आयुबोवेन रत्नद्वीप--समारोप

Primary tabs

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in भटकंती
5 Dec 2018 - 11:46 pm

आज सकाळपासून हवा कुंद होती , ढगाळ वातावरण असल्याने पाऊस कधीही पडेल असेच वाटत होते आणि झालेही तसेच.
a
थोड्याच वेळात पाऊस पडायला लागला.मात्र आमचा नाश्ता वगैरे होईपर्यंत ढग पांगले आणि स्वच्छ ऊन पडले.
गाडी तयार होतीच. हॉटेलचे बिल चुकते करून निघालो. साधारण २ तासांचा प्रवास होता. सुरुवातीला रस्त्याच्या कडेने असणारा समुद्राचा सहवास हळूहळू संपला आणि तद्दन शहरी रस्ते लागू लागले.इतक्या दिवसात ना जाणवलेले ट्रॅफिक आणि गर्दी जराजरा दिसू लागले. खरेतर आधीही काही ठिकाणी ट्रॅफिक लागले होते पण कदाचित आम्हीच ट्रिप मूडमध्ये असल्याने ते तेव्हा इतके जाणवले नव्हते. आता मात्र खिसा रिकामा होत आला होता आणि आठवडाभराच्या भ्रमंतीने जरा दमणूकही झाली होतीच. त्यामुळे मन लहान सहान गोष्टींनी त्रासत असावे.
यथावकाश आम्ही कोलंबो शहरात दाखल झालो. पुन्हा एकदा समुद्राच्या जवळून जाणारे पण ट्रॅफिकने सिग्नलने आखलेले शहरी रस्ते मागे पडत होते. मुंबईच्या महालक्ष्मी वरळी हाजी अली किंवा केम्प्स कॉर्नर वगैरे भागात फिरताना कसे वाटेल तसेच वाटत होते. एकिकडे उपुलची टकळी चालू होती.
a

