फेस्टिव्हल डायरीज..!! - कथा : १२

Primary tabs

रा.म.पाटील's picture
रा.म.पाटील in जनातलं, मनातलं
6 Jan 2019 - 10:55 am

फेस्टिव्हल डायरीज..!! : कथा - १२
( Decorate Your Love )
नववर्ष.. प्रेमाचा निरोप..

३१ डिसेंबर.. आजचा दिवस.. सारे जग आज एकवटणार.. नववर्षाच्या स्वागतासाठी.. गतवर्षाला निरोप देऊन..

तोही आज निरोपच देत होता.. तिला.. त्याच्या एकतर्फी प्रेमाला..

सारे जग आज गतवर्षातील कटू आठवणी विसरून नव्या आठवणीसाठी सज्ज होत होते..

पण त्याच्यासाठी तिच्या गतवर्षातील आठवणी ह्या गोड होत्या.. त्या तो कधीच विसरू शकत नव्हता..

पण आजचा दिवस मात्र गोड नव्हता.. कारण आज ती ऑफिस सोडून चालली होती..

ऑफिस सुटल्यावर दुसरीकडे तरी गाठभेट होईलच ह्या आशेवर तो असतानाच त्याला कळले की ती हे शहरच सोडून जाणार होती..

तिला भेटायला आपण सात समुद्रापार जाऊ असा विचार तो करत असतानाच तिने जाहीर केले की तिचे लग्न ठरले आहे म्हणून ती ऑफिस सोडत आहे आणि लग्नानंतर दुसऱ्या शहरात जाणार आहे..

आता त्याच्या सगळ्या आशा संपल्या..

निदान आज रात्री ऑफिसच्या ३१ डिसेंबर च्या पार्टीला तरी येशील ना असे कोणीतरी विचारले असता.. तिने आज तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर बाहेर जाणार आहे असे सांगितले.. म्हणजे आता हीच शेवटची भेट..

असे म्हणतात नवीन वर्षाच्या सुरुवातीला काहीतरी भेट मिळते, ती अशी भेट देईल असे त्याला वाटले नव्हते..

संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर तो काहीसा अनिच्छेने रूमवर आला, त्याचे रूममेट्स छान रात्रीच्या पार्टीच्या मूडमध्ये होते.. पण ह्याचा पडलेला चेहरा पाहून त्यांनी त्याला विचारले.. आणि त्याने मागचे वर्ष त्यांच्या समोर मांडायला सुरुवात केली..

१ जानेवारी.. तिने ऑफिस जॉईन केल्याची तारीख.. तिला पहिल्यांदा पाहिले तर तो पाहतच राहिला.. तिच्या चेहऱ्यावरून त्याची नजरच हटत नव्हती..

जर तुमची नजर चेहऱ्यावरून खाली सरकली तर समजायचे ते प्रेम नाही तर तिथे वासनाही शिरू पाहत आहे.. पण त्याची नजर तिच्या चेहऱ्यावरच स्थिर होती..

ती त्याला ज्युनिअर म्हणून जॉईन झाली होती.. अजून अवकाश होता त्याला तिला समजून घ्यायला..

तसाही एकतर्फी प्रेमाचा अनुभव त्याच्यासाठी वाईटच होता, कारण शाळेत असताना त्याने मित्रांच्या दबावाखाली एक मुलीला प्रेमासाठी प्रोपोज केले होते.. पण तिने त्या क्षणी त्याच्या कानाखाली वाजवलीच आणि गोष्ट घरापर्यंत आणून तिच्या भावाचा आणि वरून त्याच्या वडिलांचा मार बसवला तो वेगळाच..

त्याक्षणी त्याने ठरविले की मुलीने हिरवा कंदील दाखवला तरच तिला प्रेमाच्या गाडीवर बसवायचे.. आणि अशी संधी कॉलेज मध्ये त्याला मिळालीही.. तिने हिरवा कंदील दिलाही होता.. तोही गाडी घेऊन तयार होता.. पण तिच्यापर्यंत पोहचेपर्यंत तो कंदिल कधी लाल झाला त्याला कळलेच नाही.. तिचे कारण त्याला तिच्या मैत्रिणीकडून कळले की ती वडिलांच्या मृत्यूनंतर आईबरोबर मामाकडे राहत होती, आणि तिच्या मामाच्या मुलाशीच तिचे लग्न होणार होते.. आणि तिलाही आईकडे पाहून नाही म्हणता येत नव्हते.. त्याला तर खरे ह्या समाजव्यवस्थेचा राग आला होता.. पण विरोध करायचा तरी कसा कारण तिच्या मनात काय आहे हे त्याला कळलेच नव्हते.. आतापर्यंत सारा संवाद नजरेतूनच झाला होता..

