूळ पण स्वच्छ उबदार मऊपणा हे सगळं खूप आवडायचं मला. खरंतर आमच्या उरणमध्ये ह्या पाटांना दांड म्हणतात. एका भागातील दांडाला पाणी सोडलं की इतर दांड दगड-मातीने बांधून टाकायचे म्हणजे ज्या झाडांच्या किंवा भाज्यांच्या पाटात पाणी घालून झालं आहे ते माती लावून बंद करून टाकायचे.

पाण्याचे पाट झुळझुळ आवाजाच्या नादात बेभानपणे गोल आळ्यांना मिठी मारायचे. ह्या पाटातल पाणी धावत असताना देवदार च्या झाडासारखी नक्षी तयार व्हायची. खालच्या स्वच्छ तळामुळे ती नक्षी खुपच सुबक दिसायची. मध्ये एकादा दगड किंवा काठी उभी राहीली पाटात की नक्षीचा आकार बदलायचा आकार बदलायचा आणि हलकेच तुषार उडायचे. ह्या पाटात दंगा मस्ती करत भिजायचाही मोह कधी कधी माझ्याने आवरला जायचा नाही. मग काय उड्या मारून कारंजासारखे फवारे मारून घ्यायचे स्वतःच्याच अंगावर आणि मनमुराद भिजायच. उन्हाळ्यात पाणी जरा जिरत जिरत येताना सुरुवातीला खळखळाट मंदावायचा पण एकदा का पाटात पाणी जिरलं की पुन्हा ह्याचा खळखळणं चालू. जिरलेल्या पाटाचे पाणी इतकं स्वच्छ दिसे की प्यावस वाटे. वाहून वाहून पाटातील माती रेतीसारखी मऊ होत. ह्या पटांमध्ये खेळण्यात गारेगार अस माझं बालपण गेलं. ह्याच पाटांमध्ये मी कधी कागदाच्या तर कधी पानांच्या बोटी सोडून शर्यत लावायचे. पाटाला लागून जी ओली माती असे त्या चिकट मातीची खेळणी बनवायचे. खेळताना पाटातलं स्वच्छ पाणी आपल्या भांड्यात घ्यावं म्हणून पानाचे द्रोण करून वरूनच हलक्या हाताने त्या द्रोणात पाणी आणायचं आणि भातुकलीचा खेळ रंगवायचा. अनेक फुलझाडांच्या फांद्याही मी ह्या पाटाला लागून रुजवल्या आहेत. पाटात पाणी सोडलं की पक्षीही त्यात अंघोळ करायला यायचे. पंख फडफडवत तेही पाण्यात खेळायचे हे पाहणे एक कौतुक सोहळाच असे. ह्या पाटांमुळे अनेक झाडे फुलली फळली, धान्य, भाज्यांचा सुकाळ झाला, अनेक जीव, पक्षी प्राणी ह्या पाटांमुळे तरारले. हे पाट म्हणजे वाडीला हिरवीगार ठेवणारी, समृद्ध ठेवणारी संजीवनीच होती.

हा लेख दिनांक ३०/१२/२०१८ रोजी महाराष्ट्र दिनमान या दैनिकात प्रकाशीत झालेला आहे.

शेतीलेख

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

8 Jan 2019 - 4:53 pm | प्रमोद देर्देकर

हे सगळं आम्ही आमच्या गावाला (गुहागर ता. ) येथे गेलो की अजूनही चुलत भावाला मदत करवी म्हणून अजूनही करतो.
फक्त तिकडे सुपारीच्या बागा आणि एखादा माड आहे. घराजवळ जो हौद आहे तो 24 तास भरून वहात असतो त्या पाण्यानं मात्र पुढे फुलझाडं , आणि कधी लावली असेली तर भाज्यांचे वाफे फुलतात.