हे इथले जुने संसद भवन , हा कमळाच्या आकाराचा टॉवर, हे पंतप्रधानांचे निवास स्थान असे करत करत आम्ही पुढे चाललो होतो.
a
a
वाटेत कोलंबो राष्ट्रीय संग्रहालय लागले पण तिकडे प्रवेश फी फक्त श्रीलंकन रुपयात घेत होते आणि आमच्याकडे ते नव्हते त्यामुळे तो बेत बारगळला. एका भारतीय हॉटेलात जेवलो आणि गाडी पुढे गंगाराम टेम्पलकडे वळली.
a
प्रवेश द्वारापासूनच चित्तवेधक कलाकृती इथे स्वागत करीत होत्या.
a
आतमध्ये एक विहार , स्तूप , जुन्या मोटारींचे संग्रहालय , बोधी वृक्ष ,असेम्ब्ली हॉल असे बरेच काही होते.
a
a
a
जागोजागी कोरीव काम केलेल्या मूर्ती किवा सुंदर रंगवलेली चित्रे लक्ष वेधून घेत होती.विशेष म्हणजे प्रवेशद्वारापाशीच आम्हाला एक पत्रक दिले होते ज्यात १/२/३ असे नंबर घालून माहिती दिली होती आणि प्रत्येक वास्तूलाही तेच नंबर दिले होते.
a
त्यामुळे १ नंबर ठिकाणी उभे राहून पत्रकात १ नंबरची माहिती वाचली कि समजत होते.
a
a
तासभर तिथे घालवून भरपूर फोटोग्राफी करून पुढे निघालो.
a
कोलंबोचा स्वातंत्र्य चौक हा आमचा पुढचा टप्पा होता.साधारण आपले इंडिया गेट आणि संसद भवन परिसरात जसे वाटते तसेच इथेही शाळा कॉलेजच्या ट्रिप, गर्दी वगैरे माहोल होता.
a
फक्त आपल्या सारखे भेळपुरी पाणीपुरीवाले आणि पडलेले कागद नव्हते.
a
थोडीफार फोटोग्राफी करून निघालो.आमचा शेवटचा कार्यक्रम मॉलला भेट देणे हा होता. पण ते मॉल बघून पुण्यातले फिनिक्स मार्केट सिटी ह्यापेक्षा दसपट मोठे आहे असे वाटू लागले.शिवाय तिकडे पार्किंग साठी मारामारी होती ती वेगळीच.
थोडा वेळ तिथे घालवून उगाचच विंडो शॉपिंग करून बाहेर येऊन बसलो. ट्रिप संपल्याची एक खिन्न भावना उगीचच मनात दाटून आली.खरेतर आठवडाभर चांगलेच फिरलो होतो.मजा केली होती.वेगवेगळे अनुभव घेतले होते. या नकाशाप्रमाणे हिंडलो होतो.
a
एकीकडे डोंगरांपासून ते घनदाट जंगल आणि प्राण्यांमध्ये प्रवास तर दुसरीकडे हिल स्टेशन पासून विषुव वृत्ताजवळच्या बेंटोटा पर्यंत वास्तव्य. कधी बुद्ध मंदिरातले धीर गंभीर वातावरण तर कधी समुद्रावर अर्ध्या कपड्यात वावरणारे फॉरेनर असे सगळे अनुभवले होते. सगळीकडे श्रीलंकन लोकांचे चांगले अनुभवच आले होते.सगळी हॉटेल्स स्वच्छ आणि सुंदर मिळाली होती. कुठे बोट ठेवायला जागा नव्हती . ड्रॉयव्हर मृदुभाषी होता. रस्त्यात कुठे वादावादी /कटकट झाली नाही.गाडी बंद पडणे ,पेट्रोल संपणे, हॉटेलवर लाईट जाणे ,गरम पाणी न येणे ,सामान विसरणे, कोणी तरी आजारी पडणे वगैरे प्रकार घडले नाहीत. त्या सर्व गोष्टी लक्षात घेता ट्रिप उत्तमच झाली होती.
आता दिवस मावळू लागला होता. उपुलला गाडी काढायला सांगितली. कोलंबोची संध्याकाळची गर्दी ,ठिकठिकाणी रस्त्याची पुलांची कामे चालू असल्याने बंद केलेले रस्ते, समोरून वळणारे मोठे मोठे कंटेनर , वैतागलेले ट्रॅफिक पोलीस हे सगळे बंद काचेआडून बघताना मुंबईतच असल्यासारखे वाटत होते. तासाभराच्या झटापटीनंतर उपुलने गाडी सरळ टोल रोडवर घेतली आणि चित्र एकदम बदलले. मुंबई पुणे हायवेसारखा चौपदरी रस्ता मिळाला आणि गाडी सुसाट वेगात निघाली.अंधार पडता पडता कोलंबो एयरपोर्टला उतरलो आणि उपुलचा निरोप घेऊन पुन्हा एका कंटाळवाण्या प्रवासासाठी मनाची तयारी केली. मात्र पुन्हा कधीतरी श्रीलंकेला भेट द्यायची आणि राहिलेली ठिकाणे बघायची हे मनाशी ठरवतच.(समाप्त)

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

6 Dec 2018 - 12:13 am | श्वेता२४

छान झाली लेखमाला. ,तुमच्यासोबत आमचीही श्रीलंनका वारी झाली

समर्पक's picture

6 Dec 2018 - 2:41 am | समर्पक

अति दक्षिणेकडील श्रीलंका पहायला मजा आली. सिंहली ही महाराष्ट्री-प्राकृताची कन्या असल्याने मराठीची सख्खी बहीण... भाषेत काही साम्य जाणवले का? तसेच श्रीलंकेचे रुपये नसल्याने संग्रहालय पहिले नाही असा उल्लेख वाचला, शहरांमध्ये देखील चलनविनिमय अवघड आहे का?

मातारा-दोन्द्रा विषयी थोडी निराशा झाली. भारतवर्षाचा हा दक्षिणतम बिंदू; ह्या वैशिष्ट्यासाठी हा भाग भटकंतीच्या यादीत आहे. देवीनुवाराचे उपुलवन्न (उत्पलवर्ण - विष्णू) हिंदू-बौद्ध मंदिर, व देवीनुवारा नावावरून तेथे एखादे देवीचे मंदिरही असावे, त्याविषयी उत्कंठा होती. त्याविषयी अधिक काही असेल तर नक्की लिहा. पुढील लेखनासाठी अजून एक सूचना, भेट दिलेल्या ठिकाणांचा एक नकाशा समाविष्ट करता आला तर त्याला एक नेमके स्थलदर्शक परिमाण येईल.