ह्यावेळी तो मात्र ती रिस्क घेणार नव्हता, त्याने तिच्या मुलाखतीत तिच्या सर्व कुटुंबाची माहिती आधीच घेतली होती.. तिचे आई वडील गावाकडे राहत होते, एक भाऊ नोकरीसाठी बाहेर होता, आणि इथे शहरात ती मामाकडे राहत होती..

शेवटी तिच्या लग्नाचा निर्णय तिच्या वडिलांच्या हातात होता.. त्याला व्यवस्थित नोकरी होती, शहरात त्याचा फ्लॅट होता आणि लग्नासाठी लागणाऱ्या इतर गोष्टीही जुळत होत्या.. आता प्रश्न फक्त तिच्या आवडीचा होता..

तो वेळ घेत होता, जसजसा तिचा स्वभाव त्याला कळू लागला.. तसतशी ती त्याला जास्त आवडू लागली होती, पण तिच्या मनात काय आहे हे कसे कळणार..

तीही त्याच्याशी अदबीने बोलायची, वागायची.. पण तिचा आदर त्याच्यावरच्या प्रेमापोटी आहे की तो तिला सिनियर असल्यामुळे हे मात्र त्याला कळत नव्हते... आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांशी तिच्याबद्दल त्याला योग्य वाटत नव्हते कारण मागचा अनुभव..

जेव्हा त्याने शाळेत त्या मुलीला प्रोपोज केले होते.. त्या गोष्टीवरून शाळेत होणाऱ्या चर्चानी तिने पुढच्या वर्षी शाळाच बदलली होती..

आता जर ऑफिसमध्ये तिलाही असाच त्रास होईल ह्या भीतीने तो तिच्याविषयी कोणाजवळ जास्त बोलत नव्हता..
पण ह्या गोष्टीमुळे त्या दोघांमध्ये कामाव्यतरिक्त दुसरा संवाद होत नव्हता..

ह्यासाठी ऑफिसच्या वातावरणातून बाहेर दोघांचे भेटणे अपेक्षित होते..

बऱ्याचदा ग्रुपमध्ये तिच्याबरोबर हॉटेलिंग, मुव्हीज चे योग आलेही पण तिथेही ती तेवढेच आदराने बोलायची.. आणि सगळ्या सिनियरशी.. पण ज्युनिअरशी मात्र एकदम मित्रासारखी वागायची.. ते पाहून त्याला वाटत होते मी उगाच हीचा सिनियर झालो..

बघता बघता वर्ष संपले आणि आजचा दिवस उजाडला..

आपला भूतकाळ मांडताना तो कधी रूममेट्स बरोबर ३१ डिसेंबरच्या जल्लोष पार्टीत पोहचला त्याचे त्यालाच कळले नाही.. चला निदान ऑफिसच्या पार्टीत जाणे टाळले म्हणून ऑफिसमधील चेहरे दिसणार नाहीत.. आणि राहून राहून तिची आठवण आली असती ती वेगळीच.. पण इथेही तिची आठवण त्याला येत होतीच..

खरंतर त्याला ती त्याच्यासाठी एकदम अनुरुप अशी लाईफ पार्टनर वाटत होती.. पण त्यांचा त्या विषयावर संवाद कधी होऊच शकला नाही..

आणि आता करणे चुकीचे ठरेल कारण तिचा लग्नाचा निर्णय झाला आहे..

तो तिच्या आठवणीत शांतपणे एका बाजूस त्या सर्व कर्कश आवाजापासून दूरवर तिच्या आठवणीत खुर्चीवर बसून राहिला होता..