सुबोध खरे's picture

8 Jan 2019 - 8:29 pm | सुबोध खरे

लहानपणी आमच्या आजोळी आईच्या माहेरी ( नागांव- अलिबाग) येथे घरामागे विहीर आणि आमची वाडी होती. दर वर्षी आम्ही आणि आमच्या दोन मावश्या आणि दोन मामा उन्हाळ्याच्या सुटीत दोन महिने नागवला जात असू.
तेथे मागीलदारी बैलाचा रहाट होता त्याला डोळ्यावर झापड बांधलेला बैल गोल गोल फिरत रहाट ओढत. त्यावर असलेली मातीची मडकी भरून वर येत आणि पन्हळीने पाणी हौदात पडत असे. या हौदात डुंबणे हा एक आवडता उद्योग असे.या हौदातून पाणी सिमेंटचा मुख्य पाट होता त्याने पुढे जात असे आणि त्याला असंख्य फाटे होते ते मातीचेच होते. हे "शिपणं"( हाच शब्द वापरला जातो "शिंपणं" नाही) चालू असताना.एक आळी पाण्याने भरली भाताच्या पेंढीचा केलेला विटेच्या आकाराचा बांध इकडचा तिकडे करायचा कि पाणी त्या आळीत जात असे. हे काम घरच्या गड्याचे (किसन) असे पण आम्ही नातवंडे मोठ्या उत्साहाने करत असू. अशीच मोठी वाडी रेवदंड्याला आमच्या मावशीची होती.पण तिच्याकडे विजेचा पंप होता आणि सिमेंटचे पाट होते पण शेवटच्या आळ्या मातीच्या होत्या.
मी दहावीत असताना आमची आजी गेली मग ते नागावचं घर ओस पडलं (मामा मुंबईत आहेत) आणि आम्ही पण शिक्षण नोकरी संसाराच्या गाड्याला जुंपलो.
आता त्या बैलासारखं डोळ्यापुढे झापड बांधून रहाट ओढतो आहोत असंच वाटायला लागलं आहे.
आज तुम्ही आमचं लहानपण परत डोळ्यापुढे जिवंतपणाने उभं केलंत.
धन्यवाद

नेत्रेश's picture

9 Jan 2019 - 12:40 pm | नेत्रेश

"आता त्या बैलासारखं डोळ्यापुढे झापड बांधून रहाट ओढतो आहोत असंच वाटायला लागलं आहे."
हा, हा, अगदी मनात हेच आले होत.

जागु,
लेख आवडला, गावाकडच्या आठवणी जाग्या झाल्या.

टर्मीनेटर's picture

9 Jan 2019 - 12:59 pm | टर्मीनेटर

छान लेख.
एक शंका : अलकोल म्हणजे नवलकोल का?

जागु's picture

9 Jan 2019 - 2:39 pm | जागु

हो नवअलकोलच.

जागु's picture

9 Jan 2019 - 2:39 pm | जागु

हो नवअलकोलच.

अर्धवटराव's picture

9 Jan 2019 - 9:07 pm | अर्धवटराव

सुंदरच मांडलाय पाट.
आम्हाला फार काहि उपभोगायला मिळालं नाहि हे. नाहि म्हणायला आजोळी छोटीशी बाग होती, गावात नदी होती. पण त्याचं फार सुख नाहि भोगता आलं.

राजेंद्र मेहेंदळे's picture

10 Jan 2019 - 4:36 pm | राजेंद्र मेहेंदळे

कोकणात कुठेतरी माझे गाव आहे, पण तिथे कधीच कोणी राहिले नाही त्यांमुळे जायचा प्रश्नच नाही आला. पण कधी विहिरीवरची मोट, कधी मळ्यातला फेरफटका ,गाईगुरे घरी परतत असताना गळ्यातीला वाजणार्‍या घंटा, बैलगाडीचा खडखडाट, शेणामातीचा आणि वाळलेल्या गवताचा वास आला की मन त्या आठवणीत रंगुन जाते.

वीणा३'s picture

11 Jan 2019 - 3:13 am | वीणा३

मस्त मस्त लेख आणि फोटो!!! लहानपण आठवलं एकदम.

प्रमोद दर्देकर, सुबोध खरे, नेत्रेश, टर्मिनेटर, अर्धवटराव, राजेंद्र मेहेंदळे, विणा धन्यवाद. तुमचे अनुभव आणि प्रतिक्रिया दोन्ही सुंदर.