श्रीलंकेची सफर घडवून आणल्याबद्दल धन्यवाद!

विजुभाऊ's picture

6 Dec 2018 - 11:51 am | विजुभाऊ

भाषेत काही साम्य जाणवले का?

खूप शब्द मराठी सारखे आहेत. उच्चार जरा नीत ऐकले तर बोध होतो.
काही शब्दांचे अर्थ बदल होतात. उदा : उदार या शब्दाचा अर्थ प्रेम असा होतो.

विजुभाऊ's picture

6 Dec 2018 - 7:16 am | विजुभाऊ

मार्च पासून मी श्रिलंकेत रहातोय. तुम्ही सांगताय ते रोज अनुभवतोय.
खरेच खूप सुरेख देश आहे.
पण हा देश थोडा जवलून अनुभवल्यानंतर जे जाणवतय ते खूप विषण्ण करणारे आहे.
हा देश एका आर्थीक ज्वालामुखी वर उभा आहे .
कसलेच उत्पादन नाही , लोकाना कामे नाहीत,आर्थव्यवस्था पूर्ण कोलमडली आहे. गल्फमधून जे डॉलर येतात त्यावर देश चाललाय.
पूर्न आयातीवर अवलंबून असल्यामुळे डॉलर वढला की चलनफुगवटा वाढतोय.
साधे घर स्वच्छ करण्यासाठी दिवसाला चार हजार रुपये द्यावे लागतात माणसाला.

साधी नॅनो गाडी तेवीस लाखाला मिळते. शेंगदाणेही चीन मधून आलेले पाहिलेत.
बरेचासे इन्फ्रास्ट्र्क्चर चीन करुन देते. अगदी रस्ते, एअरपोर्ट , वीज प्रकल्प बंदर सुद्धा. ( श्री लंका चीन चा माम्डलीक होइल का इतकी भिती वाटते )
हम्बन टोटा भागात तर चीनीलोकांची स्वतंत्र वसाहत आहे
इथले सरकार बाहेरुन येणार्‍या मालावर तीनशे टक्के कर आकारते आणि श्रीमंत होते.

राजेंद्र मेहेंदळे's picture

6 Dec 2018 - 1:17 pm | राजेंद्र मेहेंदळे

@ विजुभाऊ- तुम्ही म्हणताय ती महागाई पदोपदी जाणवते श्रीलंकेत. शिवाय पेपरमधील बातम्यातुन चीनचे वाढणारे वर्चस्व जाणवते आहेच दिवसेन्दिवस तिकडे. स्थानिक उत्पादन किवा कारखाने जवळ जवळ दिसलेच नाहित.
@समर्पक- जेव्ह्ढे बघितले तेव्ह्ढे शब्दात मांडायचा प्रयत्न केलाय. सगळेच जमलेय असे मझेही म्हणणे नाहीये. नकाशाचे बरे सुचवलेत.टाकतो आता.
संग्रहालय बघता आले नाहि कारण तिथे कार्ड स्वाईप मशीन नव्हते. आणि भारतीय रुपये घेत नव्हते तिकिटासाठी. पण हा एक सरकारी अपवाद. बाकी सर्व हॉटेल मध्ये कार्ड चालते आणि सर्वत्र भारतीय रुपये किवा यु.एस. डॉलर घेतात. त्यामुळे तशी गैरसोय होत नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Dec 2018 - 1:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर देशाची सुंदर सहल. आवड असल्यास, पुढच्या वेळेस श्रीलंकेच्या प्राचीन वैभवालाही भेट द्या... खूप पाहण्यासारखे आहे.

आवडत्या शेजारी देशाची सफर छान ! फोटो झकास आहेत.

स्थानिकांशी झालेल्या तुम्च्य संवादात भारतीयांबद्दल भावना मित्रत्वाची वाटली की कसे ह्याबद्दल उत्सुकता आहे.