'तुम्ही पण सिंगल आहात म्हणायचे..?', त्याने त्या आवाजाच्या दिशेने वळून पाहिले.. तिथे ती होती जिला तो आठवत होता..

'तू..?' त्याच्या आवाजात आश्चर्य आणि कुतूहल दोन्ही होते..

ती - 'हो त्यांच्याबरोबर आली आहे इथे.. ते एक कॉल आला आहे म्हणून बाहेर गेलेत..'

तो- 'पण तुला एकटीला सोडून..'

ती - ' असे काही नाही..'

तो - ' एक विचारू का..?'

ती- ' विचारा ना..!'

तो- ' असा अचानक लग्नाचा निर्णय..?'

ती- 'अचानक असा नाही.. पण त्याने घरी विचारले आणि पसंती झाली आणि लग्न ठरले..'

तो- 'तुला पसंत आहे की घरच्यांना पसंत आहे..'

ती- 'घरी पण पसंत आहेच आणि मलाही..'

तो- 'पण तू एवढी शिकलेली मुलगी आणि अरेंज मॅरेज ह्याचे मला विशेष वाटतंय..'

ती- 'का? शिकलेल्या मुलींनी प्रेमविवाह केलाच पाहिजे असे काही नाही..'

तो- 'नाही पण खरा माणूस सहवासातून कळतो ना.. माणूस असा दोन तीन भेटीत कसा कळेल..'

ती- 'नाही कळत मान्य आहे, पण अरेंज मॅरेज करताना दुसरा पर्यायही नसतो ना..'

तो- 'तरीपण सुरुवातीला कोणीही चांगलेच वागतो ना..'

ती त्याला मध्येच थांबवत - ' पण प्रेम करतानाही माणूस खरा वागतो कशावरून..'

तो - ' पण काही वेळ एकत्र घालवल्यावर एकमेकांचा अंदाज येतोच ना..'

ती- 'मग तुम्ही सांगा, तुम्ही मला किती ओळखले आहे ते..?'

तिच्या ह्या प्रश्नावर तो थोडा हडबडला पण नंतर स्वतःला सावरत- ' तू एक चांगली मुलगी आहेस, एक माणूस म्हणून उत्तम आहेस..'

ती- ' हे मी जगाला जे दाखवत आले आहे त्यावरून तुम्ही म्हणताय..'

तो- ' मग तुला काय म्हणायचंय..'

ती- ' प्रत्येक व्यक्तीच्या अनेक बाजू असतात.. पण आपल्या प्रत्येक व्यक्तीशी आपण फक्त त्याच्या सोयीच्या बाजूने व्यक्त होतो..'

तो- ' म्हणजे तुझी वेगळी बाजूपण आहे म्हणायचं..'

ती- 'हो का नाही आता ऑफिसमधील प्रत्येक व्यक्तीशी मी प्रेयसी म्हणून पण वागू शकत नाही.. आणि..'

तो- ' आणि..?'

ती- ' प्रेमात लग्नाआधी कोणाचा बायको किंवा नवरा म्हणून कसा स्वभाव असेल ते कळते..?, स्वभावाचे काही रंग लग्नानंतरच कळतात..'

तो- ' तेही अंशतः खरं.. पण निदान पूर्ण अनोळखी माणसापेक्षा निदान थोडा ओळखीचा बरा नाही का..?'

ती- ' पण ह्या समाजात एखाद्या चांगल्या घरातील मुलीने प्रेमविवाह करणे म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे..'

तो- 'असे का म्हणतेस..?'

ती- ' कारण ह्या समाजाने प्रेमाला एवढे बदनाम केले आहे ना की प्रेम म्हणजे पाप असाच समज आहे लोकांचा अजून.. आणि हा समज आजकालच्या चुकीच्या दिशेने भरकटत जाणाऱ्या प्रेमामुळे अजून बळकट होत आहे.. आणि ह्या सर्वांच्या मध्ये एखाद्या निरागस प्रेमाचा बळी पडत आहे..'

तो- ' काय ग, तूझे विचारही छान आहेत आणि एवढी सुंदर आहेस तुला प्रोपोज केले असेल की कोणीतरी..'

ती थोडसं थांबत- 'हो मी शाळेत असताना.. पण मी त्याला त्यावेळी कानाखाली वाजवली होती..'

त्याला त्यावेळी स्वतःला कानाखाली बसलेली आठवली, पण लगेच स्वतःला सावरत त्याने विचारले - 'का..?, त्याचे प्रेम व्यक्त करणे पण चुकीचे होते का..?'

ती- 'नाही पण त्याला कानाखाली मारण्याचा निर्णय मी सामाजिक दबावामुळे घेतला..'

तो- 'म्हणजे..?'

ती- ' मला त्याला मारायचे नव्हते, तो नक्कीच चांगला मुलगा होता.. पण जर मी त्याला हो म्हटले असते तर कदाचित समाजाने मला वाईट मुलगी ठरविले असते..'

तो- 'पण तु त्याला समजावून सांगू शकत होतीस..?'

ती- 'समजावून सांगितले तर ऐकेल असे ते वय नव्हते आणि मी काहीच न करता निघून गेले असते तर समाजाने तर्क वितर्क लावले असते ते वेगळेच..'

तो- 'पण तुझ्या अश्या मारण्याने त्या मुलाची प्रेमभावना एकतर विखारी बनून जाऊ शकते किंवा करपून जाऊ शकतो.. म्हणजे तो पुन्हा प्रेम व्यक्त करताना घाबरू शकतो..'

ती- 'खरंतर ते वयच तसे असते.. पण त्यावेळी मी त्याला मारले कारण निदान हा विषय तिथेच संपेल असे मला वाटले, पण तो दोघांच्याही घरापर्यंत ह्या समाजाने पोहोचवलाच..'

म्हणजे त्याला ज्यावेळी त्या मुलीने मारले त्यावेळी तिच्या किंवा माझ्या घरी तिने सांगितले नसेल.. म्हणजे गैरसमज असेच तयार होतात.. आणि तो इतकी वर्ष त्या मुलीला चुकीचे समजत होता..

तो- 'मग तू ह्या अशा समाजाचा विचार करून आता अरेंज मॅरेज करते आहेस का..?'

ती- ' समाजाचे काय तुम्ही काहीही केले तरी तो नावे ठेवणारच आहे, शेवटी तुमचा आनंद महत्वाचा आहे, समाज कधीच आनंदी होणार नाही.. आणि मला हा मुलगा खरंच आवडला आहे म्हणून मी लग्न करते आहे.. कदाचित जर मी कोणाच्या प्रेमात पडले असते आणि तो माझ्या प्रेमात वाहवत जाऊन अयशस्वी झाला असता तर..'

तो- 'तशा जर तरच्या शक्यता भरपूर आहेत कदाचित तुझ्या पाठिंब्यामुळे तो कदाचित आणखी उंची गाठू शकला असता..'

ती- 'तेही खरं.. कसे आहे प्रेम हे वाईट नाही आहे, फक्त आपण ते कोणत्या दिशेने नेतो ते महत्वाचे.. मग तुम्हाला प्रेमात नकार मिळाला असला तरी.. त्यात तुम्ही स्वतःला संपवताय की सावरताय..'

तो आतल्या आत खुश होत होता कारण त्याने प्रेमाचे एक नाहीतर दोन नकार पचविले होते..

पण तरीही तो प्रेमाच्या बाबतीत कमनशिबी होता ही खंत होतीच त्याला..

तो - 'पण तरी हा प्रश्न आहेच की प्रेमभावना व्यक्त करणे हे चुकीचे आहे का..?'

ती - ' चुकीचे मुळीच नाही, पण प्रेमभावना बोलून व्यक्त होण्यापेक्षा कृतीतून व्यक्त झाली तर उत्तम, तुमच्या कृतीतून, वागण्यातून, बोलण्यातून तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीचा सन्मान करा, आदर करा, काळजी करा..'

तो - ' पण समोरच्या व्यक्तीला जर ती प्रेमभावना कळलीच नाही तर..?'

ती- ' नाही कळली तर तिचे तुमच्यावर प्रेम नाही असे समजायचे.. कारण ज्या व्यक्तीचे प्रेम असते त्याला ह्या प्रेमभावना नक्कीच कळतात.. कसे आहे ना, कोणीतरी म्हणाले आहे, प्रेम हे घडतं, घडवून आणता येत नाही..'