पु ले शु,

अनिंद्य

अनिंद्य's picture

6 Dec 2018 - 3:57 pm | अनिंद्य

तुमच्या *

चार चार नव्वद's picture

6 Dec 2018 - 4:23 pm | चार चार नव्वद

राजेंद्रजी, तुमच्या लेखांमुळे लंका प्रवासाची इच्छा झाली. बघूया कधी जमतंय. फोटो आवडले. पुढील प्रवासासाठी शुभेच्छा!!!

सुधीर कांदळकर's picture

6 Dec 2018 - 4:58 pm | सुधीर कांदळकर

गोष्टीला आदि अंत असतो. जितका अनुभव सुखद तितके पूर्णत्व जलद आले असे वाटते. लेखमाला संपूच नये असे वाटतांना ती पूर्ण झाली देखील. दाट दाट हुरहूर लावून.

सुंदर लेखमालेबद्दल अनेक अनेक धन्यवाद.

छान झाली लेखमालिका. आवडली.

कंजूस's picture

6 Dec 2018 - 6:20 pm | कंजूस

मलाही आवडले लेख. सगळ्या पौर्णिमांना सुट्टी असते म्हणतात.

खिलजि's picture

6 Dec 2018 - 6:32 pm | खिलजि

मेहेंदळे साहेब , मी श्रीलंकेला गेलो नाही . पण हि सुंदर लेखमाला वाचली, सारी चित्रं बघितले कि एक प्रश्न मनात डोकावू पाहतोय .. मला सांगा तिथे झोपड्या दिसल्या का कुठे ? का सर्वच हिरवंगार होतं ..

खिलजी साहेब तिकडे झोपडपट्टी दिसली नाही.
कदाचित मोठी शहरे फारशी नाहीत आणि लोकसंख्याही कमी असल्यामुळे असेल.पंण हल्ली तिथे शेतीसाठी मनुश्यबळ मिळणे कमी झालेय.
त्यामुळे एक वर्ष असे गेले की तांदुळही आयात करावा लागला.
एक गमतीदार गोष्ट तिथे पाहिले की लोक भर समुद्रात मत्स्यशेती करतात
खाडीत इंवा उथळ समुद्रात एखादा चौकोन बांबुंच्या सहाय्याने आखून तो जाळी लावून बम्दीस्त करतात. वरील बाजुने ही गवत किंवा पाणवनस्पतीने झाकतात.
हा झाला शेतीसाठी प्लोट. या शेतीत लॉब्स्टर किंवा इतर चांगले उत्पन्न देणारे मत्स्य बीज सोडतात.
ज्या ज्या वेळेस हवे असेल तेंव्हा कमी कष्टात ताजे मासे/ लॉबस्टर मिलतात
काही समुद्र किनारे हे निव्वळ खेकड्यांसाठी प्रसिद्ध आहेत.

राजेंद्र मेहेंदळे's picture

7 Dec 2018 - 4:07 pm | राजेंद्र मेहेंदळे

झोपड्या दिसल्या पण झोपडपट्टी नाहि. आपल्या कोळी लोकांची किनार्‍याने बांधलेली घरे जशी दिसतात तशी काही घरे समुद्राकठी दिसली. गाव भागात पाणथळ जाग बर्‍याच दिसल्या, भातशेतीही दिसली. तसेच विजुभाउ म्हणताहेत तशी मस्त्य शेती आणि बांबु उथळ समुद्रात रोवुन मासेमारीपण चालते. एकुणात लोक खाउन पिउन समाधानी (किव अल्प संतुष्ट म्हणा) वाटले.

प्रचेतस's picture

7 Dec 2018 - 8:44 am | प्रचेतस

उत्तम लेखमाला झाली ही.

टर्मीनेटर's picture

7 Dec 2018 - 12:40 pm | टर्मीनेटर

छान झाली लेख मालीका...मजा आली तुमचा अनुभव वाचायला.

दुर्गविहारी's picture

7 Dec 2018 - 6:41 pm | दुर्गविहारी

पुर्ण लेखमाला आवडली. फक्त ट्रिपचा नकाशा असता तर अंदाज आला असता.

राजेंद्र मेहेंदळे's picture

7 Dec 2018 - 7:47 pm | राजेंद्र मेहेंदळे

सुचनेबर हुकुम नकाशा दिला आहे.