तो- 'पण समोरच्या व्यक्तीने असा गैरसमज करून घेतला की ह्याचे आपल्यावर प्रेम नाही तर..'

ती- ' जर एखादी व्यक्ती तुमचे प्रेम ओळखू शकत नसेल तर आयुष्यभर तुम्हाला तुमचे प्रेम समजावून सांगावे लागेल.. माझ्या मते जीवनसाथी आता असावा जो तुमचे प्रेम ओळखू शकेल..'

त्याला कळले की तिच्या मनात त्याच्याबद्दल काहीच प्रेमभावना नाही, आहे तो फक्त आदर..
पण आज ह्या विषयावर ती एवढी मनमोकळेपणाने कशी बोलत आहे.. ह्याचेही आश्चर्य त्याला वाटत होतेच..

तो- 'पण आज तू मला एवढे सर्व कसे काय सांगितलंस..'
ती- 'कारण तेवढे तरी मी तुम्हाला व्यवस्थित ओळखले आहे आतापर्यंतच्या आपल्या सहवासातून..'

तिच्या ह्या वाक्याने त्याचे तिच्यासमोरचे अवघडलेपण दूर होते आणि तो मनमोकळेपणाने पुन्हा बोलू लागतो..

तो- 'समजा तुला तो शाळेतला मुलगा परत भेटला तर तू करशील त्याच्याशी लग्न..'

ती- 'कसं आहे ना परिस्थिती माणसाला घडवते, आता तो त्यावेळी त्या परिस्थितीत योग्य होता जर तो तसाच आणि तितकाच योग्य असेल तर करेन पण लग्न..'

त्याच्या आशा पल्लवित होत होत्या.. खरंच ती शाळेतील मुलगी हीच असेल तर.. पण..

तो - 'पण तू तर लग्न करते आहेस ना आता..'

ती- 'हो ना, आणि त्याच्याशीच करते आहे ज्याला मी कानाखाली मारली होती.. त्याच शाळेतल्या मुलाशी.. आता त्याने त्याचे प्रेम त्या उंचीवर नेऊन मला पुन्हा मागणी घातली आहे.. आणि तो हयावेळी योग्य असेल तर मी नाही का म्हणू..'

त्याच्या पल्लवित झालेल्या आशा पुन्हा धुळीस मिळाल्या..
तोच तिला तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा फोन आला आणि ती जायला निघाली..

ती- 'कसे आहे ना, प्रेमाची सुरवात करणे सोपे आहे पण ते शेवटपर्यंत जिवंतही ठेवता आले पाहिजे..'

आणि..
रात्रीचे बारा वाजले.. आकाशात आतिषबाजी झाली..
आता नवीन वर्ष सुरू झाले..
गतवर्षाला निरोप देण्यात आला.. नवीन संकल्प, नवीन आशा आणि नवीन ध्येय समोर ठेवून..

त्याचीही प्रेमाची आशा पुन्हा पल्लवित झाली.. तिच्या शेवटच्या त्या वाक्याने.. ' प्रेमाची सुरवात करणे सोपे आहे पण ते शेवटपर्यंत जिवंतही ठेवता आले पाहिजे..'

कदाचित ह्या नवीन वर्षात मिळेलही आपल्याला हवे ते प्रेम, कदाचित तिच्यासरखेच होईल.. तीच मिळून जाईल जिची कानाखाली त्याला शाळेत मिळाली होती..

ती बाहेर पडत होती, तो मात्र प्रेमभावना जिवंत ठेवून घेत होता आधीच्या एकतर्फी ' प्रेमाचा निरोप..'

***
राही..©
***

सूचना - वरील लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. वरील लेख किंवा त्याचा कोणताही भाग लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय प्रकाशित किंवा मुद्रित किंवा कोणत्याही स्वरूपात वापरता येणार नाही. तसेच परवानगी घेऊन वरील लेखाचा वापर करताना त्यात लेखकाच्या नावाचा आणि मोबाइल नंबरचा उल्लेख करावा.

संपर्क : ८३७८ ०४५१४५ (राही..)

8378 045145 (Rahi..)

कथालेख